Wednesday, February 1, 2017

अनिष्ट प्रथांशी दोन हात करणारा प्रमोद चंदाके


      आपला देश काही क्षेत्रात मोठी झेप घेत आहे.देशाचा नावलौकिक होत आहे,मात्र या नाण्याला दुसरी एक काळी बाजू आहे. ती म्हणजे अनिष्ट रुढी-परंपरा.मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे.आपला देश वाईट प्रथा-परंपरांनी भरलेला आहे.विशेष म्हणजे याचे लोकांनाही काही वाटत नाही. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात राहणारा प्रमोद सदाशिव चंदाके या तरुणाने या गोष्टी अगदी जवळून पाहिल्या आहेत. हा  जिल्हा बालविवाह,हुंडाप्रथा,वेश्यावृत्ती, देवदासी प्रथा,मानवी तस्करीसारख्या समस्यांचा बळी ठरला आहे. दुर्दैव असे की, या परिसरातले लोक अशा प्रकारचे गुन्हे रोखायचे किंवा विरोध करायचे सोडून त्यांना आपल्या जीवनाचा भाग मानून त्यातच जगत असतात. त्यामुळे या सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात आवाज उठवण्यासाठी धाडस बांधणं,हे एक मोठे आव्हान आहे. बेळगाव क्षेत्रातील बहुसंख्य समाज बराच मागासलेला आहे. इथले लोक आजदेखील मानतात की, बालविवाह,हुंडाप्रथा,वेश्यावृत्ती आणि देवदासीप्रथा सामाजिक परंपरांचा एक भाग आहे. देशाच्या विकासाची माहिती प्रसारमाध्यमे भरपूर देतात,पण अंधश्रद्धेच्या अनिष्ट प्रथांबाबत मात्र तळमळीनं कोणी दखल घेतली नाही. कलंकित करणार्या या रुढींनी बदलत्या काळानुसार वेगळं रुप धारण केलं आहे हेही प्रकर्षाने जाणवते.
 
   प्राचीन काळापासून ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात  या प्रथेचे प्राबल्य जास्त आहे. आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून जेव्हा परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात, तेव्हा महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, जागतिक महिला दिन हे शब्द तरी त्यांच्या परिचयाचे आहेत का ? हा प्रश्न पडतो.
     प्रामुख्याने रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळया वाहिल्या जातात. देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं. तिला देवाला सोडणं, देवाशी तिचा विवाह लावणं हे सर्व निर्णय तिचे आई-वडील आणि भाऊच घेत असतात. मात्र अमानुषपणे पुढे तिच्या देहाचा जो छळ होत राहतो तो मात्र तिलाच सहन करावा लागतो. प्रमोद चंदाके समजून चुकले होते की, या सगळ्या समस्यांचे मूळ लोकांच्या मानसिकतेत दडले आहे. या गर्तेतून इथल्या लोकांना बाहेर काढण्याची आवश्यकता आहे,हेही त्यांनी जाणले होते.यासाठी त्यांचे मन अस्वस्थ होऊन उठायचे.इथले गरीब आणि महिला या सामाजिक अवगुणांनी सर्वाधिक प्रभावित होत्या. या गोष्टी पटत नसतानाही विरोध करू शकत नव्हते.कारण त्यांना परंपराने चालत आलेल्या गोष्टींमध्ये काही वावगे आहे, असे वाटत नव्हते.

प्रमोद चंदाकेंना वाटायचे की, ज्या गोष्टींमुळे लोक खूश नाहीत, त्या गोष्टी योग्य कशा असतील?त्यामुळेच त्यांनी ठरवले की, ही सिस्टीम बदलली पाहिजे. त्यांनी कॉलेजला असल्यापासूनच यासाठी जागृती प्रसारणाचे काम हाती घेतले. त्यावेळेला ते सोशल वर्कचे विद्यार्थी होते. आपल्या सहकारी मित्रांशी याबाबत त्यांनी चर्चा केली आणि तीन लोकांची टीम बनवून स्थानिक संस्थांमधून याबाबतचे आकडे गोळा केले. यानंतर सुरू झाले त्यांचे जागृती प्रचाराचे काम. लवकरच  त्यांच्या तीन लोकांच्या टीमला दोन बालविवाह थांबवण्यात यश आले.मात्र त्यांना मोठ्या विरोधाशी दोन हात करावे लागले.मात्र या पुढाकाराने त्यांच्यातला विश्वास दुणावला. काही काळानंतरच्या घटनांमध्ये काही महिलांची वेश्यावृत्तीच्या दलदलीपासून त्यांनी सुटका केली.हुंडा आणि घरगुती हिंसा यांशी संबंधीत थंड बस्त्यात पडलेल्या काही प्रकरणांना तडीस नेण्यातही त्यांना यश आले. एचआयव्ही पिडित मुलांना भोजन,निवास आणि शिक्षण व्यवस्था मिळवून देण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर शिक्षण सोडलेल्या तीस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कामही केले.इतके करूनही त्यांना वाटत होतं की, आपण असे काही केले नाही, ज्याच्याने खूश व्हावे. प्रमोद सांगतात की, आमच्या टीममधल्या महिला सदस्यांमुळे बर्याच गोष्टी साध्य करता आल्या.इथल्या महिलांशी सुरक्षित यौवन संबंधांबाबत बोलणे फारच लज्जास्पद आणि अस्वीकार्य मानले जाते. मात्र टीममधील महिला सदस्यांनी याबाबतच्या जागरुकता प्रसारणात उल्लेखनीय भूमिका निभावली. असे असूनही त्यांना लोकांचे अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. कारण त्यांना वाटत होतं की, आपण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेला छेद देत आहोत. काही लोक तर त्यांचे ऐकूनही घ्यायला तयार नव्हते,त्यांना तिथून हाकलून द्यायचे. यामुळे ते निराश व्हायचे. आपल्या प्रयत्नांना लोक कधी समजून घ्यायचे, असे त्यांना वाटायचेलोकांचे असहकार्यामुळे या सामाजिक कलंकांशी लढतानाचे धैर्य गळून पडतेय की काय वाटायचे,पण त्यांनी हार मानली नाही. ते आपले काम त्याच जोमाने,त्याच नेटाने आजही करत आहेत.

No comments:

Post a Comment