रुबी तेव्हा पंधरा वर्षांची होती. ती आपल्या कुटुंबासह ब्रिटनमधल्या वेल्स प्रदेशात राहत
होती. शाळेचे दिवस अगदी मस्त आणि आनंदात जात होते. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक कुटुंबात भूकंप
झाला. तिची मोठी बहीण कुणालाही न सांगता घरातून निघून गेली.
संपूर्ण कुटुंब तिच्या शोधासाठी बाहेर पडलं. नंतर
कळलं की, तिने तिच्या मित्रासोबत लग्न केलं आहे. हे ऐकून घरच्यांना मोठा धक्का बसला. सगळ्यांनाच बदनामीची
भीती होती. आई तर फारच काळजीत होती. नातेवाईकांमध्ये
तोंड कसं दाखवायचं, हा तिच्यासमोर मोठा प्रश्न होता. त्यांचे कुटुंब बांगलादेशहून आलेले होते.
साहजिकच बहुतांश नातेवाईक तिथेच होते. आज समाजसेवा
क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणारी आणि ब्युटी क्विन विजेती ठरलेली रुबी मेरी हिची कथा
आहे.
Thursday, December 20, 2018
Saturday, December 8, 2018
यशासाठी व्हावी योग्य सुरुवात
प्रतिभावंत लेखकाची परवड
परवा ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे या प्रतिभावंत लेखकाची दुर्दशा एबीपी
माझावर पाहायला मिळाली. खरे तर उत्तम बंडू तुपे हे माझे आवडते
लेखक. त्यांची देवदासी प्रथेवरची ‘झुलवा ही कादंबरी वाचल्यानंतर
मी त्यांच्या कादंबरींचा
फॅन झालो होतो. एका दुर्लक्षित पण महत्त्वाच्या विषयाला हात घातला
होता. त्यांनी जोगत्याचा
वेश घालून महाराष्ट्र आणि कर्नाटकला भाग पिंजून काढला होता. आपल्या
जत,कोकटनूर, सौंदती या भागात देवदासी प्रथा
मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या कादंबर्यांचं मला भारी अप्रूप होतं. अर्थात लेखक काय करतो,
कुठे राहतो, याचं आपल्याला काही देणंघेणं असत नाही.
पण परवाच्या एबीपी माझाने त्यांच्यावर केलेल्या स्टोरीमुळे प्रतिभावंत
साहित्यिकांची कशी परवड होते, हे पाहायला मिळाले. साहित्य अकादमीसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे उत्तर आयुष्य
फारच हलाखीत चालल्याचे दिसत होते. इथे पैशांशिवाय मानसन्मानाला
काहीच किंमत नाही,हेच अगदी ठळकपणे दिसून आले.
Wednesday, November 21, 2018
खरेच आपण 'ओके' आहोत?
अलिकडे एक शब्द फारच प्रचलित झाला आहे. मोबाईल जसा आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे,
तसाच हा शब्ददेखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. हा तसा फार छोटा शब्द आहे,परंतु तो आपल्या मनमस्तिष्कमध्ये
जाऊन फिट बसला आहे. त्याचा वारंवार होणारा वापर, हेच सांगतो आहे. मोबाईल यायच्या अगोदर हा शब्द तसा कमी
प्रचलित होता. पण मोबाईल आला,त्यानंतर स्मार्टफोन
आला आणि याची क्रेझ वाढली. एसएमएस पाठवताना हमखास हा तिथे डोकावू
लागला. आता तर त्या शब्दाशिवाय काही चालतच नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असा कोणता शब्द आपल्या मनमस्तिष्कामध्ये
फिट बसला आहे. असो तुमची ही उत्सुकता आता ताणत नाही. तो शब्द आहे 'ओके'!
Monday, November 19, 2018
(बालकथा) वनदेवतेचा आशीर्वाद
एका गावात नागाप्पा नावाचा एक शेतकरी
राहायचा. तो जवळच असलेल्या जंगलात जायचा आणि तिथल्या रंगीबेरंगी
आणि सुंदर सुंदर पक्ष्यांना जाळं लावून पकाडायचा. त्या पक्ष्यांना
लपूनछपून शहरात जाऊन मोठ्या किंमतीला विकायचा. एके दिवशी नागाप्पाला
जंगलात एक सुंदर पक्षी सापडला. तो इतका सुंदर होता की,
त्याला आपल्याकडेच ठेवण्याचा मोह झाला. मग काय!
त्याने आपल्याच घरातल्या पिंजर्यात त्याला कैद
केलं.
Saturday, November 17, 2018
आता मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन व्हावीत
दिवसेंदिवस मोबाईल, इंटरनेटचे आकर्षण मुलांत वाढत आहे. बहुतांश घरात संवाद
हरवत चालला असल्याने मुलांत एकाकीपणा वाढत आहे. त्यामुळे अल्पवयातच
मुले एक ना अनेक प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यातून
निर्माण होणार्या समस्यांचा सामना रोजच लाखो पालकांना करावा
लागत आहे. यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर
शाळांच्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन केंद्रे
चालवण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी मुलांसह पालकांना समुपदेशन
द्यायला हवे आहे. कारण अलिकड्च्या काही वर्षात मोबाईल,
इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की, त्याकडे
कुणाचे ध्यानच गेले नाही. माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो,
त्याला मोबाईलमधलं सगळं काही जमतं, असे कौतुकाचे
शेरे पालक वर्ग मारत होते. मात्र मुलं जसजशी त्यात गुरफटत गेली,
तसतशी पालकांची हवा ताईट व्हायला लागली. मुलं आता
हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे, असा प्रश्न पडला आहे. आईने मोबाईल हिसकावून घेतला, मोबाईल विकत घेतला नाही, अशा कारणांनी मुलं आत्महत्या
करीत आहेत, यावरून मोबाईल,इंटरनेटचं वेड
कुठल्या स्तराला गेलं आहे, याचा अंदाज येईल.
यश कसं मिळवाल?
माणसं यशाच्या मागे धावत असतात. रात्र आणि दिवस
यासाठी एक करीत असतात .पण तरीही काही लोकांनाच यश प्राप्त होतं. अनेकांना यशामागे
काही तरी रहस्य लपलं आहे, असं वाटत असतं. त्यामुळे यशासाठी आणखी काही उपद्व्याप
माणसं करताना दिसतात. खरे तर कोलीन एल पावेल यांच्या म्हणण्यानुसार यशाचं असं काही
रहस्य नसतं. ते तुमची तयारी,कठोर मेहनत आणि अपयशापासून
शिकण्याचेच परिणाम असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
(हास्य एकांकिका) स्वागत
(ठिकाण: गावातला
रस्ता)
(चतुर्भुज एम.ए. उत्तीर्ण होऊन आपल्या गावात आला आहे. तो हा विचार करतोय की, गावातले लोक आपल्याला पाहून आनंदी
होतील. त्याच्या पुढ्यात एक काबुली जातीचे मांजर आहे.)
(नीलरत्नची दृष्टी चतुर्भुजवर पडते.)
Friday, November 16, 2018
स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेणारा माणूस
Tuesday, November 13, 2018
(बालकथा) ऋत्विकची हुशारी
ऋत्विक पहिलीत शिकत होता. त्याच्या घरात एका छोट्याशा उंदराने घर केले होते.
म्हणजे आपलेच घर समजून तो ऋत्विकच्या घरात बिनधास्त राहत होता.
ऋत्विकलाही तो आवडायचा. मग काय! उंदराची मज्जाच मज्जा! ऋत्विकनं लाडानं त्याचं नाव टप्पू
ठेवलं होतं. टप्पू ऋत्विक असला की, आपलीच
इस्टेट समजून घरभर उड्या मारायचा. टप्पू ऋत्विकला चांगला ओळखत
होता. ऋत्विक बाहेरून आला की, टप्पू बिळातून
बाहेर येऊन त्याच्याभोवती पिंगा घालायचा. आता तर त्या दोघांची
चांगली गट्टी जमली होती. दोघं मस्तपैकी एकत्र खेळायची.ऋत्विकचा वेळ मजेत जायचा.
Sunday, November 11, 2018
लहान मुलांसाठी आवडीने लिहणार्या: सूधा मूर्ती
सूधा मूर्ती इंग्रजी आणि कन्नड भाषेतल्या
प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी मुलांसाठीदेखील
अनेक पुस्तके लिहिली
आहेत. अलिकडेच त्यांचे द अपसाइड डाऊन किंग: अनयुज्वल टेल अबाउट राम अँड कृष्णा हे नवे पुस्तक बाजारात आले आहे.
त्यांच्या या सिरीजचे हे तिसरे पुस्तक आहे. या
कथा भारतीय पौराणिक ग्रंथांमधून घेतलेल्या आहेत. इन्फोसिस फौंडेशनच्या
प्रमुख असलेल्या सूधा मूर्ती यांचा बहुतांश वेळ हा फौंडेशनच्या कामासाठी जातो.
Thursday, November 8, 2018
प्रदूषण समस्या राष्ट्रीय आपत्ती घोषित व्हावी
ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने
फटाके फोडण्यावर निर्बंध घालत फक्त रात्री आठ ते दहा यावेळेत फटाके फोडण्यास परवानगी
दिली. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या.
पण तरीही अनेक शहरांमध्ये या आदेशाची पायमल्ली होताना दिसली.
याचा अर्थ असा की, आपण अजूनही प्रदूषण ही समस्या
फार मनावर घेतलेली नाही. न्यायालयाने प्रदूषणावर नियंत्रण घालण्यापेक्षा
सरकारने याबाबतीत कडक पावले उचलण्याची गरज आहे.पण राजकीय लाभासाठी
आपण आपल्याच लोकांचा बळी द्यायला निघालो आहे. यामुळे फक्त माणसांचाच
बळी जात नाही तर मोठ्या प्रमाणात देशाचे आर्थिक नुकसानदेखील होत आहे.
Wednesday, November 7, 2018
(बालकथा) लक्ष्मीचा निवास
एकदा भगवान विष्णू शेषनागावर विराजमान
होते. वेळ जाता जात नव्हता. मग त्यांनी
पृथ्वीवर जाऊन फेरफटका मारून येण्याचे ठरवले. वास्तविक पृथ्वीवर
येऊन त्यांना कित्येक वर्षे लोटली होती. ते आपल्या प्रवासाच्या
तयारीला लागले. इकडे भगवान विष्णूंची तयारी चालल्यावर लक्ष्मीने
विचारले, “ आज सकाळी सकाळी कुठे जाण्याची तयारी चाललीय?
”
विष्णू म्हणाले, “जरा पृथ्वीतलावर फेरफटका मारून यावं म्हणतो.
”
(बालकथा) आनंदाचा प्रकाश
चंदू दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा
करण्याचा बेत आखत होता. तेवढ्यात दाराची कडी
वाजवण्याचा आवाज झाला.दरवाजा उघडला तर दोन चिमुकली मुलं त्याला
दारात उभी असलेली दिसली. तेवढ्यात आईदेखील आली. त्यांना पाहून त्यातला एक मुलगा म्हणाला, “ आम्ही अनाथाश्रामतून
आलो आहोत. तुम्हाला काही द्यायचं असेल तर अनाथाश्रमातल्या मुलांसाठी
दान देऊ शकता. ”
आईच्या सांगण्यावरून चंदूने कपाटातले
पाच रुपये आणून मुलांना दिले. ते गेल्यावर चंदूने
आईला विचारले, “ अनाथाश्रम म्हणजे काय गं? ”
विराटकडून काय शिकावं?
विराट कोहलीसाठी गेल्या महिन्यात विशाखापट्टनममध्ये
खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज आणि भारतादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये कप्तानी करणं
खरे तर खासच होतं.कारण यात त्याने एक दिवशीय
क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. खूपच कमी
डावांमध्ये आणि कमी वयात त्याने हे लक्ष्य मिळवलं आहे. सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकर याचा सतरा वर्षांपूर्वीचा जुना जागतिक
विक्रमदेखील मोडला आहे. फार कमी वयात विराटने स्वत:ला क्रिकेट विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित केलं
आहे.त्याला मिळणारी संधी,यश आणि प्रयत्न
आपल्याला खूप काही शिकवून जातात. काम आणि नात्यांविषयी असलेला
त्याचा दृष्टीकोन आपल्याला नक्कीच प्रेरणादायी आहे.
Monday, November 5, 2018
(बालकथा) शंभराची नोट
अश्विनी बसमधल्या सर्वात मागच्या सीटवर जाऊन बसली.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला महाराष्ट्र
पूर्वी दुसर्याचं ऋण अंगावर असलं की माणसाला पूर्वी झोप येत नव्हती. माणसे त्याच्या बोझ्याखाली वावरत. चाकरी करत.
आणि संपूर्ण आयुष्य त्यांच्या हवाली करत. त्यामुळे
कर्ज अंगावर असलं की, लोकांना त्याचा भार वाटत असे. पण आजकाल ऋणाची व्याख्या बदलली आहे. कर्ज काढल्याशिवाय
प्रगती होत नाही. भौतिक सोयी-सुविधा होत
नाहीत, अशी एक धारणा होऊन बसली आहे. त्यामुळे
आजकाल लोकांची कर्ज काढण्यासाठी धडपड सातत्याने सुरू असते. एकादा
धंदा, व्यवसाय अथवा उद्योग सुरू करायचा आहे, अशावेळी कर्ज उपयोगाचे ठरू शकते. कारण डोक्यावर कर्ज
आहे, याची जाणीव होऊन माणूस सतत राबत राहतो आणि ते ऋण फेडण्याचा
प्रयत्न करत असतो. पण भौतिक सुविधांसाठी काढलेले कर्ज फायद्याचे
नक्कीच ठरू शकत नाही. पण कर्जाची कुणाला चिंता राहिलेली नाही.
त्यामुळे आजकाल कर्ज हा परवलीचा शब्द झाला आहे. नोकरदार तर त्याच्याशिवाय काही करूच शकत नाहीत. पगाराचे
तारण असल्याने बँकाही त्यांनाच कर्ज देत असते. अन्य लोकांना देताना
अनेक गोष्टी तपासल्या जातात. कर्ज मागणारा सडाफटिक असेल तर मात्र
त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. एकाद्याला काही तरी करून दाखवायची
हिंमत असते,मात्र त्याला बँकांची साथ मिळत नाही. साहजिकच कित्येक तरुण पैसे जवळ नसल्याने काही करू शकत नाहीत,हीदेखील आपल्याकडची दुसरी पण भयानक बाजू आहे.
Saturday, November 3, 2018
शेतीचे उत्पन्न दुप्पट: आग रामेश्वरी,बंब सोमेश्वरी
मोदी सरकारने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विढा उचलला आहे.
अर्थात मागील चार वर्षात काय केलं,याची उत्तरं
मागायची नाहीत.कारण त्याची त्यांच्याकडे उत्तरं आहेत.पण आपण त्यांना शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न कशाच्या
आधारावर दुप्पट करणार आहात,याचं उत्तर मागू शकतो. कसलेही ठोस नियोजन किंवा अंमलबजावणी न करता मोदी सरकारने शेतकर्यांना त्यांना आर्थिक हलाखीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच लोकांचा अशा भंपक गोष्टींवर विश्वास बसणं अशक्य
आहे. मात्र आंधळा विश्वास ठेवणार्यांचे अवघड आहे. त्यांना अगदी सर्व कसं स्वप्न साकारल्यासारखं
वाटत आहे. म्हणतात ना, जसा चश्मा,
तसे समोरचे दिसणार. आंधळ्या विश्वासाचंही तसंच होणार! त्यामुळे खरा प्रश्न आहे,तो मात्र बाजूला पडत आहे. शेती शाश्वत कशी होईल आणि शेतकर्याची आर्थिक उन्नती कशी होईल, याचा विचार होत नाही.
आणि जोपर्यंत तसा कोणी विचार करत नाही,तोपर्यंत
आपल्या देशातील शेतीची परिस्थिती सुधारणार नाही.
Friday, November 2, 2018
पंडवानी गायिका तीजन बाई
छत्तीसग़डमधील भिलाईपासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गनियारी गावात
24 एप्रिल 1956 मध्ये जन्मलेल्या तीजनबाई या सर्व
भावंडांमध्ये सर्वात मोठ्या.वडील हुनुकलाल परधा आणि आई सुखवती
यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तीजन ज्या आदिवासी समाजात
जन्मल्या , तो समाज मध गोळा करत असे. पक्षी
मारत असे. चटई-झाडू बनवत असे. त्या काळात सामान्य वर्गातील मुलींवर अनेक प्रकारची सामाजिक बंधने होती.
अशा परिस्थिती त्या शिकणार कशा? त्यांच्या वाट्यालाही
घरातील कामंच होती. लहान भावा-बहिणींचा
सांभाळ ही सर्वात मोठी जबाबदारी होती. पण तीजन यांना परमेश्वराने वेगळीच देणगी दिली होती. त्या आपल्या आजोबांना
महाभारताच्या कथा ऐकवताना, गाताना ऐकायच्या. ते त्यांना फार आवडायचे. हळूहळू त्याच कथा तीजन यांना
पाठ होऊ लागल्या. त्या लपूनछपून गाण्याचा सराव करू लागल्या.
पण तीजन यांच्या आईला त्यांचे गाणे अजिबात पसंद नव्हते. आईने ज्या ज्या वेळेला त्यांना गाताना पकडले, त्या त्या
वेळेला त्यांना कठोर शिक्षा केली गेली. तीजन सांगतात,मला घरात कोंडलं जायचं, खायला काही दिलं जायचं नाही.
कित्येकदा तर आईने त्यांची बोटेदेखील त्यांच्या घशात कोंबली होती.
जेणेकरून त्यांनी गाणे बंद करावे. पण मी कुठे थांबणारी
होते? मला पंडवानीशिवाय काही सुचतच नव्हते.
Sunday, October 28, 2018
अनुभव शिकवून जातात आपल्याला खास धडे
जीवन ही एक शाळा आहे आणि अनुभव सर्वात
चांगला शिक्षक. अनुभव आपले असोत किंवा दुसर्यांचे, आपण नेहमी त्यातून शिकत असतो. अनुभवी लोकांचे सल्ले आणि गोष्टी मोठ्या कामाच्या असतात. भलेही तुम्ही एकाद्यासारखे शिक्षण घेतले नाही अथवा कसल्याच डिगर्या घेतल्या नसतील तुम्ही, पण काही धडे असे असतात की,
जे फक्त आपल्या जीवनातल्या अनुभवातून शिकू शकतात. पुस्तकी ज्ञानाने ते मिळू शकत नाही.
मोदींचा चमचा आणि मनमोहनसिंह यांचा करिष्मा
मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांचे सल्लागार राहिलेल्या संजय बारू यांच्या पुस्तकावर बेतलेला ' द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' नावाचा चित्रपट लवकरच पडद्यावर झळकणार आहे. यात मनमोहन सिंह यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर करीत आहेत. या चित्रपटाचे नुकतेच शुटींग पूर्ण झाले आहे आणि या निमित्ताने अनुपम खेर यांनी एक बोलकी आणि त्यांच्यात हृदय परिवर्तन झाल्याची पण आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणतात, 'इतिहास तुम्हाला कधीच चुकीचा म्हणणार नाही.तुमच्या सर्वात सुंदर प्रवासासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद.तुमचा प्रवास खूपच चांगला होता.'
वास्तविक अनुपम खेर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमचा म्हणूनच ओळखले जाते.त्यांनी स्वतः देखील ते मान्य केले आहे. त्यामुळे ते अन्य विरोधी पक्षच काय, कॉंग्रेसलासुद्धा नेहमीच लक्ष्य केले आहे.मनमोहन सिंह यांच्यावरील मोदी यांच्या 'रेनकोट' वरील प्रतिक्रियेचे अनुपम खेर यांनीदेखील समर्थन केले होते.मोदी भक्त असलेल्या अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर या चंदीगढ येथून भाजपाच्या खासदार आहेत. मोदी भक्तीत लीन असलेल्या अनुपम खेर यांनी केलेले मनमोहन सिंह यांचे कौतुक खरोखरच धक्कादायक आहे. मोदींचा चमचा म्हणून ओळखले जात असल्याने मनमोहन सिंह यांच्यावर केलेले कौतुक मोदी भक्तांना अर्थात पसंद पडणार नाही, पण अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांचे चित्रपटाच्या माध्यमातून का होईना थोडा काळ जगले आहेत.त्यामुळेच त्यांना खरे मनमोहन सिंह दिसले आहेत. कॉंग्रेसपासून अगदी लांब राहिलेल्या अनुपम खेर यांना मनमोहन सिंह यांच्या जवळ जायचा प्रश्नच येत नाही. साहजिकच मनमोहन सिंह त्यांना कसे कळणार.पण आता त्यांचे हृदय परिवर्तन झाले आहे. स्वतः मनमोहन सिंह यांनीदेखील इतिहास आपले योग्य मूल्यमापन करेल, असे म्हटले होते.
मनमोहन सिंह यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांना सर्वात कमकुवत पंतप्रधान अशी टीका होत असताना ही प्रतिक्रिया दिली होती. विरोधकांना जरी सिंह कमकुवत वाटत असले तरी त्यांना स्वतः ला याबद्दल आत्मविश्वास वाटतो आहे. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान काळात कच्च्या तेलाचे दर आजच्यापेक्षाही जास्त होते आणि जगभरात मंदीचा परिणाम जाणवत होता. अशा वेळेला त्याचा काही एक परिणाम भारतावर झाला नव्हता. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या आसपासदेखील आजच्या राजकारणातले स्वतः ला अर्थतज्ज्ञ म्हणवले जाणारे पोहचू शकत नाहीत. शिवाय पंतप्रधान म्हणूनदेखील ते परंपरेला धरून सक्षम होते. ते कधीच बोलघेवडे नव्हते. कमकुवत तर कधीच नव्हते. शिवाय त्यांनी अनेक पक्षांचे सरकार चालवले आहे.म्हणजे ते कमकुवत कसे असू शकतील? त्यांच्या उदार धोरणामुळेच देश आज प्रगती करू शकला आहे. आपल्याला जगाशी लवकर संपर्क साधता आला. मेहनत, दर्जा याला महत्त्व प्राप्त झाले. आपल्या देशातील उत्पादने जगाच्या बाजारपेठेत आत्मविश्वासाने उतरली. जगाच्या तोडीची उत्पादने होऊ लागली. आज आपण अजून निर्यातीत मागे असायला आपल्या देशाची ध्येय धोरणे कारणीभूत आहेत. आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे आपण अजिबात लक्ष दिलेले नाही.आपली प्रगती कशात आहे आणि ती कशी साधली जाऊ शकते, यावर कोणी बोलायला तयार नाही. त्या दिशेने पावले पडताना दिसत नाहीत. रस्ते, संशोधन, दळणवळण, रोजगार, नवीन तंत्रज्ञान याकडे आपण लक्षच दिले नाही. साहजिकच देश अजूनही म्हणावी अशी प्रगती करू शकला नाही. दुसऱ्याची नक्कल करता येणे सोपे आहे. आपली अक्कल वापरून देशाच्या भल्याचे काही करता येते का ते पाहावे. गेल्या पन्नास वर्षात कॉंग्रेसने काय केले म्हणत फक्त टीकाच करत बसणार का? आपण काय केले ते लोकांसमोर आणले पाहिजे.आज महागाईने फारच वरचे टोक गाठले आहे. चित्र फार विपरीत आणि विचित्र आहे. आपल्या देशात शेती असो अथवा औद्योगिक उत्पादन याचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सर्व बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो तरच आपण प्रगती साधणार आहोत.
मनमोहन सिंह यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांना सर्वात कमकुवत पंतप्रधान अशी टीका होत असताना ही प्रतिक्रिया दिली होती. विरोधकांना जरी सिंह कमकुवत वाटत असले तरी त्यांना स्वतः ला याबद्दल आत्मविश्वास वाटतो आहे. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान काळात कच्च्या तेलाचे दर आजच्यापेक्षाही जास्त होते आणि जगभरात मंदीचा परिणाम जाणवत होता. अशा वेळेला त्याचा काही एक परिणाम भारतावर झाला नव्हता. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या आसपासदेखील आजच्या राजकारणातले स्वतः ला अर्थतज्ज्ञ म्हणवले जाणारे पोहचू शकत नाहीत. शिवाय पंतप्रधान म्हणूनदेखील ते परंपरेला धरून सक्षम होते. ते कधीच बोलघेवडे नव्हते. कमकुवत तर कधीच नव्हते. शिवाय त्यांनी अनेक पक्षांचे सरकार चालवले आहे.म्हणजे ते कमकुवत कसे असू शकतील? त्यांच्या उदार धोरणामुळेच देश आज प्रगती करू शकला आहे. आपल्याला जगाशी लवकर संपर्क साधता आला. मेहनत, दर्जा याला महत्त्व प्राप्त झाले. आपल्या देशातील उत्पादने जगाच्या बाजारपेठेत आत्मविश्वासाने उतरली. जगाच्या तोडीची उत्पादने होऊ लागली. आज आपण अजून निर्यातीत मागे असायला आपल्या देशाची ध्येय धोरणे कारणीभूत आहेत. आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे आपण अजिबात लक्ष दिलेले नाही.आपली प्रगती कशात आहे आणि ती कशी साधली जाऊ शकते, यावर कोणी बोलायला तयार नाही. त्या दिशेने पावले पडताना दिसत नाहीत. रस्ते, संशोधन, दळणवळण, रोजगार, नवीन तंत्रज्ञान याकडे आपण लक्षच दिले नाही. साहजिकच देश अजूनही म्हणावी अशी प्रगती करू शकला नाही. दुसऱ्याची नक्कल करता येणे सोपे आहे. आपली अक्कल वापरून देशाच्या भल्याचे काही करता येते का ते पाहावे. गेल्या पन्नास वर्षात कॉंग्रेसने काय केले म्हणत फक्त टीकाच करत बसणार का? आपण काय केले ते लोकांसमोर आणले पाहिजे.आज महागाईने फारच वरचे टोक गाठले आहे. चित्र फार विपरीत आणि विचित्र आहे. आपल्या देशात शेती असो अथवा औद्योगिक उत्पादन याचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सर्व बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो तरच आपण प्रगती साधणार आहोत.
Saturday, October 27, 2018
ही दुनिया भेसळीची...
सण-उत्सव काळात भेसळखोरांची चलती असते. नफेखोरीसाठी भेसळखोर
दुसर्याच्या जीवावर उठायला मागे-पुढे पाहात
नाहीत. त्यामुळे सण-उत्सव काळात अन्नपदार्थांबाबत
काळजी घेणे ही वैयक्तिक बाब म्हटली पाहिजे. आजच्या धावत्या आणि
जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणसाला धड चांगले, सकस अन्न खायला
मिळत नाही. ज्याच्यासाठी आटापिटा करायचा त्यालाच उपाशी ठेवायचे,त्यालाच मारायचे नाही तर फास्टफूडचा मारा करायचा.मग ते
पोट कूरकूर करणारच! पण तरीही त्याला औषधाचा डोस देऊन गप्प बसवलं
जातं. त्याची काय गरज आहे,हे आपण पाहातच
नाही. त्यामुळेच भेसळखोर सोकावले आहेत. हुबेहूब भेसळ करून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकली जाते. चवीला चवदार लागले की, माणूस मिटक्या मारत खातो.
पण त्याला चव यावी म्हणून काय काय उचापती केल्या जातात, त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातं.
आता दिवाळी तोंडावर आली आहे. तयार अन्नपदार्थ खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
साहजिकच लाडू, करंज्या, शंकरपाळ्या,
अनारस, चिवडा-चकल्या असे
कितीतरी पदार्थ तयार पॅकिंगमध्ये आपल्याला मिळत आहेत. खवा,पेढा,तूप यांची चलती असते. या काळात
भेसळखोर हमखास हात धुवून घेतात. आपल्याकडे कायदे एकदम कडक आहेत,पण त्याची अंमलबजावणी मात्र काटेकोर होत नाही,त्यामुळे
अशा लोकांचे फावतो. अंमलबजावणी यंत्रणा अपुरी पडते आहेच पण ही
यंत्रणादेखील भ्रष्टाचाराने बरबटली आहे. त्यामुळे खरी जबाबदारी
आपल्यावरच येते. दूध पोळण्याची वाट पाहण्यापेक्षा ताकही फुंकून
प्यायला शिकले पाहिजे.
अन्नपदार्थांमधील भेसळ फक्त सणासुदीला
होते, असे नाही. ती कायम सुरूच असते.
फक्त आपण ती आपल्या तीक्ष्ण नजरेने पाहिली पाहिजे. आपल्या देशात सर्वात भेसळ ही दुधात होते. आणि त्याच्यामुळे
सर्वाधिक धोकादेखील त्याच्यामुळेच होत आहे. मागे आलेल्या एका
सर्व्हेक्षणात 60 टक्क्याहून अधिक भेसळ दुधात होत आहे.
एवढे असूनही याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्षच होत
आहे. दुधाला फॅट येण्यासाठी पाण्याबरोबरच युरिया,तेलाची भेसळ केली जाते. दुधानंतर तूप आणि लोणी यात भेसळ
होत आहे. यात प्रामुख्याने रवा किंवा वनस्पती तूप मिसळले जाते.
हळ्द पावडरीत खडूची पावडर, पिवळा रंग आणि रांगोळी
मिसळली जाते. मिरची पावडरमध्ये साधारणपणे लाकडाचा भुसा,
विटांची पावडर मिसळली जाते.हिंग खड्याबरोबर त्याच
रंग-आकाराचे अन्य खडे विकले जातात.
रव्यामध्येदेखील भेसळ केली जाते. वजन वाढवण्यासाठी अनेक लोखंडाचा चुरा मिसळला जातो.
मोहरीमध्ये धोतर्याच्या बिया मिसळल्या जातात.
चहाच्या पावडरीत लाकडाचा भुसा, वापरलेली चहापूड
मिसळली जाते. डाळींना कृतीम रंग देऊन आकर्षक करण्याचा मोह विक्रेत्यांना
आवरत नाही. खाद्य पदार्थांमध्ये धुण्याचा सोडा वापरतात.
त्याच्याने पोटाला इजा झाल्याशिवाय कसे राहील? पिठीसाखरेतदेखील सोडा, बेसनपिठात लाखी डाळीचे,
सोयाबीनच्या किंवा मक्याच्या डाळीचे पीठ मिसळले जाते. लवंग,दालचिनीसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा अर्क काढून
तो विक्रीला बाजारात आणला जातो. दारूसारख्या चैनीच्या पेयातदेखील
स्वस्तातले रसायन मिसळले जाते. स्पिरीट,त्याचबरोबर अन्य विषारी रसायन मिसळले जाते, जे शरीराला
घातक आहेत. मिठाईवर चांदीच्या वर्कसाठी चक्क पत्र्याचे तुकडे,
अॅल्युमिनिअमचा किस तर केशर म्हणून कणसाच्या भुरमुट्याचे
तुरे रंगवून वापरले जाते. असे अनेक पदार्थात भेसळ केली जाते.
शिवाय भेसळ करण्याच्या नवनव्या क्लृप्त्या वापरल्या जातात.
ही भेसळ वास्तविक नफ्याच्या हेतूनच झाली. पूर्वी ती फारच मर्यादित होती,पण
आज ती कुठल्या कुठे पोहचली आहे. कशात भेसळ नाही, हे म्हणणे म्हणजे धाडसाचे ठरावे. आज भेसळीचा भस्मासूरच
वाढला आहे. त्याचे आक्राळविक्राळ रूप लोकांचा जीव घेत आहे.
कायदे कडक असूनही या भेसळखोरांना आळा बसत नाही. काही पदार्थांमध्ये होणारी भेसळ स्लो पायझन ठरत आहे तर काही गोष्टींमधील भेसळ
जन्माचे अपंग करून ठेवत आहे. माणूस खाण्या-पिण्याच्या बाबतीत बेफिकीर आहे. जिभेला चव लागली की त्यांचा
विषय संपतो. फक्त जिभेचे चोचले पुरवले जातात. शरिराचे,पोटाचे काय हाल होतात,त्याकडे
मात्र गांभिर्याने पाहिले जात नाही.
आपल्याकडे खाद्यपदार्थांवर नियंत्रण
ठेवण्यासाठी 1954 पासून कायदा अस्तित्वात आहे.
भेसळ वाढत चालल्याने वेळोवेळी या कायद्यात सुधारणा होत आली आहे.
भेसळ प्रतिबंधक कायदा 2011 अस्तित्वात होता,पण त्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2016 अस्तित्वात
आला.किरकोळ अटींचे उल्लंघन करणार्यांवर
दंडात्मक कारवाईची तरतूद यात करण्यात आली आहे. राज्यात अन्न व
औषध प्रशासनाचे सहआयुक्त हे न्यायनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याचा अधिकार आहे.
आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूदही
या कायद्यात आहे. भेसळ प्राणावर बेतल्यास जन्मठेपेपासून ते फाशीच्या
शिक्षेपर्यंतची तरतूद करण्यात आली आहे.
असे असले तरी शेवटी कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.
कायद्याच्या रक्षकांनी आपले काम चोख बजावल्यास भेसळीला नक्कीच आळा बसल्याशिवाय
राहात नाही.पण त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. शासन आणि प्रशासनाने ही बाब आपल्या मनावर घेतली पाहिजे.
Tuesday, October 23, 2018
(बालकथा) चोर कोण?
राजा कृष्णदेवराय कलाकारांचा सन्मान
करायचा. एकदा राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एक चित्रकार आला.
त्याने अनेकांची चित्रे काढली. चित्रे अप्रतिम
होती. दरबारातल्या लोकांनी त्याची वाहवा केली. चित्रकारने राजा कृष्णदेवराय यांचेही चित्र बनवले. ते
पाहून राजा खूश झाला. चित्रकाराने राजमहालाचे चित्र काढण्याची
परवानगीही घेतली. आता तो बेधडक राजमहालात कुठेही प्रवेश करत असे.
राजाने परवानगी दिली असल्याने कुणीच त्याला अडवत नव्हते. लवकरच राजमहालाचे चित्र पूर्ण झाले.
राजमहालाचे चित्र खरोखरच अप्रतिम काढले
होते. आता चित्रकाराने जायची परवानगी मागितली. राजा कृष्णदेवराय म्हणाला, “ तू उत्तम चित्रकार आहेस.
तुझा आम्हाला सन्मान करायचा आहे. आणखी दोन दिवस
रहा. मग जा. ”
चित्रकाराच्या सन्माचा दिवस निश्चित झाला. पण त्याच्या आदल्या रात्रीच
चित्रकाराच्या साहित्याची चोरी झाली. दुसर्या दिवशी सेनापतीने राजाला सांगितले.
“ महाराज चोर सापडला आणि साहित्यही.
”
राजाने विचारले, “ कोण आहे तो
चोर? ”
“ महाराज, हे
सगळे आता तेनालीराम सांगेल. ” सेनापती म्हणाला.
राजाने आश्चर्याने तेनालीरामकडे पाहिले.
तेनालीराम हात जोडून उभा राहिला आणि
म्हणाला, “ महाराज,
मीच चोर आहे. हे त्याचे सामान. ”
दरबारात चुळबूळ सुरू झाली. प्रत्येकजण म्हणत होता, “ तेनालीरामने
अतिथीचा अपमान केला.ङ्घ
तेव्हा तेनालीराम म्हणाला, “ महाराज,
हा चित्रकार नाही, शत्रूचा जासूस आहे. राजमहालाचे चित्र बनवता बनवता याने सर्व गुप्त मार्गांचा नकाशा बनवला आहे.
मला याच्यावर संशय आल्याने याचे साहित्य उचलले. आपल्याकडून हा सन्मान घेऊन निघून गेला असता,पण आपली संपूर्ण
गुप्त माहिती त्याने शत्रू राजाला पुरवली असती. ”
राजाने चित्रकाराला तुरुंगात टाकले. चित्रकाराऐवजी राजाने तेनालीरामचा सन्मान केला.
Sunday, October 21, 2018
आपण जेव्हा दुसर्याकडून अपेक्षा करतो, तेव्हा...!
दुसर्याने आपला आदर करावा, असे ज्याला
वाटत असते, त्याने प्रथम दुसर्याचा आदर
करायला शिकले पाहिजे. एकाद्याशी मैत्री करायची असेल तर पहिल्यांदा
आपल्याला दोन पावले पुढे टाकली पाहिजेत. दुसर्याने आपले कौतुक करावे असे वाटत असेल तर प्रथम आपण दुसर्याचे कौतुक करायला शिकले पाहिजे. या सगळ्याचा फक्त एकच
अर्थ आहे, तो म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरूवात करायची असेल
किंवा तशी अपेक्षा करायची असेल तर पहिल्यांदा आपण स्वत: तसे वागतो
का, हे पाहिले पाहिजे. तरच आपण दुसर्याकडून तशी अपेक्षा करू शकतो. आपण दुसर्याशी तुसडेपणाचे वागायचे आणि आपण त्याच्याकडून आदराची अपेक्षा करायची,
ही गोष्टच चुकीची आहे. अनेकांना आपल्याकडच्या पैशांची
मस्ती असते. खरे तर पैसा हा कधी मस्ती करायला लावत नाही.
आपणच मस्तीला येतो. कारण पैशांच्या जीवावर काहीही
खरेदी करता येते, असे त्यांना वाटत असते. पण या जगात पैशाने सगळेच काही विकत घेता येत नाही, याचा
खरे तर अनेक मस्तवाल लोकांना प्रचिती आली आहे. पण तरीही पैशालाच
सर्वस्व मानणार्यांना कधीच याची कल्पना येत नाही. ज्यावेळेला पैसा देऊनही पाहिजे ती गोष्ट मिळत नाही, तेव्हाच
त्याला त्याचा अनुभव येतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचा अनुभव असतो.
आज अनुभवी लोकांची खरी गरज आहे. त्यांच्या सल्ल्यांची आवश्यकता आहे. या जगात वावरत असताना अनुभवाची शिदोरी महत्त्वाची आहे. पण काही लोकांना ही माणसेच नको आहेत. त्यामुळेच म्हातारे
झालेल्या आई-वडिलांना घराबाहेर काढले जात आहे. त्यांना अनुभवाची गरज नसते. त्यांची अडचण दुसरीच असते.
ही अनुभवी मंडळी चार गोष्टी सांगायला गेली तर ही मंडळी त्यांनाच गप्प
बसवतात. त्यांच्या लेखी म्हातारी माणसे ही बिनकामाची असतात.
अशा लोकांनी चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या अंगाचा तीळपापड
होतो. त्यांच्यावर हात उगारण्यापर्यंत यांची मजल जाते.
पैसा त्यांना सर्वांपेक्षा श्रेष्ठ वाटत असतो. त्याच्या प्रेमात अशी मंडळी अक्षरश: आंधळी झालेली असतात.
त्यांना त्यामुळे समोर लहान-मोठे कोण आहेत,
आदर कुणाचा करावा, असले काही म्हणजे काही दिसत
नाही. काहींच्याबाबतीत त्यांची परवरीशदेखील महत्त्वाची आहे.
कारण घरी ज्याप्रकारे धडे मिळतात, तशीच त्यांची
बाहेर वागणूक असते. पण चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे.
त्याचा सन्मान केला पाहिजे.
दुसर्याकडून आपण अपेक्षा करतो, तेव्हा
तरी आपले वागणे आपल्या लक्षात यायला हवे. या जगाची रीतच अशी आहे,
आदर करणार्याचाच आदर केला जातो. ज्याने मदत केली त्यालाच ती मिळत राहते. इतकेच काय तर
ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडेच ती जाते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे फक्त दुसर्याकडून अपेक्षा करून कशी चालेल? आजकाल माणसे फार हुशार
झाली आहेत. पुढच्याचा आपल्याला उपयोग होत असेल तरच त्याच्याशी
बोलतात, नाही तर त्याला बगल देऊन लोक पुढे जातात. आज लोकांना विनाकारण बोलत बसायला वेळ नाही. विशेष कुणाचे
कुणाविना काही अडत नाही. ज्याच्यावर तुम्ही मेहरबानी केली आहे,
तोच तुमच्यासाठी वेळ देतो.पण तो काही मनापासून
तसा करत नाही. त्याच्या तोंडात तुमच्याविषयी शिव्याच असतात.
आपण दारू ढोसायची, बायका करायचा, आणखी काय काय उद्योग
करायचे आणि उलट दुसर्याला तो तसा करतो म्हणायचे, हे पटतं का बघा! प्रत्येकाचे एक खासगी आयुष्य असते.
त्याच्या त्या आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणाला नाही. उलट सार्वजनिक आयुष्य जगणार्यांनी आपले आयुष्य काळजीने
जपायला लागते. त्यांना लोकांसमोर जायचे असते. जर तुमची प्रतिमा त्यांच्यात चांगली नसेल तर तुम्ही कधीच सार्वजनिक जीवनात
वर येणार नाही. पैशाच्या जीवावर ते खरेदी केले तरी ते जास्त काळ
करता येत नाही. आणि ते जास्त काळ टिकतही नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे अशा अपेक्षा धरतात. एक महिला स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आली. तिला
वाटायला लागले, मला सगळ्यांनीच नमस्कार केला पाहिजे. हे कसे शक्य आहे? तुमच्याकडे ज्यांचे काम आहे,
ते नक्कीच तुमची लांगूनचालून करतील, तुम्हाला नमस्कार
करतील आणि तुमचा चमत्कारही स्वीकारतील.पण ज्यांचा तुमच्याशी काहीच
संबंध नाही. ज्यांना तुमच्याशी काहीच देणे-घेणे नाही, ते बरं तुम्हाला नमस्कार-चमत्कार करतील?
उलट सार्वजनिक क्षेत्रातल्या माणसाने
नमस्कार मागायचा नसतो. आपल्या कामातून तो मिळवायचा
असतो. तुमचे कामच ते करून जाते. तुम्हाला
त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. तुमच्या कार्यातून तुमची
ओळख होते. तुमच्याकडे ज्याचे काम नसते, पण तरीही तुमच्या कामातून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचलेले असता. तेव्हा तो तो नक्कीच तुम्हाला नमस्कार करील. तेव्हा तुमचे
कार्य त्याच्यापर्यंत पोहचलेले असते, हे लक्षात ठेवा.
Saturday, October 20, 2018
जगात देव नाहीच?
आपल्या या पृथ्वीतलावर आस्तिक आणि नास्तिक
अशा दोन प्रकारचे लोक राहतात. देवाचे अस्तित्व
मानणारे आस्तिक आणि नाकारणारे नास्तिक अशी त्याची साधीसरळ व्याख्या आहे. या जगात सर्वाधिक देव म्हणजे 32 कोटी देव एकट्या भारतात
आहेत. अन्य देशातल्या देवांची संख्या माहीत नाही. पण प्रत्येक जाती-धर्मानुसार त्यांची संख्या मात्र एकापेक्षा
अधिक आहे, हे मात्र नक्की आहे. काहीजण देवाचे
अस्तित्व नाकारून स्टंटबाजी करतात. तर्क-वितर्कावर न घासता अनेकजण वरवच्या विचारावर देवाचे अस्तित्व नाकारून मोकळे
होतात. परंतु, हीच मंडळी स्वत: संकटात सापडल्यावर देवाचा धावा करतात. त्यामुळे देवाचे
अस्तित्व नाकारण्याच्या निश्चयावर ही मंडळी ठाम नसतात.
त्यांचा त्यांच्या स्वत:वरच विश्वास नसल्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. मात्र तरीही काही
लोकांना देव हा फक्त अडचणीच्यावेळीच आठवतो. अन्य वेळी त्याचा
आपोआप विसर पडतो.
आज विज्ञानाने प्रचंड मोठी प्रगती केली
आहे. सूर्यमालेच्या बाहेरचे विश्व तपासण्याचा
प्रयत्न कसोशीने सुरू आहे. आतापर्यंतच्या संशोधनात या ब्रम्हांडात
असंख्य सूर्यमाला असल्याचे आढळून आले आहे. आपल्या सूर्यमालेत
पृथ्वीसारखा ग्रह आणि मानववस्ती अद्याप आढळून आली नसली तरी अन्य सूर्यमालेत अशी पृथ्वी
आणि मानवासारखा बुद्धीजीवी आणि सजीवसृष्टी असण्याची शक्यता बहुतांश शास्त्रज्ञांनी
मान्य केली आहे. मात्र अशा एलियनचा अद्याप सुगावा लागलेला नाही.मात्र यामुळे मानव निराश झालेला नाही. त्याचे प्रयत्न
सुरूच आहेत. अशा या अनंत ब्रम्हांडात सध्या माणूस विहार करत असताना
त्याला अजून स्वर्ग आणि नरकचा शोध लागलेला नाही. पाप-पुण्याच्या आज ज्या गोष्टी आपण करत आहोत, त्याचा लेखाजोखा
कुणीतरी ठेवतो आणि त्यानुसार आपल्या आत्म्याचा वास निश्चित ठरतो,
अशा कल्पना आपल्यासमोर विविध माध्यमांतून मांडण्यात येत आहेत.
अर्थात जीवसृष्टीच्या उत्पत्तीची उकल अद्याप झाली नसली तरी त्याच्या
मागचा ससेमिरा मानवाने अर्थात शास्त्रज्ञांनी सोडलेला नाही. पण
तरीही अनेकांना स्वर्ग आणि नर्क या कल्पनाच असल्याचे वाटते. एका
बाजूला जगाच्या निर्मितीचा शोध सुरू असताना दुसर्या बाजूला लोक
मोठ्या प्रमाणात देवा-धर्माच्या मागे लागल्याचे दिसत आहे.
हा खरे तर मोठा संशोधनाचा विषय आहे.
या जगात हौश्या-गवश्यांचा मोठा बाजार आहे. श्रीमंत-गरीब ही जी दरी आहे,ती अन्यबाबतीतही आहे. आणि याचमुळे बहुतांश लोक नशीब, प्राक्तन,देवाच्या नादी लागले आहेत. जर या जगात सर्वांना एकसारखे
राहायला,खायला आणि नेसायला मिळाले असते तर देव ही कल्पना बर्यापैकी कमी झाली असती. अभ्यास न करता परीक्षेत पास कर,म्हणून देवाकडे साकडे घालणे जसे चुकीचे आहे, तसेच देवाच्या
नावावर लोकांची फसवणूक करणेदेखील चूक आहे. यातून मोठमोठी मंदिरे
श्रीमंतीने गलेलठ्ठ झाली आहेत. लोक देवाला शरण जाऊन लाखोंची देणगी
देवाला अर्पण करत आहेत. आपल्या देशातल्या सर्व मंदिरांची संपत्ती
गोळा केली तर एका झटक्यात आपल्या देशाची गरिबी दूर होऊन जाईल. पण संपत्तीचे समान वाटप जसे अशक्य आहे, तसेच आपल्या देशातील
गरिबी हटणे त्याहूनही कठीण आहे. काही मंदिरांचे ट्रस्टी त्यांना
मिळालेल्या देणगीतून शाळा-कॉलेज, इंजिनिअरिंग,
डॉक्टरकीचे कोर्सेस,हॉस्पीटल्स चालवत आहेत,मात्र त्यातूनही ते पैसाच लाटत आहेत. तिथे शिक्षणासाठी
विद्यार्थ्यांकडून पैसा हा लाटला जातोच. त्यामुळे या संस्थासुद्धा
चराऊ कुरण बनल्या आहेत. त्यामुळे या संस्थांकडून फार चांगली समाजसेवा
सुरू आहे, म्हणणे धाडसाचे आहे.
या मंदिरांच्या ट्रस्टी लोकांना देशासाठी
खूप काही करण्यासारखे आहे. आपल्या देशातल्या विविध
संशोधनासाठी या मंदिराच्या ट्रस्टींनी पैसा गुंतवायला हवा आहे. तसेच जी मंडळी मंदिरांना देणगी देतात, त्यांनाही देशासाठी,
समाजातील गोरगरिबांसाठी काही करता येण्यासारखे आहे,पण इच्छाशक्ती आणि पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने ही मंडळी मंदिरांना देणगी देऊन
आयते पुण्य मिळवू पाहात आहेत. पण खरी सेवा ही मानवसेवा आहे,
हे पटवून द्यायला आपण कमी पडत आहोत. आणि हे जोपर्यंत
होत नाही, तोपर्यंत देशातील गरिबी हटणार नाही. गरिबी हटत नाही, म्हणजे ही मंदिरांमधील गर्दीही हटणार
नाही. साहजिकच ही सारी व्यवस्था पूर्वापार पद्धतशीरपणे बनवण्यात
आली आहे. ही परिस्थिती फक्त आपल्याच देशात नव्हे तर सर्वत्रच
आढळून येत आहे. गरिबी ही फक्त आपल्याच देशात नाही, सर्वच देशात कमी जास्त प्रमाणात ती आहे. आज चीन,
अमेरिका, रशियासारखे देश वैज्ञानिक प्रगतीवर जोर
देत असताना आम्ही मात्र पुतळे आणि मंदिरे उभारण्यात आपला वेळ आणि पैसा खर्ची घालत आहोत.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातून एकही मोठे संशोधन समोर आलेले नाही.
आपण कितीकाळ मागच्या संशोधनाचा आणि शास्त्रज्ञांच्या नावावर जगणार आहोत
माहीत नाही,पण संख्येने सर्वाधिक तरुण असलेल्या या देशाला हे
भूषणावह नाही. आपल्या देशात जोपर्यंत राजकारणावर चर्चा करण्याचे
आणि त्यांना महत्त्व देण्याचे थांबत नाही,तोपर्यंत आपल्या देशाची
प्रगती अशक्य आहे. इंग्लंडसारख्या देशात राजकारण्यांना फारसे
महत्त्व नाही. आपण मात्र त्यांना भलतेच महत्त्व देत आहोत.
आपला देश नोकरशहा आणि राजकारणी यांच्या संगनमताने चालला आहे.
वास्तविक तो समांतर चालावयास हवा होता. एकमेकांमधला
हस्तक्षेप चुकीचा आहे. आणि यामुळेच आपल्या देशात भ्रष्टाचार बोकाळला
आहे.
अशा या वातावरणात या जगात देव नाहीच, असा दावा विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ
स्टीफन हॉकिंग यांनी केला आहे. त्यांचे ब्रिफ आन्सर्स टू द बिग
क्वेश्चन्स नावाचे त्यांचे शेवटचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले
आहे. यात त्यांनी हा दावा केला आहे. ते
म्हणतात, देव हा प्रकार अस्तित्वात नाही. विश्वाची निर्मिती कोणीही केलेली नाही आणि कोणाचीही
आपल्यावर सत्ता नाही. ते पुढे म्हणतात की, देवाच्या शापामुळे माझ्यासारख्या अनेक व्यक्तींना अपंगत्व आले असल्याचे अनेक
शतकांपासून मानले जात होते. मात्र निसर्गाच्या कायद्याद्वारे
पाहिल्यास आपल्याला सर्व प्रश्नांचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण मिळू
शकते. हे विचार त्यांनी देव आहे का? या
स्वतंत्र शिर्षक असलेल्या लेखात म्हटले आहे. ते अल्बर्ट आइन्स्टाइन
यांच्याप्रमाणेच आपण निसर्गाच्या कायद्यासाठीच देव हा शब्द वापरतो, असे म्हणतात. आणि अशा पद्धतीने विचार केल्यास या शतकाअखेरपर्यंत
आपण म्हणजे मानव देव
जाणून घेऊ, असेही भाकित केले आहे.
शास्त्रज्ञ, संशोधक देवाच्या अस्तित्वाचा शोध घेत राहतील,पण त्यांचे शोध सामान्य लोकांपर्यंत आले पाहिजेत आणि त्यांनीही याचा विचार
करायला हवा आहे. आपण आपली एनर्जी भ्रष्टचार,फसवणूक करण्याबरोबरच फक्त पैसा मिळवण्यात घालवत आहोत. भौतिक सुविधांची लालसा आपल्याला लागली आहे. काहींना काम
न करता पैसे कमवायचे आहेत. काहींना दुसर्यांना लुटून आपले घर भरायचे आहे. इथे प्रत्येकजण आपापल्या
स्वार्थासाठी देवाचा वापर करतो आहे, दुसर्याला भुनवतो आहे.त्यामुळे साहजिकच आपले जीवन भरकटत चालले
आहे. माणसाने विचार करायचे सोडून दिले तर उद्या कदाचित कृत्रिम
बुद्धीचा रोबोट नक्कीच आपल्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. कदाचित उद्या या रोबोटलाच लोक देव मानू शकतील. कारण बहुतांश
लोकांचा आजचा प्रवास याच दिशेने चालू आहे. आज मूठभर लोकांकडे
श्रीमंती आहे. उद्या अशाच मूठभर लोकांकडे संपूर्ण जगाची सत्ता
असू शकेल. आणि आपण देवाच्या नावावर अधिक उपासतापास करत बसू.
Thursday, October 18, 2018
Sunday, October 14, 2018
भारताची भूकबळीच्या दिशेने वाटचाल
ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 (जीएचआय)
चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात आपल्या
देशाला भूकबळी करण्यात अपयश आल्याचेच दिसत आहे.यानिमित्ताने मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यासाठी
उपाययोजना करू शकले नाही, हे यातून उघडपणे दिसत आहे. कारण 2014 मध्ये भारत भूकबळी संपवणार्यांच्या 119 देशांच्या यादीत 55 व्या स्थानावर होता, आता म्हणजे 2018 मध्ये 103 व्या स्थानावर आहे. याचाच
अर्थ भारतातल्या बहुतांश लोकांना अजूनही पोटभर खायला अन्न मिळत नाही. त्यात महागाईने तर कहरच केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती तर सातत्याने वाढत आहेत. या किंमत वाढीचा
परिणाम अन्य घटकावर होतो आणि साहजिकच अन्य वस्तू, पदार्थ,
घटक यांच्या किंमती भडकतात. सध्या हेच सुरू आहे.
मोदी सरकार भूकबळींची संख्या कमी करण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेत आहे,
हेच कळायला मार्ग नाही.
नरेंद्र मोदी पंतप्रधान
झाल्यापासून भूकबळींची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. भूकबळी
संपविणाऱया देशांच्या या यादीत 2014 साली भारत 55 व्या स्थानावर होता. तो 2015 मध्ये या स्थानावरून 80 व्या स्थानापर्यंत पोहचला.
पुढे 2016 मध्ये 97 आणि
2017 मध्ये 100 व्या स्थानावर अशी घसरण भारताची झाली आहे.
मात्र, यंदा म्हणजेच 2018 मध्ये भारत या यादीत 103 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जवळपास पन्नास टक्के आपल्या देशाची घसरण ही मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हटली पाहिजे. या यादीत आपल्या शेजारचा पाकिस्तान 106 व्या क्रमांकावर
आहे. पण, या देशाबरोबरच स्पर्धाच होऊ शकत
नाही. ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो आहे, तो चीन या यादीत 25 व्या स्थानावर आहे. ही फार मोठी तफावत आहे. अशाने आपला भारत देश महासत्ता
बनू शकणार आहे का? या महासत्तेच्या आजूबाजूलाही कोणी फिरकू देणार
नाही.
ही आपल्या देशाची निराशजनक
कामगिरी आहे.
भूकबळींची संख्या आपण कमी करण्यात कमी पडलो आहे, हे स्पष्ट दिसत असताना मोदी सरकार यावर काय उपाययोजना करते आहे, ही आपल्याला दिसत नाही. ग्लोबल हंगर इंडेक्सकडून आलेल्या
अहवालानुसार जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळीचे
आकलन करण्यात येते. या संस्थेकडून 5 वर्षांपेक्षा
कमी वयाच्या किती चिमुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे. तसेच यामध्ये बालमृत्यू दर किती, हेही तपासले जाते.
त्यानुसार 119 देशांच्या यादीत भारत
103 व्या स्थानावर आहे.गतवषी या यादीत भारत
100 व्या स्थानावर होता. त्यामुळे भुकबळी कमी करणाऱया
देशांच्या यादीत भारत मागे पडत चालला आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी
सरकार देशातील भूकबळींचे आव्हान स्वीकारणार आहे की नाही? का अशीच
देशाची घसरण चालू ठेवणार आहे? आपल्या देशात उद्योगपती आणखी गब्बर
होत चालले आहेत आणि जनता आणखी गरीब चालली आहे. याच्याने देशात
शांतता कशी नांदेल? देशात लूटमार, चोर्या-मार्या होत आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे पोटासाठीच आहेत. लोकांची त्यांच्या
पोटाची शमली की, अशा प्रकारचे गुन्हे निश्चितच कमी होतील. पण मोदी सरकारला गरिबांपेक्षा श्रीमंत
उद्योगपतींचा कळवळा अधिक येत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. मोदी सरकारने खरे तर यावर तातडीने उपाययोजना करायला हवी आहे.नाही तर अशीच भारताची घसरण होत राहिली तर देशात आराजकता माजल्याशिवाय राहणार
नाही.
Saturday, October 13, 2018
योग्य वेळी योग्य निर्णय, तुम्हाला मिळेल सक्सेस
जीवन
म्हणजेच चढौतार. सुख-दु:ख
जीवनात दिवस-रात्र, ऊन-सावलीप्रमाणे येत राहतात. जीवनात यशापयश येत राहतं.
संधी येतात, मनाची चलबिचल होते. पण तेच लोक यशस्वी होतात, जे प्रत्येक परस्थितीला धैर्याने
तोंड देतात आणि योग्य संधीचा योग्य फायदा उठवतात. मग ते जीवन
असेल,शिक्षण असेल. योग्य वेळेला योग्य प्रश्न विचारणाराच पुढे जातो. याचाच अर्थ यशासाठी आपल्यासाठी
योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. जर याचा अभाव
असेल तर खूप मेहनत करूनही काही उपयोग होत नाही.
भितीला
पळवून लावा
प्रत्येक
माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे त्याच्यात असलेली भिती. या भितीमुळेच माणूस निर्णय घ्यायला वेळ लावतो. जो चुकला
तो संपला, हे तुम्हाला माहित आहे. निर्णय
घेण्यात उशिर लावलात,याचाच अर्थ वेळेचे नुकसान आणि डोक्यातल्या
काळज्यांना प्रोत्साहन. चिंताग्रस्त असलेले मन, डोके कधीही पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. क्षमतेचा
भरपूर उपयोग करू शकत नाही. आजच्या तरुण पिढीला प्रत्येक वेळेला
स्वत: स्वत:ला कोणता ना कोणता निर्णय घ्यावा
लागतो. काही लोक खूप दिवस विचार करतात आणि मग निर्णय घेतात.
तरीही त्यांचा निर्णय चुकलेला असतो. याचे कारण
म्हणजे मनातील भिती. विज्ञानशास्त्र आणि विश्लेषणयुक्त दृष्टिकोनयुक्त विचाराचा अभाव.
सार्थक
जीवन
जगात
अशी असंख्य काही उदाहरणे आहेत,ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं,
पण आपला आत्मविश्वास कदापि ढळू दिला नाही.
योग्य वेळेची प्रतीक्षा आणि प्रामाणिक काम तुम्हाला यशाच्या शिखराकडे
घेऊन जाते. एक दिवस संधी मिळते आणि त्यांना जीवनात जबरदस्त यश
मिळून जातं. असं म्हटलं जातं की,तप्त लोखंडावर
घाव घातल्यावर त्याला पाहिजे असा आकार देता येतो. मात्र तेच थंड
लोखंडावर कितीही घाव घातलात तरी तुम्हा हवी ती वस्तू तयार होऊन मिळत नाही. धैर्याबरोबरच काम करत असताना आपल्या मार्गावरून जाता जाता आपल्याला एक ना एक
दिवस अशी संधी मिळून जाते आणि आपल्या जीवनाचे सार्थक होते.
विचाराला
बनवा शास्त्रज्ञ
निर्णयाला
विलंब म्हणजे आपला आपल्यावर विश्वास नसणं.वैज्ञानिक
दृष्टीकोनाचा अभाव आणि भिती.माणसाला सर्वात पहिल्यांदा आपल्या
विचाराला वैज्ञानिक आणि विश्लेषणयुक्त बनवणं. मनात घर करून राहिलेल्या भितीला पळवून लावलं पाहिजे. आताच्या तरुण पिढीला विचार करायला भाग पाडून वैज्ञानिक दृष्टीकोनातून सक्षम
बनवलं पाहिजे. तरुणांनी समाजातील बर्या-वाईट गोष्टींचा अभ्यास करायला हवा. माणसाने स्व्त:ला प्रत्येक वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवलं पाहिजे.
मानवी जीवनात शिक्षणाचा मुख्य स्त्रोत हा आपला निसर्गच आहे. जर माणसाने या निसर्गाच्या नियमों पालन करत जगला तर त्याचे विचार पूर्णपणे
वैज्ञानिक होऊन जातात.
निसर्ग
समजून घ्या
या
निसर्गातील कुठलीच गोष्ट टाकाऊ, बेकार नाही. प्रत्येकाला आपले असे महत्त्व आहे. या सर्व कार्य आणि
उपयोगितांना समजून घेतले पाहिजे. ओळखले पाहिजे. आपण प्रकृतीकडून शिक्षण घेतले पाहिजे. जर आपण निसर्गाच्या
नियमांना समजून घेतले तर मनातील भिती दूर होते. आणि मनातील भिती
दूर होणे म्हणजे योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे होय. योग्य वेळी,
योग्य निर्णय माणसाला उन्नतीचा मार्ग दाखवतात.
नोकरी
न मिळाल्यास, नापास झाल्यावर, नोकरी सुटल्यावर
माणसाच्या मनात नकारात्मक भाव जमा व्हायला लागतात. अशा वेळी माणसाने
स्वत:ला माझ्याच बाबतीत असे का घडले, असा
प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचे उत्तर मिळून जाते.
मीटू ची सुरुवात 2006 ला;अमेरिकेत शिक्षाही झाली
तनुश्री दत्तने प्रसिद्ध अभिनेता
नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी आपले बंद ठेवलेले
तोंड उघडले आहे. यामुळे साहजिकच बॉलीवूडमध्ये चांगलीच
खळबळ उडाली आहे. त्यानंतर विन्टा नंदा, नवनीत झिशन, संध्या मृदुल आणि दीपिका अमीन यांनी आपला लैंगिक छळ
झाला असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अनेक कलाकारांना स्पष्टीकरण
द्यावे लागले आहे, तर चेतन भगतसारख्या लेखकाला माफी मागावी लागली
आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरविरोधात मोहिम उघडल्यानंतर देशात
बरीच खळबळ उडाली. अनेकांना तनुश्रीची भूमिका संशयास्पद वाटत होती,मात्र नंतर एक-एक महिला सामिल होऊ लागल्यावर मी टू हे
प्रकरणच वेगळे असल्याचे समोर आले. आता यात फक्त बॉलीवूड कलाकारच
नाही तर राजकीय व्यक्तीही अडकले असल्याचे एम.जे. अकबर यांच्यावरील आरोपावरून स्पष्ट झाले आहे. या मोहिमेची
कक्षा आता वाटतच जाईल, असे संकेत मिळत आहेत. याचा शेवट कसा होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण परदेशातही या मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभत आहे आणि अमेरिकेत यासंदर्भात
शिक्षाही झाली आहे. मात्र मनेका गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे
कुणी आपला अपमान केला आहे,म्हणून त्याच्यावर सूड उगवण्यासाठी
केलेला आरोप या मोहिमेचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही.
तनुश्री दत्त ही फक्त आरोप करून थांबली नाही
तर तिने पोलिसांत अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे.2008
मध्ये ’हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत
असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला होता.
नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य,
चित्रपट निर्माता सामी सद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावरमुंबईतील
ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, तनुश्री दत्ताच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकरसह अन्य
तिघांना नोटीस पाठवली आहे.
पडद्यावर संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे अलोकनाथ यांच्याविरोधात तर अनेक
महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. एका टेलीफिल्मच्या चित्रीकरणादरम्यान
आलोकनाथने जबरदस्तीने आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप दीपिकाने ट्विटद्वारे केला आहे. आलोकनाथवर सिनेसृष्टीतील
4 महिला कलाकारांनी आरोप केल्यानंतर दीपिका अमीननेही मीटू मोहिमेत पुढे
येऊन आलोकनाथने दिलेल्या त्रासाला वाचा फोडली होती. अनेक वर्षांपूर्वी दीपिका आणि आलोकनाथ
एका टेलिफिल्मसाठी चित्रीकरण करत होते. या टेलिफीमच्या चित्रीकरणादरम्यान
एक दिवशी दीपिका एकटीच तिच्या खोलीत बसली होती. तेव्हा दारूच्या
नशेत तिच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न आलोकनाथने केला. त्यानंतरही
आलोकनाथने दीपिकाला त्रास देऊ नये म्हणून सेटवरची सगळी माणसे कायम तिच्या अवतीभवती
असायचे. आलोकनाथ कायम दारू पिऊन मुलींच लैंगिक शोषण करायचा हे
सिनेजगतात सर्वश्रुत आहे. दारू पिऊन सेटवरती गोंधळ घालणे हे त्याच्यासाठी
नेहमीचच होते. मुलींना बघून त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवताच येत नसायचे, अशा शब्दात तिने आपला
संताप व्यक्त केला आहे. रेणुका शहाणे यांनीही अलोकनाथ यांचे दारू
पिल्यानंतरचे रूप वेगळे असायचे म्हटले होते.
कंगणा राणावतनेदेखील मी टू या मोहिमेत उडी घेतली
आहे.
चित्रपट दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणार्या महिलेचे समर्थन करत अभिनेत्री कंगना रनौत हिने त्यांच्यावर गंभीर आरोप केले
आहेत. विकास बहल हे सेक्ससंबंधीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे,
असे म्हणत कंगनाने खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे
आता बहल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बहल यांच्या
’क्वीन’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार्या कंगनाने लैंगिक छळासंबंधी स्वतःला आलेला अनुभव शेअर करत पीडित महिलेचे समर्थन
केले आहे. 2014 मध्ये ‘क्वीन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्या वेळी बहल यांचे
लग्न झाले होते. ते पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांविषयीच्या गोष्टी
माझ्याशी शेअर करायचे, असा आरोप तिने केला. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आमची भेट व्हायची, त्यावेळी
ते गळाभेट घ्यायचे. तेव्हा तुझ्या केसांचा सुगंध खूप आवडतो असे
ते म्हणायचे, असा आरोपही तिने केला. त्यापाठोपाठ
कंगनाने हृत्विक रोशनला सोडले नाही. बायकोला घेऊन काही पुरुष मिरवतात आणि प्रेयसीला लपवून ठेवतात
त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, असंही ती म्हणाली आहे.
आणि हा टोला हृतिकसाठी होता का असे पत्रकारांनी विचारल्यावर,
हो मी हृतिकबद्दलच बोलत असल्याचे अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटले आहे.
शिवाय यावर कढी म्हणजे लोकांनी त्याच्यासोबत काम करणे बंद केले पाहिजे,
असे कंगनाने म्हटले आहे. हृतिक आणि कंगनामधील वाद
बॉलिवूड आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता.
एका महिला छायाचित्रकाराने नुकतेच ट्विट करत
कैलाश खेरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका पत्रकार मैत्रिणीसोबत
खेर यांची मुलाखत घेण्यासाठी गेली असता, ही घटना घडल्याचे तिने
यात म्हटले आहे. मुलाखती दरम्यान दोन्ही महिलांच्या मधोमध बसून
कैलाश मला वारंवार स्पर्श करत होता. तिने आपल्या सहकारी पत्रकाराला
ही घटना त्या मुलाखतीत प्रसिद्ध करायला सुचवल्यावर, अशाप्रकारच्या
बातम्या छापल्या जात नाहीत, असे सांगण्यात आल्याचे तिने म्हटले
आहे. कैलाश खेरव्यतिरिक्त या महिला छायाचित्रकाराने मॉडेल जुल्फी
सय्यदवरही अशाप्रकारचे आरोप केले आहेत.
परराष्ट्रमंत्री एम.जे. अकबर यांच्यावरही पत्रकार सबा नकवी आणि लेखिका गजाला
वहाब यांनी अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. अन्य दोन महिलांनीही
त्यांच्यावर आरोप केले आहेत. महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर
परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर अडचणीत
आले आहेत. आता त्यांना आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार
आहे. ’मी टू’ मोहिमेने धुमाकुळ घातला असताना,
अशा थेट आरोपानंतर अप्रत्यक्षरित्या यात आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही
नाव जुडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट
सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. मी अमिताभ बच्चन यांच्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही
पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचा महानायकाचा बुरखा
फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानीने केले आहे. तसेच ट्विटरच्या
माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे.
तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एक चळवळकर्ते म्हणूनच
सादर केले गेले. मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला
खात्री आहे. या मोहिमे अंतर्गत जेव्हा तनुश्री दत्ता आणि नाना
पाटेकर यांचे प्रकरण समोर आले तेव्हा अमिताभ यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी माझे नाव तनुश्री
दत्ता नाही आणि नाना पाटेकरही नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला आणि त्याआधी
या मोहिमेबाबत ट्विट करत महिलांनी पुढे येऊन बोलले पाहिजे, अन्याय
सहन करायला नको असे ट्विट केले होते. या सगळ्या ट्विटचा आधार
घेत सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही महिलांबद्दल लिहिलेले ट्विट हे धादांत खोटे आहेत. तुम्ही जे काही वागला आहात ते आठवून तुम्ही तुमची नखं कुरतडू नका, तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही याची किंमत चुकवावी लागेल.
सध्या मी टू ही मोहीम बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत
असताना आणि त्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावर बोलायला सुरुवात केली असताना
अखेर याची दखल केंद्रसरकारने घेतली.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी पीडित महिलांकडून मी-टू मोहिमेअंतर्गत आपल्यासोबतही लैंगिक शोषण झाल्याचे उघडपणे सांगितले जात असल्याच्या
घटनांचे स्वागत केले आहे. देशात मीटू मोहिम सुरु झाल्याने मी
अत्यंत आनंदी आहे. मात्र, मी आशा करते की
या मोहिमेला स्वैर स्वरुप येऊ नये, ती नियंत्रणातून बाहेर जाता
कामा नये. महिलांनी आपल्याला ज्या लोकांनी अपमानित केले अशांना
हकनाक लक्ष करु नये,
असेही बजावले आहे. ज्या व्यक्तीने आपल्यासोबत असे
कृत्य केले त्या व्यक्तीला आपण नेहमीच लक्षात ठेवतो. त्यामुळेच
आम्ही कायदा मंत्रालयाला सांगितले आहे की, या संदर्भातील तक्रारी
दाखल करुन घेण्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसावे. त्यामुळे
पीडित महिला आता 10-15 वर्षांनंतरही याबाबत तक्रार दाखल करु शकतात.
त्यामुळे तक्रारीसाठी मार्ग खुला झाला आहे.
या मोहिमेअंतर्गत ‘मीटू’द्वारे महिलांनी पुरुषांविरोधात उठवलेला आवाज आता
महिलांच्या विरोधातही येऊन ठेपला आहे. महिलेनेच महिलेच्याविरोधात
गैरवर्तनाची तक्रार केली आहे. महिला हास्य कलाकार अदिती मित्तलने
बळजबरीने चुंबन घेतल्याचा आरोप कनीज सुरका या महिलेने केला. कनीज
सुरका हिने ट्विट करून अदिती मित्तलने माझे बळजबरीने चुंबन घेतले, असे स्पष्ट करतानाच माझ्याबाबत जे घडले आहे ते सांगणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. दोन वर्षापूर्वी अंधेरीत एक विनोदी कार्यक्रमात
ही घटना घडली असल्याचे सुरका हिने म्हटले आहे. या कार्यक्रमादरम्यान,
अदिती उठली व माझ्याजवळ आली व मला न विचारताच तिने बळजबरीने माझे चुंबन
घेतले. या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसला, असे कनीजने म्हटले आहे.
दोषींवर कारवाई झाली, तेव्हा मग आणखी आशा निर्माण झाली. या मोहिमेने अनेकांना
आवाज उठवायला प्रेरणा दिली. अनेक कारणांमुळे हा आवाज बसला होता,
बंद झाला होता. आता त्याला वाट मिळाली आहे.
विशेष म्हणजे ही मोहिम अशा वेळेला इतक्या जबरदस्तपणे वायरल होत आहे,ज्या वेळेला युद्धाच्या दरम्यान लैंगिक छळाच्याविरोधात आवाज उठवणार्या कांगोली स्त्री रोग तज्ज्ञ डेनिस मुक्वेज आणि नादिया मुराद यांना
2018 चा प्रसिद्ध नोबेल शाम्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
मी टू ची सुरुवात 2006
मध्ये
हॅशटॅग मी-टू या शब्दाचा
वापर सर्वात अगोदर 2006 मध्ये तराना बुर्के या अमेरिकी सामाजिक
कार्यकर्ता महिलेने केला होता.तेव्हापासून जगभरातल्या अनेक देशांमध्ये
वेगवेगळ्या भाषेत याचा वापर वाढला आहे. रशियामध्ये मात्र या मोहिमेविरोधातच
महिला उतरल्याचे पाहायला मिळाले. कारण या महिलांनी हार्वे वेस्टिनच्या
बाजूने मैदानात उतरले होते.रशियातल्या महिलांनी मॉस्कोमधील अमेरिकी
दूतावासवर नग्न प्रदर्शन केले होते. यांनी हार्वे यांच्या बाजूने
घोषणा दिल्या होत्या. मी टू मोहिमेमुळे फक्त भारतातच नव्हे तर
दक्षिण कोरिया, जपान, इस्त्राइल,
अरब, फ्रान्स, रशिया,
आफ्रिका, चीन, केनियासारख्या
अन्य मोठ्या देशांमध्ये खळबख उडाली आहे. मात्र एकट्या रशियात
एक वेगळाच परिणाम जाणवत राहिला.
तनुश्री प्रकरणात बहुतांश अभिनेत्री- अभिनेता त्यांच्या बाजूने उतरले आहेत. पण काहीजण इतके
दिवस महिला का गप बसल्या, असा सवाल करत आहेत. अब्जावधींच्या या फिल्मी दुनियेत नेहमी अशी प्रकरणे विसरली जात असल्याचा अनुभव
आहे. ब्रिटिश लेखिका लौरा बेट्स म्हणतात की, जोखीम घेऊन वेगवेगळ्या देशांमध्ये स्वत:च्याबाबतीत घडलेल
कथन लोकांसमोर आणत आहेत, याचे खरोखर कौतुक व्हायला हवे.
ही मोहिम आणखी पुढे जायला हवी. काही देशांमध्ये
यामुळे कायदा बदल्याचा प्रयत्न झाला आहे. पण अजून याबाबतीत दीर्घ
संघर्ष करावा लाग्णार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)