Friday, August 17, 2018

नशिबाचा खेळ


     नेहमी म्हटलं जातं की, नशिबात असतं ते चुकत नाही. यासारखीच आणखी एक प्रचलित मान्यता आहे,ती म्हणजे मनुष्य आपले भाग्य स्वत: लिहू शकतो. मग प्रश्न असा पडतो की, या दोन्ही गोष्टी कशा शक्य असतील. एकिकडे आपण नशिबाचे गुणगान गातो आणि दुसरीकडे मनुष्याच्या कर्मावर विश्वास ठेवतो. हे कसं शक्य आहे? ज्यावेळेला मुलगा चांगल्या मार्कांनी पास होत नाही, त्यावेळेला त्याच्या शिक्षकाला, समाज,परिसर,त्याचे मित्र एवढेच नव्हे तर गल्लीतल्या लोकांनादेखील दोष दिला जातो. एकादी व्यक्ती दारूच्या नादाला लागली तर, अमुक्यामुळे आमचे हे प्यायच्या नादाला लागले, नाही तर आमचे हे दारूला स्पर्शदेखील करत नव्हते. दुसर्याला दोष देऊन मोकळे. पोरगा बिघडला तर, संगतीला दोष दिला जातो, त्याच्या मित्रांना दोष दिला जातो. अदृश्य गोष्टीला दोष दिला की, त्यांना आपल्या मुलाच्या दोषाचा आणि आपल्या सगळ्या कमकुवतपणापासून सुटका करून घेता येते. दुसर्या बाजूला एक मुलगा आहे. त्याच्याजवळ सोयीसुविधा नाहीत. आई-वडील काबाडकष्ट करून त्याला शिकवतात. बाबा दुसर्याच्या शेतात राबराब राबतो, आई चार घरची धुणीभांडी करते. अशा मुलाला 90 टक्क्यांपेक्षा अधिक मिळतात,तेव्हा लोक त्याची हेटाळणी करतात. दुसरं काय! नशीब. त्याचं नशीब जोरावर होतं, असे म्हणून मोकळे होतात.

     अर्थात, हा चमत्काराचा प्रयत्न आहे. खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या अंगी अनेक कला लपलेल्या असतात. नशीब प्रत्येकाला संधी देत असतं. पण संधी हुकली तर त्याचा फायदा त्याला होत नाही. सगळं काही ठीकठाक असतानाही तो यशस्वी होऊ शकत नाही. तो त्याच्या गुणांचा, कलेचा योग्य ठिकाणी उपयोग करू शकत नाही. एकदा का मनात नकारात्मक गोष्ट घर करून बसली की, काही केल्या त्यांच्या मनातून त्या जाता जात नाहीत. खरे तर त्याच्या भाग्याला, नशिबाला दोष देण्यात अर्थ नाही. उलट तो त्याच्या गुणांचा योग्य वापर करू शकला नाही,याचा दोष आहे. नकारात्मकाता घरात येऊन बसली की, त्याचा आत्मविश्वास तुटून पडतो. तो स्वत:ला अभागी समजत असतो, करंटा समजत असतो.तो आपल्या वाईट नशिबाला स्वत: च आवतण देतो.पण ज्याच्यात मानसिक ताकद आहे,तो आपल्या मनाला कामाला जुंपलेला असतो. कर्मरत व्यक्तीचे विचार नशिब निश्चित करतात. ए जीवनालाच बदलून टाकतात. भविष्य बनवू शकतात. भारतीय तत्त्वज्ञानात कर्मशक्तीलाच महत्त्वपूर्ण समजले जाते. कर्मच जन्म-जन्मांतरीचा प्रभाव टाकू शकते. तेच व्यक्तीला सचेत, सावधदेखील करते. तर मग आपले विचार नकारात्मक का असतात? याचे दायित्व आपल्यावरही असते. आपण कुठेही गेलो, काहीही केले तरी आपले संपूर्ण जीवन आपल्या मेंदूच्या कचाट्यात सापडलेले असते.

No comments:

Post a Comment