Sunday, August 12, 2018

(बालकथा) फुलांची मुलं


     इकेता जपानच्या पर्वत घाटीत राहत होता. त्याला फुलं फार आवडायची. त्याने आपल्या बागेत फुलांची हरतर्हेची रोपं लावली होती. त्यातल्या त्यात गुलबकावलीची रोपं अधिक होती. गुलबकावलीची फुलं उमलायची तेव्हा त्याची बाग रंगीबेरंगी फुलांनी फुलून जायची. सुगंधाने बाग दरवळायची.

     एकदा वसंत ऋतुत फुलं उमलण्याअगोदरच इकेता आजारी पडला.त्याला फार वाईट वाटलं की, आता आपल्याला फुलांची देखभाल करता येणार नाही. एके दिवशी आजारी इकेता खिडकीतून बागेतल्या फुलांकडे पाहात होता.तेवढ्यात त्यानं पाहिलं की, खुपशी छोटी छोटी मुलं गुलबकावलीच्या फुलांवर नाच-गाणं करत आहेत. मुलांचा खेळ आणि त्यांचे नृत्य पाहण्यात रममाण झाला. त्यांचा खेळ पाहून त्याला फार आनंद झाला.
     त्याने आवाज देऊन मुलांना आत बोलावलं. सगळी मुलं त्याच्याजवळ आली. ती म्हणाली, “ आम्ही फुलांची मुलं आहोत.तू आजारपणामुळं दु:खी-कष्टी झाला आहेस. तुझे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच इथं आलो आहोत.” इकेताने फुलांच्या मुलांना म्हटले, “ तुमचा नाच मला फार आवडला. मला खरंच खेद आहे,मी माझ्या लाडक्या फुलांची काळजी घेऊ शकत नाही. आता यापुढेही पुन्हा त्यांची काळजी घेईन, असे वाटत नाही. माझी तब्येत आणखीच खालावत चालली आहे. ”
     मुले त्याचे बोलणे ऐकून फक्त हसली. ते इकेताला म्हणाले, “ चला, गुडबाय. आता आम्ही उद्याला येऊ. ” आणि बाहेर जाऊन ती गायब झाली.
     दुसर्यादिवशी खिडकीकडे डोळे लावून इकेता मुलांच्या येण्याची वाट पाहू लागला. एवढ्यात त्याने पाहिले की, सूर्याच्या किरणांसारखी मुलं फुलांवर नाचत होती. काही वेळ फुलांवर हुंदडल्यावर सगळी मुलं एकत्र खिडकीजवळ जमली.
मुलांनी विचारलं, “ आता कशी आहे तब्येत? कालच्यापेक्षा बरी आहे ना? ”
     इकेताने अशीच होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात एक मुलगा हवेत उडाला. हवेत तरंगत तो इकेताच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या हातात एक पान होते, त्यावर दवाचे काही थेंब चमकत होते. तो इकेताला म्हणाला, “ मी तुमच्यासाठी फुलांचे दव आणले आहेत. हे पिऊन घे. तुला बरं वाटेल. ”
     मुलाचे मन राखण्यासाठी म्हणून त्याने ते थेंब पिऊन टाकले. सगळे टाळ्या वाजवून म्हणू लागले, “ आता तुम्ही लवकर बरे होणार? ”
इकेताला त्यांच्या या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण काही वेळातच त्याला बरे वाटू लागले. एका आठवड्यात तो खडखडीत बरा झाला. आता तो पुन्हा आपल्या लाडक्या फुलांची काळजी घेऊ लागला. पण फुलांची मुलं पुन्हा कधी दृष्टीस पडली नाहीत. काळ पुढं चालला. इकेता म्हातारा झाला. त्याने खाट धरली.
     फुलांची मुलं पुन्हा एकदा त्याचे मनोरंजन करायला अवतरली. ते त्याच्या खाटेभोवती फेर धरून नाचू लागली. इकेताने त्यांना दवाचे थेंब आणायला सांगितले. मुलांनी समजावलं, “ या खेपेला आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहोत. आता तुम्ही वृद्ध झाला आहात. तिथे तुम्ही आमच्यासोबत राहायचे,खेळायचे. तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. ”
     वृद्ध इकेताला त्यांच्या बोलण्याचा अर्थ उमजला नाही. काही वेळात त्याचा मृत्यू झाला. फुलांच्या मुलांनी येऊन त्याचा आत्मा ढगांमध्ये नेला. तिथे त्यांनी त्याला खूप आनंदात ठेवले. त्याची काळजी घेत. त्याला एकटे-दुकटे कधी सोडून जात नसत.मुले विसरली नव्हती की, ज्यावेळेला ते फुलं होऊन इकेताच्या बागेत उमलली होती, त्यावेळेला त्याने त्यांची खूप काळजी घेतली होती.

No comments:

Post a Comment