Thursday, February 23, 2017

महाराष्ट्राचादेखील श्‍वास कोंडला


     दिवसेंदिवस देशातील
प्रदूषण वेगवेगळ्या कारणांनी वाढत असून, आजूबाजूला पाहिल्यावर आणि नागरिकांच्या आरोग्यात होत असलेल्या बदलांतूनही जाणवत आहे. याचा परिणाम  आपल्या महाराष्ट्रातही प्रकर्षाने जाणवत आहेच पण केंद्राच्या एका अहवालानुसार त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एका अहवालानुसार महाराष्ट्रातील 17 शहरे अतिप्रदूषित असल्याची स्फोटक आकडे जाहीर झाले आहेत.देशातील 94 शहरांत राज्यातील तब्बल 17 शहरांचा समावेश यात आहे. निव्वळ वायू प्रदूषणाने देशात दरवर्षी किमान सहा हजार लोक मृत्युमुखी पडतात हा जागतिक संस्थेचा अहवाल आहे. मुंबई,नवी मुंबई,उल्हासनगर,बदलापूर,पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद,चंद्रपूर,जळगाव,जालना, सांगली, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर या शहराचा या प्रदूषण यादीत नाव आहे.
आपल्या देशाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव यांना प्रदूषणामुळे माणसे मरतात, हे दिसले नाही. असा अजब तर्क काढून त्यांनी आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. आता या गोष्टी पुढे हसावे की रडावे, हेच कळेनासे झाले आहे. वास्तविक अलिकडच्या काळात प्रदूषणात झालेली वाढ सातत्याने जाहीरपणे मांडली जात आहे. दिल्ली शहर तर आवाक्याबाहेर गेल्याचे सांगितले जात आहे. सध्या या शहरात प्रदूषण घटावे म्हणून कमालीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अन्य शहरात असे प्रयत्न होताना दिसत नाहीत,ही दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे. केंद्र शासनाने आणि राज्य सरकारांनी यावर अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषणात घट आणण्यासाठी हालचाली करण्याची आवश्यकता आहे, नाही तर आपल्या आणखी लोकांचा द्यावा लागणार आहे.
     एका अहवालानुसार आपल्या भारतात दर मिनिटाला सरासरी दोन लोक प्रदूषणाने निर्माण झालेल्या विकारांचे बळी ठरतात. या वर्षात ही संख्या दहा लाखांवर  जाण्याची शक्यता आहे. अहवालात असे आढळले आहे की, जगातली अतिशय प्रदूषित असलेली शहरे मोजली तर अशा यादीत भारतातल्या सर्वात अधिक शहरांचा समावेश होतो. भारत आणि त्यातल्या त्यात दक्षिण आशिया हा भाग प्रदूषणाने बाधित झाल्याने अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त आहे. अपुर्या दिवसांची मुले जन्मण्याचे प्रमाण भारतात जगात सर्वात जास्त आहे. 2020 साली महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहणारा हा देश याबाबतीत जगातल्या सर्वात गरीब देेेशांच्याही मागे आहे. प्रदूषणातून निर्माण होणार्या अपुर्या दिवसांच्या प्रसूतीच्या समस्येतही असेच आपण जगात सर्वांच्या पुढे आहोत. अमुक एक समस्या केवळ महिलांंना त्रासदायक ठरणारी आहे असे दिसले तर ती सोडवण्याच्या बाबतीत सगळेच उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

      पर्यावरणात बदल होत आहे. तो बदल आणि हे वाढते हवेचे प्रदूषण या एकमेकांत गुंतलेल्या समस्या आहेत. त्यांची सोडवणूक होण्याची गरज आहे. वाढत्या प्रदूषणाने मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. हवामानात ऋतुनुसार होणार्या बदलाने हिवाळ्यात धुके निर्माण होते हे आपण अनेक वर्षे अनुभवत आहोतच. पण आता या धुक्यात प्रदूषक घटकांची भर पडून भारताच्या उत्तर भागातल्या अनेक शहरात एक विचित्र समस्या निर्माण झालेली दिसत आहे. या विशिष्ट हवेने शाळांना सुटी द्यावीं लागते. रेल्वेची वाहतूक बंद होतेे. हवाई वाहतूक विस्कळीत होते आणि नागरी जीवनावर वाईट परिणाम होतो, एकूणच प्रदूषणाची ही वाढ भयावह झाली आहे.
     अरोग्याच्या संदर्भात प्रसिध्द होणार्या लान्सेट या मासिकाने प्रकाशित केलेल्या ताज्या आकड्यांवरून जगातले हवेचे प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेले आहे, हे सिद्ध होते. हे संकट भारतात तर गंभीर झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या शहराची प्रदूषणाची पातळी किती असावी याचे काही निकष निश्चित केले आहेत. भारतातल्या 300 प्रमुख शहरांची पाहणी केली असता असे लक्षात आले की, देशातल्या एकाही शहराची प्रदूषणाची पातळी या जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या निकषात बसत नाही. म्हणजे या निकषाच्या बाबतीत असे म्हणता येते की भारतात एकही प्रदूषणमुक्त शहर नाही. अर्थात हे प्रदूषण घातक आहेच हे काही सांगण्याची गरज नाही. त्यापासून रोज नवे विकार पसरत आहेत. त्यामुळे अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे. असेच होत राहिले तर आपल्या देशातील शहरेच नष्ट होण्याची भीती आहे. खेड्यातला माणूस रोजगारासाठी शहरात जात आहे. तो या प्रदूष्णाला बळी पडत असेल तर त्याच्या जिवावर जगणार्या माणसांचे काय? असा सवाल उपस्थित होतो.या प्रदूषणामुळे अनारोग्याला तर निमंत्रण मिळत आहेच,पण यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत, याचा विचार व्हायला हवा आहे. शासकीय पातळीवर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जातीने आणि वेगाने प्रयत्न व्हायला हवे आहेत.

No comments:

Post a Comment