Saturday, May 12, 2018

(बालकथा) आजीचं पत्र हरवलं...


     
म्हणायलाच छोटू छोटा आहे,पण आहे मोठा हुशार.खरं तर त्याचे नाव अजय आहे,परंतु सगळे त्याला छोटू म्हणूनच बोलावतात. त्याला छोटू म्हणून हाक मारायला सगळ्यांनाच आवडते.त्याची एक लहान बहीण आहे,पायल.
हरवलेल्या वस्तू शोधण्यात छोटूचा  हातखंडा आहे.घरातल्या कुणाचेही काही हरवले तर तो ते झटक्यात शोधून काढी. तेवढे त्याचे डोके जोरात चालायचे.त्याच्या या कामामुळे तो सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होता.सगळे त्याला शाबासकी द्यायचे.
एके दिवशीची गोष्ट आहे. पोस्टमनने पत्र दिले. आजीने ते हॉलमध्ये ठेवले. थोड्या वेळाने ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि पत्र वाचायचे म्हणून ते ठेवलेल्या टेबलाकडे गेली,पण तिथे पत्र नव्हतेच. तिथून पत्र गायब झाले होते. तिने खूप शोधाशोध केली,परंतु ते सापडले नाही. 
छोटूच्या आईला कळले तेव्हा,तिनेदेखील सगळे घर पालथे घातले,पण तिलासूद्धा ते पत्र मिळाले नाही. मग आजी म्हणाली," काळजी करू नकोस. छोटू आला की, काढेल शोधून."
छोटू शाळेतून आल्यावर त्याला कळले की,पत्र हरवले आहे.हरवलेली गोष्ट शोधायला त्याला  खूप मजा यायची. त्याने आजीला विश्वास दिला की, तासभरातच पत्र शोधून काढेन. 
तो धावतच त्याच्या खोलीत गेला. दप्तरातली एक वही आणि पेन्सिल घेऊन तो आजीजवळ आला. तिच्या समोर बसत म्हणाला,"आजी, मला काही प्रश्नांची उत्तरे दे."
आजी हसली आणि म्हणाली,"विचार माझ्या छोटुकल्या."
"सगळ्यात शेवटी तू पत्र कधी आणि कोठे पाहिले होतेस?"
"दुपारी.इथेच या टेबलावर."
" बाहेरून कुणी आलं होतं का?"
"नाही."
"तू कुठं कुठं शोधलंस?"
"सगळीकडे. अगदी बाहेरदेखील पाहून आले.मला वाटलं, कदाचित वाऱ्याच्या झोक्याने उडून बाहेर गेलं असावं."
छोटू अगदी गंभीरपणे आजीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट वहीत टिपून घेत होता. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याने आणखी काही प्रश्न विचारले,"तू सकाळपासून कधी  बाहेर गेली होतीस का?"
"नाही..!"
"नीट विचार करून सांग!"
"नाही. फक्त दहा मिनिटासाठी मी माझ्या खोलीत गेले होते."
"तेव्हा पत्र इथेच होते?"
"हो!"
"त्यावेळेला आई कुठे होती?"
"ती तर किचनमध्ये होती."
आणखी काही गोष्टी त्याने पटापट वहीत टिपून घेतल्या.आतापर्यंत त्याच्या एक गोष्ट ध्यानात आली होती की, पत्र, आजी तिच्या खोलीत आणि आई किचनमध्ये असताना गायब झाले आहे.
तो एका बाजूला जाऊन बसला आणि विचार करू लागला.
"घरात कोणी आले नाही आणि पत्र मात्र गायब झाले आहे." ही गोष्ट त्याला सारखी सारखी सतावत होती.
एकदा त्याने संपूर्ण घर धुंडाळून पाहिले,पण पत्राचा काही ठावठिकाणा लागला नाही.शेवटी कंटाळून तो हॉलमध्ये येऊन बसला.छोटू पहिल्यांदाच चिंताग्रस्त दिसत होता. नाही तर अगदी हसत-खेळत सहजपणे तो त्या वस्तूपर्यंत पोहचायचा.
"क क कबूतर ...., ख ख खडू..., ग ग गवई... " पायल काही तरी आठवून मोठ्याने म्हणत होती.
"थोडा वेळ गप्प बसू शकत नाहीस का?" छोटू रागाने तिच्यावर ओरडला.
"तिला का ओरडतोयस?" आई शांतपणे म्हणाली. छोटू काही बोलला नाही.
क क कबूतर..., ख ख खडू..., ग ग गवई..." पायल पुन्हा पुटपुटली.
"छोटू, काही काळजी करू नकोस, जा, बाहेर जाऊन खेळ जा.पत्राचं आपण नंतर पाहू." आजी छोटूला काळजीत पाहून म्हणाली.
छोटू नाराजीनेच उठला आणि आपल्या खोलीत जाऊ लागला.तेवढ्यात त्याच्या डोक्यात शब्द घुमले.'क क कबूतर..., ख ख खडू..., ग ग गवई..., क क कबूतर, क क कबूतर... क क कबूतर!"
जराही उशीर न करता तो धावतच गच्चीवर गेला.त्याच्या घराला लागून नसीम चाच्यांची गच्ची होती. उडी मारून तो त्यांच्या गच्चीवर गेला. तिथे सात-आठ कबूतर दाणे टिपत होते. छोटू येताच ते उडून लांब जाऊन बसले. नसीम चाच्यांना कबूतर फार आवडायचे. त्यांच्या गच्चीवर पुष्कळ कबूतर असायचे. ते इकडेतिकडे वावरायचे.
छोटूचा चेहरा  अचानक उजळला. तिथे जवळच पत्र पडले होते. त्याने अगदी आनंदाने पत्र उचलले आणि आपल्या गच्चीवर आला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
"आजी....! आई....!" त्याने वरूनच मोठ्याने आवाज दिला. छोटूचा आवाज ऐकून सगळे गच्चीवर आले. त्याच्या हातात पत्र पाहून आजीला आनंद तर झाला होताच पण ती आश्चर्यचकीतही झाली होती. 
"ते बघ...तुझे पत्र गायब करणारे... त्यातल्याच कुणाचा तरी यात हात आहे." दाणे टिपणाऱ्या कबुतरांकडे इशारा करून छोटू हसत म्हणाला.
"पण बाळा, तुला रे कसं कळलं,पत्र कबुतरांनी उचललं आहे ते?"आजीने आश्चर्याने विचारले.
"पायल काही तरी आठवून म्हणत होती. तेव्हा क कबूतर ... ऐकल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला.हे काम नक्कीच नसीम चाच्यांच्या कबुतरांचे असले पाहिजे,याची खात्री झाली. कबूतर उडत उडत आपल्या अंगणात, कधी कधी आपल्या घरात येतात. आणि मुळात पत्र गायब झाले, त्या वेळात दुसरे कुणीच आपल्या घरात आले नव्हते. मग ही खोडी कुणाची असणार?" छोटूने आजीला समजावून सांगितले.
"याचे डोके तर फास्टर फेणेपेक्षाही जोरात चालते की!" आजीने त्याच्या गालांना कूरवाळून आपल्या कानशिलांवर बोटे मोडली. 
आईने त्याला जवळ घेतले आणि मायेने त्याचे केस कुरवाळू लागली.

No comments:

Post a Comment