Wednesday, January 25, 2017

दोन मोठ्या चित्रपटांचा समोरासमोर सामना


     चित्रपट बनतात ते चालण्यासाठीच. पण एकाच दिवशी बॉक्स ऑफीसवर दोन मोठे चित्रपट थडकत असतील तर, मात्र यात या चित्रपटांबरोबरच चित्रपटसृष्टीलादेखील मोठं नुकसान झेलावे लागते. या गोष्टी माहित असूनही शाहरुख खान आणि हृत्विक रोशन आज आपापले चित्रपट प्रदर्शित करत आहेत.
     गेल्या वर्षी ईदची संधी साधून प्रदर्शित करण्यास सज्ज असलेला रईस चित्रपट शाहरुख खानने नंतर त्याचे प्रदर्शन लांबणीवर टाकले.त्याचे कारण सांगताना शाहरुख म्हणाला होता की, ज्या आठवड्यात एक मोठा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याच आठवड्यात दुसरा चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. त्यावेळेला सलमान खानचा सुलतान येणार होता. सलमानसाठी शाहरुख मागे सरला. खरे तर शाहरुखने कधीही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मागे-पुढे केली नाही. जवळपास अडीच दशके यशस्वी खेळी  करणार्या शाहरुखची गती गेल्या दोन वर्षांपासून काहीसी मंदावली आहे. खासकरून दिलवाले आणि फॅन हे गेले दोन चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारसे कमाल करू शकले नाहीत. फॅन तर शंभर कोटी क्लबपर्यंतदेखील पोहचू शकला नाही. दिलवाले चित्रपटाचे काम सुरू होते, त्याचवेळेला त्याला जाणवू लागले होते की, त्याला लवकरच असे चित्रपट करावे लागतील की, त्याचे डळमळणारे सिंहासन सावरेल. परजानिया सारखा सारगर्भित चित्रपट बनवणारे राहुल ढोलकिया ज्यावेळेला त्याच्याजवळ गुजरातच्या नव्वदच्या दशकातील गँगस्टर अब्दुल लताफच्या जीवनावर आधारित रईस चित्रपटाची कथा घेऊन गेले, त्यावेळेला शाहरुखने त्याला लगेच होकार दिला. आता ही गोष्ट वेगळी की, चित्रपट बनता बनता त्यात काही गोष्टी वाढल्या काही कमी झाल्या.

आपल्या चित्रपटाची नवीन तारीख निश्चित करताना शाहरुखने बरीच काळजी घेतली होती, पण त्याला अंदाज नव्हता की, 26 जानेवारीच्या निमित्ताने राकेश रोशन यांनी आपला मुलगा हृत्विक याचा  काबिल चित्रपट प्रदर्शित करण्याचे अगोदरच ठरवले होते. हृत्विकदेखील चित्रपट स्वत:च्या जिवावर सांभाळू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. मात्र गेल्यावर्षीचा आशुतोष गोवारीकरच्या मोहनजोदाडोला जबरदस्त मात खावी लागली होती. त्यामुळे हृत्विकलादेखील एकादी चूक मोठी महागात पडू शकते. काबिल चित्रपटात हृत्विक पहिल्यांदाच एका नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तंत्रज्ञानाने समृद्ध आहे,पण कथेच्या बाबतीत काहीसे कमजोर चित्रपट बनवणारे संजय गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
     शाहरुख खान आणि हृत्विक रोशन या दोघांनाही आपल्याला एका यशस्वी चित्रपटाची गरज आहे, याची कल्पना आहे. असे असतानादेखील त्यांनी एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा आपापला हट्ट कायम ठेवला आहे. असे नाही की, असे पहिल्यांदा घडत आहे.15 ऑगस्ट 1975 या दिवशी शोलेबरोबरच जय संतोषी माँ प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. जय संतोषी माँ पहिल्या दिवसापासून तिकिट खिडकीवर गर्दी करू खेचू लागला.सुरुवातीला प्लॉप ठरवला गेलेला शोले नंतर मात्र जबरदस्त चालला. अशा प्रकारेच अमिताभ बच्चन,रेखा आणि जया बच्चन यांना घेऊन आलेला यश चोप्रा यांच्या चर्चित सिलसिला या चित्रपटासोबत महेश भट्ट यांचा अर्थ सिनेमागृहात दाखल झाला होता.अर्थ सर्वदृष्टीने लहान चित्रपट होता. पण आपल्या बोल्ड कथानक आणि मधुर संगीत या कारणाने चांगला चालला. दुसर्या बाजूला सिलसिलाला विचारणारादेखील कोणी राहिला नाही.
     जर आपल्याला दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित करून त्याचा उत्सव साजरा करायचा असेल तर अमिर खानचा लगान आणि सनी देओलचा गदर यांचे योग्य असे उदाहरण देता येईल. दोन्हीही चित्रपट खूप चालले. पण यानंतर ओम शांती ओम आणि सांवरिया, सन ऑफ सरदार आणि जब तक है जान, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले पर्यंत येता येता हे स्पष्ट झाले की, तिकिट खिडकीवर दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्यात कुणालाच फायदा होत नाही.

     प्रदर्शनाच्या तारखेबाबत फक्त कलाकारच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शकदेखील फारच आक्रमक झाले आहेत. ईद,दिवाळी,ख्रिसमस,26 जानेवारी,15 ऑगस्ट सारख्या सुट्टीच्यादिवशी मोठे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी गर्दी उसळलेली असते. असे दिवस प्रेक्षकांसाठीही पर्वणी ठरतात. पण चित्रसृष्टीला अशा मुकाबल्यांमुळे चांगल्या नफ्यावर पाणी सोडावे लागते. मोठा चित्रपट पहिल्या चार दिवसात शंभर कोटी कमावू शकला नाहीत, तर तो पुन्हा फायद्यात येत नाहीत. काही प्रमाणात आज असेच घडणार का? 

2 comments:

  1. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन तगड्या सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळाली. किंग खान शाहरुखचा ‘रईस’ आणि डान्सिंग सेन्सेशन हृतिक रोशनचा ‘काबिल’ हे दोन चित्रपट भिडले. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता ‘रईस’च रईस ठरण्याची चिन्हं आहेत.

    यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘काबिल’ सिनेमाने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला ‘काबिल’ सूडपटाचा प्रवास मांडतो.

    25 जानेवारी म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होऊनही काबिलने बऱ्यापैकी गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे रईस सारख्या तगड्या चित्रपटाची टक्कर असतानाही तो बॉक्स ऑफिसवर ‘काबिल’ ठरला आहे. ‘काबिल’चा मल्टिप्लेक्समध्ये 40 टक्के शेअर पहिल्या दिवशी होता, तर सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येही त्याचा शेअर कमी होता.

    दुसरीकडे शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने पहिल्याच दिवशी छप्पर फाडके कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली, तरी रईसने पहिल्या दिवशी 21 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केल्याचं म्हटलं जातं. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला रईस क्राईम थ्रिलर आहे.

    ReplyDelete
  2. दोन सिनेमाच्या टकरीत शाहरुखचा रईस पुढे निघून गेला आहे. दोन दिवसात रईसने ४७ कोटी तर काबिलने २४ कोटी धंदा केला. सुट्टीचे दोन दिवस आहेत.त्यामुळे दोघांना चान्स आहेत.

    ReplyDelete