आपल्या भारत देशाला महादानशूर,परोपकारी लोकांचा देश म्हणून ओळखले जाते. जर आपण आपल्या देशातल्या चोहोबाजूला नजर टाकली तर आपल्याला प्रत्येक राज्यांमध्ये,लंगर,भंडारे, छबिले,महाप्रसाद, दासोहा,अन्नछत्र,
मोफत आरोग्य सुविधा,गरीब मुलींचे विवाह,
डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया,थंडीच्या दिवसांत
गरिबांना स्वेटर,कांबळ वाटप, गरीब मुलांना
मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था चालवली जात असल्याचे दिसते. हे
सगळे पाहिल्यावर आपल्याला असे वाटते की, परोपकारांच्या या देशात
कुठल्याच गरीब व्यक्तीला कसल्याही प्रकारचा त्रास,दु:ख होत नसेल. अर्थात यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही,
कारण अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे किंवा चालवल्या जात असलेल्या विविध
संस्थांमुळे गरिबांना लाभ मिळतदेखील आहे. पण याच चित्राची दुसरी
बाजूदेखील आहे आणि ती मोठी भयानक आहे. आपण त्याची कल्पनासुद्धा
करू शकत नाही. याच परोपकारी दानशूर समाजात आपल्याला अशीही माणसे
पाहायला मिळतात की, या पृथ्वीवरची मानवता संपली आहे की काय असे
वाटावे. मानवीय संवेदनेने आपला जीव सोडला आहे. त्याच्या टिकर्या टिकर्या झाल्या
आहेत. हृदय पिळवटून टाकणार्या या घटना
पाहिल्यानंतर असे वाटून जाते की, खरोखरच या भारतात गरिबांच्या
कल्याणासाठी कुठल्या संघटना कार्यरत तरी आहेत का? त्यांचे कार्य
चालू तरी आहे का? जर असेल तर मग अशा संकटकाळी या संघटना कुठे
जातात? याच्याशी संबंधीत माणसे का दिसत नाहीत? असे वाटते की, लाचार, असहाय्य आणि
गरीब माणसे त्यांच्या दृष्टीला पडतात की नाही, जी माणसे आपल्या
जीवनातला कठीण काळ घालवताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तराखंडची
राजधानी असलेल्या देहरादून मधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी ऐकायला आणि वाचायला मिळाली. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील धामपूर गावातला
पंकज नावाचा एक रहिवाशी आपल्या आजारी भावाला-सोनूला धामपूरमधून
देहरादूनला घेऊन आला होता. पंकज धामपूरमध्ये फळांचा गाडा चालवून
आपल्या कुटुंबाचे पोट भरत असतो. टीवीग्रस्त असलेल्या त्याच्या
भावाला धामपूरच्या रुग्णालयाने देहरादूनच्या रुग्णालयात रेफर केले होते. पंकजजवळ फक्त दोन हजार रुपये होते. तेवढ्या पैशांसह भावाला
घेऊन तो देहरादूनला उपचारासाठी आला होता. पैसे नसल्याने त्याच्या
भावाच्या आरोग्य तपासण्या आणि योग्य उपचार झाले नाहीत. त्यामुळे
सोनूचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून सोनूची मोफत तपासणी सुविधा उपलब्ध झाली नाही,कारण तो धामपूरचा रहिवाशी आहे,याचा पुरावा पंकज सादर
करू शकला नाही. सोनूचा मृत्यू झाल्यावरही त्याची परवड सुरूच राहिली.
जवळ पैसे नसल्याने गावी गेल्यावर पैसे देऊ, असे
सांगूनही अॅम्बुलन्सवाल्यांनी त्याचे काही एक ऐकले नाही.
त्याला कुणीच मदत करू शकले नाही. काहींनी इथे असेच
प्रकार होत असल्याचे पंकजला सांगितले. अॅम्बुलन्सवाल्यांनीदेखील जर आम्ही अशाप्रकारची मदत करत राहिलो तर आम्हाला आमचे
घर चालवणे कठीण होऊन जाईल, असे सुनावले.
शेवटी पंकजने आपल्या भावाचा मृतदेह पाठीवर
टाकून पायीच धामपूरचा जाण्याचा रस्ता धरला. देहरादून
ते धामपूर अंतर 175 किलोमीटरचे आहे. काही
अंतर गेल्यावर त्याची गाठ काही तृतीयपंथीयांशी पडली. ते आपल्या
एका रुग्णाला घेऊन रुग्णालयात चालले होते. त्यांना पंकजची परिस्थिती
पाहून संशय आला. त्यांनी त्याची पूर्ण चौकशी केली. ते परत त्याला घेऊन रुग्णालयाकडे गेले. तृतीयपंथीय लोकांनी
आपल्याजवळचे दोन हजार आणि आणखी एक हजार लोकांच्याकडून मागून घेऊन एका अॅम्बुलन्स चालकाला दिले आणि पंकज आणि त्याच्या भावाचा मृतदेह धामपूरला सोडण्याची
आग्रहपूर्वक विनंती केली. पैसे दिल्यावर चालक तयार झाला.
अशाप्रकारे समाजातीलच एका उपेक्षित वर्गाने त्या गरिबाला मदत केली.
पण याच समाजात असलेल्या धर्मात्मा, दानशूर,
समाजसेवक, स्वयंसेवी संघटना, देशभक्त, तसेच स्वत:ला संवेदनशील
समजणार्या लोकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली. त्यांनी पंकजला त्याच्या भावाचा मृतदेह पाठीवर टाकून 175 किलोमीटरचे अंतर चालायला भाग पाडले. आणि त्याचे ते दु:ख उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले.
देहरादूनमध्ये घडलेली अशाप्रकारची ही
घटना काही पहिली नाही. देशातल्या हरेक कोपर्यात अशा घटना घडल्याचे आपण पाहिले आणि वाचले आहे. टीव्ही
मिडिया आणि प्रिंट मिडिया असे देशाचे नको असलेले चित्र आपल्याला पाहण्यास भाग पाडत
आहेत. यापूर्वीही मध्यप्रदेश आणि झारखंडमधल्या काही अशाच घटना
वाचल्या आहेत. मृत पावलेल्या माणसाचा एकादा नातेवाईक त्याचा मृतदेह
कधी पाठीवर टाकून तर कधी सायकलवर ठेवून आपल्या घरी जात आहे. कारण
एवढेच की, त्यांच्याकडे मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत नेण्यासाठी अॅम्बुलन्सला
द्यायला पैसे नाहीत.
काही वेळेला आपल्याला अशा काही घटना ऐकायला मिळाल्या आहेत की,
मृत व्यक्तीचा देह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवला नाही कारण त्यांच्याकडे
रुग्णालयाचे बिल चुकते करण्यासाठी पैसे नाहीत. खासगी दवाखान्याचे
मालक मृतदेहच यासाठी आपल्याकडे गहाण ठेवतात. बिल भरल्याशिवाय
मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्दच करत नाहीत.
अशा परिस्थितीत कुटुंबातील एकाद्या आजारी सदस्याच्या औषध-पाण्यासाठी पैसे मिळवू न शकलेल्या लोकांना गहाण ठेवलेला मृतदेह सोडवून घेण्यासाठी
प्रसंगी कर्ज काढावे लागते. यावरून आपल्याला हाही विचार करावा
लागेल की, त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार, त्यासंबंधीतले कर्म, धार्मिक रीतीरिवाज कसे पार पाडले
जात असतील.
अतिशय चकीत करून सोडणारी गोष्ट अशी की, आपल्या देशात एका बाजूला स्वत:ला
धार्मिक असल्याचे सांगणारे आणि दाखवणारे, यांची संख्या मोठ्या
वेगाने वाढत आहे.कथित गुरू,धर्मौपदेशक आणि
प्रवचनकार यांचा तर काय पूर आल्यासारखीच परिस्थिती आहे. तीर्थयात्रा
करणार्यांची, पायी चालत जाणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोज कुठल्या
ना कुठल्या सामाजिक संघटनांच्या काही गोष्टी,घटना, कार्यक्रम आपल्याला ऐकायला येतात.त्यांच्या बातम्या,फोटो वर्तमानपत्रात पाहायला मिलतात. देशात दानशूर आणि
दयाळू लोकांची अक्षरश: गर्दी असल्याचे पाहायला मिळते.
देशातल्या काही धार्मिक ठिकाणी मोफत अन्नछत्र उघडले असल्याचे पाहायला
मिळते. सण-उत्सव काळात लोकांना महाप्रसाद
वाटला जातो. दान देणार्यांची संख्यादेखील
मोठी आहे. देशातल्या मोठमोठ्या मंदिरांमध्ये फक्त रुपये-पैसेच दान दिले जात नाहीत तर सोन्या-चांदीचे दागिनेदेखील
दिले जातात. उन्हाळ्यात किंवा काही आपत्तीच्या ठिकाणी पाणी,सरबत,लस्सी, थंडपेये मोफत पुरवली
जातात. शहरात आणि ग्रामीण भागातही असे चित्र पाहायला मिळते.थंडीच्या दिवसांत काही परोपकारी माणसांकडून गरिबांना मोफत स्वेटर,कांबळ तसेच लोकरीचे कपडे वाटप केल्याच्या बातम्या आपण पाहतो, वाचतो. अशा परिस्थितीत
आपल्या नातेवाईकाचा मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत नेण्यासाठी अॅम्बुलन्स किंवा पैशांची उपलब्धी का होऊ शकत नाही. अशा
ठिकाणी उपलब्ध असलेल्या काही मूठभर लोकांकडे ही संवेदनशीलता का दिसून येत नाही,
असा प्रश्न उपस्थित होतो. या इतक्या विशाल आणि परोपकारी देशात कुठल्याही प्रदेशात,भागातून अशा प्रकारच्या बातम्या येणं, आपल्यासाठी खरेच
दुर्दैवी आहे. यावरून हेच सिद्ध होते की, आपल्या इथली मानवीय संवेदना खरेच करपू लागली आहे.
No comments:
Post a Comment