एक जिन दाम्पंत्य राहत होतं. त्यांना दोन मुलीदेखील होत्या. एकीचं नाव किटी होतं, तर दुसरीचं नाव बिटी. त्या दोघी मोठ्या व्रात्य होत्या. फार सैतानी करायच्या. शेवटी त्या जिनच्या मुलीच ना! एकदा जादू करता करता चुकल्या आणि त्या एका निर्जन बेटावर जाऊन पोहचल्या. तिथं चिटपाखरूदेखील नाही. मग काय! त्या जाम घाबरल्या. पण करणार काय? त्यांना घरी जायची जादूदेखील आठवेना! जादूची प्रॅक्टीस काळजीपूर्वक करीत जा, असे आई-बाबा वारंवार का बजावायचे. ते आता त्यांना आठवलं. आपण ज्या ज्या लोकांना त्रास दिला, त्यांना आपल्याविषयी काय वाटत असेल, याचा त्या विचार करू लागल्या. त्यांना अपराध्यासारखं वाटू लागलं. पण त्याचा आता काय उपयोग!
त्या दोघी हिंमत एकवटून हळूहळू पुढं चालू लागल्या. थोडं पुढं चालून गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, हे बेट खाण्याच्या सगळ्या जिनसांनी बनलेलं आहे. ते तिथलं पानी प्यायले, तर त्यांना खोबर्यातल्या गोड पाण्यासारखं लागलं. तिथली वाळूदेखील गाजर्याच्या हलव्यासारखी होती. आणि तिथल्या दगड-धोंड्यांचा स्वाद चॉकलेटसारखा होता. आता दोघींनाही मजा येऊ लागली. त्यांनी अगदी पोट भरून सगळ्या चिजा खाल्ल्या. मग पुन्हा पुढे सरकल्या.
पुढे गेल्यावर त्यांना एक गुहा दिसली. बिटी त्या गुहेत जाऊ इच्छित होती. पण बिटी पुरती घाबरली होती. शेवटी धाडस करून दोघीही गुहेत शिरल्या. आत गेल्यावर तर त्यांच्या आश्चर्याचा पारावर उरला नाही. आत जिकडे पाहावं तिकडे फळेच फळे! त्या जाम खूष झाल्या. किटीनं कलिंगड खायला घेतलं तर बिटीने संत्री! खात खात ती फळं वेचू लागल्या. तोच गुहेत झगमगाट झाला. गुहाभर प्रकाश उजळला. समोर त्यांचे आई-बाबा होते. झटदिशी त्या त्यांच्या दिशेने धावल्या आणि त्यांना घट्ट बिलगल्या.
आता त्या शहाण्या झाल्या. कुणाला त्रास द्यायचा नाही, असे त्यांनी पक्के ठरवले. आणि आनंदाने घरी परतल्या.
No comments:
Post a Comment