Monday, May 7, 2018

स्वत:ला माफ करायला शिका


     माणूस कळप करून राहणारा प्राणी आहे. एकमेकांच्या मदतीने आयुष्याचा प्रवास साधणारा माणूस आहे. मित्रमंडळी,जिवलग, नातेवाईक,पावणे-रावळे यांच्या गराड्यात आनंदाचा क्षण वेचणारा आनंदप्रवासी आहे. पण तरीही माणूस दु:खी आहे. कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या तीचं माणसं ऐनवेळी दगा देतात, सोडून जातात. याचाच अर्थ बहुतांश वेळा आपण आपल्याच जवळच्या लोकांमुळे सर्वात अधिक घायाळ झालेलो असतो. याला कारणही तसंच आहे. कारण आपण त्यांच्याकडून फार मोठी आशा बाळगलेली असते. त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग आशेचे निराशेत रुपांतर होते. अशाचप्रकारे आपली एकादी चूक झाली तर आपल्या माणसांनी आपली चूक सावरून घ्यावी अशी आपली अपेक्षा असते,पण हीच माणसे आपली दुसर्यापुढे निंदा करतात तेव्हा, भयंकर संताप होतो. शिवाय नैराश्य येतं. आपल्याच माणसांचा अशा प्रकारचा व्यवहार मोठ्या प्रमाणात आपल्यावर मानसिक आघात करतो. नेहमी असंही घडतं की, बरोबर अडचणीच्यावेळी आपला अगदी विश्वासू माणूसदेखील आपली साथ सोडून जातो.

     अशा वेळेला आपण त्यांना क्षमा करू शकत नाही. त्यांचा मोठा संताप आलेला असतो. एकटेपणाची भावना आपल्याला खायला उठते. पण आपण  असा विचार केला आहे का की, सर्व काही असतानादेखील जो त्रास, अडचणी आपण भोगल्या आहेत, तशाच संकटातून दुसरेही जात आहेत. तुमच्या कळत नकळत कोणत्या तरी व्यवहारामुळे, वागण्यामुळे दुसर्याला वाईट वाटले असेल. सत्य हेच आहे. आपण सर्वचजण साधारण माणसे आहोत. अशा चुका होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी. त्याच्याने प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या चांगल्या पैलूदेखील जगासमोर आणण्याची संधी मिळेल. ज्यावेळेला आपण दुसर्यांबरोबरच स्वत:लाही माफ करण्याची सवय लावून घेतली तर आयुष्य अपेक्षेप्रमाणे सरळ मार्गक्रमण करेल. शिवाय महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनाला शांती मिळेल.
कधी कधी आपल्या अगदी जवळचा माणूस अचानक आपल्याबाबतीत इतकं वाईट करून जातो, की ज्याची कधी आपण अपेक्षाही केलेली नसते. मात्र त्यामुळे नंतर नाती सामान्य होत नाहीत. ती पार बिघडून जातात. एक विचित्र अशी नाराजी आपल्या मनात त्याच्याविषयी उत्पन्न झालेली असते. याबाबतीत मला माझ्या लहानपणाची एक गोष्ट आठवली. ही गोष्ट त्यावेळची आहे,ज्यावेळेला मी शाळेला जात होतो. शाळेचा बँड होता. गावातून प्रभातफेरी काढायची असेल किंवा शनिवारी कवायत प्रकार घेण्याचा तास असेल तेव्हा, त्याचा वापर केला जायचा. मला पडघम छान वाजवायला येई. आणि माझ्या एका मित्रालादेखील ते वाजवायला येई. आम्ही दोघेही बँडमध्ये जागा मिळावी म्हणून धडपडत होतो. शिक्षकांनी यासाठी माझी निवड केली. कारण मला चांगल्यापैकी पडघम वाजवायला येई. त्यामुळे माझा मित्र मागे राहिला. माझ्या आनंदाला परिसीमाच राहिली नव्हती. त्यामुळे मी समजूच शकलो नाही की, माझ्या मित्रावर कोणता प्रसंग ओढवला आहे. त्याच्या मनाला काय वाटत आहे? एकदा ग्रामपंचायतीसमोर आम्हाला बँड वाजवण्याची संधी मिळाली. म्हणजे आमंत्रण मिळाले. कार्यक्रम मोठा होता,त्यामुळे मला मोठा आनंद झाला होता. कारण लोकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार होती. पण ऐन मोक्याच्यावेळी पडघम गायब झाले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गावातल्या दुसर्या शाळेतल्या मुलांना संधी मिळाली. नंतर कळले की, ते वाद्य माझ्या त्या मित्रानेच लपवून ठेवले होते, ज्याची निवड झाली नव्हती. मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्याच्याकडून अशी अपेक्षा मी धरलेलीच नव्हती. यानंतर मात्र आम्ही कधी बोललो नाही.
     वास्तविक, आपल्याला एकादा त्याच्या अकस्मातच्या वागण्याने घायाळ करतो, तेव्हा आपले मन त्याचा तिरस्कार करते. त्याच्या चांगल्या गोष्टींकडेही आपले लक्ष जात नाही. आपल्या मनात फक्त त्याच्याविषयी चुकीचेच विचार यायला लागतात. यामुळे फक्त नातीच तुटत नाहीत तर आपल्यालादेखील इच्छा नसतानाही तणावाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्याने त्याच्या वागण्याने आपल्याला जखम दिली असली तरी तो तसा का वागला, याचे कारण समजून घेतले पाहिजे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या त्या व्यवहाराचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
     आपल्यावर जसा प्रसंग आला आहे, तसाच प्रसंग दुसर्यावरही आलेला असतो. त्यामुळे दुसर्याला त्याच्या वागण्यावरून क्षमा करण्याबरोबरच स्वत:लाही क्षमा करायला हवी. माफ करायला हवे. आपण आपल्या स्वत:शीदेखील मृदूपणाने सामोरे जा. काय झालं एकादी चूक झाली तर? स्वत:ला एकाद्या बंदिस्त चौकटीत कोंडून ठेवू नका. माणूस हा अनुभवानेच शिकत असतो. चुका या एकप्रकारचा अनुभवच आहे. जर तुम्ही स्वत:ला माफ कराल, तेव्हा ही सवय तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून जाते. त्यामुळे दुसर्याला माफ करणे तुम्हाला अवघड जाणार नाही. आज मला वाटतंय की, मीदेखील माझ्या त्या मित्राला माफ करायला हवं. आयुष्यात येणारे चढौतार शांततेच्या मार्गाने काटता येतात. आपल्या मनात कोणाच्याही बाबतीत द्वेष राहू नये. कारण शांत आणि आनंदमय जीवन जगण्यासाठी प्रत्येक भावना आणि प्रत्येक व्यक्तीला खुल्या मनाने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. अर्थात यासाठी वेळ लागणार आहे. मन लवकर तयार होत नाही,पण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला हवे. मला तर वाटतं की, ज्यावेळेला आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकू, तेव्हा यापेक्षा सुंदर अनुभव आणखी कोणती असणार नाही.( आधारित

No comments:

Post a Comment