Thursday, May 31, 2018

(बालकथा) हत्ती माझा सोबती


     जंगलाजवळ एक गाव होतं.त्या गावात साधारण दहा एक वर्षाची चिंगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. गावात शाळा नव्हती. त्यामुळे ती घरीच राहून आईला आणि घरातल्या लोकांना कामात मदत करत होती. तिच्या खेळकर आणि आनंदी स्वभावामुळं तिने सगळ्या गावाची मनं जिंकली होती.
     चिंगीचा सगळा रिकामा वेळ जवळच्या जंगलात जायचा. तिच्याजवळ एक छोट्ंस शेळीचं कोकरू होतं. ते तिच्या सारखं मागं मागं असायचं. जंगलातला सगळा वाकडा-तिकडा असो किंवा चढणी-उतरणीचा असो, तिने सगळा रस्ता पिंजून काढला होता. तिला जंगलातली खडानखडा माहिती होती. जंग़ल आणि तिथला सुंदर निसर्ग हीच तिची शाळा होती. ती वार्याचा अंदाज पाहून हवामानाचा मूड ओळखायची. तिने आजी- आजोबांकडून झाडं-रोपं, औषधी वनस्पती यांची माहिती जाणून घेतली होती. त्यांचा औषधी गुण तिथल्या जखमी जीव-जंतू, प्राणी-पक्ष्यांवर आजमवायची. जेव्हा केव्हा तिला एकादा जखमी प्राणी वगैरे दिसायचा, तेव्हा ती लगेच त्याला आपल्या घरी घेऊन यायची आणि त्याच्यावर उपचार करायची. तो पूर्ण बरा झाल्यावर त्याला परत पाठवायची. सगळे तिला डाक्टरीण बाई म्हणून चिडवायचे.

चिंगी हाताची घडी घालून ऐटीत म्हणायची,“हो, मी तर आहेच!”
     एके दिवशी एक हत्तीचे पिल्लू त्यांच्या शेतात घुसले. कदाचित ते त्यांच्या झुंडीतून चुकले असावे. त्यामुळे तो घाबरला असावा. त्याने क्रोधाने संपूर्ण शेताचीच नासधूस चालवली होती. मोठ्या मुश्किलीने लोकांनी त्याला काबूत आणून एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला बांधून घातले. चिंगीनेच सर्वात अगोदर हत्तीच्या पिलाच्या एका पायाला जखम झाल्याचे पाहिले. तिथून रक्त येत होतं.तिने लगेच जखमेवर औषध लावून मलमपट्टी केली.
आजोबा म्हणाले, “ शाबास पोरी! तू तर कमालच केलीस! या जखमेमुळेच तो एवढा हिंसक बनला होता.”
चिंगीने त्याचे नाव काळू ठेवले. चिंगी आणि काळू दोस्त बनले. ती त्याला ऊस,केळी, हिरवा लुसलुशीत चारा चारी.ती काळूच्या पाठीवर बसून जंगलाचा फेरफटका मारी. उंच फांद्यावर लगडलेली फळं,फुलं तोडी.
आता काळू पूर्ण बरा झाला होता. एके दिवशी आजोबा म्हणाले,“ काळूला आता परत पाठवायला हवं.”
चिंगी रडू लागली. तिने काळूला मिठी मारली आणि म्हणाली,“ मी काळूला कुठे जाऊ देणार नाही. हा माझा मित्र आहे.”
आई तिला समजावण्याच्या सुरात म्हणाली,“चिंगी बाळ! काळूलादेखील त्याच्या आईची आणि घरच्यांची आठवण येत असणार ना?”
चिंगी तयार झाली आणि वडिलांबरोबर त्याला सोडायला जंगलातही गेली.
दोन वर्षे उलटली. एके दिवशी चिंगीने पाहिले की, गावकरी कशाच्या तरी काळजीत आहेत. तिने आईला विचारले,“ आई!काय गं, इथे एवढी गर्दी का?”
आई म्हणाली, “ एका वाघाने काल रुपाकाकूंची म्हैस नेली.”
चिंगी म्हणाली,“ बिचारी काकू! तिची तर एकच म्हैस होती.”
तेवढ्यात शकिल चाचाने आपल्या बकर्या हरवल्याचे सांगितले.काही वेळ विचार केल्यावर चिंगीचे आजोबा म्हणाले, “ तीन दिवसांनी आपल्या कुलस्वामिनीची यात्रा आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करू. राहिली गोष्ट वाघाची, मी आजच वनाधिकार्यांना भेटतो आणि त्याचा बंदोबस्त करायला सांगतो. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपापल्या घरासमोर होळी पेटवा आणि सावध राहा.”
आता लहान मुलांना एकट्याने बाहेर पडायला आणि खेळायला पायबंद घालण्यात आला. एकाद्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर लोक हातात काठ्या, कंदिल घेऊन एकत्रितरित्या जाऊ लागले.
गावातल्या कुलस्वामीनी देवीच्या यात्रेची तयारी जोरात सुरू झाली होती. चिंगीसुद्धा मोठ्या उत्साहात त्यात सहभाग घेत होती. गेल्यावेळेला तिने ज्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा विणल्या होत्या, त्या देवीच्या अंगावर छान सजल्या होत्या.त्यामुळे तिचे कौतुकही झाले होते.पण या खेपेला आई तिला एकटीला जंगलात सोडणार नव्हती.
चिंगीने मात्र मनोमन जंगलात जायचेच, असा पक्का निश्चय केला होता. देवीच्या पूजेच्या एक दिवस अगोदर ती तिच्या कोकरासह सकाळी सकाळीच कुणालाही न सांगता जंगलाच्या दिशेने निघाली.
तर्हेतर्हेचा फुलांचा सुवास आणि निसर्ग सौंदर्यात ती हरवून गेली. तिला आपण किती धोक्यात आहोत,याचा अजिबात विसर पडला. अचानक पक्ष्यांच्या चिवचिवाटाने वातावरणात तणाव निर्माण झाला. ती लगेच सावध झाली. तिला वातावरणात वाघाचा गंध जाणवला. ती दक्ष झाली. आजूबाजूला असलेल्या झाडींमध्ये सावधपणे निरखू लागली.
     चिंगीने कोकराला उचलून आपल्या कवेत घेतले आणि फुलांची टोपली उचलून हळूहळू गावाच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात वाघ भयंकर अशी डरकाळी मारत तिच्या अंगावर झेपावला. अगोदरच सावध असलेली चिंगी विजेसारखी चपळाईने बाजूला झाली आणि त्याचा वार चुकला. पण तिच्या हातून फुलांची टोपली खाली पडली. शेळीचे पिल्लूदेखील लांब उडून पडले. आता वाघ आपल्या तीक्ष्ण नजरेने कोकराकडे पाहू लागला. आणि अचानक झाडींमधून काळू हत्ती बाहेर आला. झटक्यात तो वाघाच्या आणि चिंगीच्या मधे येऊन उभा राहिला. आता तो वाघाला पाहून, सोंड वर करून आणि मागे-पुढे होत वाघाला आव्हान देऊ लागला. वाघाने या खेपेला काळूवर झडप घालत आपली तीक्ष्ण नखे त्याच्या शरीरात रुतवली. वेदनेने व्याकूळ झालेल्या काळूने आपल्या सोंडेने वाघाला उचलून दूर फेकून दिले.
आता वाघालादेखील जखम झाली. त्याने आपला जीव वाचवण्यातच शहाणपणा आहे, हे ओळखले. आणि शेवटेचे काळूकडे रागाने पाहात आणि डरकाळी फोडत झाडी-झुडपांमध्ये दिसेनासा झाला.
चिंगी अगदी आनंदाने ओरडली, “काळू, माझ्या दोस्ता! तू आज कमालच केलीस. माझा जीव वाचवलास.”तिने आनंदाने त्याला मिठी मारली. 
     इकडे चिंगी कुठे गेली म्हणून गावाभर शोधाशोध सुरू होती. ते जंगलाच्या दिशेनेच येत होते. तेवढ्यात वाघाची डरकाळी आणि हत्तीचा चित्कार ऐकून धावतच घटनास्थळी धावले. चिंगीला काळूसोबत सुरक्षित पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सगळ्यांनी चिंगीच्या धाडसाचे कौतुक केले. तिचे आजोबा म्हणाले,“ चिंगी, तू तर आमची मान अभिमानाने उंचावलीस.”
सगळे काळूलाही घेऊन गावात आले.काळूच्या जखमांवर चिंगीने झाडपाल्यांचे औषध लावले. सगळ्यांनी काळूला भरपेट केळी,ऊस इत्यादी खायला घातले. काही वेळाने काळू पुन्हा परत जंगलात निघून गेला.
दुसर्यादिवशी लोक मोठ्या उत्साहात देवीच्या यात्रेत सहभागी झाले. चिंगीने जंगलातून आणलेल्या फुलांच्या छान माळा बनवल्या.त्या देवीला अर्पण केल्या.
     तेवढ्यात त्यांना एक आनंदाची वार्ता ऐकायला मिळाली. वन विभागाच्या कर्मचार्यांनी वाघाला पकडून त्याची वन्य जीव संरक्षण केंद्राकडे रवानगी केली होती. आता चिंगी आणि गावकर्यांचे जीवन निसर्गाच्या सानिध्यात अगदी आनंदात जाऊ लागले. चिंगी आता रोज फळं-फुलं तोडण्यासाठी जंगलात जाते. काळू तिला रोज जंगलात भेटतो. त्याच्याशी मनसोक्त खेळते. सगळे म्हणतात, मैत्री असावी तर चिंगी आणि काळूसारखी!

Wednesday, May 30, 2018

अपयशाला हसत-खेळत सामोरे जा


     शाळा-कॉलेजच्या परीक्षेपेक्षा जीवनाची परीक्षा महत्त्वाची आहे. शाळांच्या परीक्षांमध्ये मिळालेले यशापयश माणसाला आयुष्यात येणार्या अडचणींसाठी तयार करते. परीक्षा असो किंवा स्पर्धा, त्यात नेहमी एक संदेश लपलेला असतो, जो समजून घेण्याची आवश्यकता आहे. यश उत्साह वाढवते,तर अपयश नैराश्य किंवा तणावाचे कारण बनते. कधी कधी हे नैराश्य तरुणांना किंवा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारणही ठरते.

     कधी परीक्षेत यश किंवा कधी चांगले गुण मिळाले म्हणून आनंदी होतो,पण पुढचा प्रवास पाहून आजचा तरुण निराश होतो.उपभोगवादामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याची जीवनशैलीच आज संपुष्टात आली आहे. आता खरे तर प्रत्येक माणसाला प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त यशच हवं आहे आणि हे निसर्ग आणि जीवनाच्या द्वंद्वात्मकेच्या विरुद्ध आहे. यश-अपयश, जय-पराजय, स्वीकार- अस्वीकार यांमधून फक्त यश, जय किंवा स्वीकार यांचीच तळी उचलून धरणे म्हणजे आयुष्याला एकांगी बनवण्यासारखं आहे. ज्या लहान वयात आपण निष्पाप, मस्तमौला आणि बेफिकिर मानत होतो, ते आज कुठे तरी हरवल्यासारखे वाटत आहे. तरुणांच्या आत्महत्यांच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे सामाजिक पलायन आणि अस्वीकारतेची भावना.  आज कुणालाही कामासाठी नाही असे ऐकून घेणे सहन होत नाही.  अशा परिस्थितीत असहिष्णुता आणि हिंसाचार यामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि हे फार धोकादायक आहे.
     राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड ब्यूरोनुसार 2013 मध्ये भारतात दहा ते चौदा वर्षांच्या 3 हजार 594 मुलांनी आत्महत्या केली होती आणि 2014 मध्ये चौदापेक्षा कमी वयाच्या 1700 मुलांनी आणि 14 ते 18 वर्षे वयाच्या 9 हजार 230 मुलांनी आत्महत्या केली होती. यासाठी नैराश्य, अस्वीकार, विफलता, अमानवीय/ अपमानजनक व्यवहार, उपेक्षा या गोष्टींना कारणीभूत मानले गेले. वास्तविक या वयात आत्महत्या करण्याची खास कारणे दिसून येत नाहीत. नोकरी न लागण्याची काळजी, असुरक्षिततेची भावना अशा काहीच गोष्टी नसताना ही मुले स्वत:ला आत्महत्येकडे का ढकलत आहेत? याला परिसरातला समाज कारणीभूत आहे. या समाजाकडे सर्वसमावेशक विकासाचा काहीच आराखडा नाही. दिशा नाही. शिस्तही नाही.  आज आपण एक अशा समाजाच्या दिशेने ओढले जात आहोत, जिथे स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर लक्षकेंद्रित केले जात आहेच,पण मुलांच्या स्मार्टनेसकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. मुलांना आपल्या वयाच्या हिशोबाने वाढायला संधी देणं, महत्त्वाचं आहे. पण तसे होताना दिसत नाही.
     यशापयशापेक्षा महत्त्वाचे आहे, ते म्हणजे त्यासाठी केलेला संघर्ष. कुठल्या तरी  एका परीक्षेचे यश जीवनाच्या यशाची गॅरंटी देत तर नाहीच पण त्या एका अपयशाने सर्व काही संपले, असेही होत नाही. यशापयश जीवनाच्या प्रवासातील थांबे आहेत, ध्येय नव्हे. भगवद्गीता सांगते, जीवनाची सार्थकता कर्म करण्यात आहे. मग परिणाम काहीही असो. त्यामुळे फळ अर्थात परिणामाला मा फलेषु कदाचन म्हणून त्याकडे लक्ष द्यायचे नाही, असे सांगते. मेरी जंग हा एक हिंदी चित्रपट येऊन गेला. त्यातल्या एका गाण्याची ओळ आहे, जिंदगी हर कदम एक नई जंग आहे. एक परीक्षा संपते नाही तोच दुसरी परीक्षा सुरू होते. जीवनातदेखील नित्य नवी आव्हाने येत असतात, अशा परिस्थितीत कुठल्या एका यशापयशावर किंवा जय-पराजयवर थांबणे किंवा खूश होणे अथवा दु:खात डुंबून जाणे हा काही जीवनाचा नियम नाही. जीवन न थांबता पुढे जाण्याचे एक नाव आहे.
     माणसाच्या यशाचे मूल्यांकन करताना नेहमी एक गोष्ट आपण विसरून जातो, ती म्हणजे यश मिळवण्याची धडपड करताना कितीदा आपण अपयशी राहिलो. खरे तर अपयशाशिवाय किंवा त्याला तोंड दिल्याशिवाय यश प्राप्त करणं कठीण आहे. संघर्षाशिवाय यश मिळणे म्हणजे ते यश नक्कीच नाही.   अशी किती तरी उदाहरणे आहेत, ज्यामध्ये अपयशानंतर माणसाने यश प्राप्त केले आहे. म्हणूनच त्या अपयशाला यशाची सिडी म्हटली जाते. आपण त्याला कसे घेतो, यावरही सारे अवलंबून आहे. प्रत्येक अपयश किंवा पराभव आपल्याला काही ना काही शिकवते. अपयशाच्या मार्गात मिळणारी शिकवण, जो समजून घेतो आणि मार्गक्रमण करतो, तोच यश मिळवू शकतो. यशासाठी लक्ष्य आणि योजना जितकी महत्त्वाची आहे, तितकीच गरज आहे ती अपयशाचा सामना करण्याच्या सामर्थ्यामध्ये!. ज्या दिवशी आपण निश्चित करतो की, आपल्याला यश मिळवायचे आहे, त्याच दिवशी आपल्याला अपयशाचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करायला हवे आहे. कारण अपयश हेच ती कसोटी आहे, ज्यावर आपल्याला पारखले जाते. म्हणजे तुम्ही यशाच्या योग्यतेचे आहात की नाही, हे त्यातून समजून येते.
     जर तुमच्यात दृढ इच्छाशक्ती असेल आणि अपयशाचा सामना करण्याचे सामर्थ्य असेल तर मग तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कुणीच रोखू शकत नाही. इंग्रजीमधल्या एका म्हणीनुसार, स्ट्रगल एंड शाइन मधून नेहमी अडचणीतून प्रेरणा घ्यायला हवी.  अर्थात प्रत्येक वेळेला तुम्हाला यश  मिळायला हवे, असे काही नाही. जीवनात मिळणारा पराभव आणि आव्हानांदरम्यान विचलित न होता, संघर्षावर कायम राहिलात तर नक्कीच तुमचा  यशावर अधिकार राहणार आहे. विज्ञानदेखील सांगतो की, जर एकादा अणू फुटला तर तो पुन्हा आपल्या पूर्व स्थितीला येतो , तेव्हा तो पहिल्यापेक्षा मजबूत होतो. अशा प्रकारे आपण एकाद्या अडचणीतून किंवा आव्हानातून बाहेर पडतो तेव्हा आपण पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेलो असतो.तावून-सुलाखून निघतो.
     पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रवृत्तीमुळे आज मुलांकडून  त्यांचे बालपण हिरावून घेतले जाऊ लागले आहे. वास्तविक वयाच्या प्रत्येक थांब्याचे एक महत्त्व आहे. आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना सर्वोच्च अंक मिळवताना पाहायचं आहे. डॉक्टर, इंजिनिअर आणि आयएएस, आयपीएस बनवण्याच्या इच्छेमुळे मुलांची आवड, क्षमता, स्वाभाविकपणा आणि सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुलांच्या मनातले वाचणारा कोणी नाही. त्यांच्याकडून आई-वडिलांच्या हो ला हो म्हणणार्या एका रोबोट बालकाची अपेक्षा केली जात आहे. हेच खरे तर सर्व मुलांच्या नैराश्याचे कारण आहे. सरकार, समाज, कुटुंब, शेजारी आणि शाळेचे एक दायित्व आहे, त्यांनी मुलांच्या आजूबाजूला सामूहिकता आणि भावनात्मकता यांचे कवच बनायला हवे. त्यांच्या मनातील बैचेनी आणि अतृप्तता दूर करायला हवी.  आज स्पर्धेच्या युगात मुले वेळेअगोदरच प्रौढ होऊ लागले आहेत. हे युग असे आहे की, ज्यात स्वत:च्या आवश्यकतेच्या पूर्तीमध्ये दुसर्यांना सामावून घेण्याची वृत्ती विलुप्त होत चालली आहे. आज मुलांचा निष्पापपणा आणि भावूकपणा कसल्याही परिस्थितीत जोपासायला हवा. यशापयश समान रुपाने स्वीकारले पाहिजे, अशा पद्धतीने मुलांना तयार केले गेले पाहिजे. त्यांच्याकडून त्यांच्या क्षमता आणि योग्यतेपेक्षा अधिक अपेक्षा करणे गैरवाजवी आहे. त्यांच्यात निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास करायला हवा.
     मुलांबरोबरच मोठ्यांनीही समजून घ्यायला हवे की, यशाच्या मार्गात येणारे अपयश हे  अडथळे नाहीत तर ते आपल्याला शिकवणारे पाठ आहे. अपयश आपल्याला फक्त  एवढेच सांगत नाही, तर यश मिळवण्याच्या प्रयत्नात काही चुका अथवा काही कमतरता राहिली आहे, ती सुधारण्याची आवश्यकता आहे, हेही सांगते. ज्या वेळेला एकादी व्यक्ती जीवनात  पराभवाचा सामना करते, त्यावेळेला त्याच्याजवळ दोन मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे जीवनात मिळणार्या अपयशाने निराश होणे आणि आपल्या नशिबाला बोल लावणे. दुसरा मार्ग आहे, जीवनात मिळणार्या अपयशाचा स्वीकार करणे आणि त्यातून धडा शिकणे. पराभव झाल्यानंतरही कोणता मार्ग निवडायचा, ते तुम्हाला निश्चित करायचे आहे. जीवनात अपयश मिळाले म्हणून घाबरून जाण्यापेक्षा खंबीरपणे पुन्हा उभे राहणे आणि येणार्या संकटाचा सामना करणे. आणि आपण कुठे चुकलो, आणि कोणत्या कारणामुळे चुकलो, याचा विचार करणे.यातून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो.

शाळा आणि शौचालये


     साधारण 2011 पासून राज्यात सर्व शिक्षा अभियान राबवले गेले. यातून शाळांच्या भौतिक सुविधांचा मोठा प्रश्न सोडवण्यात राज्याला यश आले आहे. पण तरीही काही प्रश्न उरतोच. कारण 2017-18 च्या यू-डायसमधील आकडेवारीनुसार राज्यातल्या अनेक शाळांना शौचालये नाहीत. मोठ्या प्रमाणात ही शौचालये वापरली जात नाहीत. याशिवाय अजूनही अनेक शाळांना संरक्षक भिंती नाहीत.इतकेच नव्हे तर वर्गखोल्या, मुख्याध्यापकांच्या खोल्या, पिण्याचे पाणी, स्वयंपाकगृहे, क्रीडांगण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प अशा किती तरी सुविधा नसल्याचेच निदर्शनास आले आहे.म्हणजे सर्व शिक्षा अभियान राबवूनही पूर्णपणे शाळांचे प्रश्न निकाली निघाले नाहीत, हे खरे! आता हे सर्व शिक्षा अभियान बंद करून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी समग्र शिक्षा अभियान राबवले जाणार आहे. 2018-19 पासून हे अभियान पूर्ण क्षमतेने राबवले जाणार आहे. आता या माध्यमातून तरी उरलेल्या शाळांच्या भौतिक सुविधा साकारल्या जातील का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

     17-18 च्या यू-डायसमधील माहितीनुसार राज्यातील एक लाख 10 हजार 315 शाळांपैकी तीन हजार 348 शाळांमध्ये मुलांची आणि दोन हजार 18 शाळांमध्ये मुलींची शौचालये उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. याशिवाय असलेल्या शौचालयांपैकी तब्बल सात हजार 60 शाळांमधील शौचालये वापराविना पडून आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे तीन हजार 653 शाळांमध्ये मुतारी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अलिकडे दिव्यांगासाठी मोठी पावले सरकारकडून उचलली जात आहेत. मात्र यू-डायसच्या माहितीनुसार 28 हजार 680 शाळांमध्ये दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत. आणि अशा शाळांची संख्या खास करून  बीड आणि नांदेड जिल्ह्यात आहेत. तर वापरात नसलेल्या शाळा या नगर, जालना,पुणे,नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. 18 हजार 123 शाळांना संरक्षक भिंती नाहीत. हे वास्तव नक्कीच आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांची कळा सांगणारे आहे.
     शौचालयांचा आणि त्यांच्या वापरांचा प्रश्न मोठा काळजीचा आणि गंभीर आहे. सरकारने यासाठी एवढा पैसा ओतायचा आणि ती शौचालये बांधायची मात्र त्यांचा वापर नाही. मग ज्या हेतूने शौचालयांची उभारणी करण्यात आला, तो साध्य झाला म्हणायचा का? एवढे करूनही मुलांना शाळेबाहेर, ओढ्याच्या काठाला आणि खास करून मुलींसाठी झुडुपांचा आधार घ्यावा लागत असेल आणि त्यांच्यावर दुष्कर्म केले जात असेल आणि त्यांना किड्या-मुंग्याच्या, सर्पदंश अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असेल तर या सर्व शिक्षा अभियान आणि आताच्या समग्र अभियानाचा उपयोग काय? आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान याला ज्या तर्हेने महत्त्व दिले जात आहे,तितकेच दुर्लक्ष शाळांमधल्या शौचालय वापराकडे केले जात आहे. मुळात आजच्या घडीला राज्यातल्या जवळपास 80 टक्के शाळांमधल्या शौचालय आणि मुतार्या धोकादयक अवस्थेत आहेत. याला निकृष्ट दर्जाचे काम कारणीभूत आहे,तितकेच ते त्यांची देखभालकडे होत असलेल्या दुर्लक्षाचेही आहे.
     मुळात अनेक शाळांमध्ये कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था नाही. दुसरे म्हणजे त्यांची देखभाल करायला मनुष्यबळ नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सकाळी शाळा भरेपर्यंत शाळांची देखभाल व्यवस्था वार्यावरची आहे. या कालावधीत ज्यांना शाळांविषयी, गावाविषयी अस्मिता नाही, अशी माणसे शाळेत जाऊन शाळेची नासधूस करणे, शाळांमध्ये मद्यपान करणे, अनैतिक गोष्टी करणे याला असुरी प्राधान्य देतात. त्यामुळे शाळांसारख्या सार्वजनिक मालमत्ता या व्यवस्थित राहतील, याचा अजिबात भरवसा नाही. पहिलीपासून सुरू होणार्या राज्यातील शाळांमधून मुला-मुलींच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकासाची पायाभरणी केली जाते, असे म्हटले जाते. मात्र याच शाळांमध्ये शिकणार्या किंवा शिकून गेलेल्या लोकांना या शाळांविषयी अजिबात आस्था नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
     सरकारी शाळांमध्य शिपाई आणि क्लार्क देण्याची शिक्षकांच्या संघटनांची मागणी फार जुनी आहे. यामुळे शिक्षकांच्यावरचे अशैक्षणिक काम कमी होईल. त्यांना अध्यापनाला वाव मिळेल, शाळांचे संरक्षण होईल. पण जिथे शिक्षक भरती करण्यासाठी सरकार मागे सरत आहे, तिथे या नियुक्त्या कशा होतील? त्यामुळे शाळांची वासलात जशी लागायची, तशी लागत आहे. त्यामुळे शाळांवर कितीही पैसा खर्च केला तरी ते सत्कारणी लागतील, म्हणणे धाडसाचे ठरेल. वास्तविक शाळांच्या संरक्षणाची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था झाल्यास शाळा परिसरात झाडे, इतर म्हणजे क्रीडा साहित्य वगैरे सुरक्षित राहतील. तसे मनात आणले तर शाळांमध्ये मुलांच्या कष्टातून, त्यांच्या सहभागातून उत्पादित मालाची निर्मिती करून व त्याची विक्री करून शाळांना त्याचा उपयोग होईल, मुलांना स्वावलंनाचे महत्त्व लक्षात येईल. पण यासाठी विचार करण्याची मानसिकता कुठल्या लोकप्रतिनिधींकडे नाही. त्यामुळे शाळांची जी दुर्दशा होत आहे. ती फारच चिंताजनक आहे, यासाठी कोणी लक्ष देईल काय?

Sunday, May 27, 2018

(बालकथा) अंगठ्याएवढा नारू


     ही फार फार जुनी गोष्ट आहे. एक गरीब लाकूडतोड्या होता. एके दिवशी सकाळी घरासमोर तीन दगडांच्या चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापवत असताना पत्नीला म्हणाला, “ पोरंबाळं नसलेलं घर कसं सुनं सुनं वाटतं नाही का?किती बरं झालं असतं, आपल्यालाही एकादं लेकरू असतं तर...! ”
तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. अहो, मला अगदी अंगठ्याएवढा जरी मुलगा असता तरी मी त्याचा लाडाने सांभाळ केला असता. ” पत्नी म्हणाली.

शेवटी एक दिवस असा आला की, त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या घरी अगदी छोटासा म्हणजे अगदी अंगठ्याएवढ्याच मुलगा जन्माला आला. दोघांनाही फार आनंद झाला. त्यांनी त्याचे नाव नारायण ठेवले. लाडाने ते त्याला नारू म्हणू लागले. त्याचा सांभाळ ते उत्तमप्रकारे करू लागले,पण त्याची कदकाठी काही वाढली नाही. तो जेवढा होता, तेवढाच राहिला. तो थोड्या दिवसांतच तब्येतीने ठणठणीत झाला. तो खूप चतुर होता.
एके दिवशी लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघाला होता. तो पत्नीला म्हणाला, “ खरंच! आपल्या घरातदेखील असा मुलगा असायला हवा होता, जो मी तोडलेली लाकडे घेऊन घरी आला असता. ”
नारू त्यांचे बोलणे ऐकत होता. तो ओरडून म्हणाला, “बाबा, मी गाडी घेऊन येतो. तुम्ही लाकडे तोडून ठेवा. ”
अरे! पण तू गाडी कशी हाकणार? तुला घोड्यावर बसता तरी येईल का? ”
तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, बाबा! आई मला घोड्याच्या कानाजवळ बसवेल. मी घोड्याच्या कानात रस्ता सांगेन आणि तो मला जंगलात आणून सोडेल. ” नारू आनंदाने म्हणाला.
झालंही असंच. लाकूडतोड्या लाकडे तोडायला निघून गेला. दुपारच्यावेळी नारूला त्याच्या आईने घोड्याच्या कानाजवळ बसवले. तो गाडी घेऊन निघाला. घोडागाडी वेगाने धावत होती. रस्त्यात दोघा अनोळख्या माणसांनी ती घोडागाडी पाहिली. गाडीत सवारी नव्हती,गाडी मालक नव्हता, तरीही गाडी धावत होती. त्यांची पाचावर धारण बसली. त्यांना जादूटोणा, भूत-पिशाच्च आहे की काय, असे वाटू लागले. शेवटी त्यांनी धाडस करून गाडीचा पाठलाग करण्याचे ठरवले. ते मागे मागे धावू लागले. गाडी कुठे जाऊन थांबते,याची त्यांना भीतीयुक्त उत्सुकता होती.
गाडीच्या मागे मागे तेही जंगलात पोहचले. पुढचे दृश्य पाहून दोघेही चकीत झाले. अंगठ्याएवढा मुलगा घोड्याच्या कानाजवळून खाली उतरला. दोघे एकमेकांकडे पाहात म्हणाले, “ अरे, हा सुपारीएवढाही नाही, आणि इतका करामती? ”
आपण या करामती बुटक्याला विकत घेतले तर...? आपण त्याला शहरात घेऊन जाऊ आणि लोकांना याच्या करामती दाखवू. रग्गड पैसा मिळेल. ”
दोघेही लाकूडतोड्याजवळ गेले. त्याच्यापुढे तसा प्रस्ताव ठेवला. लाकूडतोड्या आपल्या जिगरच्या तुकड्याला विकायचा प्रश्नच नव्हता,पण नारूच वडिलांच्या अंगावर चढला आणि त्यांच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात पुटपुटला, “ बाबा, मला त्यांना विकून टाका. माझी अजिबात काळजी करू नका. मी पुन्हा लगेच माघारी येतो. ”
शेवटी नारूची गोष्ट ऐकून लाकूडतोड्याने त्यांना विकले. त्याच्या मोबदल्यात त्याला भरपूर अशी सोन्याची नाणी मिळाली. यामुळे त्यांचे दैन्य मिटणार होते. त्यातील एकाने नारूला आपल्या डोक्यावरच्या टोपीवर बसवले आणि शहराच्या दिशेने निघाले. टोपीवर बसलेला नारू  आजूबाजूची सगळी दृश्ये आरामात पाहात होता. त्याला खूप मजा येत होती. काही अंतर चालून गेल्यावर नारू म्हणाला, “ मला कंटाळा आलाय.खाली उतरवा. ”
तो खाली उतरला. पण लगेच तो एका उंदराच्या बिळात शिरला. दोघा अनोळखींची त्रेधातिरपीट उडाली. काय करावे काहीच उमजेना. दोघांनी बिळात हात घातला. बिळ तोडून टाकले,पण नारू काही त्यांच्या हाताला लागेना. तो बिळात आणखी आत आत जात राहिला. त्याला शोधण्यात त्यांचा खूप वेळ गेला. शेवटी अंधार पडू लागला. दोघांनी आशा सोडली आणि ते माघारी जाऊ लागले. दोघे गेल्याचे पाहून तो बाहेर आला. रस्त्याच्या कडेला शेत नांगरले होते. त्यातून जायला त्याला त्रास होऊ लागला. त्याने विचार केला, “ असा कोणी भेटेल का, जो मला घरापर्यंत पोहचवेल. ” तेवढ्यात त्याने दोघा माणसांना आपसात बोलताना पाहिले. ते दोघेही चोर होते आणि गावातल्या सावकाराच्या घरात चोरी करण्यासाठी उपाय शोधत होते. नारू त्यांना म्हणाला, “ तुम्ही मला सोबत घेऊन चला. मी तुमचे काम हलके करून टाकेन. खिडकीतून मी आत जाईन आणि आतल्या किंमती वस्तू बाहेर फेकेन. ”
चोरांना फार आनंद झाला. आता त्यांना विनासायास घर लुटता येणार होते.त्यातल्या एकाने त्याला आपल्या खांद्यावर घेतले. नारू खिडकीतून आत घुसला आणि जोराने ओरडला, “ अरे, काय काय फेकू? घरातले सगळे सामान खाली फेकू का? ”
नारूचा आवाज ऐकून घरातला नोकर जागा झाला. तो उठला तसा चोरांनी पोबारा केला.
आता नारूने विचार केला, “ थोडा आराम करू.मग सकाळी उठून घरी जायला निघू. ” बाजूलाच एक रजई पडली होती,त्यावर जाऊन तो झोपी गेला.
पहाटे नोकर लवकर उठला. त्याने बाजूला पडलेली रजई उचलली आणि खिडकीजवळ जाऊन झटकली. तसा नारू खाली जाऊन पडला. तो हळूच उठला. त्याने इकडे-तिकडे पाहिले. अजून अंधार होता. कसा तरी चाचपडत रस्त्यावर आला.तेवढ्यात त्याला लोभी लांडगा दिसला. नारू म्हणाला, “ मला तुझ्या पाठीवर बसवून घेऊन चल. मी तुला एका असा घरात घेऊन जातो,तिथे तुला खूप सारे पक्वान खायला मिळतील. ”
लांडगा लोभी होताच,तो नारूच्या बोलण्यावर भाळला. नारू त्याच्या पाठीवर बसला आणि थेट घरी घेऊन आला.  अजून त्याचे आई-बाबा झोपलेले होते. नारू आणि लांडग्याने भरपेट जेवण केले. नारूने जेवण झाल्यावर मोठ्याने ढेकर दिली. तसे त्याचे आई-बाबा उठले. बाबा आवाजाच्या दिशेने आले. पाहतात तर समोर लांडगा. त्यांची भितीने गाळण उडाली,पण त्यांनी धीर धरून कुर्हाड हातात घेतली. नारू टुणकन उडी मारून त्यांच्या अंगावर चढला आणि खांद्यावर जाऊन बसला. घाबरल्यासारखे करत बाबांना म्हणाला, “ बाबा,हा लांडगा मला खायला आलाय.”
कुर्हाड पाहून लांडगा घाबरला. आणि त्याने मागे पुढे न पाहता जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. आता नारू आपल्या आई-वडिलांसोबत आनंदात राहू लागला.

Friday, May 25, 2018

सुप्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे


     मी उद्योजक अशोक खाडे. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या पेडचा. मी आज दास ऑफशोअर या यशस्वी अशा पाचशे कोटी उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक आहे. आज माझ्या कंपनीत सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात. सव्वीस वर्षांपूर्वी दरमहा पंधरा हजार रुपये पगाराची नोकरी सोडून माझा स्वत:चा उद्योग सुरू केला. पण हे एवढे मोठे वैभव आज उभे राहिले असले तरी त्यावेळी माझ्या अंगी असलेल्या आत्मविश्वास,जिद्द आणि मेहनतीमुळे घडले आहे. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.

     मी लहान असतानाची आमची घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. वडील चांभार काम करायचे. आई शेतात राबायची. यामुळे मीदेखील शेतीची कामे शिकलो. शेतातील भांगलणीसारखी कामे, ऊसतोडणी ही कामे केली आहेत. पुढे तासगावच्या बोर्डिंगमध्ये राहून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर आत्यांकडे मुंबईला गेलो. तिथे दहा बाय दहाच्या खोलीत राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे माझगाव डॉकला 1975 मध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीला प्रारंभ केला. मात्र नोकरीत मन रमेना. शेवटी 1992 मध्ये दरमहा पंधरा हजार रुपये मिळणारी नोकरी सोडून दिली आणि स्वत:ची दास ऑफशोअर कंपनी स्थापन केली. आम्ही तिघे भावंडं आहोत प्रत्येकाच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) दास हे नाव कंपनीला दिले. यातील सुरेश खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या कंपनीचा विस्तार होत गेला असून आज इंजिनिअरिंग, डेअरी, ॅग्रो प्रॉडक्ट, रस्ते बांधणी, समुद्रातील कामे, उड्डाण पूल, बांधकाम अशा सात कंपन्यांचा समूह बनला आहे.
     स्वीडनच्या शालेय अभ्यासक्रमात माझ्याविषयीच्या धड्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. खरे तर युवकांना आणि खास करून लहान मुलांना माझे सांगणे आहे की, खूप मेहनत करा. जिद्द ठेवा, आयुष्यात यश हमखास मिळते. आपल्याला आवडणारे क्षेत्र निवडा. त्यामुळे मन लावून काम करता येईल आणि त्यात चांगली प्रगती साधता येईल. आज सरकारी नोकर्या कमी आहेत. त्यामुळे नोकरीच्या मागे न धावता उद्योजक व्हा. मात्र यासाठी कौशल्य आत्मसात करायला हवे.
     कोणावरही विसंबून राहून उद्योग करता येत नाही. ज्या विषयाचे ज्ञान आहे, तेच क्षेत्र निवडा म्हणजे फसवणूक होणार नाही. उद्योग सुरू करण्यापूर्वी त्याचा सांगोपांग अभ्यास करा. आपले प्रश्न घेऊन यशस्वी झालेल्या आणि उद्योगात अयशस्वी झालेल्या लोकांकडे जा. चर्चा करा. त्यांच्या यशापयाशाचे मर्म जाणून घ्या. शंकांचे निरसन करून घ्यायला लाजू नका आणि घाबरूही नका आणि मगच उद्योगाचा नारळ फोडा.
     उद्योजक म्हणून श्रीगणेशा केल्यावर मला पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. ते काम 1 कोटी 92 लाखांचे होते. यासाठी पैसे उभे करणे कठीण होते,पण माझा आणि माझ्या भावांचा समुद्रातील कामांचा प्रदीर्घ अनुभव कामाला आला. आमचा कामातील प्रामाणिकपणा पाहून बँकांनी आम्हाला अर्थसहाय्य केले. मग काय? आम्ही मागे वळून पाहिलेच नाही. ब्रिटिश गॅस, ओएनजीसी या कंपन्यांचे समुद्रातील प्रकल्पांची कामे केली. अबुधाबीचे राजे शेख महंमद बिन खलिफा यांच्याबरोबर आमची भागिदारी आहे. उद्योग जगतात आमचे आदर्श जमशेदजी टाटा आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
     आपला मराठी माणूस उद्योग करायला कचरतो. नोकरी करणे, आठवड्याच्या सुट्ट्या खाणे आणि आहे त्यात समाधान मानणे असे मर्यादित आयुष्य मराठी माणूस जगतो. भरारी मारण्यासाठीचे पंख आपणच छाटून घेतलेले असतात. पण आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर कष्ट करण्याची जबरदस्त तयारी असायला हवी आहे. सणवार,लग्न सोहळे,दिवाळी, श्रावण अशा कामांसाठी आपण हकनाक सुट्ट्या खर्च करीत असतो. बस किंवा रेल्वेतला प्रवास आपण झोपून किंवा गप्पा मारण्यात घालवतो. राजकारण,क्रिकेट, दुसर्यांविषयी कुचेष्टा करण्यात वेळ घालवत असतो. म्हणजे जवळपास आपण साठ ते सत्तर टक्के वेळ वाया घालवतो. हाच वेळ सत्कारणी लावला तर आपलाच फायदा होतो.
     कोणताही व्यवसाय,उद्योग करायचा असेल तर संयम, मेहनत, प्रामाणिकपणा, कौशल्य, नम्रता आणि नेतृत्व क्षमता महत्त्वाची आहे. यश मिळवायचे असेल तर घेतलेल्या कामावर तुटून पडायला हवे. आज नवनव्या संधी आहेत. त्या हेरता आल्या पाहिजेत. आज अनेक वडिलोपार्जित व्यवसाय मागे पडत आहेत,पण त्यांना नव्या तंत्रज्ञानाची, कौशल्याची जोड दिल्यास असे व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ शकतात. मॉल उभा करायला फार अक्कल लागत नाही,पण स्कील बिझनेस महत्त्वाचे आहे. उद्योगात यश मिळवण्यासाठी आणि मालाच्या पुरवठ्यासाठी सतत अभ्यास महत्त्वाचा आहे. ग्राहक वाचता आला पाहिजे. स्ट्रेन्थ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेटस या चार मुद्द्यांवर व्यवसाय,उद्योग आधारलेले आहेत. त्याचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. आपली बलस्थाने आणि कमजोरी आपल्याला ओळखता आली पाहिजेत. बाजारपेठांतील संधी आणि व्यवसायातील अडथळे यांचे सतत मूल्यमापन केले पाहिजे. अर्थात उद्योगधंद्यात सतर्कताही महत्त्वाची आहे.

Tuesday, May 22, 2018

विकासाच्या वाटेवरील आव्हाने


     अलिकडच्या काही दिवसांत जगभरातल्या आर्थिक संघटनांचे जे काही शोध आणि अभ्यासाचे अहवाल प्रकाशित होत आहेत, त्यावरून भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि दहा-बारा वर्षांत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल, असा निष्कर्ष काढला जात आहेत. पण याच अभ्यास अहवालांमध्ये हेही सांगितले जात आहे की, भारताला विकासाच्या वाटेवर दिसत असलेल्या काही आव्हानांनादेखील समर्थपणे तोंड द्यावे लागणार आहे.कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी रणनीती आखण्याची गरज आहे. विदेश व्यापार तूट कमी करावी लागेल. तर देशातल्या व्यवसायातील वातावरणामध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे. यात कुठलेही दुमत असायचे कारण नाही की,जग भारताच्या आर्थिक शक्यतांचा स्वीकार करत आहे. अलिकडेच 8 मे रोजी जगातल्या प्रसिद्ध लोवी इंस्टीट्यूट संघटनेद्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये आर्थिकसह अन्य विविध मुद्द्यांवर अशियाई क्षेत्रातल्या पन्नास देशांच्या यादीत भारताला चौथी सर्वात प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भारत भविष्यातील एक विशाल शक्ती असेल, असेही म्हटले आहे.

     अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपूर्वी आशियाई विकास बँकेनेदेखील म्हटले आहे की,चालू आर्थिक वर्षांत भारताचा सात टक्क्यांहून अधिक  अंदाजित आर्थिक वृद्धी दर आश्चर्यकारकरित्या  वेगाने वाढला आहे. जर असाच वेग कायम राहिला तर अर्थव्यवस्थेचा आकार पुढच्या दशकभरात दुप्पट होऊन जाईल. हार्वर्ड विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विकास केंद्रानेदेखील विकास रिपोर्ट 2018 मध्ये म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था एका दशकात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. भारताचा वृद्धी दर चीन आणि अमेरिकेपेक्षाही अधिक राहील.
     गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकमध्ये म्हटले गेले आहे की, भारत फ्रान्सला मागे टाकून जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपीच्या आकारमानाच्यादृष्टीने भारत 2.6 लाख कोटी डॉलर मूल्य असलेला देश आहे. या अहवालानुसार पाच अन्य मजबूत अर्थव्यवस्था असलेले देश,ज्यांची नावे भारताच्या अगोदर आहेत, त्यांची नावे आहेत अमेरिका, चीन,जपान, जर्मनी आणि ब्रिटेन. आयएमएफचे म्हणणे असे की, जर भारत आर्थिक सुधारणांची प्रक्रिया अशीच सध्याच्याप्रमाणे कायम राबवित राहिला तर 2030 पर्यंत तो जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.याच प्रमाणे विश्वविख्यात ब्रिटीश ब्रोकरेज कंपनी हाँगकाँग अॅन्ड शंघाय बँक कॉरपोरेशन (एचएसबीसी) नेदेखील आपल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, जरी 2016-17 मध्ये भारताच्या वृद्धीच्या मार्गात अडथळे आले होते, तरीदेखील आता भारतातील आर्थिक सुधारणांमुळे  मजबूत होत चालली अर्थव्यवस्था प्रभावीरित्या दिसून येईल आणि 2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.
     भारताच्या अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले गेले आहे की, देशातला जिल्हावार कृषी-उद्योगाचा विकास, पायाभूत साचेबंद पकड आणि मागणीनुसार गुंतवणूक निर्मितीमध्ये यथोचित वृद्धी करण्यासाठी रणनीती आखली गेल्यास 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान 5 हजार अब्ज डॉलरपर्यंत पोहचेल. सध्याचे आकारमान 2500 अब्ज डॉलर इतके आहे. यावरून जगभरातले अभ्यास अहवाल, शोध आगामी काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल आणि पुढच्या दशकभरात ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल, असे सांगत आहेत, हे स्पष्ट होत आहे.नि:संशय भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या गेलेल्या काही सकारात्मक बाजूदेखील स्पष्टपणे दिसत आहेत.आयएमएफचे म्हणणे असे की, 2018 मध्ये भारताचा विकास दर 7.4 टक्के राहील आणि 2019 मध्ये 7.8 टक्के होईल. चीनचा 2018 चा विकास दर 6.6 टक्के आणि 2019 मध्ये 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत भारत सर्वात वेगाने विकास दर वाढणारा देश असल्याचे चित्र दिसत आहे.
     भारताची निर्यात 2017-18 मध्ये लक्ष्यानुरुप 300 अब्ज डॉलरच्यावर पोहचली आहे. भारताचा शेअर बाजार, भारताची विदेशी मुद्रा आणि भारतीय रुपया यांची परिस्थिती चांगली आहे. जीडीपीतले प्रत्यक्ष कर योगदान वाढले आहे. अशा प्रकारे आर्थिक उदारीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला उजळून टाकण्यामध्ये इथल्या मध्यम वर्गियांचीही विशेष भूमिका राहिली आहे. देशाच्या विकास दराबरोबरच शहरीकरणाच्या वाढलेल्या दराच्या जोरावर भारताल्या मध्यम वर्गातील लोकांची आर्थिक ताकददेखील वेगाने वाढत आहे. हा वर्ग दीर्घ काळ देशातल्या अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक नफा यांचा स्त्रोत राहिला आहे.
     अर्थव्यवस्था उजळण्याच्या शक्यतांना साकार करण्यासाठी काही अव्हानांचा यशस्वीरित्या सामना करावा लागणार आहे. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला उंची देण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची महत्त्वाची भूमिका द्यायला हवी. मेक इन इंडिया योजना वेगवान करायला हवी. यामुळे भारतात आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या नव्या शक्यता आकाराला येऊ शकतील. मागे प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला प्रोत्साहन देऊन भारत चीन आणि पश्चिमी देशांना मागे टाकून जगातला एक नवा कारखाना बनू शकतो.
     वास्तविक सध्याच्या घडीला जगातल्या एकूण उत्पादनापैकी 18.6 टक्के उत्पादन एकटा चीन करत आहे. पण काही वर्षांपासून चीनमध्ये आलेली मरगळ, युवा क्रियाशील लोकसंख्येतील घट आणि वाढते मेहनत खर्च आदी कारणांमुळे चीनमध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये अडचणी वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत उत्पादनातील गुणवत्तेच्याबाबतीतही चीनच्या पुढे चाललेल्या भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पुढे जाण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.प्रसिद्ध वैश्विक शोध संघटन स्टॅटिस्टा आणि डालिया रिसर्चद्वारा मेड इन कंट्री इंडेक्स 2016 मध्ये गुणवत्तेच्याबाबतीत मेड इन इंडिया, मेड इन चायनापेक्षा पुढे आहे. फक्त देशातील मेक इन इंडियाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य प्रशिक्षित युवकांची कमतरता पूर्ण करणे एवढेच नव्हे तर जगातल्या बाजारातील भारताच्या प्रशिक्षित युवकांची मागणी पूर्ण करण्यासाठीदेखील कौशल्य प्रशिक्षण रणनीती आखावी लागेल. कौशल्य प्रशिक्षित युवकांची मागणी जगभरात आहे. ही गरज भारत पूर्ण करू शकतो. कारण भारतात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आहे. या उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे. मुळात आपल्या देशातच कौशल्य प्रशिक्षित युवकांची वानवा आहे. ही दरी कमी करायला हवी. भारतात फक्त वीस टक्के लोकच कौशल्य प्रशिक्षित आहेत. चीनमध्ये हीच संख्या 91 टक्के आहे.
     सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत,त्याचा आपल्या विकास दराला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे तेल किंमती कमी करण्यासाठी भारताने चीनला सोबत घेऊन तेल उत्पादक देशांवर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तेलावर अवलंबून असणारे उद्योग-व्यवसाय कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानांचा स्वीकार करायला हवा. त्याला चालना द्यायला हवी. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीकडे अधिक लक्ष देण्याबरोबरच त्यासाठी लागणार्या वस्तूंची निर्मितीदेखील आणि त्यांवरील संशोधन याकडे लक्ष द्यायला हवे. सौर,पवन,जल विद्युत संयंत्रांचा वापर सर्वच क्षेत्रात वाढायला हवा. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे वाढणार्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतील. वीज आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील कर कमी करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्याचबरोबर सार्वजनिक परिवहन सुविधा लोकांच्या हिताची कशी होईल, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

Monday, May 21, 2018

पावसाचे मित्र


पाऊस! हे नाव ऐकताच तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.तुमच्यामध्ये एक नवा उत्साह येतो. कुठे त्या बंद बाथरुममध्ये आंघोळ करणं आणि कुठे मोकळ्या आभाळाखाली, नैसर्गिक शॉवरखाली आंघोळ करणं आणि बागडणं. फक्त विचार केला तरी मन पावसाशिवाय चिंब भिजायला लागतं. पाऊस म्हणजे फक्त  आकाशातून पाणी बरसणं नव्हे! पाऊस म्हणजे एक जीवन आहे. तो या पृथ्वीवरील जीव-जंतू,प्राणी-वनस्पती आणि मानवाला जीवन देतो. त्यामुळे सगळेच त्याची आतुरतेने वाट पाहात असतात. चला तर मग, आज आपण पाऊस आणि त्याचे काही मित्र यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊ.


पाऊस आणि पर्वत 
पहाड-पर्वत,डोंगर-दरे फिरायला तुमच्यातल्या काही जणांना फार फार मज्जा येत असणार, नाही का? पण तुम्हाला माहीत आहे का की, पावसालादेखील हे डोंगर, हे पर्वत फार फार आवडतात.खरं तर पाऊस पाडायला पर्वत-पहाडांचा फार मोठा हातभार लागतो.त्याचं होतं  असं की, बाष्पाने भरलेल्या वाऱ्याच्या मार्गावर जेव्हा पर्वत आडवे येतात,तेव्हा त्यांना ओलांडून पुढे जाण्यासाठी वाऱ्याला आणखी उंच वर जावे लागते.त्यामुळे हवा प्रसरण पावते. असे झाल्याने पर्वतांवर जमा झालेला बर्फ आणि त्याचा गारवा यामुळे त्यांच्यातील उष्णता कमी होते.हवा थंड झाल्यावर हवेत असलेला बाष्प थेंबाच्या रूपाने खाली जमिनीवर बरसायला लागतो.


पाऊस आणि शेतकरी 
तुम्हाला माहीत असेल, आजदेखील आपला देश कृषीप्रधान आहे. 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोक खेड्यात राहतात.शेती आणि शेतीनिगडीत व्यवसाय करतात. शेतीसाठी पाण्याची गरज असते.ही गरज नद्या पूर्ण करतात. पण आपल्या देशात सगळीकडे काही नद्यांचे खोरे नाहीत. आपल्या देशातला बहुतांश प्रदेश हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नदी अडवून धरणे बांधण्यात आली आहेत. काही ठिकाणी भूगर्भातल्या पाण्याचा वापर केला जात आहे.विहिरी,विंधन विहिरी,तलाव यांच्यामार्फत शेतीसाठी पाण्याची गरज भागवली जाते.पण ही सिंचन यंत्रणादेखील सर्वत्र आहे, असे नाही. आजही फार मोठा प्रदेश कोरडवाहू आहे.आणि इथे पावसाशिवाय शेती करणे अशक्य आहे. पाऊस पडल्याशिवाय विहिरी,तलाव,विंधन विहिरी यांनादेखील पाणी येत नाही. म्हणूनच शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात असतो.

पाऊस आणि बेडूक 
पाऊस पडून झाल्यावर तुम्ही कधी पार्कमध्ये किंवा तलावाकाठी गेला आहात का? गेला असाल तर तिथे तुम्हाला डरांव डरांव असा कोलाहल ऐकायला आला असेल.हा कोलाहल बेडकांचा असतो. यांना पावसाच्या पाण्यामुळे एक प्रकारचे नवे जीवन मिळालेले असते. वास्तविक,बेडूक मुख्यत्वे करून पाण्याचा निवासी आहे. शहरीकरण वाढले तसे त्यांची घरे असलेल्या नद्या,तलाव आपण हिरावून घेतले आहेत. अशी कुठे जागाच आपण ठेवली नाही,जिथे हे राहू शकतील. असे असले तरी ते आपल्याजवळ राहायला उतावीळ असतात. जरा जरी थोडे फार पाणी साचलेले तरी ते त्यांना पुरेसे आहे. ते लगेच तिथे राहायला जातात. आपलं घर बनवतात. पण ज्यावेळेला पाऊस दया करत त्याच्यावर बरसतो,तेव्हा ते अगदी आनंदाने 'डरांव... डरांव' करत पावसाला धन्यवाद देतात.

पाऊस आणि मोर

मोर एक असा पक्षी आहे,ज्याला पावसाची प्रतीक्षा सर्वाँपेक्षा अधिक असते.पावसाचे ढग पाहिल्यावर सर्वात अगोदर आनंद होतो मोराला! ते पाहूनच तो नाचायला लागतो.त्याला नाचताना पाहून लोक ओळखतात की, आता पावसाळा दूर नाही.पावसाच्या वेळी मोर नाचतो त्याला आणखी एक कारण आहे. खरे तर ढगांना पाहून मोर तिच्या लांडोरला आकर्षित करण्यासाठी नाचू लागतो. मोराला मोठे पंख असतात. ज्यावेळेस तो पंख पसरून नाचतो,त्यावेळेस एक अद्भूत असं दृश्य तयार होतं.त्याच्या पंखांवर जे रंग आहेत,त्यावर पावसाचे थेंब पडतात,तेव्हा ते आणखी चमकदार होतात. लांडोर ते पाहून खूप आनंदी होते.

पाऊस आणि वर्षावने
पावसामुळे वर्षावने हिरवीगार डवरतात. त्यांना जगाला  'ऑक्सिजनचे सप्लायर' म्हटले जाते.पण या वनांमधल्या झाडांना फ़ुलं-फळं लगडतात.त्यासाठी पाण्याची गरज असते.ती पावसामुळे मिळते.धुवाँधार पाऊस वनांमधल्या झाडांना  वर्षभर हिरवंगार ठेवण्याचे काम करतो. हीच वने पावसाला रिटर्न गिफ्टच्या रूपाने जगाला ऑक्सिजनचे भांडार पुरवतात.

पाऊस आणि ओरांगउटान

ओरांगउटान हा माकड प्रजातीतील एक विशाल प्राणी आहे.ज्यावेळेस पाऊस पडतो,त्यावेळेस तो नखरा दाखवत कुठे गुहेत किंवा आणखी कुठे सुरक्षित आश्रयाला न जाता तो आहे त्या ठिकाणी थांबतो. त्याला पावसात भिजायला आवडतं,पण पाणी मात्र त्याला डोक्यावर पडलेलं आवडत नाही. त्यामुळे तो पाऊस येणार आहे म्हटल्यावर पानांची टोपी बनवून घेतो. मग तो अगदी कुठेही असला तरी पावसाचा आनंद घेतो.

पाऊस आणि हिप्पो 
मूळचा आफ्रिकेतला निवासी असलेला हिप्पो म्हणजेच पाणघोडा कदाचित तुम्ही प्राणी संग्रहालयात वगैरे पाहिला असेल.त्यांना वाटलं तर ते कधीच पाण्याबाहेर यायचे नाव घेत नाहीत. वास्तविक, त्यांच्या शरीरावर चरबीची थप्पी असते. त्यामुळे त्याला उकाड्याचा फार त्रास होतो.त्याचे पावसावर फार प्रेम असते. बरसणाऱ्या पावसाळ्यात हिप्पो नदी, सरोवरे सोडून बाहेर पडतात.कारण त्यांना पावसाचे स्वच्छ पाणी फार आवडते.

पाऊस आणि खार 

खार सर्वांनाच आवडते. ती एवढीशीच असते,पण तिच्यापेक्षा तिची झुपकेदार शेपटीच आपल्याला अधिक नजरेत भरते.पावसाशी तिचे काही कुठे शत्रुत्व वगैरे नाही.पण तिला पावसाचे पाणी तिच्या सुंदर शरीरावर पडलेलं आणि ते भिजलेलं अजिबात आवडत नाही.शरीर पावसाने भिजू नये म्हणून ती आपल्या भल्या मोठ्या  शेपटीचा छत्रीसारखा उपयोग करून घेते. ती शेपटी आपल्या अंगावर ओढून घेते.यामुळे पावसाच्या पाण्यामुळे तिची शेपटी भिजते,पण तिचे अंग मात्र भिजत नाही.ते कोरडेच राहते.

पाऊस आणि आसामी गेंडा
आसामनिवासी गेंडा ब्रम्हपुत्रा नदीच्या काठावर राहतो. नदीशी त्याचे जुने नाते आहे. आणि ज्याचे नाते नदीशी आहे,म्हटल्यावर तो बरं पावसाला घाबरेल? पाऊस त्याच्यासाठी मित्रासारखा आहे.  कांजीरंगा वनक्षेत्र पावसाच्या दिवसांत पाण्याने भरून जाते.या वनांमध्ये गेंडे पावसाच्या पाण्याशी खेळताना तुम्हाला दिसतील.खरे तर त्यांच्या शरीरावर इतकी जाड कातडी असते की,पावसाचे पाणी त्याच्या शरीराला फार थंड करू शकत नाही.त्यामुळे ते पावसात आजारी पडत नाहीत.