काँग्रेस आणि समाजवादी
पार्टी यांच्या आघाडीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की,राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरुपी
मित्र असतो ना शत्रू असतो. मुलायमसिंह यादव काँग्रेससोबत जायला
अजिबात तयार नव्हते,पण त्यांचे मुख्यमंत्री सुपूत्र अखिलेश यांनी
उत्तर प्रदेशात चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाशी आघाडी करून मोठा राजकीय
डाव खेळला आहे.वास्तविक देशात मे 2014 च्या
लोकसभा निवडणुकीचा प्रभाव अद्याप ओसरलेला नाही,त्यात उत्तर प्रदेशमध्ये
मिळालेल्या 73 जागांनी नरेंद्र मोदी लाटेत भाजपाला सत्ता देण्यात
सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. लोकसभा निवडणुकीत समाजवादी
पार्टीला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते,तर काँग्रेसला
केवळ अमेठी आणि रायबरेलीचा गड राखता आला होता.बहुजन समाज पार्टीला
(बसपा) तर आपले खातेदेखील खोलता आले नव्हते.त्यामुळे ही निवडणूक सपा,बसपा,काँग्रेस
आणि भाजपा या चारही पक्षांसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. अर्थात
निवडणूक काळात होणारी अशी कुठलीही आघाडी नीतीन्यायाची किंवा सैद्धांतिक कटिबद्धतेच्या
जवळ जाणारी असत नाही,त्यात फक्त तत्कालिन लाभाचे राजकीय गणित
मांडलेले असते.दोन महिन्यापूर्वी 27 साल
युपी बेहाल सारख्या घोषणा देत शीला दिक्षीत यांना मुख्यमंत्रीच्या रुपात सादर करणारी
काँगेस राहुल गांधी यांच्या किसान यात्रेशिवाय फारशी हालचाल करू शकली नव्हती.
त्यामुळे काँग्रेससाठी समाजवादी पार्टीशी आघाडी करणं यापेक्षा दुसरा
चांगला पर्याय नव्हता.सपा आणि काँग्रेस यांचे रणनीतीकार बिहारच्या
महाआघाडीसारख्या यशाच्याबाबतीत विचार करत असतील तर त्याला आणखी एक कारण आहे,
ते म्हणजे गेल्या काही निवडणुकांच्या अनुभवावरून सांगता येईल की दोघांची
एकत्रित मते 35 ते 38 टक्क्यांच्यादरम्यान
आहेत.त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पण
जातीय समिकरणाचे राजकारण करणारी बसपा या आघाडीची गणितेही बिघडवू शकते.असे झाले तर, याचा फायदा मोदींचा चेहरा घेऊन निवडणूक
लढवत असलेल्या भाजपाला होऊ शकतो.मतदाराच्या विवेकावर प्रश्न उपस्थित न करता हे पाहणे मोठे रंजक आहे की,सपाच्या
घरच्या भांडणात विजेता बनून पुढे आलेले अखिलेश,यांची आघाडी सत्ताविरोधी
वातावरणाला छेद देणार का? या आघाडीचे श्रेय काँग्रेस नेता प्रियांका
गांधी यांनाही दिले जात आहे, त्या उत्तर प्रदेशातल्या मृतप्राय
काँग्रेससाठी संजीवनी साबित होणार का?हे पाहावे लागेल.
No comments:
Post a Comment