Tuesday, January 3, 2017

शत्रू झाले मित्र!

एक म्हातारा उंदीर होता. वयोमानामुळे तो कित्येक दिवस आजारी होता. त्यामुळे एक दिवस त्यानं आपला नातू सनीला जवळ बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाला, ‘‘सनी, आज मी तुला फार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या मी तुला कधी सांगितल्या नव्हत्या. आता ऐक, मी आजपर्यंत तुला खोटं सांगत आलो की, या बिळाशिवाय जगात दुस-या कुठल्याही ठिकाणी बीळ नाही, पण तसं नाहीय.
या जगात वेगवेगळ्या प्राण्यांची असंख्य बिळं आहेत. तू या बिळातून बाहेर पडलास की मला सोडून निघून जाशील, या भीतीपोटीच मी तुला हे वास्तव सांगितलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे उंदरांना फक्त पळताच येतं, असं मी तुला सांगायचो, पण खरी गोष्ट अशी की, आपल्याला पोहतादेखील येतं. हे सगळं तुला यासाठी सांगतो, की आता मी फार काळ जगेन, असं वाटत नाही. माझ्यानंतर तुला एकटयालाच येणा-या संकटाचा सामना करावा लागणार आहे, म्हणून तुला आधीच सावध केलेलं बरं!’’ ..आणि थोडय़ा दिवसांनी त्याच्या आजोबांचं निधन झालं.
त्यानंतर सनी काही दिवस बिळात एकटाच राहिला. आजोबांनी आणून ठेवलेले काही पदार्थ खाऊन त्यानं आपली भूक भागवली. पण आता जमा केलेलं अन्न संपत आल्यामुळे तो काळजीत पडला. कारण त्याच्यासाठी अन्नाची व्यवस्था त्याचे आजोबाच करत असल्यामुळे चिमुकल्या सनीला अन्न कसं मिळवतात, याची थोडीसुद्धा माहिती नव्हती. सनीने अजूनपर्यंत बाहेरचं जगसुद्धा नीट पाहिलं नव्हतं.
चिंतातूर परिस्थितीतच सनी एके दिवशी बिळाबाहेर पडला. सनीला तेव्हा आजोबा हयात असताना नेहमी जी गोष्ट सांगायचे, त्याची आठवण झाली, ती म्हणजे बाहेर आपले असंख्य शत्रू आहेत, ज्यात सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मांजर! हिच्यापासून खूप सावध राहावं लागतं. पण सनीनं आजपर्यंत मांजराला प्रत्यक्षात वा चित्रात कधीच पाहिलं नव्हतं. अन्न संपल्यावर तो एके दिवशी बिळाबाहेर पडला आणि अन्नाच्या शोधात इकडे-तिकडे तुरुतुरु धावू लागला. थोडा वेळ फिरल्यानंतर त्याला रामलालशेठचं मिठाईचं दुकान दिसलं. त्याने दुकानात चोरपावलाने प्रवेश केला आणि मग तिथे ठेवलेल्या लाडवावर ताव मारायला सुरुवात केली.
लाडवानंतर त्याची नजर एका तबकात ठेवलेल्या बालुशाहीवर पडली आणि त्याने तीसुद्धा गट्टम केली. लाडू-बालुशाही खाऊन त्याचं पोट तट्ट भरलं. यामुळे त्याला इतकी सुस्ती चढली होती की, बिळापर्यंत जाणंसुद्धा शक्य नव्हतं. मग तो झोपण्यासाठी जागा शोधू लागला, तेव्हा त्याला जवळच पांढ-या रंगाची रजई पडलेली दिसली. सनी कसाबसा तिथपर्यंत पोहोचला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की, ती रजई नसून पांढ-या रंगाचा कुठला तरी प्राणी आहे. रामलालशेठनं पाळलेल्या या मांजरीनं भरपेट खाल्यामुळे तीसुद्धा सुस्तावलीच होती. दुकानातच पाय पसरून झोपली होती. पोट टम्म भरल्यामुळे सनीला चालणं शक्य नसल्याने तो तिच्या शेपटीचा आधार घेऊन तिथेच झोपला. या आधी मांजराला पाहिलं नसल्यामुळे ती मांजर असल्याचं त्याला माहीत नव्हतं.
गाढ झोपेत असलेल्या मांजरीला आपल्या शेपटीवर उंदीर झोपला आहे, याची जाणीवच झाली नाही. थोडय़ा वेळाने रामलालशेठ दुकानात आल्यावर त्याने मोना आणि सनीला झोपलेलं पाहिलं. तो मोठय़ाने ओरडला, ‘‘मोना, ऊठ उंदीर आलाय!’’ आणि मोना जागी झाली. अचानक झालेल्या या हालचालीमुळे सनीचीसुद्धा झोपमोड झाली. कुठलातरी प्राणी आपल्यामागे लागला आहे, याची जाणीव झाल्यामुळे सनीही धावायला सुरुवात केली. थोडं अंतरानंतर मोनाने सनीला पकडलं. ती त्याला खाणार, तेवढयात त्याने तिच्याकडे विनंती केली, ‘‘गेले दोन-चार दिवस मी उपाशी होतो.
माझे आजोबापण मला सोडून गेले आणि त्यांच्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही.’’ मोनाने त्याच्याकडे तुच्छतेनेच बघितलं. तसं सनीनं आणखी घाबरत विचारलं, ‘‘तुम्ही कोण आहात आणि मला का पकडलं?’’ मोना त्याच्या अंगावर फिस्सकन ओरडली,‘‘मी मोना नावाची एक मांजर आहे.’’ मांजर कशी दिसते, हे सनीला तेव्हा पहिल्यांदा कळलं, पण त्याची कहाणी ऐकून मोनाला त्याची दया आली आणि तिनं सनीला सोडून दिलं. जाताना तिनं सनीला, ‘‘माझ्यातलं थोडं जेवण तुझ्यासाठी राखून ठेवेन. तू एवढंच करायचं, दुकानात कोणी नसेल तेव्हा येऊन ते घेऊन जायचं,’’ असंही सांगितलं.
मोना दुकानात परतल्यावर ‘‘तू असताना उंदीर कसा आत आला?’’ तुला कसं कळलं नाही, असे प्रश्न रामलालशेठ तिला विचारू लागला. पण मोनाने या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तेव्हा कंटाळून तो जिलेबी काढायच्या कामाला निघून गेला. थोडय़ा वेळाने मोनाने एक बर्फीचा तुकडा उचलून सनीला दुकानाबाहेर आणून दिला आणि तो घेऊन सनी बिळाच्या दिशेने पळाला.

No comments:

Post a Comment