Monday, August 27, 2018

राजकारणावर बोलू काही!


     राजकारणावर बोलणं आणि लिहिणं फार सोप्पं आहे. कारण लोकं जितकं गंभीरपणे त्यावर बोलतात, तितकं राजकारणी लोक गंभीरपणे घेत नाहीत. हां, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना लोक आजूबाजूला बघतात, हा भाग सोडला तरी अजूनही राजकारणावर बोलण्याला पहिली पसंदी दिली जाते. त्यामुळेच आपल्याकडच्या वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनेलमध्ये आणि पारावरच्या गप्पांमध्ये राजकारण अधिक शिजताना दिसते. राजकारणी होणं सगळ्यात सोप्पं आहे. दुसर्यावर आरोप केला की, झाला राजकारणी! हे एवढे सोपे असल्याने गल्लीतलं शेंबडं पोरगंदेखील तुझ्याकडं किती माणसं आहेत, असं दुसर्या शेंबड्या पोराला म्हणतंय. याचा परिणाम असा झालाय की, गावातल्या प्राथमिक शाळेतदेखील राजकारण घुसलंय. हायस्कूल आणि कॉलेजच्या पोरांचं तर सोडूनच द्या. त्यांनी तर दादा, आबा, साहेबाचा आधीच पल्लू धरू ठेवला आहे. दादागिरी करायला, हाच पदर त्याला महत्त्वाचा ठरू शकतो. अजून आईचा पदर न सोडलेला हा पोर्या डायरेक्ट राजकारण्यांचा पदर धरून चालतो, तेव्हा आपल्या देशात राजकारणाची आणि राजकारण्यांची किती क्रेझ आहे, याची कल्पना यायला हरकत नाही.

     तिकडे दिल्लीत,मुंबईत दोन राजकारण्यांच्या वाक्युद्ध चाललेलं असतं,पण इकडे हा त्यात तोंड खुपसून आपलाच नेता कसा लय भारी आहे, याची कमिंट फेसबूक, वॉट्सअपवर टाकून मोकळा होता. आणि मग खालच्या पातळीवर तितक्याच खालच्या पातळीवरून कमेंट्स टाकण्याच्या स्पर्धा सुरू होतात. या लोकांचे आयडॉल सचीन तेंडूलकर, विराट कोहली, टाटा, अंबानी असणार नाहीत. यांचा आयडॉल हा गल्लीतला अमूक एक दादा असतो, तमूक एक साहेब असतो. त्याने काय कर्तृत्व गाजवलेलं माहित नसतं,पण त्याच्या वाढदिवसाला मात्र गावभर डिझिजल पोस्टर्स लावलेले असतात. त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ही पोरं तुफान नाचतात. ती इतकं नाचतात की, पुढचे दोन दिवस त्यांच्या अंगातून आळस जात नाही. अमूक एका राजकारणी दादाचा कार्यकर्ता म्हणून घ्यायला या लोकांना भारी आवडते. त्यामुळे आपल्या गल्लीत डॉक्टर,इंजिनिअर, शिक्षक, व्यापारी, व्यावसायिक किंवा उद्योजकापेक्षा अधिक राजकारण करणारे लोक अधिक दिसतात.
फुकट खायला,प्यायला आणि हिरोगिरी करायला मिळत असेल तर आणखी काय हवं असतं? त्यामुळेच मराठी माणूस पुढे सरकताना दिसत नाही. राजकारणी आपली भाकरी भाजून घेण्यासाठी अशा पोरांचा आधार घेऊन त्यांच्याही भाकरीची सोय करतात. त्यामुळे गल्लीतली पोरं राजकारण्यांच्या दरबारात दरबार भरवायला जातात. पण यातून किती लोक पुढे आले आहेत. याचा हिशोब मात्र ही मंडळी करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत असो, किंवा नगरपरिषद, जिल्हा परिषद, इथे ज्याच्याकडे पैसे खर्च करण्याची ऐपत असते. त्यांनाच उमेदवारी दिली जाते आणि ज्याला प्रामाणिकपणे लोकसेवा करायची असते, त्याचे डिपॉझिटसुद्धा जप्त होईल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. माणसे साम,दाम,दंड आणि गर्दीला घाबरतात आणि भुलतात. त्यामुळे शिकून साहेब झालो तरी राजकारण्यांचे पाय धरायला त्यांच्याच दरबारात जावे लागते, हेही काहींच्या लक्षात आल्याने सर्वात सोपा आणि मस्त मार्ग शोधला जातो,तो राजकारणी होण्याचा! पण यामुळे सगळे प्रश्न सुटतात, असा नाही. पण देशाच्या उन्नतीसाठी हा प्रकार मोठा घातक आहे.राजकारणात सगळेच यशस्वी होत नाहीत. अक्सिडेंटली लोकप्रतिनिधी झालेले लोक पुन्हा कधीच राजकारणात आलेले नाहीत.किंवा दिसत नाहीत.  दादा, अण्णा, साहेब,सरकार हीच मंडळी आघाडीवर राहिली आहेत. बाकीचे फक्त हुकुमाचे ताबेदार. आणि जोपर्यंत ही हुजरेगिरी आपल्या देशात चालत राहिल, तोपर्यंत आपल्या देशाचे भले होणार नाही.
     आपल्या देशात क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण यांच्या गप्पा रंगत राहतील, तोपर्यंत अन्य क्षेत्राला संधी मिळणार नाही. आपण गावचे राजकारण करत राहू,त्या नशेत झुलत राहू, तोपर्यंत आपल्या घरातली दारं,खिडक्या,फरशी अन्य प्रांतातले लोकच बसवतील आणि शेवटीदेखील आपल्याला याच घरात कायम बसवण्याची व्यवस्था हेच लोक करतील. आपण मात्र आरक्षण आरक्षण म्हणून ओरडत राहू. उपाशी पोटी लढत राहू. एवढ्या सगळ्या लोकांना नोकर्या द्यायला सरकारची ऐपत नसतानादेखील आपण अजूनही त्यांच्याकडेच हात पसरतोय. उद्योगधंदे करा,व्यवसाय मांडा असे कुणी कितीही ओरडून सांगितले तरी आम्हाला त्यांचा आवाज ऐकायलाच येत नाही. दहा वर्षे झाली सरकारी नोकर्यांची भरती करण्यात आली नाही, तरीही आम्ही बाजारातल्या तुरीसारखे आरक्षणासाठी लढतो आहे. यात राजकारणी आपापले साध्य साधून घेत आहेत. याचा पत्ताच कुणाला लागत नाही. व्यक्तिपूजा बोकाळत चालली आहे. घराघरात प्रत्येकाचा आयडॉल राजकारणी फोटो वेग़वेगळ्या भिंतीवर टांगलेला दिसतो आहे. जिथे घरातच भांडण सुरू आहे, ज्या त्या घरात भाऊ भावाचा, बाप मुलाचा वैरी बनला आहे, तिथे तुम्हा- आम्हां सामान्य जनांचे काय? रोज भांडणे, मारामार्या, खून, खंडणी यांसारखे प्रकार पहावे, ऐकावे आणि वाचावे लागत आहेत. का कुणी तरुण आदर्श नागरिक बनू शकत नाही? का कुणी आदर्श समाजसेवक बनू शकत नाही? सगळ्यांनाच तोडफोडीचं आकर्षण का आहे? याचा विचार पालक म्हणून प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने माझ्या हाताखालचा विद्यार्थी का आदर्श नागरिक बनू शकत नाही, याचे चिंतन करायला हवे. आपल्याकडे अनेक क्षेत्रात संधी आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातल्या तरुणांनी ठरवले तर बरेच काही घडू शकते. महासत्ता तर कधीच झाली असती. क्रीडा क्षेत्रात चीन सोडून द्या,पण छोटे छोटे देश पन्नास-शंभर सुवर्णपदके सहज खिशात टाकून जातात. आम्ही मात्र सात- आठ सुवर्णपदकांवर आनंदोत्सव साजरा करतो. अशी भरारी मारण्यासाठी अनेक क्षेत्र खुले आहेत. पण आम्हाला त्याची वाट पकडायचीच नाही, असे आम्ही ठरवलेलो आहे. दादागिरी, अन्याय- अत्याचार, नशापान करण्यात आपला सारा वेळ खर्ची पडत असेल तर कशी होणार देशाची प्रगती?
     आज सैन्यात काम करणारे सिनिअर लोक धास्तावले आहेत. कारण आजच्या तरुण सैनिकांच्या हातात मोबाईल दिसत आहेत. तासनतास त्यांच्या हातात मोबाईल असल्याने त्यांच्यावर विसंबून राहायचा धोका पत्करायला वरिष्ठ तयार नाहीत. ही कहाणी एक वरिष्ठ सैनिक सांगत होता. ही परिस्थिती आपल्या सैन्याची असेल तर गल्ली-बोळात बापाच्या जीवावर जगणार्या तरुणांची काय वेगळी अवस्था असणार आहे? आपल्या देशात कौशल्य शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. अर्थात हे कौशल्य शिक्षण जुजबी आहे. जग फार पुढे गेले आहे. आज ड्रोनयुद्ध आपल्या उंबरठ्यावर आहे. घरात बसून लोक बँका, लोकांच्या खात्यावरचे पैसे लुटत आहेत. या क्षेत्रात फार मोठी कामगिरी,संशोधन  आपल्याकडून होण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे शिक्षण आपल्याकडे नाही. अजूनही आपल्या राजकारण्यांना लोकांनी चहा, वडा-पावच विकावा असे वाटत आहे. आणि आपण त्यावर टाळ्या वाजवून दाद देतो आहे, त्याचे समर्थन करतो आहे. शेवटी या देशाची सुत्रे कुणा एका अंबानीकडेच द्यायच्या हालचाली व्हाव्यात आणि आपण त्यांनी दिलेल्या फुकट रिचार्जवर आपला वेळ दवडायचा का? याचा विचार करायला हवा आहे.
     आपण अंगमेहनत करण्याचे सोडून द्यायला लागलो आहे. आपल्याकडे टॅलेंट आहे,पण ते वाया घालवत आहोत. आपल्याला या कौशल्याची वानवा जाणवू लागली आहे. ही कौशल्ये प्राप्त करायला मेहनत लागते. आणि या मेहनतीपासूनच आपण दूर चाललो आहोत. कारण राजकारण करायला मेहनत करावी लागत नाही.

Sunday, August 26, 2018

प्रयत्नांवर विश्‍वास हवा


     काही माणसांना कितीही सांगा, सुधारणार नाहीत. त्यांच्यात बदल हा होणे नाही. एका शाळेत एक मॅडम आहेत. त्यांना कितीही सांगा,मॅडम मुलांकडे लक्ष द्या, शाळेत लक्ष द्या. पण फरक काही पडत नाही. आपण कधी लवकर घरी जाऊ, दांडी कशी मारता येईल, याचाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो. संधी मिळेल तेव्हा, ते त्यांच्या वाच्येतून बाहेर पडते. अशा लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली तरी पालथ्या घड्यावर पाणी! अर्थात अशी माणसं सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, असे नाही. करतात,पण पुन्हा ढेपाळतात. स्टीक अप राहत नाहीत. आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिलो नाही तर आपल्यात बदल होणार नाही.

      आपल्यात बदल करणं तसं कठीण असतं. पडिले इंद्रियास वळण... या उक्तीप्रमाणे ते लवकर बदलणं कठीण आहे. यासाठी फार मोठी मेहनत करावी लागते. यावर खूप काम करावं लागतं, हे मी म्हणत नाही. डॉ. टीचिकी डेविस या प्रसिद्ध वेलबीइंग कोच यांचं म्हणणं आहे. त्यांचे परपस ड्रिवन इंटरप्रिन्योरशिप: द टेन इंटरप्रिन्योरशिप स्किल्स यू नीड टू ट्रान्सफॉर्म योर लाइफ, स्टार्ट  अ बिझनेस यू लव ,एंड चेंज द वर्ल्ड हे फार प्रसिद्ध पुस्तक आहे.
      बर्याचदा आपल्याला सुधरायचं असतं. आपल्यात सुधारणा करावयाच्या असतात. रोज ठरवतो,पहाटे उठायचं,फिरायला जायचं. डॉक्टरांनीदेखील सांगितलंय, वजन फार वाढलंय, रोज फिरायला जात जा. पण सकाळी कितीही ठरवलं तरी उठायचं होत नाही. रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहतो. झोप येत नाही. रात्री कुठे अकरा-बारा वाजता झोप येत येते. डॉक्टरांचं आणखीही एक म्हणणं असतं. किमान सहा तास तरी झोप झाली पाहिजे. पण पहाटे पाच वाजता उठायचं म्हणजे कुठे सहा तास झालेले असतात. असे काही तरी फालतू विचार करून आपला संकल्प आपणच मोडीत काढत असतो. झोप ही सहा तास असो अथवा चार तास. ती गाढ झाली की पुरे. पण आपण आपल्या आरोग्याबाबत जास्तच जागृत झालो आहोत. त्यामुळे आपण आपली फारच काळजी घेतो आहे. पण खरी काळजी आपण करतच नाही. तसे असते तर लवकर निजे,लवकर उठे, त्यास आरोग्य लाभे, याचा का मग विसर पडतो? तर हे आपलं असं आहे.
      बॉस कितीही ओरडला तरी हा ढिम्मच! कारण काही होत नाही. उलट काही लोकांना याचे कारण दुसर्यावर फोडायला आवडतं. त्यांनी मला वेळेवर फाईल दिली नाही. त्यामुळे माझं काम वेळेत पूर्ण झालं नाही. आपली जबाबदारी दुसर्यावर ढकलली की काम झाले. ऑफिसच्या कामात घरच्या कामाची कारणं सांगायची. हा अलिकडचा लाडका फंडा. घरचे रडगाणे ऐकवले की, बर्यापैकी सांत्वनता मिळते. पण बॉस जेव्हा उखडतो, तेव्हा त्याची भंबेरी उडते. सगळ्यांनाच मुलं-बाळं आहेत,त्यांच्या त्यांच्या समस्या आहेत. सगळ्यांनी तीच कारणं सांगत बसला तर बॉसला आपला गाशा गुंडाळून वनवासात जावं लागेल. सरकारी खात्यात मात्र याची मोठी चलती आहे. शेवटी सरकारी ते सरकारीच! इथे कुणी कुणाला विचारतच नाही. सवलत कशी मिळवता येते, याचीच संधी शोधली जाते. त्यामुळे कामे निपटायची राहून जातात. साहजिकच सरकारी काम अन सहा महिने थांब, ही म्हण त्यांना सार्थ ठरवायची असते.
      संधी, सवलत मिळवायच्या नादात आपण फार काही गमावत असतो. आपण आपले कर्तव्य विसरत असतो. आपल्यावर काही नियम बांधायचे असतात. स्वत:वर काही शिस्त लावायची असते. ती आपण करू शकत नाही. सुधारणा सुधारणा तर हीच असते. स्वत:ला चांगली सवय लावायची, वेळच्यावेळी कामाचा निपटारा करायचा. प्रत्येकाच्या अंगी सर्जनशीलता हा गुण असतो. त्याचा वापर करून बॉसकडून शाबासकी मिळवण्यासाठी काही नवं त्याच्यापुढे मांडायला हवं. बॉस फक्त त्यालाच संधी देतो, सवलत देतो, त्याचंच ऐकतो, अशी आपण तक्रार करतो, तेव्हा आपलं काही तरी चुकलं आहे, याचा विचार आपण करत नाही. आपण आपल्यात बदल करत नाही,पण दुसर्याने बदलावे,याचा मात्र विचार करत असतो. अशा विचाराने आपण सुधारणार आहे का?
      कित्येकदा मी अशी माणसम पाहिली आहेत. त्यांना आयुष्यात काही कमवायचंच नाही, मिळवायचच नाही. आहे ना नोकरी. खूप झालं. कितीही राबलं तरी तिथंच आहे. पण काही मिळवायचं असेल तर काही करायचं असतं. हे डोक्यात यायला हवं. अशी माणसं मेलेल्याहूनही मेल्यासारखं जगत असतात. काही आनंद नाही,उत्साह नाही. नवं शिकण्याची ऊर्मी नाही. आपली आवड आहे, तीदेखील जोपासायची नाही. अशा जीवनाला काय अर्थ आहे? मी अशी काही माणसं पाहिली आहेत, ज्यांनी नोकरी-धंदा सांभाळून आपला छंद जोपासला आहे. आणि याच छंदाने नंतर त्यांना भरपूर पैसा मिळवून दिला आहे. मग या लोकांनी ही नोकरी सोडून छंदालाच व्यवसाय-धंदा केला. आज ही माणसं सुखात- आनंदात आहेत. आपल्याला असं काही स्वप्न का बाळगता नाही येणार? आपण जिथे पहाटे लवकर उठण्याचा संकल्प पूर्णत्वास नेऊ शकत नाही,तिथे मोठी स्वप्नं कोठून बाळगणार? आपण खरोखर, कसोशीने पूर्ण प्रयत्न केला तर काहीच शक्य नाही.यावर विश्वास ठेवायला हवा.

... तर भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर का नाही येणार?


     दलालांची सद्दी संपते तेव्हा... हा 26 ऑगस्ट 2018 च्या मंथन पुरवणीतला अतुल कुलकर्णी यांचा लेख प्रामाणिकपणे वास्तव मांडणारा आहे. लोकमत वृत्तपत्र काँग्रेसच्या मुशीतला असला तरी त्यांनी वास्तव मांडताना कधी भेदभाव केला नाही. हा लेखसुद्धा वाचताना तसेच जाणवले. विद्यमान सरकारच्या काही निर्णयाने खरेच शासनाचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. अनेक योजना लाभदायी ठरल्या आहेत. संगणकीय क्षेत्राचा किती लाभ झाला आहे, याचे प्रत्यंतरही येत आहे. शेतकर्यांची कर्जमाफी काही उच्चपदस्थ लोकांच्या घोळामुळे काहीशी बदनाम झाली.पण तरीही नेमक्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ झाला. विलंबामुळे ही योजना बदनाम झाली, अन्यथा ही योजना शेतकर्यांनी डोक्यावर घेतली असती.

     जलयुक्त शिवार, शिष्यवृत्ती योजना, शेतकर्यांची कर्जमाफी,खतांमध्ये सबसिडी, शिधापत्रिका आधारलिंकिंग,सावता माळी आठवडी बाजारपेठ योजना आणि आपले सरकार पोर्टल आदी योजनांमुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची बचत तर झालीच आहे,पण त्यातून दलाली संपुष्टात येऊन जनतेची लूट थांबण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवारम्य्ळे आतापर्यंत तब्बल साडेबारा हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त होण्यास मदत झाली आहेत. युरिया र्खीें थेट शेतकर्यांपर्यंत पोहोच होऊन लागल्याने अनेक घोटाळे बाहेर पडले. दहा लाख बोगस शिधापत्रिका उघडकीस आल्या. अडत्यांची मक्तेदारी मोडकळीस येण्याची मदत झाली. अशाच योजना अजून येऊ घातल्या आहेत. किमान आधारभूत किंमत शेतमालाला न देणार्या व्यापार्याला,कंपन्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
     मला एक व्यक्ती म्हणाली होती, पन्नास वर्षे काँग्रेसच्या लोकांनी आपल्याच लोकांची घरे भरली. आता दुसरे खात आहेत, म्हणून बिघडले कुठे? तळे राखील, तो पाणी चाखील. पण कामे चांगली होत आहेत. भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. हे काय कमी आहे काय? कोणतेही सरकार सत्तेवर आले की, आपल्या लोकांना कंत्राटे देणार? पण आता त्यातही बरीच पारदर्शकता आली आहे. -टेंडरमुळे तुझा-माझा म्हणणार्या लोकांनाही आता मर्यादा आल्या आहेत. असो. या लेखात लेखकाने आणखी एक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष पुरवणे आवश्यक होते. कदाचित ही योजना त्यांच्या नजरेतून सुटली असावी, असे वाटते. ती योजना म्हणजे शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या. हजारो शिक्षकांच्या बदल्या या एकही पैसा कुणाला न देता झाल्या आहेत. यापूर्वी आंतरजिल्हा बदली करून घेतलेल्या लोकांना किती मनस्ताप आणि आर्थिक खर्च करावा लागला आहे, हे खरे तर त्यांच्याच तोंडून ऐकणे योग्य ठरेल. दुसर्या जिल्ह्यात जाताना प्राथमिक शिक्षकांना सेवेत असलेल्या आणि ज्या जिल्ह्यात जायचे आहे, त्या जिल्ह्यातल्या अधिकार्यांना,लोकप्रतिनिधींना असे मिळून कमाल तीन-तीन लाख रुपये वाटावे लागले आहेत. यात दलालीचा प्रश्न नसला किंवा सरकारचा पैसा वाचण्याचा प्रश्न नसला तरी भ्रष्टाचाराला आळा बसला, हे काय कमी आहे काय? भ्रष्टाचारमुक्त देश हे स्वप्न आहे, त्याची ही सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही.   
     लेखकाने म्हटल्याप्रमाणे कोणतेही सरकार स्वत:चे नुकसान किंवा बदनामी करून घेण्यासाठी कोणती योजना राबवत नाही. फक्त या योजना राबवणारे नोकरशहा त्या इमानेइतबारे राबवण्यात यशस्वी झाल्यास सरकारचा हेतू सफल होण्यास मदत होते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अतुल कुलकर्णी यांनी मांडला आहे. तो म्हणजे सरकारला या चांगल्या योजनांची प्रसिद्धी करण्यात अपयश आले आहे. सगळे काही जादूची कांडी फिरवल्यावर जसा चमत्कार घडतो, तसा तात्काळ लगेच बदल शक्य नाही. राजकारण करतानादेखील सहेतूकता असेल तर चांगल्या योजनांची वाहवा करणे, काही जड जात नाही. पण तसे होणे शक्य नाही. विरोध नाही केला तर विरोधकांचे अस्तित्व ते काय राहणार आहे? अशा योजना लोकांसमोर आल्यास पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर का येणार नाही?

Saturday, August 25, 2018

धागे नात्यांचे


     कोणताही सण,उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही कारण आहे. इतिहास आहे. पण अलिकडच्या काळात आपण जे सण,उत्सव साजरा करतो आहे, तेव्हा त्या मागचा हेतू आपण लक्षात घेतो का? कारण सण साजरा करण्याचा हेतूच बदलला आहे. त्याची जातकुळीच आपण बदलून टाकली आहे. वास्तविक आपला देश हा सण-उत्सवांचा देश असल्याचे म्हटले जाते. पण तरीही तो साजरा करताना त्यामागची पार्श्वभूमीच आपण विसरून गेलो आहे. दारू पिऊन बेहोश नाचणे, कानाचे पडदे फाटेपर्यंत विविध प्रकारांनी ध्वनि,वायुप्रदूषण करणे असा प्रकार चालू असतानाच जी नाती जपली जावीत म्हणून साजरे करतो, ती नातीदेखील आपण आपल्या वागण्याने मातीमोल करून टाकली आहेत. आपल्या देशाची संस्कृतीच आपण बदलून टाकली आहे. त्यामुळे या देशाचं कसं होणार याची चिंता खरे तर सतावत आहे.
     
देशातल्या अनेक सणांमधला सण आहे तो रक्षाबंधनचा. उद्या रविवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्ताने भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला तिचे, आई-वडिलांचे,गुरु-शिष्याचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण आजच्या अनिश्चिततेच्या काळात हे सणदेखील आपल्याला प्रामाणिक वाटेनासे झाले आहेत. स्त्रियांवरील वाढते अत्याचार डोके चक्रावून सोडणारे आहेत. सीतेला आई मानणार्या या देशात सत्यवचनी राम राहिला नाही. भावाला साथ देणारा लक्ष्मण राहिला नाही. गुरु म्हणून आदराचे स्थान पटकवणार्या शिक्षकांनी आपलीच इभ्रत वेशीवर टांगली आहे. अशा राक्षसीयुगात स्त्री घरात आणि दारातसुद्धा सुरक्षित राहिलेली नाही. महिलांवर बलात्कार करणारे जसे बाहेरचे आहेत, तसेच नात्यातलेदेखील आहेत. बाप नावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणार्या घटना आपल्या देशात घडत आहेत. बापच आपल्या मुलीवर अत्याचार करत असल्याचे घटना उघडकीस येत आहेत. भाऊ आपल्या बहिणीवर, गुरु आपल्या शिष्येवर अत्याचार करणारा हा देश बनला आहे. आपला समाज इथंपर्यंत कसे पोहचला,हे कोडेच आहे. पुरुष आपल्या नातेसंबंधांचा भीडभाड ठेवायला तयार नाही, असले कसले हे कलियुग आले म्हणायचे?
     असल्या बातम्या वाचून आता आपल्याही अशा घटना ऐकण्याची सवय झाली आहे. पहिल्यासारखे आपल्या ऐकून,वाचून धक्के बसत नाहीत. चीड निर्माण होत नाही. आपली संवेदना पार मरून पडली आहे. आज विश्वास नावाची चीज राहिलेली नाही. माणसाची जगण्याची दिशा बदलली आहे.जो तो फक्त स्वत:साठी जगतो आहे. आई-वडील,पत्नी, मुले,बहीण-भाऊ ही नातीच राहिलेली नाहीत. साधा फोन करून भाऊ बहिणीची तर बहीणदेखील भावाची विचारपूस करायला तयार नाही. ही नाती इतकी कटू झाली आहेत की,भाऊ बहीणीचा वाटा द्यायला तयार नाही आणि बहीण त्याला कोर्टात खेचल्याशिवाय सोडत नाही. प्रामाणिकपणा राहिलेलाच नाही. मुलं आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारालादेखील यायला तयार नाहीत, इतकी आपल्या कामात व्यस्त झाली आहेत. परवाचा किस्सा तर ताजाच आहे. पालघरच्या पारशी महिलेचे निधन झाले. गावकर्यांनी तिच्या मुलीला संपर्क साधला. कधी निघताय? अंत्यसंस्कार करायचे आहेत. तर ती आम्हाला वेळ नाही. अंत्यविधी उरकून घ्या, असे सांगते. शेवटचे तोंड तरी पाहायचे, असे विचारल्यावर मोबाईलवर लाईव्ह दाखवा असे संवेदना मेलेली अहमदाबादची मुलगी म्हणते, तेव्हा या नात्याला काय म्हणायचे, असा प्रश्न पडतो. अशी मुलं पोटाला का जन्माला घातली, असा प्रश्न त्या आत्म्यालाला पडला असेल.
     अशा वातावरणात रक्षाबंधनसारखे उत्सव फक्त औपचारिकच राहिले आहेत. आई-वडिलांना फक्त पैसा-संपत्ती यासाठीच विचारले जात आहे. संपत्तीची वाटणी झाली की, त्यांना धक्के मारून बाहेर काढले जात आहे. या लोकांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. कुणाला वृद्धाश्रमात दिवस काढावे लागत आहेत. अन्य नातीदेखील औपचारिकतेपुरती उरली आहेत. नात्यातला गोडवा नष्ट झाला आहे. मोठे कुटुंब छोटे कुटुंब बनले असताना त्यातही आता नवरा-बायकोचे पटेनासे झाले आहे. मुलं चार-पाच वर्षांची असतानाच घटस्फोट घेऊन मुलांचे भविष्य अंध:कारात ढकलत आहेत. टीव्ही-सिनेमा यात षडयंत्र रचणारी नाती दाखवली जात आहेत, तशीच नाती आता घराघरात दिसत आहेत. कुटुंब नावाच्या संस्थेला चूड लावला जात आहे. नात्यांमध्ये ना भावना राहिल्या आहेत, ना संवेदना. विश्वास, एकमेकांची काळजी घेण्याच्या प्रकाराला तडे गेले आहेत. फक्त स्वार्थ आणि स्वार्थ भरून राहिला आहे. आता कुठे तरी श्रावणकुमार पाहायला मिळतो आहे. अशा क्वचित घडणार्या नात्याच्या, कर्तव्याच्या बातम्या व्हायला लागल्या आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. सगळाच समाज बिघडला आहे, असे नाही पण नाती तोडणारी प्रवृत्ती वेगाने वाढत आहे. माणूस फक्त यंत्र उरला आहे.
     आता मुलगा जन्माला आला की, पाळणाघरात जातो आहे. तीन वर्षांचा होत नाही,तोपर्यंत शाळा,क्लास यांमध्ये व्यस्त होत आहे. शाळेत दाखल करण्यापूर्वीचा काळ हा त्याच्यावरच्या संस्काराचा आहे. या कालावधीत नातेसंबंध घट्ट झाले तरच तोही तो पुढे टिकवणार आहे.पण नेमका हाच काळ आई-वडिलांना स्वत:च्या प्रगतीचा वाटत आहे. साहजिकच मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांना या कालावधीत माया-प्रेम हवे असतेच शिवाय समाजात वावरायचे कसे, संघर्ष कसा करायचा याचे शिक्षण याच काळात मिळणे अपेक्षित आहे. आई-बाप मुलांनी मागणी केली की, ते लगेच पुरवतात. त्यामुळे पुढे मोठी समस्या निर्माण होऊन बसते. नाही हा शब्द त्याच्या ऐकण्यात येत नाही.त्यामुळे त्याला पुढे आयुष्य जगताना अड्चणी येतात. तेव्हा तो आई-वडिलांना दोष देतो. त्यांचा पाणौतारा करतो. अशा परिस्थितीत मुलगा आत्महत्या करतो किंवा आई-बापाला मारून टाकतो. आयुष्य खल्लास!
     आज आदर्श समाज स्थापनेसाठी चिंतनाची गरज आहे. आज संस्कार महत्त्वाचे झाले आहेत.आर्थिक उदारीकरणानंतर देशाची आर्थिक    व्यवस्था बदलली आणि माणूस त्याचबरोबर त्याची मानसिकतादेखील बदलली. बर्याच गोष्टी त्याच्या आवाक्यात आल्या,पण तरीही लोभ कमी झाला नाही. समाधान ही वृत्ती राहिली नाही. चंगळावाद वाढला. त्याच्या पुर्ततेसाठी घरादारात लूटमार वाढली. पुरुष संस्कृती आणखी वाढली आणि मुलींची संख्या कमी होऊ लागली. दोन-तीन दशकात पार नातीच बिघडून गेली आहेत. ही नाती नव्याने पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. याचाच अर्थ असा की, भारतीय संस्कृतीचा नव्याने पाया रचण्याची आवश्यकता आहे. शिक्षक, समाजधुरीण, शासनकर्ते या सगळ्यांनीच आता यासाठी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक विषमता इतक्यात नष्ट होत नाही,मात्र त्यादृष्टीने पावले पडायला हवीत.

Thursday, August 23, 2018

(बालकथा) मिकीचीचे नशीब


     ही गोष्ट चीनमधल्या एका शहरातल्या मिकीची या तरुणाची आहे. एके दिवशी संध्याकाळी मिकीची आपल्या मित्राला भेटायला एका बौद्ध मंदिरात गेला होता. त्यादिवशी पौर्णिमा होती. त्यामुळे मंदिरातील संगमरवर फरशी चंद्र किरणांनी चांदीसारखी चकाकत होती.मिकीची मंदिराच्या पायरीवर बसून मित्राची वाट पाहात होता. खूप उशीरापर्यंत वाट पाहूनही मित्र आला नाही, तेव्हा तो नाराज होऊन परत जायला निघाला.जात असताना त्याची दृष्टी बाजूच्या एका बाकड्यावर बसलेल्या वृद्ध व्यक्तीवर पडली. ती व्यक्ती पुस्तक वाचण्यात मग्न होती. उत्सुकतेपोटी मिकीची त्या वृद्ध व्यक्तीजवळ जाऊन उभा राहिला आणि जे पुस्तक तो वृद्ध इतक्या तल्लीनतेने वाचत होता,ते पुस्तक तो निरखून पाहू लागला.

     परंतु, ती व्यक्ती जे पुस्तक वाचत होती,ते पुस्तक दुसर्याच कुठल्या तरी भाषेत होते. मिकीची वृद्ध व्यक्तीला म्हणाला, “ आजोबा, तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू का? हे जे पुस्तक तुम्ही वाचता आहात ते कोणत्या भाषेत आहे हे सांगाल का जरा? ”
त्या वृद्धाने वर पाहिले आणि हसून म्हणाला, “  बाळा, ही भाषा पाताळलोकची आहे.मी तिथलाच राहणारा आहे. या जगाचे कार्य व्यवस्थितरित्या चालावे,यासाठी आम्हाला कधी कधी इकडे यावे लागते. ”
     वृद्धाचे बोलणे ऐकल्यावर मिकीचीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याला वाटले की, तो वृद्ध आपली गंमत करतो आहे. मिकीचीने दुसर्यांदा विचारले, “ आजोबा, खरे सांगा. तुम्ही पाताळलोकचे आहात तर मग इथे काय करता आहात? असे कोणते काम आहे, जे तुम्ही पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर आला आहात? माझ्या माहितीप्रमाणे या जगातले लोक अगदी कठीणातले कठीण कामसुद्धा सहजरित्या सिद्धीस नेतात.मग अशा लोकांना तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीची गरजच काय? ”
     वृद्ध व्यक्तीने त्याच्याकडे अगदी स्नेहभावाने पाहिले आणि म्हटले, “ अजून तू या सर्व गोष्टी जाणून घेण्याएवढा मोठा झाला नाहीस. तरीही तुला या गोष्टी समजून घ्यायला हव्यात,म्हणून सांगतो. या जगात विवाह, धन-दौलत कमावणे यासारखी कार्ये ही नशीबावरच अवलंबून असतात. आणि या कामांसाठी आम्हाला इथे यावे लागते. ”
     वृद्ध व्यक्तीचे बोलणे मिकीचीला मोठे विलक्षण वाटले. त्याला अधिक जिज्ञासा झाली. त्याला वाटलं,खरेच हा माणूस सत्य सांगतो आहे. भाग्य, नशीब या गोष्टी ऐकल्यावर तोही नाही म्हटले तरी उत्साहित झालाच. त्याला मग स्वत:विषयी जाणून घ्यावंसं वाटलं.
आजोबा, तुम्ही भाग्याचं म्हणता ना मग माझं सांगा ना! माझा विवाह कधी आणि कुणाबरोबर होईल? माझा एक मित्र आहे... तोदेखील खूप दिवसांपासून विवाहाच्या प्रतीक्षेत आहे.याची चर्चा करण्यासाठी त्याने मला इथे मंदिरात बोलावले होते. मग तुम्ही सांगू शकाल का,तो या प्रयत्नात यशस्वी होईल का? ”  मिकीची अगदी विनम्रपणे वृद्धाला म्हणाला.
     वृद्ध व्यक्ती हसली आणि म्हणाली, “ हो हो,मी तुझ्या मित्राविषयी आवश्य सांगू शकतो. तुझ्या मित्राचा विवाह एका वयस्कर महिलेशी होणार आहे आणि तुझा विवाह एका अशा मुलीशी होईल, जिच्या कपाळावर एक मोठी विचित्र चामखीळ असेल. ”  हे ऐकून मिकीची नाराज झाला.
नाराज होऊ नकोस,बाळा. तुझी पत्नी सुशील आणि गुणवान असेल. आणि तुझ्या प्रगतीची ती कारणही असेल. खरे तर आपण माणसाच्या गुणांकडे पाहायला हवे, अवगुणांकडे नव्हे. सौंदर्यापेक्षा मन सुंदर असायला हवं. ”  वृद्ध मिकीचीची पाठ थोपवत म्हणाला.
माझी भावी पत्नी आणि तिचे घर मला दाखवू शकाल काय? ”  मिकीचीने वृद्ध व्यक्तीला विचारले.
हो हो, तू म्हणशील तसं. ”  असे म्हणत वृद्ध व्यक्तीने आपल्याजवळच्या छोट्याशा पिशवीतून चिमूटभर गुलाल बाहेर काढला आणि काही तरी पुटपुटत मिकीचीच्या डोळ्यांसमोर उधळला. पुढच्याच क्षणी मिकीची आणि वृद्ध व्यक्ती एका बाजारात उभे होते.
तिकडे बघ, समोर जी महिला भाजीपाला विकते आहे ना, तिच्या शेजारी बसलेली ती मुलगी तुझी भावी पत्नी आहे. ”  वृद्ध त्या मुलीकडे अंगुलीनिर्देश करून सांगू लागला.
     मिकीचीने पाहिले की, ती मुलगी सुंदर तर होती पण तिच्या कपाळावरच्या काळ्या मोठ्या चामखिळीने तिचे सौंदर्य पार नष्ट झाले होते.
नाही नाही आजोबा,ही मुलगी माझी पत्नी बनू शकत नाही. ”  मिकीची ओरडला. पण त्याच्याजवळ कोणीच नव्हते आणि तो पूर्वीसारखा मंदिराबाहेर उभा होता. त्याने वृद्ध व्यक्तीची सर्वत्र शोधाशोध केली, पण ती पुन्हा कुठेच दिसली नाही. कदाचित आपण एकादे स्वप्न पाहिले असावे, असे समजून तो परत घरी निघून आला.
     या घटनेनंतर काही दिवसांनी मिकिचीच्या मित्राचे आमंत्रण आले. तो विवाह करून परतला होता आणि त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन केले होते. त्यादिवशी त्याला मित्राच्या पत्नीला पाहून मोठा धक्काच बसला. खरोखरच मित्राची पत्नी वयस्कर होती. मिकिचीला त्याच्या मित्राने बोलता बोलता सांगितले की, त्याची पत्नी खूप श्रीमंत आहे. तिला दुसरा कुणीच नातेवाईक नाही. अशा प्रकारे तो एका श्रीमंत महिलेशी विवाह करून एका रात्रीत श्रीमंत बनला होता. हे पाहून आणि ऐकून मिकिचीचे डोके गरगरायला लागले.
म्हणजे ते स्वप्न नव्हते. ती वृद्ध व्यक्तीदेखील खरोखरीच पाताळलोकी होती. त्याने त्याचे भविष्य वर्तवले होते, ते आता खरेच सत्यात उतरणार होते. पण मिकिचीने मनोमनी ठरवले की, काही झाले तरी आपण त्या मुलीशी विवाह करायचा नाही. भलेही आपण अविवाहित राहिलो तरी चालेल.
     यानंतर काही दिवसांनी त्याने आपले शहर सोडले. तो या शहरातून त्या शहरात असा भटकत राहिला. एके दिवशी मिकिची एका नावेतून प्रवास करत होता. अचानक मोठे वादळ आले. समुद्राच्या लाटा उसळल्या आणि त्याची नाव उलटली. ते आणि अन्य प्रवाशी पाण्यात बुडाले. योगायोगाने तो बेशुद्धावस्थेत किनार्याला लागला. तिथे एका श्रीमंत व्यक्तीची त्याच्यावर दृष्टी पडली. त्याने त्याला नोकरांकरवी उचलून घरी आणले. श्रीमंत व्यक्तीच्या तरुण मुलीने त्याची मनोभावे सेवा केली. याचा परिणाम असा झाला की, मिकिची लवकर बरा झाला. मिकिचीची सेवा करता करता ती तरुणी मिकिचीच्या प्रेमात पडली. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली.
एक दिवस संधी साधून श्रीमंत व्यक्तीने मिकिचीजवळ विवाहाचा विषय काढला. तरुणी सुंदर होती. त्याने पटकन होकार दिला. तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती थोडे अडखळत म्हणाली, “ पण मिकिची, एक सत्य तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पुढे तक्रार नको. ”
कोणते सत्य? ”  मिकिचीने विचारले.
 खरे तर ही माझी मुलगी नाही. हिला मी एका भाजी विक्रेत्या महिलेकडून दत्तक घेतले आहे. कारण मला मूलबाळ नव्हते. ”
सत्य ऐकून मिकिचीने आ वासला. किती तरी वेळ तो तसाच उभा होता. “  म्हणजे तुमच्या मुलीच्या कपाळावर मोठी चामखीळ होती तर..? ”  मिकिची मोठ्याने पुटपुटला.
तुम्हाला कसे माहित? असं का? म्हणजे आमच्या शेजार्यांनी तुम्हाला सांगितले असेल.पण मी माझ्या मुलीसाठी खूप मोठी रक्कम खर्च करून शस्त्रक्रिया करून तिची ती चामखीळ काढून टाकली आहे. आता ती या शहरातील एकमेव सर्वात सुंदर मुलगी आहे. ”  
     श्रीमंत व्यक्तीचे बोलणे ऐकून मिकिची म्हणाला, “  तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ती फक्त सुंदरच नाही तर सुशील आणि गुणवानदेखील आहे.तिची सेवा आणि समर्पण भाव पाहूनच मी ओळखले होते की, तिच्यासारखी दुसरी मुलगी असणारच नाही.खरं सांगू का, आज जरी तिच्या कपाळावर ती चामखीळ असती तरी मी तिच्याशी विवाह केला असता. शेवटी आता मला कळून चुकले आहे की, सौंदर्यापेक्षा गुणांना अधिक महत्त्व असते. ”  मिकिची अगदी नम्रपणे म्हणाला. यानंतर काही दिवसांत त्याने त्या युवतीशी मोठ्या थाटामाटात विवाह केला.(चिनी कथेवर आधारित)-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

मित्र कसा असावा?


     खरा मित्र कुणाला म्हणायचं, जो सुख-दु:खाच्यावेळी , संकटाच्यावेळी अथवा दुसर्या अशा अडचणीच्यावेळी तुमच्या उपयोगाला पडतो. किंवा तो आपल्याला सल्ला देतो आणि तुमच्या अडचणी समजून घेतो. मार्ग काढायला मदत करतो. एवढीच मित्राची व्याख्या आहे का? कारण मित्र आपल्याला जगण्याची ऊर्जा देतो. उमेद देतो. खरे सांगायचं तर, खरा मित्र हा एक अनमोल खजिना असतो. त्याच्याजवळ गेलात की, तुम्हाला तुमच्या मनासारखं आणि भरभरून मिळतं. 12 ते 91 वर्षांपर्यंतच्या लोकांवर केलेल्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अशा लोकांची तब्येत सारखी सारखी खराब राहते, ज्यांना मित्र नाहीत. किंवा ते कुणाशी मैत्री करत नाहीत. मित्रांच्या संगतीत आपल्याला आनंद होतो, मन खूश राहतं, हे ठीक आहे,पण मित्र असल्याचा परिणाम याही पुढे जाऊन होतो.
मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मैत्री आणि आरोग्य शरीराच्या तणाव प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवता, तेव्हा तुमचा तणाव त्याच्याशी शेअर करता, त्यामुळे तुम्ही चांगले, दीर्घ आयुष्य जगू शकता. मित्र आपल्या जगण्याचं टॉनिक आहे.
     व्यस्त महिलांना जीवन जगण्याची कला शिकवणार्या इनर पीस फॉर बिजी वुमन या पुस्तकाच्या लेखिका जोआन बारिसेंका लिहितात की, ज्यावेळेला महिला तणावाखाली असतात, तेव्हा त्या अशा मित्राच्या-मैत्रिणीच्या शोधात असतात, जे त्यांच्या तणावाचे कारण ऐकू शकतील आणि त्या तणावमुक्त होऊ  शकतील.
     इथे मला आचार्य रामचंद्र शुक्ल यांच्या काही ओळी आठवतात. ते म्हणायचे की,मित्र आपल्या जीवनासाठी औषध आहे. आपल्याला आपल्या मित्रांकडून अशी आशा करायला हरकत नाही, जे आपल्या संकल्पांना अधिक दृढ बनवतात. दोष आणि चुका यांपासून आपल्याला सावरतात.आपल्या सत्य,पवित्रता आणि मर्यादेच्या प्रेमाला पुष्टी देतात. ज्यावेळेला आपण वाईट मार्गावर पाय ठेवतो, त्यावेळेला ते सावध करतात. ज्यावेळेला आपण हताश असतो, तेव्हा ते आपल्यात उत्साह आणतात. मित्राचे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे, ते म्हणजे उच्च आणि महान कार्यासाठी तो आपल्याला  मदत करतो, प्रोत्साहन देतो आणि हिंमत देतो, ज्यामुळे आपण आपल्या मर्यादेपेक्षा महान कार्य करण्याची क्षमता बाळगून राहतो. मित्र केवळ सुख-दु:खाचे हिस्सेदार नसतात तर जीवनाचा खुराकदेखील असतात. आयुष्यात असे मित्र भेटणं म्हणजे आपल्याला एक वरदान लाभल्यासारखं आहे. चांगल्या लोकांना चांगला मित्र लाभणं, ही एक देणगीच वाटत असते, हे सांगावं लागतं का?

Wednesday, August 22, 2018

समजून घ्या, क्षमा करा


     आपण कित्येकदा अशा माणसांच्या बाजूने होतो, ज्या माणसांच्या बाजूने व्हायचे नसते. पण परिस्थिती अशी काही होते की, तिथे आपला नाईलाज होतो. कित्येकदा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो. अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ती कित्येकदा महत्त्वाच्या पदावर असतात किंवा त्यांची चमचेगिरी करत असतात. मन मारून आपण त्यांच्या बाजूने होत असतो. काही माणसं आपल्याला आवडत नाहीत,पण नेमके त्यांच्याबरोबरच दिवस काढायचे असतात. तसं ते फार कठीण  असतं. पण त्यामुळे त्रास हा आपल्यालाच होत असतोतेव्हा आपण सतत त्याच्याबद्दलच विचार करत असतो. मानसशास्त्रज्ञ पियरे विल्सन काय म्हणतो बघा, तो म्हणतो, आपल्या डोक्यात अशा काही गोष्टी फिट बसलेल्या असतात की, त्या आपल्याला आवडत नाहीत.पण सारखी सारखी आपण त्यांचीच आठवण काढत असतो किंवा त्या गोष्टी वारंवार समोर येत असतात. असे वारंवारच्या होण्याने आपल्या कार्यकृतीवर त्याचा परिणाम होतो. उदाहरणच द्यायचे झाले तर समोरच्याने केलेला आपला अपमान! त्याच्या संबंधाने आपल्या मनात नकारात्मक गोष्टी सारख्या सारख्या येत राहतात. त्यामुळे आपल्याला वाईट वाटते. आपण दु:खी होतो. नाराज होतो. आपण समजतो की, तो आपल्या दु:खी करत आहे,पण तसे असत नाही तर आपण स्वत:च स्वत:ला दु:खी करत असतो.

     आपण चांगल्या गोष्टी कधीच उघाळत बसत नाही. आपल्यासमवेत झालेल्या नकारात्मक, वाईट गोष्टींचाच आपण अधिक विचार करत असतो आणि दुसर्याविषयी आपल्या मनात हकनाक जहर निर्माण करत असतो. हेच जहर आपल्यावरच प्रयोग करतं आणि आपल्यालाच चित्तपट करतं. आपण विनाकारण नकारात्मकता मनात बाळगल्याने आपण आपल्याच मनातून उतरत जातो. कारण झालेला अपमान, फसवणूक अशा कित्येक गोष्टी आपल्याबाबतीत होऊनही काही करू शकत नाही. मनात समोरच्याला जोराची थप्पड लगावयाची असते,पण इभ्रत आपल्या आड येते. त्यामुळे चरफडत आतल्या आत झुरायला होते. याचा मानसिक त्रास हा आपल्यालाच होतो. समोरच्यावर त्याचा काहीएक परिणाम झालेला नसतो.
     कवी आणि नाटककार बर्तोल्त ब्रेख्त यांना प्रत्येक वाईट व्यवस्था बदलायची होती,पण त्यांना या संबंधीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा ते दोष करत नव्हते. त्यांनी लिहिलेदेखील आहे की, अन्यायाविरुद्ध व्यक्त केलेली घृणा आपल्याच चेहर्याला विकृत बनवते. या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर चेहरा विकृत करण्यापासून आपण बचावू शकतो. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो,ती आपण समजून घेतली तर आपण त्याच्यापासून स्वत:ला वेगळे करू शकतो. दुसरे म्हणजे त्याला क्षमा करणे. यामुळे आपण द्वेषाच्या बंधनातून मुक्त होतो. दुसर्याचा द्वेष करायचा थांबलो आणि समोरचा असा का वागला, या गोष्टी समजून घेतल्या की, आपला जीवन प्रवास यशस्वी आणि आनंदमय होतो.
     यानंतर प्रसिद्ध लेखक नील वॉल्स काय म्हणतात बघा, परमेश्वर कधी कुणाला क्षमा करत नाही आणि कधी करणारही नाही. कारण तो कुणाचाही निर्णय ऐकवत नाही. म्हणजे फैसला देत नाही. तो फक्त आपल्याला समजून घेतो आणि कुणालाही तो जेव्हा पूर्णपणे समजून घेतो, तेव्हा त्याच्याजवळचे पाप शिल्लक राहत नाही. आपणही ईश्वराचे अंश असेल तर आपणदेखील तसाच विचार करायला नको का? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जीवन काट्याकुट्यांनी, मानापमानांनी भरलेले आहे. आपण त्यालाच कवटाळून बसलो तर जीवनाचा आनंद कसा उपभोगणार?

नेत्रदानातील घट चिंताजनक

     परवा अवयवदानाबाबतीत महाराष्ट्राने आघाडी घेतल्याची बातमी वाचायला मिळाली होती. ती वाचल्यानंतर महाराष्ट्र बदलतोय, असे वाटून गेले होते. अवयवदानाची किती आवश्यकता आहे, हे एकाद्या अवयवाच्या निकामी होण्याने अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीला विचारल्यावर लक्षात येईल. नव्या तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टी शक्य होऊ लागल्या असताना त्याचा उपयोगही करून घेता आला पाहिजे. फक्त धन-दौलत,पैसा- अडका, घर-गाडी दान करण्याचे दिवस आता संपले आहेत. आज वाहनांची वर्दख वाढल्या मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर वाढल्याने कॅन्सरसारखे आजार बळावत चालले आहेत. एकेक अवयव निकामी होऊ लागले आहेत. याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. काही लोक जन्मताच व्यंग घेऊन येत आहेत. या सर्वांनाच रक्त, अवयवांची गरज भासू लागली आहे. त्यामुळे अवयवदान,रक्तदान आणि नेत्रदान वाढले पाहिजे. कोणतेही दान सर्वश्रेष्ठच असते. त्यामुळे ही भावना रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. शाळा,महाविद्यालय, मॉल, सार्वजनिक ठिकाणे आदी परिसरात लोकांच्या शंका-कुशंका बाहेर पडतील आणि त्यांचे निरसन होईल, अशा प्रकारची व्यवस्था शासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने उभी करण्याची गरज आहे

     आपल्याकडे नेत्रदानासाठीही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम राबवली जात आहे. तथापि या आरोग्यदायी उपक्रमाला आरोग्य विभागातून म्हणावी तशी साथ मिळत नसल्याची तक्रार आहे. साहजिकच राज्यात अंधत्व निवारणाचा कार्यक्रम कूर्मगतीने पुढे सरकत असल्याचे निदर्शनास आले आहे. एका आकडेवारीनुसार भारतात अंधत्व आलेल्यांची संख्या जवळपास 15 लाख एवढी असून देशात नेत्रदानाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 50 हजार डोळे उपलब्ध होतात. प्रत्यक्षात सुमारे सव्वा लाख डोळे मिळणे गरजेचे असून दरवर्षी आपण श्रीलंकेतून दहा हजार डोळे आयात करतो. गेल्या वर्षी राज्यात 7 हजार 514 लोकांनी नेत्रदान केले होते. त्यापैकी 2 हजार 989 बुबळे वापरण्यायोग्य होती व तेवढ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळाली. यंदा मात्र अवघ्या पाच हजार लोकांनीच नेत्रदान केले असून हे घसरते प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी सकारात्मक आणि तिथेच वेगाने पाऊल उचलणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा तसेच योग्य माहितीअभावी पुरेशा प्रमाणात नेत्रदान होत नाही. लहान मुलांसाठी वीस ते तिशीतील तरुणांचे बुबुळ मिळणे गरजेचे असून यासाठी अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नेत्रपटल काढण्याबाबत कायदा होणे आवश्यक आहे
     आरोग्य विभागामार्फत नेत्रदानाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही. तसेच यासाठी मनुष्यबळ अपुरे असून मुळात उद्दिष्टच गेली अनेक वर्षे मर्यादित ठेवले गेलेे असेल तर अधिक काम कोण करणार? अरोग्य विभागाच्या आंधळ्या दृष्टिकोनामुळे राज्याच्या अंधत्व निवारण कार्यक्रमापासून आपण कोसो दूर आहोत. याचा मोठा फटका राज्यातील हजारो अंध व्यक्तींंना बसत असून जवळपास 35 हजार लोक आजघडीला दृष्टी मिळण्यापासून वंचित आहेत. यामध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक बालकांचा समावेश असून आरोग्य विभागाकडून जमा केल्या जाणार्या बुबुळांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या चार वर्षांत सातत्याने नेत्रदानाच्या माध्यमातून नेत्रपटल जमा करण्याचा आरोग्य विभागाचा आलेख घसरत चालला असून नेत्रदानाच्या माध्यमातून बुबुळ मिळाल्यास त्याच्या प्रत्यारोपणातून हजारो अंध लोकांना दृष्टी मिळणे शक्य असतानाही 2013 पासून 2018 पर्यंत प्रतिवर्षी केवळ 6 हजार 600 बुबळे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवून आरोग्य विभागातील उच्चपदस्थांनी आपला आंधळा दृष्टिकोन दाखवून दिला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 पर्यंत महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याची घोषणा करताहेत तर त्यांचा आरोग्य विभाग मात्र अजगरासाराखा सुस्तावला आहे. त्याची हालचाल वाढण्यासाठी डोस देण्याची आवश्यकता आहे.

कर्नाटकात कृत्रीम पावसाचा प्रयोग यशस्वी;प्रगत महाराष्ट्र कुठे?


     महाराष्ट्रात दुष्काळी पट्टे सोडले तर धो धो पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारची एक प्रकारची चिंता मिटली आहे. पण जिथे सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान आहे,त्या भागाचाही विचार सरकारने करण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यात निम्मे तालुके दुष्काळाच्या खाईत सापडले आहेत. येथील खरिप कधीचा वाया गेला आहे. अलिकडच्या काही वर्षात सातत्याने घडत आहे,मात्र सरकारची मदत इथंपर्यंत पोहचत नाही. सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी जिल्यातील शेती वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी कृत्रीम पाऊस मदतीला धावून येऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील सातत्याने कृत्रीम पाऊस पाडण्याची आवश्यकता आहे

      कर्नाटक याबाबतीत आघाडीवर आहे. प्रगत आणि पुरोगामी म्हटले जाणार्या महाराष्ट्राने या राज्याकडून काही तरी घेण्यासारखे आहे. दुतडी वाहणार्या नद्या असतानादेखील कर्नाटक कृत्रीम पावसाचे प्रयोग सातत्याने करत आहे. आणि त्यात ते चांगल्यापैकी यशस्वी झाले आहे. इथे कृत्रीम पावसाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी उत्तर कर्नाटकात विमानाद्वारे केलेल्या क्षार फवारणीतून ढगांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा तिप्पट पाऊस पाडण्यात तिथे हवामान शास्त्रज्ञांना यश आले आहे. या तंत्रामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2017 या काळात कर्नाटक राज्याला 2.1 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले. फक्त पाण्याच्या उपलब्धतेचे मूल्य पाहाता तीस कोटी खर्चाच्या प्रयोगातून सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये परतावा मिळाल्याचे कर्नाटक शासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
     उत्तर कर्नाटक भागात कायम दुष्काळी स्थिती असते. त्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी कर्नाटकने कृत्रिम पावसाचा पर्याय निवडला. ढगाच्या निरीक्षणासाठी पश्चिम किनारपट्टी सोडून कर्नाटकचा नव्वद टक्के भाग व्यापतील, अशा भागात तीन रडार बसवण्यात आले. एकावेळी अनेक भागातील ढगांमध्ये क्षारांची फवारणी व्हावी यासाठी दोन विमाने वापरण्यात आली. संपूर्ण कर्नाटक राज्यात दर पाच किलोमीटरच्या क्षेत्रात एक स्वयंचलित पर्जन्यमापक बसवण्यात आल्यामुळे झालेल्या पर्जन्यवृष्टीची नेमकी नोंद घेता येऊ शकली. या नोंदीवरून कर्नाटक राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या ढगांमधून फवारणीआधी तीन ते पाच मिलीमीटर पाऊस झाला, फवारणीनंतर त्याच ढगातील पावसाचे प्रमाण दहा मिलीमीटरपर्यंत तर काहीवेळा पंचवीस ते तीस मिलीमीटरपर्यंत वाढल्याचे दिसून आले. ढगांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा सरासरी तिप्पट पाऊस कृत्रिमरित्या पाडण्यात यंत्रणा यशस्वी ठरली आहे. परिणामी शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
       फक्त आपल्या कर्नाटक राज्यातच कृत्रीम पाऊस पाडला जात नाही तर जगभरात सातत्याने कृत्रीम पाऊस पाडणारे देश आहेत. त्यांच्या सततच्या प्रयोगामुळे त्यांना तंत्रज्ञानाच्या विकासात आणखी भर घालता आली आहे. त्यामुळे ढगांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा किती तरी पटीने अधिक पाऊस पाडला जात आहे आणि तेथील पाण्याचे दैन्य संपुष्टात आणले जात आहे. वास्तविक भारत सरकारने या गोष्टीकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे पाऊस पडेपर्यंत पाणी पाणी अशी ओरड सुरू होते,मात्र एकदा का पाऊस झाला की, सगळे काय विसरले जाते. मग पुन्हा पुढच्यावर्षीच त्याची आठवण होते. तहान लागली की, विहिर खोदण्याचा हा प्रकार कित्येकदा अंगावर आला आहे,पण यातून कुणीच शिकायला तयार नाही. आता तरी सरकार याकडे जातीने लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच आहे. 
     महाराष्ट्र सरकारदेखील सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रयोग करणार असल्याचे सांगण्यात आले होते,मात्र त्याचा काहीच गाजावाजा दिसत नाही. अशाने महाराष्ट्राचा पाणी प्रश्न मिटणार नाही. सरकारने मोठी गुंतवणूक करून कृत्रीम पावसासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. कारण कृत्रिम पावसामुळे येत्या काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही, हे स्पष्ट आहे. आधुनिक युगात याची गरजच आहे.कर्नाटक राज्यात त्याची चांगली सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारसह अन्य राज्यांनी याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

Tuesday, August 21, 2018

वर्तमानात जगा


     माणूस विचार करणारा प्राणी आहे. त्यामुळे सतत त्याच्या डोक्यात काही ना काही विचार चालू असतो. माणसाला खरे तर भविष्याची काळजी अधिक सतावत असते. त्यामुळे तो सतत डोक्यात राख घालून घेऊन वावरत असतो. भविष्याची काळजी करत असताना तो प्रत्यक्षात भुतकाळातल्या घटनांशी चिकटून बसलेला असतो. साहजिकच त्याची प्रगती होताना दिसत नाही. कारण तो वर्तमानात जगतच नसतो. वास्तविक आपण मागचा-पुढचा विचार न करता वर्तमानात भरभरून जगलं पाहिजे. वर्तमान कसा जगला यावर भविष्य अवलंबून आहे. माणसाने गेलेल्या गोष्टी विसरून पुढे पुढे गेले पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे पाणी. पाणी जोपर्यंत वाहत असते,तोपर्यंत ते स्वच्छ,निर्मळ, ताजे असते. ते एकाच ठिकाणी साठले म्हणजे मात्र त्याला दुर्गंधी यायला लागते. त्यात अपायकारक जीव-जंतू वाढायला लागतात. तसे स्वत:लाही चांगले, काही तरी खास बनवायचे असेल तर पुढे पुढे जात राहिले पाहिजे. वाटेत येणार्या समस्या, अडथळे दूर सारून स्वत:ला एक अनुभवसिद्ध बनवले पाहिजे.त्याचाच उपयोग आपल्या भावी जीवनात होत असतो.
   
 काही माणसे भुतकाळात यशस्वी झालेल्या महान व्यक्तींचे विचार आत्मसात करतात. पण असेही काही माणसे असतात की, ते भुतकाळातील लोकांमध्ये आणि भुतकाळात आपल्यासोबत घडलेल्या घटनांमध्येच हरवून जातात. अशी माणसे आजच्या संबंधीत गरजा, समस्या आणि त्याच्या जाणिवा यांची काळजी करताना दिसत नाहीत. खरे तर जुन्या-नव्या आणि भुत-वर्तमान यांची सांगड घालून आयुष्य जगायचे असते. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य यशस्वी बनवायचे असते. जर तुम्ही भुतकाळात आणि त्यातल्या घटनांमध्येच अडकून पडलात तर मात्र तुम्ही त्याचा विचार करून करून त्रासून जाणार. अशा लोकांना मग वर्तमानापेक्षा भविष्याचीच अधिक चिंता लागून राहिलेली असते. ही माणसे विचार करतात की, आपला वर्तमान कसाही असू दे,पण भविष्यकाळ मात्र जबरदस्त असला पाहिजे. पण त्यांना याची जाणीव नसते की, ते आपला वर्तमान योग्य प्रकारे जगत नाहीत,तिथे भविष्याची गॅरंटी कोण देणार? वर्तमानावरच भविष्य अवलंबून असते. 
     महात्मा गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, तुमचे भविष्य तुम्ही आज काय करताय, या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे भूत आणि भविष्याची काळजी सोडून वर्तमान चांगल्या प्रकारे जगण्यासाठी कामाला लागा. हीच सुखद जाणीव आहे. जर तुम्ही आजचा उपयोग योग्य प्रकारे करू शकलात तर तुमचे भविष्यदेखील उज्ज्वल असणार आहे.
     वर्तमान चांगला बनवण्यासाठी आपण आपल्यापेक्षा मोठ्या किंवा महान व्यक्तींच्या भूतकाळातून काही शिकण्याची आवश्यकता नाही. जर शिकण्याची दृष्टी असेल तर आपण आपल्या वयाच्या छोट्या व्यक्तीकडूनदेखील शिकू शकतो. स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी काही ऊर्जावान लोकांच्या भेटी घ्यायला हव्यात. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.  विशेष म्हणजे आपण आशावादी राहिले पाहिजे. आशा केल्याने जीवनात नव्या आशेचा संचार होतो.

Monday, August 20, 2018

आता अवकाश सुरक्षिततेचा विचार व्हावा


     माणूस जिथं जिथं गेला आहे, तिथं तिथं त्याने केरकचरा नेला आहे. आपल्या मनुष्य धर्मानुसार त्याने आपल्या घराचा केरकचरा तर केला  आहेच,पण त्याने दुसर्याच्या घराचे अंगणदेखील स्वच्छ ठेवले नाही. घरादारात कचरा ठेवून मजेत जगणारा हा जगातला एकमेव प्राणी असावा. याने नदी-नाले,समुद्रच काय पर्वत-डोंगरसुद्धा सोडले नाहीत. जिथे जाईल,तिथे कचरा नेला आहे आणि तिथेच टाकून आला आहे. त्याचबरोबर त्यामुळे उद्भवणारी समस्याही तिथे ठेवून आला आहे. आता अवकाशातही केरकचरा सोडून येत आहे. आता हीदेखील मोठी समस्या बनली आहे. घाण करणे-केरकचरा करणे, हा मनुष्यस्वभाव का जात नाही, कळायला मार्ग नाही. खरे तर त्याला स्वच्छतेचे वावडेच आहे, असे म्हटले पाहिजे. घरादारातल्या केरकचर्यामुळे रोगराई पसरू लागली आहे आणि त्याच्यामुळे आपलाच जीव धोक्यात घालत आहे. आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारा हा प्राणी विरळाच म्हणायला हवा. जमीन, समुद्र आणि अवकाशात केरकचरा करून माणूस आपलेच मरण आपल्याच हाताने लिहित आहे.

     मानवाने त्याच्या विकास चक्रात कचर्याचेदेखील रुप पालटवले आहे. शहरात,महानगरात तर केरकचरा आणि त्याचा निपटारा हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. प्लास्टिकचा कचरा ही एक मोठी समस्याच आहे, जी कधी नष्ट होण्याचे नावच घेत नाही. याने नदी-नाल्यांमध्ये मोठी समस्या निर्माण केली आहे.समुद्रदेखील याच्यापासून सुटलेला नाही. समुद्राच्या तळाशी हा कचरा साचत साचत वरती येऊ लागला आहे. यामुळे समुद्रातले जीव-जंतू, समुद्री सस्तन प्राणी यांचा जीव धोक्यात आला आहे. समुद्राच्या काठाला असे जीव मरून पडलेले आपल्याला वारंवार दिसून येत आहे. या घटना आपल्या संवेदनाला धक्के देत आहेत.  आता अशी भीती वाटायला लागली आहे की, समुद्रापेक्षाच हा कचराच मोठा होतोय की काय? हा कचरा डोंगर, पर्वत माथ्यांवरसुद्धा कधीचा जाऊन पोहचला आहे.
     गिर्यारोहक आपल्यासोबत प्लास्टिक व अन्य कचरा घेऊन जात आहे,मात्र येताना ते तिथेच टाकून माघारी परतून येत आहे. त्यामुळे या भागातदेखील केरकचरा गंभीर रुप घेत आहे. आता त्यामुळे एवरेस्ट शिखरचे नामकरण कचराकुंडी असे झाले आहे. अर्थात याचे धोके लक्षात येऊ लागल्याने यावर उपाययोजना केल्या जात आहेत. नेपाळ सरकारने यावर एक चांगला पर्याय काढला आहे. गिर्यारोहींच्या वस्तूंची यादी केली जाते आणि ते पुन्हा परत आले की, त्या वस्तू तपासल्या जातात. प्लास्टिकच्या पिशव्या,बाटल्या, ॅल्युमिनिअमचे कॅन,सिगरेटची पाकिटे, डबे यादीनुसार आहेत का, हे पाहिले जाते. या सर्व वस्तू परत आल्या नसतील तर त्या गिर्यारोहकांना दंड भरावा लागतो. पण यामुळेदेखील परिस्थिती सुधारताना दिसत नाही. पृथ्वीवरची ही केरकचर्याची समस्या जटील बनत चालली असताना आता वैज्ञानिकांना अवकाशातील वाढत्या कचर्यांची चिंता सतावू लागली आहे.हा स्पेस जंक धोक्याच्या पातळीवर पोहचला आहे.
     अवकाशातल्या केरकचर्याला स्पेस जंक म्हटलं जातं. हा दोन प्रकारचा असतो. एक आहे तो, वेगवेगळ्या प्रकारच्या उल्कांमुळे बनला आहे,ज्याला नैसर्गिक कचरा म्हणतात. दुसरा आहे तो मानवनिर्मित आहे. म्हणजे लहान-मोठी वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स, वेळोवेळी अवकाशात सोडण्यात आलेले उपग्रह. ज्यांचे आयुष्य संपले आहे, असे उपग्रह अवकाशातच पृथ्वीच्या भोवतीने चक्रा मरताहेत.      उपग्रहापासून वेगळे झालेले,तुटलेले भागदेखील असेच अंतराळी फिरत आहेत. मागे चीनने अवकाशात दोन उपग्रहांची धडक लावण्याचा प्रयोग केला होता. यातून ते ग्रह जळून राख झाले,पण ती राख तशीच वातावरण कक्षेत फिरत आहे. यामुळे काही धातूंचे तुकडे विखुरले गेले आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित या कचर्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे. उल्कांपासूनचा कचरा हा सूर्याभोवती फिरत आहे, तर मानवनिर्मित कचरा हा पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे. यातले काही पृथ्वीच्या कक्षेत येऊन भरकटतात. हे तुकडे त्यांच्या मार्गात येणार्या उपग्रहांना किंवा अवकाश यात्रींना धडकल्यास काय अनर्थ ओढवू शकेल, याचा अंदाज नाही. या कचर्यांचा जो वेग आहे, तो ताशी 17 हजार मैल असा आहे. म्हणजे बंदुकीतून निघणार्या गोळीपेक्षा सुमारे 22 पट अधिक वेग त्याचा आहे.
     नैसर्गिक उल्कापात यातून निघणारा कचरा हा पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर घर्षणाने चक्काचूर होऊन जातो. मात्र मानवनिर्मित उपग्रह अनेक धातूंच्या मिश्रणातून बनलेला असतो. हा घर्षण प्रक्रियेला दिर्घकाळ तोंड देऊ शकतो. अमेरिका अवकाश एजन्सी नासाच्या एका अंदाजानुसार अशा कचर्याचे पाच लाखांहून अधिक तुकडे पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. आता यापासून कशी मुक्तता मिळवायची, याची कल्पना कुणालाच नाही.  त्यामुळे आता सर्वांनाच अवकाशात उपग्रह सोडताना यापासून निर्माण होणार्या समस्याचे निराकरण कसे करायचे,यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. औषधांची निर्मिती करताना जशी ऐथिक्स कमिटीची व्यवस्था करण्यात आली आहे, तशी व्यवस्था किंवा प्रोटोकॉल बनवण्याची आवश्यकता आहे. यासारखे आपल्या इथे ग्रीन ट्रिब्यूनल आहे,तसेच काही तरी जागतिक स्तरावर बनवण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण असे समजत आलो आहोत की, जर धरती सुरक्षित नाही,तर आपणदेखील सुरक्षित नाही,पण आता अवकाशाच्या सुरक्षिततेचा विचारदेखील आपल्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे