Sunday, October 7, 2018

(वन्यजीव सप्ताह) प्राण्यांकडून शिकायला हवं


     आपल्या आजूबाजूला असंख्य प्राणी आहेत. शाळेत आपल्या जंगली आणि पाळीव प्राण्यांची माहिती दिलेली आहे. त्यांची राहणी, अन्न, निवास अशा किती तरी गोष्टींची माहिती आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकांमधून दिली जाते. याशिवाय पंचतंत्रपासून हॅरी पॉटरपर्यंत अनेक पुस्तकांमधून आपण नाना तर्हेच्या प्राण्यांविषयी भरपूर वाचले आहे. अशा गोष्टी फक्त आपल्यालाच नाही तर जगभरातल्या मुलांना वाचायला आवडतात. प्रत्येक प्राण्यांची ठेवण, रचना, आकार, वजन, स्वभाव,गुण आदी गोष्टींमध्ये विविधता असते. आपल्या मनुष्य प्राण्याकडे जे नाही, ते त्यांच्याकडे आहे आणि आपल्याकडे जे आहे, ते त्यांच्याकडे नाही. पण त्यामुळे आपल्याला त्याची काही खंत वाटत नाही. हत्तीसारखा प्रचंड ताकदीचा, आकाराचा हत्ती ज्यावेळेला सोंडेने पाणी पितो तेव्हा आपल्याला त्याचे आश्चर्य वाटत नाही. झेब्राच्या शरीरावर पट्टे, मोराची सुंदर पिसं,घुबडाची रात्रीच्यावेळी चमकणारे डोळे, वाघाची डरकाळी हे सग़ळे पाहिल्यावर आपल्याला कधी वाटत नाही की, यासर्व शक्ती आपल्याकडे का नाहीत?

     प्रत्येक प्राण्याची एक क्वालिटी असते. आपल्याला त्यांच्याकडून काही तरी शिकण्यासारखे आहे. हरणाचा सावधपणा, चित्त्याचा वेग, कोल्ह्याची लबाडी, कुत्र्याची स्वाभिभक्ती, हत्तीची ताकद, सिंहाचा आक्रमक, भारदार रुबाब, सश्याचा भित्रेपणा म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये अशी विशिष्ट अशी एक खासियत आहे. त्यामुळे तो प्राणी त्याच्या विशेषपणामुळे ओळखला जातो.
     इतिहासकार मेन्ली पी हॉल यांनी प्राण्यांवर खूप काम केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, प्राण्यांजवळ अद्भूत शक्ती असते. त्यांनीच आपल्यासाठी एका गोष्टीवर जोर दिला आहे. तो म्हणजे प्राण्यांमध्ये काय काय शक्ती आहेत, त्याची माहिती आपल्याला हवी आणि त्याचा दुरुपयोग केला जाऊ नये. जंगलात खूप असे प्राणी राहतात. त्यात भयानक हिंस्त्र असतात तर काही लहान असतात. मोठे प्राणी छोट्या प्राण्यांवर अवलंबून असतात. अशा प्राण्यांपासून बचाव यासाठी छोट्या प्राण्यांना निसर्गातच काही देणगी मिळाली आहे.त्याचा वापर करून ते घनदाट जंगलात, हिंस्त्र प्राण्यांच्या सानिध्यात राहत असतात. इथे सगळ्यांना एकमेकांपासून स्वत:चा बचाव करत जगावे लागते. वाघाची चाहूल लागली की, हरणाचे कान पटकन उभे राहतात. हत्तीच्या पायांच्या आवाजाने जमिनीला कंप फुटतो. अशा वेळेला छोटे प्राणी धावायला लागतात. कारण त्याच्या पायाखाली येऊन चिरडले तरी जाणार नाही ना, याची त्यांना भिती असते. प्रत्येक प्राण्याला माहित असतं की, कसं जगायचं?
     आपण मनुष्य प्राण्याने मात्र अलिकडच्या शंभर वर्षात अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे आपले जगणे सुकर झाले आहे. आपले जीवन सोपे बनले आहे. पण तरीही माणूस भितीच्या छायेखालीच वावरताना दिसतो. कारण शोध जरी लागले तरी नवनवी संकटे मात्र आपण निर्माण करत आहोत. त्यामुळे आजही आपल्याला आपला जीव मूठीत ठेवून वावरावे लागत आहे.
     ज्यावेळेला आपण प्राण्यांसोबत जंगलात राहत होतो तेव्हा आपले आयुष्य मात्र फार वेगळे होते. आता आपण गावात, शहरात राहतो. जंगली प्राण्यांसोबत आता रोजचे असे नाते उरलेले नाही. कित्येकांना तर अनेक प्राण्यांना पाहायचीदेखील संधी मिळालेली नाही. आजची शहरातील पिढी प्राण्यांना फक्त चित्रात किंवा टीव्हीच्या पडद्यावर पाहत आहेत. प्रत्यक्षात पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे,कारण प्राण्यांची संख्यादेखील कमी होऊ लागली आहे. शहरातले प्राणी संग्रहालयेही बंद होऊ लागली आहेत. या जगात चित्र-विचित्र प्राणी आहेत. त्यांच्याविषयी वाचल्यानंतर त्यांना पाहायचे कुतूहल होते.पण आपल्याला पाहायला मिळत नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. खरोखरच अनेक प्राण्यांमध्ये एक वेगळीच जादू असते. काल्पनिक वाटावेत, असे असले तरी हे प्राणी हॅरी पॉटरच्या कथांमधल्या प्राण्यांसारखे काल्पनिक नाहीत. निसर्गाने त्यांना तसेच बनवले आहे. अशा प्राण्यांना पाहायसाठी आपण आपला थोडा वेळ द्यायला हवा.
या प्राण्यांचे निरीक्षण करणे हे खरे तर मनोरंजक आहेच,पण त्यातून त्यांच्याकडून आपल्याला जगण्याच्या टिप्सदेखील मिळतात. कधी तरी अभयारण्याला भेट द्यायला हवी. रानोमाळ भटकायला हवं, निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवायला हवा. कारण आपल्या निसर्गातील जीव-जंतू, झाडं-वेली आपल्याला जगण्याची उमेद निर्माण करतात. जगण्याची कला शिकवतात. त्यांच्याकडून या गोष्टी जाणून घेऊन आपण आपले जीवन समृद्ध करून घ्यायला हवे.



No comments:

Post a Comment