Sunday, March 10, 2013

लघुकथा :लोकासांगे...!

     शाळेची मधली सुट्टी झाली होती. काही शिक्षक व्हरांड्यात गप्पा मारत होते. इतक्यात सहावीतला एक मुलगा रडत रडत तिथे आला. रावडे गुरुजींनी त्याला विचारलं," काय झालं रे?"
"गुरुजी, बंक्या मला सारखा फेगड्या फेगड्या म्हणतोय. माझे पाय फेगडे आहेत, यात माझा काय दोष?"
रावडे गुरुजी बंक्याला बोलावून आणायला सांगतात. थोड्या वेळाने चार-दोन पोरं बंक्याला पकडून गुरुजींच्याकडे ओढून आणतात. रावडे गुरुजी बंक्याचा हात हातात घेतात नि जवळ खेचतात. वर पाठीत दोन रट्टे देतात. बंक्या पाठ धरून कण्हायला लागतो.
"गाढवा, रम्याला फेगड्या फेगड्या म्हणतोस. दुसर्‍याला नावे ठेवतोस....: असे म्हणत आणखी एक रट्टा पाठीत हाणतात. बंक्या रडायला लागतो.
" दुसर्‍याला नावे ठेवायची नसतात, माहित हाय का नाह्य. दुसर्‍याच्या अवगुणावर बोलायचं नसतं. चिडवायचं नसतं. समजलास! आता पुन्हा असं म्हणू नको. जा...!"
बंक्यानं रडतच पळ काढला.
कदम गुरुजी रावडे गुरुजींना सांगू लागले," अहो, त्या जाधव गुरुजींचा ऍक्सिडेंट झाला. बिच्चारे रस्त्यातून कडेने निघाले होते.मागून टु-व्हीलरने धडक दिली. चांगलंच लागलं आहे त्यांना!"
"कोण जाधव, तो ढांगोळ्या? तो होय. चालणार उंटासारखा. ऍक्सिडेंट होणार तर काय होणार! तोच आडवा आला असेल आणि पडला असेल...."                                                            

लघुकथा    : लायकी
महिलांची किटी पार्टी चालली होती. मिसेस नाईक नव्यानंच पार्टी जॉईन केलेल्या मिसेस पवारांशी ओळख वाढवण्याच्या इराद्याने त्यांच्याजवळ सरकल्या. मिसेस पवार कुणाशी तरी मोबाईलवर बोलण्यात गुंतल्या होत्या. बोलणं झाल्यावर मोबाईल ऑफ करून मिसेस पवार अगदी हसतमुखानं मिसेस नाईकांशी भेटल्या. त्यांच्या गप्पा चालल्या असतानाच पुन्हा मिसेस पवारांचा मोबाईल वाजला. "एक्सक्युज मी'' म्हणत त्यांनी फोन रिसीव्ह केला. तोच मिसेस नाईकांची नजर पवारांच्या मोबाईलवर पडली. अगदीच स्वस्तातला मोबाईल पाहून आश्चर्यात पडल्या. आता त्यांनी मिसेस पवारांना तिथंच सोडलं आणि मिसेस घाटगेंकडे गेल्या.
आता मिसेस नाईक घाटगेंना सांगत होत्या," मिसेस पवारचा  मोबाईल हँडसेट तर पाहा, किती भिकारडा! जेमतेम हजार रुपड्यांचाच असेल, बाई! ती नक्कीच मिडल क्लास असली पाहिजे. साडी आणि चप्पलदेखील स्वस्तातलीच दिसतेय. अहो, मी तर माणसाची लायकी पाहूनच त्यांच्याशी मैत्री करते."           

No comments:

Post a Comment