श्याम बिहारी प्रसाद
पाटणातल्या बीएसएनएलमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.
आता ते आपल्या मुलीकडे दिल्लीला राहायला आले आहेत.इथल्या वसंतकुंज परिसरातल्या फुटपाथवर त्यांनी मजुरांच्या मुलांसाठी एक शाळा
सुरू केली आहे. वाहनांचा गोंगाट आणि गर्दीची वर्दळ असतानादेखील
इथली मुले मन लावून अभ्यास करीत असतात. स्थानिक लोकांची मदतदेखील
या शाळेला होत असते.
त्याचे झाले असे
की, वसंत कुंज परिसरातील घरांजवळ एक
हनुमान मंदिर आहे. श्याम बिहारी प्रसाद रोज सकाळी फिरायला इथे
येत. हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग होता. इथे त्यांना पाहायला मिळाले की, बरीच मुलं लोकांकडून
प्रसाद मागायला इथे उभी असतात. एकदा त्यांनीदेखील आपल्या हिश्श्यातला
प्रसाद एका मुलाला दिला. दुसर्यादिवशी
त्यांनी जवळच्या एका दुकानातून काही बिस्किटे घेतली आणि मंदिराच्या दरवाज्यावर उभ्या
असलेल्या त्या मुलांना वाटली. यातील बहुतांश मुलांचे आई-वडील मजुरी करतात.ती सकाळी कामावर गेली की, मुले बाहेर फिरून काही खाण्या-पिण्याच्या शोधात राहतात.
स्थानिक सरकारी शाळा सकाळी दहाला सुरू होते. शाळेला
जाण्याअगोदर ही मुलं मंदिराच्या बाहेर खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या
लोभापायी उभे राहतात. त्या मुलांशी मग श्यामबिहारी प्रसाद यांनी
बातचित केली. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आले की,
गणित आणि विज्ञानमधल्या सामान्य गोष्टीसुद्धा त्यांना माहित नाहीत.
त्यांना हिंदी आणि इंग्रजी लिहायलासुद्धा येत नव्हते.
त्यांची मुलगी
डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहे. ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलीला सांगितली.त्यावर त्यांची
मुलगी म्हणाली की, आपल्याला त्यांच्यासाठी काही तरी करायला पाहिजे.
मग त्यांनी त्या मुलांना विचारले,तुम्हाला शिकायचं
आहे का? मुलांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यावर दुसर्याचदिवशी सकाळी आठ वाजता मंदिराच्या फुटपाथवर त्यांना बोलावले.
2013 सालातील ती नोव्हेंबरची एक थंड सकाळ होती. आणि वसंत कुंजच्या सेक्टर बी-9 मधील फुटपाथवर एक नवीन
शाळा सुरू झाली. इथे शिकायला येणार्या
मुलांनी आपल्या मित्रांदेखील ही गोष्ट सांगितली. त्यामुळे मुलांची
संख्या वाढू लागली. आता इथे दुसरी ते दहावीपर्यंतची
35 ते 40 मुले शिकायला येतात. यातील बरीच मुले याअगोदर शाळेत जात नव्हती. श्यामबिहारी
प्रसाद यांनी त्यांच्या पालकांना समजावून सांगितले आणि त्यांना सरकारी शाळेत दाखल केले
गेले.
आता शाळेच्या मदतीसाठी
स्थानिक लोक पुढे येऊ लागले आहेत. काही लोक आपला रिकामा वेळ इथे घालवतात. मुलांना गणित,इंग्रजी आणि दुसरे विषय शिकवतात. काही लोक असेही आहेत,जे मुलांसाठी काही खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन येतात.
सकाळी वर्ग सुरू होण्याअगोदर प्रार्थना होत असते. सगळ्या मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांचा
प्रयत्न असतो. शाळेतील मुले श्यामबिहारी प्रसाद यांना अंकल म्हणून
बोलावतात. आता ही मुलं प्रश्न विचारताना
लाजत-बुजत नाहीत. मुलांसाठी स्टेशनरी,पुस्तके,कॉमिक्स आणि गोष्टीची पुस्तके ते घेऊन जातात,कारण त्यामुळे त्यांचे मन अभ्यासात लागावे. मोठ्या मुलांना
स्पर्धा परीक्षांसाठीदेखील मार्गदर्शन केले जाते.
एक दिवस पावसामुळे
मुलांना शिकवता आले नाही, तेव्हा मंदिराच्या पुजार्याने त्यांना मंदिरात शिकवण्याची
परवानगी दिली. ज्यावेळा ही फुटपाथ शाळा सुरू झाली, त्यावेळेला त्यांच्याजवळ फक्त एक चटई होती. पण स्थानिक
लोकांनी यासाठी खूप मदत केली. एक दिवस एक डॉक्टर आले आणि त्यांनी
मुलांसाठी एक फळा आणून दिला.शाळेत रोज हजेरी घेतली जाते आणि सातही
दिवस शाळा सुरू राहते. वाहनांचा गोंगाट आणि गर्दीची वर्दळ असतानादेखील
मुले इथे अगदी मन लावून शिकतात. अगोदर मुले एकमेकांशी बोलताना
शिव्या वैगेरे द्यायचे, आता त्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झाली आहे. त्यांच्या परीक्षांच्या गुणांमध्येदेखील
सकारात्मक फरक पडला आहे. आता इकडे-तिकडे
फिरण्यापेक्षा मुले नियमितपणे या शाळेत येऊ लागली आहेत.
No comments:
Post a Comment