Tuesday, January 31, 2012

यशस्वी होण्याचे नऊ मंत्र

प्रत्येक माणसात प्रतिभेचा राजहंस दडलेला असतो, माणसाने या राजहंसाचा शोध घेतला पाहिजे, तसेच उच्च ध्येय ठेवून कर्तृत्वाने उंच शिखर गाठावे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. गरिबांनी गरीबच रहावे म्हणून समाजात अनेक गोष्टी पेरल्या आहेत. यात अंथरुण पाहून पाय पसरावेत, साधी राहणी, उच्च विचार अशा गोष्टींचा समावेश आहे, परंतु अंथरूण पाहून पाय पसरायला लागतात, तर उद्या दुसरा कुणी तुमच्या अंथरुणात पाय घालेल. त्यामुळे तुम्ही तुमचे अंथरूण वाढवा. साधी राहणी व उच्च विचार हाही बकवास आहे. कुणी पॉश राहतो म्हणून त्याचे विचार वाईट आहेत, असे मानण्याचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एके ठिकाणी म्हटले आहे की, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या उदासिन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. कारण आहे त्या स्थितीत समाधानी न होण्याच्या वृत्तीतूनच स्वतः ची व समाजाची उन्नती होत असते.  जीवनात यशस्वी होण्यासाठी नऊ सूत्रांचा अवलंब करावा, यश नक्की तुमच्या दारात आहे, असे समजा. ध्यानात ठेवा आणि अवलंब करा- १) सर्वांत आधी ध्येय निवडा. ते उच्च दर्जाचे हवे. २) ध्येयप्राप्तीसाठी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. ३) कठोर पर्शिम ४) वेळेचे योग्य नियोजन. ५) शॉर्ट कट कधीच नको. ६) जे जे उदात्त व चांगले असेल त्याचा स्वीकार. ७) आई-वडिलांचे महत्त्व वेळीच ओळखा. ८) सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवा. ९) मानसिकता बदला. - मच्छिंद्र ऐनापुरे,  लोकमत, कोल्हापूर (३०/१/१२)

Sunday, January 29, 2012

चित्रपटातील गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी चित्रपट निर्मात्यांच्या पहिल्या पसंदीचे राष्ट्रीय नेते आहेत. काही नामांकित तर काही नवोदित कलाकारांनी या रुपेरी पडद्यावर महात्मा गांधीजींची भूमिका साकारली आहे. काही अशाच 'रिअल लाईफ' गांधींविषयी...
बेन किंग्सले- गांधी
बेन किंग्सले यांचे मूळ नाव कृष्णा पंडित भटजी. त्यांचा जन्म इंग्लंदमध्ये झाला. त्यांची आई ऍनालान्सा मेरी ही ब्रिटिश अभिनेत्री होती. ती मूळची भारतीय. बेन किंग्सले यांना खरी ओळख  गांधी चित्रपटामुळे मिळाली. वास्तविक त्यांना ही भूमिका पसंद नव्हती. परंतु, निर्माता- दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो यांना गांधीजींच्या भूमिकेसाठी योग्य असा भारतीय चेहरा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी बेन किंग्सले यांची निवड केली आणि आग्रह धरला. अत्यंत सफाईदारपणे किंग्सले पडद्यावर गांधी म्हणून वावरले आणि इतिहास निर्माण झाला.
दर्शन झरीवाला- गांधी माय फादर : २००७
दर्शन झरीवाला गुजराती आहेत. त्यांच्या मातोश्री लिला गुजराती अभिनेत्री होती. दर्शन यांनी 'क्योंकी सांस भी कभी बहु थी' या मालिकेत तुलसचीचे सासरे म्हणूनही काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. पण त्यांना गांधी- माय फादर मुळेच खरी ओळ्ख मिळाली.
अन्नू कपूर -सरदार : १९९३
अन्नू कपूर टीवी आणि सिनेसृष्टीतील एक चर्चीतले नाव. 'तेजाब' चित्रपटात आणि टीवी वाहिनीवरील 'अंताक्षरी' कार्यक्रमामुळे तो आपल्या सार्‍यांचा परिचयाचा आहे. मात्र १९९३ मध्ये आलेल्या 'सरदार' चित्रपटामुळे त्याची अभिनय क्षमता किती परिपक्व आहे, याचा प्रेक्षकांना अंदाज आला. यात महात्मा गांधीच्या भूमिकेला त्याने चांगला न्याय दिला.
नसरुद्दीन शहा- हे रामः २०००
नसरुद्दीन शहा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबांकी इथला. रिचर्ड एडनबरो यांच्या 'गांधी' मध्ये त्यांना गांधीजींची भूमिका सकारायला मिळाली होती. पण ही भूमिका बेन किंग्सले यांच्याकडे गेली. गांधी साकारायला मिळाला नाही, याची त्यांना मोठी खम्त वाटत होती. परंतु, शेवटी त्यांची ही इच्छा कमल हसनने पूर्ण केली. 'हे राम' या आपल्या चित्रपटात कमलने त्यांना गांधीजींची भूमिका दिली.

माझी कविता

सुख
गेले चार दिवस
शेजारच्या स्मशानात
प्रेतांच्या आगीचा डोंब उठला
नव्हता
आणि म्हणूनच त्याच्या
पोटात दुखायला लागलं होतं
माणुसकीच्या पतनास
कारणीभूत ठरणार्‍या
कुणाचं वाईट घडलंच नाही तर
त्याच्या सुखाला ओहोटी
लागणार्‍या...
अशा रोगट सुखांनी
ग्रासलेला
तो एक क्षुद्र वखारवाला
पोट धरून बसला होता

Saturday, January 28, 2012

हसत जगा ५

* ते मूल कोण?
     एकदा रितेश आणि जेनेलिना या दोघांनी   एक खेळ खेळायचं ठरवलं. दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारायचे आणि ज्याला उत्तर देता येत नाही, त्याने दुसर्‍याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण द्यायचं. जेनेलिना सगळ्या प्रश्नांची पटापटा उत्तर द्यायची आणि इकडे रितेशचं पाकिट रिकामं व्हायचं.
हे फार व्हायला लागल्यावर रितेश वैतागला. पैशापेक्षा आपल्याला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, याचा त्याला संताप येत होता. शिवाय जेनेलिना भावी पत्नी असल्याने तिच्याकडून पराभव स्वीकारायचं म्हणजे देशमुख खानदानाच्या इज्जतीचा प्रश्न होता.  त्याची त्याला टोचणी लागून राहिली होती. शेवटी त्याने आपली सल अर्शद वारशीजवळ बोलून दाखवली. अर्शद म्हणाला," घाबरू नकोस. मी तुला एक प्रश्न विचारतो. माझ्या वडिलाचं एक मूल आहे. पण ते मूल म्हणजे माझी बहिणही नाही आणि भाऊही नाही तर ते कोण?"
रितेशला ( अर्थात) उत्तर आलं नाही. शेवटी अर्शदनंच त्याला सांगितलं," अरे मीच नाही का?"  रितेशने मान डोलावली. अर्शद म्हणाला," असं कर, हा प्रश्न तू जेनेलिनाला विचार. आज तुला नक्की जेवण मिळेल."
रितेश खुशीतच जेनेलिनाकडे गेला आणि म्हणाला," माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या वडिलाचं एक मूल आहे. पण ते मूल म्हणजे माझी बहीणही नाही आणि भाऊही नाही. तर ते मूल कोण?"
जेनेलिना हुशार निघाली. ती पटकन म्हणाली," तूच !"
" हॅ..ट !" रितेश अत्यानंदाने ओरडला. " अगं, ते म्हणजे अर्शद !" हा! हा! हा!

*सरदारजी
      सगळे विनोद सरदारजींवर होत असल्याने एक सरदार फारच वैतागला होता. पुण्यातल्या आपल्या सहकार्‍यांना तो म्हणाला, " आता  मीच सगळ्यांना मूर्ख बनवतो की नाही पहा. " असे म्हणून तो ऑफिसमधून बाहेर आला. त्याने खूप विचार केला आणि एक प्लॅन केला. जवळच असलेल्या बसस्टॉपवर गेला. आणि आकाशात एकटक पाहात उभा राहिला.
" हा वर काय पाहतोय, चला आपणही पाहु या ," असा विचार करून रस्त्यावरचे काहीजण त्याच्याबरोबर आकाशात पाहू लागले. तेही डोळे फाडफाडून पाहात राहिले. पाहता पाहता रस्त्यावर मोठी गर्दी जमली. सरदारजी मनातल्या मनात हसत होता.  'बघा, कसे मूर्ख बनवले मराठी लोकांना...!" असे म्हणत समाधानाने त्याने  त्या गर्दीवर नजर टाकली.... पाहतो तर त्याच्या लक्षात आलं की, सारे सरदारजीच आहेत.  

पोलिस यंत्रणा आधुनिक व्हायला हवी

      आता गुन्ह्यांचे स्वरुप बदलत चालले आहे. पूर्वी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे घडत्.या गुन्ह्यातले गुन्हेगार, त्या गुन्ह्यामागील पार्श्वभूमी- कारणे स्थानिक स्वरुपाची असायची. पण अलिकडच्या काळात गुन्ह्यांच्या पद्धतीत फार मोठा बदल झाला आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा कट हद्दीच्या बाहेर रचण्यात येत आहे. शिवाय गुन्ह्यामागची कारणेसुद्धा स्थानिक राहिलेली नाहीत. समाजातील गरीब्-श्रीमंतीची दरी वाढत चालल्याने आणि चैनीची सवय लागत चालल्याने पैशासाठी वाट्टेल ते, करायला तयार झालेली तरुण पिढी आप्त-स्वकीय, मित्र ही नातीगोती विसरून कोणतेही स्तर गाठायला तयार झाला आहे. गरीब - श्रीमंत याबरोबरच बहुसंख्य आणि अल्पसंख्याक अशी दरीही वाढत चालली आहे. अनैतिक गोष्टी बळावल्या आहेत. राग-द्वेष यांना सीमा राहिलेली नाही. बदलाची भावना तीव्र झाली आहे. अशात गुन्ह्यांची संख्याही वाढत चालली आहे. गुन्हे करून नामानिराळे राहण्याच्या उद्देशाने अथवा गुन्हा यशस्वी व्हावा, यासाठी गुन्हेगारांनी गुन्ह्याचे स्वरुपच बदलून टाकले आहे.
     आधिनिक तंत्रज्ञान, हत्यारे यांचा वापर वाढला आहे. मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान ही आता गुन्ह्तातील प्रभावी साधने बनत चालली आहेत. मोठमोठ्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी तशी मोठी यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांचा वापर हो ऊ लागला आहे. बॉम्बस्फोटसारख्या घटनांचा तपास करतानाही पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत आहे. याचा अर्थ पोलिसांना ही गुन्ह्यांची नवी आव्हाने अवघड चालली आहेत, असे दिसायला लागले आहे. काही गुन्ह्यातील सूत्रे राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशातून चालवली जात आहेत. अशा वेळेला पोलिस यंत्रणा नक्कीच दुबळी ठरत आहे. अशा हद्दीपलिकडील गुन्ह्यांचा तपास आपल्याकडील पोलिस यंत्रणा कसा करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी वेगळी यंत्रणा विकसित करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.
      पोलिस यंत्रणा अद्ययावत, प्रशिक्षित  करण्याची आवश्यकता आहे. केवळ पोलिसांची संख्या वाढवून चालणार नाही. स्थानिक पोलिस, शहर पोलिस, राज्य व अन्य गुप्तचर यंत्रणा यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. ग्रामीण भागातल्या पोलिस यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असायला हव्यात. कारण गुन्हेगार ग्रामीण भागात वास्तव्य करून आपले इप्सिप्त साध्य करू पाहात आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीसारख्या ठिकाणी लैला नावाच्या पाक अभिनेत्रीकडे सॅटालाईट फोन यंत्रणा मिळून आली आहे. अद्याप तिच्याबाबतचा तपास सुरू असला तरी गुन्हेगार ग्रामीण भागात येऊन पोहोचला आहे, याचे भान यायला हवे आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ याची पोलिस खात्याला नितांत गरज आहे. नव्याने भरती होणार्‍या पोलिस कर्मचारी- अधिकार्‍यांना सायबर गुन्ह्यांचा अधिक अभ्यास असणे गरजेचे आहे.
     इंटरनेट हा भविष्यातील गुन्ह्यांचा मोठा दुवा असणार आहे. त्यामुळे इंटरनेटवरून पाठविण्यात येणारे संदेश, ई-मेल्स, अन्य डाटा सामुग्री यांच्यावर गोपनीय पद्धतीने लक्ष ठेवणारी व यातील अधिकाधिक गोष्टीची जाण असणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान कौशल्यावर पोलिस विभागाची 'कमांड' असायला हवी. हद्दीपलिकडील गुन्ह्यांच्या तपासाऐवजी अशा प्रकारची गुन्हेगारी कशी रोखता येईल, यावर भर देण्याच्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली पाहिजे. सायबर गुन्ह्यातल्या अधिकाधिक गोष्टी परदेशी यंत्रणांकडून जाणून घ्यायला हवे आहे.
     पोलिस खात्यात ताणतणाव वाढला आहे. या पोलिसांचा सारा वेळ आपल्या राजकारण्यांच्या, मंत्र्या-संत्र्यांच्या संरक्षणासाठी , त्यांचे दौरे पार पाडण्यातच अधिक जात आहे.  पोलिसांकडे आधुनिक हत्यारांची कमतरता आहे. पोलिस यंत्रणा सर्वदृष्टीने सक्षम करण्याबरोबरच पोलिसांच्या आरोग्याचा, ताणतणावाचा प्रश्नही विचारात घेतला पाहिजे. या खात्यात आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणातही पोलिस कर्मचार्‍यांची पुरेसी संख्या नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. साधनेही आधुनिक नाहीत. त्यामुळे पोलिस यंत्रणा आधुनिकतेची झूल पांघरण्यात अद्याप पिछाडीवर आहे. तेव्हा वाढत चाललेले सायबर गुन्हे कशी रोखली जाणार,असा संतापजनक सवाल उपस्थित होतो. यंत्रणेत आधुनिकता आल्याशिवाय  यंत्रणा सक्षम होत नाही,  'गुन्हेगार पुढे आणि काठी घेऊन पोलिस मागे' ही जुनी ओळख पोलिसांनी घालवायला हवी आहे.   

Friday, January 27, 2012

क्रीडा ' भारतरत्न ' साठी सचिनसोबत अन्य दिग्गज दावेदार

' भारतरत्न ’ कुणाला द्यावा , यासंबंधी जे निकष आहेत , त्यात  सचिन बसत नाही , असा मुद्दा समोर आला होता . कारण, आजवर जी - जी मंडळी या पुरस्काराची मानकरी ठरली आहेत , त्यांच्यात एकही क्रीडापटू नाही . कारण , हा किताब कला , साहित्य , संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणा - या व्यक्तीलाच दिला जावा , असा एक नियम आहे . त्यात क्रीडाक्षेत्राचा समावेश नाही . म्हणूनच हा नियम बदलल्याशिवाय सचिनला ‘ भारतरत्न ’ देता येणार नाही, अशी परिस्थिती होती. मात्र आता भारताच्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी क्रीडा क्षेत्राचा समावेश करण्याबाबत क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे शिफारस केली आहे. याबाबत चर्चा चालू असल्याबाबत केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे  या सन्मानाच्या श्रेणीत क्रीडा क्षेत्राचा समावेश होणार, ही बाब निश्चित आहे. मात्र आता या 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानासाठी दावेदारांची संख्याही वाढली आहे.  
'भारतरत्न' सचिनलाच पहिल्यांदा का द्यायचा? अन्य क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे काहीच योगदान नाही काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यान्चंद, टेनिसपटू रामनाथन कृष्णन आणि बुद्धिबळ चँपियन विश्वनाथ आनंद यांचेही योगदान  कमी नाही. त्यामुळे सचिनच्या अगोदर या खेळाडूंना या सन्मानाने गौरवले गेले पाहिजे. याचा अर्थ  त्याच्या योगदानात न्यूनत्व आहे, असे नाही. उलट त्याने देशाचा सन्मान क्रिकेट विश्वात वाढविला आहे. त्याने मिळवलेली उपलब्धी जगातल्या कुठल्याही खेळाडूला मिळवता आली नाही. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजारावर धावा बनवल्या आहेत. आता तो शतकांचे महाशतक बनवण्याच्या उंबरठ्यावर आहे. पुढील काही दिवसांत  तो हा सन्मान मिळवणारा जगातला पहिला खेळाडू बनेल, यात तीळमात्र शंका नाही. एकदिवशीय स्पर्धेत दुहेरी शतक जमवणारा तो एकमेव खेळाडू आहे. वास्तविक त्याच्या नावावर अनगणित रेकॉर्ड आहेत. आज तर अशी परिस्थिती आहे की, तो मैदानावर उतरला की कोणता ना कोणता विक्रम होतोच. आपल्या देशात क्रिकेट हा धर्म आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यागणिक नवनवे विक्रम करणा-या सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधला देव मानले जाते.त्याला भारतरत्न मिळावा ही तमाम भारतीयांची मागणी आहे, यात शंका नाही.
मात्र क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे का/ , असा प्रश्न निर्माण होतो. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखणार्‍या मेजर ध्यानचंदांची कामगिरी नजरेआड  करता येणार नाही. नव्हे, ती करताच येत नाही. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत शानदार कामगिरीने सार्‍या जगाला दिपवून टाकले होते. मेजर ध्यानचंद म्हणजे एक जिवंत  दंतकथा होती. चेंडू त्यांच्या स्टीकला चिकटतो, असे म्हटले जायचे. त्यासाठी त्यांच्या स्टीकची तपासणी केली जायची. आज देशाच्या या राष्ट्रीय खेळाची वाताहत झाली आहे. गेल्या तीन दशकापासून या खेळाचा देशावरचा प्रभाव अजिबात  राहिला नाही. त्यामुळे 'भारतरत्न'चा विषय निघतो तेव्हा या महान खेळाडूचा विचार केला जात नाही. रामनाथन कृष्णन खेळायचे त्या काळात आजच्यासारखी एटीपी रँकिंग नव्हती. पण अनधिकृतरित्या का होईना ते जगातल्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये नक्की समावेशित  होते. त्यांनी ग्रँडस्लॅम स्पर्धेबरोबरच डेविस कपमध्येसुद्धा  भारताला नवी उंची देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. हां, त्यांची कामगिरी सचिनसारखी भारदस्त वाटत नाही. परंतु ते ज्या काळात खेळत, त्यावेळी देशात साचेबंदपणाही नव्हता, रँकिंगचा खेळ नव्हता. असे असले तरी  'भारतरत्न' च्या दावेदारांमध्ये त्यांचा समावेश नाकारता येत नाही.
विश्वनाथ आनंदने तर देशाच्या बुद्धिबळास एक नवी दिशा दिली आहे, जी कोणीही नाकारू शकत नाही. आनंदच्या अगोदर  ग्रँडमास्टर बनण्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्याच्या योगदानामुळेच देशात आज आपल्याकडे डझनावारी ग्रॅडमास्टर तयार झाले आहेत. विश्वनाथ आनंदने विविध स्तरावर आपला पताका फडकावत देशाच्या शिरपेचात नव-नवे तुरे खोवले आहेत. आनंदने स्पेनचे नागरिकत्व मिळवले असले आणि गेल्या काही वर्षांपासून ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केले नसले तरी तो एक भारतीय आहे, हे नाकारून चालत नाही. आज तो जो काही व्यक्तिगत  यश मिळवत आहे, ते भारतीय नागरिक म्हणूनच मिळवत आहे. त्यामुळे भारतरत्न देताना, त्याच्या दाव्याकडेही कानाडोळा करून चालणार नाही. सचिनला 'भारत्तरत्न'   देण्याच्या विरोधात क्वचितच कोणी असेल. पण त्याची अविश्वसनीय कामगिरी पाहूनच क्रीडा क्षेत्राचा 'भारतरत्न' निकषात अंतर्भाव करण्याचा प्रयत्न चालला आहे, हे नाकारून चालत नाही. संपूर्ण देश सचिनला भारतरत्न दिल्याचे पाहण्यास आतुर आहे. पण त्याचबरोबरच असे करताना माजी दिग्गजांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.                                                                               हसत जगा ४

कवी: अरे! माझी चप्पल. संमेलनात माझी चप्पल कुणी ढापली.आता मी घरी कसा जाऊ?
श्रोता: तुम्ही तुमची कविता म्हणायला सुरू करा. आपोआप चप्पलांचा ढिग येऊन पडेल
-----------
टेक्सी ड्रायव्हर( मारवाडी पॅसेंजरला): शेठ, गाडीचा ब्रेकफेल झालाय. आता काय करू?
मारवाडी: अरे, पहिल्यांदा मीटर बंद कर.
--------------
१९८० सालातील मुलगी: आई, मी जिन्स घालते.
आई: नको बाई, लोक काय म्हणतील?
२०११ तील मुलगी: आई, मी मिनी स्कर्ट घालू?
आई : घाल बाई, काही तरी घाल.

वाचनीय माहिती

१) कुबेराचे नाव वैश्रवण होते. त्याला यक्षगणाचा नायक म्हणून साक्षात भगवान शंकरांनीच नियुक्त केलेला आहे. नलकुबेर हा वैश्रवणाचा पुत्र. यानेच रावणाला 'परस्त्रीला स्पर्श करू नकोस' असा शाप दिला होता.२) बिभीषण हा रामायण आणि महाभारत काळातही होता. याचं कारण म्हणजे त्याला मिळालेलं अमरत्वाचं वरदान. सप्तचिरंजीवांमधील इतर सहा असे आहेत- हनुमान, अश्वत्थामा, बली, कृपाचार्य, परशुराम व वेदव्यास ३) महाभारतचे रचनाकार कृष्ण्द्वैपायन व्यास. त्यांच्या चिरंजीत्वामुळे निधन पावलेच नाहीत. ४) रामायण व महाभारत काळात साधारण १५०० वर्षांचे अंतर मानण्यात येते.
५) तिसरा काल संपावयास चौर्‍याऐंशी लक्षपूर्व तीन वर्ष आठ मास पंधरवडा असताना र्‍षषभदेवांचा जन्म झाला. तृतीय कालामध्ये जैन धर्माचा युगारंभ झाला. र्‍हषभदेव हे संस्थापक. यांना आदिनाथ, पुरू ही नावे आहेत. त्यांचे माता-पिता नभिराज, मरुदेवी. विदेह क्षेत्रात नेहमी चतुर्थ काल नांदत असल्यामुळे तीर्थकरांची उत्पत्ती नेहमी चालू असते. त्यामुळे जीवास आपले आत्महित साधण्यास चांगलाच अवसर मिळू शकतो. तशी गोष्ट भरत क्षेत्रात नाही. कारण इथे व ऐरावत क्षेत्रात विशिष्ट काळातच तीर्थकरांचे अस्तित्व उपलब्ध होत असते. तो म्हणजे चतुर्थ काळ. या काळात नियमाने चोवीस तीर्थंकर होतात. त्यांच्या प्रभावामुळे अनेक जीवांचे कल्याण होते. उत्सर्पिणी वावसर्पिणी या दोन्ही युगांच्या चवथ्या काळात तीर्थंकरादी त्रेसष्ट शलाका पुरुषांची उत्पत्ती होते. त्यांच्या आचरणाचा इतर प्राणीमात्रावर प्रभाव पदतो. तेव्हा जैन धर्मात काल नावाचे स्वतंत्र द्रव्य आहे. त्यांचे अस्तित्व अनादी निधन आहे.
६) ह्र्षभ हे पहिले तीर्थंकर हो ऊन गेले .त्यांच्यानंतर महावीर हे चोवीसावे तीर्थंकर आहेत. चोवीस तीर्थंकरांची नावे अशी:   १) षभनाथ २) अजीतजी ३) संभ्भवजी ४) अभिनंदनजी ५) सुमतिनाथ ६) पद्मप्रभू ७) सुपार्श्वनाथ ८) चंद्रप्रभ ९) पुष्पदन्त १०) शीतलनाथ ११) श्रेयांसनाथ १२() वासपुज्य १३) विमलनाथ १४) अनंतनाथ १५) धर्मनाथ १६) शांतीनाथ १७) कुंथुनाथ १८) अरनाथ १९) मल्लीनाथ २०) मुनीसुव्रत २१) नेमिनाथ २२) नेमिनाथ २३) पार्श्वनाथ २४) महावीर. वीर, महावीर, सन्मति, वर्धमान, अतिवीर ही पाच नावे महावीरांना आहेत. पार्श्वनाथानंतर अडीचशे वर्षांनंतर महावीर तीर्थंकर झाले. त्यावेळी जिकडे-तिकडे अराजकता, हिंसाचार माजलेला होता. भारत भूमीवर महावीरांचा जन्म झाला त्यावेळी लोकांनी अहिंसा सम्रात जन्माला आला म्हणून उत्सव केला. त्यांनी शांततेचा उपदेश देऊन अहिंसेचा प्रसार केला. जैन धर्म हा कलियुगातील नाही. जैनामध्ये महापुरान हा ग्रंथ श्रेष्ठ, अलौकिक आहे.
७) हजरत मोहमंद पैगंबर यांच्याअगोदर १,४०,००० ( एक लाख चाळीस हजार) पैगंबर पृथ्वीवर येऊन गेले आणि त्यांनी धर्मकार्य केले. सर्वात अगोदर जे पैगंबर पृथ्वीवर आले, त्यांचे नाव आदम अलैसलाम. पैगंबरचा मराठी अर्थ होतो ईश्वरदूत. संदेशवाहक, प्रेषित , अवतार. मात्र महमंद पैगंबर यांच्या काळात रमजान महिन्यात पवित्र कुरानाचे लेखन केले गेले आणि ते शेवटचे प्रेषित असल्यामुळे भगवान महावीरांप्रमाणे सर्वाच्या लक्षात राहिले.
८)  आशिया खंडात बौद्ध धर्माची पाळेमुळे दोन्-अडीच हजार वर्षांपूर्वी रुजलेली आहेत. पर्यटकांचे आकर्षन ठरलेला 'बुद्धिस्ट सर्किट' म्हणजे जागतिक (युनिस्को) वारशाच्या यादीतील लुम्बिनीपासून सांची कुशीनगरसह अनेक ऐतिहासिक स्थळांची सफर होय.
९) संतांची संपूर्ण नावे: संत एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी जन्मस्थळ -पैठण जन्म शके १४५० ते ५५ च्या दरम्यान झाला असावा. संत तुकाराम बोल्होबा मोरे( आंबिले) जन्मस्थळ- देहू जन्म शके- १५३०. संत नामदेव दामाशेटी (आडनाव मिळू शकले नाही) जन्मस्थळ- नरसी बामणी जन्म शके- ११९२ ,संत रामदास- नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्मस्थळ- जांब जन्मशके-  १५१० , संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी जन्मस्थळ- आळंदी जन्मशके- ११९३ संत गाडगेबाबा- डेबुजी झिंगरराजी जानोरकर जन्मस्थळ- शेणगाव जन्मशके- १७९८
१०) अष्टवक्र हा त्यांच्या वडिलांच्या शापामुळे आठ ठिकाणी वाकडा असा जन्मला, पण तो खूप विद्वान होता. तो बारा वर्षांचा असतानाच जनक राजाच्या दरबारातील विद्वानांचया सभेत त्याने सर्वांना जिंकून घेतले. त्याची अष्तावक्रगीता खूप प्रसिद्ध आहे.
११) जन्मपत्रिकेत राहू-केतू याम्ना ग्रह म्हटले असले तरी वास्तवात मात्र ते ग्रह नसून अवकाशातील दोन काल्पनिक बिंदू आहेत. वास्तविकता चंद्राची कक्षा व पृथ्वीची कक्षा यांच्यात ५ अंशाचा कोन आहे. म्हणजेच चंद्राची कक्षा ५ अंशांनी कललेली आहे. त्यामुळे साहजिकच बहुतांश वेळा चंद्र हा पृथ्वीच्या प्रतलात नसतो. परंतु याला दोन बिंदू अपवाद आहेत. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या प्रतलाला ज्या दोन त्।इकाणी छेदते त्याठिकाणी चंद्र असल्यास चंद्र, पृथ्वी  व सूर्य हे खगोल एक प्रतलीय अवस्थेत येतात. या दोन बिंदूंनाच राहू केतू म्हणतात. येथे कोणताही ग्रह (राहू-केतू) अस्तित्वात नसल्याने त्यांची प्रतिमा नाही. ग्रहणाच्यावेळी चंद्र या दोन बिंदूंपैकी एका बिंदूच्या जवळ असतो. चंद्र पूर्वेकडऊन पश्चिमेकडे जात असताना ज्या बिंदूपासून जातो, तो राहू, तर ज्या बिंदूपासून चंद्र दक्षिणेकदे जाऊ लागतो तो केतू होय.
१२) भगवान विष्णूंचे अवतार मानलेल्या श्रीराम- श्रीकृष्ण यांना सर्वांनी देवरुपामध्ये स्वीकारले.चैत्र शुद्ध नवमीला श्रीराम जन्म आणि श्रावण वद्य अष्टमीला  आपन  श्रीकृष्णजन्म असे मोठ्या उत्साहाने साजरे करीत असतो. श्रीरामाच्या ( वाल्मीकी रामायनापासून सर्वच) चरित्रांमध्ये उल्लेख आहे, की सीतेला भूमातेने आपल्या उदरी सामावून घेतल्यानंतर काही कालाने आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असे मानून श्रीरामांनी शांतपणे शरयु नदीमध्ये प्रवेश करून आपले अवतारकार्य संपविले. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये उल्लेख असा आहे की, यादव कुळाला मिळालेल्या शापानुसार यादवी हो ऊन यादववंश नाश पावला. त्यामुळे उद्विग्न हो ऊन श्रीकृष्ण वनामध्ये जाऊन एकटाच एका वृक्षाखाली पायावर पाय टाकून पहुडला. दूरवरून त्याच्या पावलाला हरणासारखे मानून कोणा व्याधाने सोडलेल्याबानाने त्याचे देहावसान झाले.
१३)म्युझियम हा इंग्रजी शब्द जरी लॅटिन शब्दावरून आलेला असला तरी त्याची उत्पत्ती मूळच्या श्लेग्दह या ग्रीक शब्दातून झालेली आहे. Museiem शब्दाचा अर्थ 'म्युझेसना अर्पन केलेले मंदिर' ग्रीक पुराणानुसार देवांचा राजा झूस याच्या नऊ कन्या म्युझेस या नावाने एकत्रितपणे ओळखल्या जातात. त्या विविध कलांच्या देवता आहेत. त्यांच्या कलांचा समावेश असलेले मंदिर म्हणजेच  Museiem . अर्थात आधुनिक काळात म्युझियम. अनेक जानकारांच्या मते, इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात टॉलेमी सॉटर पहिला या इजिप्तच्या राजाच्या कालात अलेक्झांड्रिया येथे स्थापन्यात आलेले भव्य ग्रंथालय हेच जगातील पहिले म्युझियम. विविध विषयांवरील पन्नास हजारांहून अधिक भूर्जपत्र, चर्मपत्रावरील हस्तलिखिते या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली होती. काळाच्या ओघात अनेक कारणांनी हे ज्ञानाचे भंडार उदध्वस्त झाले किंवा नष्ट झाले.

पुस्तकांचा मोठा बाजार


मुंबईच्या अंजली जोसेफच्या 'सरस्वती पार्क; या कादंबरीला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सध्या भारतीय युवा लेखकांचा बोलबोला सुरू आहे.सगळ्याच वयोगटातील वाचकांवर त्यांची पुस्तके जादू करताना दिसत असून ही नवी लेखक मंडळी  रात्रीत स्टार होताना दिसत आहेत. ही सारी किमया त्यांच्या नव्या लेखन स्टाईलची आहे, असे म्हाणायला हवे. जुन्या साचेबद्धतेतून बाहेर पदत या मंडळी आपला असा एक नवा रस्ता शोधला आहे. इंग्रजी भाषेला देशी बाज देत आणि बोल्ड प्रयोगाची वाट चोखांदळत त्यांनी वाचकांना खिळवून ठेवण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. मोठ्या मोठ्या गप्पा आणि आदर्शाचा बाता न मारता साध्या सोप्या गोष्टी सांगताना दिसतात.
विशेष म्हणजे त्यांना डोक्यावर घेण्यात युवा पिढीचाच वाटा अधिक आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या युवा लेखकांच्या प्रती लाखोने विकल्या जात असून त्यांचे इन्कमसुद्धा लाखोच्या घरात गेले आहे. चेतन भगतच्या 'फाइव्ह पॉईंट समवन' या पुस्तकाच्या दहा लाखाहून अधिक प्रती खपल्या आहेत.    आता त्याच्या नव्या तीन पुस्तकांच्या प्रिंट ऑर्डरी पाच लाखांपेक्षा अधिक  आहेत. चेतन भगतप्रमाणेच आयाअयटीचा प्राध्यापक अमिताभ बाग याच्या ' अबॉव एवरेज' यापुस्तकाच्या प्रकाशकाने चारदा रिप्रिंट काढल्या आहेत. 'एचएसबीसी'मध्ये वरच्या पोस्टवर काम करीत असलेल्या बँकर रवी सुब्रमण्यमच्या ' इफ गॉड वाज ए बॅ़कर'पुस्तकाच्या लाखाहून अधिक प्रती संपल्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून सुब्रमण्यमला चाळीस लाखाचे इन्कम मिळाले आहे. आता तोही दुसर्‍या पस्तकाच्या तयारीला लागला आहे. हॉटेल एग्जीक्युटीव ते लेखक असा प्रवास केलेल्या बनी अद्वैताने 'आलमोस्ट सिंगल' च्या नावाने एखादी रहस्यकथा लिहावी आणि ती हातोहात उचलावी, हे सारे अजब म्हणावे लागेल. हे पुस्तक सध्याच्या घडीला 'हिट बुक्स'मध्ये सामिल झाले आहे. त्याच्या ५० हजाराहून अधिक कॉपीज विकल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर अनुराग माथूरच्या ' इन्स्क्रेबल अमरिकन्स' नोबेलने तर रेकॉर्ड ब्रेकच केले आहे. डझनभराहून अधिक युवा लेखक आपल्या पिढीच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ही मंडळी त्यांच्या हृद्याच्याच गोष्टी मांडत असल्याने   त्या आपल्याशा वाटतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, या युवा लेखकांनी सध्याची 'फ्रेम' तोडून त्याला नवा आयाम दिला आहे. भाषेच्या स्तरावर प्रचलित 'सिस्टीम' ला फाटा देऊन  नव्या शैलीचा अविष्कार केला आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, इंग्रजी फिक्शन लेखनप्रकारात विविध क्षेत्रातील लोक येत आहेत. आपल्या सिस्टीमशी जुडलेल्या अशा कथा  सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, इंग्रजी फिक्शन लेखनप्रकारात विविध क्षेत्रातील लोक येत आहेत. आपल्या सिस्टीमशी जुडलेल्या अशा कथा  परस्परांशी संबंधीत असल्याकारनाने त्याचा सबंध सामन्यांशीही येतो आहे. याचा आनखी एक फायदा असा झाला आहे की, लिखानात अधिक वास्तवता आणि लेखनक्षेत्र विभिन्नता युक्त बनले आहे. गेल्या दशकभरात बॅ़कर्सपासून आयटी प्रोफेशनल्सपर्यंत सारे या क्षेत्रात आले आहेत. काही वर्षापूर्वी विबिन्न पेशातील माणसे इच्छा असूनही  लेखनापासून स्वतःला व्यक्त करायला पुढे यायला तयार नव्हते. खुद्द इंग्रजी अथवा परकिय प्रकाशक एक नवा पायंडा पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे नव्या जमान्यातील युवा वर्ग लॅपटेपच्या माध्यमातून सातत्याने लेखन करताना दिसत आहे. स्वतःच्या मनातील अस्वस्थता, खदखद या रुपाने व्यक्त करीत आहे. सध्याच्या नेट-ब्लॉगच्या माध्यमातून ते अपसूक जाहीर होत आहे. स्वतःला मांडण्याचा प्रयत्न करणार्‍याचे हे माध्यम दोन्ही बाहू पसरून स्वागत करण्यास उत्सुक आहे.
नवा लेखक वर्ग नवी सोच आणि नवा ट्रेण्ड घेऊन मैदानात उतरला आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की, आपला वाचक विशाल असा युवा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याविषयी, नोकरीविषयी , प्रेम-तक्रार अशा गोष्टी घेऊन  समकालीन पुस्तकांमध्ये स्वतःची प्रतिमा  धुंडाळत आहे.    प्रारंभी चित्रपटांनी हा ट्रेंड पकडला होता. आता प्रकाशकांनी तो आपलासा केला आहे. वास्तविक आयाआयटी ग्रॅज्युएट ते बॅ़कर बनलेल्या चेतन भगतच्या ' 'फाइव पॉईंट समवन' पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी  प्रकाशकांना रहस्यमय पुस्तकांना देशात बाजार नाही, असेच वातत होते. त्यांना यशाची शक्यता नव्हे खात्रीच नव्हती. पन पुस्तक बाजारत आले आणि सारे काही पालटूनच  गेले. इंग्रजी भाषेतसुद्धा काही काळापूर्वी दोन्-तीन हजार कॉपीज खपल्या म्हणजे उत्कृष्ट सेल म्हटला जात होता. पाच हजाराहून अधिकची संख्या बेस्ट सेलर मानली जायची. पन सध्याच्या पुस्तकांच्या विक्रीने सगळे मापदंदच बदले आहेत.
पुस्तकांच्या जबरदस्त यशामुळं भारत देश पुस्तकांचा मोठा बाजार असल्याचं निदर्शनास आलं आहे. पुस्तकांच्या नव्या क्रांतिचा प्रणेता चेतन भगत असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. बाजारात चमकत असलेल्या नव्वद टक्के लेखकांचे आयु २५ ते ३५ च्या दरम्यान आहे. काहींनी कॉर्पोरेट जगतामध्ये नोकरी करत कथा लेखन क्षेत्रात उडी घेतली आहे.

एप्टीट्यूड टेस्ट

 १० वी इयत्तेत शिकणारा अमोल, त्याला संगीततज्ज्ञ बनायची इच्छा आहे. मात्र त्याचे  पॅरेंटस त्याला इंजिनीयच्या पाहू इच्छितात. याबाबतीत काउन्सलरांनी त्यांना एप्टीट्यूड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. अमोलच्या टेस्टनंतर कळलं की, तो एक यशस्वी संगीततज्ज्ञ बनू शकतो. अमोल एकटाच असा विद्यार्थी नाही, तर त्याच्यासारखे कित्येक विद्यार्थी असे आहेत की त्यांना योग्य दिशा देण्यासाठी पॅरेंटस आता एप्टीट्यूड टेस्ट करताना दिसत आहेत.
करिअर सिलेक्शन्साठी मिळते हेल्प
करियरची योग्य निवड करण्यासाठी कँडिडेटमध्ये असलेल्या क्षमतांचे आकलन होण्यासाठी एप्टीट्यूडबरोबरच त्याची आवदही पाहिली जाते. यामुळे करियर निवड्यात चांगली मदत मिळू शकते.करियरला योग्य दिशा देण्याबाबत एप्टीट्यूड आणि इंटरनेटबरोबरच पर्सनालिटी, शारीरिक क्षमता यांचाही प्रामुख्याने विचार केला जातो. तिन्ही गोष्टींचा विचार करूनच करियर निवडण्याबाबत सल्ला दिला जातो.
टेस्टची आवश्यकता का?
एप्टीट्यूड टेस्ट्च एखाद्या व्यक्तीला करियर आणि कामाची दिशा सांगू शकते. त्याची क्षमता आणि रुची बर्‍याच गोष्टी सांगू शकतात. यानंतर उमेदवाराला योग्य प्रोफेशन निवडण्याचा सल्ला दिला जातो. असे न केल्यास व्यक्तीचा विकास खुंटतो. तो काम एन्जॉय करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या मनात नकारात्मक विचार हावी व्हायला लागतात. यश न मिळाल्यास तो मग डिप्रेशन स्थितीत येऊ शकतो. यासाठी शिक्षण संस्थांमध्ये  करियर अँड काउन्सलिंग सेंटर उघडली जात आहेत.
एप्टीट्यूड टेस्ट्चे विभाग
लॉजिकल रीजनिंग - लॉजिकल रीजनिंगनुसार वर्क रिजन रिलेशनवर जोर दिला जातो. एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक स्तरावर कॅल्कूलेशनची क्षमता किती आहे, याचे आकलन लॉजिकल रीजनिंग करतं. जर उमेदवार यात जादा स्कोर करत असेल, तर समजावं की तो रुल्समध्ये राहून कठिण समस्येतून मार्ग काढू शकतो. असे युवा मॅनेजर, शास्त्रज्ञ आणि व्हाइट कॉलर जॉबमध्ये जाण्यास उपयुक्त असतात.
ऑब्सट्रॅक्ट रीजनिंग : यानुसार युवा विस्कटलेल्या वस्तू एकत्रित करून प्लॅन्ने काम करण्यास विशेष कौशल्य राखून असतात. यात एप्टीट्यूड कोणत्या दिशेला जात आहे, त्याची दिशा काय आहे? तो एका एरियामधून दुसर्‍या एरियात लिंक करतोय का नाही. हेसुद्धा पाहिलं जातं. सिव्हील अथवा इलेक्टॉनिक इंजिनियरिंगमध्ये चांगले काम करणार्‍या युवावर्गात ऑब्सट्रॅक्ट रीजनिंग सोडवण्याची क्षमता अधिक राखतो.
न्यूमेरिकल रीजनिंगः ही एखाद्या व्यक्तीमधील गणितीय क्षमता जाणण्यास मदत करते. असे यंगस्टर्स सीए , गणितज्ज्ञ आणि अकाउंटंट बनण्यास अधिक पात्र आहेत.
आय हँड कॉर्डिनेशनः सामान्यतः टेक्निकल काम करणारे ड्रायव्हर, पायलट अथवा मशीनमॅन्मध्ये  हा एप्टीट्यूड असायला हवा. यातील व्यक्ती हात-पाय अथवा डोळे काम करताना किती केंद्रीत करू शकतो, हे पाहिले जाते.
क्रिएटिव इनोवेशनः यात एखाद्या व्यक्तीची रचनात्मक क्षमता पाहिली जाते. सामान्यतः व्हाइट कॉलर जॉबमध्ये अशा प्रकारच्या लोकांची आवश्यकता असते. यानुसार या गोष्टीही पाहिल्या जातात की, तो निर्णय किती लवकर आनि योग्य स्वरुपात घेतो. जर त्याच्यात फ्लॅक्सिबिलिटी स्तर चांगला असेल तर त्याला हायर पोस्टसची जबाबदारी दिली जाते. यात त्याच्यात मोठेपना किती आहे, याचेही आकलन केले जाते. एप्टीट्यूड टेस्टमध्ये ओरिजनॅलिटीसुद्धा पाहिली जाते. हे गुण ज्याच्यात आहेत, ते शिक्षक, लेखक, अभिनेता , संगीतज्ज्ञ आणि आविष्कारक बनण्याची क्षमता असते.

हसत जगा ३

एका माणसानं दुसर्‍याला विचारलं, तुम्ही आठवड्यातून कितीदा शेव करता?'
दुसरा- आठवड्यातून पन्नास- साठ वेळा.
पहिला- तुम्ही वेडेबिडे आहात काय?
दुसरा - नाही, मी न्हावी आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा रामाचे गाढव पळाले. रामा मंदिरात गेला आणि खूप उशीर परमेश्वराच्या मूर्तीसमोर उभा राहून प्रार्थना करत राहिला.
शामा- रामा, तू देवाजवळ तुझे गाढव सुखरुप मिळावे म्हणून प्रार्थना करतो आहेस ना? '
रामा- नाही रे बाबा, मी तर देवाला थँक्यू बोलतोय.
शामा- का रे ?
रामा- अरे, गाढव पळालं तेव्हा  देवाच्या कृपेनं मी त्यावर स्वार नव्हतो.  असतो ना तर मीसुद्धा त्याच्याबरोबर पळालो असतो. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रामा शामाला - तू कधी खोटं पकडणारी मशीन पाहिली आहेस का? 
शामा- हो पाहिली आहे, माझं नुकतंच तिच्याशी लग्न झालंय.
--------------------------------------------------------------------------------------------------------
श्रोता ( गायकास): आज आपल्या आवाजात मागच्या कार्यक्रमासारखा दर्द जाणवत नाही.
गायक- मी तो दर्द देणारा दात उपटून टाकला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
टप्पू ( मम्मीला): आज मी शाळेला जाणार नाही?
मम्मी: का?
टप्पू:  काल आमच्या शाळेत  आमचं  वजन केलं .आज आम्हाला विकतील, असं  मला  वाटतंय.                                                                          

हसत जगा 2

कवी: अरे! माझी चप्पल. संमेलनात माझी चप्पल कुणी तरी  ढापली.आता मी घरी कसा जाऊ?
श्रोता: तुम्ही तुमची कविता म्हणायला सुरूवात  करा. आपोआप चप्पलांचा ढिग येऊन पडेल. त्यातून तुमची शोधून घ्या.  
-----------
टेक्सी ड्रायव्हर( मारवाडी पॅसेंजरला): शेठ, गाडीचा ब्रेकफेल झालाय. आता काय करू?
मारवाडी: अरे, पहिल्यांदा मीटर बंद कर.
--------------
१९८०  सालातील मुलगी: आई, मी जिन्स घालते.
आई: नको बाई, लोक काय म्हणतील?
२०११ तील मुलगी: आई, मी मिनी स्कर्ट घालू?
आई : घाल बाई, काही तरी घाल.
मार्च एंड्चे टार्गेट
एका भल्या माणसानं दिवसा एका डासाला पाहिलं आणि म्हणाला, ' अरे, तू तर रात्री येतोस ना, मग आता का आलास? '
डास म्हणाला,' मार्च महिना आहे ना! टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्यासाठी ओव्हरटाईम करतोय.'
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
एका  बहाणेबाज कर्मचार्‍याचा आजोबा त्याला भेटायला त्याच्या ऑफिसात गेला. बॉसला म्हणाला,' या ऑफिसात सुनील नावाची काम करते. मला त्याला भेटायचं आहे. तो माझा नातू आहे.'
बॉस वाईट चेहरा करत  म्हणाला,' मला सांगायला वाईट वाटतं. तुम्ही उशीराने आलात. तो आताच तुमची नाजुक अवस्था पाहायला सुट्टी घेऊन हॉस्पीटलमध्ये गेला आहे.'

माझे लेख

Wednesday, January 25, 2012

बालकथा स्वप्नबोध

     एक संत आपल्या ध्यानसाधनेत दिवस-रात्र मग्न होते. त्यांना आपल्या साधनेचा अहंकार उत्पन्न झाला होता.  एके रात्री त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. समोर देवदूत उभा होता. देवदूत मरण पावलेल्या लोकांना त्यांच्या कर्माचा हिशोब मागत होता. एकेकजण आपापल्या मनुष्य जन्मातील कर्माचा जमा-खर्च त्याच्यापुढे सादर करत होता. शेवटी संतांवरही वेळ आली. तेव्हा देवदूतानं त्यांना विचरलं," तुमच्या जीवनातलं सगळ्यात चांगलं कार्य सांगा, ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळून जाइल."
     संतांनी विचार केला, मी तर माझं सारं आयुष्य पुण्य कार्यातच व्यतीत केलं आहे. एक कार्य चांगलं आहे म्हणून सांगू? शेवटी ते म्हणाले," मी पाच वेळा तीर्थयात्रा केली आहे."
यावर देवदूत म्हणाला," तुम्ही तीर्थयात्रा केली आहे, खरं आहे. परंतु, तुम्ही या कार्याची चर्चा सतत लोकांशी करत आला आहात. त्यामुळे आपले सगळे पुण्य नष्ट झाले आहे."
     संतांना खूप वाईट वाटले. पुन्हा ते धाडस करून म्हणाले," मी रोज परमेश्वराचे ध्यान आणि त्यांच्या नावाचा जप करतो. " देवदूत म्हणाला," तुम्ही परमेश्वराचे ध्यान करत होता. जप करत होता. तेव्हा तिथे दुसरा कोणी आल्यावर तुम्ही मानसिकदृष्ट्या विचलित होत होतात. आणि मग ते पूर्ण करण्यासाठी पून्हा अधिक काळ ध्यान्-जपाला बसावं लागायचं.... चला जाऊ द्या, आणखी एखादं कर्म सांगा."
     संतांना वाटलं, त्यांनी केलेली सगळी तपश्चर्या वाया गेली आहे. त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू ओघळले. इतक्यात संत झोपेतून जागे झाले. त्यांना स्वप्नात दडलेला अर्थ समजला. त्यांना आपल्या साधनेचा झालेला अहंकार दूर झाला. ते आपल्या त्यागमय जीवनाच्या बदल्यात अपेक्षा ठेऊ लागले होते. त्यादिवसापासून मात्र विचलित न होता, परमेश्वराच्या ध्यानात रमू लागले.

Tuesday, January 24, 2012

dainik surajya, solapur 24/1/2012
gavakari, nashik 2412012

Sunday, January 22, 2012

आधी प्राथमिक शिक्षणाची दैना थांबवा, मग...

      सर्व शिक्षा अभियानमुळे प्राथमिक शिक्षणात भौतिक सुविधा आल्या, पण शैक्षणिक गुणवत्ता काही विकसित झाली नाही. 'प्रथम' या सामाजिक संस्थेने देशातल्या घसरलेल्या शिक्षणाविषयी विचार करायला लावणारा रिपोर्ट  सर्व शिक्षा अभियानने काहीही साध्य झाले नसल्याचेच सांगत आहे. सर्व शिक्षा अभियानवर  कोट्यवधी पैसा लुटण्यात आला. तो अक्षरशः पाण्यात गेला आहे.( का कुणाच्या घशात गेला आहे?) या अभियानाची चिकित्सा होण्याची आवश्यकता असताना व त्यात सुधारणा करण्याची गरज असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून राष्ट्रीय माध्यमिक अभियानाची सुरूवात केली आहे. त्याच्या यशापयशाचा कुठेच ठोकताळा नसताना त्याच धर्तीवर आता राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान (रुसा) राबवण्याचा घाट घातला आहे. सर्व शिक्षा अभियानातून काही आऊट्पूट निघाले नसताना सरकार अभियानावर अभियान राबवत आहे. पैसा खोर्‍याने ओतत आहे, मात्र शिक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर गांभिर्याने विचार केला जात नाही, असेच यावरून स्पष्ट होते. 
      प्राथमिक शिक्षणाची चिरफाड करणारे 'प्रथम' संस्थेबरोबरच गेल्या तीन महिन्यात आणखी दोन संस्थांचे रिपोर्ट जाहीर झाले आहेत. या सर्व्हेक्षणांमुळे भारतीय प्राथमिक शिक्षण पद्धतीवर खरोखरीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'प्रथम' संस्थेने   देशभरातील ६ लाख ५० हजार प्राथमिक शाळांमधील मुलांचे सर्व्हेक्षण केले. यात म्हटले आहे की,  गेल्या वर्षभरात पहिल्यापेक्षा अधिक प्राथमिक शिक्षणाची वाताहत झाली असून पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीच्या वर्गातल्या पाठ्यपुस्तकातले धडे  धडपणे वाचता येत नाहीत. केवळ ४८.२ टक्के विद्यार्थीच व्यवस्थितरित्या वाचू शकले  आहेत. विशेष म्हणजे  शिक्षणाचा अधिकाराचा कायदा (आरटीआय) लागू होण्यापूर्वी परिस्थिती चांगली होती, असा हा सर्व्हे सांगतो. तिसरी इयत्तेतील केवळ २९.९ टक्के मुले  वजाबाकी ही क्रिया करू शकली आहेत.
     आरटीआय ऍक्ट लागू झाल्याने  शिक्षण घेणार्‍या मुलांच्या संख्येत वाढ झाली असली तरी उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा मात्र घसरला आहे. या सर्व्हेक्षणापूर्वी प्राथमिक शिक्षणाचा  घसरलेला दर्जा दर्शविणारे आणखी दोन रिपोर्ट समोर आले आहेत. विप्रो आणि एज्युकेशन इनिशिएटिव या संस्थाच्या सर्व्हेक्षणात नामांकित शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण या संस्था फक्त पाठांतरावर जोर दिले जात असल्याचे म्हटले आहे. याशिवाय एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रिपोर्टनुसार ७४ देशांमध्ये भारताचा क्रमांक खालून दुसरा राहिला आहे.   भारतीय शालेय मुलांपेक्षा फक्त किर्गिस्तानची मुले मागे आहेत.
     जर आपण ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था (नॉलेज इकोनॉमी) बनवणार असू, तर हे रिपोर्ट  आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावेत. सध्याचे ज्ञान आणि टेक्नोलॉजीच्या मदतीने आपली अर्थव्यवस्था जिथंपर्यंत पोहोचायला हवी होती, तिथंपर्यंत ती पोहोचली आहे, असे वारंवार सांगितले जात आहे. यानंतरचा आपल्या देशाचा विकास ज्ञानाच्या विकास आणि शोधावर अवलंबून राहणार आहे. जर शालेय स्तरावरचा पाया कमकुवत ठरत असेल तर मग उच्च शिक्षणाचा स्तर उंचावणार कसा हा प्रश्न आहे.
     प्राथमिक शिक्षण स्तरावर सर्व शिक्षा अभियान राबवण्यात आले. यासाठी केंद्राने कोट्यवधी रुपये राज्य शासनांना पुरवले. तो पैसा कसा खर्च करायचा , यासाठी राज्य शासनांना मुभा दिली होती. मात्र गेल्या दहा- बारा वर्षात त्याचे आऊट्पूट शोधले तर हाती धुपाटणेच लागल्याचे स्प्ष्ट होते.  हां, एक गोष्ट मात्र झाली. सरकारी प्राथमिक शाळांना भौतिक सुविधा मिळाल्या. वर्ग खोल्या, मध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी खोल्या उपलब्ध झाल्या. शिवाय शौचालये-स्वच्छतागृहे, विकलांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, वीज- पाण्याच्या सुविधा मिळाल्या. शाळांच्या आवाराला सुरक्षा भिंती मिळाल्या. वरिष्ठ वर्गांना संगणक मिळाले. म्हणजे भौतिक सुविधा मिळाल्या. पण त्याचा वापर मात्र कुठेच दिसत नाही. महाराष्ट्र राज्यातली परिस्थिती पाहिल्यास असे लक्षात येईल की, जवळपास ८० ट्क्के शाळांमधील शौचालये वापरण्यालायक नाहीत. त्यांचा वापर होत नाही. विद्यार्थ्यांना अजूनही उघडयावर शौचास करणे भाग पडत आहे. संगणक मिळाले. पण ते चालविणारे प्रशिक्षित शिक्षक नाहीत्. त्यामुळे संगणक धूळ खात पडून आहेत, असे विदारक चित्र  'प्रथम'च्या पाहणीतून समोर आले आहे.
     खेळाची साधने, वाचनालयाची पुस्तके मिळाली, पण ती कपाटाच्या बाहेर आलीच नाहीत.  सोयी-सुविधा मिळाल्या. भौतिक सुविधा प्राप्त झाल्या परंतु शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याऐवजी अधिक घसरत चालली. शिक्षक वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे, शौचालये-मुतार्‍या, आवारभिंत बांधत राहिले. त्यांची मानसिक आवस्था बिघडून गेली. अशैक्षणिक कामाचा व्याप कमी होण्याऐवजी वाढत गेला. त्याच्याने शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत गेले. शिवाय आणखीही काही कारणे शैक्षणिक दर्जा घसरण्यास कारणीभूत आहेत. आता गेल्या वर्षापासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्याचीही तर्‍हा यापेक्षा वेगळी होणार नाही. यातूनही भौतिक सुविधांवर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपल्या शिक्षणसम्राटांना आयती पर्वणी मिळाली आहे. या बहाद्दरांनी राज्यात शिक्षणसंस्था उघडल्या. पण शाळांना ना इमारती, ना सुविधा दिल्या. शाळा अनुदान लाटत राहिले, आपल्या आप्तेष्टांना नोकरीला लावून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला. वर शिक्षणसम्राट म्हणून मिरवण्यात धन्यता मानली. पण शाळा पडक्या वाड्यात, पतर्‍याच्या चार भिंतीत भरवत राहिले. पिण्याच्या पाण्याची, शौचालय-स्वच्छतागृहांचा अभाव, खेळायला मैदाने नाहीत, अशा कोंडवाड्यात शाळा भरवत राहिले. याच्याने कोणता शैक्षणिक गुणवत्तेचा विकास होणार आहे?  आता त्यांना  राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातून  आयत्या शैक्षणिक भौतिक सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे शिक्षण सम्राटांचे भलेच होणार आहे.
     माध्यमिक शिक्षा अभियानाला आता कुठे सुरुवात झाली नाही तोच सरकारने राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान राबवण्याचा घाट घातला आहे. अर्थात आपल्या देशातल्या उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांची आवस्थाही काही यापेक्षा वेगळी नाही. शैक्षणिक दर्जेबाबत ओरड सुरू आहेच. केवळ पदव्यांच्या भेंडोळ्या दिल्या जात आहेत.  शिवाय आजच्या परिस्थितीला अनुसरून शिक्षण देणार्‍या संस्थांची वाणवा आपल्या देशात आहे. उच्च शिक्षणाचा स्तरसुद्धा फारसा चांगला आहे, असा नाही. कुठल्याही भारतीय विद्यापीठाची विदेशी विद्यापीठाशी तुलनाच केली जाऊ  शकत नाही, इतकी विदारक अवस्था इथल्या विद्यापीठांची आहे.  भारतात ज्या काही चांगल्या संस्था आहेत, त्यासुद्धा आंतरराष्ट्रीय  कसोटी स्तरावर उतरू शकत नाहीत. गेल्या काही वर्षात आपण शिक्षणाची जी उपेक्षा केली आहे, त्याचा हा परिणाम आहे, असे खात्रीने म्हणायला हवे. पैसा खर्च केला म्हणजे गुणवत्ता आली, असे होत नाही.  
     आपल्याकडे उच्च शिक्षण व्यवस्थेत खासगी क्षेत्राचा वावर वाढला आहे, वाढतो आहे. पण खासगी शिक्षण हे  गुणवत्तेला पर्याय होऊ शकत नाही.   खासगी शाळांमध्ये जवळपास ६० टक्के मुलं शिक्षण घेतात. जी मुलं सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, ती मुलंसुद्धा खासगी शिकवण्यांना जातात. कारण सरकारी शाळांमध्ये शिकवलं जात नाही.  ज्या पालकांची थोडीफार चांगली आर्थिक  परिस्थिती आहे, ते आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये पाठवताना दिसत आहेत. खासगी शाळांचे लक्ष्य एकच असते, परीक्षेत मुलांचा परिणाम चांगला दिसावा. त्यामुळे ते मुलांवर पुस्तके लादताना आणि घो़कंपट्टीवर जोर देताना दिसतात. पालकसुद्धा धावपळीच्या जगात मुलाकडे व्ययक्तिक लक्ष द्यायला तयार नाही. त्यापेक्षा लागणारा भरमसाठ पैसा द्यायला तयार आहे. त्याला शिक्षण कुठे चांगले मिळते, कसे मिळते याचा अजिबात पत्ता नाही.
      खासगी संस्थांच्या या रणनीतीमुळे विद्यार्थी परीक्षेत  चांगला क्रमांक मिळवण्यात व एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित उच्च शिक्षण देणार्‍या संस्थेत प्रवेश मिळवायला पात्र होतो. पुढे चांगली नोकरीही मिळवून जातो. परंतु, त्याच्या बौद्धिक वाढीचा आणि समजूतदारपणाचा सर्वांगिण विकास होत नाही. केवल एकतर्फी समज आणि ज्ञानाच्या जोरावर युवक नोकरी करण्याइतपत सक्षम होतो. पण शोध किंवा काही नवं करण्याच्या गोष्टीत मात्र तो यशस्वी होत नाही.
     या सगळ्या सर्व्हेक्षणांमधून एक लक्षात येते की, शिक्षणाची ही सगळी गडबड प्राथमिक शिक्षणापासून होत आहे. ती सुधारण्यासाठी मोठ्या परिवर्तनाची आवश्यकता आहे. गुणवत्ता नसलेल्या शिक्षणातून आपण अशी युवा पिढी घडवत आहोत की, येणार्‍या आव्हानाला झेलण्यास असमर्थ ठरू शकतील. सरकारला तर प्रयत्न करावे लागतीलच पण खासगी क्षेत्रानेसुद्धा आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शेवटी प्रश्न देशाच्या नव्या पिढीचा आहे. त्यासाठी 'आधी कळस मग पाया' या समजुतीवर न जाता 'आधी पाया मग कळस' अशी आपल्या शिक्षणाची चाल असायला हवी , याचे भान कुठे तरी ठेवायला हवे                                                                                      

नाट्य संमेलन, सांगली

सांगली येथे पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची ही एक सचित्र झलक