Sunday, October 28, 2018

मोदींचा चमचा आणि मनमोहनसिंह यांचा करिष्मा


मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांचे सल्लागार राहिलेल्या संजय बारू यांच्या पुस्तकावर बेतलेला ' द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'  नावाचा चित्रपट लवकरच पडद्यावर झळकणार आहे. यात मनमोहन सिंह यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर करीत आहेत. या चित्रपटाचे नुकतेच शुटींग पूर्ण झाले आहे आणि या निमित्ताने अनुपम खेर यांनी एक बोलकी आणि त्यांच्यात हृदय परिवर्तन झाल्याची पण आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणतात, 'इतिहास तुम्हाला कधीच चुकीचा म्हणणार नाही.तुमच्या सर्वात सुंदर प्रवासासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद.तुमचा प्रवास खूपच चांगला होता.'
वास्तविक अनुपम खेर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमचा म्हणूनच ओळखले जाते.त्यांनी स्वतः देखील  ते मान्य केले आहे. त्यामुळे ते अन्य विरोधी पक्षच काय, कॉंग्रेसलासुद्धा नेहमीच लक्ष्य केले आहे.मनमोहन सिंह यांच्यावरील मोदी यांच्या 'रेनकोट' वरील प्रतिक्रियेचे अनुपम खेर यांनीदेखील समर्थन केले होते.मोदी भक्त असलेल्या अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर या चंदीगढ येथून भाजपाच्या खासदार आहेत. मोदी भक्तीत लीन  असलेल्या अनुपम खेर यांनी केलेले मनमोहन सिंह यांचे कौतुक  खरोखरच धक्कादायक आहे. मोदींचा चमचा म्हणून ओळखले जात असल्याने मनमोहन सिंह यांच्यावर केलेले कौतुक मोदी भक्तांना अर्थात पसंद पडणार नाही, पण अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांचे चित्रपटाच्या माध्यमातून का होईना थोडा काळ  जगले आहेत.त्यामुळेच त्यांना खरे मनमोहन सिंह दिसले  आहेत. कॉंग्रेसपासून अगदी लांब राहिलेल्या अनुपम खेर यांना मनमोहन सिंह यांच्या जवळ जायचा प्रश्नच येत नाही. साहजिकच मनमोहन सिंह त्यांना कसे कळणार.पण आता त्यांचे हृदय परिवर्तन झाले आहे. स्वतः मनमोहन सिंह यांनीदेखील इतिहास आपले योग्य मूल्यमापन करेल,  असे म्हटले होते.
मनमोहन सिंह यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांना सर्वात कमकुवत पंतप्रधान अशी टीका होत असताना ही प्रतिक्रिया दिली होती. विरोधकांना जरी सिंह कमकुवत वाटत असले तरी त्यांना स्वतः ला याबद्दल आत्मविश्वास वाटतो आहे. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान काळात कच्च्या तेलाचे दर आजच्यापेक्षाही जास्त होते आणि जगभरात मंदीचा परिणाम जाणवत होता. अशा वेळेला त्याचा काही एक परिणाम भारतावर झाला नव्हता. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या आसपासदेखील आजच्या राजकारणातले स्वतः ला अर्थतज्ज्ञ म्हणवले जाणारे  पोहचू शकत नाहीत. शिवाय पंतप्रधान म्हणूनदेखील ते परंपरेला धरून सक्षम होते. ते कधीच बोलघेवडे नव्हते. कमकुवत तर कधीच नव्हते. शिवाय त्यांनी अनेक पक्षांचे सरकार चालवले आहे.म्हणजे ते कमकुवत कसे असू शकतील? त्यांच्या उदार धोरणामुळेच देश आज प्रगती करू शकला आहे. आपल्याला जगाशी लवकर संपर्क साधता आला. मेहनत, दर्जा याला महत्त्व प्राप्त झाले. आपल्या देशातील उत्पादने जगाच्या बाजारपेठेत आत्मविश्वासाने उतरली. जगाच्या तोडीची उत्पादने होऊ लागली. आज आपण अजून निर्यातीत  मागे असायला आपल्या देशाची ध्येय धोरणे कारणीभूत आहेत. आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे आपण अजिबात लक्ष दिलेले नाही.आपली प्रगती कशात आहे आणि ती कशी साधली जाऊ शकते,  यावर कोणी बोलायला तयार नाही. त्या दिशेने पावले पडताना दिसत नाहीत. रस्ते, संशोधन, दळणवळण, रोजगार,  नवीन  तंत्रज्ञान याकडे आपण लक्षच दिले नाही. साहजिकच देश अजूनही म्हणावी अशी प्रगती करू शकला नाही. दुसऱ्याची नक्कल करता येणे सोपे आहे.  आपली अक्कल वापरून देशाच्या भल्याचे काही करता येते का ते पाहावे. गेल्या पन्नास वर्षात कॉंग्रेसने काय केले म्हणत फक्त टीकाच करत बसणार का?  आपण काय केले ते लोकांसमोर आणले पाहिजे.आज महागाईने फारच वरचे टोक गाठले आहे. चित्र फार विपरीत आणि विचित्र आहे. आपल्या देशात शेती असो अथवा औद्योगिक उत्पादन याचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सर्व बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो  तरच आपण प्रगती साधणार आहोत.

No comments:

Post a Comment