Tuesday, February 28, 2017

बचतगटातून स्वयंरोजगार

     बचत गट म्हणजे सामान्यतः 10 ते 20 महिलांचा अनौपचारिक समूह. किंवा एका निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन आणि स्वेच्छेने एकत्र आलेल्या महिलांचा गट म्हणजेच बचत गट. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने बचत गट आहेत. बचत गटांच्या मोहिमेची सुरुवातदेखील अपघाती रूपातच झाली. बांगलादेशचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. महमूद यूनूस हे जोबरा या खेड्यात गेले असता, त्यांनी पाहिले की तेथील महिला टोपल्या बनवितात; मात्र कच्चा माल घेण्यासाठी या सर्व महिला सावकाराकडून अधिक व्याजदराने कर्ज घेतात. टोपल्या विकल्यानंतर, कर्ज फेडल्यावर या महिलांच्या हाती काहीच राहत नसे. डॉ. यूनूस यांनी 42 महिलांना एकत्र करून त्यांना त्याकाळाचे 500 टाका कर्ज म्हणून दिले. हे कर्ज एका महिलेचे नसून, तुमच्या गटाचे आहे असे सांगितले. महिलांनी टोपल्या बनवून विकल्या आणि त्यांना त्या व्यवहारातून कर्ज फेडल्यावर नफा देखील झाला. याच घटनेनंतर डॉ. महमूद यूनूस यांना सूक्ष्म वित्त आणि बचत गटांची ताकत दिसली. याच मोहिमेची परिणती म्हणजे बांगलादेशातील ग्रामीण बँकेची स्थापना. डॉ. युनूस यांना या कामासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
     बचत गटांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यामुळे महिलांचे संघटन बळ वाढते. आपण बरेच वेळा वृत्तपत्रात वाचतो की बचत गटांच्या महिलांनी गावातील दारूचे गुत्ते आणि इतर अनिष्ट व असामाजिक कामे बंद पाडली. ही ताकद या सामान्य महिलांमध्ये येते कोठून, तर बचत गटाच्या माध्यम ातून वाढलेल्या संघटन बळातून. या व्यतिरिक्त बचत गटाचा मुख्य फायदा म्हणजे महिलांना अडीअडचणीच्या वेळेस कमी व्याजदराने उपलब्ध होणारे हक्काचे अर्थसहाय्य. आज अनेक बचत गट केवळ बचत करत नसून त्यापुढे जाऊन यशस्वीरीत्या स्वयंरोजगार करीत आहेत. सध्या असे अनेक बचत गट आढळून येतात ज्यांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली आहे आणि आज या गटातील महिला या कंपनीच्या संचालिका आहेत. काही बचत गटांनी आपली बँक सुरू केलीय. याशिवाय वार्षिक पाच कोटींच्या वर उलाढाल करणारे गट देखील आहेत. बचत गटाची विभागणी लिंग, वास्तव्य आणि आर्थिक उत्पन्न आदी बाबींवर होते. याप्रमाणे बचत गटाचे प्रकार म्हणजे महिला बचत गट, पुरुष बचत गट, ग्रामीण बचत गट, शहरी बचत गट व दारिद्य्र रेषेवरील व दारिद्य्ररेषेखालील बचत गट. बँकेत बचत गटाच्या नावाने खाते उघडणे आवश्यक असते. गटाची नोंदणी करावयाची असेल तर शहरी विभागात महापालिकेत अथवा नगरपरिषदेत तर ग्रामीण भागात पंचायत समितीच्या कार्यालयात करावी लागते. बचत गट बनविणे ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे.
      शासनाने जास्तीत जास्त महिला या मोहिमेत सहभागी व्हाव्यात याच उद्देश्याने बचत गटांना कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकविले नाही. बचत गट बनवायचा असेल तर फक्त एका वाडीतील, वस्तीतील किंवा गावातील दहा ते वीस महिलांचा एक गट बनवावा, त्यांना आपली संकल्पना सांगावी, गटास नाव द्यावे, गटाचे नियम बनवावेत, दर म हिन्यास गोळा करावयाची रक्कम सर्वानुमते ठरवावी आणि पदाधिका-यांची निवड करुन ते ठराव पारीत करून बँकेत बचत गटाचे खाते उघडावे. पदाधिकार्यांमध्ये अध्यक्षा, सचिव व खजिनदार ही पद आवश्यक असतात; मात्र काही मोठे गट उपाध्यक्ष, सहसचिव, सहखजिनदार, सल्लागार आदी पदे देखील ठेवतात. केवळ काही शासकीय योजनांचा किंवा कर्जयोजनेचा लाभ मिळावा इतक्या संकीर्ण उद्देशापोटी बचत गट बनवू नये. बचत गटांची वर नमूद केलेली ताकद लक्षात ठेवावी आणि गट स्थापन करुन स्वयंरोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करावा. स्वयंसिद्धा होऊन स्वतःस आणि इतरांस आपली खरी शक्ती काय आहे याची प्रचिती द्यावी. एक स्त्री जी संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकते तिला हे करणे अजिबात अशक्य नाही. मात्र हे साध्य करण्यास लागेल ती फक्त इच्छाशक्ती; जी सुप्तावस्थेत आहे, ती जागृत करा, दुरदृष्टी बाळगा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती स्वप्ने पुर्ण करण्याची जिद्द निर्माण करा. यश तुमचेच आहे.



No comments:

Post a Comment