Wednesday, May 16, 2012

... आणखी किती बळी देणार आहोत आपण!

     रस्ता अपघाताच्याबाबतीत भारताची सार्‍या जगात छी: तू झाली आहे. जगभरात प्रत्येक तासाला होणार्‍या रस्ता अपघातात २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्या ४० आहे. म्हणजे यात एक तृतीयांश भारतीय आहेत. आणखी एक धक्कादायक बाब अशी कीदरवर्षी होणार्‍या रस्ता अपघातामुळे भारताला २० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार एवढ्यात पैशात देशातल्या पन्नास टक्के कुपोषित बालकांना पोषण आहार दिला जाऊ शकतो. २०१० मध्ये भारतात १.३४ लाख लोक रस्ता अपघातात मरण पावले आहेत. राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड ब्युरोनुसार ९९ टक्के अपघात मद्यपान करून गाडी चालवल्याने घडले आहेत. दहशतवादामुळे दरवर्‍शी दोन हजार माणसे मेली तर तो राष्ट्रीय चिंतेचा विषय होतो. मात्र रस्ता अपघातात तब्बल लाख- दीड लाख   माणसे मरत असताना याची दखल गांभिर्याने घेतली जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र आघाडीवर आसावा, यात आणखी ते दुर्दैव कोणते? रस्ता अपघातात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१० मध्ये देशात ३ लाख ८४ हजार ९४९ माणसे रस्ता अपघातात मरण पावली. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ६४ हजार २०४ लोकांचा समावेश आहे. मध्यप्रदेशमध्ये रस्ता अपघातात ३५ हजार ६१७ माणसांचा बळी गेला आहे. त्यांचा देशात दुसरा क्रमांक आहे.
     आपल्या देशात जड वाहनामुळे दरवर्षी १२५ लाख माणसे अपघातात आपला जीव गमावतात. तर ५ लाखापेक्षा अधिक लोक गंभीर जखमी होतात. योजना आयोगाच्या रिपोर्टनुसार या अपघाताम्मध्ये ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. ही बाब मोठी चिंताजनक म्हटली पाहिजे. देशभरात रोज कुठे ना कुठे असा प्रकार घडत असतो. गर्दीच्या हाती सापडलेल्या चालकाला मारहाण, रास्ता रोको किंवा वाहनांची तोडफोड या घटना आता सामान्य झाल्या आहेत. यातून होणारे नुकसान मोठा चिंतेचा विषय असून ज्याची चूक नाही, त्यालाही नुकसानीला सामोरे जावे लागते. असा हा मामला विचित्र आहे. म्हणजे एकदा घरातून गेलेल्या माणसाची माघारी येण्याची शाश्वती तर  नाहीच. पण शिवाय तो जिवंत आलाच तर कशा अवस्थेत येईल, काही सांगता येत नाही.  चूक नसलेल्या लोकांनाही हकनाक या अपघातांचा झटका बसतो.
     अपघाताला कुठले एक कारण पुरेसे नाही. त्याला अनेक कारणे आहेत. शासन, प्रशासन आणि निष्कालजीपणाने ,बेदरकारपणे गाडी चालवणारी माणसे त्याला कारणीभूत आहेत. आपल्या देशात रस्त्यांची अवस्था मोठी भयावह आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आपल्या सरकारी व्यवस्थेतून कुठलीच यंत्रणा   सुटलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामातल्या भ्रष्टाचारामुळे रस्ते मजबूत होत नाहीत. त्यांचा दर्जा अगदीच तकलादू असतो.  एका पावसाळयातच त्याची वाट लागलेली असते.  शिवाय  डागडुजीबद्दलचा निष्काळजीपणा हा आणखी एक मोठा कळीचा मुद्दा आहेडागडुजीबाबत शासन गंभीर नाहीच शिवाय दुरुस्ती केलीच तर वरवरची असते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे निमंत्रक बनले आहेत.वाहन बेदरकार चालवणार्‍यांनावरही कुठले नियंत्रण राहिलेले नाही. रस्ता म्हणजे आपल्या बापजाद्याची इस्टेट असल्यासारखी माणसे वागत असतात.  यात आपली युवा पिढी आघाडीवर आहे. वर पाहिलेल्या आकडेवारीवरून आपल्या ते लक्षात येईल. युवा पिढी जिवाची पर्वाच करायला तयार नाही. त्यांना बेदरकारपणा आणि धूमचा शौक भावला आहे. पण त्यांना आपल्या मागे कुणी आहे, आपल्या पुढच्या आयुष्यात बरेच काही कर्तृत्व करायचे बाकी आहे, याची अजिबात चिंताच नाही. आई-वडीलही त्यांना मोकळीक देत असतात. त्यांच्यावर बंधने घालण्यास कचरतात. मुले आता भावनिक ब्लॅकमेलचा लाभ उठवून विविध गैरमार्गाचा अवलंब करत आहेत. वास्तविक पालकांनी सगळ्याच बाबतीत कठोरता बाळगायला हवी. आठरा वर्षे पूर्ण झाल्याखेरीज पाल्याच्या हातात वाहन सोपवू नये. यामुळे बर्‍याच गोष्टींना आळा बसेल.
     रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. रोज मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना स्वतः बरोबरच दुसर्‍याची काळजी घेणे आवश्यक बनले आहे. मात्र आपल्याकडे वाहन चालवताना जसा निष्काळजीपणा बाळगला जातो तसा वाहनांच्या काळजी घेण्याच्याबाबतीतही घडत आहे. वाहनांची वेळच्यावेळी काळजी घेतली जात नाही. वेळच्यावेळी ऑईलबदलीसारखी, ब्रेकफेलची कामे, वाहनांची स्वच्छता या गोष्टी व्हायलाच हव्यात. जड वाहनांच्याबाबतीत तर सर्वदृष्टीने काळजी आवश्यक आहे. शिवाय वाहने जपून चालवायला हवीत. वेगावर मर्यादा हवी. 'मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक' हे ध्यानात ठेवायला हवे. शासनानेही रस्ता दुरुस्ती, रस्त्यांच्या दर्जेबाबत काळजीने लक्ष द्यायला हवे. रस्त्याची कामे चांगली न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून अन्य लोकांकडून चांगल्या प्रकारे कामे करून घेता येतात. रस्त्यांच्या कामांची वेळोवेळी पाहणी व्हायला हवी. रस्ते म्हणजे दळणवळणाच्या रक्तवाहिन्या आहेत. गाव, शहरजिल्हा, राज्य आणि देश यांच्या विकासात रस्त्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांची चिंता व्हायलाच हवी. सर्व काही शक्य आहे, पण त्याला इच्छाशक्तीची गरज आहे. शासनाने त्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे.          
dainik saamana 23/5/2012                                                                            

No comments:

Post a Comment