Monday, August 27, 2018

राजकारणावर बोलू काही!


     राजकारणावर बोलणं आणि लिहिणं फार सोप्पं आहे. कारण लोकं जितकं गंभीरपणे त्यावर बोलतात, तितकं राजकारणी लोक गंभीरपणे घेत नाहीत. हां, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना लोक आजूबाजूला बघतात, हा भाग सोडला तरी अजूनही राजकारणावर बोलण्याला पहिली पसंदी दिली जाते. त्यामुळेच आपल्याकडच्या वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनेलमध्ये आणि पारावरच्या गप्पांमध्ये राजकारण अधिक शिजताना दिसते. राजकारणी होणं सगळ्यात सोप्पं आहे. दुसर्यावर आरोप केला की, झाला राजकारणी! हे एवढे सोपे असल्याने गल्लीतलं शेंबडं पोरगंदेखील तुझ्याकडं किती माणसं आहेत, असं दुसर्या शेंबड्या पोराला म्हणतंय. याचा परिणाम असा झालाय की, गावातल्या प्राथमिक शाळेतदेखील राजकारण घुसलंय. हायस्कूल आणि कॉलेजच्या पोरांचं तर सोडूनच द्या. त्यांनी तर दादा, आबा, साहेबाचा आधीच पल्लू धरू ठेवला आहे. दादागिरी करायला, हाच पदर त्याला महत्त्वाचा ठरू शकतो. अजून आईचा पदर न सोडलेला हा पोर्या डायरेक्ट राजकारण्यांचा पदर धरून चालतो, तेव्हा आपल्या देशात राजकारणाची आणि राजकारण्यांची किती क्रेझ आहे, याची कल्पना यायला हरकत नाही.

     तिकडे दिल्लीत,मुंबईत दोन राजकारण्यांच्या वाक्युद्ध चाललेलं असतं,पण इकडे हा त्यात तोंड खुपसून आपलाच नेता कसा लय भारी आहे, याची कमिंट फेसबूक, वॉट्सअपवर टाकून मोकळा होता. आणि मग खालच्या पातळीवर तितक्याच खालच्या पातळीवरून कमेंट्स टाकण्याच्या स्पर्धा सुरू होतात. या लोकांचे आयडॉल सचीन तेंडूलकर, विराट कोहली, टाटा, अंबानी असणार नाहीत. यांचा आयडॉल हा गल्लीतला अमूक एक दादा असतो, तमूक एक साहेब असतो. त्याने काय कर्तृत्व गाजवलेलं माहित नसतं,पण त्याच्या वाढदिवसाला मात्र गावभर डिझिजल पोस्टर्स लावलेले असतात. त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ही पोरं तुफान नाचतात. ती इतकं नाचतात की, पुढचे दोन दिवस त्यांच्या अंगातून आळस जात नाही. अमूक एका राजकारणी दादाचा कार्यकर्ता म्हणून घ्यायला या लोकांना भारी आवडते. त्यामुळे आपल्या गल्लीत डॉक्टर,इंजिनिअर, शिक्षक, व्यापारी, व्यावसायिक किंवा उद्योजकापेक्षा अधिक राजकारण करणारे लोक अधिक दिसतात.
फुकट खायला,प्यायला आणि हिरोगिरी करायला मिळत असेल तर आणखी काय हवं असतं? त्यामुळेच मराठी माणूस पुढे सरकताना दिसत नाही. राजकारणी आपली भाकरी भाजून घेण्यासाठी अशा पोरांचा आधार घेऊन त्यांच्याही भाकरीची सोय करतात. त्यामुळे गल्लीतली पोरं राजकारण्यांच्या दरबारात दरबार भरवायला जातात. पण यातून किती लोक पुढे आले आहेत. याचा हिशोब मात्र ही मंडळी करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत असो, किंवा नगरपरिषद, जिल्हा परिषद, इथे ज्याच्याकडे पैसे खर्च करण्याची ऐपत असते. त्यांनाच उमेदवारी दिली जाते आणि ज्याला प्रामाणिकपणे लोकसेवा करायची असते, त्याचे डिपॉझिटसुद्धा जप्त होईल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. माणसे साम,दाम,दंड आणि गर्दीला घाबरतात आणि भुलतात. त्यामुळे शिकून साहेब झालो तरी राजकारण्यांचे पाय धरायला त्यांच्याच दरबारात जावे लागते, हेही काहींच्या लक्षात आल्याने सर्वात सोपा आणि मस्त मार्ग शोधला जातो,तो राजकारणी होण्याचा! पण यामुळे सगळे प्रश्न सुटतात, असा नाही. पण देशाच्या उन्नतीसाठी हा प्रकार मोठा घातक आहे.राजकारणात सगळेच यशस्वी होत नाहीत. अक्सिडेंटली लोकप्रतिनिधी झालेले लोक पुन्हा कधीच राजकारणात आलेले नाहीत.किंवा दिसत नाहीत.  दादा, अण्णा, साहेब,सरकार हीच मंडळी आघाडीवर राहिली आहेत. बाकीचे फक्त हुकुमाचे ताबेदार. आणि जोपर्यंत ही हुजरेगिरी आपल्या देशात चालत राहिल, तोपर्यंत आपल्या देशाचे भले होणार नाही.
     आपल्या देशात क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण यांच्या गप्पा रंगत राहतील, तोपर्यंत अन्य क्षेत्राला संधी मिळणार नाही. आपण गावचे राजकारण करत राहू,त्या नशेत झुलत राहू, तोपर्यंत आपल्या घरातली दारं,खिडक्या,फरशी अन्य प्रांतातले लोकच बसवतील आणि शेवटीदेखील आपल्याला याच घरात कायम बसवण्याची व्यवस्था हेच लोक करतील. आपण मात्र आरक्षण आरक्षण म्हणून ओरडत राहू. उपाशी पोटी लढत राहू. एवढ्या सगळ्या लोकांना नोकर्या द्यायला सरकारची ऐपत नसतानादेखील आपण अजूनही त्यांच्याकडेच हात पसरतोय. उद्योगधंदे करा,व्यवसाय मांडा असे कुणी कितीही ओरडून सांगितले तरी आम्हाला त्यांचा आवाज ऐकायलाच येत नाही. दहा वर्षे झाली सरकारी नोकर्यांची भरती करण्यात आली नाही, तरीही आम्ही बाजारातल्या तुरीसारखे आरक्षणासाठी लढतो आहे. यात राजकारणी आपापले साध्य साधून घेत आहेत. याचा पत्ताच कुणाला लागत नाही. व्यक्तिपूजा बोकाळत चालली आहे. घराघरात प्रत्येकाचा आयडॉल राजकारणी फोटो वेग़वेगळ्या भिंतीवर टांगलेला दिसतो आहे. जिथे घरातच भांडण सुरू आहे, ज्या त्या घरात भाऊ भावाचा, बाप मुलाचा वैरी बनला आहे, तिथे तुम्हा- आम्हां सामान्य जनांचे काय? रोज भांडणे, मारामार्या, खून, खंडणी यांसारखे प्रकार पहावे, ऐकावे आणि वाचावे लागत आहेत. का कुणी तरुण आदर्श नागरिक बनू शकत नाही? का कुणी आदर्श समाजसेवक बनू शकत नाही? सगळ्यांनाच तोडफोडीचं आकर्षण का आहे? याचा विचार पालक म्हणून प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने माझ्या हाताखालचा विद्यार्थी का आदर्श नागरिक बनू शकत नाही, याचे चिंतन करायला हवे. आपल्याकडे अनेक क्षेत्रात संधी आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातल्या तरुणांनी ठरवले तर बरेच काही घडू शकते. महासत्ता तर कधीच झाली असती. क्रीडा क्षेत्रात चीन सोडून द्या,पण छोटे छोटे देश पन्नास-शंभर सुवर्णपदके सहज खिशात टाकून जातात. आम्ही मात्र सात- आठ सुवर्णपदकांवर आनंदोत्सव साजरा करतो. अशी भरारी मारण्यासाठी अनेक क्षेत्र खुले आहेत. पण आम्हाला त्याची वाट पकडायचीच नाही, असे आम्ही ठरवलेलो आहे. दादागिरी, अन्याय- अत्याचार, नशापान करण्यात आपला सारा वेळ खर्ची पडत असेल तर कशी होणार देशाची प्रगती?
     आज सैन्यात काम करणारे सिनिअर लोक धास्तावले आहेत. कारण आजच्या तरुण सैनिकांच्या हातात मोबाईल दिसत आहेत. तासनतास त्यांच्या हातात मोबाईल असल्याने त्यांच्यावर विसंबून राहायचा धोका पत्करायला वरिष्ठ तयार नाहीत. ही कहाणी एक वरिष्ठ सैनिक सांगत होता. ही परिस्थिती आपल्या सैन्याची असेल तर गल्ली-बोळात बापाच्या जीवावर जगणार्या तरुणांची काय वेगळी अवस्था असणार आहे? आपल्या देशात कौशल्य शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. अर्थात हे कौशल्य शिक्षण जुजबी आहे. जग फार पुढे गेले आहे. आज ड्रोनयुद्ध आपल्या उंबरठ्यावर आहे. घरात बसून लोक बँका, लोकांच्या खात्यावरचे पैसे लुटत आहेत. या क्षेत्रात फार मोठी कामगिरी,संशोधन  आपल्याकडून होण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे शिक्षण आपल्याकडे नाही. अजूनही आपल्या राजकारण्यांना लोकांनी चहा, वडा-पावच विकावा असे वाटत आहे. आणि आपण त्यावर टाळ्या वाजवून दाद देतो आहे, त्याचे समर्थन करतो आहे. शेवटी या देशाची सुत्रे कुणा एका अंबानीकडेच द्यायच्या हालचाली व्हाव्यात आणि आपण त्यांनी दिलेल्या फुकट रिचार्जवर आपला वेळ दवडायचा का? याचा विचार करायला हवा आहे.
     आपण अंगमेहनत करण्याचे सोडून द्यायला लागलो आहे. आपल्याकडे टॅलेंट आहे,पण ते वाया घालवत आहोत. आपल्याला या कौशल्याची वानवा जाणवू लागली आहे. ही कौशल्ये प्राप्त करायला मेहनत लागते. आणि या मेहनतीपासूनच आपण दूर चाललो आहोत. कारण राजकारण करायला मेहनत करावी लागत नाही.

1 comment:

  1. The National Testing Agency (NTA) has organized the Joint Entrance Examination (JEE) Head all over India, it is one of the National Level Entry Examination for Twelfth Students for taking admission in various Engineering courses in top IIT and NIT institutions. to read more click here

    ReplyDelete