बालकथा
एक गरीब माणूस होता. पण
होता मोठा हुशार.तो नेहमी श्रीमंतांची टर उडवायचा. त्यांची चेष्टा करायचा. कधी कधी
राजालादेखील सोडायचा नाही. राजाची टर उडवताना तो कशाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही.
त्याचा हा कारनामा राजापर्यंत पोहचला होता. त्यामुळे तोदेखील नाराज होता.
एक दिवस राजाने त्याला
आपल्या दरबारत बोलावून घेतले. म्हणाला, ‘ मी ऐकलंय की तू फार
हुशार आहेस. मग माझ्यासाठी तीन दिवसांत आकाशात घर बांधून दाखव बरं. तुला किती
माणसं लागतील तितकी मिळतील. पण लक्षात ठेव. तीन दिवसात आकाशात घर बांधले नाहीस तर
तुला माझे सैनिक शिक्षा देतील.’
‘महाराज, मी
नक्की आकाशात घर बांधून देईन.’ इतके म्हणून तो माणूस घरी
आला. पण त्याला प्रश्न पडला. आकाशात घर कसं बांधायचं?त्याने
रात्रभर विचार केला. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक मोठा पतंग बनवला.
त्याला एक घंटी बांधली. एका झाडाच्या शेंड्यावर गेला आणि त्याने तो पतंग उडवला. त्याची
दोरी तिथेच बांधून खाली आला.
दुसर्यादिवशी लोकांना घंटीचा
आवाज ऐकू येऊ लागला. राजानेदेखील तो आवाज ऐकला. आता तो माणूस राजाजवळ गेला.
म्हणाला, ‘महाराज, आकाशात घर
बांधण्याचं काम मी सुरू केलं आहे.आपल्याला घंटीचा आवाज ऐकू येतोच आहे.
आकाशातले मजूर घंटी वाजवून काही तरी मागत आहेत. आपण आपल्या सिपायांना सांगून
तेवढ्या वस्तू आकाशात पोहोचत्या करा.’
राजाने विचारले, ‘ माझे शिपाई आकाशात कसे चढतील?’
माणूस म्हणाला,‘ तिथंपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग आहे.’
राजाच्या आदेशावर सिपाई
त्याच्यासोबत निघाले. माणसाने त्यांना पतंग ज्या झाडाला बांधला होता, त्या झाडाजवळ आणले. व त्यांना ती दोरी दाखवत म्हणाला,‘ हाच तो रस्ता. यावरून तुम्ही आकाशात जाऊ शकता.’
सिपायांनी दोरीवर
चढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना काही वर चढता येईना.
शेवटी वैतागून शिपाई राजाजवळ आले आणि म्हणाले, ‘महाराज,
आकाशात कुठल्याच माणसाला चढून जाता येत
नाही.’
राजा म्हणाला, ‘ तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आकाशात माणसाला कसं बरं चढता येईल?.’
तेवढ्यात तो माणूस म्हणाला, ‘ हो का, महाराज! आपल्याला ही गोष्ट माहित होती तर मला आकाशात घर कसे बांधायला
सांगितलंत?’ राजाजवळ याचं उत्तर नव्हतं. पण त्याच्या
हुशारीची राजाने दाद दिली. शिवाय आपल्या दरबारात मोठ्या
पदावर त्याची नियुक्ती केली. साहजिकच तेव्हापासून त्याने श्रीमंतांची
टर उडवायचे सोडून दिले.
No comments:
Post a Comment