तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणार्या दुष्परिणामांची कल्पना जनमानसाला व्हावी, या हेतूने जागतिक स्तरावरूनच तंबाखूविरोधी दिवस पाळण्यात येतो. पण तरीही माणूस व्यसनापासून मुक्त होताना दिसत नाही. उलट व्यसनाच्या विळख्यात आणखी आवळता जातो. एक धक्कादायक निष्कर्ष असे सांगतो की, तंबाखूच्या आहारी गेलेला माणूस वर्षभरात पाऊण किलो तंबाखू फस्त करीत असतो. आजकाल तंबाखू चघळणे, गुटखा खाणे, सिगारेट ओढणे ही फॅशन होऊन बसली आहे. दरवर्षी या फॅशनचा आलेख आपल्या देशात वाढत आहे. मागील दोन दशकांत तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले आहे, असे "वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट इन्व्हेटिगेट इन हेल्थ'तर्फे झालेल्या सर्वेक्षणात नमूद आहे.
१९५0 ते २000 या पन्नास वर्षांत तंबाखूने विकसित देशांमध्ये तब्बल ६ कोटी लोकांचा बळी घेतला. त्यापैकी जवळजवळ ५ कोटी पुरुष होते, तर १ कोटी महिला होत्या. यात भारत आणि चीन आदी देशांचा समावेश नाही. आज तंबाखूमुळे दरवर्षी तीस लाख लोकांचा जीव जातो. त्यात दहा लाख चिनी नागरिक, तर आठ लाख भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर आगामी १0-१५ वर्षांत हीच संख्या १ कोटीवर पोहोचेल, अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्यात ३0 लाख चिनी लोक असतील.तंबाखूमुळे निकोटीनसह २४ प्रकारचे विषारी पदार्थ असतात. यामुळे अकाली मृत्युमुखी पडणार्यांचे आयुष्य त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे सरासरी २0 ते २५ वर्षांनी कमी होत असते, असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. विकसित देशातील फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मरणार्या रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांना तंबाखूच्या सवयी असतात. तर भारतात मुख कर्करोगामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणार्या एक लाख दुर्दैवी भारतीयांपैकी जवळजवळ ९५ टक्के हे तंबाखूचे शिकार ठरत असल्याचे आढऊन आले आहे.
तंबाखूचे पृथक्करण केल्यावर त्यात २४ प्रकारचे प्रमुख घातक पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. त्यातल्या अनेक पदार्थांमध्ये कर्करोग निर्माण करण्याची क्षमता आहे. तंबाखूतला सर्वात घातक घटक म्हणजे निकोटीन. तंबाखू, जर्दा, गुटखा आणि मावा खाल्ल्याने तोंडाच्या श्लेमपटलावर तर विपरित परिणाम होतोच, शिवाय त्यातील विषारी पदार्थ रक्तात पसरून सर्व शरीरावरच त्याचा परिणाम होतो. तंबाखूतले उत्तेजक, विषारी पदार्थ काही क्षणातच रक्तात पसरतात व उत्तेजना आणतात. त्यामुळे हळूहळू त्याची चटक लागते.
पण तंबाखूच्या सेवनाने येणारी उत्तेजना तात्पुरती असते. थोडयाच वेळात त्याची 'किक' संपते. मग मानसिक थकवा जाणवायला लागतो. शारीरिक क्षमताही कमी व्हायला लागते. स्नायूंमध्ये ढिलाई आल्यासारखे वाटते. ही ढिलाई घालवण्यासाठी मग पुन्हा तंबाखू, गुटखा, मावा खावावा लागतो. आणि हे दुष्टचक्र पुढे चालूच राहते. यातून सशक्त, निरोगी, कार्यक्षम आणि देशभक्त पिढी निर्माण होण्याऐवजी दुबळी, रोगी, अकार्यक्षम, व्यसनग्रस्त, वैफल्यग्रस्त पिढी तयार होते, ज्याची देशाच्या विकासात काडीची मदत होत नाही.
कर्करोगाचे अनेक प्रकार असले आणि आज हा रोग भयानक रूप घेत असला तरी तंबाखू, गुटखा आणि मावा यामुळे केवळ वीस-पंचवीस वर्षांची युवा पिढी तोंडाच्या कर्करोगाला बळी पडत आहे, ही मोठी दुर्दैवाची आणि चिंतेची बाब म्हटली पाहिजे. जगभरात तोंडाच्या कर्करोगाला बळी पडलेल्या लोकांची संख्या केवळ तीन- चार टक्के आहे, मात्र आपल्या भारतात हेच प्रमाण ४० ते ५० टक्के इतके भयावह आहे. आता हृदयविकाराच्या कारणांत तंबाखू, गुटखा आणि मावा यांच्या सेवनाच्या कारणाचाही समावेश झाला आहे. तंबाखू सेवनामुळे कातडीखालील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हृदयाचे ठोके वाढतात. हृदयाचे काम वाधते, पण रक्तपुरवठा मात्र वाढत नाही. आणखी परिणाम म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर विशिष्ट प्रकारच्या स्निग्ध पदार्थांची पुटे चढण्याची क्रिया बळावते. त्यामुळे हळूहळू रक्तवाहिन्यांचा व्यास कमी हो ऊ लागतो व साहजिकच त्या त्या अवयवांचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो.
याशिवाय तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम होतात. तोंडाची चव जाते. भूक मंदावते. पचनाच्या तक्रारी वाढायला लागतात. तंबाखूच्या धुरामुळे श्वसनाचे विकार, अस्थमा आदी रोगांनाही आयते आमंत्रण मिळते. आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्याचा अंडाशयावर परिणाम हो ऊन नपुसकत्व येऊ शकते. शुक्रजंतूंवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. माकडावर केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे.
तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनानंतर अनेक अनिष्ट परिणाम माणसाच्या शरिरावर होत असतानाही युवा पिढी त्याच्यापासून दूर जाण्यापेक्षा त्याला अधिकाधिक जवळ करताना दिसत आहे, हे मोठे दुदैव म्हटले पाहिजे. आजच्या पालकाला आपल्या पाल्याकडे वेळ द्यायला फुरसत नाही. तर पाल्य चांगल्या गोस्टींचा अंगिकार करण्यापेक्षा वाईट गोष्टींना कवटाळताना दिसत आहेत्.प्राथमिक शाळेत जाणार्या मुलांच्या खिशात पेन-पेन्सिल ऐवजी गुटख्याच्या पुढ्या आढळून येत आहेत. आजच्या मुलांवर, युवा पिढीवर कुणाचाच धाक राहिलेला नाही. सरकारेही त्यांच्या भावनिकतेचा विचार करताना त्यांना शारीरिक अथवा मानसिक असा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा कायद्याच्या निर्मितीच्या मागे लागताना दिसत आहेत. त्यामुळे ना पालकाचा वचक राहिला ना शिक्षकाचा! शारीरिक, मानसिकतेने दुर्बल झालेली मुले अशा तकलादू व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात. मात्र हे व्यसन सबल करत नाही, उलट त्याला आतून पोखरण्याचे काम करते.
व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी लोकांना विशेषतः युवा पिढीला नितीमत्तेची मोठी गरज आहे. नीती आणि भीतीची योग्य सांगड घालून त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याची गरज आहे. नीतीमत्तेचे धडे घरापासून गिरवायला हवेत. अगोदर पालकांनी त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा चव चाखण्याची ऊर्मी जागी हो ऊन त्याचा आस्वाद घेण्याकडे कल वाढतो. कुठल्याही गोष्टीचा एकदा का आस्वाद घेतला की ती गळी पडल्याशिवाय राहत नाही.शाळा-कॉलेजमधून शिक्षक- प्राध्यापकांनीसुद्धा संस्कारावर भर द्यायला हवा. शिक्षकच मुलांसमोर व्यसन करत असेल तर त्यांनी आदर्श कोणाकडून घ्यायचा, हा मोठा प्रश्नच निर्माण होईल. सगळेच शिक्षक सारखे नसतात, या न्यायाने क्वचितच शिक्षक तंबाखू, गुटखा अथवा मावा खाताना किंवा सिगरेट ओढताना दिसतात.
धुम्रपानाबाबत सरकारने अनेक कडक कायदे अस्तित्वात आणले आहेत. शाळा- कॉलेज, थिएटर, वाचनालये, बसस्थानक अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, शिवाय कडक शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे, पण कायदा पळतो कोण, असा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणच्या प्रमुखाला तसेच शाळा- कॉलेजच्या मुख्याध्यापक- प्राचार्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. पण कोणीही 'नस्ती आफत' ओढवून घ्यायला तयार नाही. कारण त्यांच्या संरक्षणासाठी पुरेशी व्यवस्था अथवा कायदा अस्तित्वात आणलेला नाही.
सिगरेट- विडी ओढणार्यापेक्षा त्याचा धूर घेणार्यालाही त्याचा अधिक त्रास होतो, ही मोठी चिंतेची बाब आहे. यासाठीच हे कायदे करण्यात आले असले तरी गांभिर्याने घ्यायला कोणी तयार नाही. आपल्या देशात अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले आहे. विशेषतः अल्पवयीन मुले या रोगांची शिकार होताना दिसतात. आरोग्याला आपायकारक असलेल्या तंबाखूच्या धुरामुळे सर्दी, पडसे, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे अशा नित्य समस्याही उद्भवत आहेत.
तंबाखू व त्याच्याशी निगडीत असलेले उद्योगक्षेत्र आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता हितसंबंध गुंतलेल्या लॉबीच्यावतीने धुम्रपानाबाबत पद्धतशीरपणे गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत असतात. सरकारलाही यातून मोठा महसूल मिळत असल्याने तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई करणारे कायदे सरकारने केले असले तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकार सतर्क नाही. निदान त्याबाबत जागरूक असण्याची आवश्यकता आहे. वेळप्रसंगी कायद्याची कठोरता दाखवली गेली पाहिजे. नाही तर निव्वळच्या कागदी कायद्याला काहीच महत्त्व नाही. धुम्रपानाच्या समस्येवर उपाय करताना लोकशिक्षणावरही अधिक भर दिला गेला पाहिजे. सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने तंबाखूपासून दूर राहण्याच्या दृष्टीकोनातून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यात तळमळ असली पाहिजे तरच प्रयत्नांना यश मिळते. प्रत्येक डॉक्टरांनी यासाठी जरूर प्रयत्न करायला हवेत. गणेशोत्सवसारख्या अन्य मंडळांनीही जागृतीचे प्रयोग हाती घ्यायला हवेत. निर्व्यसनी प्रत्येक माणसाने संपूर्ण देश आपल्यासारखा होण्यासाठी योगदान द्यायला दिले पाहिजे. (संकलित)
(३१ मे तंबाखू सेवन विरोधी दिन)
No comments:
Post a Comment