Sunday, August 19, 2018

(बालकथा) प्रायश्‍चित


     अमोलच्या बाबांनी ऑफिसातून आल्या आल्या अमोलला आवाज दिला,पण तो घरात नव्हता. त्याच्या आईने सांगितले की, तो गच्चीवर पतंग उडवतो आहे. बाबा म्हणाले, “ मी तुला कितीदा बजावलं की, त्याला दिवसभर पतंग उडवायला देऊ नकोस म्हणून. सकाळ-संध्याकाळ पाहिजे तेव्हा गच्चीवर पतंग उडवत असतो. त्याला जरा खाली बोलव. ”
आईने बाबांची भीती दाखवून अमोलला खाली घेऊन आली. बाबा त्याला म्हणाले, “ हे बघ अमोल, जरा अभ्यासाकडेही लक्ष दे. सहामाही परीक्षा आठवड्याभरावर आली आहे ना? ”

पण बाबा, मी दिवसभर कुठे पतंग उडवतोय. आताच तर वर गेलोय. ” अमोल म्हणाला.
हे बघ, सकाळी शाळेला जाण्यापूर्वी पतंग उडवताना दिसतोस.संध्याकाळीदेखील गच्चीवरच असतोस. पतंग उडवण्याच्या नादात तुझे अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही. ” अमोलचे बाबा म्हणाले.
पण बाबा, मी सगळा होमवर्क करून जातो.कधी माझी तक्रार आली आहे का? मी अभ्यास करतोय म्हणून तर वर्गात पहिला येतोय ना?ङ्घ अमोल म्हणाला.
ते म्हणाले, “ते मला काही सांगू नकोस. मी तुला पुन्हा बजावतोय. तू खेळ,पण इतकेही नाही की, अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हावे. ”
या खेपेला अमोलची आई मधे पडली. “ तुम्ही तर ना, दिवसभर माझ्या मुलाच्या मागे लागता. ऑफिसमधून घरात पाय ठेवताय न ठेवातय तोच, अमोल कुठाय म्हणून ओरडता. बाकी सर्वांची मुले खेळतात,बागडतात.मग यानंही थोडं फार खेळलं म्हणून बिघडलं कुठे? ”
तू त्याला लाडानं बिघडवून ठेवू नकोस. जरा विचार कर. आठवड्याभरात परीक्षा सुरू होईल. ”
ते पुढे म्हणाले, “ या परीक्षेत कमी मार्क पडल्यावर संपूर्ण निकालावर त्याचा परिणाम नाही का होणार? मार्क कमी पडले तर तो आणि तू दोघेही पश्चाताप करत बसाल. ” बाबा रागाने म्हणाले.
तुम्ही त्याची काळजी करू नका. हा अभ्यासात इतका हुशार आहे की, नंबर खाली येण्याचा प्रश्नच येत नाही. ” आई म्हणाली.
मग ठीक आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी आजपासून त्याला काहीही बोलणार नाही. ” ते म्हणाले. आई अमोलला म्हणाली, “ जा बाळा, थोडा वेळ खेळ जा. ”
पाहता पाहता परीक्षा सुरू झाली. पण अमोलचा पतंगबाजीचा शौक काही कमी झाला नाही. संधी मिळताच तो गच्चीवर जाई आणि मनसोक्त पतंग उडवी. साहजिकच त्याचे अभ्यासाकडे म्हणावे असे लक्ष लागत नाही.
परीक्षेनंतर काही दिवसांत गुणपत्रके देण्यात आली. त्यातले मार्क पाहून अमोलला धक्काच बसला. त्याचा गुणपत्रकावर विश्वासच बसला नाही. त्याला फारच कमी मार्क मिळाले होते. त्याचा क्रमांक पहिल्या पाचमध्येदेखील आला नव्हता. बाईंनीदेखील त्याची चांगलीच कान उघाडणी केली.
आता त्याच्या लक्षात आले की, बाबा त्याला पतंग उडवायला का नको म्हणत होते. तो पतंगबाजीत इतका गुरफटून गेला होता की, त्यामुळे तो अभ्यासापासून वंचित राहिला.
घरी आल्यावर तो गुपचुप आपल्या खोलीत गेला. बेडवर जाऊन शांतपणे लवंडला. आईला अमोल आल्याचे कळताच ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, “ काय रे! आल्या आल्या असा लवंडलास का? खेळायला जायचं नाही का? जा, थोडं दूध पी आणि खेळून ये. ”
अमोलला वाटलं, आता आईदेखील त्याची मस्करी करू लागली आहे. त्यामुळे तो काहीच बोलला नाही.
आई पुन्हा म्हणाली, “थकवा आलाय का बाळा? तब्येत बरोबर नाही का? ” असे म्हणून तिने तिचा हात अमोलच्या कपाळाला लावला.
अमोलला आईचे बोलणे ऐकून रडू कोसळले.त्याने रडतच त्याच्या दप्तरातले गुणपत्रक काढून आईच्या हातात दिले. मार्कं पाहून आईलाही धक्का बसला. म्हणाली, “ हे रे काय बाळा, इतके कमी मार्क? ”
तेवढ्यात अमोलचे बाबादेखील ऑफिसमधून आले. त्याला रडत असताना पाहून घाबरून म्हणाले, “ काय झालं गं अमोलला? ”
घाबरतच आईने त्यांच्या नजरेला नजर न भिडवता आपल्या हातातले गुणपत्रक त्यांच्या हातात दिले. त्यांनाही थोडा धक्का बसला.पण ते सावरले. म्हणाले, “ अरे एवढंच ना! मग त्यात काय रडायचं? आता यापुढे नेटाने अभ्यास कर आणि  ही कसर भरून काढ. ”
अमोल आता बाबांच्या कमरेला येऊन चिकटला. रडत म्हणाला, “ बाबा,माझं चुकलं. मी तुमचं ऐकलं नाही. ”
नाही रे, असं रडायचं नसतं. आता तुला कळलं ना,बस्स! तुला जाणीव झाली,यातच प्रायश्चित आलं. आता अभ्यासाकडे लक्ष दे. ” असे म्हणत बाबांनी त्याला प्रेमानं जवळ घेतलं. अमोलने आता मन लावून अभ्यास करण्याचा संकल्प केला.

No comments:

Post a Comment