Saturday, January 21, 2017

जिगरबाज युवराज


     भारतीय क्रिकेट संघ दहाव्या विश्वचषक स्पर्धेत 24 मार्च 2011 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामना खेळत होता. या सामन्यात भारतीय संघाचा  विश्वचषकातला प्रवास इथेच थांबणार असे म्हटले जात होते. कारण परिस्थितीही तशी दिसत होती. 261 धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाचे निम्मे शिलेदार पावणेदोनशे धावा फलकावर असतानाच पॅवेलियनमध्ये परतले होते. अशा अडचणीच्या काळात आणि मोठे दडपण शिरावर असताना युवराजसिंहने एक चमत्कार दाखवत अर्धशतक झळकावले. आणि ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यादिवशी युवराजसिंह पत्रकारांना सामोरे गेला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवसांमध्ये मिडिया आणि युवराजसिंह यांच्यातलं नातं फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे युवराजसिंहला तो अनुभव आश्चर्याचा धक्का देणारा होता. त्यावेळी तो म्हणाला होता, मला वाटतं की, आज मी काही तरी चांगलं केलं आहे. म्हणूनच तर टाळ्या वाजताहेत. जवळजवळ सहा वर्षांनी परवा गुरुवारी कटकमध्येदेखील जवळपास असेच घडले.25 धावांवर तीन गडी गमावलेल्या भारतीय संघाची कमान संभाळली आणि त्यानंतर आपल्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ खेळी करण्याचे काम युवराजने केले. त्याने 127 चेंडूमध्ये 150 धावांची खेळी केली.या खेळीनंतर तो कॅमेर्यासमोर आला, तेव्हा त्याने 2011 च्या विश्वचषकाचा उल्लेख केला. युवराजसिंहने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान पटकावला होता.

     ही गोष्ट वेगळी की, त्या विश्वचषकानंतरचा काळ युवराजसिंहच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. विश्वचषक संपल्यानंतर बरोबर लगेचच त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्याची तब्येत विश्वचषक दरम्यानच खालावली होती,पण तो टाळत होता. त्याला भिती होती की, जर काही गंभीर असेल तर डॉक्टर त्याला खेळायला परवानगी देणार नाहीत. आणि तो त्यावेळेला कसल्याही परिस्थिती खेळू इच्छित होता. विश्वचषकातले  सामने आठवा. आपल्याला मैदानात खोकताना युवराजसिंह दिसेल.संघाला चॅम्पिअन बनवल्यानंतर युवराजने चषक हातात घेतला होता. चषक पकडल्यानंतर त्याला रडू कोसळले होते.त्यावेळेपर्यंतही त्याला ठाऊक नव्हतं की, येणारा काळ फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर त्याच्या तमाम चाहत्यांनाही रडवून जाईल.कॅन्सरची बातमी एखाद्या वादळासारखी आली. पण युवराजने त्या वादळाचा खंबीरपणे सामना केला. जवळजवळ दोन महिने त्याच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान युवराजने लान्स आर्मस्टाँगचे पुस्तक वाचले. पुस्तकाने त्याला अॅन्सरशी लढण्याचे आणि जीवन जगायला प्रेरणा दिली. युवराजने स्वत:ला खचू दिले नाही. या दरम्यान त्याला भेटायला येणार्या लोकांना विनोद-चुटके सांगत असे. किमोथेरेपी आणि रेडिएशनदरम्यान त्याच्या डोक्यावरचे केस झडत होते,तेव्हा त्याने स्वत:च आपले फोटो सोशल मिडियावर टाकले. शेवटी कॅन्सरनेच हार पत्करली. कटकच्या या जबरदस्त खेळीनंतर वीरेंद्र सेहवाहने एक पोस्ट सोशल मिडियावर टाकली.जुन्या नोटा रद्द झाल्या पण जुने युवराज आणि धोनी संपले नाहीत, अशी काहीतरी ती पोस्ट होती.
     कटकमधील सामना जिंकल्यानंतरचा युवराजचा आनंद बरेच काही सांगून जात होता. त्याने आपली बॅट छातीला कित्येकदा बडवली. हा त्याचा इशाराच होता, त्याला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा स्वत:लाच सिद्ध करून दाखवायचं होते. त्याला हे सिद्ध करायचे होते की, त्याच्यात  अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे.मैदानावर जरी तो इंग्लंड संघाला हरवण्यासाठी खेळताना दिसत असला तरी त्याच्या या  खेळीने कॅन्सरसारख्या रोगावर पूर्णपणे मात केली होती.

     कॅन्सरच्या पुनरागमानंतर युवराजसिंहला संघात कधी पक्के स्थान मिळाले नाही. त्याने स्वत:च सांगितले की, त्याच्या मनात क्रिकेट सोडण्याचा विचार आला होता.पण त्याने कष्ट,जिद्द कायम ठेवली. घरच्या मैदानावर तो चांगले प्रदर्शन करत राहिला.मैदानात घाम गाळत राहिला. कटकमधली खेळी या मेहनतीचाच परिणाम आहे. लक्ष्य,मेहनत आणि तंदुरस्ती जर युवराजसिंहसोबत राहिली तर आगामी काळातल्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो सामन्यांचे परिणाम बदलू शकतो. वयाचा विचार केला तर त्याच्यात अजून क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. भारताला युवीसारख्या चमत्कार घडवणार्या खेळाडूची आवश्यकता आहे.तोही त्यासाठीच शेवटपर्यंत झटत राहील.

No comments:

Post a Comment