Saturday, October 13, 2018

मीटू ची सुरुवात 2006 ला;अमेरिकेत शिक्षाही झाली


     तनुश्री दत्तने प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी आपले बंद ठेवलेले तोंड उघडले आहे. यामुळे साहजिकच बॉलीवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर विन्टा नंदा, नवनीत झिशन, संध्या मृदुल आणि  दीपिका अमीन यांनी आपला लैंगिक छळ झाला असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अनेक कलाकारांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे, तर चेतन भगतसारख्या लेखकाला माफी मागावी लागली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरविरोधात मोहिम उघडल्यानंतर देशात बरीच खळबळ उडाली. अनेकांना तनुश्रीची भूमिका संशयास्पद वाटत होती,मात्र नंतर एक-एक महिला सामिल होऊ लागल्यावर मी टू हे प्रकरणच वेगळे असल्याचे समोर आले. आता यात फक्त बॉलीवूड कलाकारच नाही तर राजकीय व्यक्तीही अडकले असल्याचे एम.जे. अकबर यांच्यावरील आरोपावरून स्पष्ट झाले आहे. या मोहिमेची कक्षा आता वाटतच जाईल, असे संकेत मिळत आहेत. याचा शेवट कसा होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण परदेशातही या मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभत आहे आणि अमेरिकेत यासंदर्भात शिक्षाही झाली आहे. मात्र मनेका गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे कुणी आपला अपमान केला आहे,म्हणून त्याच्यावर सूड उगवण्यासाठी केलेला आरोप या मोहिमेचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही.

     तनुश्री दत्त ही फक्त आरोप करून थांबली नाही तर तिने पोलिसांत अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.2008 मध्येहॉर्न ओके प्लीजया चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला होता. नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, चित्रपट निर्माता सामी सद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावरमुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, तनुश्री दत्ताच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकरसह अन्य तिघांना नोटीस पाठवली आहे.
      पडद्यावर संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे अलोकनाथ यांच्याविरोधात तर अनेक महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. एका टेलीफिल्मच्या चित्रीकरणादरम्यान आलोकनाथने जबरदस्तीने आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप दीपिकाने ट्विटद्वारे केला आहे. आलोकनाथवर सिनेसृष्टीतील 4 महिला कलाकारांनी आरोप केल्यानंतर दीपिका अमीननेही मीटू मोहिमेत पुढे येऊन आलोकनाथने दिलेल्या त्रासाला वाचा फोडली होती.  अनेक वर्षांपूर्वी दीपिका आणि आलोकनाथ एका टेलिफिल्मसाठी चित्रीकरण करत होते. या टेलिफीमच्या चित्रीकरणादरम्यान एक दिवशी दीपिका एकटीच तिच्या खोलीत बसली होती. तेव्हा दारूच्या नशेत तिच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न आलोकनाथने केला. त्यानंतरही आलोकनाथने दीपिकाला त्रास देऊ नये म्हणून सेटवरची सगळी माणसे कायम तिच्या अवतीभवती असायचे. आलोकनाथ कायम दारू पिऊन मुलींच लैंगिक शोषण करायचा हे सिनेजगतात सर्वश्रुत आहे. दारू पिऊन सेटवरती गोंधळ घालणे हे त्याच्यासाठी नेहमीचच होते. मुलींना बघून त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवताच येत नसायचे, अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला आहे. रेणुका शहाणे यांनीही अलोकनाथ यांचे दारू पिल्यानंतरचे रूप वेगळे असायचे म्हटले होते.
     कंगणा राणावतनेदेखील मी टू या मोहिमेत उडी घेतली आहे. चित्रपट दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणार्या महिलेचे समर्थन करत अभिनेत्री कंगना रनौत हिने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विकास बहल हे सेक्ससंबंधीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, असे म्हणत कंगनाने खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता बहल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बहल यांच्याक्वीनचित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार्या कंगनाने लैंगिक छळासंबंधी स्वतःला आलेला अनुभव शेअर करत पीडित महिलेचे समर्थन केले आहे. 2014 मध्येक्वीनचित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्या वेळी बहल यांचे लग्न झाले होते. ते पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांविषयीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, असा आरोप तिने केला. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आमची भेट व्हायची, त्यावेळी ते गळाभेट घ्यायचे. तेव्हा तुझ्या केसांचा सुगंध खूप आवडतो असे ते म्हणायचे, असा आरोपही तिने केला. त्यापाठोपाठ कंगनाने हृत्विक रोशनला सोडले नाही. बायकोला घेऊन काही पुरुष  मिरवतात आणि प्रेयसीला लपवून ठेवतात त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, असंही ती म्हणाली आहे. आणि हा टोला हृतिकसाठी होता का असे पत्रकारांनी विचारल्यावर, हो मी हृतिकबद्दलच बोलत असल्याचे अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटले आहे. शिवाय यावर कढी म्हणजे लोकांनी त्याच्यासोबत काम करणे बंद केले पाहिजे, असे कंगनाने म्हटले आहे. हृतिक आणि कंगनामधील वाद बॉलिवूड आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता.
     एका महिला छायाचित्रकाराने नुकतेच ट्विट करत कैलाश खेरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका पत्रकार मैत्रिणीसोबत खेर यांची मुलाखत घेण्यासाठी गेली असता, ही घटना घडल्याचे तिने यात म्हटले आहे. मुलाखती दरम्यान दोन्ही महिलांच्या मधोमध बसून कैलाश मला वारंवार स्पर्श करत होता. तिने आपल्या सहकारी पत्रकाराला ही घटना त्या मुलाखतीत प्रसिद्ध करायला सुचवल्यावर, अशाप्रकारच्या बातम्या छापल्या जात नाहीत, असे सांगण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. कैलाश खेरव्यतिरिक्त या महिला छायाचित्रकाराने मॉडेल जुल्फी सय्यदवरही अशाप्रकारचे आरोप केले आहेत.
     परराष्ट्रमंत्री एम.जे. अकबर यांच्यावरही पत्रकार सबा नकवी आणि लेखिका गजाला वहाब यांनी अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. अन्य दोन महिलांनीही त्यांच्यावर आरोप केले आहेत. महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर अडचणीत आले आहेत. आता त्यांना आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार आहे. ’मी टूमोहिमेने धुमाकुळ घातला असताना, अशा थेट आरोपानंतर अप्रत्यक्षरित्या यात आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जुडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. मी अमिताभ बच्चन यांच्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचा महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानीने केले आहे. तसेच ट्विटरच्या माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे. तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एक चळवळकर्ते म्हणूनच सादर केले गेले. मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला खात्री आहे. या मोहिमे अंतर्गत जेव्हा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण समोर आले तेव्हा अमिताभ यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी माझे नाव तनुश्री दत्ता नाही आणि नाना पाटेकरही नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला आणि त्याआधी या मोहिमेबाबत ट्विट करत महिलांनी पुढे येऊन बोलले पाहिजे, अन्याय सहन करायला नको असे ट्विट केले होते. या सगळ्या ट्विटचा आधार घेत सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही महिलांबद्दल लिहिलेले ट्विट हे धादांत खोटे आहेत. तुम्ही जे काही वागला आहात ते आठवून तुम्ही तुमची नखं कुरतडू नका, तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही याची किंमत चुकवावी लागेल.
     सध्या मी टू ही मोहीम बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत असताना आणि त्या माध्यमातून  अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावर बोलायला सुरुवात केली असताना अखेर याची दखल केंद्रसरकारने घेतलीकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी  पीडित महिलांकडून मी-टू मोहिमेअंतर्गत आपल्यासोबतही लैंगिक शोषण झाल्याचे उघडपणे सांगितले जात असल्याच्या घटनांचे स्वागत केले आहे. देशात मीटू मोहिम सुरु झाल्याने मी अत्यंत आनंदी आहे. मात्र, मी आशा करते की या मोहिमेला स्वैर स्वरुप येऊ नये, ती नियंत्रणातून बाहेर जाता कामा नये. महिलांनी आपल्याला ज्या लोकांनी अपमानित केले अशांना हकनाक  लक्ष करु नये, असेही बजावले आहे. ज्या व्यक्तीने आपल्यासोबत असे कृत्य केले त्या व्यक्तीला आपण नेहमीच लक्षात ठेवतो. त्यामुळेच आम्ही कायदा मंत्रालयाला सांगितले आहे की, या संदर्भातील तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसावे. त्यामुळे पीडित महिला आता 10-15 वर्षांनंतरही याबाबत तक्रार दाखल करु शकतात. त्यामुळे तक्रारीसाठी मार्ग खुला झाला आहे.
     या मोहिमेअंतर्गतमीटूद्वारे महिलांनी पुरुषांविरोधात उठवलेला आवाज आता महिलांच्या विरोधातही येऊन ठेपला आहे. महिलेनेच महिलेच्याविरोधात गैरवर्तनाची तक्रार केली आहे. महिला हास्य कलाकार अदिती मित्तलने बळजबरीने चुंबन घेतल्याचा आरोप कनीज सुरका या महिलेने केला. कनीज सुरका हिने ट्विट करून अदिती मित्तलने माझे बळजबरीने चुंबन घेतले, असे स्पष्ट करतानाच माझ्याबाबत जे घडले आहे ते सांगणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. दोन वर्षापूर्वी अंधेरीत एक विनोदी कार्यक्रमात ही घटना घडली असल्याचे सुरका हिने म्हटले आहे. या कार्यक्रमादरम्यान, अदिती उठली व माझ्याजवळ आली व मला न विचारताच तिने बळजबरीने माझे चुंबन घेतले. या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसला, असे कनीजने म्हटले आहे.
       विकास बहल, चेतन भगत, कैलास खेर यांच्यावर आज लैंगिक छळाचे आरोप झाले असले तरी यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. मधुर भांडारकर, सुपरस्टार राजेश खन्ना, दिवाकर बॅनर्जी, आदित्य पांचोली, इरफान खान, जितेंद्र त्याचबरोबर ओमपुरी, गायक अंकित तिवारी अशा अनेकांवरदेखील गंभीर आरोप झाले आहेत.गेल्यावर्षी अमेरिकेत ज्यावेळेला हॉलीवूड स्टार हार्वे वेंस्टीनच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप झाला, तेव्हा मी-टू मोहिम संपूर्ण अमेरिकेत वणव्यासारखी पसरली. वर्षबहरात या मोहिमेने अनेक देशात प्रवेश केला आणि त्या त्या देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. यात अनेक नावाजलेले लोक अडकले.
दोषींवर कारवाई झाली, तेव्हा मग आणखी आशा निर्माण झाली. या मोहिमेने अनेकांना आवाज उठवायला प्रेरणा दिली. अनेक कारणांमुळे हा आवाज बसला होता, बंद झाला होता. आता त्याला वाट मिळाली आहे. विशेष म्हणजे ही मोहिम अशा वेळेला इतक्या जबरदस्तपणे वायरल होत आहे,ज्या वेळेला युद्धाच्या दरम्यान लैंगिक छळाच्याविरोधात आवाज उठवणार्या कांगोली स्त्री रोग तज्ज्ञ डेनिस मुक्वेज आणि नादिया मुराद यांना 2018 चा प्रसिद्ध नोबेल शाम्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
मी टू ची सुरुवात 2006 मध्ये
हॅशटॅग मी-टू या शब्दाचा वापर सर्वात अगोदर 2006 मध्ये तराना बुर्के या अमेरिकी सामाजिक कार्यकर्ता महिलेने केला होता.तेव्हापासून जगभरातल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषेत याचा वापर वाढला आहे. रशियामध्ये मात्र या मोहिमेविरोधातच महिला उतरल्याचे पाहायला मिळाले. कारण या महिलांनी हार्वे वेस्टिनच्या बाजूने मैदानात उतरले होते.रशियातल्या महिलांनी मॉस्कोमधील अमेरिकी दूतावासवर नग्न प्रदर्शन केले होते. यांनी हार्वे यांच्या बाजूने घोषणा दिल्या होत्या. मी टू मोहिमेमुळे फक्त भारतातच नव्हे तर दक्षिण कोरिया, जपान, इस्त्राइल, अरब, फ्रान्स, रशिया, आफ्रिका, चीन, केनियासारख्या अन्य मोठ्या देशांमध्ये खळबख उडाली आहे. मात्र एकट्या रशियात एक वेगळाच परिणाम जाणवत राहिला.
     तनुश्री प्रकरणात बहुतांश अभिनेत्री- अभिनेता त्यांच्या बाजूने उतरले आहेत. पण काहीजण इतके दिवस महिला का गप बसल्या, असा सवाल करत आहेत. अब्जावधींच्या या फिल्मी दुनियेत नेहमी अशी प्रकरणे विसरली जात असल्याचा अनुभव आहे. ब्रिटिश लेखिका लौरा बेट्स म्हणतात की, जोखीम घेऊन वेगवेगळ्या देशांमध्ये स्वत:च्याबाबतीत घडलेल कथन लोकांसमोर आणत आहेत, याचे खरोखर कौतुक व्हायला हवे. ही मोहिम आणखी पुढे जायला हवी. काही देशांमध्ये यामुळे कायदा बदल्याचा प्रयत्न झाला आहे. पण अजून याबाबतीत दीर्घ संघर्ष करावा लाग्णार आहे.

No comments:

Post a Comment