Monday, February 13, 2017

(रहस्य कथा) अंधारातील चाहूल


     थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडली होती.रात्रीच्या वेळी भयंकर अशा  गार बोचर्या वार्यात बाहेर पडायची कुणाची हिंमत होत नव्हती. रस्ते सुनसान  होते. सगळे आपापल्या घरात अंगाभोवती चादर, रग वैगेरे लपेटून पडले होते.
     शहराच्या एका बाजूला झोपडपट्टी होती. ती गरीब, राबून खाणार्यांची वस्तीतिथेच एका झोपडीवजा छोटेखानी घरात चन्नाक्का  नावाची विधवा राहत होती. ती मोठ्या हालाखीत जीवन कंठीत होती. वस्तीतल्या बायका नेहमी चन्नाक्काच्याबाबतीत बोलत असायच्या.पण त्यांना  तिच्याविषयी अजिबात सहानुभूती नव्हती, तर एक प्रकारचा असुरी आनंद होता. तिच्या मुलाचा-पिर्याचा तुरुंगात आजारामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती अक्षरश: कोलमोडून पडली होती. तिचा आधार हरपला होता.

     त्या रात्री चन्नाक्काचं मन अधिकच बैचेन होतं. तिच्या बालमैत्रीणीनं-सगुणानं तिला आपल्याकडे राहायला बोलावलं होतं. तीही एकटीच तिच्या घरापासून काही अंतरावर राहत होती. ती म्हणत होती, आपलं उरलेलं आयुष्य एकत्र घालवू. तेवढाच एकमेकींना आधार होईल.चन्नाक्कालाही ते पटत होतं. तिच्या राहत्या जागेला मोठी किंमत येणार होती. पण ती घर विकायच्या मनस्थितीत नव्हती. त्याचाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता. त्यामुळं तिला झोप येत नव्हती.
     रात्रीचा एक वाजला होता. ती जागीच होती. इतक्यात तिला बाहेर कुणाच्या  तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. चन्नाक्का सावध झाली. उठून बसली. तिने मग हळूच खिडकीतून बाहेर पसरलेल्या अंधारात डोकावून पाहिलं. कोण असतील बरं इतक्या अंधारात आणि इतक्या थंडीत बाहेर कशी पडली असतील ही माणसं? कशाला आली असतील? तिने खिडकीतून रोखून बाहेर अंधारात  पाहण्याचा प्रयत्न केला, पण काही दिसलं नाही.
     ती वळून पलंगावर लवंडायला चालली होती, तोच पुन्हा बोलण्याचा आवाज आला. बारीक आवाजात काही तरी फूसफूस चालली होती. ती पुन्हा खिडकीपाशी गेली. बाहेर डोकावू लागली. अचानक ती घाबरली.आपला भ्रम तर नसेल? खरेच बाहेर माणसे असतील? किती असतील? आणि एवढ्या रात्री इथे कशाला आली असतील? विचार करून ती खिडकीच्या एका बाजूला सावध उभी राहिली.
     जर ती अनोळखी माणसे आत आली तर? हा विचार करून चन्नाक्काचे डोकेच गरम झाले. ती भयंकर घाबरली. पण तिने भीतीला आपल्या कह्यात घेतले. हातात काठी घेतली आणि धडधडणार्या छातीने दरवाज्यामागे थांबून संकटाची वाट पाहू लागली. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला  तरी मी पहिल्यांदा या काठीने त्यांचा चांगलाच समाचार घेईन. त्यांना अशीतशी सोडणार नाही. ती बडबडली. आता तिच्यात चेव आला होता. तिला दरवाजासमोर पावलांचा आवाज ऐकू आला. हळूच तिने दाराच्या फटीतून पाहिले. गडद अंधारात दोन सावल्यांसारखे काही तरी भासत होते. ते दरवाजाला लागूनच उभे होते. त्यांची फक्त खुसफूसच ऐकायला येत होती.
     बराच वेळ अशीच अवस्था होती. मग ते दोघे आले, तसे निघून गेले. चन्नाक्काला मात्र काय भानगड आहे, कळत नव्हते. ते दोघे बराच उशीर दरवाजाबाहेर उभे होते, पण त्यांनी आत येण्याचा प्रयत्न केला नाही. आता ते परत निघाले होते. ही काय भानगड आहे? याच विचारात ती बराच वेळ उभी होती. तिच्या हाताच्या मूठी काठीभोवती गच्च आवळलेल्या होत्या. तिला भिती वाटत होती ती, ते पुन्हा परतून येतील याची! बराच वेळ निघून गेला. सगळीकडे सामसूम होती. ते अनोळखी लोक परतले नाहीत. आता  तिला  थकव्याने घेरले. आणि कधी तरी पहाटे तिचा डोळा लागला.
     दरवाजावरची  जोराची खटखट ऐकून चन्नाक्का  खडबडून जागी झाली. खोलीत थोडाफार प्रकाश पसरला होता. तिने उठून दरवाजा उघडला. चांगलंच उजाडलेलं होतं. बाहेर काही माणसे उभी होती. त्यात वस्तीतली काही माणसे आणि पोलिसवाले होते. तिचं हृदय वेगानं धडधडायला लागलं. '' काय झालं?''
'' तुम्ही बर्या आहात ना? '' इन्स्पेक्टरने विचारलं आणि पुन्हा म्हणाला, '' मी इन्स्पेक्टर पांडुरंग.''
'' व्हय, पण  झाल काय?'' चन्नाक्कानं पुन्हा विचारलं
     इन्स्पेक्टर पांडुरंग यांनी तिला आपल्यासोबत येण्याचा इशारा केला. मग दरवाजापासून काही अंतरावर असलेल्या झाडीजवळ जाऊन थांबले. तिथे कुणीतरी एक माणूस बेशुद्धावस्थेत पडला होता.
पांडुरंग यांनी त्याच्या चेहर्याच्या दिशेने इशारा करत म्हटलं, '' या माणसाला ओळखता तुम्ही? ''
     चन्नाक्कानं त्या माणसाला निरखून पाहिलं आणि म्हणाली, '' न्हाय, मी याला ओळखत न्हाय.'' आणि मग तिच्या डोळ्यांसमोर ते रात्रीचे  दृश्य फिरू लागले.
     जवळच एक सायकल पडली होती. बहुतेक बेशुद्ध पडलेल्या माणसाची असावी. पांडुरंग म्हणाले, '' मी सकाळी इथून निघालो होतो, तेव्हा याला पाहिलं. आणखी एक विचित्र गोष्ट अशी की, याच्या आजूबाजूला शंभरा- शंभराच्या नोटा पडलेल्या होत्या. नोटा एकदम नव्या करकरीत होत्या. काही नोटा याच्या खिशातही सापडल्या. काय भानगड आहे, कळायला मार्ग नाही. तुम्ही एकट्या राहता, जरा काळजीने राहा. ''
     चन्नाक्काने इन्स्पेक्टरला रात्रीची घटना सांगितली. इन्स्पेक्टरच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते.         '' म्हणजे ते दोघे होते. आपापसात बोलत होते. मग त्या दोघांनी दरवाजा खटखटण्याचा किंवा आत येण्याचा प्रयत्न केला नाही? ''
   '' न्हाय. मलाही त्याचंच कोडं पडलंय. ते बारीक आवाजात बोलत माझ्या दरवाजासमोर उभे होते. थोडा वेळ थांबले आणि आल्यापावली निघून गेले.'' चन्नाक्का म्हणाली.
'' आणि या इथे पडलेल्या माणसाला अगोदर कधीच बघितलं नाही? '' पांडुरंग यांनी विचारलं.
'' न्हाय, पण हा माणूस त्यातला असंल, असं वाटत न्हाय. कारण ते दोघे होते. ''
    '' कदाचित दोघांमध्ये कुठल्या तरी कारणाने वाद झाला असेल आणि मग मारामारी. त्यात एकटा बेशुद्ध पडला असेल आणि दुसरा पळून गेला असेल.इथे पडलेल्या शंभराच्या नोटा अशीच काही तरी कहानी सांगतात. '' इन्स्पेक्टर म्हणाला.
     तोपर्यंत बेशुद्ध पडलेल्या माणसाला पोलिसांनी दवाखान्यात पोहचवलं होतं. जाताना इन्स्पेक्टर चन्नाक्काला म्हणाला, '' मला वाटतं, तुम्ही काही दिवस दुसरीकडे कुठे तरी राहायला जा. मी इथे  काही लोकांना पाळतीसाठी ठेवतो.''
     चन्नाक्का त्याचदिवशी तिच्या मैत्रिणीकडे-सगुणाकडे राहायला गेली. तिकडे इन्स्पेक्टर दवाखान्यात जाऊन त्या माणसाला जाऊन भेटला, जो घटनास्थळी बेशुद्धावस्थेत मिळून आला होता. त्याने वेगळीच कथा सांगितली-'' माझं नाव रामराव. मी जवळच्याच कारखान्यात कामाला आहे. रात्रपाळी संपवून मी परतत होतो, तेव्हा मी दोघा माणसांना चन्नाक्काच्या घरासमोर उभे असल्याचे पाहिले. मला त्यांची परिस्थिती माहित आहे. मला जरा संशय आला. मी लपून पाहू लागलो की, शेवटी ती माणसे काय करतात ते. जर त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मदतीला धावून जायचं, असा मी विचार केला.''
     पण त्यांनी तसं काही केलं नाही. काही वेळाने ते जसे आले, तसे निघून गेले. मी चन्नाक्काच्या दरवाजाजवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक पाकिट पडलं होतं. ते उघडून पाहिलं, तर  त्यात शंभरा- शंभराच्या नोटा होत्या. माझ्या लक्षात काहीच येईना. शेवटी या पाकिटाचे रहस्य काय असावं? दोघे त्यांच्या परिचयाचे असते तर दरवाजा उघडायला लावून त्यांनी पाकिट दिलं असतं. पण अशा प्रकारे न सांगता दरवाजाबाहेर पाकिट सोडून जाण्याचा अर्थ काय ?
    '' इतके रुपये पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी पाकिट घेऊन जायला निघालो. झाडीपर्यंत जातोय ना जातोय तोच कुठून तरी दोघांनी माझ्यावर अचानक हल्ला केला.खेचाखेची झाली. हाणामारीत मी खाली पडलो, तेथून पुढचं मात्र मला काही माहित नाही. ''
     प्रकरण मोठं गुंतागुंतीचं होतं. इन्स्पेक्टर पांडुरंग यांनी घराच्या आसपास आपली माणसे पेरली आणि रात्रीची वाट पाहू लागले. त्यांना खात्री वाटत होती की, रामराववर हल्ला करणारे जे लोक होते, ते त्यांनीच  रुपयांचं  पाकिट ठेवलं होतं.
     रात्र झाली. शांतता पसरली. मध्यरात्रीच्या वेळी पावलांची चाहूल आली. आणि दोन माणसे तिथे आली. पांडुरंग आणि त्याचे साथीदार पाहात होते. त्या दोघांनी कालच्या रात्रीप्रमाणेच एक पाकिट दरवाजाच्याबाहेर ठेवले आणि निघाले. एकाने दुसर्याला हळूच म्हटले, '' बहुतेक, आज तरी कुठली गडबड होणार नाही. ''
     '' गडबड तर होणारच! '' पांडुरंग म्हणाले आणि पोलिस कर्मचार्यांनी त्या दोघांना पकडले. विचारल्यावर दोघांनी सांगितलं'' आमचा उद्देश वाईट नव्हता. आम्हाला चन्नाक्का काकूला मदत करायची होती. ''
     नंतर त्या दोघांना चन्नाक्काने पाहिलं, तेव्हा ती उसळून त्यांच्या अंगावर धावून गेली. ती रडत रडत म्हणाली,   '' हेच ते  पिर्याचे दोस्तयांनीच त्याला वाईट संगतीला लावलं. आता तो तुरुंगात मेला नी हे मला मदत करायला आले आहेत. नकोय मला असली मदत. ''
     इन्स्पेक्टर पांडुरंग यांनी तिला समजावलं, शांत केलं. त्या दोघांना आत टाकलं. रामरावला ताकीद देऊन सोडून दिलं. आणि आणखी एक! आता चन्नाक्का आणि सगुणा एकत्र राहू  लागल्या होत्या. इन्स्पेक्टर अधीमधी जातात, ख्यालीखुशाली पुसतात. थोडीफार आर्थिक मदत करतात. पांडुरंग म्हणाले होते, ''  मी तुमच्या मुलासारखाच. काही अडचण आली तर बिनधास्त सांगा.संकोच करू नका. ''                                                                           
                                                                                                     



No comments:

Post a Comment