मी शरलॉक होम्ससोबत एके ठिकाणी निघालो होतो. अचानक कुणी तरी हाक दिली, " मायबाप,काही तरी द्या. देव तुमचं भलं करील..." मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं, आणि माझ्या अंगावरून सरसरून काटा निघून गेला. बाप रे! किती भयंकर चेहरा होता, त्या भिकार्याचा! कपाळावर जखमेचा खोल व्रण होता. आणि वरचा ओठ असा काही वर सरकला होता की, तो खालच्या ओठाला बिलगायचं नावच घेत नव्हता.गालावर विद्रुप मोठे मोठे डाग होते. आणि डोक्यावर लाल रंगाचे केस. अंगावर मळलेले- फाटलेले शिरशिरी आणणारे कपडे होते.
मी होम्सचा हात ओढतच म्हणालो," लवकर चल येथून." होम्स हसून म्हणाला," वाटसन, घाबरू नकोस. हा ह्यूज बून. मी पाहत आलोय त्याला. लोक मदत करतात. पैसे देतात. याचा फक्त चेहरा खराब नाही तर याचा एक पायसुद्धा मोडलेला आहे. बिच्चारा, लंगडत लंगड्त चालतो."
मी मात्र मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागलो, ' पुन्हा कधी या ह्यूज बूनचा चेहरा माझ्यासमोर आणू नकोस. पण तसं घडायचं नव्हतं. एका मिसिंग प्रकरण समोर आलं. आणि त्या प्रकरणाचा ह्यूज बूनला भेटल्याशिवाय उलगडा होणार नव्हता. झालं होतं असं की, सेंट क्लेअर नावाचा इसम रहस्यमयरित्या गायब झाला होता. त्याच्याबाबतीत जो कोणी काही सांगू शकत होता, तो म्हणजे भिकारी ह्यूज बून! पोलिसांनी त्याला अटकही केली होती. पण सेंट क्लेअरविषयी काही माहिती मिळाली नव्हती.
सेंट क्लेअरची पत्नी मॅरी शरलॉक होम्सला भेटायला आली होती. होम्सने मला याबाबतीत सांगितलं होतं. सेंट क्लेअर आपल्या पत्नी-मुलांसह शहराबाहेरच्या एका वसाहतीत राहत होता. त्याचे जीवन सुखी-समाधानी होते. तो रोज सकाळी त्याच्या कामानिमित्तानं शहरात येत असे आणि सायंकाळी ठरलेल्या वेळेत घरी परतत असे. एक दिवस सेंट क्लेअर शहरात आला. त्याच्या पत्नीलाही काही कामानिमित्तानं शहरात यावं लागलं. ती रस्त्यावरून निघाली होती. चालता चालता तिची नजर समोर असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या उघड्या खिडकीकडे गेली. तिचा पती सेंट खिडकीत उभा होता. दोघांची नजारानजर झाली. सेंट झटकन मागे सरला आणि खिडकीही लगेच बंद झाली. ते पाहून मॅरी घाबरली. तिला काहीच कळेना! तिला पाहून सेंट मागे का हटला आणि खिडकी का बंद झाली? मॅरी जाणून घेण्यासाठी इमारतीत घुसली. पायर्या चढून वर जाणार इतक्यात इमारतीचा मालक लास्कर समोर आला. तो म्हणाला," मॅडम, तुम्ही वर जाऊ शकत नाही."
मॅरी घाबरून बाहेर आली. समोर दोन काँन्स्टेबल उभे होते. ती त्यांच्याकडे गेली. आणि सारा प्रकार सांगितला. वर म्हणाली," मला वाटतं, माझ्या पतीला किडनॅप केलं असावं. प्लिज, मला मदत करा."
दोन्ही काँन्स्टेबल मॅरीसोबत आत गेले. तिथे लास्कर उभाच होता. त्याने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्याला रस्ता मोकळा करणं भाग पडलं. वरच्या मजल्यावर दोन खोल्या होत्या. एक रिकामी होती. आणि दुसर्यात तोच तो भयंकर चेहर्याचा भिकारी ह्यूज बून बसला होता. पण मॅरीला सेंट क्लेअर कुठेच दिसला नाही.
लास्कर म्हणाला," इथे तर फक्त हा भिकारी ह्यूज बून राहतो. याच्याशिवाय मी कुणालाच वर येताना पाहिलेलं नाही. मिसेस मॅरींना नक्कीच भास झाला असला पाहिजे."
पोलिसांनी सगळी खोली धुंडाळूली. तर तिथे त्यांना एक पँत, शर्ट आणि एक जोड चप्पल आढळून आली. मॅरी ती पाहताच किंचाळली, " ही या माझ्या पतीच्याच वस्तू आहेत. पण त्यांचा कोट कुठाय? आणि माझा पती...?" असे म्हणून तिने हंबरडा फोडला.
आता पोलिसांचा मॅरीच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यांनी ह्यूज बूनला अटक केली. आणि ठाण्यात नेले. पण ह्यूज बून एकसारखा एकच पालपूद लावत होता, "मला माहित नाही. सेंट क्लेअरचे कपडे तिथे कसे आले?''
लास्करने पोलिसांना सांगितले की, ह्यूज बून अनेक वर्षांपासून बाजारात भिक मागायला बसतो. मीच त्याला दया येऊन माझ्या इमारतीत राहायला जागा दिली होती."
लास्करच्या इमारतीच्या पाठीमागे एक खोल नाला होता. त्यात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी यायचे. पोलिसांनी भरतीचे पाणी ओसरल्यावर नाल्यातसुद्धा शोध घेतला, तेव्हा त्यात एक कोट मिळून आला. कोटाच्या खिशात पुष्कळशी चिल्लर नाणी सापडली. कोटामुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले.
त्या रात्री होम्सने सेंट क्लेअरच्या घरी जाताना मला सगळा किस्सा ऐकवला. जेव्हा आम्ही मॅरीच्या घरी पोहचले, तेव्हा मॅरीने सांगितले, " एक चांगली बातमी आहे, सेंटने एक चिठ्ठी पाठवली आहे. त्यात त्याने आपण खुशाल आहोत आणि लवकरच परतणार असल्याचं म्हटलंय." होम्सने पत्र पाहून विचारलं, ही अक्षरं तुमच्या पतीचीच आहेत?"
मॅरी म्हणाली, " हो, आणि सोबत त्यांनी त्यांची अंगठीही पाठवली आहे. क्लेअर सुखरूप असला तरी रहस्य मात्र कायम होतं.
होम्स रात्रभर विचार करत होता. तो झोपला नाही. दुसर्यादिवशी त्याने मला लवकर उठवलं. हातात एक बॅग थांबवली. "चल,आपल्याला एके ठिकाणी लवकर जायचं आहे." लवकरच आम्ही जेलसमोर उभा होतो. कोठडीत तोच भयंकर चेहर्याचा ह्यूज बून होता. होम्सने शिपायाला बोलावले. त्याने सांगितल्यानुसार ह्यूज बूनला घट्ट पकडलं. होम्सने बॅगेतून एक स्पंज काढला आणि तो ओला करून ह्यूज बूनच्या चेहर्यावर जोरजोराने रगडू लागला. बून ओरडत होता आणि सुटण्याचा प्रयत्न करीत होता. पण सिपायाची पकड मजबूत होती. थोड्याच वेळात चेहर्यावरचा सारा लेप उतरला. आणि समोर सेंट क्लेअर उभा राहिला. तो रडत म्हणाला," हो, मीच सेंट क्लेअर आणि ह्यूज बूनसुद्धा...!"
नंतर सेंट क्लेअर ऊर्फ ह्यूज बूनने जे काही सांगितलं, ते असं होतं- ' मी एक चांगला अभिनेता होतो. नाटकात काम करायचो. नंतर पत्रकार म्हणूनही एका वृत्तपत्रात काम करू लागलो. एकदा संपादकांनी भिकार्याच्या जीवनावरची स्टोरी बनवायला सांगितली. भिकार्यांच्या जीवनाच्या मुळाशी जाण्यसाठी मी स्वतः एका भिकार्याचा गेटअप केला. आणि त्यांच्यात जाऊन बसलो. स्टोरी तर खूप छान जमलीच पण आणखी एक विशेष गोष्ट घडली. ती म्हणजे, त्या दिवशी मला पुष्कळ पैसे मिळाले. ते पैसे माझ्या पगारापेक्षा किती तरी अधिक होते. मग तेव्हापासून हेच काम करायचं ठरवलं. मी रोज घरातून निघायचो, ह्यूज बूनचा मेकअप चढवायचो आणि बाजारात जाऊन बसायचो. यासाठी लास्कर मला मदत करायचा,"
त्यादिवशी मी कपडे बदलत होतो, तेव्हा माझ्या पत्नीने मला पाहिलं. ती आत येईपर्यंत मी माझा वेश बदलला होता. मॅरी येण्यापूर्वीच मी चिल्लरने भरलेला कोट मागे नाल्यात फेकला होता. बाकीचे कपडे बाहेर फेकणार तोच, मॅरी सिपायांसह आत आली. त्यामुळे कोट नाल्यात मिळाला आनि बाकीचे कपडे खोलीत! नंतर मी मॅरीची चिंता दूर करण्यासाठी पत्रसुद्धा पाठवलं, पण शरलॉक होम्सने या सगळ्या प्रकरणावरचा पडदा उठवला.'
हा किस्सा संपला. सेंट क्लेअरची कसल्याही शिक्षेविना सुटका झाली. तो घरी पोहचला पण तेव्हापासून ह्यूज बून मात्र कोणाला दिसला नाही. भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे
मूळ लेखक- आर्थर कानन डायल ( शरलॉक होम्स पात्राचा निर्माता)
No comments:
Post a Comment