Monday, February 13, 2017

(बालकथा) सोनेरी नदीचा राजा


 हिरवागार  घाट  उंच-उंच पहाडांनी वेढलेला होता. घाटमाथ्यावरील  सखल जमीन चांगली पिकाऊ होती. तीन भाऊ घाटातल्या जमीनीचे  मालक होते. श्वाटर्ज,हँस आणि ग्लक अशी त्यांची नावे होती. ग्लक सगळ्यात धाकटा  होता. त्याचा स्वभावही मोठ्या भावांपेक्षा  अगदी विपरीत होता. शॉटर्ज आणि हँस जितके क्रूर होते, तितकाच ग्लक दयाळू आणि सहनशील वृत्तीचा होता.
     एकदा त्या भागात दुष्काळ पडला. शेती वाळून गेली. फक्त घाटमाथ्यावरची शेती तेवढी  हिरवीगार राहिली. श्वाटर्ज आणि हँस यांनी संधीचा पुरेपूर फायदा उठवला. मन मानेल तशी  त्यांनी धान्याची विक्री केली. त्यातून त्यांनी पुष्कळ पैसा कमावला.
     एका रात्रीची गोष्ट. बाहेर थंड वादळवारा सुटला होता. घरात ग्लक एकटाच होता. तेवढ्यात कुणी तरी दरवाजा ठोठावला. ग्लकने पाहिले तर दारात एक म्हातारा  उभा होता. त्याने त्याला आत घेतले. म्हणाला, बाबा, शेकशेगडीजवळ बसा. थंडी जाईल. वृद्ध म्हणाला, बेटा, मी कित्येक दिवसांपासूनचा उपाशी आहे, मला काही तरी खायला दे.
     ग्लकने त्याला भोजन  दिले. म्हातारा  खाऊ लागला. तेवढ्यात ग्लकचे दोन्ही भाऊ आले. अनोळखी म्हातार्याला आपल्या घरात बिनधास्त  भोजन करत असलेला  पाहून दोघांचेही माथे भडकले. त्यातल्या एकाने ग्लकला बदडायला सुरूवात केली तर   दुसरा म्हातार्याच्या हातातले  ताट हिसकावून  ओरडला, भिकारड्या, चल निघ येथून.
     म्हातारा  उठला. एकदा त्याने ग्लककडे एकटक पाहिले. श्वाटर्ज आणि हँस तर त्याला मारहाण करतच  होते. म्हातारा म्हणाला, मी मध्यरात्री पुन्हा परत येईन. असे म्हणून तो अंधारात गडप झाला.

     ग्लक आपल्या खोलीत विव्हळत पडला होता. श्वाटर्ज आणि हँस दोघांनी भरपेट भोजन केले आणि आरामात डारडूर झोपी गेले. ग्लक मात्र म्हातार्याचा  विचार करत पडला, तो मध्यरात्री का येतो म्हणाला? तो कोण आहे? अशा अनेक प्रश्नांनी त्याला घेरले होते.
     रात्री भयानक  वादळ उठले. ग्लक अजूनही जागाच होता. वादळवार्यामुळे घर जोरजोराने थरथरू लागले. श्वाटर्ज आणि हँससुद्धा जागे झाले. तेवढ्यात जोराचा आवाज आला. श्वाटर्जच्या खोलीचे छत उडून गेले. आत ठेवलेले साहित्यसुद्धा उडून कुठे कुठे विखरले  गेले. हँसचीसुद्धा तशीच अवस्था झाली. दोघेही भयभयीत झाले.
     त्याचवेळेला  म्हातारा  दारात आला. दोघा भावांना पावसात भिजताना पाहून तो हसला. आणि म्हणाला, तुम्ही दोघेही ग्लकच्या खोलीत जा. त्याच्या खोलीत कशाचाच परिणाम नाही. शांतता आहे.
     श्वाटर्ज आणि हँस ग्लकच्या खोलीत गेले. तो आरामात पहुडला होता. आणि  खरोखरच त्याच्या खोलीत शांतता होती. बाहेरचा काहीच परिणाम तिथे जाणवत नव्हता.
     घरात काही दागिने होते. श्वाटर्ज आणि हँसने सोनार काम करण्याचे ठरवले. ते दागिन्यात भेसळ करत आणि भोळ्याभाबड्य लोकांना फसवत. ग्लकला मात्र ते पसंद नव्हते. पण तो एकटा  बिच्चारा काही करू शकत नव्हता.
     त्यांच्या दागिन्यातल्या भेसळीतला प्रकार लोकांना कळला. लोकांनी त्यांना बदडून काढला. त्यांच्याजवळचे सगळे काही लुटून नेले. आता त्यांच्याजवळ काहीच उरले नाही. अगदी खायचीसुद्धा भ्रांत झालीग्लकजवळ मात्र  एक ग्लास उरला होता. तो सोन्याचा होता. श्वाटर्ज ग्लकला म्हणाला, आज ग्लास  वितळवत्यामुळे काही दिवस  तरी जगता येईल.  
     दोघे भाऊ फिरायला गेले. ग्लक ग्लास वितळवायला बसला. त्याने  भट्टी पेटवली आणि त्यात ग्लास  टाकला. तेवढ्यात आवाज आला, मला काढून उलटा कर. तुझे भले होईल.
     ग्लक आश्चर्याने इकडे-तिकडे पाहू लागला. पण आवाज कोठून आला, हेच  त्याला कळेना.   तेवढ्यात पुन्हा आवाज आला, मी ग्लासमधून बोलतोय. ग्लास  आगीतून बाहेर काढ आणि उलटा  ठेव. ग्लकने ग्लास उलटा केला, तेव्हा सोने वितळून एक वडी तयार झाली. आणि  त्यातून एक बुटका  म्हातारा बाहेर आला. त्याचा रंगसुद्धा सोनेरी होता. बुटका  म्हातारा ग्लकला म्हणाला, बेटा, तू तर फारच  प्रामाणिक आणि परोपकारी मुलगा आहेसमला एका दृष्ट जादूगाराच्या तावडीतून मुक्त केलंस. मी या घाटावरून वाहणार्या सुवर्ण नदीचा राजा आहे. जादुगाराने आपल्या जादूने मला या ग्लासात बंदी केले होते. मला बंदी झाल्याने  नदीचे पाणी अटून गेले. शेतंही वाळून गेले.
     ग्लक म्हणाला, मग आता नदी वाहणार ना?
     पवित्र जलाचे दोन थेंव नदीत टाकल्यास नदीचे पाणी मुक्त होईल आणि ते वाहायला लागेल. पण  कोणी अपवित्र जल नदीत टाकले तर तो काळा दगड बनून जाईल, असे म्हणून त्या बुटक्या  म्हातार्याने आगीत उडी घेतली. त्याबरोबर वितळलेले सोनेही लुप्त झाले.
 

   ते पाहून ग्लक घाबरला. सोनेरी  ग्लासाविषयी भावांनी विचारल्यावर मी काय सांगणार? ते तर मला खाऊन टाकतील.
तो विचार करू लागला, पण त्याला काहीच सुचेना! तेवढ्यात श्वाटर्ज आणि हँस परत आले. त्यांनी ग्लकला सोन्याविषयी विचारले, तेव्हा त्याने घडलेला खरा प्रकार कथन केला. पण त्यांचा  ग्लकच्या  बोलण्यावर विश्वास बसला नाही. दोघांनी मिळून त्याची चांगलीच धुलाई केली.
     पण नंतर त्यांना ग्लक  कदाचित  खरे बोलत असावा, असे वाटले. नदीच्या पाण्यातून सोने मिळणार असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा त्यांनी विचार केलाश्वाटर्ज म्हणाला, ठीक आहे, मी पुजार्याकडून पवित्र जल घेऊन येतो. पण  हँस कसा बरं मागे राहिलत्याने मनात विचार केला, एकट्या  श्वाटर्जने  नदीतले सगळे सोने हडप केले तर...?  तो म्हणाला, नाही, मी पहिल्यांदा जाईन.
     यावरून दोघांमध्ये वाद  सुरू झाला. वादाचे पर्यावसन भांडणात आणि मग हाणामारीत झाले. शेजारी-पाजारी  गोळा  झाले. शिपाई आले. शिपायांना  पाहून हँस पळून जाऊन कुठे तरी लपला. श्वाटर्जला शिपायांनी पकडले आणि घेऊन गेले.
     शिपाई गेल्यावर हँसने मंदिरातल्या गाभार्यात पूजेसाठी ठेवलेले पवित्र जल चोरले आणि ते घेऊन पहाड चढू लागला. कडकडीत  ऊन होतं. हँसच्या घशाला कोरड पडली. त्याने पवित्र जलाची  बाटली तोंडाला लावली. तेवढ्यात त्याच्यासमोरून एक कुत्रा धापा टाकत येताना दिसला. त्याची जीभ बाहेर आली होती. तो भयंकर  तहानलेला होता. कठोर हृदयाच्या हँसवर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो कुत्र्याला लाथाडून पुढे निघून गेला.
     थोड्या वेळाने पुन्हा हँसचा गळा पुन्हा सुखू लागला. त्याने बाटली तोंडाला लावली, तोच समोरून एक म्हातारा येताना दिसला. हँसजवळ आल्यावर तो म्हणाला, बेटा, पाणी!
     हँस त्याला रागाने जोराचा धक्का देऊन पुढे निघाला. समोर नदी पात्रात सगळीकडे त्याला सोनंच दिसत होतं. त्याने उतावीळपणे  नदीत पवित्र पाणी ओतले, तसा जोराचा गडगडाट  झाला. आणि  हँस नदीत कोसळलाआणि क्षणार्धात  काळा दगड बनला.
काही दिवस उलटले. ग्लकने मोठी मेहनत करून थोडे फार धन गोळा केले. जामिनाची रक्कम जमा झाली. ती भरली आणि श्वाटर्जची सुटका केली. त्याच्या डोक्यात अजूनही सोन्याची नदी घोळत होती. बाहेर आल्या आल्या त्याने ग्लकला विचारले, तुझ्याजवळ किती पैसा आहे?
     ग्लकने  उरलेला सगळा पैसा  त्याला देऊन टाकला. ते घेऊन श्वाटर्ज एका पुजार्याकडे गेला.त्याला म्हणाला, मला पवित्र जल द्या. पुजार्याने त्याच्याकडून पैसे घेतले, पण त्याला पवित्र जल न देता  साधारण पाणी दिले.
श्वाटर्ज निघाला. वाटेत त्याला कुत्रा भेटला. मग म्हातारा. त्यानेही त्यांना पाणी दिले नाही. पहाडावर जाऊन त्याने नदीत पाणी ओतले, तोच विजेचा कडकडाट झाला.ज्या दगडावर श्वाटर्ज उभारला होता. तो तुटून खाली कोसळला. त्याबरोबर श्वाटर्जही नदीत पात्रात पडला आणि क्षणार्धात काळा दगड बनला. आता नदीत दोन काळे दगड पडलेले दिसत  होते.
     दोघेही भाऊ परतले नाहीत. त्यामुळे ग्लकला काळजी वाटू लागली. त्याने स्वत: वर जाऊन पाहण्याचा निश्चय केला. त्याने पुजार्याकडून पवित्र जल घेतले आणि निघाला. कडक ऊन होतं. तो पाणी पिणारतेवढ्यात त्याला तहानलेला कुत्रा दिसला.   आपली तहान विसरून त्याने कुत्र्याला पाणी पाजले.
     काही अंतर गेल्यावर त्याला एक तहानलेला म्हातारा दिसला. तो स्वत: पाणी प्याला नाही, पण म्हातार्याला पाजले. म्हातारा ग्लकला आशीर्वाद देऊन निघून गेला. ग्लक मात्र फार तहान लागली होती. पण बाटलीत थोडेच पाणी शिल्लक होते. ग्लकची तहान वाढत चालली होती. तेवढ्यात एक चमत्कार झाला. अचानक समोर  त्याला तो बुटका  म्हातारा दिसला, जो ग्लासमधून निघाला होता.ग्लक म्हणाला, बाबा! पवित्र जल मी इथवर नाही आणू शकलो. आता काय करू?
     सोनेरी बुटका  हसला. म्हणाला, तुझे दोन्ही भाऊ काळे दगड होऊन नदीत पडले आहेत.
पण ते तर पवित्र जल घेऊन आले होते. ग्लक आश्चर्याने म्हणाला.
     जी वस्तू दु:खी, गरजवंत  माणसाच्या उपयोगी पडत नाही, ती पवित्र असू शकत नाही. असे म्हणत त्याने जवळच्याच एका झाडाचे फूल तोडले. म्हणाला, फुलावर जमा झालेले दव पवित्र आहेत. तू हे दवाचे थेंब  नदीत टाक.
     ग्लकने  दवाचे थेंब  नदीत शिंपडले.आणि काय आश्चर्यनदीचे थांबलेले पाणी खळाखळा  वाहात  घाटाच्या दिशेने वाहू लागले. ग्लकने वळून पाहिले.तर बुटका  म्हातारा  गायब झाला होता.
  ग्लक घाटावर परत आला. पाहतो तर चोहोबाजूला हिरवागार  गालिचा पसरल्यासारखा  दिसत होता. हिरवेगार  पीक डोलत होते. त्याच्या मोडक्या-तोडक्या घराच्या जागी सुंदर वाडा उभा होता. आणि खरोखरच  नदीचे पाणी सोनेरी बनले होते. ( इंग्लंडची लोककथा)                                                                                      



No comments:

Post a Comment