Tuesday, March 19, 2013

बालकथा कोल्हा आणि सिंह

      
      एक दिवस भुकेल्या कोल्ह्याची एका सिंहाशी गाठ पडली. सिंहाला पाहताच कोल्ह्याची शिट्टी-बिट्टी गुल झाली. तो थरथरतच हात जोडून म्हणाला," महाराज, मला अभय द्या. मी आपली प्रत्येक आज्ञा मानेन."
      सिंहाला कोल्ह्याची दया आली. तो कोल्ह्याला म्हणाला," ठीक आहे. चल, माझ्यासोबत. माझी प्रत्येक गोष्ट मानणार असशील तर तुला खाण्या-पिण्याचीदेखील भ्रांत राहणार नाही.
     "आपला हुकूम सर आँखों पर, महाराज." कोल्हा लवून मुजरा करत म्हणाला.
     "आता मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐक. तुला रोज पहाडावर जाऊन खाली घाटीत कोणी जनावर फिरतं-बिरता  का, ते पाहावं लागेल. आणि जनावर दृष्टीस पडलं की, मला येऊन सांगायचं.  मग मी शिकार करेन आणि माझं भरपेट भोजन झालं की मग तू उरलेल्या  मांसावर  ताव मारायचंस."
     "जशी आपली आज्ञा, महाराज!" कोल्हा पुन्हा लवून मुजरा करत म्हणाला.
     दुसर्‍यादिवशी कोल्हा पहाडाच्या टोकाच्या दिशेने निघाला. त्याची दृष्टी एका हत्तीवर पडली. तो धावतच   सिंहाजवळ आला आणि लवून मुजरा करत म्हणाला, " महाराज, शिकार आहे."
     सिंहाने हत्तीची शिकार केली.  त्याच्यावर यथेच्छ  ताव मारला. त्यानंतर कोल्ह्यानेदेखील आपली भरपेट पोटपूजा केली. अशाप्रकारे कोल्ह्याचे मस्त दिवस चालले होते. आता कोल्हा धष्टपुष्ट  आणि गुटगुटीत दिसायला लागला होता. पण त्याचबरोबर त्याच्यातली विनम्रतादेखील  कमी होत चालली होती. एक दिवस तो विचार करू लागला,' मी सिंहाच्या उष्ट्यावरच माझे पोट का भरावं? मीदेखील श्वापद आहे. मीसुद्धा हत्ती आणि म्हशींची शिकार करू शकतो. शिवाय आता मीदेखील खाऊन-पिऊन चांगला धष्टपुष्ट झालो आहे.'
     तो सिंहाला म्हणाला," महाराज, आपले उष्टे खाण्यातच माझे अर्धे आयुष्य गेले. आता मीदेखील  स्वतः शिकार करू शकतो.  हत्तीला एका झटक्यात यमसदनी धाडू शकतो."
     सिंहाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला," कोल्ह्याही गोष्ट तुझ्या आवाक्यातली नव्हे. मी जी काही शिकार करतो, तेच खाऊन मस्त रहा. त्यातच तुझे भले आहे."
     " नाही महाराज, कृपा करून मला एक संधी द्या. या खेपेला मी इथेच थांबेन आणि तुम्ही पहाडावर जा आणि एखादा हत्त्ती दिसला तर मला सांगायला या. मी नक्कीच त्याची शिकार करेन."
     सिंहाने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केलापण व्यर्थ! शेवटी सिंह तयार झाला.  सिंह पहाडावर गेला. थोड्या वेळाने  परत आला आणि कोल्ह्याला म्हणाला," आत्ता आत्ताच मी एक हत्ती पाहिला आहे."
      लगेच कोल्हा धावत सुटला  आणि हत्तीसमोर जाऊन उभा राहिला. 'आता झटक्यात याची गरदन पकडतो आणि  याचा खेळ खल्लास करतो. असे म्हणत  त्याने हत्तीवर झेप घेतली. पण त्याची झेप चुकली आणि तो एका झाडावर जाऊन आदळला. हत्ती संतापला.  त्याने त्याला एका झटक्यात आपल्या पायाखाली घेतले आणि चिरडून टाकले.  
तात्पर्यः काही करण्यापूर्वी आपले सामर्थ्य ओळखायला हवे.

No comments:

Post a Comment