काही माणसांना कितीही सांगा, सुधारणार नाहीत. त्यांच्यात बदल
हा होणे नाही. एका शाळेत एक मॅडम आहेत. त्यांना कितीही सांगा,मॅडम मुलांकडे लक्ष द्या,
शाळेत लक्ष द्या. पण फरक काही पडत नाही.
आपण कधी लवकर घरी जाऊ, दांडी कशी मारता येईल,
याचाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो. संधी
मिळेल तेव्हा, ते त्यांच्या वाच्येतून बाहेर पडते. अशा लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली तरी पालथ्या घड्यावर पाणी!
अर्थात अशी माणसं सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, असे नाही. करतात,पण पुन्हा ढेपाळतात.
स्टीक अप राहत नाहीत. आणि आपल्या निर्णयावर ठाम
राहिलो नाही तर आपल्यात बदल होणार नाही.
आपल्यात बदल करणं तसं कठीण असतं. पडिले इंद्रियास वळण... या उक्तीप्रमाणे
ते लवकर बदलणं कठीण आहे. यासाठी फार मोठी मेहनत करावी लागते.
यावर खूप काम करावं लागतं, हे मी म्हणत नाही.
डॉ. टीचिकी डेविस या प्रसिद्ध वेलबीइंग कोच यांचं
म्हणणं आहे. त्यांचे परपस ड्रिवन इंटरप्रिन्योरशिप: द टेन इंटरप्रिन्योरशिप स्किल्स यू नीड टू ट्रान्सफॉर्म योर लाइफ, स्टार्ट अ बिझनेस
यू लव ,एंड चेंज द वर्ल्ड हे फार प्रसिद्ध पुस्तक आहे.
बर्याचदा आपल्याला सुधरायचं असतं. आपल्यात सुधारणा करावयाच्या
असतात. रोज ठरवतो,पहाटे उठायचं,फिरायला जायचं. डॉक्टरांनीदेखील सांगितलंय, वजन फार वाढलंय, रोज फिरायला जात जा. पण सकाळी कितीही ठरवलं तरी उठायचं होत नाही. रात्री उशीरापर्यंत
टीव्ही पाहतो. झोप येत नाही. रात्री कुठे
अकरा-बारा वाजता झोप येत येते. डॉक्टरांचं
आणखीही एक म्हणणं असतं. किमान सहा तास तरी झोप झाली पाहिजे.
पण पहाटे पाच वाजता उठायचं म्हणजे कुठे सहा तास झालेले असतात.
असे काही तरी फालतू विचार करून आपला संकल्प आपणच मोडीत काढत असतो.
झोप ही सहा तास असो अथवा चार तास. ती गाढ झाली
की पुरे. पण आपण आपल्या आरोग्याबाबत जास्तच जागृत झालो आहोत.
त्यामुळे आपण आपली फारच काळजी घेतो आहे. पण खरी
काळजी आपण करतच नाही. तसे असते तर लवकर निजे,लवकर उठे, त्यास आरोग्य लाभे, याचा
का मग विसर पडतो? तर हे आपलं असं आहे.
बॉस कितीही ओरडला तरी हा ढिम्मच! कारण काही होत नाही. उलट काही लोकांना
याचे कारण दुसर्यावर फोडायला आवडतं. त्यांनी
मला वेळेवर फाईल दिली नाही. त्यामुळे माझं काम वेळेत पूर्ण झालं
नाही. आपली जबाबदारी दुसर्यावर ढकलली की
काम झाले. ऑफिसच्या कामात घरच्या कामाची कारणं सांगायची.
हा अलिकडचा लाडका फंडा. घरचे रडगाणे ऐकवले की,
बर्यापैकी सांत्वनता मिळते. पण बॉस जेव्हा उखडतो, तेव्हा त्याची भंबेरी उडते.
सगळ्यांनाच मुलं-बाळं आहेत,त्यांच्या त्यांच्या समस्या आहेत. सगळ्यांनी तीच कारणं
सांगत बसला तर बॉसला आपला गाशा गुंडाळून वनवासात जावं लागेल. सरकारी खात्यात मात्र याची मोठी चलती आहे. शेवटी सरकारी
ते सरकारीच! इथे कुणी कुणाला विचारतच नाही. सवलत कशी मिळवता येते, याचीच संधी शोधली जाते.
त्यामुळे कामे निपटायची राहून जातात. साहजिकच सरकारी
काम अन सहा महिने थांब, ही म्हण त्यांना सार्थ ठरवायची असते.
संधी, सवलत मिळवायच्या नादात आपण फार काही गमावत असतो. आपण
आपले कर्तव्य विसरत असतो. आपल्यावर काही नियम बांधायचे असतात.
स्वत:वर काही शिस्त लावायची असते. ती आपण करू शकत नाही. सुधारणा सुधारणा तर हीच असते.
स्वत:ला चांगली सवय लावायची, वेळच्यावेळी कामाचा निपटारा करायचा. प्रत्येकाच्या अंगी
सर्जनशीलता हा गुण असतो. त्याचा वापर करून बॉसकडून शाबासकी मिळवण्यासाठी
काही नवं त्याच्यापुढे मांडायला हवं. बॉस फक्त त्यालाच संधी देतो,
सवलत देतो, त्याचंच ऐकतो, अशी आपण तक्रार करतो, तेव्हा आपलं काही तरी चुकलं आहे,
याचा विचार आपण करत नाही. आपण आपल्यात बदल करत
नाही,पण दुसर्याने बदलावे,याचा मात्र विचार करत असतो. अशा विचाराने आपण सुधारणार
आहे का?
कित्येकदा मी अशी माणसम पाहिली आहेत. त्यांना आयुष्यात
काही कमवायचंच नाही, मिळवायचच नाही. आहे
ना नोकरी. खूप झालं. कितीही राबलं तरी तिथंच
आहे. पण काही मिळवायचं असेल तर काही करायचं असतं. हे डोक्यात यायला हवं. अशी माणसं मेलेल्याहूनही मेल्यासारखं
जगत असतात. काही आनंद नाही,उत्साह नाही.
नवं शिकण्याची ऊर्मी नाही. आपली आवड आहे,
तीदेखील जोपासायची नाही. अशा जीवनाला काय अर्थ
आहे? मी अशी काही माणसं पाहिली आहेत, ज्यांनी
नोकरी-धंदा सांभाळून आपला छंद जोपासला आहे. आणि याच छंदाने नंतर त्यांना भरपूर पैसा मिळवून दिला आहे. मग या लोकांनी ही नोकरी सोडून छंदालाच व्यवसाय-धंदा केला.
आज ही माणसं सुखात- आनंदात आहेत. आपल्याला असं काही स्वप्न का बाळगता नाही येणार? आपण
जिथे पहाटे लवकर उठण्याचा संकल्प पूर्णत्वास नेऊ शकत नाही,तिथे
मोठी स्वप्नं कोठून बाळगणार? आपण खरोखर, कसोशीने पूर्ण प्रयत्न केला तर काहीच शक्य नाही.यावर
विश्वास ठेवायला हवा.
No comments:
Post a Comment