Friday, March 29, 2013

टोनी माकडाचे लग्न

     एका नदीच्या काठाला फार सुंदर बाग होती. बागेत विविध प्रकारच्या वृक्ष-वेली होत्या. त्यांना सुंदर सुंदर फुलं लागलेली होती, मधुर, रसाळ फळं लगडली होती. बागेत खूप सारे पक्षी राहत होते. बागेचं सौंदर्य पाहून तिथं परदेशातले पक्षीही आराम करायला येत. फळांचा मनमुराद आस्वाद घेत. काही दिवसांनी टोनी माकडही तिथं राहायला आलं. बागेजवळच्या नदी पात्रात सोनी नावाची मगरदेखील राहत होती. टोनी-सोनीची छान मैत्री जमली होती.
     टोनी दिवसभर जंगलातल्या झाडांवर मर्कटलीला करायचा. कधी या फांदीवर तर कधी त्या फांदीवर उडया मारणं चालूच असायचं. तो शांत म्हणून कधी बसतच नसे. फळं खायचा तीही अर्धीमुर्धीच! उरलेली फेकून द्यायचा. झाडांचं नुकसान करायचा. कित्येक पक्ष्यांची घरटीदेखील त्यानं उद्वस्त केली होती. त्याच्या सततच्या त्रासाला सगळेच पार वैतागून गेले होते. त्यांनी त्याला कित्येकदा समजावून सांगितलं, ‘टोनीदादा, आम्हीदेखील इथे राहतो. आम्ही वारंवार घरटी बनवतो, आणि तू मनाला येईल तेव्हा झाडांच्या फांद्या तोडून टाकतोस. जर तू या फांद्या तोडत राहिलास तर आम्ही कुठे राहायचं? आमच्यावर दया कर.
     परंतु, टोनी त्यांचे ऐकलं न ऐकल्यासारखं करे. आपल्या मर्कटलीला चालू ठेवी. कंटाळून एक दिवस पक्ष्यांनी विचार केला, टोनीच्या खोडया थांबवायच्या असतील, तर यावर आता काही तरी उपाय शोधला पाहिजे.
पक्ष्यांमध्ये एक सोनसाळुंखी होती. ती फार चतुर आणि बुद्धिमान होती. कुठल्याही कामात तिचं डोकं तुफान चालायचं. तिच्या डोक्यात एक कल्पना आली. टोनीचं आपण लग्न करून टाकू. म्हणजे त्याच्या सवयी आपोआप बदलतील.सोनूने सगळ्यांना कल्पना सांगितली.
     सगळ्यांना तिची कल्पना भारी आवडली. तिच्या बुद्धिमत्तेचं सगळे कौतुक करू लागले. पण पुढे प्रश्न असा पडला की, त्याच्याशी लग्न कोण करणार? कारण आजूबाजूच्या परिसरात माकडांचं एकही कुटुंब वास्तव्याला नव्हतं.
पण काही रानचिमण्या अन्नाच्या शोधात नदीच्या पलीकडे असलेल्या चंदनवनात जायच्या. तिथे बल्लू माकड आपल्या कुटुंबासह राहत असल्याची माहिती त्यांना होती. त्याला दोन मुलं होती. त्यात एक मुलगीदेखील होती. सोन साळुंखीने त्या मुलीशी टोनीचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.
     सगळ्या पक्ष्यांनी मिळून टोनीपुढे त्याच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नाचे ऐकून टोनी नाराज झाला. त्याने सर्वाशी बोलणं टाकलं. जंगलात तो सोनी मगरीशिवाय कुणाचेच ऐकत नव्हता. त्यामुळे सगळ्यांनी सोनीला गळ घालण्याचं ठरवलं. तिला पटवून दिलं, की टोनी आपोआप बोहल्यावर चढायला तयार होईल, याची खात्री त्यांना होती.
एक दिवस सगळे नदीकाठाला गेले. सोनीची भेट घेतली आणि टोनीच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर मांडला.  आम्ही टोनीच्या भलंच चिंतीत आहोत, असं सर्व पशूपक्ष्यांनी सोनीला पटवून दिलं. टोनीच्या लग्नाचा विषय ऐकून तीदेखील हरखून गेली. टोनीचं मन बदलण्याची जबाबदारी तिने स्वत:वर घेतली. पशू-पक्ष्यांना फार आनंद झाला.
     टोनी हिंडण्या-फिरण्याचा मोठा शौकीन होता. पाण्यातली सफर त्याला जाम आवडायची. ही सफर त्याला त्याची मैत्रीण-सोनी घडवून आणायची. आपल्या पाठीवर बसवून त्याला दूर-दूपर्यंतचा परिसर दाखवून आणायची. मोबदल्यात टोनी तिला जंगलातले मधुर, रसाळ फळं खायला आणून द्यायचा. एकदा सोनीने त्याला जलसफरीला नेले. गप्पा मारता मारता म्हणाली, ‘टोनीदादा, कुठंवर एकटाच झाडांवर मर्कटलीला करत राहणार? आता लग्न करून घे. गृहस्थी सांभाळ. वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. शिवाय झाडांवर राहणा-या पक्ष्यांचादेखील विचार कर. त्यांना नेहमी त्रास देत राहतोस. पण ते तुझी किती काळजी घेतात. माझं पाहिलंस ना, माझंही कुटुंब आहे. आता तूही कुटुंब करून मजेत राहा आणि ते मलादेखील आवडेल’.
     अपेक्षेप्रमाणे टोनी सोनीची गोष्ट ऐकून लग्नाला तयार झाला. पक्ष्यांनी टोनीच्या लग्नाचा प्रस्ताव बल्लूजवळ ठेवला. भावी जावयावर बागेतल्या पक्ष्यांचं प्रेम पाहून बल्लू भारावून गेला. म्हणजे जावई लाखात एक आहे, याची त्याला खात्री पटली. त्याने पटकन होकार दिला.
     आता टोनीच्या लग्नाची धामधूम सुरू झाली. सोनीने लग्नाची सगळी व्यवस्था आपल्या शिरावर घेतली. गोपू गाढवाचा बँड परिसरात चांगलाच लोकप्रिय होता. त्याचाच बँड सांगण्यात आला. नदीपलीकडे नेण्या-आणण्याची सगळी व्यवस्था सोनीनेच केली. त्यासाठी तिने आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतलं. मगरींच्या पाठीवर बसून व-हाड पलीकडे गेले. बल्लू माकडानेही तेवढयाच तोलामोलाचा लग्नाचा थाट केला होता. सनई-चौघडयाच्या मंगलमय वातावरणाने व-हाडी मंडळी भारावून गेली. जेवणाचा बेतही बँडच्या तालावर व-हाडी बेभान नाचू लागली. काळूबाळू या जोडगोळीचा डान्स तर सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू ठरला. बन्या बेडूक आणि त्याच्या साथीदारांनी असा काही झांज वाजवला की, सगळे त्याच्या तालावर नाचू लागले. कोकिळा, चिमण्या यांनीदेखील आपल्या गोड आवाजातल्या गाण्यांनी सगळ्यांना खूश केलं. मोरांनी थुई थुई नाच केला. दोन्हींकडील मंडळी अगदी आनंदात होती. 
     अशाप्रकारे बल्लू माकडाच्या मुलीचा विवाह टोनीशी मोठय़ा थाटामाटात पार पडला. आलीकडच्या काळात असा विवाहसोहळा कधी झालाच नव्हता, असं जो तो म्हणत होता. बागेतल्या सगळ्यांनी टोनीला शुभेच्छा दिल्या.
लग्नानंतर टोनी एकदम बदलला. आता तो शांत आणि लाजरा बनला. बागेत सगळे पक्षी आनंदाने राहू लागले.

No comments:

Post a Comment