Monday, February 13, 2017

(रहस्यकथा) भिंतीलाही कान असतात


     का कुणास ठाऊक पण जयसिंगला झोप काही येत नव्हती. त्याच्या रूमच्या अगदी पाठीमागून  स्टेशनकडून येणारा रस्ता जात होता. रात्रीच्यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसायची, पण स्टेशनमधून येणारा इंजिनच्या कर्णकर्कश शिट्टीचा आवाज  आणि चाकांची धडधड रात्रीची शांतता भंग करीत होती. जयसिंग  कित्येकदा  विचार करायचा, तिकडे कुठे तरी शांत ठिकाणी  राहायला जावं, पण त्याची योजना काही सफल होत नव्हती.
     मध्यरात्र सरली  होती. या अंगावरून त्या अंगावर होता होता , कोण जाणे त्याला कधी झोप लागली होती. पण स्टेशनमधल्या गाडीच्या शिट्टीने अचानक ती उडाली. तो  पुन्हा  झोपण्याचा आयास  करू लागला. तेवढ्यात बाहेर रस्त्यावर गाडी थांबल्याचा  आवाज आला. रूमच्या पिछाडीसच असलेल्या  रस्त्यावर दोन माणसे आपापसात काही तरी कुजबजत होती. इतक्यात त्याच्या कानाला त्याचे आपले नाव जयसिंग  ऐकायला आले.
     जयसिंगने  पटकन उठून खिडकी उघडली आणि बाहेर काळोखात डोकावू लागला, परंतु रस्त्यावर कोणीच दिसले नाही. जयसिंग विचारात   पडला. एवढ्या  काळोख्या रात्री काही अनोळखी माणसे त्याच्याविषयी काय बरं विचार करत असतील? खरं तर  पोलिसात कळवायला काही  खास असं  कारण घडलं नव्हतं. कदाचित  त्याला भाससुद्धा झाला असण्याची शक्यता होती.
     जयसिंगने कशी तरी रात्र काढली. मग सकाळी आपल्या मित्राला- हंबीरला फोन केला. तो एक प्रायव्हेट  डिटेक्टीव  होता. तो लगेचच आला. खिडकीत उभा राहून रस्त्याकडे पाहात राहिला. नंतर खाली जाऊन त्याने आवाज आलेल्या ठिकाणाची पाहणी केली. पण तिथे काही सुगावा लागला  नाही.
     ''ठीक आहे, आज रात्री पुन्हा लक्ष ठेव.'' हंबीर म्हणाला आणि निघून गेला.

     दिवसा आणखी एक घटना घडली. ज्याने जयसिंग हादरलाजयसिंगचा मित्र दामोदरचा फोन आला. त्याच्या घरावर रात्री दरोडा पडला होता.
     जयसिंग  लागलीच  दामोदरच्या घरी गेलादामोदरने सांगितले, '' रात्री दोनच्या सुमारास अचानक दारावर खटखट झाली. मी चमकून विचारलं, तर बाहेरच्या व्यक्तीनं तुझं नाव घेतलं. मी दरवाजा उघडला  आणि दोन माणसे जबरदस्तीने  आत घुसली. त्यांनी मला बांधलं. नोकराला खोलीत डांबलं. नी मग  कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये घेऊन पसार झाले.''
     जयसिंगने  दामोदरला रात्रीच्या एक वाजताची घटना सांगितली. म्हणाला, '' म्हणजे, माझ्या घराच्या  पिछाडीस  उभे राहून बोलणारे  लोक निश्चितच मला जाणणारे आहेत. त्यांनी माझे नाव घेऊन तुला  तुला दरवाजा उघडायला भाग पाडले. ''
     वृत्तपत्रात  दामोदरच्या घरावर पडलेल्या दरोड्याची बातमी तपशिलाने प्रसिद्ध झाली होती. रूमवर आल्यावर  जयसिंगने  हंबीरला फोन केला. तो जयसिंगला म्हणाला, ''आता एक निश्चित झाले की, काल रात्री तू जे  तुझे नाव ऐकले होतेस, ते बरोबर होते. कदाचितदामोदरला लुटणारे लोक तुझ्या घराच्या पाठीमागे काही क्षण थांबले असावेत. त्याचवेळेला त्यातल्या एकाने तुझे नाव घेतले असावे आणि योगायोगाने ते तू ऐकलंस.दरोडेखोरांना ते तुझ्या रूमच्या अगदी निकट  उभे आहोत, याचा अंदाजसुद्धा नसणार. ''
     संध्याकाळी हंबीर  जयसिंगच्या घरी आला. तो म्हणाला, ''मी रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन विचारपूस केली. स्टेशन मास्तरने सांगितलं की, रात्री एकच्या गाडीने दोन माणसे उतरली होती. ते कोल्हापूरहून आले होते. खात्रीने ज्यांनी  तुझ्या मित्राच्या- दामोदरच्या घरावर दरोडा टाकला, ते तेच आहेत. ''   अचानक जयसिंगला दामोदरची कुठली तरी गोष्ट आठवली. तो पटकन  म्हणाला, ''हंबीर, अरेएक महत्त्वाची गोष्ट अशी की, दामोदरचे बँक खाते कोल्हापूरमधल्या  बँकेत  आहे. बदली झाल्यापासून अद्याप त्याने इथे मिरजेला खाते काढले नव्हते आणि त्याने  त्यादिवशी तिथून दोन लाख रुपये काढून आणले होते. ''
     हंबीर  विचार करून म्हणाला, ''कोल्हापूर  या केसमधला महत्त्वाचा दुवा आहे. दामोदरने बँकेतून  काढलेले दोन लाख रुपये  नक्कीच कुणाला तरी माहित होते. ''
     ''मग तो कोण असू शकतो!  कोल्हापूरमधल्या कोणाला तू ओळखतोस का? '' हंबीरने विचारलं.
     ''माझ्या आठवणीप्रमाणे तर कोणी नाही. '' जयसिंग.
    ''पण दरोडेखोरांमधला कोणी तरी आहे, की जो तुला ओळखतो. पण ते तुझे नाव घेऊनच  दामोदरला दरवाजा उघडायला लावायचे, अशी योजना करूनच  आले होते. आणि घडलेही तसेच. रात्री तुझे नाव ऐकून  दामोदर  गोंधळला असावा आणि त्या गोंधळाच्या  गडबडीतच  त्याने दरवाजा उघडला असावा. त्यामुळे त्यांचं काम सोपं झालं.''
     ''त्यामुळेच  तर या दरोड्याचा आळ माझ्यावर येतो. ''   जयसिंगच्या असल्या  बोलण्यावर  हंबीर मोठ्यानं हसला. त्याने  जयसिंगच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, '' मित्रा, मला वाटतंतुझं नावच या केसचा गुंता सोडवू शकतं.आपल्याला याबाबतीत आणखी तपास करायला हवा. ''
     दरोड्याचा तपास पोलिस आपल्या पद्धतीने करत होते. इकडे  हंबीर  आणि जयसिंग पुन्हा एकदा  स्टेशन मास्तरला  जाऊन भेटले. त्याने ती रेल्वेची तिकिटे दाखवली, जी त्या माणसांनी उतरताना गेटवर त्याला दिली होती. त्यात प्रवासाचा  आरंभ कोल्हापूरमधून असल्याचा उल्लेख होता.
     ''त्या माणसांना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकाल का? '' हंबीरने विचारले.
   ''हो, नक्कीच! फक्त ते दोघेच त्या ट्रेनमधून उतरले होते. ''  स्टेशन मास्तर म्हणाला.
     जयसिंगने स्टेशनच्या टॅक्सी स्टँडवर विचारपूस केली. ज्याने त्या दोघांना  दामोदरच्या घरापर्यंत नेले  होते, तो टॅक्सीवाला मिळाला. हंबीर आणि जयसिंग  त्याच टॅक्सीत बसून निघाले. जयसिंगने आपल्या रूमच्या पाठीमागच्या बाजूला गाडी थांबवायला सांगून विचारले,''त्या रात्री दोघांनी गाडी इथे थांबवायला सांगितली होती?''
     टॅक्सी ड्रायव्हर काही वेळ इकडे तिकडे पाहात राहिला. ''नक्की जागा ओळखणं कठीण आहे, पण त्यांनी वाटेत मला थोडा वेळ गाडी थांबवायला सांगितली होती. ''
     नंतर तो दोघा माणसांना रात्री ज्या ठिकाणी सोडले, त्या ठिकाणी घेऊन गेला. दामोदरचे घर तेथून काही अंतरावरच होते. टॅक्सीवाला म्हणाला, ''मी त्यांना विचारलंसुद्धा  की, इथे तर कोठे घरं नाहीत? यावर ते म्हणाले, ''तुला काय करायचं? भाडं मिळालं ना? चल फुट आता! ''    
      यानंतर जयसिंग  हंबीरसोबत कोल्हापूरला गेलादामोदरने ज्या बँकेतून दोन लाख रुपये काढले होते, त्या बँकेत जाऊन  चौकशी केली. काउंटरवर बसलेल्या कर्मचार्याने सांगितले की, '' मला ती व्यक्ती चांगली लक्षात आहे, कारण त्यादिवशी ते खूपच घाईगडबडीत होते. शिवाय बँक बंद व्हायलाही काही मिनिटांचाच अवधी होता. ''
      बाजूला येत हंबीर  जयसिंगला म्हणाला, ''इथे तर आपल्याला काहीच सुगावा लागत  नाही. ''   ते बँकेच्या बाहेर पडले. स्टेशनच्या दिशेने चालू लागले, तोच बँकेतला एक कर्मचारी  गडबडीने एका बाजूला जाताना दिसला. तो एका गॅरेजमध्ये घुसला. थोड्या वेळाने एका इसमासह बाहेर आला. जयसिंग  त्या इसमाला पाहून चकीत झाला. म्हणाला,'' बँक कर्मचार्यासोबत जो माणूस आहे, ना तो माझा जुना ड्रायव्हर आहे. काही महिन्यापूर्वीच तर त्याला  मी काढून टाकलं   आहे. पण , तो इथे राहतो, याची मला कल्पना नाही. '' 
      हंबीर  म्हणाला, ''जयसिंगआपल्याला  आता एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. हा बँक कर्मचारी आणि तुझा ड्रायव्हर! नक्कीच तुझा ड्रायव्हर  दामोदरला ओळखत असला पाहिजे. ''
     ''हो हो, बर्याचदा त्याला घेऊन मी दामोदरच्या घरी गेलो  आहे. '' जयसिंग  म्हणाला.
     ''बँक कर्मचारी तुझ्या जुन्या ड्रायव्हरला ओळखतोयाचा अर्थ, कर्मचार्याने पैशाची गोष्ट तुझ्या ड्रायव्हरला सांगितली असली पाहिजे. किंवा पैसे काढताना ड्रायव्हर त्यावेळेला तिथे उपस्थित असला पाहिजे.'' हंबीर म्हणाला.
    ''असू शकतं.''  जयसिंग.
     काही वेळ  हंबीरने  जयसिंगला काही तरी समजावत होता. तिकडे बँक कर्मचारी आणि ड्रायव्हर आपापसात काही तरी बोलत होते. मग जयसिंग  ड्रायव्हरजवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, ''अरे, परवा  रात्री माझ्या रूमजवळून गेलास आणि मला भेटलासुद्धा आला नाहीस. ''
     जयसिंगचे बोलणे ऐकून ड्रायव्हर चपापला. पण स्वत: ला सावरत म्हणाला, ''मी तर नोकरी सोडल्यापासून तुमच्या रूमकडे कधी फिरकलोसुद्धा नाही. ''
     ''मग बहुतेक तू तुझ्या साथीदारांना पाठवलं असशील... '' जयसिंग  म्हणाला. त्यांच्यात बोलणे चालले होतेएवढ्या कालावधीत  हंबीरने जवळच्या पोलिस ठाण्यातून दोन काँन्स्टेबल बोलावून  आणले.पोलिसांना पाहताच  बँक कर्मचारी आणि ड्रायव्हर पळून जाऊ लागले, पण त्यांना पोलिसांनी पकडले.
     पोलिस ठाण्यात झालेल्या चौकशीत  सगळे  काही सत्य बाहेर पडले.बँक कर्मचारी आणि  जयसिंगचा तो जुना ड्रायव्हर  मित्र  होते. ज्यावेळेला  दामोदर  पैसे काढायला बँकेत आला होता, त्यावेळेला ड्रायव्हरसुद्धा बँकेत उपस्थित होता. मग दोघांनी योजना बनवली. त्यांचे दोन साथीदार दामोदरला लुटण्यासाठी गेले. ड्रायव्हरने त्या दोघा गुंडांना दामोदरच्या घराचा दरवाजा रात्री  उघडवण्यासाठी  जयसिंगचे नाव घ्यायला सांगितले होते. दोघा दरोडेखोरांनी  जयसिंगच्या रूमच्या पाठीमागे उभे राहून आपापसात बोलताना जयसिंगचे नाव घेतले होते, आणि ते कर्मधर्म संयोगाने  जयसिंगने ऐकले होते.
     चौघांनीही लुटलेल्या मालाची समान वाटणी करण्याची योजना बनवली होती, पकडले गेले, त्याच दिवशी रात्री त्यांची बैठक बसणार होती. परंतु तत्पुर्वीची त्यांना तुरुंगाची हवा खायला मिळाली. ड्रायव्हर आणि बँक कर्मचार्याने दामोदरच्या घरात दरोडा घातलेल्या आपल्या त्या दोघा साथीदारांचीही नावे पोलिसांना सांगितली.

                                                                                                                      

No comments:

Post a Comment