Tuesday, October 9, 2018

पाणी अडवाच,पण झाडेही लावा


     पाणी फौंडेशन, नाम फौंडेशन आणि त्यांच्या जोडीला राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यात चांगली कामे झाली आहेत. मात्र पाऊसच झाला नसल्याने ही कामे बेकार गेली आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पावसाचे पाणी अडवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला,मात्र पावसानेच पाठ फिरवल्याने या योजनांचा रिझल्ट हा नापास असाच आला आहे. कारण गतवर्षापेक्षा यंदा पाण्याचे टँकर जास्त लागल्याचे आकडेवारी सांगते. गेल्यावर्षी सहा महसूल विभागात 107 पाण्याचे टँकर लागले होते. यंदा मात्र हा आकडा तब्बल 329 वर गेला आहे. शिवाय सध्याला तितक्याच गावांची पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासन दरबारी पडून आहे. शासनाला अजूनही पाऊस पडेल, अशी आशा आहे. पण राज्याच्या हवामान खात्याने कधीच मान्सून माघारी परतला आहे, हे सांगून टाकले आहे. साहजिकच त्यामुळे राज्यापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सध्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडून द्या, आता प्यायलाही पाणी नाही, अशी भीषण परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. प्रशासन पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत चालढकल करत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सांगितले आहे. आकडेवारी मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शासनालाही पाऊस पडेल आणि राज्यावरचे दुष्काळाचे संकट टळेल असे वाटले होते.पण यंदाच्या पावसाळ्यात तीस टक्केदेखील पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यापुढे बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी खरिपाला पाऊस झाला नसला तरी रब्बीला पावसाने साथ दिली होती. उशिराने पाऊस झाला असला तरी उत्पादनात घट होऊनही शेतकर्यांना पावसाची साथ लाभली होती. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मिटला होता. त्यामुळे साहजिकच पाण्याचे टँकर कमी लागले होते. गेल्या वर्षी कोकण आणि नागपूर विभाग वगळता नाशिकला 24, पुणे 32, औरंगाबाद 28, अमरावती 23 असे पाण्याचे टँकर सुरू होते. यंदा मात्र यात वाढ झाली आहे. कोकण आणि नागपूर विभाग सोडला तर नाशिक 118, पुणे 21, औरंगाबाद 182 आणि अमरावती 8 अशा टँकरद्वारा पाणी पुरवठा केला आत आहे.
     राज्यात मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, अनिश्चित व खंडित व पर्ज्यनमानामुळे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता वाढली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2014 मध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत गेल्या तीन वर्षात सुमारे 16 हजारांहून अधिक गावांमध्ये ही कामे सुरू झाली. राज्य शासनाबरोबरच लोकसहभाग,पाणी फौंडेशन, नाम फौंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग लाभला. या कामाचा परिणाम गेल्यावर्षी पावसाळ्यात दिसून आला. गेल्या तीन वर्षात निवड झालेल्या गावांमध्ये 4 लाख 98 हजार 206 इतकी जलयुक्त शिवारची कामे झाली आहेत. या अभियानात 2018 आणि 19 मध्ये 6 हजार 200 गावांची निवड करण्यात आली होती. मात्र कामे झाली चांगली,पण पावसानेच दगा दिल्याने या कामावर पाणी फिरले आहे.
     पावसाचे पाणी जिरवून ओढ्या,नाले, तलाव, विहिरी आणि कुपनलिकांना पाणी आणण्याचे काम या योजनेमुळे यशस्वी होऊ शकते, हे गेल्या दोन वर्षात आपण अनुभवले आहे. आपल्या राज्यात सिंचन योजना भरपूर असल्या तरी त्यातून सिंचन किती झाले, हा वादाचा मुद्दा आहे.पण त्यातून पावसाचे पाणी अडवून आपापल्या गावी सोय गावकरी एकत्र येऊन करू शकतात, हे स्पष्ट झाले. त्यातून लोकसहभाग वाढत गेला. त्यात अमिरखानच्या वॉटर कपने आणखी रंगत आणली.खरे तर प्रत्येक गावाने पावसाचा थेंब न थेंब अडवला पाहिजे. कारण कित्येक भागात, तालुक्यात, जिल्ह्यात नद्या वाहत नाहीत. त्यांना पाण्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून जिरवता येऊ शकते, हे फार पूर्वीचे तंत्र आपण वापरत आहोत. पाणी अडवा, पाणी जिरवा ही टॅगलाईन महाराष्ट्रानेच संपूर्ण देशाला दिली आहे. पण पाऊस पडला तरच या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता आपण पाऊस पडण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, याची अंमलबजावणी मनापासून केली पाहिजे.प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतील.

No comments:

Post a Comment