Sunday, October 21, 2018

आपण जेव्हा दुसर्‍याकडून अपेक्षा करतो, तेव्हा...!


     दुसर्याने आपला आदर करावा, असे ज्याला वाटत असते, त्याने प्रथम दुसर्याचा आदर करायला शिकले पाहिजे. एकाद्याशी मैत्री करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला दोन पावले पुढे टाकली पाहिजेत. दुसर्याने आपले कौतुक करावे असे वाटत असेल तर प्रथम आपण दुसर्याचे कौतुक करायला शिकले पाहिजे. या सगळ्याचा फक्त एकच अर्थ आहे, तो म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरूवात करायची असेल किंवा तशी अपेक्षा करायची असेल तर पहिल्यांदा आपण स्वत: तसे वागतो का, हे पाहिले पाहिजे. तरच आपण दुसर्याकडून तशी अपेक्षा करू शकतो. आपण दुसर्याशी तुसडेपणाचे वागायचे आणि आपण त्याच्याकडून आदराची अपेक्षा करायची, ही गोष्टच चुकीची आहे. अनेकांना आपल्याकडच्या पैशांची मस्ती असते. खरे तर पैसा हा कधी मस्ती करायला लावत नाही. आपणच मस्तीला येतो. कारण पैशांच्या जीवावर काहीही खरेदी करता येते, असे त्यांना वाटत असते. पण या जगात पैशाने सगळेच काही विकत घेता येत नाही, याचा खरे तर अनेक मस्तवाल लोकांना प्रचिती आली आहे. पण तरीही पैशालाच सर्वस्व मानणार्यांना कधीच याची कल्पना येत नाही. ज्यावेळेला पैसा देऊनही पाहिजे ती गोष्ट मिळत नाही, तेव्हाच त्याला त्याचा अनुभव येतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचा अनुभव असतो.

     आज अनुभवी लोकांची खरी गरज आहे. त्यांच्या सल्ल्यांची आवश्यकता आहे. या जगात वावरत असताना अनुभवाची शिदोरी महत्त्वाची आहे. पण काही लोकांना ही माणसेच नको आहेत. त्यामुळेच म्हातारे झालेल्या आई-वडिलांना घराबाहेर काढले जात आहे. त्यांना अनुभवाची गरज नसते. त्यांची अडचण दुसरीच असते. ही अनुभवी मंडळी चार गोष्टी सांगायला गेली तर ही मंडळी त्यांनाच गप्प बसवतात. त्यांच्या लेखी म्हातारी माणसे ही बिनकामाची असतात. अशा लोकांनी चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या अंगाचा तीळपापड होतो. त्यांच्यावर हात उगारण्यापर्यंत यांची मजल जाते. पैसा त्यांना सर्वांपेक्षा श्रेष्ठ वाटत असतो. त्याच्या प्रेमात अशी मंडळी अक्षरश: आंधळी झालेली असतात. त्यांना त्यामुळे समोर लहान-मोठे कोण आहेत, आदर कुणाचा करावा, असले काही म्हणजे काही दिसत नाही. काहींच्याबाबतीत त्यांची परवरीशदेखील महत्त्वाची आहे. कारण घरी ज्याप्रकारे धडे मिळतात, तशीच त्यांची बाहेर वागणूक असते. पण चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. त्याचा सन्मान केला पाहिजे.
    दुसर्याकडून आपण अपेक्षा करतो, तेव्हा तरी आपले वागणे आपल्या लक्षात यायला हवे. या जगाची रीतच अशी आहे, आदर करणार्याचाच आदर केला जातो. ज्याने मदत केली त्यालाच ती मिळत राहते. इतकेच काय तर ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडेच ती जाते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे फक्त दुसर्याकडून अपेक्षा करून कशी चालेल? आजकाल माणसे फार हुशार झाली आहेत. पुढच्याचा आपल्याला उपयोग होत असेल तरच त्याच्याशी बोलतात, नाही तर त्याला बगल देऊन लोक पुढे जातात. आज लोकांना विनाकारण बोलत बसायला वेळ नाही. विशेष कुणाचे कुणाविना काही अडत नाही. ज्याच्यावर तुम्ही मेहरबानी केली आहे, तोच तुमच्यासाठी वेळ देतो.पण तो काही मनापासून तसा करत नाही. त्याच्या तोंडात तुमच्याविषयी शिव्याच असतात.
     आपण दारू ढोसायची, बायका करायचा, आणखी काय काय उद्योग करायचे आणि उलट दुसर्याला तो तसा करतो म्हणायचे, हे पटतं का बघा! प्रत्येकाचे एक खासगी आयुष्य असते. त्याच्या त्या आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणाला नाही. उलट सार्वजनिक आयुष्य जगणार्यांनी आपले आयुष्य काळजीने जपायला लागते. त्यांना लोकांसमोर जायचे असते. जर तुमची प्रतिमा त्यांच्यात चांगली नसेल तर तुम्ही कधीच सार्वजनिक जीवनात वर येणार नाही. पैशाच्या जीवावर ते खरेदी केले तरी ते जास्त काळ करता येत नाही. आणि ते जास्त काळ टिकतही नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे अशा अपेक्षा धरतात. एक महिला स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आली. तिला वाटायला लागले, मला सगळ्यांनीच नमस्कार केला पाहिजे. हे कसे शक्य आहे? तुमच्याकडे ज्यांचे काम आहे, ते नक्कीच तुमची लांगूनचालून करतील, तुम्हाला नमस्कार करतील आणि तुमचा चमत्कारही स्वीकारतील.पण ज्यांचा तुमच्याशी काहीच संबंध नाही. ज्यांना तुमच्याशी काहीच देणे-घेणे नाही, ते बरं तुम्हाला नमस्कार-चमत्कार करतील?
     उलट सार्वजनिक क्षेत्रातल्या माणसाने नमस्कार मागायचा नसतो. आपल्या कामातून तो मिळवायचा असतो. तुमचे कामच ते करून जाते. तुम्हाला त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. तुमच्या कार्यातून तुमची ओळख होते. तुमच्याकडे ज्याचे काम नसते, पण तरीही तुमच्या कामातून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचलेले असता. तेव्हा तो तो नक्कीच तुम्हाला नमस्कार करील. तेव्हा तुमचे कार्य त्याच्यापर्यंत पोहचलेले असते, हे लक्षात ठेवा.

2 comments: