Thursday, February 16, 2017

बनावट आणि अवैध दारूचा महापूर


     अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल येथील बनावट विषारी दारुचे प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. या घटनेतील मृतांची संख्या सहा झाली असून येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कँटिनमध्येच ही दारू बनवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आहे. एका उमेदवाराने दिलेल्या पार्टीत हा प्रकार घडला आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कँटिनमध्ये बनावट दारूची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासन व्यवस्था किती ढिसाळ,बेजबाबदार आहे,याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. आणखी एक धक्कादायक प्रकार असा की, देशात विषारी दारूने बळी होणार्यांच्या संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. सलग 2014 पासून महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. ही खरे तर आपल्यादृष्टीने लाजिरवाणी गोष्ट म्हटली पाहिजे. सातत्याने अशी प्रकरणे राज्यात घडत असून याबाबत कसलेच नियंत्रण नाही,ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

     आपल्या राज्यात असो किंवा देशात अशी दुर्घटना घडली की, दारूबंदी आणि देशी दारू यावर अनेक अंगांनी चर्चा होत राहते. काही लोक दारूबंदीची कुचेष्टा करीत असतात. कारण त्यांच्या मते दारूला पूर्ण बंदी करणे हे अव्यवहार्य आहे. शिवाय जगातच सर्वांची राहणी आणि जगण्याची शैली बदलत आहे. अशा स्थितीत सगळीकडे दारू हे व्यसन नव्हे अशी भावना बळावत आहे आणि आपणच केवळ दारूच्या बंदीचा आग्रह धरला तर ते विसंगत ठरेल. अशी दारूबंदी नीट अंमलातही येत नाही. कायद्याने आणि कागदावर बंदी राहते पण व्यवहारात कोठून ना कोठून दारू मिळत राहते. अशी दारूबंदी हा हास्यास्पद प्रकार ठरतो. दारूबंदीच्या विरोधकांचे असे मत आहे. शिवाय दारूबंदीमुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. हा महसूल बुडवायला सरकार तयार होत नाही.
     दारूवर कायद्याने बंदी घातली तरी ती बेकायदेशीररित्या का होईना पण तयार होत राहते आणि लोकही चोरून ती पितात. मग लोक जर तिला सोडायलाच तयार नाहीत तर तिच्यावर सक्तीने बंदी घालण्यापेक्षा तिला खुली केलेली काय वाईट ? हे मत काही निर्विवाद नाही. काही लोकांना नक्कीच असे वाटते की, दारूबंदी लागू झाली म्हणजे ती शंभर टक्के यशस्वी होणार नाही हे खरे पण बंदी असल्यावर निदान काही लोक तरी तिच्यापासून दूर राहतील. आज दारूबंदी नसल्यामुळे सारे काही खुले आहे आणि ती सहज उपलब्ध होत असल्याने अनेक लोक सहजतेने तिच्या आहारी जातात. बंदी नसल्याने तिला उलट प्रतिष्ठा मिळाली आहे.
बिहारसारख्या गरीब राज्याने दारूबंदी यशस्वी करून दाखवली आहे. भलेही अन्य मार्गाने दारू इथे उपलब्ध होत असली तरी येथे दारू पिण्याचे प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मोठ्या महसुलावर पाणी सोडून हा निर्णय बिहार सरकारने घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे. ही बंदी कायम राहिली तर नक्की यात फरक पडत जाणार आहे. दारूच्या आहारी गेलेल्या लोकांच्या वर्तनाने अनेक कुटुंबे उदवस्त झाली आहेत. कित्येक संसार उघड्यावर पडली आहेत. आपल्या राज्यातल्या काही जिल्ह्यात दारूबंदी आहे. इथेही अन्य मार्गाने दारू मिळत आहे,मात्र तिथेही चांगला फरक पडला आहे,हे नाकारता येत नाही. त्यामुळे दारूबंदी फुकाने वाया जाणारी नाही, हेही इथे लक्षात घेतले पाहिजे.

     दारू बंदी लादली तर बेकायदा दारू तयार होते  पण दारूबंदी नसली तरीही बेकायदा दारू तयार होतेच असे अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमलसारख्या प्रकारांनी दाखवून दिले आहे. देशी दारू उघडपणे मिळत असतानाही बेकायदा दारू अशी का तयार व्हावी असा प्रश्न आहे. देशी दारू उघडपणे दुकानात मिळत असतानाही काही लोक तिच्याऐवजी अशी बेकायदा दारू पीत असतात कारण काही गरीब लोकांना दुकानातली स्वस्त दारूही परवडत नाही. म्हणून मग काही लोक त्यांचे समर्थनही करीत असतात. कष्ट करून थकलेले हे गरीब लोक नाइलाज म्हणून ही बेकायदा दारू पितात आणि त्यांना काही पर्याय नसतो असे त्यांचे समर्थन असते. पण असे समर्थन योग्य नाही. दारू प्राशन करण्यात काही चूक आहे हे या लोकांना कोणी सांगायलाच तयार नाही. तसे सांगण्यात काही तरी चूक आहे असेच समजले जायला लागले आहे. संस्काराचा लोप झाला आहे. दारू पीणे गरजेचे मानले जात आहे. आपल्याकडे दारूबंदी व उत्पादन शुल्क खाते आहे. या खात्याकडून अशा अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी की,या खात्याने पुरेसे संख्याबळ पुरवले जात नाही. वाहनांची सोय नाही. त्यामुळे या खात्याची अवस्था नळे काढलेल्या वाघासारखी झाली आहे. कित्येक वर्षांपासून सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मग बनावट किंवा अवैध दारू निर्मितीला आळा कसा घातला जाणार, हा प्रश्नच आहे.

No comments:

Post a Comment