Wednesday, May 16, 2018

सामाजिक भान असलेला पोलिस अधिकारी: महेश भागवत


     सध्या हैद्राबादचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले महेश मुरलीधर भागवत हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. त्यांना नुकताच जागतिक पातळीवरचा गौरव प्राप्त झाला आहे. त्यांच्या मानवी तस्करी रोखण्याबाबतच्या कामाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. भागवत यांचा जगातील अवैध मानवी वाहतूकीला आळा घालणार्या जगभरातील 100 प्रभावी व्यक्तीमत्वांमध्ये समावेश करण्यात आली आहे. अमेरिकेतील असेंट कम्प्लायन्स या संस्थेच्यावतीने त्यांची निवड करण्यात आली आहे. या आधीदेखील भागवत यांना अमेरीका सरकारचा ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो हा पुरस्कारही मिळाला आहे. 2004 पासून भागवत हे मानवी तस्करी रोखण्याचे काम करत असून त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये आत्तापर्यंत हे कार्य केले आहे. पोलिसांतील माणुसकी म्हणून त्यांची ओळख आहे.

    सध्या तेलंगणमधील हैदराबाद-राचकोंडाचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले भागवत हे मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक. महेश भागवत यांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह, नर्मदा बचाओ आंदोलनात मेधा पाटकर यांच्यासोबत त्यांनी काही काळ काम केले. ते 1995 मध्ये  भारतीय पोलीस सेवेत दाखल  झाले.आयपीएस झालेल्या भागवत पहिल्यांदा मणिपूर-त्रिपुरा केडर मिळाले. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर ते आंध्र प्रदेश केडरमध्ये आले. आदिलाबाद जिल्ह्यात कार्यरत असतानापीपल्स वॉर ग्रुपच्या नक्षलवाद्यांनी सिरपूर-कागजनगरचे आमदार आणि त्यांच्या चार अंगरक्षकांची हत्या केली. नक्षल्यवाद्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे भागवत यांच्या लक्षात आले. त्यांनी पाठिंब्यामागची कारणे शोधून काढली आणि नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणाराअज्ञात स्वेच्छाहा प्रकल्प राबविला. पोलिस आणि नागरिकांमधील समन्वयासाठीमैत्री संघनिर्माण केला. ‘मी कोसमया उपक्रमाद्वारेकम्युनिटी पोलिसिंगचे उत्तम उदाहरण घालून दिले.
     नलगोंडाच्या पोलिस अधीक्षकपदी कार्यरत असताना यादगिरीगुट्टा येथील मानवी व्यापाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. अडीचशे जणांना अटक केली. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांची सुटका केली. पीडितांची सुटका झाली आणि जबाबदारी संपली, असा विचार त्यांनी केला नाही. पीडित स्त्रियांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. उदबत्ती, भांडी निर्मितीचे, शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. या महिलांच्या मुलींच्या नशिबी वेश्याव्यवसायातले मरण येऊ नये म्हणून सात ते पंधरा वयोगटातील मुलींना त्यांनी शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली. प्रशासकीय अधिकारांचा कौशल्यपूर्ण वापर आणि अशासकीय संस्थांची मदत घेत त्यांनी शेकडो मुले, महिला, युवतींची नरकयातनांतून सुटका केली आहे. पीडितांना आत्मविश्वासाने जगण्याची संधी देणारा त्यांचा हाआसराप्रकल्प राज्य सरकारने स्वीकारला आहे. खरे तर अशी प्रकरणे सरधोपटपणे हाताळली जातात. भागवत यांनी ती अभिनव पद्धतीने हाताळत त्यांच्या मुळाशी जाऊन अनेक टोळ्यांची कारस्थाने उघड केली हे त्यांचे वैशिष्टय. सध्या ते ज्या रचाकोंडा पोलीस क्षेत्रात काम करीत आहेत तेथे त्यांनी पाच हॉटेल्स व 20 निवासी इमारतीत चालणारे किमान 25 कुंटणखाने बंद केले.
     आपल्याकडे अनेकदा कामगारांचीही तस्करी करून त्यांना गुलामासारखे वागवले जाते. अशी मोठ्या टोळ्या त्यांनी उघडकीस आणल्या असून देशातील अशा मोठया मोहिमेचे नेतृत्व केले. बालकामगार ठेवणे गुन्हा असला तरी अजूनही असे प्रकार सर्रास चालतात. भागवत यांनी 350 मुलांना वीटभट्टीच्या कामांवरून मुक्त करून त्यांचे कोमेजलेले बालपण त्यांना परत बहाल केले आहे. अवैध मानवी वाहतूक मोठ्याप्रमाणावर होत असते. त्याला आळा घालणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. भागवतांनी अवैध मानवी वाहतूक रोखण्याच्या कामाची सुरुवात हैद्राबादमधून केली. त्यानंतर त्यांनी त्यावेळच्या आंध्रप्रदेशच्या विविध भागांमध्ये अवैध मानवी वाहतूक रोखण्याबाबत मोहिम उघडली. त्यांनी गुन्हेअन्वेशन विभागाच्या महिला सेलसोबतही काम केले. संयुक्त राष्ट्र आणि गृहमंत्रालयाच्या सहकार्याने त्यांना भारतातील बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पोलीसांना स्थानिक सरकार आणि समासजेवी संस्थाच्या मदतीची गरज असते.
      अवैध मानवी वाहतूक रोखणे म्हणजे केवळ महिलांची सोडवणूक नाही तर त्यांचे सुरक्षित जागी पुर्नवसन करणे तितकेच महत्त्वाचे असते. या भावनेतून ते कार्य करीत आहेत. पोलीसांचे काम हे त्या व्यक्तीला सोडवून आणणे असते. सरकारने त्या व्यक्तीला संरक्षण देणे गरजेचे असते. त्याचबरोबर सोडवणूक करुन आणलेल्या महिलेने पुन्हा त्या मार्गाकडेवळू नये यासाठी त्यांचे योग्य पुर्नवसनही तितकेच महत्त्वाचे आहे. सोडवणूक केलेल्या महिलेला आर्थिक मदत मिळेल याकडेही ते लक्ष देत असतात. अनेक स्वयंसेवी संस्थांनी सोडवणूक करुन आणलेल्या महिलांचे तसेच मुलांचे पुर्नवसन करण्यासाठी मोलाची साथ दिली आहे. त्याचबरोबर महिलेला तस्करांपासून सोडवून आणून त्यांना कोर्टात साक्ष देण्यास उभे करणे हेही अत्यंत आवश्यक असल्याचे भागवतांचे मत आहे.
     पुण्यात शिक्षण घेत असताना नरेंद्र दाभोलकर, मेधा पाटकर यांच्यासोबत अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तेथूनच एक सामाजिक भान मनात निर्माण झाले होते. 2004 सालापासून अवैध मानवी वाहतूक रोखण्याचे काम करण्यास सुरुवात केली. हैद्राबाद येथे पोलीस उपायुक्त असताना अनेक ठिकाणी धाडी घालून महिलांची सुटका केली. हा संघटित गुन्हा असल्याने त्याची उकल करणे अनेकदा अवघड जाते. या मानवी वाहतूकीमध्ये लहान मुला-मुलींचे प्रमाणही अधिक असते. अश्यावेळी या मुलांची सुटका करुन त्यांच्यासाठी शाळा सुरु करण्याचे काम सामाजिक संस्थांच्या सहाय्याने त्यांनी केले आहे. अवैध मानवी वाहतूकीतून सुटका केलेल्या महिलांचे पुनर्वसन करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर या अवैध वाहतूकीच्या सूत्रधाराला पकडून मूळापासूनच या समस्येला उपटून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. याच कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment