Sunday, May 20, 2018

मानवाच्या निष्काळजीपणामुळे प्राणी-प्रजातींवर अस्तित्वाचे संकट


      ज्या प्रकारे आज संपूर्ण जग वैश्‍विक प्रदूषणाशी सामना करत आहे आणि कृषी क्षेत्रात उत्पादनाचे संकट वाढत आहे,त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास जैव विविधतेचे महत्त्व वाढत चालले आहे. या गोष्टी लक्षात घेतल्यास आपल्याला जिथे जैव कृषी संरक्षणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे,तिथे या प्रदूषण, मानवाचा हस्तक्षेपामुळे ज्या काही जीव प्रजातींवर संकटे आली आहेत, जी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांच्याही संरक्षणाची आज गरज आहे. कारण आज जवळपास 50 पेक्षा अधिक जीव प्रजाती रोज लुप्त होत आहेत. हा भारतासह संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय आहे. कदाचित यासाठीच  नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधपत्राने पृथ्वीवरील जैविक विनाशाच्याबाबतीत भयावह असा इशारा देण्यात आला आहे.

     जवळपास साडेचार अब्ज वर्षांपूर्वीच्या या पृथ्वीने आतापर्यंत पाच महाविनाश पाहिले आहेत. या दरम्यान लाखो जीव-जंतू आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्या. पाचव्या महासंहारात डायनासोरसारख्या महाकाय प्राण्यांचादेखील शेवट झाला. या शोधपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, आता पृथ्वीने सहाव्या महाविनाशाच्या मुखात प्रवेश केला आहे. याचा अंत भयावह असणार आहे, कारण आता पृथ्वीवरच्या चिमण्यांपासून जिराफसारख्या प्राण्यांची संख्याही वेगाने कमी होत चालली आहे. शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या घटत्या संख्येला वैश्‍विक महारोग असे नामकरण करताना या घटनांना सहाव्या महाविनाशाचा भाग असल्याचे म्हटले आहे. मागच्या ज्या पाच महाविनाशाच्या घटना घडल्या,त्यांना नैसर्गिक घटना असल्याचे म्हटले जात आहे. पण आता शास्त्रज्ञांनी या महाविनाशाचे कारण मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे भौगोलिक क्षेत्र हिरावून घेतल्याचे आणि पर्यावरणीय तंत्र बिघडल्याचे सांगितले आहे.
     स्टेनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक पाल आर. इहरिच आणि रोडोल्फो डिरजो नावाच्या ज्या दोन शास्त्रज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे,त्यांची गिणती पद्धती तीच आहे, जी इंटरनॅशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचरसारख्या संस्थेने स्वीकारली होती. या अहवालानुसार 41 हजार 415 पशु-पक्ष्यांच्या प्रजाती संकटात आहेत. या दोघांच्या शोधपत्रानुसार पृथ्वीवरचे 30 टक्के पृष्ठवंशीय प्राणी विलुप्ततेच्या उंबरठ्यावर आहेत. यात सस्तनप्राणी,पक्षी,सरपटणारे आणि उभयचर प्राण्यांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीत चित्ता या चपळ प्राण्यांची संख्या 7 हजार आणि ओरांगउटांगची संख्या 5 हजार उरली आहे.
     या शोधपत्रानुसार यापूर्वी झालेले पाच महाविनाश हे नैसर्गिक असल्याकारणाने यांचा वेग संथ होता,पण सहावा जो महाविनाश होणार आहे,तो मानवनिर्मित असेल, त्यामुळे याचा वेग खूपच अधिक असणार आहे. अशा परिस्थिती तिसरे महायुद्ध झाले तर मात्र या विनाशाचा वेग आणखी भयंकर असणार असल्याचे म्हटले जात आहे. असे घडले तर या विनाशाच्या विळख्यात फक्त जीव-जंतू प्रजाती येणार नाहीत,तर मानव प्रजाती, संस्कृती, सभ्यतादेखील येतील. या शोधपत्राच्या गंभीर इशार्‍याची दखल घेऊन तातडीने यावर उपाययोजना राबवण्यासाठी पावले उचलायला हवीत. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे,त्याच अमेरिकेच्या राष्ट्रपती-डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शब्द फिरवत हवामान बदलाचा समझोता करार रद्द करून टाकला आहे. त्यामुळे अशी एक शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे की, जगातील राजकीय नेतृत्व या दिशेने कोणते पाऊल उचलणार आहे. याकडे गंभीरपणे पाहिले जाणार आहे की नाही?
     एक काळ असा होता, ज्यावेळेला मानव वन्य प्राण्यांच्या भीतीने गुहेत किंवा उंच झाडांवर आश्रय शोधत फिरत होता. पण जसजशी मानवाची प्रगती होत गेली,तसतशी प्राण्यांवरची त्यांची हुकूमत वाढत गेली. प्राण्यांना आपल्या आश्रयाखाली आणण्याच्या प्रयत्नात अनेक प्राणी-पक्षी असुरक्षित झाले. वन्यजीव जाणकारांनी जे ताजे आकडे मिळवले आहेत, त्यातून असे संकेत मिळत आहेत की, माणसाने आपल्या खासगी हिताच्या रक्षणासाठी गेल्या तीन शतकात जगातल्या जवळपास 200 जीव-जंतुंचे अस्तित्वच संपवले आहे. भारतात सध्या जवळजवळ 140 जीव-जंतू संकटात सापडले आहेत. राष्ट्रीय उद्यान, अभ्ययारण्य आणि प्राणी संग्रहालय यांच्या संपूर्ण व्यवस्थेबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
     18 व्या शतकापर्यंत प्रत्येक 55 वर्षांमध्ये एका वन्य प्राण्याची प्रजाती लुप्त होत होती. 18 आणि 20 व्या शतकादरम्यान प्रत्येक 18 महिन्यात एका वन्यप्राण्याची प्रजाती नष्ट होत आली आहे. एकदा का एका प्राण्याची प्रजाती पृथ्वीवरून नष्ट होते,ती पुन्हा निर्माण करण्याची क्षमता मानवांमध्ये नाही. नैसर्गिकरित्या त्याची पुन:उत्पत्ती होण्यासाठी हजारो-लाखो वर्षे लागतात. अर्थात शास्त्रज्ञ क्लोनपद्धतीने डायनासोर पुन्हा पृथ्वीवर अवतरित करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत,पण अजूनही या प्रयोगात यश मिळालेले नाही. क्लोन पद्धतीने मेंढीची निर्मिती केल्यानंतर शास्त्रज्ञांना असा विश्‍वास आहे की, ते लुप्त झालेल्या प्राण्यांच्या प्रजाती पुन्हा अस्तित्वात आणू शकतील. अलिकडेच चीनने क्लोन पद्धतीने दोन माकडांची निर्मिती केली असल्याचा दावा केला आहे. पण काही झाले तरी याला इतिहास साक्षीदार आहे की, मनुष्य कधीही निसर्गावर विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे मानवाने आपल्या वैज्ञानिक उपलब्धतेच्या अहंकारातून बाहेर न आल्यास विनाश जवळ आहे, असेच समजायला हवे. आपण या काही गोष्टी विसरून चालत नाहीत की, प्रत्येक प्राण्यांचे पर्यावरणीय तंत्र, खाद्यसाखळी  आणि जैव विविधतेच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. त्याचे महत्त्व कमी करून चालणार नाही. कारण याच पर्यावरणीय तंत्र, खाद्यसाखळीवर माणसाचे अस्तित्व टिकून आहे.
भारतात वन्य संरक्षणाचे प्रयत्न
     जीव-जंतु,प्रजाती यांच्या संरक्षणाकडे आपल्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. अशातही काही लोकांनी त्यांच्या संरक्षणासाठी काही प्रयत्नही केले आहेत. 107 मध्ये पहिल्यांदा सर मायकल कीन यांनी जंगलांना प्राणी अभयारण्य बनवण्याबाबत विचार केला, पण सर जॉन हिबेटने तो विचार धुडकावून लावला. इ. आर. स्टेवान्स यांनी 1916 मध्ये कालागढचे जंगल प्राणी अभ्ययारण्य बनवण्याचा विचार ठेवला. पण कमिशनर विन्डम यांच्या जबरदस्त विरोधामुळे हे प्रकरण पुन्हा मागे पडले. 1934 मध्ये गव्हर्नर सर माल्कम हॅली यांनी कालागढ जंगलाला कायदेशीर संरक्षण देत राष्ट्रीय प्राणी उद्यान बनवण्याचा निर्णय घेतला. हॅली यांनी मेजर जिम कार्बेटशी चर्चा करून या उद्यानाची सीमा निश्‍चित केली. 1935 मध्ये युनायटेड प्राविन्स ( सध्याचे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड) नॅशनल पार्क्स अ‍ॅक्ट संमत केला आणि हे अभ्ययारण्य भारतातले पहिले राष्ट्रीय वन्य प्राणी उद्यान बनले. हे हॅली यांच्या प्रयत्नांमुळे बनले होते, त्यामुळे या उद्यानाला हॅली नॅशनल पार्क असे नाव देण्यात आले. नंतर उत्तर प्रदेश सरकारने जिम कार्बेटच्या स्मरणार्थ याचे कार्बेट नॅशनल पार्क असे नामकरण केले. अशा प्रकारे भारतात राष्ट्रीय उद्यानांचा पाया इंग्रजानी रचला. (आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस -22 मे निमित्त) 

No comments:

Post a Comment