पूर्वीच्या काळातील माणसे आणि आताच्या काळातील माणसे यांच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल झालेला दिसून येईल. पूर्वीच्या काळी मोठय़ा कष्टाची कामे करणार्या व्यक्तींना वेगळ्यावेगळ्या व्यायामाची गरजच भासत नसे. अर्थात त्यांना कराव्या लागणार्या कष्टामुळे त्यांच्याकडे इतर गोष्टींसाठी वेळच नसे, हा भागही तितकाच महत्त्वाचा आहे, पण नवनवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आल्यावर दैनंदिन जीवनातही त्याचा वापर वाढला. त्यामुळे वेळेबरोबर कष्ट वाचू लागले. परिणामी कष्टाच्या कामामुळे शरीराला मिळणारा व्यायाम कमी झाला. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी वेगळे उपाय करणे क्रमप्राप्त झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे संपूर्ण जीवनाचा ढाचाच बदलून गेला आहे. त्यामुळे विविध आजारांना आपोआपच निमंत्रण मिळायला लागले आहे. त्यामुळे आपल्यासारखीच स्थिती भावी पिढीची होऊ नये, यासाठी आतापासूनच आपल्याला काळजी घ्यायला हवी.
एक सजग पालक म्हणून काही तत्त्वांचे पालन आपण आपल्या मुलांसाठी करायला हवे. शालेय वयात मुलांची योग्य रीतीने शारीरिक, मानसिक तसेच भावनिक वाढ होणे आवश्यक असते. वाढत्या वयानुसार वजन व उंचीमध्येही योग्य वाढ होणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींसाठी शरीराची योग्य हालचाल होणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे वजन तसेच उंचीचे संतुलन राखले जाते. असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अलीकडे बदललेल्या जीवनशैलीनुसार वाढत्या वयातच मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे. त्यामुळे हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. मुलांनी दररोज किमान एक तास व्यायाम करणे अथवा घराबाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे, पण शरीराची ही गरज आज पुरवली जात नाही. वाढत्या वयातील मुलांची जीवनशैली दिवसेंदिवस अधिकाधिक बैठी होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. त्यामुळे त्याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा. मुले एकदा शाळेत जायला लागली की, मग शालेय विषयांबरोबरच निरनिराळ्या विषयांच्या शिकवण्यांच्या गराड्यात ती हरवून जातात. त्याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षकांच्या व पालकांच्या अभ्यासाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांचा अधिक वेळ जातो. त्यामुळे मुलांना खेळायला तसेच बागडायला वेळच उरत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्यामुळे किंवा भ्रमणध्वनी, संगणकावर खेळल्यामुळे सकाळी लवकर उठता येत नाही. त्यामुळे सकाळी व्यायाम करण्याची वेळ निघून गेलेली असते. तसेच संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर मुलांना पुन्हा शिकवणीला जायला लागते. त्यानंतर टीव्हीवर काटरून बघण्यात वेळ जातो. त्यामुळे मैदानी खेळ खेळता येत नाही. परिणामी शरीराला व्यायामही मिळत नाही. असे अनेक दिवस झाल्यास त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. काहीजणांचा लठ्ठपणा वाढतो. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम मुलांच्या जीवनावर होत आहे, तर मुलांच्या काही गोष्टी शहरी जगण्याशी जोडलेल्या आहेत. मुलांना खेळायची इच्छा असेल तरीही ते रहात असलेल्या इमारतीच्या आवारात खेळायला मोकळी जागाच नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. अशी स्थिती आज अनेक शहरात आहे. त्यामुळे परिसरातील जागेची कमतरता मुलांच्या मनावर परिणाम करते. तसेच त्यांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम करते. शाळेत जाणार्या मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांना तंदुरुस्त राहता येईल. मुलांनी शाळेत चालत किंवा सायकलवरून गेल्यास त्याचा फायदा त्यांना निश्चितच होईल. जागेअभावी खेळता येत नसलेल्या मुलांना पालकांनी कराटे, बॉक्सिंग, स्वीमिंग, टेनिस अशा खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त करावे. या खेळामुळे मुलांच्या शरीराला सर्वांगसुंदर असा व्यायाम मिळेल. तसेच त्याचा फायदा पुढील आयुष्यात त्यांना होईल. लहान वयामध्ये मुलांना नवीन खेळ व छंद जोपासणे सोपे जाते. त्यामुळे त्यांना तसे वातावरण तयार करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. सुटीच्या दिवशी मुलांना समुद्रकिनारी घेऊन जाऊन तिथे पकडापकडीसारखे खेळ खेळणे तितकेच महत्त्वाचे आहे. वाळूचे किल्ले बनविणे, पोहण्याची स्पर्धा घेणे असे केल्याने मुलांनाही एक वेगळेपण अनुभवता येईल. मैदानी खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक प्रगती होते. त्यामुळे तसे खेळ मुलांनी खेळले पाहिजेत. त्याचबरोबर एकाग्रता वाढविणारे खेळ खेळण्यास मुलांना पालकांनी सुचवावे. नेमबाजी, पतंग उडविणे यासारख्या खेळांचा समावेश यामध्ये करता येईल. अगदी घरातल्या घरात दोरीच्या उड्या मारल्यामुळेही शरीराला चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे पालकांनी सजगपणे आपल्या मुलासाठी सर्जनशील व सुरक्षित व्यायामा सुचवावे.
No comments:
Post a Comment