Monday, January 30, 2017

हार्मोनियमचा सूर


     तबल्यावरची थाप ऐकली की, आठवतं,वाह ताज!, ढोलकीचा आवाज ऐकला की, आठवती ती लावणी. वीणेची तार छेडली की, प्रार्थना ओठांवर येते.पण हार्मोनियमचा सूर ऐकायला  येतो,तेव्हा काय आठवतं? आपल्याकडे कीर्तन,भजन,पारायणे,प्रवचने होतात,इथे हार्मोनियमशिवाय कामच चालत नाही. पूर्वी बहुरुपी लोक गळ्यात हार्मोनियम अडकवून दारोदारी फिरून गाणी म्हणायची. हाच हार्मोनियम संगीतातला महत्त्वाचा हिस्सा असला तरी त्याला दुय्यम स्थान मिळत गेले आहे.हिंदी चित्रपटातदेखील याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकगीत,भजनसंध्या,कव्वाली,ठुमरी, सबद,गजलपासून बॉलीवूडमधल्या कित्येक प्रसिद्ध गाण्यांचा भाग बनलेला हार्मोनियम आज मात्र काहीसा मागे पडला आहे.संगीतकारांच्या वाद्यवृंदांमधून आता तो फारसा दिसत नाही.ऑर्केस्ट्रा,गाण्यांच्या मैफलीतूनही बाजूला होतो आहे.पण तरीही अजून ग्रामीण भागातल्या संगीत कार्यक्रमांमध्ये तो आपले अस्तित्व टिकून आहे.इथेही नवे तंत्रज्ञानाची वाद्ये पोहचली असली तरी आणखी काही दिवस हार्मोनियमला मरण नाही,हे खरे!
हिंदी चित्रपटातले पहिले गाणे हार्मोनियमच्या सुरांनीच सजले होते.सन 1931 मध्ये पहिला बोलपट आला तो आलमाआरा. दे दे खुदा के नाम पर... हे गीत पहिल्यांदा हार्मोनियमवर गायिले गेले होते. चित्रपट आणि गाणे दोन्ही हिट झाले.या गाण्याद्वाराच प्लेबॅक सिंगिंग प्रकार सुरू झाला.हे गाणे तबला आणि हार्मोनियमवर रिकॉर्ड केले गेले होते. या वाद्याचा इतका मोठा प्रभाव पडला की, 1940 नंतर हार्मोनियमने चित्रपटसृष्टीत बलस्थान पटकावले. पुढे हा सिलसिला असाच सुरूच राहिला. पडोसन चित्रपटातले एक चतुर नार... आठवा. किशोर कुमार आणि मेहमूद या गाण्यात हार्मोनियमद्वाराच एक-दुसर्यासमोर भिडतात आणि आपले संगीतातले ज्ञान दाखवतात.याशिवाय दोस्ती चित्रपटातील कोई जब राह नाम आए... आणि अपनापन चित्रपटातील आदमी मुसाफिर है... ही गाणी देखील हार्मोनियमच्या धूनवरच आहेत. पुढच्या काळात हार्मोनियमच्या हुनरसोबत संगीतकारांच्या जोड्यासुद्धा बनल्या. उदाहरणे आहेत, शंकर-जयकिशन,लक्ष्मीकांत-प्यारेलालसारख्या संगीतकार जोड्यांचा! एका जोडीत जयकिशन हार्मोनियममध्ये पारंगत होते तर दुसर्या जोडीत प्यारेलाल यातले वस्ताद! हार्मोनियममध्ये माहिर असलेल्यांमध्ये संगीतकारांबाबत बोलायचे झाल्यास नौशाद अलींचा उल्लेख आवश्यक आहे.एक काळ असाही आला की, ढोलकीशिवाय संगीत लयबद्ध करण्यास हार्मोनियम एक जरुरी साज बनला. कौटुंबिक कार्यक्रम,सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्येही याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. वक्त चित्रपटातील ए मेरी जौहरजबी... गाणे कोण विसरू शकेल?गाण्याच्या बॅकग्राऊंडला हार्मोनियमच आहे. याशिवाय अमिताभ यांच्या चित्रपटांमधील जसे की, मंझील चित्रपटातील रिमझिम गिरे सावन,सिलसिलाचे रंग बरसे भीगे चुनर वाली, चुपके चुपकेचे सारेगामा गाण्यांमध्येदेखील हार्मोनियमचाच सूर लागला आहे. 21 व्या शतकातदेखील हार्मोनियमच्या धुनवरील कित्येक गाणी आठवणीतील बनली आहेत, जी आजसुद्धा लोकांच्या ओठांवर आहेत. 2010 मधील तीस मार खां चित्रपटातील शीला की जवानी आठवा. विशाल शेखरचा आवाज आणि कटरिना कैफचे डान्सिंग स्टेप यामुळे गाने पॉप्युलर बनले असले तरी हार्मोनियमचा वापरदेखील या गाण्याची खासियत आहे.गाण्याच्या अंतरादरम्यान हार्मोनियमचा ज्याप्रकारे वापर केला गेला, त्याने संगीतप्रेमींची हार्मोनियमशी जोडलेल्या गेलेल्या आठवणी ताज्या झाल्या. सन 2006 मध्ये आलेल्या ओमकारामधील नमक इश्क का...देखील त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडी होता. या गाण्याला शब्दांबरोबरच हार्मोनियमच्या धुननेदेखील हिट बनवले.हार्मोनियममुळे चित्रपट दुनिया सजली-धजली असली तरी हार्मोनियमच्या अस्तित्वावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


आर.के.स्टुडिओमध्ये संगीत बैठकीत बसलेले संगीतकार (डावीकडूनशंकर आणि जयकिशन(हार्मोनियमवरअभिनेत्री नरगीस,बेगम पाराविजयलक्ष्मी आणि राजकपूर.

हार्मोनियमची उत्पत्ती
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की, हार्मोनियम भारतीय वाद्ययंत्र नाही. याची उत्पत्ती फ्रान्समध्ये झाली. 19 व्या शतकात मध्य पॅरिसमध्ये अॅलेक्झांडर फ्रँको डिबेन यांनी याचा शोध लावला.1842 मध्ये त्यांनी हार्मोनियम या शब्दाचे पेटंट केले होते.ज्यावेळेला हा भारतात आला,त्यावेळा याचा फुट एअर वर्झन म्हणजे पायाने वाजवला जाणारा हार्मोनियम अधिक उपयोगात होता. हा खुर्चीवर बसून पायाने हवा पंप करून वाजवला जायचा. पण भारतीय संगीत मैफिलींचा विचार करून हार्मोनियममध्ये बदल करून त्याला हाताने वाजवण्याजोगा करण्यात आला.याचे श्रेय जाते द्वारकानाथ घोष आणि कंपनीला! यांनी बनवलेला हार्मोनियम द्वारकिन हार्मोनियम या नावाने प्रसिद्ध झाला. नंतर हळूहळू या रुपातही बदल होत गेले.भारतीयांनी कित्येक प्रकारचे यात बदल केले. कल्पर,स्केल चेंजर,सुटकेस आणि सिंगल,डबल अशा स्वरुपात हार्मोनियम आणले. पण सिंगल-बिलो हार्मोनियम अधिक वापरात आला. याला 35 किज(सूर) आहेत. हा सगळ्यात लहान हार्मोनियम.हा कुठेही सहज ने- आण करता येतो.  

Sunday, January 29, 2017

वाचनाकडून लेखनाकडे     मला शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड होती. माझे माध्यमिक शिक्षण  विश्रामबाग(सांगली) येथील महाराष्ट्र रेसिडेन्शियल(एम. आर) हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या तिथल्याच होस्टेलमध्ये राहात होतो. हाताला जे गवसेल ते वाचत सुटायचो. शाळेजवळच पोलिस लाईन होती. तिच्या गेटवर कुपवाडकडे जाणार्या मार्गावर एक मोफत वाचनालय होते.म्हणजे एक लोखंडी खांब रोवलेला आणि त्यावर एक-दीड फुटाच्या चार पाईपा असायच्या.त्यात वर्तमानपत्रे ठेवली जायची. ती वाचायला सकाळी गर्दी असायची.तिथे मी रोज नेमाने वाचायला जायचो. तिथे वर्तमानपत्राची पाने सुटी व्हायची. एक एक पान एक एक वाचक घ्यायचा. त्यामुळे संपूर्ण पेपर वाचायसाठी प्रतिक्षा करावी लागायची.दुसरा वाचेपर्यंत थांबून राहावे लागायचे. गोष्टीची पुस्तकेही जशी मिळेल तशी वाचून काढायचो.

     जतला उन्हाळी-दिवाळी सुट्टीला आलो की, करमायचे नाही. कारण मित्र नसायचे. गल्लीतल्या मुलांमध्ये जायला बुजायचो. मग सरळ स्टँड गाठायचो. तिथे मौला गवंडी यांचा पेपर स्टॉल आहे. त्यांच्याकडून पेपर, मासिके विकत घ्यायचो.चांदोबा असायचा. तो घ्यायचा.मी सारखा सारखा तिथे वाचनाच्या ओढीने स्टॉलवर जायचो. त्यामुळे गवंडी यांच्याशी झालेल्या ओळखीने पेपर मोफत चाळायला मिळायचे. त्यांनीही कधी फुकट का वाचतोस म्हटले नाही.त्यांनी इतरांबरोबर मलाही पेपर वाचायला मुभा दिली होती. नंतर माझ्याच वयाचा बाळासाहेब पेटकर नगरहून आपल्या बहिणीकडे राहायला आला होता. त्यांची बहीण सुषमा अक्का पेपर स्टॉलला मदत करायच्या. त्या रिक्षाही चालवायच्या.बाळूमुळे मला अधिकच पुस्तके, मासिके वाचायला मिळायची.
     वर्तमानपत्रे, त्यातल्या बातम्या, रविवारच्या पुरवण्या वाचता-वाचता मलाही आपले नाव पेपरात छापून यावे, असे वाटायचे. पण ते कसं छापून आणायचं माहित नव्हतं. पण मी दहावीला असताना माझं नाव पेपरात छापून आलं. मला आश्चर्याचा धक्का तर बसलाच, पण आनंदही खूप झाला. ती बातमी होती, होस्टेलच्या छात्रपदाधिकार्यांच्या निवडीची! होस्टेलला मुलांना काही कामे नेमून दिली होती. होस्टेल प्रमुख,वाचनमंत्री, स्वयंपाकमंत्री,स्वच्छतामंत्री वैगेरे. माझी स्वच्छतामंत्री म्हणून निवड झाली होती. ती बातमी छापून आली होती. वर्तमानपत्रात त्यावेळेला पहिल्यांदा माझे नाव छापून आले होते.
     दरम्यान दहावी झाल्यानंतर डी.एड.ला मिरजेतल्या शेठ रतिलाल गोसलिया अध्यापक विद्यालयात प्रवेश मिळाला. तिथेही मी होस्टेललाच राहत होतो. तिथे माझी देशिंगच्या दयासागर बन्नेशी ओळख झाली. आम्ही दोघेही होस्टेलला होतो.तो कविता करायचा. त्याच्या कविता वर्तमानपत्रात छापून यायच्या.मग मलाही कविता करण्याचा छंद जडला.ते वयही तसं होतं. एकदा दोन-तीन कविता मिरजेच्या अतिरेकी या वर्तमानपत्राकडे छापायला पाठवून दिल्या. आणि काय आश्चर्य त्यातली एक कविता रविवारच्या पुरवणीत छापून आली. त्यावेळचा मला झालेला आनंद अवर्णणीय होता.मग कथा,कविता लिहिण्याचा सपाटाच सुरू झाला. डी.एड.ला असताना एक कथाही लिहिली. तीदेखील दैनिक अतिरेकीमध्ये छापून आली. अतिरेकी दर रविवारी दोन पानांची साहित्यिक पुरवणी काढायची. त्याचे संपादन कवी भीमराव धुळूबूळ करायचे. सांगली-मिरज परिसरातले नवोदित लेखक,कवी त्यात लिहायचे. तो पेपर घ्यायला दर रविवारी सकाळी मिरजेच्या रेल्वेस्टेशनला जायचो. मिरजेतून जनप्रवास आणि सांगलीतून प्रभात दर्शन,राष्ट्रशक्ती,नवसंदेश,केसरी, अग्रदूत ही दैनिके प्रसिद्ध व्हायची. मग मी या दैनिकांमध्येही लिहायला लागलो.जे मनात येईल त्या विषयांबरोबरच, कथा,कविता लिहिण्याचा प्रपंच सुरूच राहिला.ते सगळे छापून येऊ लागले.
     डी.एड.झाल्यावर 1992 ला पुन्हा जतला आलो. यावेळेला पहिले काम केले ते म्हणजे जतमधल्या नगर वाचनालयाचा सभासद झालो. वाचानलायात प्रचंड पुस्तके. काय वाचू आणि काय नाही, असे झाले. पण जे वाचू वाटायचे,ते वाचून काढायचा सपाटाच लावला. कुठले पुस्तक चांगले, कुठले नाही, असा प्रकार काही केला नाही.साहित्यातले सगळे प्रकार वाचत गेलो.( आजही वाचनालयाचा सभासद आहे. पण वाचन कमी झाले आहे.)

     शाळेय जीवनापासून वर्तमानपत्राशी माझी नाळ जोडली गेली होती.त्यामुळे वाचकांच्या सदरातदेखील लिहायला लागलो.जतमधल्या काही समस्या, प्रश्न मांडत गेलो. असे करत असताना मग मला बातमीदार व्हावसं वाटायला लागलं. कथा-कविता लिहित असल्याने जनप्रवासमधील काही लोकांशी माझी ओळख झाली होती. त्यामुळे जतमधून वार्ताहरचा अर्ज केला. त्यांनी होकार दिला आणि मी वार्ताहर झालो. जनप्रवासमध्ये अनिल काळे म्हणून त्यावेळेला उपसंपादक होते. त्यांनी मला प्रोत्साहन दिले.( आजही ते जनप्रवासमध्ये त्या पदावर कार्यरत आहेत)त्यामुळे जतमध्ये वार्तांकनाचे काम करू लागलो. लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळू लागली. या कालावधीत मी तत्कालिन आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या जत येथील राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेत शिक्षक पदावर रुजू झालो होतो.नोकरी करत करत वार्ताहरचे काम करत होतो.
या कालावधी इचलकरंजी येथून प्रसिद्ध होणारे मॅचेस्टर (सध्या महासत्ता या नावाने प्रसिद्ध होत आहे) फार्मात होते.या दैनिकाबरोबरच मध्यंतरी दैनिक केसरीतही काम केले. सध्या महासत्ताशीच जोडला गेलो आहे. पण वार्ताहर म्हणून काम करीत असताना कथा-कवितांच्या लेखनाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले.(यामुळे मी स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले आहे, असे माझे साहित्यिक मित्र म्हणतात आणि ते योग्यही आहे.) या कालावधीत लेखन मंदावले होते. कविता लिहिण्याचा तर नादच थांबला. बालकथा, कथा असा लेखन प्रपंच सुरू राहिला. पण त्यात वेग नव्हता. 1995 च्या दरम्यान लवकुमार मुळे,महादेव बुरुटे,मी, विजय नाईक आणि शेगावमधील काही मंडळींनी मराठी साहित्य सेवा मंच स्थापन करून ग्रामीण साहित्य संमेलन घ्यायला सुरुवात केली. आज ही संस्था मोठ्या नावारुपाला आली आहे. आनंद यादव,फं.मुं.शिंदे,विठ्ठल वाघ अशी बरीचशी मोठी साहित्यिक मंडळी अध्यक्ष म्हणून लाभली आहेत.या संस्थेचा काही वर्षे अध्यक्ष म्हणूनही मी काम केले आहे.
     याच दरम्यान मी आश्रमशाळेतील नोकरी सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झालो. हा प्रवास सुरू असतानाच  शिक्षक संघटनांमध्ये काही पदावर काम करू लागलो. ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेंडस सर्कल या देशव्यापी आणि राज्यव्यापी या पत्रकारांच्या संघटनेचा राज्य सरचिटणीस म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. 2013 आणि 14 या कालावधीत हसत जगावे आणि जंगल एक्सप्रेस ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विविध वर्तमानपत्रात विविध विषयांवर लेखन सुरूच आहे. बालकथा किशोर मासिकासह छावा,माझा छोटू या मुलांसाठीच्या मासिकांसह सकाळ,पुढारी,संचार,गावकरी,तरुण भारत या विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. होत आहेत. सप्टेंबर 2011 पासून माझा स्वतंत्र ब्लॉग सुरू केला. चित्रपट,राजकीय, सामाजिक, पर्यावरण,सांस्कृतिक, साहित्य अशा विविध अंगाने लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. 1995 च्या दरम्यान दैनिक केसरीत चित्रपटासाठी वाहिलेली विविधा नावाची पुरवणी सुरू होती. या कालावधी चित्रपट कोडे वर्ष-दीड चालवले. दैनिक अग्रदूतमध्ये शाळांच्या उपयोगासाठी वर्षभर दिनविशेष सदर लिहिले. पुढारीतील हसत जगावे या सदरासाठी तर सातत्याने लेखन केले. वृत्तपत्रांमध्ये विविध विषय हाताळले. मात्र बरेच लेख तत्कालिन प्रश्नांवर, विषयांवर लिहिले गेले असल्याने त्यांचे आजच्या घडील मूल्य शून्य आहे. मात्र काही विषय चिरकाल वाचावेसे असेही आहेत. अशा लेखांचा संग्रह करून प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. जीवनात काही गोष्टी अशाही घडल्या.त्यामुळे काही काळ लेखनाकडे दुर्लक्षही झाले.पण वाचकांचा पत्रव्यवहार या सदरांसाठी लेखन थांबले नाही. विविध वृत्तपत्रात या सदरासाठी लिहित होतो आणि आजही लिहितो आहे. इअचलकरंजीच्या वृत्तपत्र लेखक संघाने दोनवेळा माझा उत्कृष्ट वृत्तपत्रलेखक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. हा सन्मान माझ्यासाठी फार मोठा आहे. त्याच्याने या सदरासाठी कायमचा बांधला गेलो. आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार माझ्या अगदी जवळचा, अंतस्थ भिडणारा आहे.


     सध्या समाजासाठी झटणार्या अथवा मोठ्या कष्टातून वर आलेल्या लोकांवर लिहित आहेत. त्यांच्या कामातून, त्यांच्या कष्टातून इतरांना प्रेरणा मिळावी, असा माझा उद्देश आहे. जगासह भारतभर अशी माणसे विखुरली आहेत. त्यांच्या मुलाखतीतून त्यांचे जीवन चरित्र उलगडत जाते. त्यांच्या संकलनातून त्यांच्यावर लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे अशा बर्याच लोकांचे चरित्र मराठी भाषेत उपलब्ध नाही.त्याचा मराठी लोकांना उपयोग व्हावा, प्रेरणा मिळावी,हा माझ्या लेखनामागचा प्रामाणिक उद्देश आहे. माझ्या ब्लॉगवर आपणाला अशा व्यक्ती भेटत राहतील.

साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी झटणार्‍या आशाताई


     गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2017 ला नागपूर येथे दोन दिवसाचे भव्य असे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले.या संमेलनाला उदघाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाभले होते. संमेलन ज्यांनी आयोजित केले होते, त्या साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा आशाताई पांडे आहेत.त्यांचे अवघे आयुमान 78. त्या आजही नेटाने साहित्य सेवा करतात. या क्षेत्रात असलेल्या अनेक भाषांच्या साहित्यीकांनाही एकत्र जोडण्याचे काम करीत आहेत. साहित्य विहार नावाचे साहित्याला वाहिलेले नियतकालिक चालवले जाते शिवाय विविध भाषांमध्ये कवींचे प्रातिनिधीक कवितासंग्रहही प्रसिद्ध केले जात आहेत.या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
     अशा या उत्साही,चिरतरुण आशाताई पांडे यांचा जन्म मध्यप्रदेशातला. त्यांचे कुटुंब साहित्याच्या वातावरणातले. यामुळे त्या कविता लिहायला लागल्या. त्यांनी नागपुरातल्या नवयुग विद्यालयात भाषा शिक्षिका म्हणून तीस वर्षे अध्यापनाचे काम केले.1999 ला सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या आयुष्यातून बर्याच गोष्टी करायच्या सुटल्या आहेत. त्यांना साहित्याची आवड असल्याने त्यांनी याद्वारे एक साहित्यिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला.मराठी साहित्याने समाज,रंगमंच आणि सिनेमा समृद्ध केला आहे.पण त्यांनी दुसर्या भाषांनाही प्रोत्साहन देण्याचा विचार केला. नागपुरात मित्र मंडळ नावाची साहित्यिक संस्था 1971 पासून कार्यरत आहे. त्या या संस्थेशी जोडल्या गेल्या. त्यावेळेला या संस्थेचे एकूण 15 सदस्य होते. या संस्थेच्या बैठका साहित्यिकांच्या घरी होत. यामुळे या संस्थेशी नवीन सदस्य जोडले जात नव्हते.ज्यावेळेला या संस्थेची जबाबदारी आशाताई पांडे यांनी घेतली,त्यावेळी त्यांनी या संस्थेला व्यापक स्वरुप देण्याचा विचार केला.आपल्या देशात महिलांकडून एखाद्या मोठ्या जबाबदारीची अपेक्षा केली जात नाही. साहजिकच त्यांना अनेक लोकांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. त्यात त्यांच्याच संस्थेचे लोकही होते. संस्था चाललीय तशी चालू दे. तुम्ही कुठे कुठे धावपळ करीत राहणार? अर्थात त्यांचा त्यांना विरोध नव्हता. एका निवृत्त महिलेला धावपळ त्रासाचे ठरेल, असे त्यांना वाटे. आशाताई म्हणतात, मी साहित्याकडे फक्त मनोरंजन या दृष्टीने पाहात नाही. साहित्यात काही नवीन, काही खास होण्याची गरज आहे. साहित्य समाजाला काही देत नसेल तर ते व्यर्थ आहे.

     त्यांनी सगळ्यात प्रथम संघटनेची बैठक राजाराम दीक्षित लायब्ररी हॉलमध्ये घ्यायला सुरुवात केली. याचा परिणाम दिसायला लागला.साहित्यप्रेमी या बैठकांना यायला लागले आणि नव्या लेखक-कवींशी संपर्कही व्हायला लागला. नंतर शहरातल्या सायंटिफिक हॉलमध्ये बैठका व्हायला लागल्या. संस्था रजिस्टर नव्हती. 2011 मध्ये साहित्य विहार या नावाने संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. संस्थेचा उद्देश्य व्यापक होता. सर्व भाषेतल्या साहित्याला प्रोत्साहित करणे हा महत्त्वाचा उद्देश. संस्थेचे ब्रीदच आहे,सर्व भाषा समभाव. दर महिन्याला सर्वभाषा कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. याद्वारे असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे की, साहित्य लोकांना आणि भाषांना जोडण्याचे काम करते. या संस्थेच्या कार्यातून नागपुरात भाषा,संस्कृती आणि समाजाचे संवर्धन आणि त्याला पुढे नेण्याचे काम चालू आहे.लोकांमध्ये साहित्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून साहित्य विहार नावाची एक पत्रिकादेखील सुरू करण्यात आली आहे. सोळा पानांच्या या पत्रिकेची किंमत पाच रुपये आहे. आता आर्थिक कारणांने याचे मासिक प्रकाशन होत नसले तरी श्रावण,वसंत आणि दिवाळी असे वर्षात तीन अंक तरी प्रसिद्ध केले जातातच. नव्या कविंचा कवितासंग्रहही प्रसिद्ध केला जातो. आता पुस्तक प्रदर्शन भरवण्याची योजना आहे. सध्या संस्थेशी शंभराहून अधिक लोक जोडले गेले आहेत. 78 वर्ष वयोमान आशाताईंचे आहे, मात्र त्यांची काही ना काही करण्याची धडपड सुरूच आहे. शरीर आता पहिल्यासारखे साथ देत नसले तरी जोपर्यंत आपण जिवंत आहे,तोपर्यंत साहित्य सेवा करण्याचा त्यांनी संकल्प सोडला आहे.त्या म्हणतात की,लोकांचे प्रेम आणि नवोदित कवींचा उत्साह पाहून मलादेखील उत्साह येतो. आणि मी काम करत राहते.

Friday, January 27, 2017

गावाचे नाव बदलवणारी हरप्रीत कौर

     हरप्रीत कौर आठव्या इयत्तेत शिकते. तिच्या गावाचे नाव गंदा. ती कुठेही गेली की, तिच्या गावाच्या नावावरून तिला चिडवले जायचे. टोमणे मारले जायचे. तिने निर्धार केला, गावाचे नाव बदलायचे. तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. आणि काय आश्चर्य! पंतप्रधान कार्यालयाकडून खाली पत्र आले. यंत्रणा हलली. आता या गावाचे नाव अजितनगर असे होत आहे. हे सगळे हरप्रीत कौरच्या निश्चयामुळे,धाडसामुळे झाले. तिच्यावर गाव खूश आहे. गावाने तिच्या कुटुंबाला राहायला जागा देऊन 26 जानेवारीला तिचा सत्कार केला.हरप्रीत आता गावासाठी बरेच काही करायचा इरादा घेऊन पुढे सरसावली आहे.

     हरप्रीत कौरचे गंदा नावाचे गाव हरियाणातल्या रतिया तालुक्यात आहे. तिचे आई-वडील दुसर्याच्या शेतात मोलमजुरी करायला जातात. पण तिला गरिबीपेक्षा गावाचे नाव त्रासदायक ठरायचे. एखाद्या अनोळखीसमोर गावाचे नाव घ्यायला तिला लाज वाटायची. मावशीकडे गेल्यावर तिला तिचा मुलगा तिची आणि तिच्या भावांची टर उडवायचा. म्हणायचा,तू गंदा गावाची आहेस. तुझं गाव गंदा आहे. तू गंदी आहेस. हे ऐकल्यावर तिला वाईट वाटायचे.आपले गाव तर सोडता येत नाही,पण गावाचे नाव तरी बदलता येईल. आईजवळ तिने आपल्या मनातले विचार बोलून दाखवले.पण ती म्हणाली, गावातले मोठे,बुजुर्ग लोक गप्प आहेत, मग आपल्याला कसली लाज? मग तू का त्याचा विचार करतेस? त्यावेळेला तिच्या मनात विचार आला. तिने ऐकले होते की, कित्येक मुलांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या समस्या कळविल्या आहेत. तिने मग पत्र लिहिण्याचा निश्चय केला. आपला इरादा तिने आपल्या वडिलांना सांगितला तर ते तिच्यावरच भडकले. ते म्हणाले, आपण आधीच गरीब आहोत. पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्यासाठी आणखी अडचणी वाढवून ठेवू नकोस.आपल्यासारख्यांना सरपंचांना भेटायचं म्हणजे मुश्किल काम आहे, तिथे तू पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची गोष्ट करतीयस?त्यांचं असंही म्हणणं पडलं की, जिथे गावातले मोठे,बुजुर्ग गावाचे नाव बदलू शकले नाहीत, तिथे आपण काय चीज आहे? त्यांचे म्हणणे बरोबर होते. तिने ऐकले होते की,1989 मध्ये गावाचे नाव बदलून अजितनगर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.पण त्यावर सरकारी मोहर लागली नाही. पण हरप्रीत कौरने पंतप्रधानांना पत्र लिहिलेच. तिने त्या पत्रात लिहिले की, आमच्या गावाच्या नावामुळे आम्ही जिथे कुठे जाऊ तिथे आमचा अपमान केला जातो. कृपया, गावाचे नाव बदला. सुरुवातीला विश्वास नव्हता की, यावर काही तरी अंमल होईल. पण जिल्हा आणि तहसील कार्यालयाला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आले. शासन यंत्रणा हलली. प्रस्ताव तयार झाले. वर पाठवण्यात आले.त्यालाही मंजुरी मिळालीआता गावाचे नाव बदलून अजितनगर होईल. गावाचे नाव बदलणार असल्याची बातमी आल्यावर लोकांचे वागणे बदलले. तिच्या मैत्रिणी पंतप्रधानांना पत्र लिहिण्याच्या गोष्टीवरून टर उडवायच्या. आता त्यांना तिच्याविषयी अभिमान वाटतो आहे.

     सरपंचांसह गावातले सगळेच लोक तिचा आदर करू लागले. ते म्हणू लागले की, जे काम गावातली मोठी,ज्येष्ठ मंडळी करू शकले नाहीत, ते एका लहान मुलीने करून दाखवले. गावकर्यांनी तिच्या कुटुंबाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि 26 जानेवारी 2017 रोजी तिचा गावाने मोठा सत्कार केला. आता ती म्हणते की, आता माझे काम संपले नाही तर सुरू झाले. गावाचे नाव बदलण्याची समस्या संपली असली तरी गावातल्या अनेक समस्या आहेत. त्याही सुटल्या पाहिजेत. गावातल्या ज्या शाळेत ती शिकत आहे, त्या शाळेला कंपाऊंड नाही. यामुळे जनावरे आत घुसतात.शाळेतल्या लहान मुली पाहिजे त्यावेळेला घरी जातात.शाळेशेजारी जनावरांचा दवाखाना आहे,त्यालाही कुंपण नाही. बेवारस जनावरं झाडं-फुलं खातात. आणखी बर्याच समस्या आहेत. माझ्यामुळे मात्र या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे की, एखाद्या व्यक्तीने मनात आणले तर काय होऊ शकते. तिला शिकून पुढे तिच्या आई-वडिलांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करायचे आहेतिच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट ही की, आता तिचे कुटुंब आणि गाव पूर्णपणे तिच्यासोबत आहे.

फुटपाथवरची शाळा चालवणारे अंकल

     श्याम बिहारी प्रसाद पाटणातल्या बीएसएनएलमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. आता ते आपल्या मुलीकडे दिल्लीला राहायला आले आहेत.इथल्या वसंतकुंज परिसरातल्या फुटपाथवर त्यांनी मजुरांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आहे. वाहनांचा गोंगाट आणि गर्दीची वर्दळ असतानादेखील इथली मुले मन लावून अभ्यास करीत असतात. स्थानिक लोकांची मदतदेखील या शाळेला होत असते.
     त्याचे झाले असे की, वसंत कुंज परिसरातील घरांजवळ एक हनुमान मंदिर आहे. श्याम बिहारी प्रसाद रोज सकाळी फिरायला इथे येत. हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग होता. इथे त्यांना पाहायला मिळाले की, बरीच मुलं लोकांकडून प्रसाद मागायला इथे उभी असतात. एकदा त्यांनीदेखील आपल्या हिश्श्यातला प्रसाद एका मुलाला दिला. दुसर्यादिवशी त्यांनी जवळच्या एका दुकानातून काही बिस्किटे घेतली आणि मंदिराच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या त्या मुलांना वाटली. यातील बहुतांश मुलांचे आई-वडील मजुरी करतात.ती सकाळी कामावर गेली की, मुले बाहेर फिरून काही खाण्या-पिण्याच्या शोधात राहतात. स्थानिक सरकारी शाळा सकाळी दहाला सुरू होते. शाळेला जाण्याअगोदर ही मुलं मंदिराच्या बाहेर खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या लोभापायी उभे राहतात. त्या मुलांशी मग श्यामबिहारी प्रसाद यांनी बातचित केली. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गणित आणि विज्ञानमधल्या सामान्य गोष्टीसुद्धा त्यांना माहित नाहीत. त्यांना हिंदी आणि इंग्रजी लिहायलासुद्धा येत नव्हते.
     त्यांची मुलगी डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहे. ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलीला सांगितली.त्यावर त्यांची मुलगी म्हणाली की, आपल्याला त्यांच्यासाठी काही तरी करायला पाहिजे. मग त्यांनी त्या मुलांना विचारले,तुम्हाला शिकायचं आहे का? मुलांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यावर दुसर्याचदिवशी सकाळी आठ वाजता मंदिराच्या फुटपाथवर त्यांना बोलावले. 2013 सालातील ती नोव्हेंबरची एक थंड सकाळ होती. आणि वसंत कुंजच्या सेक्टर बी-9 मधील फुटपाथवर एक नवीन शाळा सुरू झाली. इथे शिकायला येणार्या मुलांनी आपल्या मित्रांदेखील ही गोष्ट सांगितली. त्यामुळे मुलांची संख्या वाढू लागली. आता इथे दुसरी ते दहावीपर्यंतची 35 ते 40 मुले शिकायला येतात. यातील बरीच मुले याअगोदर शाळेत जात नव्हती. श्यामबिहारी प्रसाद यांनी त्यांच्या पालकांना समजावून सांगितले आणि त्यांना सरकारी शाळेत दाखल केले गेले.
     आता शाळेच्या मदतीसाठी स्थानिक लोक पुढे येऊ लागले आहेत. काही लोक आपला रिकामा वेळ इथे घालवतात. मुलांना गणित,इंग्रजी आणि दुसरे विषय शिकवतात. काही लोक असेही आहेत,जे मुलांसाठी काही खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन येतात. सकाळी वर्ग सुरू होण्याअगोदर प्रार्थना होत असते. सगळ्या मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. शाळेतील मुले श्यामबिहारी प्रसाद यांना अंकल म्हणून बोलावतात. आता ही मुलं प्रश्न विचारताना लाजत-बुजत नाहीत. मुलांसाठी स्टेशनरी,पुस्तके,कॉमिक्स आणि गोष्टीची पुस्तके ते घेऊन जातात,कारण त्यामुळे त्यांचे मन अभ्यासात लागावे. मोठ्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठीदेखील मार्गदर्शन केले जाते.

एक दिवस पावसामुळे मुलांना शिकवता आले नाही, तेव्हा मंदिराच्या पुजार्याने त्यांना मंदिरात शिकवण्याची परवानगी दिली. ज्यावेळा ही फुटपाथ शाळा सुरू झाली, त्यावेळेला त्यांच्याजवळ फक्त एक चटई होती. पण स्थानिक लोकांनी यासाठी खूप मदत केली. एक दिवस एक डॉक्टर आले आणि त्यांनी मुलांसाठी एक फळा आणून दिला.शाळेत रोज हजेरी घेतली जाते आणि सातही दिवस शाळा सुरू राहते. वाहनांचा गोंगाट आणि गर्दीची वर्दळ असतानादेखील मुले इथे अगदी मन लावून शिकतात. अगोदर मुले एकमेकांशी बोलताना शिव्या वैगेरे द्यायचे, आता त्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झाली आहे. त्यांच्या परीक्षांच्या गुणांमध्येदेखील सकारात्मक फरक पडला आहे. आता इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा मुले नियमितपणे या  शाळेत येऊ लागली आहेत

पुन्हा महिलांची उपेक्षा


     महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या घोषणा ऐकून ऐकून आता आपले कान विटले आहेत.पण त्यांना त्यांचे हक्क काही मिळताना दिसत नाहीत. महिलांना ना घरात, ना समाजात ना राजकारणात सन्मान आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्याचा मुद्दा सतत चर्चिला जातो, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बहुतांश राजकीय पक्ष महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ मोठमोठ्या बाता मारताना जरूर दिसतात,पण ऐन मोक्याच्यावेळी मागे सरतात. आता हेच बघा ना! देशातल्या प्रमुख  पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय फड रंगात आला आहे. राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या  उमेदवारांच्या नावाच्या घोषणादेखील केल्या आहेत. या यादींवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, महिलांना त्यांनी अगदीच दुय्यम स्थान देऊन त्यांच्यावर एकप्रकारचा अविश्वासच दाखवला आहे. यावरून सगळेच राजकीय पक्ष बोलबच्चन असल्याचेच दिसत आहेत.


     गोष्ट उत्तरप्रदेशची असो किंवा अन्य राज्यांची! सगळीकडेच महिलांना बायपास केले आहे.इथे पुरुष उमेदवारांचाच बोलबाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप,काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बसपा यांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या 1137 उमेदवारांच्या यादीत महिलांची संख्या फक्त 93 इतकी आहे. म्हणजे फक्त नऊ टक्के. भाजपने 11 टक्के तर समाजवादी पार्टीने नऊ टक्के महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, काँग्रेस आणि बसपाने केवळ पाच-पाच टक्केच महिलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, काँग्रेस आणि बसपाचे नेतृत्व अनुक्रमे सोनिया गांधी आणि मायावती या महिला करत आहेत. या पक्षांकडून अपेक्षा केली जाते की, यांनी महिलांना अधिक प्रमाणात उमेदवारी देऊन अन्य पक्षांवर दवाब आणू शकला असता. अशीच परिस्थिती अन्य राज्यांतदेखील आहे. गोवामध्ये भाजपने 36 उमेदवारांपैकी फक्त एका महिलेला उमेदवारी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची मागणी यासाठी चालली आहे की, राजकीय पक्षांनी एक तृतीयांश महिलांना उमेदवार बनवले जावे. सध्या या पक्षांकडे सर्वात मोठा बचावाचा मुद्दा असा आहे की, जिंकू शकणार्या उमेदवारांवरच ते डाव खेळतात. असे असेल तर महिलांच्या हक्काविषयी का बाता मारायच्या? का त्यांना स्वप्ने दाखवली जात आहेत? महिला पुरुषांच्याबरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायला समर्थ असताना का त्यांच्यावर अविश्वास दाखवला जात आहे. राजकीय पक्षांचे खायचे आणि दाखवायचे दात वेग़ळे आहेत, हेच यातून सिद्ध होत आहे. राजकीय पक्षांनी आपण बोलतो तसे करून दाखवले पाहिजे. अशा आहे की, राजकीय पक्षांनी महिलांचे महत्त्व समजून घेऊन महिला आरक्षण विधेयक पारित करण्यासाठी पुढाकार घ्यावा,जेणे करून त्यांच्या स्वप्नांना पंख लागू शकतील आणि त्या भरारी घेऊ शकतील

Thursday, January 26, 2017

(बालकथा) नखांचा रंग


     राजा कृष्णदेवराय प्राणी-पक्ष्यांवर खूप प्रेम करायचा.एक दिवस एक पारधी राज दरबारात आला. त्याच्याजवळ पिंजर्यात एक सुंदर,रंगीबेरंगी आणि काहीसा विचित्र जातीचा पक्षी होता. तो राजाला म्हणाला, महाराज, या सुंदर आणि विचित्र जातीच्या पक्ष्याला मी काल जंगलातून पकडले आहे. हा खूप छान गातो आणि पोपटासारखा बोलतोदेखील. हा मोरासारखा नुसताच रंगीबेरंगी नाही तर त्याचासारखा नाचतोदेखील. मला वाटतं की, आपण हा पक्षी पाहावा आणि पसंद पडल्यास खरेदी करावा.

     राजाने पक्षी पाहिला.म्हणाला, “  हो,दिसायला तर हा पक्षी खूपच रंगीबेरंगी आणि विचित्र आहे.तुला याच्यासाठी योग्य असे मूल्य दिले जाईल.
     राजाने पारध्याला 50 सुवर्णमुद्रा दिल्या.आणि त्या पक्ष्याला आपल्या महालातल्या बागेत ठेवण्याचा आदेश दिला. तेवढ्यात तेनालीराम आपल्या जागेवरून उठला आणि म्हणाला, “   महाराज, मला वाटत नाही की, हा पक्षी पावसाळ्यात मोरासारखा नाचू शकेल.मला तर वाटतं की, हा पक्षी कित्येक वर्षापासून अंघोळदेखील केला नाही. 
     तेनालीरामची गोष्ट ऐकून पारधी घाबरला आणि दु:खी स्वरात म्हणाला, “  महाराज, मी एक गरीब पारधी आहे. पक्ष्यांना पकडणं आणि त्यांना विकणं हीच माझी आजीविका आहे. म्हणून मी समजतो की, पक्ष्यांच्याबाबतीत माझ्या माहितीवर कोणत्याही विनाप्रमाण आरोप लावणं योग्य नाही.
     पारध्याचे हे म्हणणे ऐकून महाराजदेखील नाराज झाले.ते तेनालीरामला म्हणाले, “  तेनालीराम, तुला असे म्हणणे शोभत नाही. तू तुझी गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतोस का?
     “  मी माझी गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतो,महाराज. असे म्हणून तेनालीरामने एक ग्लास पाणी मागवले.त्याने तो ग्लास त्या पक्षावर ओतला.पक्ष्याच्या शरीरावर ओतलेले पाणी रंगीत झाले. आणि पक्ष्याचा रंग साधारण भुरा झाला. यावर तेनालीराम म्हणाला, “  महाराज, हा काही विचित्र जातीचा पक्षी नाही. हा तर एक साधा जंगली कबुतर आहे.
     “ पण तुला कसे कळले की हा पक्षी रंगवलेला आहे? महाराजांनी तेनालीरामला विचारले.

     महाराज, पारध्याची रंगीत नखे पाहून. पक्ष्याच्या शरीराचे रंग आणि पारध्याच्या नखांचे रंग एकसारखे आहेत. बिंग फुटल्याचे पाहून पारधी पळण्याचा प्रयत्न करू लागला.पण त्याला सैनिकांनी पकडले. राजाने त्याला फसवण्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले. आणि त्याला दिलेला पुरस्कार म्हणजे 50 सुवर्णमुद्रा तेनालीरामला दिल्या.                            

संयमी,मृदू स्वभावाचे गायक :येशुदास


      येशुदास यांचे वडिल ऑगस्टाइन जोसेफ प्रसिद्ध थिएटर कलाकार आणि मल्याळी गायक होते. तेच त्यांचे पहिले गुरू.ज्यावेळेला ते आपल्या करिअरच्या शीर्षस्थानी होते,तेव्हा त्यांच्या कोचीस्थित घरी लोकांच्या रांगा लागायच्या.पण वाईट दिवस आले,तेव्हा मात्र त्यांच्या मदतीला फारच थोडे लोक आले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, येशुदास यांनीदेखील पार्श्वगायनांध्ये यावे. पण हे सगळे सोपे नव्हते. ख्रिश्चन असल्या कारणाने कर्नाटक संगीत शिक्षण घेण्यासाठी कित्येकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले.या दरम्यान घरची आर्थिक परिस्थिती बिघडली. फी भरण्यासाठी पैशांची कमतरता भासू लागली.
     
 के.जे.येशुदास पहिल्यांदा ज्यावेळेला ऑडिशनसाठी चेन्नईला गेले,त्यावेळेला त्यांची टेस्ट घेणार्या संगीतकारने त्यांना तुझ्या आवाजात दम नाही.तुला दुसरे काही तर करायला पाहिजे, असे सांगून टाकले.नंतर ऑल इंडिया रेडिओ,त्रिवेंद्रम यांनादेखील  त्यांचा आवाज प्रसारणालायक वाटला नाही.पण त्यांच्या संयमाचा पुरस्कार त्यांना मिळाला तो 1961 साली. कलापदुक्कल चित्रपटासाठी त्यांनी पहिले गीत रेकॉर्ड केले. आतापर्यंत त्यांनी तब्बल 40 हजारांपेक्षा अधिक गाणी गायिली आहेत.एम.जी.रामकृष्णन,एनटीआर,अमिताभ बच्चन सारख्या कलाकारांसाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे.त्यांनी गायिलेली गाणी लोक आजदेखील त्याच उत्साहाने ऐकत असतात.
1965 च्या दरम्यान भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले.त्यावेळेला येशुदास गाणी गाऊन युद्धासाठी निधी गोळा करायचे.1971 मध्येदेखील भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली,तेव्हादेखील ते गाण्यासाठी रस्त्यावर उतरले.खुल्या ट्रकमध्ये गाणी गाऊन देशासाठी त्यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली. 1968 मध्ये तत्कालिन सोवियत सरकारने त्यांना आमंत्रित केले, तिथे रशियाच्या रेडिओ कजाकिस्तानसाठी त्यांनी गाणी गायिली,त्या गाण्यांचे खूप कौतुक झाले. पार्श्वगायनासाठी केरळ सरकारने विक्रमी 23 वेळा अॅवार्ड देऊन गौरव केला आहे. 1987 मध्ये राज्य सरकारला त्यांनी स्वत: विनंती केली, यापुढे मला हा अॅवार्ड देऊ नये.
     मल्याळीपासून हिंदी,तामिळ,कन्नड,रुसी,अरबी आणि लॅटीन अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. भाषा त्यांच्या गायकीच्या आड कधी आली नाही. हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्यांदा आनंद महल मध्ये सलिलदा यांच्यामुळे त्यांना गाण्याची संधी मिळाली. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी आ रे आ रे मितवा ... सारखी गाणी प्रसिद्ध पावली.1975 मध्ये आलेल्या छोटीसी बात नंतर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांची एक खास ओळख निर्माण झाली. जानेमन जानेमन तेरे दो नयन आणि ये दिन क्या आए सारखी गाणी लोकांच्या ओठांवर बसली. पण सगळ्यात जास्त प्रसिद्धी 1976 मध्ये आलेल्या चितचोर मधील  गोरी तेरा गांव बडा प्यारा, जब दीप जले आना आणि आज से पहले आज से ज्यादा सारख्या गाण्यांनी दिली. यानंतर त्यांनी नैया,सुनयना,सावन को आने दो, चश्मे बद्दूर,सदमा आदी चित्रपटांसाठी गाणी गायिली.  1997 मध्ये ए. आर. रेहमानसाठी रामगोपाल वर्मा यांच्या दौड चित्रपटामध्ये संजयदत्तवर चित्रित केलेले ओ भंवरे हे त्यांचे बॉलीवूडसाठी गायलेले अलिकडील गीत होय.

     चितचोरचे संगीतकार रवींद्र जैन यांनी तर त्यांना इतपर्यंत म्हटले होते की, मला जर डोळे मिळाले तर पहिल्यांदा मी येशुदासला पाहीन. येशुदास यांना  प्रसिद्ध गुरुवायुर मंदिरात कृष्ण स्तवन गायचे होते,पण काही नियमांमुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही.ज्यावेळी त्यांनी मल्याली गीत गुरुवायुर अम्बला नादयिल ... द्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,तेव्हा प्रत्येक मल्याळींचे हृदय भावूक झाले. अशा या गायकाला नुकताच केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा!

Wednesday, January 25, 2017

दोन मोठ्या चित्रपटांचा समोरासमोर सामना


     चित्रपट बनतात ते चालण्यासाठीच. पण एकाच दिवशी बॉक्स ऑफीसवर दोन मोठे चित्रपट थडकत असतील तर, मात्र यात या चित्रपटांबरोबरच चित्रपटसृष्टीलादेखील मोठं नुकसान झेलावे लागते. या गोष्टी माहित असूनही शाहरुख खान आणि हृत्विक रोशन आज आपापले चित्रपट प्रदर्शित करत आहेत.
     गेल्या वर्षी ईदची संधी साधून प्रदर्शित करण्यास सज्ज असलेला रईस चित्रपट शाहरुख खानने नंतर त्याचे प्रदर्शन लांबणीवर टाकले.त्याचे कारण सांगताना शाहरुख म्हणाला होता की, ज्या आठवड्यात एक मोठा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याच आठवड्यात दुसरा चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. त्यावेळेला सलमान खानचा सुलतान येणार होता. सलमानसाठी शाहरुख मागे सरला. खरे तर शाहरुखने कधीही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मागे-पुढे केली नाही. जवळपास अडीच दशके यशस्वी खेळी  करणार्या शाहरुखची गती गेल्या दोन वर्षांपासून काहीसी मंदावली आहे. खासकरून दिलवाले आणि फॅन हे गेले दोन चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारसे कमाल करू शकले नाहीत. फॅन तर शंभर कोटी क्लबपर्यंतदेखील पोहचू शकला नाही. दिलवाले चित्रपटाचे काम सुरू होते, त्याचवेळेला त्याला जाणवू लागले होते की, त्याला लवकरच असे चित्रपट करावे लागतील की, त्याचे डळमळणारे सिंहासन सावरेल. परजानिया सारखा सारगर्भित चित्रपट बनवणारे राहुल ढोलकिया ज्यावेळेला त्याच्याजवळ गुजरातच्या नव्वदच्या दशकातील गँगस्टर अब्दुल लताफच्या जीवनावर आधारित रईस चित्रपटाची कथा घेऊन गेले, त्यावेळेला शाहरुखने त्याला लगेच होकार दिला. आता ही गोष्ट वेगळी की, चित्रपट बनता बनता त्यात काही गोष्टी वाढल्या काही कमी झाल्या.

आपल्या चित्रपटाची नवीन तारीख निश्चित करताना शाहरुखने बरीच काळजी घेतली होती, पण त्याला अंदाज नव्हता की, 26 जानेवारीच्या निमित्ताने राकेश रोशन यांनी आपला मुलगा हृत्विक याचा  काबिल चित्रपट प्रदर्शित करण्याचे अगोदरच ठरवले होते. हृत्विकदेखील चित्रपट स्वत:च्या जिवावर सांभाळू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. मात्र गेल्यावर्षीचा आशुतोष गोवारीकरच्या मोहनजोदाडोला जबरदस्त मात खावी लागली होती. त्यामुळे हृत्विकलादेखील एकादी चूक मोठी महागात पडू शकते. काबिल चित्रपटात हृत्विक पहिल्यांदाच एका नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तंत्रज्ञानाने समृद्ध आहे,पण कथेच्या बाबतीत काहीसे कमजोर चित्रपट बनवणारे संजय गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
     शाहरुख खान आणि हृत्विक रोशन या दोघांनाही आपल्याला एका यशस्वी चित्रपटाची गरज आहे, याची कल्पना आहे. असे असतानादेखील त्यांनी एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा आपापला हट्ट कायम ठेवला आहे. असे नाही की, असे पहिल्यांदा घडत आहे.15 ऑगस्ट 1975 या दिवशी शोलेबरोबरच जय संतोषी माँ प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. जय संतोषी माँ पहिल्या दिवसापासून तिकिट खिडकीवर गर्दी करू खेचू लागला.सुरुवातीला प्लॉप ठरवला गेलेला शोले नंतर मात्र जबरदस्त चालला. अशा प्रकारेच अमिताभ बच्चन,रेखा आणि जया बच्चन यांना घेऊन आलेला यश चोप्रा यांच्या चर्चित सिलसिला या चित्रपटासोबत महेश भट्ट यांचा अर्थ सिनेमागृहात दाखल झाला होता.अर्थ सर्वदृष्टीने लहान चित्रपट होता. पण आपल्या बोल्ड कथानक आणि मधुर संगीत या कारणाने चांगला चालला. दुसर्या बाजूला सिलसिलाला विचारणारादेखील कोणी राहिला नाही.
     जर आपल्याला दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित करून त्याचा उत्सव साजरा करायचा असेल तर अमिर खानचा लगान आणि सनी देओलचा गदर यांचे योग्य असे उदाहरण देता येईल. दोन्हीही चित्रपट खूप चालले. पण यानंतर ओम शांती ओम आणि सांवरिया, सन ऑफ सरदार आणि जब तक है जान, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले पर्यंत येता येता हे स्पष्ट झाले की, तिकिट खिडकीवर दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्यात कुणालाच फायदा होत नाही.

     प्रदर्शनाच्या तारखेबाबत फक्त कलाकारच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शकदेखील फारच आक्रमक झाले आहेत. ईद,दिवाळी,ख्रिसमस,26 जानेवारी,15 ऑगस्ट सारख्या सुट्टीच्यादिवशी मोठे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी गर्दी उसळलेली असते. असे दिवस प्रेक्षकांसाठीही पर्वणी ठरतात. पण चित्रसृष्टीला अशा मुकाबल्यांमुळे चांगल्या नफ्यावर पाणी सोडावे लागते. मोठा चित्रपट पहिल्या चार दिवसात शंभर कोटी कमावू शकला नाहीत, तर तो पुन्हा फायद्यात येत नाहीत. काही प्रमाणात आज असेच घडणार का? 

Tuesday, January 24, 2017

कल्याण पॉल


     भारताचे हिमालय क्षेत्र विविध प्रकारच्या वनस्पती,जीव-जंतूंचं आवास तर आहेच शिवाय विभिन्न जलस्त्रोतांचे उगमस्थानही आहे.पण औद्योगिकरण,खाणकाम,वनतोड आणि प्रदूषण आदी कारणांमुळे या क्षेत्रातील पर्यावरणीय तंत्र सतत बिघडत चालले आहे.एका बाजूला हिमनद्या वितळत आहे,तर दुसर्या बाजूला वनांची संख्या कमी होत असल्याने भूस्खलन आणि पेयजल संकट उभे ठाकत आहे. मॅगेसेस पुस्कार विजेते कल्याण पॉल यांना जाणवलं की, नैसर्गिक संसाधने नष्ट होणे,हेदेखील गरिबीचं प्रमुख कारण आहे. या विचारामुळेच त्यांना मूलभूत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धन करायला प्रेरणा मिळाली. भारतात विपूल नैसर्गिक संपत्ती असतानादेखील हिमालय क्षेत्रातले लोक देशातल्या अन्य भागातल्या तुलनेत अधिक प्रमाणात मूलभूत सुविधांसाठी वंचित आहेत.मध्य आणि पश्चिमी हिमालयातील नैसर्गिक संसाधनांचं आंकुचन शेतीच्या अस्तित्वासाठी संकट निर्माण करत आहे.

     कल्याण पॉल यांनी 1992 मध्ये पॅन हिमालयन ग्रासरुट डेवलपमेंट फाऊंडॅशन ची सुरुवात केली,कारण पर्यावरण समुदाय आधारित अशा तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार केला जावा,जे पर्यावरणाराच्या हिताचे असेल.त्यांनी मग रोजच्या गरजांशी जोडलेल्या तंत्रज्ञानाला स्थानिक समुदयांच्या जीवनाशी जोडण्याचा निश्चय केला.पेयजल,ऊर्जा संरक्षण,जैवविविधतेचे संरक्षण,टिकाऊ शेती अशा साधनांची निर्मिती आणि माहितीच्या आधारे सामुदायिक सशक्तीकरण हा आपल्या रणनीतीचाच भाग आहे.कल्याण पॉल यांनी त्याचा अभ्यास केला आणि  अशा मूलभूत तंत्रज्ञानाच्या शोधाला लागले,जे पर्वतीय पर्यावरणीय तंत्र आणि स्थानिक गरजांशी अनुकूल असेल. कल्याण पॉल यांना अंत:स्त्राव कूप ( भूजल स्तर राखण्यासाठी), रुफटॉप वॉटर,हार्वेस्टिंग,पारंपारिक पिकांची शेती, सामुदायिक व्यवसाय आणि बायोगॅस यामुळे स्थानिक पर्यावरणीय तंत्रात सुधारणा करु शकतो. त्यांना हेही माहित होतं की,जल आणि वन व्यवस्थापनासाठी मातीमध्ये ओलावा असावा लागतो. याच्या प्रसार आणि प्रसारासाठी स्थानिक बेरोजगार युवकांना संस्थेचे माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आले. आणि त्यांचे एक नेटवर्क तयार केले गेले.हे युवक गावोगावी जाऊन या तंत्रज्ञानाशिवाय पारंपारिक शेती आणि चांगल्या मूल्यांच्या पिकांबाबतीत लोकांना सांगायचे.       अशाप्रकारे पशूपालन आणि पोल्ट्रीच्या सहाय्याने सामुदायिक सशक्तीकरणाचा प्रयत्नदेखील केला गेला. याबरोबरच गेल्या काही काळापासून चालत आलेल्या हिमखाद्य नावाचा ब्राँड स्थानिक शेतकर्यांच्या उत्पादनांना बाजराशी जोडण्यासाठीदेखील फायद्याचे सिद्ध झाले. पेयजल सुनिश्चित करण्यासाठी अंत:स्त्राव कूप सगळ्यात चांगले तंत्रज्ञान सिद्ध झाले.याचे व्यवस्थापन समुदायातले लोक स्वत:च करतात. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातल्या 350 गावांमध्ये 500 हून अधिक अंत:स्त्राव विहिरींची निर्मिती केली गेली. यामुळे जवळपास एक लाख लोकांना दररोज पिण्याचे पाणी मिळायला लागले. या क्षेत्रातल्या महिला आणि मुलांना आता पाण्यासाठी दूर दूर भटकावे लागत नाही. छतावरचे पावसाचे पाणी एकत्रित  गोळा करण्यासाठी लोकांना प्रेरित केले गेले.त्यामुळे जलस्त्रोतांवरचा भार कमी झाला. शिवाय इथे  स्वच्छतेसंबंधीच्या सुविधांनादेखील प्रोत्साहन दिले जात आहे,यामुळे पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यास फारच मदत मिळते आहे. स्वच्छ आणि ऊर्जेचे टिकाऊ स्त्रोत म्हणून बायोगॅसचा उपयोग होत आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलावरची निर्भरतादेखील कमी होत आहे.

सपा-काँग्रेस आघाडी जादू करणार का?काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्या आघाडीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की,राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरुपी मित्र असतो ना शत्रू असतो. मुलायमसिंह यादव काँग्रेससोबत जायला अजिबात तयार नव्हते,पण त्यांचे मुख्यमंत्री सुपूत्र अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाशी आघाडी करून मोठा राजकीय डाव खेळला आहे.वास्तविक देशात मे 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रभाव अद्याप ओसरलेला नाही,त्यात उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या 73 जागांनी नरेंद्र मोदी लाटेत भाजपाला सत्ता देण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते,तर काँग्रेसला केवळ अमेठी आणि रायबरेलीचा गड राखता आला होता.बहुजन समाज पार्टीला (बसपा) तर आपले खातेदेखील खोलता आले नव्हते.त्यामुळे ही निवडणूक सपा,बसपा,काँग्रेस आणि भाजपा या चारही पक्षांसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. अर्थात निवडणूक काळात होणारी अशी कुठलीही आघाडी नीतीन्यायाची किंवा सैद्धांतिक कटिबद्धतेच्या जवळ जाणारी असत नाही,त्यात फक्त तत्कालिन लाभाचे राजकीय गणित मांडलेले असते.दोन महिन्यापूर्वी 27 साल युपी बेहाल सारख्या घोषणा देत शीला दिक्षीत यांना मुख्यमंत्रीच्या रुपात सादर करणारी काँगेस राहुल गांधी यांच्या किसान यात्रेशिवाय फारशी हालचाल करू शकली नव्हती. त्यामुळे काँग्रेससाठी समाजवादी पार्टीशी आघाडी करणं यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नव्हता.सपा आणि काँग्रेस यांचे रणनीतीकार बिहारच्या महाआघाडीसारख्या यशाच्याबाबतीत विचार करत असतील तर त्याला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे गेल्या काही निवडणुकांच्या अनुभवावरून सांगता येईल की दोघांची एकत्रित मते 35 ते 38 टक्क्यांच्यादरम्यान आहेत.त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पण जातीय समिकरणाचे राजकारण करणारी बसपा या आघाडीची गणितेही बिघडवू शकते.असे झाले तर, याचा फायदा मोदींचा चेहरा घेऊन निवडणूक लढवत असलेल्या भाजपाला होऊ शकतो.मतदाराच्या विवेकावर प्रश्न उपस्थित न करता हे पाहणे मोठे रंजक आहे की,सपाच्या घरच्या भांडणात विजेता बनून पुढे आलेले अखिलेश,यांची आघाडी सत्ताविरोधी वातावरणाला छेद देणार का? या आघाडीचे श्रेय काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांनाही दिले जात आहे, त्या उत्तर प्रदेशातल्या मृतप्राय काँग्रेससाठी संजीवनी साबित होणार का?हे पाहावे लागेल. 

Monday, January 23, 2017

रोबोट पत्रकार आणि बेरोजगारीची चिंता


    गेल्या आठवड्यात चीनच्या चायना डेली या वृत्तपत्रात एक सामान्य अशी बातमी छापून आली होती. 300 शब्दांच्या बातमीचे लेखक होते,जियाओ नन.त्या बातमीमध्ये खास म्हणण्यासारखं काही नव्हते, पण ती बातमी ज्याने लिहिली,त्याला महत्त्व आहे. कारण तो लेखक कुठली व्यक्ती नव्हती, तर तो एक रोबोट होता. रोबोटने ही बातमी काही सेकंदात लिहिली होती. अर्थात ही घटना काही पहिल्यांदा घडली आहे, असे नाही. बातम्या देणारी एजन्सी असोशिएट प्रेसमध्ये हे काम खूप आधीपासून सुरू आहे. तिथे कंपन्यांच्या रिपोर्ट, अहवाल यांच्या आधारावर बातम्या लिहिण्याचे काम रोबोटच करत आला आहे. विशेष म्हणजे अशा बातम्या रोबोटकडेच सोपवण्यात आल्या आहेत. असोशिएटच्या संपादकांचे म्हणणे असे की, रोबोट आकडे चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात. शिवाय ते अगदी वेगाने रिपोर्ट लिहू शकतात.त्यांच्या रिपोर्टमध्ये चुकाही फारच कमी होतात. आपण असा विचार करत असाल की, रोबोट फक्त वृत्तपत्रीय बातम्या लिहिण्याचे कामच करू शकतात,त्यांना दुसरे काम जमणार आहे का? पण थोडे थांबा, तुम्ही असा विचार करत असाल तर थांबा! रोबोट व्यावसायिक रचनात्मक लेखन करण्याच्या कामातदेखील फारच पुढे गेला आहे. अमेरिकेतील  फ्रेंडस या लोकप्रिय मालिकेच्या एका संपूर्ण एपिसोडची पटकथा रोबोटकडूनच लिहून घेतली गेली आहे.याबाबतची बातमीही अशी आली आहे की, तो एपिसोड लवकरच प्रसारित केला जाणार आहे. गेल्यावर्षी जपानमध्ये एका अशा कादंबरीचे प्रकाशन झाले, ज्याचा सहलेखक एक रोबोट होता. अर्थात दुसरा लेखक व्यक्तीच होती.पण आम्हाला याबाबतीत अधिक माहिती नाही, की यात दोघांची अशी वेगळी वेगळी भूमिका काय होती? पण यातली रंजक गोष्ट अशी की, एका स्पर्धेत या कादंबरीला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की, जेव्हा आपण रोबोट लेखकाची गोष्ट करतो आहोत, याचा अर्थ हा यंत्रमानव नाही तर  कॉम्प्युटर प्रोग्रॅम आहे, जे आपण सांगितल्यानुसार म्हणजे आपली अक्कल घातल्यानुसार तो  रिपोर्टपासून ते रचनात्मक लेखनापर्यंतच्या गोष्टी करू शकतो.

     मग या सगळ्यावरून आपल्याला असे वाटते का, की लिहिणारी माणसे बिते जमाने की बात होतील? या क्षेत्राततल्या लोकांचे म्हणणे असे की, या यंत्रलेखकांमध्ये अजून खूप काही गोष्टींची कमतरता आहे. सध्या ते मानवी लेखकांना या व्यवसायातून पूर्णपणे बाहेरचा रस्ता दाखवतील, अशी परिस्थिती नक्कीच नाही. उदाहरणार्थ, रोबोट पत्रकार एखाद्याची मुलाखत अगदी चांगल्याप्रकारे घेऊ शकेल,पण त्यात उत्तराच्या अंदाजानुसार प्रतिप्रश्‍न विचारू शकत नाही. त्याचबरोबर तो हेदेखील निश्‍चित करू शकत नाही की, या उत्तरांमध्ये शेवटी ती कोणती गोष्ट आहे, ज्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. म्हणजे वृत्तपत्रीय भाषेत तो मुलाखतीला न्यूज अँगल निश्‍चित करू शकत नाही.  कॉम्युटर विशेषज्ञ, जे कृत्रीम बुद्धी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला विकसित करण्याचे काम जीव तोडून करतात, त्यांचे म्हणने असे की, लवकरच ते आपली संपूर्ण अक्कल रोबोटमध्ये घालणारच. पण दुसरा विचार असा की, रोबोटमध्ये तुम्ही कितीही अक्कल घातली तरी तो घातलेल्या अकलेनुसारच काम करू शकणार ना! याबाबतीत माणसाला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. मर्यादा नाही. असेही म्हटले जात आहे की, ज्यांच्यासाठी हे काम व्यापार आहे, ते माणसाच्या तुलनेत रोबोटलाच प्राधान्य देतील.

     अशा परिस्थितीत या क्षेत्रातील लोक बेरोजगार होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. पण असे काही होणार नाही.रोबोट कितीही शहाणा असला तरी तो पूर्णपणे लेखक होऊ शकत नाही. त्याला सहलेखक म्हणूनच समाधान मानावे लागणार आहे. कमीत कमी त्याचे काम योग्य आहे की अयोग्य आहे, हे पाहण्यासाठी माणसांची आवश्यकता पडणार आहे. खरे तर आता कुणालाही काही माहिती नाही की पुढे जी अंतीम परिस्थिती असेल,त्यात शेवटी काय होईल? नव्या तंत्रज्ञानाच्या प्रत्येक भागात बेरोजगारीचा मुद्दा उठवला जात आला आहे. असेच औद्योगिक क्रांतिमध्ये झाले होते, आणि हेच कॉम्प्युटर आगमनावेळीही झाले होते. आणखी एक धारणा अशी की, बेरोजगारीचे मूळ कारण तंत्रज्ञानात नाही, तर अर्थव्यवस्थेत आहे.  त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे आहे.

Sunday, January 22, 2017

साबरमती का एक संत


 महात्मा गांधी फक्त एक नावच नाही,तर एक पूर्ण विचारधारा आहे.जितके अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो,तितक्याच नव्या गोष्टी समोर येतात.
1.ब्रिटेन म्हणजेच तो देश ज्याच्या विरोधात गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली,तिथूनच त्यांच्या मृत्यूच्या 21 वर्षांनंतर त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट जारी करण्यात आले.

2.महात्मा गांधी जीवनभर रोज 18 किलोमीटर पायी चालत राहिले.सांगितलं जातं की,ते रोज जवळपास 700 शब्द लिहायचे.यात राजकारण,स्वातंत्र्य,समानता आदी संबंधीत विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे.
3.टॉल्सटॉय, आइन्स्टीन आणि हिटलर सारख्या व्यक्तिंबरोबर महात्मा गांधीचा आयुष्यभर पत्रव्यवहार सुरू राहिला.4.भारतात महात्मा गांधींच्या नावावर 53 मुख्य मार्ग आहेत.तसेच भारताबाहेरही 48 असे मार्ग आहेत,ज्यांची नावे महात्मा गांधींच्या नावाने आहेत.
4. महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रा 8 किलोमीटर इतकी लांब होती.
5.ज्यावेळा भारताच्या स्वातंत्याची घोषणा झाली,तेव्हा गांधीजी दिल्लीत नव्हते. ते कोलकात्यातील धार्मिक सदभावनेसाठी उपोषणाला बसले होते.
6.जगभरात आपल्या नेतृत्वसाठी चर्चेत राहिलेले गांधीजी आपल्या आयुष्यात कधीही कुठल्याही राजकीय पक्षाचे पद घेतले नाही.
7.महात्मा गांधीजींना नोबेल पुरस्कारासाठीदेखील पाच वेळा मानांकन मिळाले होते.
8.दक्षिण आफ्रिकेत त्यांनी 15 हजार डॉलरचा पगार मिळाला होता.ही त्याकाळाच्या हिशोबाने खूपच मोठी रक्कम होती.पण ते ती सर्व रक्क्म सोडून भारतात परत आले. आणि सत्याग्रही बनले.
9. आफ्रिकेत वर्णभेद मिटवण्याच्या प्रयत्नात त्यांनी फुटबॉल क्लबदेखील बनवला होता.
10.ते पहिले असे भारतीय आहेत की,ज्याला अमेरिकेच्या साप्ताहिक पत्रिकाद्वारा दरवर्षी दिला जाणारा टाईम पर्सन ऑफ द इयर टायटल दिले गेले.11.तामिळनाडूतील मदुराईमध्ये ज्यावेळा त्यांचा काही गरीब लोकांना संवाद झाला,त्यावे़ळीपासून त्यांनी आयुष्यभर वस्त्राचा त्याग करून फक्त पंचा नेसण्याचा निर्णय घेतला