Sunday, February 26, 2017

उपहास आणि अपमानानंतरचे यश


     यशाची कुठली अशी व्याख्या नाही. प्रत्येकाचं यश हे वेगवेगळं असतं,मात्र तुम्ही यशासाठी जो मार्ग निवडता ,तो उपहास,उपेक्षा आणि अपमान यांना ओलांडल्याशिवाय जात नाही. विशेष म्हणजे  आपल्याला हा मार्ग न सांगता मिळतो.लोकांना तुम्ही काय करणार आहात किंवा काही नवीन शोधत आहात,हे जाणून घ्यायचं असतं, कारण तुम्हाला तेवढी तुमची पात्रता नाही, असं सांगायचं असतं आणि तुम्हाला त्यापासून रोखायचं असतंतुम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा तुमच्या निवडीची ते टर उडवतील,उपहास करतील.तुमचा आत्मविश्वास ढळावा,यामागे काहींचा उद्देश असतो.त्यासाठी ही माणसे वाट्टेल तशा पद्धतीने अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. वेंधळ्यासारखे काही तरी करू नकोस, असाही सल्ला दिला जातो. आपल्या जवळच्या लोकांकडूनही असे काही कमेंट्स येतात की, तुम्हाला आश्चर्य व्हायला होतं. काही लोक तुमच्या क्षमतेबाबतच प्रश्न उपस्थित करतात. आपल्या धाडसाचा अपमान करतात. पण ज्यावेळेला तुम्हाला यश मिळतं,तेव्हा अपमान,उपेक्षा आणि उपहास सर्व काही यशापुढे गौण,छोटे वाटायला लागतात. त्यामुळे तुम्हाला मिळालेला उपहास,अपमान आणि उपेक्षा लक्षात ठेवून वाटचाल करा. कारण ते तुम्हाला सतत टोचत राहतील. ते तुमच्या पुढे जाण्याच्या इच्छाशक्तीला सतत इंधन घालत राहतात. त्याच गोष्टी तुम्हाला उत्साह देत राहतात.
महान बास्केटबॉल प्लेयर
त्याला हॉयर स्कूल बास्केटबॉलच्या संघातून काढण्यात आलं. त्याने घरी आल्यावर स्वत:ला कित्येक तास कोंडून घेतलं. पण  त्याने दृढ निश्चय केला. आपण खेळ सोडायचा नाही. शेवटी तो म्हणजे मायकल जॉर्डन बास्केटबॉल खेळातला शतकातला महान खेळाडू बनला.चौदा वेळा तो एनबीए ऑल स्टार चॅम्पियन बनला. दोन वेळा तो ऑलम्पिक गोल्ड मेडेलिस्टदेखील राहिला. 5 वेळा तो एनबीएचा मोस्ट वॅल्यूड प्लेयर बनला. या गोष्टीवरून एक स्पष्ट आहे की, अपमानानंतर निराश व्हायचं नाही.
लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपली नजर लक्ष्यावर खिळलेली असली पाहिजे.लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.लोक जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही,तोपर्यंत म्हणतच राहणार.ज्यादिवशी तुम्ही यशस्वी व्हाल,त्यादिवशी सगळ्यांची बोलती आपोआप बंद होईल. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांवर मर्यादेपेक्षा प्रेम करत असाल तर, लोकांची फिकीर न करता आपले लक्ष्य गाठण्यासाठी कठोर मेहनत करत रहा. तुम्हाला कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भटकायचं नाहीए.
कार्टूनिस्ट ते डिज्नीलँडपर्यंत
युवा कार्टूनिस्टला वर्तमानपत्रातून यासाठी काढून टाकण्यात आले होते की,त्याच्याकडे ओरिजनल आयडिया नव्हती आणि शिवाय कल्पनाशक्तीचा अभावदेखील होता, असंही सांगण्यात आलं होतं. आपण बोलत आहोत वाल्ट डिज्नीविषयी! आपण त्यांना यासाठी ओळखतो की, त्यांनी मिकी माऊससारख्या कार्टून कॅरेक्टरची निर्मिती केली.त्यांनी 22 ॅकॅडमी अवार्ड्स जिंकले आहेत.ते हॉलीवूडमधील यशस्वी निर्माते आहेत. त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे बनलेला डिज्नीलँड प्रत्येकाच्या चेहर्यावर हास्य आणतो.
अपमान आणि लेम्बोर्गिनी
इटालियन व्यावसायिक आणि स्पोर्ट्स कार निर्माता फारुशियो लेम्बोर्गिनीला संपूर्ण जग फॅशनेबल आणि लग्जरी स्पोर्ट्स कार लेम्बोर्गिनीच्या निर्माताच्या रुपात ओळखतं. स्वत:साठी त्यांनी त्यावेळेला सर्वात प्रसिद्ध अशी स्पोर्ट्स कार फेरारी विकत घेतली होती. पण आवाज करणार्या गियरबॉक्समध्ये त्यांना काहीतरी गडबड वाटली.ते एन्जो फेरारी यांना भेटायला गेले, जे फेरारीचे मालक होते.पण एन्जो यांनी त्यांच्याकडे जवळपास दुर्लक्षच केलं. त्यांचा अपमान करणारा व्यवहार लेम्बोर्गिनी यांच्या मनाला लागला.त्या अपमानानेच त्यांना स्पोर्ट्स कार निर्मितीमध्ये उतरवलं. फेरारीमध्ये त्यांना जी मॅकेनिकल चूक जाणवली होती, ती त्यांनी सुधारली. सुरुवातीच्या व्यवसायातल्या घाट्यानंतरही ते फॅशनेबल स्पोर्ट्स कारचे यशस्वी निर्माता बनले.
उपहासाला घाबरू नका
कित्येकदा तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यातल्या मौलिकतेविषयी किंवा कल्पनाशक्तीविषयी संशय वाटतो. पण त्यांच्याकडून केला गेलेला अपमान,उपहास,तिरस्कार किंवा उपेक्षा तुमच्यातल्या सृजनशीलतेला बाहेर काढण्यास मदत करतात. एक लक्षात घ्या की, आपल्या या लक्ष्याच्या दिशेनेच्या प्रवासात मिळालेल्या अपमान,उपेक्षा आणि उपहासाचा यशानंतर बदला घ्यायचा नाही आहे. सूडाचा आणि नकारात्मकतेचा विचार तुमची उंची कमी करतो. असले विचार  तुमच्या तिथंपर्यंत पोहचलेल्या उंचीला धक्का देणारे आहेत. तुमचे यशच ते काम आपोआप करत असते. मात्र त्यांनी जे काही बोलले आहे, अपमान,उपहास,उपेक्षा केली आहे,त्याचा यशासाठी वापर करून घेतला पाहिजे.

No comments:

Post a Comment