Friday, January 27, 2017

गावाचे नाव बदलवणारी हरप्रीत कौर

     हरप्रीत कौर आठव्या इयत्तेत शिकते. तिच्या गावाचे नाव गंदा. ती कुठेही गेली की, तिच्या गावाच्या नावावरून तिला चिडवले जायचे. टोमणे मारले जायचे. तिने निर्धार केला, गावाचे नाव बदलायचे. तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. आणि काय आश्चर्य! पंतप्रधान कार्यालयाकडून खाली पत्र आले. यंत्रणा हलली. आता या गावाचे नाव अजितनगर असे होत आहे. हे सगळे हरप्रीत कौरच्या निश्चयामुळे,धाडसामुळे झाले. तिच्यावर गाव खूश आहे. गावाने तिच्या कुटुंबाला राहायला जागा देऊन 26 जानेवारीला तिचा सत्कार केला.हरप्रीत आता गावासाठी बरेच काही करायचा इरादा घेऊन पुढे सरसावली आहे.

     हरप्रीत कौरचे गंदा नावाचे गाव हरियाणातल्या रतिया तालुक्यात आहे. तिचे आई-वडील दुसर्याच्या शेतात मोलमजुरी करायला जातात. पण तिला गरिबीपेक्षा गावाचे नाव त्रासदायक ठरायचे. एखाद्या अनोळखीसमोर गावाचे नाव घ्यायला तिला लाज वाटायची. मावशीकडे गेल्यावर तिला तिचा मुलगा तिची आणि तिच्या भावांची टर उडवायचा. म्हणायचा,तू गंदा गावाची आहेस. तुझं गाव गंदा आहे. तू गंदी आहेस. हे ऐकल्यावर तिला वाईट वाटायचे.आपले गाव तर सोडता येत नाही,पण गावाचे नाव तरी बदलता येईल. आईजवळ तिने आपल्या मनातले विचार बोलून दाखवले.पण ती म्हणाली, गावातले मोठे,बुजुर्ग लोक गप्प आहेत, मग आपल्याला कसली लाज? मग तू का त्याचा विचार करतेस? त्यावेळेला तिच्या मनात विचार आला. तिने ऐकले होते की, कित्येक मुलांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या समस्या कळविल्या आहेत. तिने मग पत्र लिहिण्याचा निश्चय केला. आपला इरादा तिने आपल्या वडिलांना सांगितला तर ते तिच्यावरच भडकले. ते म्हणाले, आपण आधीच गरीब आहोत. पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्यासाठी आणखी अडचणी वाढवून ठेवू नकोस.आपल्यासारख्यांना सरपंचांना भेटायचं म्हणजे मुश्किल काम आहे, तिथे तू पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची गोष्ट करतीयस?त्यांचं असंही म्हणणं पडलं की, जिथे गावातले मोठे,बुजुर्ग गावाचे नाव बदलू शकले नाहीत, तिथे आपण काय चीज आहे? त्यांचे म्हणणे बरोबर होते. तिने ऐकले होते की,1989 मध्ये गावाचे नाव बदलून अजितनगर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.पण त्यावर सरकारी मोहर लागली नाही. पण हरप्रीत कौरने पंतप्रधानांना पत्र लिहिलेच. तिने त्या पत्रात लिहिले की, आमच्या गावाच्या नावामुळे आम्ही जिथे कुठे जाऊ तिथे आमचा अपमान केला जातो. कृपया, गावाचे नाव बदला. सुरुवातीला विश्वास नव्हता की, यावर काही तरी अंमल होईल. पण जिल्हा आणि तहसील कार्यालयाला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आले. शासन यंत्रणा हलली. प्रस्ताव तयार झाले. वर पाठवण्यात आले.त्यालाही मंजुरी मिळालीआता गावाचे नाव बदलून अजितनगर होईल. गावाचे नाव बदलणार असल्याची बातमी आल्यावर लोकांचे वागणे बदलले. तिच्या मैत्रिणी पंतप्रधानांना पत्र लिहिण्याच्या गोष्टीवरून टर उडवायच्या. आता त्यांना तिच्याविषयी अभिमान वाटतो आहे.

     सरपंचांसह गावातले सगळेच लोक तिचा आदर करू लागले. ते म्हणू लागले की, जे काम गावातली मोठी,ज्येष्ठ मंडळी करू शकले नाहीत, ते एका लहान मुलीने करून दाखवले. गावकर्यांनी तिच्या कुटुंबाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि 26 जानेवारी 2017 रोजी तिचा गावाने मोठा सत्कार केला. आता ती म्हणते की, आता माझे काम संपले नाही तर सुरू झाले. गावाचे नाव बदलण्याची समस्या संपली असली तरी गावातल्या अनेक समस्या आहेत. त्याही सुटल्या पाहिजेत. गावातल्या ज्या शाळेत ती शिकत आहे, त्या शाळेला कंपाऊंड नाही. यामुळे जनावरे आत घुसतात.शाळेतल्या लहान मुली पाहिजे त्यावेळेला घरी जातात.शाळेशेजारी जनावरांचा दवाखाना आहे,त्यालाही कुंपण नाही. बेवारस जनावरं झाडं-फुलं खातात. आणखी बर्याच समस्या आहेत. माझ्यामुळे मात्र या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे की, एखाद्या व्यक्तीने मनात आणले तर काय होऊ शकते. तिला शिकून पुढे तिच्या आई-वडिलांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करायचे आहेतिच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट ही की, आता तिचे कुटुंब आणि गाव पूर्णपणे तिच्यासोबत आहे.

No comments:

Post a Comment