Thursday, December 29, 2016

घरच्यांपासून लपवून हॉकी शिकलो


     पंजाबच्या एका छोट्याशा गावात राहणार्‍या हरजीतचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. ते नेहमी ट्रक घेऊन देशातल्या दूरवरच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जायचे. पंधरा-पंधरा दिवस, महिना-महिना घरी येत नसत.अशा परिस्थितीत सगळी जबाबदारी आईवर पडायची. ते सगळे मोहाली जिल्ह्यातल्या कुरेली गावात राहत असत. घरापासून जवळच असलेल्या मैदानावर गल्लीतली मुले हॉकी खेळायला जायची. हरजीतदेखील शाळा सुटल्यावर थेट मैदानावरच जायचा. आई हाका मारायची,ओरडायची, पण त्याचा हरजीतवर कसलाच परिणाम व्हायचा नाही. आई रागवायची,बाबा आल्यावर त्यांच्याजवळ कागाळी करीन म्हणायची,पण बाबा कित्येक दिवसांनंतर यायचे,मग आई तक्रार करण्याचे विसरून जायची.
     आईला काळजी वाटायची. मुलाचे अभ्यासकडे लक्ष नाही. फक्त खेळाकडे ध्यान आहे. तिला काय माहित की, खेळातदेखील करिअर करता येते.तिची फक्त एवढीच इच्छा असायची की,त्याने मोठे होऊन बापासारखे ट्रक ड्रायव्हर होऊ नये.तिचे एकच स्वप्न होते, मुलाने शिकून एखादी चांगली नोकरी पकडावी.त्या दिवसांत शेजार्‍यांच्या फारच कमी घरांमध्ये टीव्ही होता. काही लोक रेडिओवर क्रिकेट समालोचन ऐकायचे. सचिन आणि गांगुली यांची नावे त्याने आवश्य ऐकली होती. मात्र कुठल्या हॉकीपटूचे नाव माहित नव्हते. हॉकी खेळण्यात त्याला खूप मजा येत होती. हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर स्टीकने चेंडूशी खेळायला त्याला फार आवडायचं.
आता त्याचं अभ्यासातून मन उडालं होतं. एक दिवस त्याने हिम्मत करून बाबांना सांगून टाकलं की, मला शाळा शिकायची नाही, हॉकी शिकायची आहे. मला हॉकीपटू व्हायचं आहे. हे ऐकून बाबांना मोठा धक्का बसला. ते त्याच्यावर चांगलेच भडकले. त्यांना वाटले की, पोरगं,चुकीच्या दिशेने चाललं आहे. ते त्याच्याकडून खूप मोठी आशा बाळगून होते. पण पोरगा मात्र त्यांची स्वप्ने धुळीला मिळवायला निघाला होता.त्याला खूप बोलणी खावी लागली. पण हरजीतसिंहवर त्याचा काही फरक पडला नाही.शाळेतल्या शिक्षकांनीही हरजीतच्या वडिलांना समजावून सांगितलं. खेळातसुद्धा चांगल्या संधी आहेत. त्याला अडवू नका.खेळू द्या. शेवटी बाबा तयार झाले. हॉकी शिकवणुकीचा खर्च मोठा होता.हरजीतला हॉकी कीट घ्यायसाठी वडिलांना नातेवाईकांकडून उधारीने पैसे घ्यावे लागले होते. शिकवणीची फीदेखील जास्त होती. प्रशिक्षकानं सांगितलं होतं की, मुलाच्या डाएटकडे लक्ष द्या. वडिलांची कमाई इतकी नव्हती की, ते इतका खर्च पेलू शकतील. मुलाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्या हाताबाहेरचं काम होतं. अडचणी वाढल्या तसं, त्यांनी एक दिवस वैतागून सांगितलं की, आता खेळ-बीळ बंद कर आणि अभ्यासाला लाग. त्याकडे लक्ष दे. हरजीतला मोठा धक्काच बसला.पण वडिलांना काही बोलायची त्याची हिम्मत झाली नाही. प्रशिक्षण सोडून तो पुन्हा अभ्यासाला लागला. 
     बाबांची ताकीद होती की, चांगल्या गुणांनी पास व्हायला हवं. त्यामुळे त्याचा अभ्यासात अधिक वेळ जाऊ लागला. मात्र हॉकी मनातून जात नव्हती. हॉकीपासून काही दिवस दूर राहिला, पण फार दिवस नाही. घरच्यांपासून लपवून तो गोपाळ अ‍ॅकॅडमीत जायला लागला. अशाप्रकारे त्याची हॉकीची शिकवणी सुरू राहिली. घरच्यांना याची गंधवार्तादेखील लागली नाही. प्रशिक्षक त्याच्या कामगिरीवर खूश होते. ते दिवस मोठ्या अडचणीचे होते. त्याच्याजवळ बूट घ्यायलादेखील पैसे नव्हते. घरची परस्थितीही अशी नव्हती की, त्याने वडिलांकडे पैसे मागून घ्यावेत. त्यामुळे त्याला फाटक्या बुटावरच काम चालवावे लागे. त्याची हॉकी स्टीक तुटायची, तेव्हा प्रशिक्षक त्याला दुसरी स्टीक उपलब्ध करून द्यायचे. त्याला खेळत राहणं महत्त्वाचं होतं. हरजीतच्या आई बलवीर सांगतात की, आमची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती.हॉकी खेळायला त्याला चांगल्या बुटांची गरज होती. पण आम्ही नाही घेऊ शकलो. हॉकी खेळायला त्याला खूप दूर पायी चालत जावं लागायचं. मी जाणायची की, त्याला सायकल हवी आहे, पण आम्ही असहाय्य होतो. 
     या दरम्यान हरजीत स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत होता. मोहालीत त्याचं नाव होत होतं. ही गोष्ट घरच्यांपर्यत पोहोचली, तेव्हा शेजार्‍यांनी सांगितलं की, तुमचा मुलगा खेळात चांगला हुशार आहे. खूप चांगला खेळतो. आता घरचे नाराज नव्हते. या दरम्यान त्याचा मोठा भाऊ नोकरी करायला सौदी अरेबियात गेला.लहान भावाच्या प्रशिक्षणाची सारी बाजू त्याने उचलली. घरची परिस्थिती सुधारू लागली.हरजीत 2008 साली गाव सोडून जालिंधरला आला. तिथे सुरजीतसिंह अ‍ॅकॅडमीत दाखल झाला. तिथे त्याला पहिल्यांदा पुरेशा सुविधांसह खेळण्याची संधी मिळाली. तो या संधीचे महत्त्व जाणून होता. मोठ्या जोमाने तो आपले लक्ष्य गाठण्यासाठी कामाला लागला. आता हॉकी त्याचं वेड बनलं.
     2012 साली पंजाब ज्युनिअर हॉकी संघात त्याला स्थान मिळालं. याच वर्षी सुल्तान ऑफ जौहर कपसाठी खेळण्याची संधी मिळाली. 2013 साली सगळ्यात उभरता खेळाडू म्हणून त्याला पुरस्क्कार देऊन गौरवण्यात आलं. आई सांगते की, हरजीत खूपच कष्टाळू आणि शांत स्वभावाचा आहे. तो आमच्यापासून लपवून हॉकी शिकत राहिला. मोठ्या अडचणी असतानाही त्याने आम्हाला काही मागितले नाही. आता संपूर्ण देश त्याचे कौतुक करत आहे. आम्हाला त्याचा मोठा अभिमान वाटतो आहे. डिसेंबर 2016 मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील ज्युनिअर हॉकी संघाने देशाला विश्‍वचषक मिळवून दिला. तब्बल 15 वर्षांनंतर संघाने ज्युनिअर हॉकी विश्‍वचषक पटकावला. जिंकल्यानंतर हरजीतने घरी फोन केला, तर कळलं की सगळं गाव या विजयाचा उत्सव साजरा करत आहे.हरजीत म्हणतो की, वाटलं होतं की, आपण ही बातमी सांगितल्यावर आईला मोठा धक्का बसेल. पण शेजार्‍यांनी आधीच तिला भेटून शुभेच्छा दिल्या होत्या. आईला आनंद होणं,हा माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे.

Tuesday, December 27, 2016

करुण कलाधरण नायर     25 वर्षाच्या या युवा भारतीय क्रिकेटपटूचे नाव आज प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठांवर आहे. का असणार नाही म्हणा, कारण करुण नायरने इतक्या लहान वयात कामगिरीच तशी मोठी केली आहे. त्याने आपल्या तिसर्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तिहेरी शतक झळकावून आपले नाव जगातल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामिल केले आहे.भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेतल्या पाचव्या कसोटी सामन्यात करूणने 303 धावा बनवून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्या शतकाला तिहेरी शतकात बदलून विरेंद्र सेहवागसोबतच्या क्लबमध्ये जाऊन पोहचला आहे.
     क्रिकेटपटू करण नायरचा जन्म 6 डिसेंबर 1991 मध्ये जोधपूर येथे झाला.खरे तर तो मूळचा केरळचा राहणारा आहे. राज्यस्तरावर करण कर्नाटककडून खेळतो आहे. क्रिकेटच्या मैदानावर अगदी मोकळेपणाने खेळणारा आणि गोलंदाजांची शिट्टी-बिटी गुल करणारा करण स्वभावाने तसा फारच लाजाळू आणि कमी बोलणारा आहे.तो कोणाशीही एकदम मिसळत नाही.
     करणने आपल्या पहिल्या दर्जाच्या खेळाला 2013 ला प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच वर्षी म्हणजे 2016 ला त्याने  पदार्पण केले. पहिल्या दर्जाच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्याची शानदार कामगिरी पाहून आयपीएल 2016 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सने त्याला 4 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. पण त्याचा बेस प्राइस फक्त 10 लाख रुपये होता.
     आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या तिसर्याच सामन्यात परिपक्व खेळाचे प्रदर्शन करत त्याने सार्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. करणला लहानपणी फुफ्फसाचा आजार होता. फुफ्फसाची क्षमता कमी असल्याने त्याला  डॉक्टरांनी शारीरिक मेहनतीचा सल्ला दिला होता. यामुळे वडिलांनी त्याला क्रिकेटच्या मैदानात उतरवले. शानदार कामगिरीमुळे करण भविष्यात कित्येक विक्रम तोडू शकतो, यात वादच नाही. त्याच्या पुढील कामगिरीस शुभेच्छा!कुस्तीला पुन्हा वैभव प्राप्त होईल?


     ग्लॅमर,प्रेम आणि रोमांस  यांनी भरलेल्या बॉलीवूड चित्रपटांना कंटाळलेले प्रेक्षक आता खेळ आणि खेळाडूंच्या जीवनाशीसंबंधीत चित्रपटांना अधिक पसंद करताना दिसत आहेत. लगान,चक दे इंडिया,भाग मिल्खा भाग, पानसिंह तोमर आणि मेरी कोमसारख्या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे उत्साहित बॉलीवूड निर्मात्यांचे लक्ष आता कुस्तीशीसंबधीत कथानकावर गेलं आहे. सलमान खाननी पश्‍चिम उत्तर प्रदेशातील कुस्तीशीसंबंधीत कथेवर सुल्तान  बनविला. जॉन अब्राइमने रुस्तम-ए-हिंद गामांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.अमिरखानचा दंगल आपलं लक्ष केवळ देशातला प्राचीन खेळ-मलविद्या किंवा कुस्ती याची झालेली दुर्दशा याकडेच वेधत नाही तर भारतीय समाजात होत असलेल्या बदलावरही प्रकाश टाकतो.
     तसे पाहिले तर आपल्या देशातले क्रीडाप्रेमी क्रिकेटशिवाय दुसर्‍या कुठल्या खेळाकडे पाहायलाच तयार नाहीत.नाही म्हणायला  हॉकी,व्हॉलीबॉल,गोल्फ,बास्केटबॉल आणि कबड्डीविषयी थोडी रुची वाढत आहे. पण क्रिकेटच्या मानाने ती कमीच आहे. ही आवडदेखील देशातल्या काही भागा-प्रदेशांपुरतीच मर्यादित आहे. फुटबॉल म्हटले की, पश्‍चिम बंगाल. आपल्या देशातल्या इतर राज्यात याबाबतची रुची जवळजवळ नाहीच. भारतात कुस्तीची लोकप्रियता कमी होत असली तरी ऑलम्पिकमध्ये हा मोठा लोकप्रिय खेळ आहे. जगातल्या 122 देशांमध्ये कुस्ती खेळली जाते. भारत,पाकिस्तान,इराण,तुर्की, उज्बेकिस्तान, तजाकिस्तान,मंगोलियासारख्या देशांमध्ये कुस्तीविषयी पारंपारिक आवड पाहायला मिळते.महाभारत काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत भारतात मल्लविद्येला म्हणजेच कुस्तीला एक समृद्ध परंपरा आहे. आजदेखील उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा,मध्यप्रदेश, राज्स्थान आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील अशी अनेक ठिकाणे आहेत,जिथे कुस्ती आणि पैलवानीविषयी लोकांमध्ये कमालीची रुची आहे. मोठ्या शहरांमध्ये आयपीएल सामान्यांसाठी लाखोची गर्दी होत असते, तशी ग्रामीण भागात कुस्ती पाहायला गर्दी होत असते. आपल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नाशिक, सातारासारख्या जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागात कुस्तीचे आखाडे प्रसिद्ध आहेत.इथल्या कुस्तीची ऐटच न्यारी आहे.
     स्वातंत्र्य पूर्वकाळात सगळ्या जुन्या शहरांमध्ये जसं की, भोपाळ,इंदोर,पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा,नागपूर, मुंबई, बडोदा,बरेली, ग्वालियर,झांसी,दिल्ली,रोहतक,मेरठ,लुधियाना,अमृतसर, जालंधर आदी शहरांमधले आखाडे प्रसिद्ध आहेत. ही आखाडे शहरापासून काही अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात बांधले गेले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे कुस्तीवर विलक्षण प्रेम. फाळणी अगोदरच्या पंजाब प्रांतातल्या प्रसिद्ध पैलवानांना आंमत्रण देऊन इथल्या कुस्तीगीरांना तालीम द्यायचे. त्यामुळेच महाराष्ट्रात आखाड्यांना तालीम म्हटले जाऊ लागले. महाराजांमुळे कुस्तीला महाराष्ट्रात मान मिळाला. आजही पूर्वीप्रमाणे कुस्तीचा फड ग्रामीण भागात रंगतो. फड प्रेक्षकांनी खचाखच भरलेला असतो. 
     साठच्या दशकापर्यंत उत्तर भारत आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमधल्या आखाड्यांमध्ये पैलवानांची गर्दी होती. त्या दिवसांत पैलवान आजच्या चित्रपटातल्या नायकाप्रमाणे  लोकांमध्ये प्रसिद्ध होते. लोक सामान्य लोक त्यांना पाहायला, बोलायला, भेटायला उत्सुक असत. त्यांना दूध, खारीक-बदाम खाऊ घालत, त्यांना मान-सन्मान देण्यात त्यांना आनंद वाटे. दिल्लीचे गुरु हनुमान आणि त्यांचे शिष्य चंदगीराम यांचे नाव आदराने घेतले जाई. 1970 च्या दशकापर्यंत बॉलीवूडमध्ये दारासिंहचे चित्रपट सुपरहिट चालायचे, जे प्रामुख्याने त्यांची मल्लविद्या किंवा शरीरसौष्ठवर अधारित होते.
     भारतातल्या प्रसिद्ध पैलवानांमध्ये जगज्जेते गुलाम मोहम्मद ऊर्फ गामा यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. 1878 मध्ये अमृतसर येथे जन्मलेले गामा फक्त 10 वर्षाचे असताना त्यांनी जोधपूरमध्ये झालेल्या आखाड्यात 400 पैलावानांच्या स्पर्धेत 15 वे स्थान पटकावले होते.त्यांच्याबाबतीत आणि त्यांच्या सरावाबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. ते रोज पाच हजार जोर बैठका आणि तीन हजार दंडबैठका मारायचे.त्यांचा दररोजचा खुराक जबरदस्त होता. 15 लीटर दूध,एक शेर बदाम आणि अर्धा शेर तूप त्यांना रोज लागायचे. 1897 आणि 1910 च्या दरम्यान गामा यांनी भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये जाऊन तिथल्या नामांकित पैलवानांना धूळ चारली होती. त्यांना 1910 मध्ये रुस्तम-ए-हिंद हा किताब दिला गेला.
     गामा यांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिद्ध आहे. तसेच गुलाम आलिया यांनी 1902 मध्ये युरोपातील सर्व मल्लांना जिंकून रुस्तम-ए-हिंदचा किताब मिळवला होता. कल्लू आलिया व त्यांचा मुलगा गामा कल्लू हाही प्रसिद्ध मल्ल होता. अहमदबक्ष या मल्लाने 1912 मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजानाच्या सर्व प्रसिद्ध पैलवानांना हरविले होते.
     1920 साली सर दोराबजी टाटांच्या मदतीने काही कुस्तीगीर  एंटवर्प ऑलिम्पिक सामान्यांसाठी गेले होते. त्यावेळी शिंदे नावाच्या महाराष्ट्रीय मल्लाने कुस्तीत आपली चुणूक दाखवली होती. त्यानंतर 1948 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या मातीतल्या रांगड्या खाशाबा जाधवने दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळवला. पुढे 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटवून भारताला एकमेव कास्यपदक मिळवून दिले. त्याच सामान्यात के.डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक आला.अलिकडे सुशांतकुमार,योगेश्‍वर दत्त यांनीही आपल्या कुस्तीचे वैभव राखत यश मिळवून दिले.
      फाळणीनंतर गामा पाकिस्तानात गेले आणि लाहोरला स्थायिक झाले. आपल्या जीवनाच्या आखेरच्या काळात ते खूपच आजारी होते. त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावेळेला भारतातले उभरते उद्योगपती जीडी बिर्ला, जे कुस्ती आणि पैलवानीचे मोठे शौकीन होते, त्यांनी गामा यांना आर्थिक मदत केली. गामा यांचे निधन 23 मे 1960 मध्ये लाहोर येथे झाले. असे म्हटले जाते की, चिनी मार्शल आर्टचा विख्यात कलाकार ब्रूसली याने गामा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतली होती.
     भारतात कुस्ती आणि पैलवानीची इतकी मोठी समृद्ध परंपरा आणि लोकप्रियता असताना शेवटी आपण ऑलम्पिक, एशियाड आणि कॉमनवेल्थसारख्या खेळांमध्ये का चांगले प्रदर्शन करू शकत नाही? का आपण साक्षी मलिकने मिळवलेल्या महिला कुस्तीतल्या कास्य पदकावर संतुष्ट होतो? ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.याला सर्वस्वी आपल्या देशांची सरकारे जबाबदार आहेत.त्यांनी या खेळाची फार मोठी उपेक्षा केली आहे. आता कुस्ती फक्त गावांपुरती मर्यादित राहिली आहे. शहरी मध्यमवर्ग क्रिकेटमध्ये मश्गूल आहे. कारण त्यात ग्लॅमर,पैसा,रोमांच सर्व काही आहे. ग्रामीण भारतातले मोठे-वृद्ध, मुले आणि युवा कुस्तीचे आखाडे पाहून रोमांचित होतात. त्यांच्या मनोरंजनाचे ते साधनच आहे. कुस्ती ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आहे. पण ही कुस्ती गाव-खेडे सोडून बाहेर पडायला हवी आहे. 
     अमिर खानच्या दंगल चित्रपटाने भारतीय कुस्तीविषयी एक उम्मीद जागवली आहे. रुस्तम-ए-हिंद गामा आपल्या वृद्धापकाळात आपल्यावरील उपचाराला महाग झाले असले तरी भारताच्या युवा पैलवानांना आणि खास करून गीता फोगट,बबिता फोगट आणि साक्षी मलिकसारख्या पैलवानांना मदत आपल्या देशातल्या सरकारांनी औद्योगिक घराण्यांनी करायला हवी आहे.
daink sanchar,solapur

Monday, December 26, 2016

प्रत्येक दिवस,क्षण उल्हास आणि उत्साहाने जगा


     नवं वर्ष, नवा उल्हास आणि नवा विचार घेऊन येत असतो. प्रत्येक माणूस विचार करत असतो की,जर वर्षाचा पहिला दिवस चांगला असेल ,उल्हासित,उत्साहित असेल तर तशाच प्रकारे संपूर्ण वर्ष जाईल. हा विचार चांगलाच आहे,कारण ज्यावेळेला आपण आपल्या मनाला एक शक्तीशाली संकल्प देतो. तेव्हा त्यानुसारच आपल्या सगळ्या शक्ती काम करायला लागतात.
प्रत्येक दिवस माना नवीन वर्ष
नव्या वर्षाचा पहिला दिवस कसल्याही परिस्थितीत चांगाल जावा, यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कित्येकदा भांडखोर व्यक्तीदेखील हा दिवस स्वत:ला विवादात न टाकण्याचा प्रयत्न करतो. पण दुसर्‍याच दिवशी सगळम काही सामान्य हो ऊन जातं. मग आपण फक्त नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचाच का विचार करावा? आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस हा नवा असतो. दररोज सूर्य आपल्या नव्या लालसर.सोनेरी छटांसह उगवत असतो.निसर्ग रोज आपल्याला नव-नवी सुंदरता प्रदान करत असतो. कारण आपण आनंदी राहावं, उल्हासित राहावं आणि जीवनाचा घेत राहावं. जर निसर्ग आणि त्याचे पाचही तत्त्व रोज आपल्याला नवं काही देण्याचा प्रयत्न करत असतील, तर मग आपण का नाही आनंद घ्यायचा? कारण फक्त हेच आहे की, आपण त्याचा सन्मान करत नाही. त्याचा स्वीकार करत नाही. आपण रोज आपल्या मनाला नव्या विचाराचा, नव्या उल्हासाचा गृहपाठ द्यायला हवा. त्यानुसार काम करत त्याला पुढे न्यायला हवं. आपण 24 तासाची दिनचर्या एका सिस्टीममध्ये बांधण्याचा आणि त्याला मूर्तरूप देण्याचा प्रयास करायला हवा. मग आपल्या लक्षात ये ईल की, हळूहळू आपल्या जुन्या सवयींमध्ये सुधारणा होत आहेत.हा प्रयत्न काही दिवस करीत राहिल्यास आपल्याला जाणवायला लागेल की,सगळं काही ठिक हो ऊ लागलं आहे.
समस्या खंबीर बनवतात
स्वामी विवेकानंद म्हणतात की, जर आपले जीवन सहज,सरळ चालले असेल, त्यात कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नसतील तर लक्षात घ्यावं की आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत. कारण यशाचा रथ समस्या, अडचणींना चिरडल्याशिवाय एक पाऊलदेखील पुढे सरकू शकत नाही. सत्यता हीच की,कुठल्याही यशामागे समस्यांचं असणं अनिवार्य आहे. त्यामुळे समस्यांना कधी घाबरून जाऊ नये. उलट मनाला स्थीर ठेवून त्याचं समाधान पाहा. वास्तविक, समस्या आपल्याला खंबीर बनवण्यासाठी येत असतात. त्यावेळेला आपली सगळी कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये अधिक सक्रिय होतात.ज्याच्याने अनुभव आणि बुद्धीचा विकास होतो.
नकारात्मक विचाराला रामराम
ज्याप्रकारे शरीराला अन्नाची आवश्यकता असते, त्याचप्रकारे आत्मा निरोगी राहावा, यासाठी सकारात्मकऊर्जेची गरज असते. त्यामुळे नेहमी सकारत्मक गोष्टींचाच विचार करा. नकारात्मकतेला मनात अजिबात आणू देऊ नका. असं माना की, जे काही जीवनात घडत आहे, त्यामागे काही ना काही प्रयोजन ठरलं आहे, काही तरी चांगलं दडलं आहे. असं एकदा  मन बनलं की,मग नकारात्मक विचार त्याकडे फिरकतसुद्धा नाहीत. जीवनात छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या भूमिका निभावत असतात.व्यावहारिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनातदेखील या गोष्ती महत्त्वाच्या आहेत. जे लोक या गोष्टींकडे लक्ष पुरवतात, त्यांच्यासाठी यशाची शक्यता अधिक असते. या सगळ्यांव्यतिरिक्त देवाविषयीचा दृढविश्‍वास दगडातदेखीव जीव ओतू शकतो. मनाची जर ही खात्री झाली की, माझ्या प्रत्येक कामात ईश्‍वरीय मदत मिळते आहे, तर त्याचा आत्मविश्‍वास इतरांपेक्षाही आणखी वाढतो. अशी माणसे कधीही निराश आणि हताश होत नाहीत. त्यांच्यांमध्ये नेहमी उल्हास आणि उत्साहाचा स्तर अन्य लोकांपेक्षा अधिक असतो.

भिजत घोंग़डे असलेल्या शाळांच्या वीजबिलाचा प्रश्‍न सोडविण्याची गरज


 वीज बील भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडीत करणे,मीटर काढून नेणे,नोटीस देणे अशी कारवाई वीज महावितरणने जिल्हा परिषदांच्या काही शाळांवर केली आहे. पण कारवाईने हा प्रश्‍न सुटणार नाही. यासाठी रज्य सरकारने ठोस भूमिका घेऊन शाळांच्या वीजबिलांसंदर्भात निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
 जिल्हा परिषदांच्या बहुतांश शाळांमध्ये संगणक, ई-लर्निंगचा वापर होत आहे.लोकवर्गणी, जिल्हा परिषद निधी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ई-लर्निंग सुविधा उपलब्ध होत आहेत.यासाठी विजेची नितांत आवश्यकता आहे. शिक्षण विभागातील अधिकारी शाळांनी विद्युत पुरवठा जोडून घेण्याबाबत वेळोवेळी सूचना करतात. प्रसंगी वीजपुरवठा जोडणी केली नाही म्हणून आढावा बैठकीत,शैक्षणिक शिबिरांमध्ये मुख्याध्यापकांना धारेवर धरले जाते. विद्युत पुरवठा जोडून घेतल्यानंतर वीज बिल कसे भरायचे हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच राहतो. त्यामुळे धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशा दुहेरी कात्रीत शिक्षक आणि शाळा सापडल्या आहेत.
 जिल्हा परिषदेच्या शाळा या डोंगर-कपर्‍यातून, माळरानावर अशा सर्वदूर पसरल्या आहेत.या शाळांना स्वतंत्र निधीची तरतूद वीज बिल भरण्यासाठी केलेली नाही. तरीही काही शाळा लोकवर्गणी, शाळा सुधार योजना अथवा शिक्षकांच्या पदरमोडीतून भरत असतात. शाळांना मिळणारा निधीच तटपुंजा असतो.त्यामुळे दर महिन्याला येणारे वीजबिल भरणे शाळांच्या आवाक्याबाहेरील प्रश्‍न बनला आहे. शाळांना येणारी वीज्बिलेही व्यावसायिक दरामुळे भरमसाठ येतात. हाच मुख्य कळीचा मुद्दा आहे. घरगुती जोडणीसाठी स्थिर आकार हा 40 रुपये आहे. परंतु व्यावसायिक वीज जोडणीमध्ये स्थिर आकार 190 रुपये आहे. म्हणजे शाळांना नाहक 150 रुपयांचा जादा भार सोसावा लागतो. शाळांमध्ये काही उत्पादक किंवा व्यावसायिक काम झाले असते तर ठीक आहे;परंतु केवळ अल्प व शैक्षणिक बाबींसाठी विजेचा योग्य वापर होत असताना व्यावसायिक दराने वीजबिल आकारणे अन्यायकारक आहे. त्यातच घरगुती वापरासाठी विजेचा दर हा 3.36 रुपये प्रति युनिट आकारला जातो. म्हणजे येथेही प्रत्येक युनिटमागे शाळांना नाहक दोन रुपयांचा भुर्दंड पडतो. त्यामुळे येणारी बिलेही भरमसाट येतात व न भरल्यामुळे कारवाईचा बडगा उभारला जातो. त्यासाठी राज्यसरकारने सकारात्मक भूमिका घेऊन शाळांना घरगुती पद्धतीने वीज बिलाची आकारणी करण्याची गरज आहे. राज्य सरकारने दीर्घकाळ भिजत पडलेला हा प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. 

ऑनलाईन गंडविण्याच्या घटना वाढल्या

 एटीएम कार्डची मुदत संपली आहे. क्रेडिट कार्डची पत वाढविण्यात येत असल्याचे फोनवरून सांगून भामटे स्वत: बँकेचा अधिकारी असल्याचे बतावणी करतात. 
बर्‍याचदा ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा एटीएम कार्डवरील नंबर वाचून सांगा अथवा कार्ड बंद होईल, असे सांगतात. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून नागरिक एटीएम कार्ड, डेबिट कार्डवरील नंबर सांगून मोकळे होतात. 
सायबर गुन्हेगार त्या क्रमांकाच्या आधारे दुसरे एटीएम कार्ड तयार करतात अथवा त्या नंबरच्या आधारे ऑनलाईन खरेदी करून लाखो रुपयांना चुना लावतात.  इंटरनेट, संगणक आणि मोबाईलच्या वापरासोबत या साधनांचा वापर करून गुन्हे करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषत: एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड मिळवून ऑनलाईन गंडविण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासोबतच महिलांचे अश्लील चित्रण करण्याचे प्रकारही होत असल्याने याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे गुन्हे दाखल होत आहेत. 
गेल्या काही वर्षांपासून मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे. सायबर गुन्हेगार हे जगाच्या पाठीवर कोठेही बसून गुन्हे करीत असतात. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यात अडचणी येत आहेत. यातून आपली फसवणूक टाळण्यासाठी  एटीएम कार्डची माहिती कुणाला ही  देऊ नका. ऑनलाईन गंडविण्याचे प्रकार वाढत असल्याने कोणत्याही व्यक्तीला एटीएम कार्ड, डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचे पिन नंबर, ओटीपी नंबर अथवा अन्य कोणतेही क्रमांक देऊ नका.

मनाच्या आजारपणाकडे लक्ष देणे गरजेचे

महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. तरी आरोग्य व आरोग्यसेवा या बाबत महाराष्ट्र पिछाडीवर राहिले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागत असला तरी आरोग्य सेवेच्या निर्देशांकामध्ये महाराष्ट्र मागे पडला आहे. सार्वजनिक सेवांचा र्‍हास झाल्यामुळे गरिबांनाही खासगी सेवेवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा हा एकूण आरोग्य सेवेचा कणा आहे. यामुळे यात आमूलाग्र सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, आरोग्यावरील सरकारी खर्चात व सरकारी सेवेत वाढ, पुरेसे व सक्षम मनुष्यबळ विकसित करणे, औषधांची खरेदी व आरोग्य केंद्रांना पुरवठा होणे, 'आशा-कार्यक्रमा'त सुधारणा, ग्रामीण उपकेंद्रांच्या दर्जात वाढ, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकार्‍याची नेमणूक करणे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये यांचे सक्षमीकरण करणे या सोबतच खासगी सेवेचे नियमन व प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. संशोधनात वाढ होणे गरजेचे
जगात २,४६८ मेडिकल कॉलेज आहेत. यातील भारतात ४१२ मेडिकल कॉलेज आहेत. दरवर्षी सुमारे ५६ हजार डॉक्टर बाहेर पडतात. इतर देशातील डॉक्टर आपल्या आयुष्यात जेवढय़ा रुग्णांवर उपचार करीत नसतील त्यापेक्षा जास्त रुग्णांवर भारतातील डॉक्टर आपले वैद्यकीय शिक्षण घेत असताना उपचार करतात. एवढा अनुभव त्यांच्याकडे असतो. जगात विविध ठिकाणी आपली सेवा देणार्‍या भारतीय डॉक्टरांनी आपली सेवा थांबविल्यास ही सेवा कोसळून पडेल, अशी स्थिती आहे. परंतु आपण मागे पडतो ते संशोधनात. यासाठी क्लिनिकल डाटा कलेक्शन करून त्यावर संशोधन होणे आवश्यक आहे. देशात मेडिकल महाविद्यालय कुठे व्हावे हे दानदाते व राज्यकर्ते ठरवितात. हे थांबणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या स्थितीत ३00 व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा देणे आवश्यक आहे. खासगी लोकसहभागातून विकास शक्य आहे.
राज्यातील मेडिकल रुग्णालयांची स्थिती फारशी चांगली नाही. खासगी लोकसहभागांतर्गत (पीपीपी) या रुग्णालयांचा विकास केल्यास याचा फायदा गरीब रुग्णांना होऊ शकेल. मेडिकल महाविद्यालयात सोयींच्या अभावाने येथून शिक्षण घेणारे डॉक्टरच आपली पुढील सेवा येथे देत नाही. याचा विचार होणे गरजेचे आहे. मागील एका सर्वेक्षणामध्ये कुपोषित चे प्रमाण मोठे आहे. याला विविध कारणांपैकी एक कारण म्हणजे महिलांमध्ये रक्ताचे कमी प्रमाण. याशिवाय स्तनपान व सहा महिन्यानंतर बाळाला देणारा पूरक आहार याकडे होत असलेले दुर्लक्ष हेही एक कारण आहे. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक महिला आपले सहा महिने व त्यापुढील बाळ नातेवाईकांच्या भरोवशावर ठेवून कामाला जातात. परिणामी, बाळाला पोषक आहार मिळत नाही. अंगणवाड्यामध्ये पाळणाघराची सोय केल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होईल. विशेष म्हणजे, शासनाच्या आरोग्य योजना योग्य पद्धतीने जरी राबविल्यास ३0-४0 टक्के कुपोषण कमी होऊ शकते.  केवळ शरीराच्या आजारपणाकडे लक्ष देऊ देऊन चालणार नाही, तर मनाच्या आजारपणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. समाजात वाढते एकारलेपण हाही एक मानसिक आजार आहे. कुपोषण आणि दारिद्रय़ हे समाजातील मोठे आजार आहेत.

रोजगार हमीचे जनक वि.स.पागे


 कष्टकर्‍यांच्या हक्काचा रोजगार देण्याच्यादृष्टीने सांगली जिल्ह्यातल्या  सुपुत्र आणि विधानपरिषदेचे माजी सभापती वि.स.पागे यांनी राज्यात रोजगार हमी योजनेचा कायदा केला.राज्याच्या या ऐतिहासिक निर्णयाची केंद्रानेदेखील दखल घेतली आणि तत्कालीन कॉंगेस आघाडी सरकारने ही योजना 2005 पासून  देशभर सुरू केली.
 गरिबांच्या चेहर्‍यावरील दु:खाची जाणीव, तसेच कष्टकर्‍यांच्या हाताला हक्काचे काम मिळावे, तरच त्याला पोटभर अन्न मिळेल, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तासगावचे सुपुत्र वि.स. पागे यांनी रोजगार हमी योजना जन्मास घातली. केवळ घोषणा करून वि.स.पागे थांबले नाहीत. सध्याच्या राज्यकर्त्यांप्रमाणे त्यांची ही केवळ घोषणा नव्हती. त्यांनी रोजगार हमीची योजना जाहीरही केली आणि तासगाव तालुक्यातील विसापूर येथून योजनेची सुरुवातही करून दाखवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ती यशस्वीदेखील करून दाखवली.म्हणूनच त्यांना रोजगार हमीचे जनक म्हटले जाते.
 गुणवंत,कीर्तीवंत,दूरदृष्टीचे संयमी, सोज्वळ असे व्यक्तीमत्त्व म्हणजे वि.स. पागे.1969 मध्ये पागे यांनी मांडलेल्या या पहिल्या कामाचा प्रयोग सर्वप्रथम तासगाव तालुक्यातील विसापुरात झाला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याहस्ते या कामाचा प्रारंभ होणार होता. परंतु,तांत्रिक अडचणीमुळे तत्कालिन कृषिमंत्री पी.के. चव्हाण यांच्याहस्ते प्रारंभ झाला. रोहयोची पहिली कुदळ विसापुरात मारली गेली. 25 टक्के लोकवर्गणी आणि 75 टक्के शासनाचा पैसा अशा पद्धतीने पहिल्यांदा या कामाची सुरुवात झाली.त्यावेळी लोकवर्गणीतून दीड-दोन हजार आणि सरकारकडून पाच-सहा हजार अशा आठ एक हजाराचे हे पहिले काम झाले.खुदाई करून या योजनेतून वृक्षारोपण करण्यात आले.
 दोन वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यभर ही योजना लागू केली. त्यावेळी वि.स. पागे यांचे सर्वत्र कौतुक झाले.काम नसणार्‍या अनेक बेकारांनी त्यांना धन्यवाद दिले. पुरुष आणि महिलांना समान मजुरी मिळाली पाहिजे, या हेतुने 2 रुपये 70 पैसे मजुरीवर मजुरांनी काम केले. सुरुवातीला 8 ते 10 मजूर कामाला होते. सुमारे 56 लाभधारकांनी विविध कामे यातून केली होती. पुढे राज्यात सर्वत्र या कामाची मागणी वाढू लागली. पर्यायाने गरजूंना स्थानिक पातळीवर काम मिळाल्याने खूप समाधानाचे वातावरण होते. महाराष्ट्राने ही योजना बरीच वर्षे चालवली. याचे अनुकरण पहिल्यांदा आंध्र प्रदेश सरकारने केले. नंतर केंद्र सरकारनेही या योजनेला विशेष महत्त्व देत 2005  रोजगार हमी योजना राबवली.यामुळे देशातल्या कोट्यवधी मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला.
 ग्रामसभेला याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे यातील भ्रष्टाचाराला लगाम बसला आहे.यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. होत आहेत. मात्र ज्या सांगलीच्या भुमिपुत्राने रोजगार हमी योजन देशभर पोहचवली, त्या जिल्ह्यात मात्र या योजनेला अधिकर्‍यांच्या निष्काळजीपणामुळे खीळ बसली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुमारे अडीच लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. अधिकार्‍यांनी ही योजना मोठ्या जोमाने राबवण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी,कवठेमहांकाळ आणि तासगाव, मिरजेचा पूर्व भाग अजूनही दुष्काळाचे चटके सोसतो आहे.इथे जलसंधारणाची कामे अजून मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. जलसंधारणातून हे दुष्काळी तालुके सुजलाम-सुफलाम झाल्यास वि.स.पागेसारख्या महान व्यक्तिला ती मानवंदना ठरेल

कामाचा ताण करतो नातेसंबंधावर, मानसिकतेवर परिणाम


कामाचा सततचा असणारा ताण आणि प्रत्येक बाबतीत आपण पुढे असावे, यासाठी तरुणांची असणारी धडपड यांमुळे २५ ते ३५ या वयात रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक तक्रारीत वाढ होत आहे.
तरुणांना तासन् तास एका जागेवर बसून करावे लागणारे काम, कामानिमित्त होणारा प्रवास, ऑफिसमधील एसीची हवा आणि विशिष्ट टार्गेट पूर्ण करण्याचा असणारा ताण यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा प्रकारे दीर्घ काळ एसीमध्ये काम केल्याने डी ३ आणि बी १२ जीवनसत्त्वांची कमतरता होणार्‍या रुग्णांची दवाखान्यात सध्या गर्दी आहे.
त्याचबरोबर, अतिरिक्त ताणाने उद्भवणार्‍या रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्णही २0 ते ३0 टक्के असतात. विविध शिफ्टमध्ये काम करावे लागणार्‍या तरुणांमध्ये पचनाच्या विकारांचे प्रमाणही मोठे असते.
एसीमध्ये बरेच तास बसल्याने श्‍वसनाचे विकार, दीर्घ काळ टिकणारा सर्दी-खोकला असे विकार आढळतात. तसेच एसीची हवा ही नैसर्गिक नसल्याने त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व सामान्य वातावरणात गेल्यावर रुग्णाला त्या हवेशी जुळवून घेणे अवघड जाते. त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण या लोकांमध्ये मोठे असते. मोकळ्या हवेत शरीराची नैसर्गिकपणे होणारी वाढ एसीच्या वातावरणामुळे खुंटते. या सगळ्यावर उपाय म्हणून काही देशांत दिवसातील ठराविक काळ उन्हात काम करण्याची पद्धत अवलंबली जाते.
तसेच, सतत एका जागेवर एकाच अवस्थेत बसून राहिल्याने सांध्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. एसीची असणारी अतिगार हवा व बाहेरील सामान्य हवा यांमुळे सांधेदुखीच्या तक्रारी असणारे रुग्ण वाढतात. तसेच, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊन आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. दीर्घ पल्ल्याचा दुचाकीवरील प्रवास हाही पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतो. बराच काळ खुर्चीवर कॉम्प्युटरसमोर बसणे आणि व्यायामाचा अभाव यांमुळेही सांधेदुखीच्या तक्रारींत वाढ होत असल्याचे चिन्ह आहे.
अशा प्रकारच्या कामाच्या ताणामुळे नातेसंबंध आणि मानसिक तणावांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. यासाठी ताणाचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे असते. तसेच, ताणाचा मनावर तर परिणाम होतोच; पण शरीरावरही दीर्घकालीन परिणाम होतो.  एसीमध्ये बरेच तास बसल्याने श्‍वसनाचे विकार, दीर्घ काळ टिकणारा सर्दी-खोकला असे विकार आढळतात. तसेच एसीची हवा ही नैसर्गिक नसल्याने त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व सामान्य वातावरणात गेल्यावर रुग्णाला त्या हवेशी जुळवून घेणे अवघड जाते. कामाच्या ताणामुळे रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या विकारांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय हा ताण जर अति झाला, तर पॅरालिसिसचा अँटॅक येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्या क्षमता ओळखून त्यानुसार काम करणे अतिशय महत्त्वाचे असते. अशा प्रकारे ताणाने ग्रासलेले लोक एकलकोंडे होण्याचीही शक्यता असते. या ताणाचा त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावरही अतिशय वाईट परिणाम होतो. मागील काही दिवसांत अशा रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे.

शिक्षकांना दडपणविरहीत ठेवा


  शिक्षण पद्धती अधिक भक्कम करण्यासाठी मुळात शिक्षकांना असमाधानी, दडपणाखाली ठेवण्याचे प्रकार चुकीचे आहे. स्मार्ट शिक्षणासाठी शिक्षकांनाही काम करण्याची मोकळीक, स्थैर्य मिळायला हवे, "काळाबरोबर शैक्षणिक क्षेत्र, शैक्षणिक धोरणे, मुलांची गुणवत्ता बदलत आहे. यात टिकून शैक्षणिक क्षेत्राची बैठक भक्कम करण्याचे आव्हान आहे. सोशल मीडियाचा प्रसारही वेगाने होत आहे; मात्र या वेगवान मीडियाच्या फायद्यांबरोबरच काही दुष्परिणामही समोर येत आहे. नव्या शिक्षण धोरणाविषयीही चांगल्याबरोबरच वाईट मतप्रवाहही आहेत. पालकांचीही काय भूमिका असायला हवी हा घटक महत्त्वाचा आहे. या सगळ्यामध्ये नेमके काय व्हायला हवे, हे शिक्षकच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. शिक्षकांनी नेमके काय व्हायला हवे, सध्याच्या धोरणात शिक्षकालाच त्याच्या सेवेची, पदाची खात्री देता येत नाही.   त्यांच्यावर इतर कामांचा बोजा वाढला आहे.   त्यामुळे मुळात शिक्षकच समाधानी नसेल, तर तो चांगले शिक्षण कसे देणार ? यासाठी शिक्षकांना काम करण्याची मोकळी द्यायला हवी. अनावश्‍यक दबाव, गळचेपी थांबायला हवी आजच्या शिक्षण पद्धतीत आणि जुन्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना चॅलेजिंग शिक्षण देणे काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाने योग्य तो प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
      काही वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षण पाठ शिकविले जात असत. त्याचा फायदा मुलांना रोजच्या जीवनात होत असे; मात्र सध्याच्या आधुनिक शिक्षणात हा महत्त्वाचा भाग मागे पडला असून, त्याची जागा इंटरनेट, सोशल मीडियाने घेतली आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू व्हावा, त्या माध्यमातून मुलांचे पुस्तक वाचन सुधारण्यास मदत होणार आहे.
     मुले इंटरनेट आणि सोशल मीडियावर जास्त वेळ राहत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; मात्र पूर्वीच्या काळीही गुन्हे होत होते. त्यामुळे नाहक आधुनिक शिक्षणाला दूषण न देता इंटरनेटचा वापर सकारात्मकदृष्ट्या कसा होईल आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होईल, याचा अभ्यास शिक्षकांनी करणे गरजेचे आहे.
सद्यःस्थितीत शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याचे किंवा ज्ञानदानाचे काम सोडून शाळाबाह्य कामे मोठ्या प्रमाणात दिली जातात. परिणामी दिड ते दोन महिने शिक्षक शाळेबाहेर असतात. त्याचा संबंधित शिक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होता. त्यांच्या जीवनाचा कोणी विचार करत नाही. आधुनिक शिक्षण पद्धतीने सर्व काही नियम शिक्षकांवर लादण्यात आले आहेत; मात्र पालक आणि विद्यार्थ्यांना तसे कोणत्याही नियम ठेवण्यात आलेले नाहीत. परिणामी त्याचा फटका शिक्षकांना बसत असून, आपण कोठे तरी सुरक्षित नाही, अशी भावना शिक्षकांच्या मनात निर्माण होत आहे.

पाणी बचत मंत्राचा प्रसार व्हायला हवा


पाणी म्हणजे जीवन. अशा पाण्याचा प्रश्‍न यंदा गंभीर आहे, याची जाणीव  ठेवायला हवी. दुष्काळसदृश परिस्थितीचं भान  ठेवायला हवं. त्याचप्रमाणे पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उधळपट्टी ही गंभीर बाब आहे. पाण्याचा वापर काटकसरीनेच करण्याची आवश्‍यकता आहे.
आम्ही पाणीपट्टी भरतो, मग किती पाणी वापरायचे हे  आम्ही ठरवणार,  असे यापुढील काळात म्हणून चालणार नाही. पाण्याची बचत ही प्राथमिकता आहे. तज्ज्ञांच्या मते दरडोई दर दिवशी 40 लिटर पाणी पुरेसे ठरते. आपण किती पाणी वापरतो हे पाहणे गरजेचे आहे. वैयक्तिक, परिसराची व सार्वजनिक स्वच्छता कटाक्षाने पाळायला हवी. पण पाण्याची उधळपट्टी टाळायलाच हवी.
तिसरे जागतिक युद्ध झाल्यास ते पाण्यासाठीच होईल, हे भाकीत वास्तवात उतरेल याची धास्ती वाटते. भारताची लोकसंख्या जगाच्या 16 टक्के आहे व पाण्याचा साठा फक्त 4 टक्के आहे, हे विसरून चालणार नाही. त्यातच अमर्याद जंगलतोड, भौतिक सुधारणा व विकासाच्या नावाखाली रस्ते, कॉंक्रिटची उभी राहणारी जंगले, उद्योगांसाठी वापरले जाणारे पाणी याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
घरांतून वाहणारे नळ दुरुस्त करून घ्यावेत. वाहणारे सार्वजनिक नळ दुरुस्त करून घ्यावेत.  रेन हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, पाणी साठवण व काटकसरीने वापर यास प्राधान्य हवे. पाणी शिळे होत नाही याची जाण  ठेवायला हवी.     खरे तर "जलबचत चळवळ' उभी करण्याची गरज  आहे. महिला स्वयंसहाय्यता बचत गट, स्वयंसेवी संस्था, भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळे, सांस्कृतिक मंडळे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वगैरेंनी 'पाणी वाचवा' मोहीम हाती घेऊन जनजागृती करायची गरज आहे. पाणी बचत मंत्राचा "डोअर टू डोअर' प्रसार होणे गरजेचे आहे. पाण्याचा वापर करताना फक्त स्वतःच्या घरापुरतेच नव्हे तर एकूण समाजाचा, राज्याचा व राष्ट्राचाही विचार व्हावा.  लहरी मान्सून, आटत आलेले नैसर्गिक पाणी स्त्रोत, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वेगाने होणारी घट, वाढते हापसे यांमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वेगाने होणारी घट यांमुळे पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. बरं पाणी साठवण्यासाठी आणि बचत करण्यासाठी मात्र कोणतेही प्रयत्न नाहीत. त्यामुळे विहिरी, नद्या, तलाव, तळी यांमध्ये साठा येणार तरी कोठून. त्यामुळे यासाठी जागृती घरा घरातून होण्याची आवश्‍यकता आहे.
इतर कोणत्याही गोष्टी वा वस्तू उदा. धान्य वगैरे परदेशातून आयात करता येईल टंचाईग्रस्त म्हणून. पण पाणी आणणार कोठून? तेव्हा "पाणी वाचवा', पाणी जिरवा आणि त्याचा वापर काटकसरीने करा .

विश्‍वास - अविश्‍वास

 
 
    पाच वर्षांच्या वेदान्तला शेजारच्या राधिकेने एका क्षुल्लक कारणावरून ङ्गारच रागावलं. इतकंच नव्हे तर त्याच्या हाताला धरून ती त्याला त्यांच्या घरी घेऊन गेली. घरी मग आईनेदेखील त्याची चाम्गलीच खरडपट्टी काढली. आपल्या मुलानं काय केलंय किंवा राधिका त्याच्यावर का रागावली? या गोष्टी तिला जाणून घ्याव्याच वाटल्या नाहीत.
      वेदान्तप्रमाणे साधारत: सगळेच पॅरेंटस आपल्या मुलाची चूक काय आहे, याची शहानिशा न करताच दुसर्‍या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन आपल्या मुलावर तोंडसुख घ्यायला , मारहाण करायला पुढे सरसावतात. यामुळे आई-वडील आपल्या मुलांपासून दूर जायला लागतात.
 मुलांची मनस्थिती समजून घ्या
      आपले आई-बाबा आपल्यावर विश्‍वास करत नाहीत, ही गोष्ट मुलांच्या मनाला ङ्गार लागते. सुरुवातीलाच जर पालक आपल्या मुलाची मनस्थिती जाणून घेऊ शकले तर ते आपल्या मुलाला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून परावृत्त करू शकतात. पण, आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले पालक आपल्याला काही किंमतच देत नाहीत, आपल्याला कळवूनच घेत नाहीत, हे जर का एकदा मुलांच्या मनात घर करून बसले की, मग ते आपोआप हळूहळू त्यांच्यापासून दूर व्हायला लागतात.
 अंतर वाढत जातं
      14 वर्षांचा सौरभ आपल्या कुठल्याही प्लॅनिंगविषयी जरादेखील आपल्या पालकांशी बोलायला  तयार नसतो. त्याने जो काही प्लॅन केला आहे, त्यावर विश्‍वास ठेवायला पालक तयारच नसतात. सौरभचं म्हणणं असं की, माझ्या पॅरेंटसला वाटतं , मी जे काही करतो ते सगळं चुकीचे करतो. कुणी काही म्हटलं की, लगेच ते मला रागावतात. ते माझ्या कुठल्याच गोष्टी बिलीव करत नाहीत.म्हणून मग मला माझी कुठलीच गोष्ट त्यांना सांगावीशी वाटत नाही.
      ज्यावेळेला मुलांचा आपल्याच आई-वडिलांवर विश्‍वास राहत नाही, तेव्हा मग अशी परिस्थिती निर्माण होते. आणखी एक, मुलांना त्यांच्याविषयी आवश्यकतेपेक्षा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलं आवडत नाही. खपत नाही. कित्येकदा याच्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
 तज्ज्ञांचं मत
      बालमानसशास्त्रज्ञांचं म्हणणं असं की, मुलं म्हणजे कच्ची मातीच. त्यांना ज्या साचेत घातलं जाईल, तशी ती बनतात, अशा प्रकारे जर का कुणी कायमचाच विश्‍वास ठेवला नाही तर भविष्यातदेखील ते कधी आपल्या आई-वडीलांवर  विश्‍वास ठेवणार नाहीत. इतकंच नव्हे तर पुढे ही मुलं आपल्या आई-वडिलांचा दुसर्‍यासमक्ष पाणौतारा करायलादेखील कमी करत नाहीत. सुरुवातीच्या काळातच मुलांच्या मनांमध्ये आई-वडिलांविषयी एक इमेज बनून राहते. पुढे भविष्यात तिच आणखी गडद होते. जर आई-वडीलच बालपणापासून त्यांच्यावर अविश्‍वास ठेवायला लागले तर  त्याचे दुष्परिणाम भविष्यात नक्कीच पाहायला मिळतात.
      सांगायचा मुद्दा असा की, मुलांवर विश्‍वास ठेवणं म्हणजे त्यांचा विश्‍वास जिंकणं आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी सज्ज करणं होय. पण याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या मुलांवर डोळे झाकून विश्‍वास ठेवावा किंवा त्यांच्या सगळ्याच गोष्टी नजरेआड कराव्या. पालकांचं   थोडं  जहाल, थोडं  मवाळ धोरण  आणि  थोडा विश्‍वास   त्याला एक चांगला नागरिक बनवण्यास  मदत करतं.

ही तोंडे बंद कोण करणार?    आपल्या महाराष्ट्रात शासनानं मावा,गुटखा अशा तंबाकूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. पण आपल्याला कुठे जाणवता का बंदी आहे असं? सगळीकडे खुलेआम, बिनबोभाट  खवय्यांच्या या आवडत्या जिनसा सहज मिळतात. कधी तरी कोठे तरी कारवाई केल्याची बातमी वाचायला मिळते. बाकी सगळा आनंदी आनंद आहे. तंबाकूच्या सेवनाने तरुणाई बिघडत चालली आहे. कर्करोगासारख्या रोगांना बळी पडत ते स्वत:चाच र्‍हास करून घेत आहेत. या तरुणांची कीव येऊन की काय शासनाने मोठ्या महसुलावर पाणी सोडत मावा,गुटख्यांवर बंदी आणली. पण तरुणांना त्याचे काय! मावा,गुटख्याचं बचकं तोंडात टाकून त्याच्या कीकने येणारा परमानंद घेत राहतात. ठीक आहे, मावा, गुटखा, पान-तंबाकू  खातात ते खातातच पण  वर कुठेही थुंकतात. याला काय म्हणायचे? हे वागणे किळस आणणारे आहे.
      समाजात वावरताना सभ्यतेच्या काही मर्यादा असतात. या गोष्टी सांगायचे म्हणजेदेखील सामाजिकदृष्ट्या चिंतेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. कुठे काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे जसे म्हत्त्वाचे आहे तेवढेच कुठे कसे वागावे यापेक्षा कसे वागू नये, याला अधिक महत्त्व आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते. समाजात वावरताना असं दिसतं की, लोक बोलताना कशाचाही विचार करीत नाहीत.उचलली जीभ लावली टाळ्याला. खरे म्हणजे अशा माणसांच्या जिभेलाच टाळे लावले पाहिजे. ठाकरे यांनी व्यावहारिक सत्य स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.तसाच एक प्रकार कोठेही थुंकणार्‍यांच्या बाबतीत समाजात नित्य पाहायला आणि अनुभवायाला मिळत आहे.कुठे थुंकावे याचा धरबंध थुंकाणारे पाळत नाहीत.या आपल्या वृत्तीचा त्रास समाजाला होतो,याची या थुंकणार्‍यांना जरादेखील तमा नसते. पूर्वी एक जाहिरात दूरदर्शनला यायची. ती सार्वजनिक हितार्थच होती.रवंथ करणारी एक म्हैस आणि पान खावून पचकन थुंकणार्‍या इसमाची “ आदमी है की जानवर ” अशी तुलना करणारी ही जाहिरात माणूस थुंकण्याच्याबाबतीत जनावरासारखा वागतो, या गोष्टीवर प्रकाश टाकणारी होती. अशा कित्येक जाहिराती समाजहितार्थ दाखवल्या जातात. पण सवयीचा गुलाम बनलेला माणूस मात्र ही थुंकण्याची घाणेरडी सवय काही सोडायला तयार नाही.
      पान-तंबाकू, मावा, गुटखा खाणार्‍या रसिकांच्या मुख कमलातून निघणारा रस  व तो पचकन कुठेही थुंकल्यामुळे केल्या गेलेल्या रंगपंचमीमुळे प्रदर्शित झालेली रसिकता कुठे तरी थांबली पाहिजे.सरकारी कार्यालयातील भिंतीचे कोपरे  आणि तसलीच सार्वजिक ठिकाणे यावर अशी रंगपंचमी होऊ नये, म्हणून देवादिकांचे चित्रे लावण्याचा प्रयत्न झाला.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानचादेखील अशा मंडळीवर परिणाम झाला नाही. माणसाला हे करू नको, ते करू नको, असे म्हटले की तो हमखास तसे करणारच, ही माणसाची प्रवृत्ती आहे. “इथे लघवी करू नये”  अशी एकादी पाटी किंवा सूचना लिहिलेली असते, मात्र काही महाभाग तिथेच हमखास लघवी करतात, किंवा “येथे वाहन थांबवण्यास मनाई आहे”, असा ङ्गलक जिथे आहे नेमके त्याच्या खाली वाहन लावलेले आढळते,तसा हा प्रकार आहे.
      कोठेही थुंकणे ही लोकांच्या आरोग्यास अपायकारक व तितकीच किळसवाणी गोष्ट आहे.सारासार विचार न करता कुठेही थुंकल्यामुळे सार्वजनिक इमारती,रस्ते नुसते गलिच्छ होत नाहीत तर त्यामुळे ङ्गुफ्ङ्गुसाचे रोग, क्षयरोग, श्‍वासोच्छवासाचे विकार ङ्गैलावण्याचीही मोठी भीती असते. एसटीतून, मोटारीतून किंवा दुचाकीवरून जाताना  पिचकारी मारणारे बाहेर किंवा आजूबाजूला  कोणी पादचारी आहे की नाही, याचादेखील विचार करत नाही. रस्त्यात थुंकणारे केवळ रस्त्यातच थुंकत नाहीत तर आजूबाजूला कोणी उभा आहे की नाही याचे भान न ठेवता मनमोकळेपणाने थुंकतात. त्यामुळे अनेकदा अनेकांच्या अंगावर ही थुंकी उडालेली असते. यावरून मारामार्‍यादेखील होतात. पण अशा महाभागांना मारामार्‍याच काय मरणाचीदेखील भीती वाटत नाही. अशी कमाल ङ्गक्त थुंकणार्‍यांच्याबाबततीतच घडू शकते.
      कुठेही थुंकणे हा जणू काही आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे काही जणांना वाटत असते.यासंदर्भातील एक गंमतीदार गोष्ट सांगितली जाते.एका धनाढ्य व्यक्तीकडे त्याचा एक मित्र गेला. अलिशान भिंतीवर त्याने थुंकी टाकली. तोंडात तंबाकूमिश्रीत पान असल्याने त्याला पुन्हा थुंकी मारावीशी वाटली. तेवढ्यात त्याच्या धनाढ्य मित्राने एक उत्तमप्रतीची, महागडी पिंकदाणी त्याच्या तोंडासमोर धरली. तरी त्या महाभागाने आपली पिंक भिंतीवरच टाकली. असे दोन-चारदा झाले. प्रत्येकवेळी तो श्रीमंत मनुष्य पिंकदाणी त्याच्या तोंडासमोर धरत होता. अखेर शेवटच्या त्या कृतीला हा थुंकणारा वैतागला आणि चिडून म्हणाला,हे पहा पुन्हा जर हे चकचकीत भांडे माझ्यापुढे धरले तर मी त्यातच थुंकेन. सांगून ठेवतो. आता काय म्हणावे या महाभागाला? सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान न करणे, सार्वजनिक ठिकाणी गुटखा, मावा किंवा पान खावून न थुंकणे ही साधीसोपी सभ्य गोष्ट आहे. पण ही सभ्यतादेखील आपल्याकडे राहिली नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असं सांगून झालंय. आता यावर आणखी काय सांगावं  

समुहाने वाईटाचा नाश शक्य


आपल्या आजूबाजूला  आपल्याला नको असलेल्या काही गोष्टी घडत असतात.  आपल्या देशात भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. दिवसाढवळ्या आपल्या माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी मुडदे पडत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज कोणावर ना कोणावर अन्याय घडत आहे. या गोष्टी थांबवता येणं शक्य नाही, पण कमी जरूर करता येतील. त्यासाठी एका विचाराच्या माणसांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. यावर निव्वळ भाषणे देऊन चालणार नाही. संयमाने या समस्यांच्या मुळाशी जायला हवे. हे करताना आपल्या स्वत:लाही बदलायला हवे. आपल्या आवडी-निवडींना, स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, असा विचार करून समाजासाठी काही केले पाहिजे. की बांधिलकी जोपासली पाहिजे. मन संवेदनशील असलं पाहिजे. सहिष्णु असलं पाहिजे. या मतलबी दुनियेत आपण मतलबी होऊन चालणार नाही. त्यांना वळणावर आणायला हवं. वळणाचं पाणी वळणावरचं जाणार, असं म्हणतात. वळणं चांगली असली की, काही त्रास पडत नाही. आपल्याला  फक्त वळण लावून द्यायचे आहे.
 समाज अनेक कारणांनी प्रदुषित होत आहे. तसं माणसाच्या कृपेनं निसर्गदेखील प्रदूषित होत आहे. जल, हवा,ध्वनी प्रदूषणाने माणूस माणसाचंच जिणं हराम करत आहे. सांडपाणी,रसायन मिश्रित कारखाण्याची मळी नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यातल्या पाण्याच्या सेवनानं आरोग्य बिघडत चाललं आहे. जमिनीत रासायनिक खताचा बेसुमार वापर करून तिला नापिक करत आहोत. कारखान्यांच्या धुरंड्यांमधून, वाहनंमधून निघणारा विषारी वायू माणसाचंच आयुष्य कमी करत आहे. त्यातच करू नये ते माणूस करू लागल्याने स्वत:च स्वत:च्या शरीराची नासाडी करून घेत आहे. दारू, मावा-गुटखा, बिडी-सिगरेट याची लत माणूस हकनाक लावून घेत आहे. सरळ जीवन जगण्याचा मंत्र आपल्या साधू-संतांनी दिला असताना माणूस वाकड्यात शिरत आहे. यावर समुहाने आवर घालता येईल. गाव करी तिथे राव काय करील, अशी एक म्हण आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून वाईटाचा नाश करण्याचा चंग बांधला तर सर्व काही शक्य आहे.

अस्सल भारतीय चायनीज

 चायनीज पदार्थ आता खेड्यातदेखील पोहचलं आहे. या पदार्थांवर सर्वाधिक उड्या पडताहेत त्या लहान मुलांच्या. अगोदर अक्काबाई पोटात रिचवणार्‍या मंडळींना याची चव तोंडात रेंगाळायची, पण आता चायनीज घराघरात पोहचले आहे. बाहेरचे खायचे नाही, असा सज्जड दम मुलांना देणारे पालक चिकन मंचुरियन, गोबी मंचुरियन घरात करून देत आहेत. त्याचा मसाला आता बाजारात सहज आणि मोठ्या प्रमाणात मिळत आहे. अर्थात गाड्यावरच्या चिकन पदार्थांची चव वेगळीच असते, पण सुगरणी महिला(आई) किंवा सुगरण पुरुष (बाबा) बर्‍यापैकी चवीचे पदार्थ करून मुलांना घालत आहेत. इतके हे चायनीज पदार्थ आता भारतीय खाद्यसंस्कृतीत मिसळले आहेत.
 जतच्या यल्लमा यात्रेत या चायनीज पदार्थांच्या स्टॉलंना असलेली गर्दी त्याची क्रेझ किती मोठी आहे, हे दाखवते. सर्वस्तराचे लोक या पदार्थांवर तुटून पडताना दिसतात. गरीब-श्रीमंत, सर्व जाती-धर्माचे लोक यचे चाहते आहेत. लहान मुलांना कधी एकदा जतची यात्रा येते आणि चायनीज पदार्थांवर ताव मारू असं होतं. जतमध्ये सुरुवातीला रज्जाक नगारजी यांचा एकमेव गाडा होता. आता अनेक गाडे, स्टॉल लागलेले आपल्याला दिसतील. वडापावच्या गाड्यांबरोबर चायनीज पदार्थांचे गाडे, स्टॉल उभे आहेत.
 मोठ्या कढईत वेगवेगळ्या भाज्यांचे बारीक तुकडे चर्रर्र आवाज करत व्हिनेगार, चिली सॉसमध्ये घोळवून राइस, नूडल्स तयार होताना पाहणं गमतीदार असतं. पदार्थ बनवणार्‍याच्या हाताची चलाखी आपल्याला मोहवून जाते. की डिश प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये गरमागरम समोर येते, तेव्हा त्याची चटकदार चव तोंडात पाणी आणतं. त्या चवीच्या लोभानं आपण चटकन चिकनचा तुकडा तोंडात टाकायला बघतो आणि जिभेला चटका देऊन बसतो. पण तरीही चयनीज पदार्थ चवीने खातो.
 चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहेच. त्यापाठोपाठ चिनी पदार्थांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर आक्रमण केले आहे. म्हणूनच आसेतू हिमालय कुठेही जा तिथे चिनी खद्यखुणा आपल्याला पाहायला मिळतील.गाव तिथे एसटीच्या धर्तीवर गाव तिथे चयनीज गाडी इथवर चिनी खाण्याने आपल्या खाद्य प्रांतात घुसखोरी केली आहे. या चायनीज खाण्यात अजिनोमोटो नावाचा एक घटक चवीसाठी घातला जातो. हा घटक आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. त्याच्या अतिसेवनाने हाडं ठिसूळ बनतात.शरीरात अनावश्यक कॅलरी वाढतात. असं सांगितलं तरी आपल्याकडचे लोक चिनी पदार्थ खायचं सोडत नाही. अजिनोमोटोसारख्या ङ्गिजुल गोष्टीसाठी चिनी खाणं बंद करावं असं कुणाला वाटत नाही. कारण तेवढं वेडच चिनी खाण्याने आम्हा भारतीयांना लावली आहे. 
 चीन आपला कट्टर शत्रू आहे.त्यांच्या भारतीय प्रांतावरच्या अतिक्रमाणाच्या बातम्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला त्यांचा प्रचंड राग येतो. भारतापेक्षा सर्वच स्तरावर चीन बलाढ्य आहे, याची कल्पना आपल्याला आहे, पण बाजारात जातो तेव्हा सर्वात पहिली नजर आपली चिनी वस्तूंवर पडते. रस्त्याकडेलाच वस्तूंचा बाजार मांडलेला असतो. किंवा रस्त्यावरून जाताना चिनी पदार्थांचा  चटकदार, घमघमीत  वास नाकाला झोंबतो, तेव्हा तोंडाला नक्की पाणी सुटतं. अशावेळा चिनी लोकांबाबत संताप येत नाही. चिनी मोबाईलने तर तरुणांना वेडच लावलं आहे. स्वस्तात अनेक ङ्गंक्शन असलेले मोबाईल तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
 चायनीज पदार्थ ङ्गारसे नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे आहेत. उच्चभ्रू हॉटेलमधल्या पदार्थांची चव एखाद्यावेळेस या मंडळींनी घेतली नसेल, पण चायनीजची चव न चाखलेला क्वचितच आढळेलं. चिकन चिली. हाका नुडल्स,चिकन मंचुरियन, व्हेज मंचुरियन, शेजवान सॉस, चिकन सूप ही नाव आता आपल्या तोंडात सहज रुळली आहेत. पण आज आपण चायनीजपदार्थ  खातो, ते अस्सल चायनीज नाही, याची ङ्गारसी कुणाला कल्पना नाही. ते आहे फ्युजन झालेलं भारतीय चायनीज आहे. थोडक्यात काय तर चिनी आणि भारतीय खाद्यसंस्कृतीच्या मिलाङ्गातून तयार झालेलं नव्या पद्धतीचं खाणं. भारतीयांना तिखट,तेलकट, मसालेदार खाणं आवडतं. चायनीजवाले चिनी सॉसबरोबर भारतीय मसाले वापरतात. की चटकदार चव भारतीयांच्या खास पसंदीचे असते. खरे मूळ चिनी जेवणवेगळेच असते. ते ङ्गारच मिळमिळीत असतं. आणि या जेवणात वापरले जाणारे घटकदेखील वेगळेच असतात. जतमधल्या रामराव महाविद्यालयातले प्राध्यापक डॉ. श्रीकांत कोकरे सर आपला एक प्रबंध वाचन्यासाठी चीनला गेले होते. तिथे ते चार-पाच दिवस होते. त्यांना तिथलं खाणं अगदीच बेचव,वेगळंच आणि कसं तरी वाटल्याचं सांगितलं होतं. त्यांना इथे ये ईपर्यंत कधी एकदा आपल्या भारतीय पदार्थांवर ताव मारू असं झालं होतं. त्यामुळे चायनीज चाहत्यांनी एक लक्षात ठेवायला हवं की, आपल्याकडडे लोकप्रिय झालेले मंचुरियन किंवा चिली चिकन चिनी नव्हेत तर ते अस्सल भारतीय आहेत. भारतीय पदार्थांमधला चटकदारपणा अन्य कुठल्या देशात सापडणं अशक्यच आहे. 

Sunday, December 25, 2016

पत्रकारांनी आरोग्याशी तडजोड नकोय

 
     लोकशाहीत चौथ्या स्तंभाला विशेष महत्त्व आहे. समाजाच्या विविध प्रश्‍नांना प्रसारमाध्यमे वाचा फोडतात. शासनाचे व लोकप्रतिनिधींचे काय चुकते ते सुद्धा जनतेपुढे मांडण्याचे धैर्य पत्रकार दाखवतात. त्यामुळे या माध्यमाचा शासन व पुढारी धसका घेतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. सततची धावपळ, वेळीअवेळी खाणे, अपुरी झोप यामुळे त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु, त्याला न जुमानता आपले कार्य तो करीत असतो. त्याच्या कार्याची दखल समाज घेत असतो. त्याचा वेळोवेळी उचित असा गौरव करीत असतो. त्याला मान-सन्मान मिळत असतो. पण तरीही तो आर्थिक बाजूने नडलेला असतो. त्याच्या कामाचा व्याप दांडगा असतो, सतत तो कार्यरत असतो. पण तो आर्थिकदृष्ट्या मात्र सक्षम नसतो. फक्त पत्रकारिता करणार्‍या मंडळींना फक्त याच्यावर उदरनिर्वाह करता येत नाही. कौटुंबिक आर्थिकता ताणलेली असते. खरे म्हणायला गेले तर तो आर्थिक बाजूने सक्षम नसतो, त्याला स्थैर्य नसते. वृत्तपत्र चालवणारे मालक त्याच्या कामाएवढा मोबदला देत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. अर्थात हे मी मोठ्या आणि नावाजलेल्या वृत्तपत्रांबाबत बोलतोय. रोजगार हमीवर जाणारा शेतमजूर जेवढे महिन्याला कमावतो, तेवढेही या पत्रकाराच्या हातात पडत नाही. त्यामुळे या पत्रकाराला समाजात मान-सन्मान असला तरी त्याला आर्थिक स्थैर्य नाही. कामसुद्धा एके ठिकाणी शेवटपर्यंत राहील, याची शाश्‍वती नाही. मालक राहू दे बाजूला पत्रकाराला ज्याच्या हाताखाली काम करावे लागते, अशा वृत्तसंपादक, जाहिरात प्रमुख, व्यवस्थापक यांच्याकडूनही फारशी चांगली वागणूक मिळत नाही. सारखा तगादा लागलेला असतो. बातमीचा, जाहिरातीचा, त्याच्या वसुलीचा! यामुळे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बातमीदार किंवा पत्रकार म्हणून काम करणार्‍या मंडळींचे मानसिक स्वास्थ्यदेखील चांगले राहत नसल्याचा अनुभव आहे. 
     त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्‍न मात्र इथे महत्त्वाचा ठरतोय. एवढी धावपळ करूनहीदेखील काही त्रुटी राहिल्या तर वरिष्ठांची बोलणी खावीच लागते. कारण वृत्तपत्रांमध्येदेखील जीवघेणी स्पर्धा आहे. आपल्या दैनिकात बातमी चांगली, सविस्तर आली पाहिजे, असा अट्टाहास वरिष्ठांचा असतो. त्यामुळे एवढी धावपळ करूनही वरिष्ठांची बोलणी खावी लागत असेल तर त्याची मानसिक स्थिती चांगली राहिल का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे पत्रकारांनीही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. आपले आरोग्य शाबूत तर सर्व काही शाबूत. त्यामुळे त्यांनी आरोग्याशी तडजोड करू नये, असे वाटते. अलिकडे वॉट्स ऍप, फेसबूकचा जमाना आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा उपयोग आपल्या कामात करायला हवा. तंत्रज्ञान सुधारले आहे. घटनेच्या ठिकाणी थोडा वेळ बसून निवांतपणे बातमी देता येते. या नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची सुविधा वृत्तपत्रांनी पत्रकारांना करून द्यायला हवी.
    ग्रामीण भागातल्या पत्रकारांना लॅपटॉप, टॅबलेट, उत्तम प्रकारचा ( बातम्यासाठी सर्व सोयीनियुक्त )मोबाईल अशा गोष्टी पत्रकारांक़डे आवश्यक आहे. वृत्तपत्रांनी आपल्या दैनिकाचे काम उत्तमप्रकारे कसे होईल पाहताना पत्रकाराची सर्व ती काळजी घ्यायला हवी. त्याचा आरोग्य विमा उतरवायला हवा. मोठ्या आजारांबाबती आर्थिक मदत द्यायला हवी. नाही तर अनेक पत्रकारांना याबाबतीत आलेले अनुभव कटु आहेत. पत्रकारांच्या बातम्या देणारे बेरयया ऊर्फ नारद ( ब्लॉग) याने याविषयी बरेच लिहिले आहे. त्यामुळे त्याची चर्चा करत नाही. शेवटी पत्रकारांना एकच सांगावेसे वाटते की, त्यांनी आपल्या आरोग्याविषयी तडजोड करू नये. व्यायाम, योगावर भर द्या. कामे तर काय होतीलच.

तरुणाईने विधायक संकल्प घेऊन पुढे आले पाहिजे


चार दिवसांतच नववर्षाची सुरुवात होईल. नवे वर्ष म्हणजे संकल्प, नवी सुरुवात, नवा प्रयत्न व नवा उत्साह असायला हवा. जुन्याचे जुनाटपण , कटू अनुभव विसरायला लावून नवी उमेद देण्याची प्रेरणा नवे वर्ष देते. त्यामुळे दरवर्षी नव वर्षाच्या सुरुवातीचे स्वागत करण्यासाठी तरुणाई आसुसलेली असते,परंतु या स्वागतामध्ये संकल्पापेक्षा , विधायक उपक्रमांपेक्षा गटागटाने एकत्र येऊन पार्ट्या साजर्या करण्यावरच अधिक भरवाढू लागला आहे.हे चित्र खटकणारेच आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्या वर्षाच्या तयारीसाठी सोशल मिडियांवरून प्लॅनिंगचे चॅटिंग सुरू आहे.मात्र नव्या वर्षाचे स्वागत दारु पिऊनच करावे, असे काही कोणत्या पुस्तकात, मार्गदर्शिकेत लिहून ठेवले नाही. हा काळोखाचा रस्ता आपला नाही, हे माहित असूनही तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत दारुच्या पार्ट्यांनी करायचे म्हणते, हे जरा अजबच मानावे लागेल.ार्थात सरकारनेही त्यापुढे दोन पावले पुढे टाकत बार, दुकानांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला जरा जास्तीचीच मोकळीक दिली आहे. त्यावरून सरकारी व्यवस्थेलाही नेमके काय सांगायचे आहे, हेही स्पष्ट होत नाही.
गेल्या काही वर्षांपासून शहरी,निमशहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात अगदी वाड्यावस्त्यांवरही मद्याच्या बाटल्या रित्या करून नवीन वर्षाचे स्वागत होते. नशेत बेधुंद झालेली तरुणाई ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून,कर्णकर्कश्श आवाजापुढे  अचकट-विचकट नृत्य करून नववर्षाचे स्वागत करते हे दुर्दैवच मानावे लागेल. त्यापुढचे काही नमुने दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून भरधाव दुचाक्या चालवून हॅपी न्यू इयर अशी हाळी देत रस्त्याने फिरतात. गाढ झोपेत असलेले ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना नव्या वर्षाच्या पहिल्या क्षणालाच असा खडा लागणार असेल तर नव्या वर्षाबद्दल त्यांची काय मते बनतील याचा विचार कोणी करीत नाही, या वर्षी तो करावा अशी माफक अपेक्षा आहे.
राज्यात एकिकडे दररोजच्या हलाखीला, नेहमीच्या शेतीतील तोट्याला कंटाळून, पिचून गेलेल्या शेतकर्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. दररोज पाच-सहा आत्महत्यांच्या घटना घडतच आहेत. कदाचित आपल्या घराजवळ, गावाजवळ, तालुक्याजवळ नसेल,परंतु आपल्या राज्यातच या दुर्दैवी घटना घडत आहेत. कोणाच्या तरी घरातील आधार सहजगत्या संपतो, हे चित्र दिसत असताना खिसा रिता होईपर्यंत खर्च करून नव्या वर्षाचे स्वागत चुकीच्या पद्धतीने करण्याची चूक या वर्षी तरी तरुणाईने करू नये. नोटाबंदी याला काही प्रमाणात आळा घालील, असे वाटत असले तरी तरुणाई स्वत: हो ऊन यापासून परावृत्त झाली तर चांगलेच म्हणायला हवे. राज्यात,देशात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शिक्षणापासून ते नोकर्यांपर्यंत अन शेतीतील कष्टापासून ते व्यवसायातील मंदीपर्यंत अनेक समस्या आहेत. त्याची जाणीव बाळगून आपला उत्साह कोणाच्या तरी अडचणींचा विषय बनणार नाही, याची काळजी नववर्षाचे स्वागत करणार्यांनी नक्की घ्यावी.
आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर एकत्र येऊन उवा पिढीने या निमित्ताने सामाजिक जाबाबदारीचे भान ठेवत शेतकयांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल चिंतन करण्याची ही वेळ आहे. आत्महत्यांपासून शेतकर्यांना परावृत्त करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील, त्यामध्ये आपला काय वाटा राहिल, याविषयी गटचर्चा करण्याचीही आवश्यकता आहे. गरिबांना मदत,स्वच्छतासारखी जबाबदारी उचलता ये ईल का याविषयी संकल्प करावा. ॠमाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धांना पायबंद घालण्यासाठी नव्या वर्षात युवकांची फळी उभारता ये ईल का? त्यांच्यामध्ये सामाजिक समरसतेची मशाल पेटविता ये ईल का, याविषयीही विचारमंथन करावे. अर्थात नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषाने करूच नये, असा याचा अर्थ कदापि नाही. फक्त तो चुकीच्या मार्गाने न करता जो खर्च जर गावातील एखाद्या गरजु, हुशार मुलाला शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन तोच खर्च शाळेकडे सुपूर्त केला,त्या विद्यार्थ्यास आवश्यक साहित्य खरेदी करून भेट देऊन केला तर तो सार्थकी लागेल. आजची युवा पिढी ही समंजस आहे, त्याहून ती नव्या विचारांना आयाम देणारी व दूरदृष्टीने विचार करणारी आहे, हे थोरांना पटवून देण्याचीही संधी यानिमित्ताने आहे.

या दिवसाच्या निमित्ताने आपले गाव, आपली वाडी-वस्ती स्वच्छ व लखलखीत करण्यानेही नवे वर्ष अधिक उत्साहाने साजरे करता येऊ शकते.गावात जलसंवर्धनासाठी एखादी उपाययोजना आखता येत असेल तर त्यामध्येही योगदान देऊन नवनिर्मितीला हातभार लावता येऊ शकेल. गावातील ओढे खोलीकरणासाठी, स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी एवढेच नाही तर गावातील अंतर्गत रस्त्यांच्या सुशोभिकरणाचीही मोहिम युवकांनी हाती घ्यावी.एकदा का तरुणाईने एखादा प्रश्न हाती घेतला व त्यांचा समूह एखाद्या कामास सुरुवात करताना दिसला तर आजच्या तरुणाईकडे भरवशाने पाहात असलेली जुनी पिढी आणि आपोआपच ग्रामपंचायतीही माणसेही या कामात पुढे सरसावतील. फक्त सुरुवात झाली पाहिजे.

पाणी आणि अनाहूत सल्ले

     काहीजण सांगतात की ,सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे.आणखी कोणी दुसरेच काही सांगतं.जगातल्या जलसंकटाबाबत ज्याला कसलीही  गंध वार्ता नाही ,अशी मंडळी सकाळी सकाळी दोन दोन लीटर पाणी प्यायचा सल्ला देतात. जितकं पाणी प्याल,तितकं चांगलं,असंही ठणकावून सांगतात. जादा पाणी पिल्याने शरीराला कोणताच अपाय होत नाही, कारण जादा झालेले  पाणी शरीर स्वतः बाहेर फेकते आणि त्याच्या बरोबर शरीरातील घाणदेखील बाहेर टाकते,असेही सांगितले जाते.हे असल्या सल्ल्यांनी  शरीराला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही ,त्यामुळे लोक असे सल्ले स्वीकारतात किंवा  अजमावूनही पाहताना दिसतात.पण शास्त्रज्ञ सांगतात की ,अशा सल्ल्यांमध्ये  कसलाच दम नाही आणि या मागील विचाराच्या द्रुष्टीत  सत्यही नाही. आपल्याला माहीत आहेच,आवश्यकतेपेक्षा पाणी कमी पिल्याने  शरीरात डीहायड्रेशन होते.आणि जरूरतपेक्षा अधिक पाणी पिले तर हायपोहायड्रेशन होऊ शकतं. उलट  हायपोहायड्रेशन शरीराला नुकसान पोहचवू शकतं. जादा पाणी पिल्याने शरीरातील  सोडियमचे प्रमाण कमी होते आणि ते धोकादायक होऊ शकतं.शिवाय किडनीचे  कामदेखील वाढते. म्हणजे आपल्याला जीवन देणारे पाणी अधिक झाल्याने जीवावरसुद्धा उठू शकते.
    काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांच्या एका टिमने आपल्या शरीरात जादा झालेल्या पाण्याने काय होतं किंवा काय घडू शकतं ,याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.यांसाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोगदेखील केले.त्यांनी त्या लोकांचे दोन गट केले.एका गटाकडून खूप उशीरापर्यंत कसरत करून घेतली.कारण व्यायाम केल्याने घाम निघाल्यानंतर  त्यांना पाण्याची गरज जास्त  लागते. दुसऱ्या गटाला अशा ठिकाणी ठेवलं गेलं की ,त्यांच्या शरीरातून घाम निघणार नाही.काम केल्यानेही त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. यानंतर दोन्ही गटातील लोकांना एकाच वेळी पाणी प्यायला देण्यात आले. तसेच ते पाणी पीत असताना त्या सगळ्यांचे 'फंक्शनल एमआरआय'देखील करण्यात आला. या 'एमआरआय'मध्ये असे आढळून आले की ,ज्या  लोकांनी व्यायाम केला होता त्या लोकांच्या मेंदूने आरामात पाण्याचा स्वीकार केला.पण दुसऱ्या गटातील लोक जबरदस्तीने पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते.वास्ताविक  त्यांना तहान लागलेली नव्हती. या गटातील लोकांच्या मेंदूतील कोशिकांमध्ये तणाव दिसत होता. कारण नसताना ते पाणी पीत होते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की ,जितकं आवश्यक आहे तितकंच खावे तसे,पाण्याच्याबाबतीतही आहे.तहान लागली असेल तेवढेच पाणी प्यावे. आपल्याला भूक लागते , याचा सरळ अर्थ असा की , आपल्या शरीराला  ऊर्जेची गरज आहे. त्याप्रकारे ज्यावेळेस आपल्याला तहान लागते,त्यावेळेस शरीराला पाण्याची गरज आहे. आवश्यकतेपेक्षा खाल्लेले अन्न आपल्याला नुकसान पोहचवते. तसेच जादा पाणी शरीराला धोका पोहोचवते.आपण जादा मीठ असलेले  भोजन खाल्ले की आपल्याला  अधिक तहान लागते. कारण शरीरातील किंवा रक्तातील सोडियमची मात्रा कमी करण्यासाठी जादा पाणी लागते .आपले आणि बाकीच्या जीव -जंतूचे शरीर अशा प्रकारे विकसित झाले आहे की ,त्याला स्वतः ला आपल्या पोषनांची गरज ठाऊक आहे.आपल्या शरीराला माहीत आहे ,त्याला केव्हा , आणि किती पाणी लागते .यांसाठी त्याला सोशल मिडियातील वैद्यांची गरज लागत नाही.सोशल मीडिया आपल्या सामाजिकतेशी निगडीत आहे.आमच्या आरोग्यासाठी नाही.

पतंगापासून वीजनिर्मिती

पतंगापासून वीजनिर्मिती
     आकाशात उडणारे रंगी-बेरंगी पतंग सगळ्यांनाच लुभावतात.जगभरातल्या मुलांसाठी तो एक खेळ आहे, तर मोठ्यांसाठी पतंग उडवणं ही एक कला आहे.भारतात  फक्त पतंग उडवले जात नाही, तर लढवलेदेखील जातात. आम्ही या कलेला स्पर्धात्मक खेळामध्ये रूपांतरित केले  आहे. इथे पतंग उडवणं म्हणजे फक्त उडवणं, असा अर्थ होत नाही.इथे पतंगबाजी होते.पहिल्या महायुद्धात पतंगांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. अठराव्या शतकात त्यांचा वापर संशोधनासाठी केला गेला. बेंजामिन फ्रँकलिन, अ‍ॅलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर केला, तर राईटबंधू यांनी त्याचा वापर करून पुढे विमानाचा शोध लावला. विल्यम एडी व लॉरेन हारग्रेव्ह यांनी हवामानाचा अभ्यास त्याच्या मदतीने केला.  इतिहासात असे अनेक प्रसंग घडले.भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातला एक दिलचस्प प्रसंग आहे. सायमन कमिशन भारतात आला होता. आपल्या बैठकीच्यानिमित्ताने तो लखनौलादेखील गेला होता.कुठलाही स्वातंत्र्य सैनिक जवळपासदेखील फिरकू शकणार नाही, अशा पद्धतीची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यादिवशी अचानक बैठकीच्या ठिकाणी काही पतंग तुटून पडले. त्या सगळ्यांवर लिहिलं होतं-सायमन गो बॅक.
पतंग ही अशी पहिली वस्तू आहे, जिला माणसाने आकाशात उडवू शकला आणि आपल्या इशार्‍यावर नाचवूही शकला.पतंगाचा उपयोग हवामान जाणून घेण्यासाठी आणि  हेरगिरी करण्यासाठीदेखील केला गेला.
     आकाशात उडणारे पतंग शास्त्रज्ञांसाठीदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले.विविध प्रकारच्या पतंगांनी त्यांना फक्त उडण्याच्या सिद्धांत शिकवला नाही तर त्यांना एकाद्या  वस्तूला उडण्यालायक बनवण्यासाठीचे एरो-डॉयानमिक डिझाईनसुद्धा शिकवलं.ढगांनी आच्छादलेल्या एका दुपारी ज्यावेळेला बेंजामिन  फ्रँकलिनने रेशमी दोरीने पतंग उडवला, त्यावेळेला त्याला आकाशातल्या विजेचे रहस्य उलगडले.आता शास्त्रज्ञ पतंगाचा आणखी  एक उपयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.ते पतंगापासून वीजनिर्मिती करणार आहेत.वास्तविक यादिशेने गेल्या 35 वर्षांपासून प्रयत्न चालू  आहेत.पण आता या तंत्रज्ञानाने एक फलस्वरूप प्राप्त केले आहे. स्कॉटलंडमध्ये एक  असं विद्युत संयंत्र बसवलं जात आहे, ज्यातून फक्त पतंगापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.या संयंत्राद्वारा शास्त्रज्ञ 500 मेगावॉट वीजनिर्मिती करू शकणार आहेत.यासाठी क्रॉसविंड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक टर्बाईनला 40 फुटाचे दोन विशालकाय पतंग जोडलेले असतील.पतंग हवेत उडत असतील त्यावेळेला टर्बाईन चालतील आणि वीज तयार होईल. यातील आणखी एक खास गोष्ट अशी की,यापासून  वीज निर्माण होताना  पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही. आणि दुसरे म्हणजे ती सगळ्यात स्वस्त पडणार आहे.असं म्हटलं जात आहे की, सध्या विद्युत निर्मितीसाठी जी गुंतवणूक करावी लागत आहे ,त्यापेक्षा या तंत्रज्ञानाने वीज निर्मितीसाठी फक्त दहा टक्के खर्च येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर वीज उत्पादन सुरू झाले तर सरकारला सबसिडीसुद्धा द्यावी लागणार नाही.
     या प्रयोगासाठी स्कॉटलंडची निवड केली आहे, याला आणखी एक कारण आहे. इथे वर्षभर एकाच वेगाने हवा वाहात असते.त्यामुळे भारतासारख्या देशात हवेचा वेग आणि दिशा सतत बदलत असते, अशाठिकाणी हे  तंत्रज्ञान कितपत फायद्याचं आहे,याची आपल्याला अजून कल्पना नाही.पण एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर या तंत्रज्ञानात सुधारणा होत राहतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.पण आपल्याला दिलासा देण्यालायक गोष्ट अशी की, स्वस्त ऊर्जा आणि पर्यावरण हित जोपासणार्‍या वैकल्पिक साधनाच्या शोधाची मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात सौर ऊर्जेवरील खर्च  कमी होत आहे. पवन ऊर्जेच्या उत्पादनाचा विस्तार वाढत आहे.दुसरीकडे विद्युत बिल कमी येणाच्यादृष्टीने वापरात येणार्‍या वस्तू बनविण्यात आपण यशस्वी होत आहोत.त्यामुळे विजेचा वापर कमी होऊ लागला आहे. हा सिलसिला असाच राहिला तर पर्यावरणातील बदल आणि ग्लोबल वार्मिंगचे आव्हान आपण  सहजगत्या  पेलू शकू. यापूर्वी वीज निर्मितीत रंगीबेरंगी पतंगदेखील  आपली भूमिका वटवतील, याचा विचारदेखील कोणी केला नव्हता.

Saturday, December 24, 2016

सेंकड हँड स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी...


      तुम्ही सेकंड हँड स्मार्टफोन विकत घ्यायचं प्लॅनिंग करत असाल तर  काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल
आजकाल काही लोक नवा स्मार्टफोन थोड्या दिवसांसाठी वापरून लगेच विकून टाकतात. तुम्ही कमी किंमतीत सेकंड हँड फोन विकत घेऊन वापरू शकता, पण यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे. फोन खरेदी करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्या.
बील आणि बॉक्स घ्या
     सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करतेवेळी बील घेणं यासाठी आवश्यक आहे की,यामुळे आपल्याला हा फोन चोरीचा तर  विकला जात नाही ना, हे आपल्याला कळेल.जर आपल्याला भविष्यात हा हँडसेट पुन्हा विकायचा असेल किंवा रिप्लेस करायचा असेल तर हे बील आपल्या कामी येईल.फोनसोबतच बॉक्स घेतल्याने तुम्ही आयएमईआय नंबरची खात्री करू शकाल.लक्षात ठेवा की, विकणारा तुम्हाला एक्सेसरीज देत नसेल तर तुम्ही किंमत आणखी कमी करू शकता.
चोरीचा फोन
     कित्येकदा लोक चोरीचा स्मार्टफोन विकतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा संशय असेल तर बिलासोबत बॉक्सदेखील मागून घ्या. चोरीच्या स्मार्टफोनसोबत बॉक्स असण्याची शक्यता फारच कमी असते.बॉक्समध्ये लिहिलेला आयएमईआय नंबर आपल्या स्मार्टफोनच्यावर*#06# डायल करून दिसणार्या नंबरशी पडताळून पहा.हा नंबर जुळला माही तर काही तरी गडबड आहे, हे लक्षात येईल.सोबतच imeidetective.com सारख्या वेबसाइटसवर हा क्रमांक टाकून तपासा. कारण चोरीचा स्मार्टफोन ट्रेकिंगसाठी तर या वेबसाईटवर टाकला नाही ना,हेही लक्षात येईल.
2 जीबी रॅम
     10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनचे आता 2 जीबी रॅम सामान्य झाले आहेत.त्यामुळे सेकंडहँड स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 2 जीबी रॅम असणं आवश्यक आहे. प्रोसेसरदेखील चेक करून पाहायला हवं. एक वर्ष जुने मिडियाटेक प्रोसेसर स्मार्टफोनचे परफॉर्मेंस चांगले राहत नाही.क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन चिपचे स्मार्टफोन चांगले असतात.
हार्डवेअरवर लक्ष द्या
     स्मार्टफोनची बॉडी लक्षपूर्वक तपासा.कुठे तो फुटला तर नाही ना, ते पहा.सोबत लॅपटॉप आणि यूएसबी केबल आवश्य घेऊन या. तो योग्यप्रकारे चार्ज होतो की नाही ते पहा. शिवाय फाईल्स योग्यप्रकारे ट्रान्सफर होतात की नाही ते चेक करा. त्यात सिमकार्ड टाकून नेटवर्क योग्यप्रकारे चालतो का पाहतानाच इंटरनेट सुरू करून अॅप्सदेखील रन करा.
वॉरंटी तपासा
     कित्येकदा लोक नवीन स्मार्टफोन घेतात आणि आपला जुना स्मार्टफोन विकतात. कित्येकदा लोक फोन खरेदी करताना स्मार्टफोनच्या वॉरंटी कालावधीकडे पाहत नाहीत.वॉरंटी कालावधी पाहण्याचे कारण म्हणजे यामुळे कदाचित हा तुमचा फायद्याचा व्यवहार ठरू शकतो. यामुळे कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास आपण त्याला ऑफिशियली सर्विस सेंटरकडे जाऊ शकतोयशासाठी घाला सकारात्मक चश्मा


     प्रत्येक माणूस आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी कोणता ना कोणता संकल्प आवश्य करत असतो. जर तुम्हाला आपले आयुष्य आणि करिअर आनंददायी बनवयाचे असेल तर तुम्हालाही एक संकल्प सोडायला हवा. तो म्हणजे आपला दृष्टीकोन थोडा बदलण्याचा संकल्प. तुम्हाला आपल्या नजरेवर पॉजिटिव चश्मा चढवावा लागेल. काही काळ हा चश्मा तसाच  घालून ठेवा, मग आपलं जीवन  नजरांना चांगले दिसायला लागेल.
या जगात सगळेच चांगले
     जर आपण वाईटच पाहण्याचा निश्चय केला असेल तर मग कसं बरं आपण यशापर्यंत पोहोचू शकाल? या नजरेमुळे आपल्याला प्रत्येक पावलावर वाईटच दिसेल. कुठे भ्रष्टाचार असेल,कुठे भावंडांमध्ये वाद दिसतील. कुठे काय तर कुठे1 आपल्याला चांगले दिसण्याची कुठे संधीच दिसणार नाही.यामुळे निराश होऊन मान खाली घालून बसण्यापेक्षा उठा. आकाशाकडे पहा. आपल्या मनातल्या विश्वासाला कमजोर होऊ देऊ नका.
होतं ते चांगल्यासाठी
     जग खूप मोठं आहे, मात्र आपला विचार करण्याचा परीघ छोटा आहे. कित्येकदा आपण एखाद्या घटनेच्याबाबतीत इच्छा असूनही चांगल्या दृष्टीने विचार करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.मग बघा, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सहजतेने निपटारा करू लागाल.
चांगले पहा,चांगले होईल
     सगळं जग चांगल्या गोष्टीनं भरलेलं आहे.पण कदाचित आपली रीत असेल किंवा जगाची. आपण कुठल्या गोष्टींवर विश्वासच ठेवायला तयार नाही.कित्येकदा आपण प्रत्येक चांगल्या माणसामध्ये वाईट शोधायला लागतो. कंपनी किंवा बॉसने  आपल्या हितासाठी लाख चांगली पावले उचलू दे, आपले मन वाईटच चिंतणार. आपल्याला विश्वासच होत नाही की,जगात आपल्यासोबतदेखील चांगले घडू शकते. आपण फक्त संशय घेत राहतो.कित्येकदा आपल्याबाबतीत वाईट घडतं,त्यावेळा आपण असा का विचार करत नाही की, वाईट काळात वाईट विचार केल्याने वाईटच गोष्टी वाढतील.
आनंद आजूबाजूलाच आहे
     नेहमी लोकांना वाटतं की, सुख मोठ्या मुश्किलीने मिळतं.पण हे खरे नाही. सुख तर नेहमी आपल्या आजूबाजूलाच विखुरलेलं असतंफक्त तो गोळा करणारा आणि वाटणारा माणूस पाहिजे आहे. आनंद मिळवण्यासाठी आपल्याला दूर कुठे जाण्याची गरज नाही. तर तो जाणून घेण्याची गरज आहे.    हा निर्णय देश हिताचा नाही


     कर्नाटक सरकारकडून लवकरच राज्यातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या नोकर्‍यांमध्ये स्थानिक लोकांना म्हणजेच भूमिपुत्रांना 100 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यातून माहिती व तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्राला वगळण्यात आले आहे. यातून सगळ्यात पहिला प्रश्‍न असा उपस्थित होतो की,खासगी क्षेत्रात अशा प्रकारची आरक्षण व्यवस्था लागू केली जाऊ शकते का? केले जाऊ शकते तर मग कुठल्या क्षेत्रात केले जाऊ शकते किंवा किती करू शकतो? वास्तविक अशा प्रकारच्या प्रश्‍नाची चर्चा करणंच योग्य नाही. अशा प्रकारची चर्चा देशाच्या हिताची नाही.जर खासगी क्षेत्रात आरक्षणाची गोष्ट केलीच तर खासगी क्षेत्रच संपुष्टात येईल आणि देशातील रोजगाराची समस्या कमी होण्यापेक्षा आणखी वाढेल.स्थानिक लोकांना नोकरी देण्यास खासगी क्षेत्राला बांधिल करणं योग्य नाही.उदाहरण म्हणून जर कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशच घेतल्यास, आणि इथे खासगी क्षेत्रास आरक्षण लागू केल्यास सांगा, मग हा निर्णय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला का लागू केला नाही?  असे करण्याचा प्रयत्न केला असता तर  या क्षेत्राचा विकासच खुंटला असता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे क्षेत्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान घेत नाही, सवलत मिळवत नाही.उलट राज्यालाच काही देत असेल तर त्यांना अशा प्रकारची बांधिलकी स्वीकारायला लावता ये ईल  का? खरे तर सर्वोच्च न्यायालयासमोर अशा प्रकारचा मामला आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे उदाहरण समोर नाही.पण वाटतं की, न्यायालयदेखील अशा प्रकारचा निर्णय सामान्य माणसाच्या मूळ अधिकाराच्या विरुद्धच मानेल आणि या विचाराच्या विरोधातच निर्णय देईल. तुम्ही कुणाला अशा प्रकारचे आरक्षण देण्यासाठी दवाब आणू शकत नाही. वास्तविक  ते तुमचा निर्णयच मानत नाहीत. वरकरणी अशा प्रकारचा मान्य करतील, पण त्यांना जे काही करायचे आहे, तेच करतील. हा मुद्दाच वेगळा आहे, त्यामुळे याची इथे चर्चा करणे योग्य नाही. आता दुसरा प्रश्‍न हा की,खासगी क्षेत्रातील कंपन्या, कारखाने तर स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देत असतात. ते असे यासाठी करतात, कारण स्थानिक व्यक्ती,माणसे त्यांच्यासाठी अधिक काम करू शकतात. अन्य प्रदेशातील व्यक्ती तर अनेक कारणांसाठी आपल्या घरी, आपल्या प्रदेशात जायला बघतो.त्याच्या सुट्टी घेऊन जाण्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे खासगी क्षेत्राला आरक्षणासाठी दबाव आणण्याची गरजच नाही. जरा विचार करा, देशातल्या अन्य राज्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर काय होईल? मुंबई शहर तर उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांनी भरलेलं आहे. जर इथेही खासगी क्षेत्रात आरक्षण दिले जाऊ लागले तर हे क्षेत्र रिकामच होऊन जाईल. त्यामुळे विविध प्रकारच्या आरक्षणानं खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करणं फारच संकोचित विचार म्हणता येईल.नि: संशय हा अशा प्रकारचा निर्णय राजकीय कारणांनी घेतला जातो. पण यामुळे देश आणि समाजाचेच मोठे नुकसान होते. आरक्षण जातीच्या नावावर असेल किंवा मग भाषेच्या नावावर,खासगी क्षेत्रात तर चुकीचेच मानले जाईल. कदाचित  अशा प्रकारच्या गोष्टी राजकीय लाभासाठी केल्या जात असतील. आणि त्यामुळे लोकांना मतेही मिळत असतील पण शेवटी याचे नुकसान देशालाच सोसावे लागणार आहे.या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की, अशा प्रकारची चर्चा करणंच योग्य नाही. कारण हा निर्णय देश हिताचा नाही. संवेधानिकदृष्ट्या तर याला योग्य मानलं जाऊच शकत नाही.


Friday, December 23, 2016

गोल्डन गर्ल: सिमोन बाईल्स


    
चार फूट 9 इंच उंचीच्या सिमोन बाईल्सचे आयुष्य चित्रपटात शोभेल असेच आहे.कोलंबियात जन्मलेली सिमोनची आई मादक द्रव्याच्या आहारी गेली होती.त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिचा आजी- आजोबांनी सांभाळ केला.सिमोनसह त्यांनी तिच्या बहिणीलाही दत्तक घेतले.गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी सिमोन 19 वर्षे वयात वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या इतिहासात सगळ्यात जास्त गोल्ड मेडल जिंकणारी जिम्नॅस्ट बनली आहे. तिच्या आयुष्यातील अंतरंगाविषयी...
     सिमोनला आईचा व्यवहार विचित्र वाटत होता.ती कधीही आपल्या मुलांवर प्रेम करत नव्हती.ती इतर आयांप्रमाणे  घरात ना स्वयंपाक करायची ना मुलांचा सांभाळ करायची.कित्येक दिवस तर ती घरीच यायची नाही. आलीच तर तिची अवस्था मोठी विचित्र असायची. लहानगी सिमोन तिच्याजवळ जायचा प्रयत्न करायची.पण ती भडकून तिला झिडकारून टाकायची.सिमोनला दोन बहिणी आणि एक भाऊ होता. तिचे आजोबा ऊेमधे यायचे,मुलांची हालहवा जाणून घ्यायला.ते आईला खूप रागवायचे. तिला ड्रग्झ सोडण्याचा सल्ला द्यायचे. पण आईवर त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही.
     तेव्हा सिमोन फक्त सहा वर्षांची होती. तिला माहित नव्हतं की, ड्रग्झ काय चीज आहे? पण तिला एवढं माहित होतं की,ड्रग्झमुळेच आईची ही खराब अवस्था झाली आहे.काही दिवस गेले. आईच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही.मग एक दिवस आजोबांनी वैतागून एक निश्चय केला की, सिमोन आणि तिची धाकटी बहीण अदरिया आपल्या आईसोबत राहणार नाहीत. ते दोघींना घेऊन आपल्या घरी आले. आईने एका दस्ताऐवजावर सही करून आपल्या दोन मुलींशी कायदेशीररित्या संबंध तोडून टाकले. आता ती कधीच आपल्या दोन मुलींना भेटणार नव्हती. ही घटना आहे2003 सालची.आजोबा आपल्या दुसर्या पत्नीसोबत टेक्सासला राहत होते. नेली खूपच प्रामाणिक महिला होती. सिमोन सांगते, आजी खूपच चांगली होती. ती आमची फार काळजी घ्यायची. आम्ही आजोबांना पप्पा म्हणायचो, आणि आजीला मम्मी. ते आमचा फार लाड करायचे.त्यांनी आम्हाला कायद्यानं दत्तक घेतलं होतं. आईमुळं मुलांचं आयुष्य बरबाद हो ऊ नये, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी आईला सक्त ताकीद दिली होती की,त्यांनी कधीच त्यांच्या घरी यायचं नाही.मुलींना कधी भेटायचा प्रयत्नही करायचा नाही.
     आता सिमोन आणि अदरियाची जबाबदारी आजी- आजोबांवर होती. पण त्यांची मोठी बहीण एशले आणि भाऊ तेविन तेव्हाही एकटचेच होते.त्यांचा सांभाळ करायला कोणीच नव्हते. सगळ्यात दुखद गोष्ट म्हणजे सिमोनचे वडील केल्विन स्लेवन यांनाही नशेची लत होती. ते तर आधीच घर सोडून गेले होते.या दरम्यान एका नातेवाईकांनी एशले आणि तेविन यांना दत्तक घेतले. अशाप्रकारे चारही भावडांना नवे पालक मिळाले.पण त्यांचे मूळ कुटुंब मात्र उदवस्त झाले होते.
     सिमोन आणि अदरिया शाळेत शिकू लागल्या. त्यांना त्यांचं बालपण परत मिळालं.त्यांचं खेळणं-बागडणं पाहून आजी- आजोबा खूश होत. एकदा शाळेच्यावतीने मुले एका जिमनॅस्टिक सेंटरला भेट द्यायला गेली. सिमोनने तिथे जिम्नॅस्टच्या कसरती पाहिल्या. तिला राहवले नाही,तीही सगळ्यासमक्ष त्यांची नक्कल करू लागली. सगळे एकदम चाट पडले, कारण तिच्यात कमालीची स्फूर्ति होतीच पण कोणत्याही ट्रेनिंगशिवाय ती लिलया कसरती करीत होती.ती घरी आली. एका आठवड्याने सेंटरमधून एक पत्र आले. पत्रात लिहिले होते की, आपल्या मुलीमध्ये अदभूत प्रतिभा आहे.तिला ट्रेनिंगसाठी पाठवून द्या. दुसर्याचदिवशी जिम्नॅस्ट सेंटरमध्ये तिची भरती झाली. सिमोन सांगते, आजीने मला जिम्नॅस्ट बनण्यासाठी प्रेरित केले.तिने मला कधीच निराश केले नाही.ती माझी आईही आहे आणि आजीही. मला कधीच वाटले नाही की, ती माझ्या आईची सावत्र आई आहे.
     लहानग्या सिमोनला या खेळात आनंद वाटू लागला.ज्या कसरती करायला बाकीच्या मुलांमुलींना कित्येक वर्षे लागायची, त्या सिमोन काही दिवसांतच शिकून घ्यायची. लवकरच तिची ख्याती सार्या अमेरिकेत पसरली. की बातमी तिच्या खर्या आईपर्यंत म्हणजे शेनॉनपर्यंत पोहचली. ज्या ज्या वेळेला टिव्हीवर तिच्या मुलीची बातमी यायची, त्या त्या वेळेला तिचं मन तिला भेटायला अतुर व्हायचं. पण वडील रोनाल्ड यांची सक्त ताकीद असल्यामुळे ती असे काही करू शकत नव्हती. या दरम्यान तिने नशेच्या सवयीपासून स्वत:ची सुटका करून घेतली होती.पण कायद्यानं ती आपल्या मुलांवरचा अधिकार गमावून बसली होती.शेनॉन म्हणते,माझी सिमोनला भेटण्याची खूप तडपड व्हायची. मी खूप रडायची. पण माझ्यामुळे तिचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी तिला भेटायचा प्रयत्न केला नाही.

     गेल्या काही वर्षात सिमोन जिम्नॅस्टोंच्या जगतात नवी सनसनाटी निर्माण करत एकदम प्रकाश झोतात आली.कमी कदकाटीच्या या अश्वेत मुलीला पाहून सारे जग चकीत झाले. तिने सर्वाधिक सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम केला.त्यामुळे लोक तिला गोल्डन गर्ल म्हणू लागले. यावर्षीच्या रिओ ऑलम्पिकमध्ये तिने चार सुवर्णपदके आपल्या नावावर केली. 19 वर्षाच्या या वयात इने वर्ल्ड चॅम्पियनच्या इतिहासात सगळ्यात जास्त पटकावली आहेत.ती तीन कसरती एका दमात करते. तिच्या स्टाईलला द बाईल्स असे नाव दिले गेले आहे.सिमोन सांगते, माझ्या कित्येक सहकारी मित्र-मैत्रिणी माझ्यासारखा पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ते तो करू शकत नाहीत.मला स्वत:लाच माहित नाही की, ही कला मी कशी शिकले? सिमोन आपल्या यशावर खूश आहे. ती म्हणते,हे सगळं आजी- आजोबांच्या त्यागा आणि प्रेमामुळं शक्य झालं. आता तिला तिच्या आईविषयी कसलीच तक्रार नाही. पाच वर्षांपूर्वी ती आपल्या आईला भेटली होती. आता ती नेहमी तिच्याशी फोनवर गप्पा मारत असते.सिमोनची आई म्हणते,ज्या वेळेला माझ्या मुलीने रिओमध्ये गोल्ड मेडल जिंकले, त्यावेळेला मी माझ्या शेजार्यांमध्ये चॉकलेट्स वाटली. मला खात्रीच वाटत नाही की, मी सिमोनची आई आहे.