Friday, March 29, 2013

टोनी माकडाचे लग्न

     एका नदीच्या काठाला फार सुंदर बाग होती. बागेत विविध प्रकारच्या वृक्ष-वेली होत्या. त्यांना सुंदर सुंदर फुलं लागलेली होती, मधुर, रसाळ फळं लगडली होती. बागेत खूप सारे पक्षी राहत होते. बागेचं सौंदर्य पाहून तिथं परदेशातले पक्षीही आराम करायला येत. फळांचा मनमुराद आस्वाद घेत. काही दिवसांनी टोनी माकडही तिथं राहायला आलं. बागेजवळच्या नदी पात्रात सोनी नावाची मगरदेखील राहत होती. टोनी-सोनीची छान मैत्री जमली होती.
     टोनी दिवसभर जंगलातल्या झाडांवर मर्कटलीला करायचा. कधी या फांदीवर तर कधी त्या फांदीवर उडया मारणं चालूच असायचं. तो शांत म्हणून कधी बसतच नसे. फळं खायचा तीही अर्धीमुर्धीच! उरलेली फेकून द्यायचा. झाडांचं नुकसान करायचा. कित्येक पक्ष्यांची घरटीदेखील त्यानं उद्वस्त केली होती. त्याच्या सततच्या त्रासाला सगळेच पार वैतागून गेले होते. त्यांनी त्याला कित्येकदा समजावून सांगितलं, ‘टोनीदादा, आम्हीदेखील इथे राहतो. आम्ही वारंवार घरटी बनवतो, आणि तू मनाला येईल तेव्हा झाडांच्या फांद्या तोडून टाकतोस. जर तू या फांद्या तोडत राहिलास तर आम्ही कुठे राहायचं? आमच्यावर दया कर.
     परंतु, टोनी त्यांचे ऐकलं न ऐकल्यासारखं करे. आपल्या मर्कटलीला चालू ठेवी. कंटाळून एक दिवस पक्ष्यांनी विचार केला, टोनीच्या खोडया थांबवायच्या असतील, तर यावर आता काही तरी उपाय शोधला पाहिजे.
पक्ष्यांमध्ये एक सोनसाळुंखी होती. ती फार चतुर आणि बुद्धिमान होती. कुठल्याही कामात तिचं डोकं तुफान चालायचं. तिच्या डोक्यात एक कल्पना आली. टोनीचं आपण लग्न करून टाकू. म्हणजे त्याच्या सवयी आपोआप बदलतील.सोनूने सगळ्यांना कल्पना सांगितली.
     सगळ्यांना तिची कल्पना भारी आवडली. तिच्या बुद्धिमत्तेचं सगळे कौतुक करू लागले. पण पुढे प्रश्न असा पडला की, त्याच्याशी लग्न कोण करणार? कारण आजूबाजूच्या परिसरात माकडांचं एकही कुटुंब वास्तव्याला नव्हतं.
पण काही रानचिमण्या अन्नाच्या शोधात नदीच्या पलीकडे असलेल्या चंदनवनात जायच्या. तिथे बल्लू माकड आपल्या कुटुंबासह राहत असल्याची माहिती त्यांना होती. त्याला दोन मुलं होती. त्यात एक मुलगीदेखील होती. सोन साळुंखीने त्या मुलीशी टोनीचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.
     सगळ्या पक्ष्यांनी मिळून टोनीपुढे त्याच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नाचे ऐकून टोनी नाराज झाला. त्याने सर्वाशी बोलणं टाकलं. जंगलात तो सोनी मगरीशिवाय कुणाचेच ऐकत नव्हता. त्यामुळे सगळ्यांनी सोनीला गळ घालण्याचं ठरवलं. तिला पटवून दिलं, की टोनी आपोआप बोहल्यावर चढायला तयार होईल, याची खात्री त्यांना होती.
एक दिवस सगळे नदीकाठाला गेले. सोनीची भेट घेतली आणि टोनीच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर मांडला.  आम्ही टोनीच्या भलंच चिंतीत आहोत, असं सर्व पशूपक्ष्यांनी सोनीला पटवून दिलं. टोनीच्या लग्नाचा विषय ऐकून तीदेखील हरखून गेली. टोनीचं मन बदलण्याची जबाबदारी तिने स्वत:वर घेतली. पशू-पक्ष्यांना फार आनंद झाला.
     टोनी हिंडण्या-फिरण्याचा मोठा शौकीन होता. पाण्यातली सफर त्याला जाम आवडायची. ही सफर त्याला त्याची मैत्रीण-सोनी घडवून आणायची. आपल्या पाठीवर बसवून त्याला दूर-दूपर्यंतचा परिसर दाखवून आणायची. मोबदल्यात टोनी तिला जंगलातले मधुर, रसाळ फळं खायला आणून द्यायचा. एकदा सोनीने त्याला जलसफरीला नेले. गप्पा मारता मारता म्हणाली, ‘टोनीदादा, कुठंवर एकटाच झाडांवर मर्कटलीला करत राहणार? आता लग्न करून घे. गृहस्थी सांभाळ. वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. शिवाय झाडांवर राहणा-या पक्ष्यांचादेखील विचार कर. त्यांना नेहमी त्रास देत राहतोस. पण ते तुझी किती काळजी घेतात. माझं पाहिलंस ना, माझंही कुटुंब आहे. आता तूही कुटुंब करून मजेत राहा आणि ते मलादेखील आवडेल’.
     अपेक्षेप्रमाणे टोनी सोनीची गोष्ट ऐकून लग्नाला तयार झाला. पक्ष्यांनी टोनीच्या लग्नाचा प्रस्ताव बल्लूजवळ ठेवला. भावी जावयावर बागेतल्या पक्ष्यांचं प्रेम पाहून बल्लू भारावून गेला. म्हणजे जावई लाखात एक आहे, याची त्याला खात्री पटली. त्याने पटकन होकार दिला.
     आता टोनीच्या लग्नाची धामधूम सुरू झाली. सोनीने लग्नाची सगळी व्यवस्था आपल्या शिरावर घेतली. गोपू गाढवाचा बँड परिसरात चांगलाच लोकप्रिय होता. त्याचाच बँड सांगण्यात आला. नदीपलीकडे नेण्या-आणण्याची सगळी व्यवस्था सोनीनेच केली. त्यासाठी तिने आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतलं. मगरींच्या पाठीवर बसून व-हाड पलीकडे गेले. बल्लू माकडानेही तेवढयाच तोलामोलाचा लग्नाचा थाट केला होता. सनई-चौघडयाच्या मंगलमय वातावरणाने व-हाडी मंडळी भारावून गेली. जेवणाचा बेतही बँडच्या तालावर व-हाडी बेभान नाचू लागली. काळूबाळू या जोडगोळीचा डान्स तर सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू ठरला. बन्या बेडूक आणि त्याच्या साथीदारांनी असा काही झांज वाजवला की, सगळे त्याच्या तालावर नाचू लागले. कोकिळा, चिमण्या यांनीदेखील आपल्या गोड आवाजातल्या गाण्यांनी सगळ्यांना खूश केलं. मोरांनी थुई थुई नाच केला. दोन्हींकडील मंडळी अगदी आनंदात होती. 
     अशाप्रकारे बल्लू माकडाच्या मुलीचा विवाह टोनीशी मोठय़ा थाटामाटात पार पडला. आलीकडच्या काळात असा विवाहसोहळा कधी झालाच नव्हता, असं जो तो म्हणत होता. बागेतल्या सगळ्यांनी टोनीला शुभेच्छा दिल्या.
लग्नानंतर टोनी एकदम बदलला. आता तो शांत आणि लाजरा बनला. बागेत सगळे पक्षी आनंदाने राहू लागले.

Friday, March 22, 2013

लांब नाकाची म्हातारी

     बिंदूसेन नावाचा एक राजा होता. त्याला एकुलती एक मुलगी होती, तिचं नाव होतं बिंदिया. ती फारच गर्वष्ठि आणि कोपिष्ठ स्वभावाची होती. तिच्या वर्तनाने महालातल्या सगळ्या दास-दासी तिला घाबरून असत. बिंदियाला एकमेव मैत्रीण होती, तिचं नाव निकिता. प्रधानांची कन्या असणारी निकिता मात्र फारच दयाळू आणि सुस्वभावी होती.
     एक दिवस बिंदियाला शिकारीला जायची लहर आली. तिने निकिताला बोलावलं. निकिताची शिकारीला जायची इच्छा नव्हती, पण ती राजकन्येला नाराज करू शकत नव्हती.
     बराच वेळ त्यांची भटकंती चालली, पण शिकार करायला एकही जंगली श्वापद दृष्टीस पडलं नाही. शेवटी राजकन्येने आपला घोडा जंगलाच्या घनदाट भागाकडे वळवल, तिनं सोबत कुणालाच घेतल नाही. बिंदूसेन राजाने तिला तिथं जायला मनाई केली होती, पण तिने वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. जंगलात गेल्यावर ती रस्ता चुकली. तिला काहीच उमजेना. निकितासह सगळे मागेच राहिले होते. पुढे काही अंतर गेल्यावर तिला एका झाडाखाली एक कृश म्हातारी झोपलेली दिसली. तिचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब होतं.
ए म्हातारे, मला जंगलाबाहेर जाण्याचा रस्ता सांग.बिंदिया म्हातारीजवळ जात म्हणाली
मला भूक लागलीय.म्हातारी पडल्यापडल्याच म्हणाली.
मला रस्ता सांग, नाही तर तुझं नाकच उडवीन.
     म्हातारी चवताळून उठली. माझं नाक उडवतेस? जा, तुझं नाक लांब होऊन जाईल.म्हातारी क्रोधानं म्हणाली आणि बघता बघता ती जंगलात गडप झाली.
     म्हातारी अदृश्य होताच, इकडे बिंदियाचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब झालं. ते पाहून ती प्रचंड घाबरली आणि जोरजोराने ओरडू लागली, रडू लागली.
     इकडे बिंदियाला शोधण्याच्या नादात निकितादेखील घनदाट जंगलात रस्ता हरवली.
ती बिंदियाला हाका मारत होती, तेवढय़ात तिला एका झाडाखाली तीच म्हातारी झोपलेली दिसली जिचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब होतं. निकिता घोडयावरून उतरली व म्हातारीजवळ गेली.
आजी, तुम्ही जंगलात एकटीच कशा..?’
मुली, मला फार भूक लागलीय.. ती म्हातारी मोठया मुश्किलीने बोलली.
     निकिताने आजूबाजूला पाहिलं. काही अंतरावरच फळांनी लगडलेलं एक झाड होतं. ते पाहताच निकिता स्वत: उठली आणि जाऊन झाडाची फळं तोडून आणली. काही फळं म्हातारीला दिली आणि आपणही खाऊ लागली. इतक्यात एक आश्चर्य घडलं. म्हातारीने फळ तोंडात धरताच म्हातारी अदृश्य झाली आणि तिच्या जागी एक सुंदर परी प्रकटली.
     माझं नाव पूनम परी. क्रोधाच्या भरात मी एका ऋषींचा अपमान केला होता. त्यांच्या शापानेच मी लांब नाकाची म्हातारी बनले. तू दयाळू आणि साधी-सरळ गुणी मुलगी दिसतेस. म्हणूनच तू स्पर्श केलेलं फळ खाताच मी शापमुक्त झाले.परी निकिताला म्हणाली.
     पूनम परी, मला जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सांग.निकिताने तिला विनंती केली.
पूनम परी तिला एक सुंदर बाहुली देत म्हणाली, ‘ ही बाहुली तुला मार्ग दाखवेल आणि एक वरदानदेखील देईल.
निकिता बाहुलीच्या सहाय्यानं जंगलाबाहेर आली. तिथे तिला बिंदिया भेटली. पण तिचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब दिसत होतं.
हे कसं झालं गं?’ निकितानं विचारलं.
     बिंदियाने म्हातारीचा शाप निकिताला सांगितला. त्या म्हातारीने तुला शाप दिला आणि मला ही बाहुली. हिच्याकडून मी एक वरदानही मागू शकते.निकिता म्हणाली आणि तिने बाहुलीकडे आपल्या मैत्रिणीचं, बिंदियाचं नाक ठीक करण्याचं वरदान मागितलं.
     लगेच बिंदिया पहिल्यासारखी सुंदर दिसू लागली. जंगलात मिळालेल्या धडयाने ती सगळ्यांशी प्रेमानं वागू लागली.

Tuesday, March 19, 2013

बालकथा कोल्हा आणि सिंह

      
      एक दिवस भुकेल्या कोल्ह्याची एका सिंहाशी गाठ पडली. सिंहाला पाहताच कोल्ह्याची शिट्टी-बिट्टी गुल झाली. तो थरथरतच हात जोडून म्हणाला," महाराज, मला अभय द्या. मी आपली प्रत्येक आज्ञा मानेन."
      सिंहाला कोल्ह्याची दया आली. तो कोल्ह्याला म्हणाला," ठीक आहे. चल, माझ्यासोबत. माझी प्रत्येक गोष्ट मानणार असशील तर तुला खाण्या-पिण्याचीदेखील भ्रांत राहणार नाही.
     "आपला हुकूम सर आँखों पर, महाराज." कोल्हा लवून मुजरा करत म्हणाला.
     "आता मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐक. तुला रोज पहाडावर जाऊन खाली घाटीत कोणी जनावर फिरतं-बिरता  का, ते पाहावं लागेल. आणि जनावर दृष्टीस पडलं की, मला येऊन सांगायचं.  मग मी शिकार करेन आणि माझं भरपेट भोजन झालं की मग तू उरलेल्या  मांसावर  ताव मारायचंस."
     "जशी आपली आज्ञा, महाराज!" कोल्हा पुन्हा लवून मुजरा करत म्हणाला.
     दुसर्‍यादिवशी कोल्हा पहाडाच्या टोकाच्या दिशेने निघाला. त्याची दृष्टी एका हत्तीवर पडली. तो धावतच   सिंहाजवळ आला आणि लवून मुजरा करत म्हणाला, " महाराज, शिकार आहे."
     सिंहाने हत्तीची शिकार केली.  त्याच्यावर यथेच्छ  ताव मारला. त्यानंतर कोल्ह्यानेदेखील आपली भरपेट पोटपूजा केली. अशाप्रकारे कोल्ह्याचे मस्त दिवस चालले होते. आता कोल्हा धष्टपुष्ट  आणि गुटगुटीत दिसायला लागला होता. पण त्याचबरोबर त्याच्यातली विनम्रतादेखील  कमी होत चालली होती. एक दिवस तो विचार करू लागला,' मी सिंहाच्या उष्ट्यावरच माझे पोट का भरावं? मीदेखील श्वापद आहे. मीसुद्धा हत्ती आणि म्हशींची शिकार करू शकतो. शिवाय आता मीदेखील खाऊन-पिऊन चांगला धष्टपुष्ट झालो आहे.'
     तो सिंहाला म्हणाला," महाराज, आपले उष्टे खाण्यातच माझे अर्धे आयुष्य गेले. आता मीदेखील  स्वतः शिकार करू शकतो.  हत्तीला एका झटक्यात यमसदनी धाडू शकतो."
     सिंहाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला," कोल्ह्याही गोष्ट तुझ्या आवाक्यातली नव्हे. मी जी काही शिकार करतो, तेच खाऊन मस्त रहा. त्यातच तुझे भले आहे."
     " नाही महाराज, कृपा करून मला एक संधी द्या. या खेपेला मी इथेच थांबेन आणि तुम्ही पहाडावर जा आणि एखादा हत्त्ती दिसला तर मला सांगायला या. मी नक्कीच त्याची शिकार करेन."
     सिंहाने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केलापण व्यर्थ! शेवटी सिंह तयार झाला.  सिंह पहाडावर गेला. थोड्या वेळाने  परत आला आणि कोल्ह्याला म्हणाला," आत्ता आत्ताच मी एक हत्ती पाहिला आहे."
      लगेच कोल्हा धावत सुटला  आणि हत्तीसमोर जाऊन उभा राहिला. 'आता झटक्यात याची गरदन पकडतो आणि  याचा खेळ खल्लास करतो. असे म्हणत  त्याने हत्तीवर झेप घेतली. पण त्याची झेप चुकली आणि तो एका झाडावर जाऊन आदळला. हत्ती संतापला.  त्याने त्याला एका झटक्यात आपल्या पायाखाली घेतले आणि चिरडून टाकले.  
तात्पर्यः काही करण्यापूर्वी आपले सामर्थ्य ओळखायला हवे.

Sunday, March 10, 2013

लघुकथा :लोकासांगे...!

     शाळेची मधली सुट्टी झाली होती. काही शिक्षक व्हरांड्यात गप्पा मारत होते. इतक्यात सहावीतला एक मुलगा रडत रडत तिथे आला. रावडे गुरुजींनी त्याला विचारलं," काय झालं रे?"
"गुरुजी, बंक्या मला सारखा फेगड्या फेगड्या म्हणतोय. माझे पाय फेगडे आहेत, यात माझा काय दोष?"
रावडे गुरुजी बंक्याला बोलावून आणायला सांगतात. थोड्या वेळाने चार-दोन पोरं बंक्याला पकडून गुरुजींच्याकडे ओढून आणतात. रावडे गुरुजी बंक्याचा हात हातात घेतात नि जवळ खेचतात. वर पाठीत दोन रट्टे देतात. बंक्या पाठ धरून कण्हायला लागतो.
"गाढवा, रम्याला फेगड्या फेगड्या म्हणतोस. दुसर्‍याला नावे ठेवतोस....: असे म्हणत आणखी एक रट्टा पाठीत हाणतात. बंक्या रडायला लागतो.
" दुसर्‍याला नावे ठेवायची नसतात, माहित हाय का नाह्य. दुसर्‍याच्या अवगुणावर बोलायचं नसतं. चिडवायचं नसतं. समजलास! आता पुन्हा असं म्हणू नको. जा...!"
बंक्यानं रडतच पळ काढला.
कदम गुरुजी रावडे गुरुजींना सांगू लागले," अहो, त्या जाधव गुरुजींचा ऍक्सिडेंट झाला. बिच्चारे रस्त्यातून कडेने निघाले होते.मागून टु-व्हीलरने धडक दिली. चांगलंच लागलं आहे त्यांना!"
"कोण जाधव, तो ढांगोळ्या? तो होय. चालणार उंटासारखा. ऍक्सिडेंट होणार तर काय होणार! तोच आडवा आला असेल आणि पडला असेल...."                                                            

लघुकथा    : लायकी
महिलांची किटी पार्टी चालली होती. मिसेस नाईक नव्यानंच पार्टी जॉईन केलेल्या मिसेस पवारांशी ओळख वाढवण्याच्या इराद्याने त्यांच्याजवळ सरकल्या. मिसेस पवार कुणाशी तरी मोबाईलवर बोलण्यात गुंतल्या होत्या. बोलणं झाल्यावर मोबाईल ऑफ करून मिसेस पवार अगदी हसतमुखानं मिसेस नाईकांशी भेटल्या. त्यांच्या गप्पा चालल्या असतानाच पुन्हा मिसेस पवारांचा मोबाईल वाजला. "एक्सक्युज मी'' म्हणत त्यांनी फोन रिसीव्ह केला. तोच मिसेस नाईकांची नजर पवारांच्या मोबाईलवर पडली. अगदीच स्वस्तातला मोबाईल पाहून आश्चर्यात पडल्या. आता त्यांनी मिसेस पवारांना तिथंच सोडलं आणि मिसेस घाटगेंकडे गेल्या.
आता मिसेस नाईक घाटगेंना सांगत होत्या," मिसेस पवारचा  मोबाईल हँडसेट तर पाहा, किती भिकारडा! जेमतेम हजार रुपड्यांचाच असेल, बाई! ती नक्कीच मिडल क्लास असली पाहिजे. साडी आणि चप्पलदेखील स्वस्तातलीच दिसतेय. अहो, मी तर माणसाची लायकी पाहूनच त्यांच्याशी मैत्री करते."           

Friday, March 8, 2013

बालकथा जिनच्या मुली

      एक जिन दाम्पंत्य राहत होतं. त्यांना दोन मुलीदेखील होत्या. एकीचं नाव किटी होतं, तर दुसरीचं नाव बिटी. त्या दोघी मोठ्या व्रात्य होत्या. फार सैतानी करायच्या. शेवटी त्या जिनच्या मुलीच ना! एकदा जादू करता करता चुकल्या आणि त्या एका निर्जन बेटावर जाऊन पोहचल्या. तिथं चिटपाखरूदेखील नाही. मग काय! त्या जाम घाबरल्या. पण करणार काय? त्यांना घरी जायची जादूदेखील आठवेना! जादूची प्रॅक्टीस काळजीपूर्वक करीत जा, असे आई-बाबा वारंवार का बजावायचे.  ते आता त्यांना आठवलं. आपण ज्या ज्या लोकांना त्रास दिला, त्यांना आपल्याविषयी काय वाटत असेल, याचा त्या विचार करू लागल्या. त्यांना अपराध्यासारखं वाटू लागलं. पण त्याचा आता काय उपयोग!
      त्या दोघी हिंमत एकवटून हळूहळू पुढं चालू लागल्या. थोडं पुढं चालून गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, हे बेट खाण्याच्या सगळ्या जिनसांनी बनलेलं आहे. ते तिथलं पानी प्यायले, तर त्यांना खोबर्‍यातल्या गोड पाण्यासारखं लागलं. तिथली वाळूदेखील गाजर्‍याच्या हलव्यासारखी होती. आणि तिथल्या दगड-धोंड्यांचा स्वाद चॉकलेटसारखा होता. आता दोघींनाही मजा येऊ लागली. त्यांनी अगदी पोट भरून सगळ्या चिजा खाल्ल्या. मग पुन्हा पुढे सरकल्या.
      पुढे गेल्यावर त्यांना एक गुहा दिसली. बिटी त्या गुहेत जाऊ इच्छित होती. पण बिटी पुरती घाबरली होती. शेवटी   धाडस करून दोघीही गुहेत शिरल्या. आत गेल्यावर तर त्यांच्या आश्चर्याचा पारावर उरला नाही. आत जिकडे पाहावं तिकडे फळेच फळे! त्या जाम खूष झाल्या. किटीनं कलिंगड खायला घेतलं तर बिटीने संत्री! खात खात ती फळं वेचू लागल्या. तोच गुहेत झगमगाट झाला. गुहाभर प्रकाश उजळला. समोर त्यांचे आई-बाबा होते. झटदिशी त्या त्यांच्या दिशेने धावल्या आणि त्यांना घट्ट बिलगल्या.
आता त्या शहाण्या झाल्या. कुणाला त्रास द्यायचा नाही, असे त्यांनी पक्के ठरवले. आणि आनंदाने घरी परतल्या.

Wednesday, March 6, 2013

नवनवे प्रयोग आणि अवाजवी प्रशिक्षण यामुळे प्राथमिक शिक्षणाचा झाला बट्ट्याबोळ

     प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सतत ओरड सुरू असते. नुकताच 'असर' या आणखी एक संस्थेचा रिपोर्ट जाहीर झाला आहे, त्यात आठवीपर्यंतच्या चिंता वाटाव्या इतपत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत क्रिया येत नसल्याचे म्हटले आहे. या रिपोर्टमुळे सरकार, शिक्षक आणि पालक यांची डोकी ताळ्यावर येणं आवश्यक होतं, मात्र प्रत्येकजण दुसर्‍याच्या अंगावर खापर फोडून मोकळा झाला आणि त्याकडे सगळ्यांनीच सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. यात स्वतः शासन आणि त्यांचा शिक्षण विभाग आघाडीवर असल्याचे दिसते. प्रशिक्षणाच्या नावाखाली गेल्या वर्षभरात शिक्षकांनाच 'शाळाबाह्य' ठरवण्याचा सुरू असलेला धक्कादायक प्रकार अजूनही चालूच आहे. या दिवाळीनंतर तर शिक्षकांचे पाय शाळांमध्ये ठरलेच नाहीत. कारण एक ना अनेक प्रशिक्षणे त्यांच्या माथी मारल्यामुळे 'शिक्षक प्रशिक्षणावर आणि विद्यार्थी वार्‍यावर' असे मथळे वृत्तपत्रांमध्ये येत राहिले. तरीही शिक्षण खात्याला आणि शासनाला जाग आली नाही, हे केवढे मोठे दुर्दैव म्हणायचे!
     सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मूल्यमापन, इंग्रजी संभाषणासाठीचे ब्रिटीश कौन्सिल, बालस्नेही अभ्यासपद्धती, स्काऊट-गाईड, कब-बुलबुल, मासिक संमेलने, तंबाकू विरोधी कार्यशाळा अशी एक ना अनेक प्रशिक्षणे सध्या चालू आहेत. यातील काही खात्यांतर्गत तर काही सेवाभावी संस्थांची आहेत. परीक्षेचा कालावधी जवळ आला तरी शिक्षक बाहेरच आहेत. साहजिकच याचा मोठा परिणाम गुणवत्तेवर झाला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांची भेटच होत नाही, शाळांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी कशी वाढणार? शाळेतले निम्म्याहून अधिक शिक्षक प्रशिक्षणात असल्यावर बाकीच्या शिक्षकांवर केवळ मुलं आणि शाळा सांभाळण्याचीच जबाबदारी उरते. तेवढीच जबाबदारी सध्या पार पाडली जात आहे.
     अशा परिस्थितीत शिक्षकांना केवळ 'वडाप' करून अभ्यासक्रम संपवन्याशिवाय पर्याय राहत नाही. मग मुलांमध्ये गुणवत्ता तरी कशी येणार? 'असर', 'प्रथम' सारख्या संस्था सर्व्हेक्षणाच्या नावाखाली शाळांचा दर्जा ठरविणार, उपाय सांगून त्याची अंमलबजावणीदेखील करायला भाग पाडून अनुदानाचा मलिदाही लाटणार! त्यांची पोटे चालतातच पण शासनसुद्धा कुठल्या एका गोष्टीवर ठाम न राहता शिक्षणातील नवनव्या प्रयोगांना मंजूर देत राहते. आणि मग दरवर्षी नव्या-नव्या प्रयोगांचा खेळ सुरू राहतो. कधी कधी तुमच्या तुमच्या पद्धतीने जा, पण हाही उपक्रम राबवा, असा हेका चालवला जातो. पुणे विभागाचे आयुक्त यांनी या विभागात असाच सर्वागिंण गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवला आहे. मागे प्रथम या संस्थेने वाचन-लेखन प्रकल्प राबवला होता. असे काही ना काही सुरूच आहे.  एखाद्या प्रयोगाचे निष्कर्ष हाती येत नाहीत, तोच नव्या प्रयोग, उपक्रमाची अंमलबजावणी करायचा आदेश आलेला असतो. प्राथमिक शिक्षण आणि शाळा ही एक प्रयोगशाळा झाली आहे.
     मुलांना अभ्यासाची भीती वाटते आहे. ते आत्महत्या करताहेत, म्हणून त्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून आनंददायी शिक्षण आणले. त्याचे शिक्षकांनी प्रशिक्षणे घेतले. शिक्षकांच्या माराची भीती वाटू नये म्हणून वर्गात साधा डस्टरसुद्धा टेबलावर ठेवायचा नाही, असा हुकूम निघाला. छडी तर कधीच शाळांमधून हद्दपार झाली आहे. अभ्यासक्रमाचे ओझे वाटू नये आणि त्याचा बाऊ केला जाऊ नये म्हणून सरसकट आठवी इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, असा आदेश निघाला. त्याबरोबरच परीक्षादेखील घ्यायची नाही. त्यामुळे शाळेत गैरहजर, शरीर, मन आणि बौद्धिक पातळीवर कमकुवत असलेला मुलगाही या नियमाने पुढे सरकत गेला. मागचे कच्चे असताना, त्याला पुन्हा नव्या अभ्यासक्रमाच्या घाण्याला जुंपले गेले. व्हायचे तेच झाले. मुले आठवीपर्यंत लिलया पास झाली आणि नववीत जाऊन अडकली. असे अनेक प्रयोग राबवण्याचे फतवे निघाले आहेत. हे प्रयोग, उपक्रम राबवण्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी अंमलबजावणीकर्त्यांनी तो चुकीच्या पद्धतीने राबवला. त्याचा चुकीचा संदेश खालपर्यंत गेला, असाही प्रकार घडला आहे. आता पुन्हा परीक्षा पद्धत सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जी काही तज्ज्ञ मंडळी वर बसली आहेत, त्यांनीच हे प्रयोग राबवायचे आणि त्यांनीच त्याला नकार द्यायचा, हा कसला प्रकार म्हणायचा!
     दिल्लीतल्या डिसेंबर महिन्यात घडलेल्या बलात्कार घटनेने तर सारा देश हादरून गेला आहे. वास्तविक अशा घटना रोजच घडताहेत. कोणी मुकाट्याने त्याचे परिणाम सोसत असतात, कोणी आपले जीवन संपवून सगळ्याच गोष्टीला पूर्णविराम देऊन टाकतात. पण आता अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना शोधल्या जात आहेत. त्यातच आता शालेय शिक्षणात ज्युडो-कराटेचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने केंद्रीय पातळीवर घेतला आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, विद्यार्थ्यांच्या कुवतीचा विचार न करता असे एका मागून एक विषय विद्यार्थ्यांच्या बोकांडी मारले जात आहेत. उपक्रम, प्रयोग आणि नवनव्या विषयांचा अंतर्भाव यामुळे मुले तर गोंधळी आहेतच पण शिक्षकदेखील वैतागून गेले आहेत. खरे तर विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारचा बलात्कारच आहे. बलात्कार म्हणजे जबरदस्ती. शासन विद्यार्थ्यांवर ही जबरदस्तीच करत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी विरोध करू शकत नाहीत. कोणाच्या विरोधात आवाज उठवू शकत नाहीत. म्हणून त्यांच्यावर उपक्रम, प्रयोग आणि विषयांवर विषय लादले जात आहेत. समाज मूल्यहीन होत आहे. चला, मूल्यशिक्षणाची सक्ती करा. त्याच्यासाठी शालेय वेळापत्रकात खास तासिका ठेवण्यात आल्या. पर्यावरणाचा र्‍हास होतोय. मग पर्यावरण विषय सक्तीचा करा. झाले, त्याचीही अंमलबजावणी चालू...! विवाहबाह्य संबंध वाढताहेत. मग लैंगिक शिक्षण सक्तीचे करा.  शासनाने आजपर्यंतचे सगळे जीआर एकत्र केले तर त्याचा एक ढिग होईल आणि मग सगळ्यांचा विचार केल्यावर इतके विषय खरेच गरजेचे आहेत का, याचा विचार करण्याची वेळ येईल. अर्थात या विद्यार्थ्यांचे नशीब इतकेच की, निष्क्रिय यंत्रणा, कामचुकार शिक्षक, अधिकारी यांच्या अंमलबजावणीतून पळवाटा निघत राहिल्याने आणि गुणवत्ता तपासण्याचे निकष व्यक्तीपरत्वे असल्याने यातून विद्यार्थ्यांची सुटका होत आली आहे.
     असा हा सगळा प्रयोगांचा, त्यासाठीच्या प्रशिक्षणाचा खेळ गेल्या पंधरा वर्षांपासून अव्यावहतपणे सुरू आहे.  पंधरा वर्षांपूर्वी या खेळाला क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाने सुरू झाला, तो सुरूच आहे. गुणवत्ता विकासाच्या नावाखाली मूल्यमापनाची शस्त्रे वारंवार बदलली जात आहेत. दरवर्षी शिक्षकांना प्रशिक्षणाला सामोरे जावे लागलेच आहे. या सततच्या बदलाने आणि प्रशिक्षणामुळे शिक्षक पार गोंधळून आनि थकून गेला आहे. गरीब बिच्चारा विद्यार्थी मात्र न कुरकुरता नवनवे बदल मुकाट्याने स्वीकारत आहे. शिक्षण, शिक्षण यंत्रणा आणि शिक्षक हे सततचे प्रयोग सहन करत राहतील, त्यानुसार अंमलबजावणी करत राहतील. पण या विद्यार्थ्यांचे काय? ज्याच्यासाठी सारा हा अट्टाहास चालला आहे, त्याच्या मनाचा, कुवतीचा कोणी विचार का करत नाही. शेवटी त्यांनी किती विषय, प्रयोग, उपक्रम झेलायचेआता नव्या बालकांच्या मोफत शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार शाळांच्या वेळा सकाळी साडेनऊ ते साडेपाच अशा करण्याचा घाट घातला जात आहे. मूलभूत क्रियेत मागे असलेल्या मुलांना शाळेव्यतिरिक्त जादा अधिक तास द्यावा लागणार आहे. त्यांच्या मानसिकतेचा, क्षमतेचा यात काहीच विचार करण्यात आला नाही. सलग आठ-नऊ तास शाळांच्या चार भिंतीत कोंडून ठेवणे योग्य आहे का? शिक्षकांच्या चाकोरीबद्ध चौकटीत त्याने हसायचे-बागडायचे आणि अभ्यासात डोके खुपसून बसायचे आणि आठ-नऊ तासांच्या शाळेतल्या वावरानंतर घरी जायचे. तिथे त्याची कुठली 'एनर्जी' राहणार आहे. ग्रामीण- शहरी भागातला आणखी एक फरक असा की, ग्रामीण भागातल्या मुलांना घरकामात मदत करावी लागते, तर शहरातील मुले पुन्हा शिकवणी, अभ्यास याच्या मागे लागलेले असतात. मनसोक्त खेळायला, मनापासून काही करायला त्यांना वेळच मिळत नाही. वाड-निवड याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते. मग त्यांच्यातल्या कलागुणांना कसा वाव मिळणार? शाळांमध्ये भौतिक, शैक्षणिक साधनांचा वानवा आहे. त्याला तिथे पुस्तकांव्यतिरिक्त काहीच साधने  मिळत नाहीत.
     शाळेत आणि घरात सतत अभ्यास आणि कामाचा ताण! अशा परिस्थितीत आपण त्यांच्यातले कोणते गुण विकसित करणार आहोत? त्याला पोहायला जावं, सायकल चालवावी, झाडावर चढावं, मनसोक्त खेळावं, मनाला वाट्टेल, असे काही तरी सृजन करावं असं वाटत असतं. पण त्याला ही संधी मिळतच नाही. आज शहरातल्या ६०-७० टक्के मुलांना पोहता येत नसल्याचं स्पस्ट झालं आहे. दुर्दैवाने उद्या पाण्यासंबंधीचे संकट त्याच्यासमोर उभे राहिले तर तो त्याचा सामना कसा करणार? त्याच्यावर भावनिक, मानसिक आणि शारीरिक भक्कमतेचे शिक्षण असे एका जागी बसून, शिकवून आणि पुस्तकातून मिळणार आहेत का, याचा विचार केला गेला पाहिजे.  परोपकार करण्याचे, संकटकाळी मदत करण्याचे मूल्य केवळ शिकवून घडणार आहेत का? प्रत्यक्ष जीवनात त्याला एखाद्या गोष्टीची गरज पडली आणि दुसर्‍याने मदत केली न केली यावर त्याची मानसिकता घडणार आहे. आज काही मुलांना काहीच मिळत नाही तर काही मुलांना सांगायचा अवकाश! पालक त्याच्या समोर आणून ठेवतात. या दोन्ही मुलांची मानसिकता वेगवेगळी आहे. ज्याला भरपूर मिळते, तो आज दुसर्‍याला मदत करायचे सोडून अधिकाधिक स्वार्थी बनत चालला आहे. तर ज्याच्याकडे काही नाही, त्याला इच्छा असूनही काही मदत करता येत नाही. अशी विचित्र परिस्थिती असताना या दोघांमध्ये सांगड घालायची असेल तर त्याला व्यवहारात उपयोग करता आला पहिजे, अनुभव घेता आला पाहिजे. ज्याला सतत मिळत राहते, त्याला एखादेवेळेस मिळाले नाही तर हिसकावून घेण्याची, ओरबाडून, चोरी करून  घेण्याची हुक्की येते व तसे करून तो मिळवतो. अशाने कसली मूल्ये रुजणार आहेत. शिक्षण ही फक्त शाळा, शिक्षक यावरच अवलंबून नाही. शिक्षण समाजाभिमुख करायला निघालो आहे, पण ही जी बंदिस्त चौकट दिसते आहेत्याचा बिमोड कोण करणार? पालकाची, समाजाची काहीच कर्तव्ये नाहीत का? त्यांना कोण जाब विचारणार? त्यांना कोण शिकवणार?
     शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग, उपक्रम आणि विषयांची सक्ती करून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढणार? स्वयंसेवी संस्थांना आपले दुकान चालवायचे असते. ते त्यांचे काम करत असतात. पण तज्ज्ञ म्हणून जी माणसे आणि सरकार चालवणारे राज्यकर्ते यांनीही आपली डोकी चालवायला हवीत. 'राजा बोले, दळ हले' नुसता असा प्रकार सुरू आहे. आता हा शिक्षणावरचा प्रयोग थांबायला हवा. ठोस काही तरी घेऊन मुलांपर्यंत जायला हवे. मूलभूत क्रियांवर भर दिला की, मुलांना आता दिशा देण्याचीच केवळ आवश्यकता आहे. आज घर, समाजाकडून मुलांना खूप काही शिकायला मिळत आहे. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यामुळे बर्‍याच गोष्टींचे ज्ञान होत आहे. शिक्षक, पालक आणि समाजाला फक्त दिशा द्यायचं काम करायचं आहे. शाळांमधला शिक्षकांवरचा अशैक्षणिक कामाचा बोझा काढून टाका, शाळांना मुले रमतील, शिकतील असे वातावरण करणार्‍या भौतिकसुविधाशैक्षणिक साधने, त्यांच्या कलागुणांना वाव देणारी साधने, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्या. मग मुलंही शाळेत रमतील, शिकतील. मग कुणा स्वयंसेवी संस्थांना शिक्षणाची, शाळांची  गुणवत्ता तपासण्याची आवश्यकता भासणार नाही.

Tuesday, March 5, 2013

नवे नातेसंबंध जोडु या!

      आजकाल परस्परांतील मानवी संबंध फक्त औपचारिक बनले आहेत. माणसं एकमेकांना भेटतात, ती फक्त कामापुरती! भेटण्यामागे काही तरी कारण असतं. एखाद्यानं फोन केला की, प्रारंभीच्या ख्यालीखुशालीनंतर आपण लगेच म्हणतो, "बोला, फोन का केला होतात?' एखादा भेटायला आला आणि तो काही बोलला नाही तरी आपल्या मनाला वाटत असतं की, हा काही तरी कामानं आला आहे. आता आपण ठरवूनच टाकलंय की, कुणी कुणाला अकारण भेटतच नाही. कारण आता कुणाजवळ वेळच नाही. विनाकारण भेटायला जाणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे, असं वाटतं.
      यात काही वावगं नाहीच, असं वाटण्याइतकं ही गोष्ट आता सामान्य झाली आहे. हे चुकीचं आहे, असं कधी आपल्या लक्षातदेखील येत नाही. पण आपली चूक ही की, अशाप्रकारे आपण कधी कुणाशी 'दिल से' जोडले गेलोच नाही. हृदयाशी हृदयाचं नातं जुळणं ही तशी स्वाभाविक क्रिया आहे, पण आपण कधी दुसर्‍याच्या हृदयात डोकावून पाहण्याचा प्रयत्नच करत नाही. माणसाच्या हृदयात अनेक कप्पे आहेत. काम तर ही एक बाह्यक्रिया आहे, जी उपजीविकेसाठी गरजेची आहे. पण मानवीय नाती मात्र हृदयाशी हृदय जुडल्यावरच बनतात. आजच्या जीवनशैलीत माणसे ही नातेसंबंध जोडण्याची कला पार  विसरून गेली आहेत. या आधुनिक जगात सगळी माणसे एकमेकांसाठी केवळ साधन बनली आहेत. एका माणसाचं दुसर्‍या माणसाशी माणुसकीच्या नात्याचा कुठला संबधच राहिला नाही. जेव्हा आपलं काम संपतं तेव्हा आपला त्या माणसाशी संबंध संपतो. तो आपल्यादृष्टीने टाकाऊ बनतो. माणसं एकमेकांचा उपयोग फक्त एक वस्तू म्हणून करतात. नंतर मग फेकून देतात. म्हणजे हाडामांसाची, भावभावनांनी ओतप्रोत भरलेली माणसेदेखील आता एखादी वस्तू बनून राहिली आहेत.
     या जीवनशैलीमुळे प्रेम कोरडं बनत चाललं आहे. नि:स्वार्थ ही आता फक्त कल्पनाच राहिली आहे. त्यामुळे नाती संपून त्याजागी  व्यवहार नावाचा दलाल उभा राहिला आहे. ही कोरडी नाती आपल्याला, माणसाला कोठे घेऊन चालली आहेत, हे मात्र कळायला मार्ग नाही. मात्र यामुळे मानवाची सद्दी संपत चालली आहे. आज कोरडी वागणारी माणसे उदया मतलबासाठी हिंस्त्र बनतील. मग त्याच्यात आणि जनावरात काहीच फरक राहणार नाही. त्याची प्रचिती  आपल्याला जागोजागी  येत आहे.
      आज आपल्या जीवनात प्रेम, माया, जिव्हाळा, स्नेह परत मिळवायचा असेल तर अकारण संबंध जोडले जायला हवेत. अकारण एखाद्याला मदत करायला हवं किंवा काही कारण नसताना कुणाशी तरी बसून चहा घ्यायला हवा.  गप्पा निघतील. सुख-दुखं शेअर होतील.  मग बघा, नाते संबंधाचं एक नवम द्वार उघडलं जात आहे, असं आपल्या लक्षात ये ईल. यात दुसरी व्यक्ती साधन नव्हे तर साध्य असेल. हाच मानवतेचा गौरव आहे. दुसर्‍याचा गौरव वाढवून आपल्यालादेखील एका नव्या ऊर्जेचा अनुभव घेता ये ईल.