Sunday, January 29, 2017

साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी झटणार्‍या आशाताई


     गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2017 ला नागपूर येथे दोन दिवसाचे भव्य असे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले.या संमेलनाला उदघाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाभले होते. संमेलन ज्यांनी आयोजित केले होते, त्या साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा आशाताई पांडे आहेत.त्यांचे अवघे आयुमान 78. त्या आजही नेटाने साहित्य सेवा करतात. या क्षेत्रात असलेल्या अनेक भाषांच्या साहित्यीकांनाही एकत्र जोडण्याचे काम करीत आहेत. साहित्य विहार नावाचे साहित्याला वाहिलेले नियतकालिक चालवले जाते शिवाय विविध भाषांमध्ये कवींचे प्रातिनिधीक कवितासंग्रहही प्रसिद्ध केले जात आहेत.या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
     अशा या उत्साही,चिरतरुण आशाताई पांडे यांचा जन्म मध्यप्रदेशातला. त्यांचे कुटुंब साहित्याच्या वातावरणातले. यामुळे त्या कविता लिहायला लागल्या. त्यांनी नागपुरातल्या नवयुग विद्यालयात भाषा शिक्षिका म्हणून तीस वर्षे अध्यापनाचे काम केले.1999 ला सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या आयुष्यातून बर्याच गोष्टी करायच्या सुटल्या आहेत. त्यांना साहित्याची आवड असल्याने त्यांनी याद्वारे एक साहित्यिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला.मराठी साहित्याने समाज,रंगमंच आणि सिनेमा समृद्ध केला आहे.पण त्यांनी दुसर्या भाषांनाही प्रोत्साहन देण्याचा विचार केला. नागपुरात मित्र मंडळ नावाची साहित्यिक संस्था 1971 पासून कार्यरत आहे. त्या या संस्थेशी जोडल्या गेल्या. त्यावेळेला या संस्थेचे एकूण 15 सदस्य होते. या संस्थेच्या बैठका साहित्यिकांच्या घरी होत. यामुळे या संस्थेशी नवीन सदस्य जोडले जात नव्हते.ज्यावेळेला या संस्थेची जबाबदारी आशाताई पांडे यांनी घेतली,त्यावेळी त्यांनी या संस्थेला व्यापक स्वरुप देण्याचा विचार केला.आपल्या देशात महिलांकडून एखाद्या मोठ्या जबाबदारीची अपेक्षा केली जात नाही. साहजिकच त्यांना अनेक लोकांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. त्यात त्यांच्याच संस्थेचे लोकही होते. संस्था चाललीय तशी चालू दे. तुम्ही कुठे कुठे धावपळ करीत राहणार? अर्थात त्यांचा त्यांना विरोध नव्हता. एका निवृत्त महिलेला धावपळ त्रासाचे ठरेल, असे त्यांना वाटे. आशाताई म्हणतात, मी साहित्याकडे फक्त मनोरंजन या दृष्टीने पाहात नाही. साहित्यात काही नवीन, काही खास होण्याची गरज आहे. साहित्य समाजाला काही देत नसेल तर ते व्यर्थ आहे.

     त्यांनी सगळ्यात प्रथम संघटनेची बैठक राजाराम दीक्षित लायब्ररी हॉलमध्ये घ्यायला सुरुवात केली. याचा परिणाम दिसायला लागला.साहित्यप्रेमी या बैठकांना यायला लागले आणि नव्या लेखक-कवींशी संपर्कही व्हायला लागला. नंतर शहरातल्या सायंटिफिक हॉलमध्ये बैठका व्हायला लागल्या. संस्था रजिस्टर नव्हती. 2011 मध्ये साहित्य विहार या नावाने संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. संस्थेचा उद्देश्य व्यापक होता. सर्व भाषेतल्या साहित्याला प्रोत्साहित करणे हा महत्त्वाचा उद्देश. संस्थेचे ब्रीदच आहे,सर्व भाषा समभाव. दर महिन्याला सर्वभाषा कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. याद्वारे असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे की, साहित्य लोकांना आणि भाषांना जोडण्याचे काम करते. या संस्थेच्या कार्यातून नागपुरात भाषा,संस्कृती आणि समाजाचे संवर्धन आणि त्याला पुढे नेण्याचे काम चालू आहे.लोकांमध्ये साहित्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून साहित्य विहार नावाची एक पत्रिकादेखील सुरू करण्यात आली आहे. सोळा पानांच्या या पत्रिकेची किंमत पाच रुपये आहे. आता आर्थिक कारणांने याचे मासिक प्रकाशन होत नसले तरी श्रावण,वसंत आणि दिवाळी असे वर्षात तीन अंक तरी प्रसिद्ध केले जातातच. नव्या कविंचा कवितासंग्रहही प्रसिद्ध केला जातो. आता पुस्तक प्रदर्शन भरवण्याची योजना आहे. सध्या संस्थेशी शंभराहून अधिक लोक जोडले गेले आहेत. 78 वर्ष वयोमान आशाताईंचे आहे, मात्र त्यांची काही ना काही करण्याची धडपड सुरूच आहे. शरीर आता पहिल्यासारखे साथ देत नसले तरी जोपर्यंत आपण जिवंत आहे,तोपर्यंत साहित्य सेवा करण्याचा त्यांनी संकल्प सोडला आहे.त्या म्हणतात की,लोकांचे प्रेम आणि नवोदित कवींचा उत्साह पाहून मलादेखील उत्साह येतो. आणि मी काम करत राहते.

1 comment:

  1. सुप्रसिद्ध बहुभाषिक कवयित्री व साहित्य विहार संस्था अध्यक्ष आशा पांडे यांचे कबीर विचार दर्शन हे पुस्तक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना भेट देण्यात आले.कुठल्याही मराठी लेखिकेने महात्मा कबीर यांच्या विचारांवर आधारित लिहिलेले हे पहिलेच पुस्तक. लेखिका आशाताई पांडे यांचा साहित्य निर्मिती उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे. आशा पांडे यांनी साहित्य विहार संस्थेच्या माध्यमातून निःस्वार्थ साहित्य सेवा केली. महाराष्ट्रातील पहिल्या गजलकार ही ख्यातिप्राप्त आहे. वयाची तमा न बाळगता त्यांनी सतत उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली. पाच भाषांमधून आजवर तब्बल 35 पुस्तके प्रकाशित.

    ReplyDelete