Saturday, August 18, 2018

पतसंस्थांकडील गुंतवणूक कोणत्या आधारे करावी?


     आपल्याकडच्या बँकांमधल्या गैरव्यवहारामुळे लोकांना पैसे कुठे गुंतवायचे आता कळेनासे झाले आहे. मोठी लोकं लाखो,कोटीने बँकांना सहज गंडा घालतात आणि मोकाट फिरतात. पण तिथेच साधा माणूस असेल किंवा शेतकरी असेल तर त्यांच्या मागे लागून मात्र त्याच्या नाकीनऊ आणतात. बँकांच्या या कटकटीतून शेवटी तो आत्महत्याच करतो, दुसरे काही त्याला जमत नाही. दुसरीकडे बँकांना लाखो-कोटींचा गंडा घालणारे बँकांनाच शहाणपणाचे डोस पाजून आपण कसे बरोबर आहोत,हेच सांगत सुटतात. राजकारणी लोकांशी लागेबांधे असल्याने अशा लोकांचे काही एक वाकडे होत नाही. शेतकर्याला कोणी वाली असत नाही. शेतकरी आणि सामान्य माणूस यांच्या मुंड्या पिरगाळूनच ही माणसे मोठी झालेली असतात. बँका असोत किंवा पतसंस्था,या सर्वच क्षेत्रात राजकारण्यांचा,ठग्यांचा राजरोस वावर आढळून येतो. यांच्यामुळे अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या आहेत. सहकारी साखर कारखाने किंवा अन्य प्रक्रिया उद्योग, सुतगिरण्या अशा अनेक संस्था अशा लोकांनी गिळंकृत केल्या आहेत. सांगली,बुलढाणा अथवा सोलापूर जिल्ह्यातल्या डबघाईला आलेल्या सहकारी संस्था या काही उदाहरणादाखल देता येतील.

      या सगळ्यामुळे लोकांनी गुंतवणूक कोठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान लोकांना किंवा शेतकर्यांना मोठ्या किंवा राष्ट्रीयकृत बँका त्यांच्या पायरीवरदेखील उभा करून घेत नाहीत. त्यामुळे कित्येकांना सहकारी पतसंस्थांचा आधार घ्यावा लागतो. पण इथेही याहून बिकट अवस्था आहे. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या पतसंस्थांचे दिवाळे निघाले आहे. तरीही लोकांना यांचा हा आधार लागतोच.  आपल्या राज्यात आजच्या घडीला सुमारे 13 हजाराहून पतसंस्था आहेत. या संस्थांमध्ये सुमारे 70 हजार कोटींच्या ठेवी आहेत. माणसे आपल्या मुला-मुलींची लग्ने करण्यासाठी किंवा दवाखाना खर्चासाठी पैशांची गरज म्हणून गुंतवणूक करतो. पण ऐनवेळी हे पैसे उपलब्ध होत नाहीत. आपल्या गरजेला हे पैसे मिळत नसतील तर या पतसंस्थांची आपल्याला गरजच काय, असा प्रश्न निर्माण होतो.
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अत्यंत तोकड्या व्याजाने ठेवींवर व्याज मिळते. त्याच्यापैकी दोन-ते तीन टक्क्यांपेक्षा अधिक व्याज या पतसंस्थांमध्ये मिळते. त्यामुळे हा लाभ लक्षात घेऊन लोक पतसंस्थेला ठेवीसाठी निवडतात. मात्र इथेही गैरव्यवहारांचा बाजार भरलेलाच आहे. त्यामुळे पतसंस्थांमध्ये पैसे गुंतवताना काही प्रमाणात काळजी ही घ्यावीच लागते. त्याशिवाय आपल्या ठेवींना संरक्षण मिळणार नाही. अलिकडे पतसंस्थांच्या ठेवींनादेखील विमा संरक्षण देण्याचा विचार चालू असल्याचे वाचनात आले आहे.पण तरीही पतसंस्थांमध्ये पैसे गुंतवताना काळजी ही घेतलीच पाहिजे.त्यामुळे लोकांनी पतसंस्थांच्या लेखाजोखांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. अर्थात यातही गोलमाल करून बँका आणि पतसंस्था चांगली श्रेणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी सलग तीन-चार वर्षांचा लेखाजोगा पाहायला हवा.त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा. सध्या सर्वत्र पतसंस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन केले जात आहे. बँकासुद्धा ग्राहक मिळवण्यासाठी नानातर्हेच्या क्लृप्त्या करताना दिसत आहेत. त्यामुळे साधारणपणे सभासद व ठेवीदारांनी ठेवीत तसेच कर्जवाटपात झालेली वाढ याबाबी नक्कीच तपासून पाहायला हव्यात.
     पतसंस्थांचे वार्षिक अहवाल पाहताना थकीत कर्जाचे प्रमाण पाहायला हवे. दहा टक्क्यांपेक्षा अधिक थकीत कर्जाचे प्रमाण असेल तर काळजी करण्याची गोष्ट आहे. 5 टक्क्यांच्या आत असेल तर परिस्थिती उत्तम आहे, असे समजावे. पाच ते दहा टक्क्यांपर्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे समजावे. अनुत्पादित कर्जाचा (एनपीए) आकडाही पाच टक्क्यांपर्यंत असल्यास उत्तम तर पाच ते 15 टक्क्यांपर्यंत ठीक आहे,पण त्यापेक्षा अधिक असेल तर मात्र गंभीर विचार करण्यासारखी परिस्थिती आहे, असे समजावे.
जाणकारांच्या मतानुसार वैधानिक लेखापरीक्षक संस्थेचे लेखापरीक्षण करताना कर्ज प्रकरणांच्या तारण मालमत्तेची गुणवत्ता, संचालकांचे कर्जवाटप आणि वसुलीची धोरणे तसेच त्या धोरणांचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम यांचे विश्लेषण विचारात घेतले जातात. या सगळ्याच गोष्टींच्या नोंदी लेखापरीक्षण अहवालात केलेल्या असतात.त्यामुळे ठेवीदार सभासदांनी या अहवालातील गंभीर दोष लक्षात घेऊन ठेवी ठेवण्याचा विचार करायला हवा.
     आणखी एक महत्त्वाचे म्हणजे लेखापरीक्षणातील गुणांकन हे सीएएमईएल रेटिंग पद्धतीने केले जात असते. यातल्या गुणांकणानुसार 100 ते 75 टक्क्यांपर्यंतच्या गुणांसाठी अ वर्ग दिलेला असतो. 74 ते 61 टक्के यासाठी ब वर्ग आणि 60 ते 51 साठी क वर्गाची तरतूद केलेली असते. विशेषत: बहुतांश पतसंस्थांचे लेखापरीक्षण अ वर्ग असल्याचे आढळून येते. अशावेळेला त्यांचे गुणांकन लक्षात घ्यायला हवे. ज्यांचे कामकाज 90 पेक्षा जस्त असेल, ते परिपूर्ण असल्याचे समजले जाते. याचा विचार केल्यास आपण कोणता वर्ग मिळाला आहे,याचा विचार करण्यापेक्षा पतसंस्थेला 100 पैकी किती गुण मिळाले,याचा विचार करावा. संस्थेकडून या गोष्टी विचारून पुढचे पाऊल टाकायला हवे. खराब कामगिरी असेल तर आपल्याला येथील गुंतवणूक जोखमीची आहे, असाच विचार करायला हवा. आज इतके पोळत आहे की, आता कुठलीही गोष्ट फुंकून पिण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.सामान्य लोकांनी आपल्या चौकशा करण्याचे प्रमाण कमी नव्हे तर जास्त प्रमाणात करायला हवे. जोपर्यंत आपल्या समस्येचे निराकरण होत नाही, तोपर्यंत कुठल्याही संस्थेतील गुंतवणूकही जोखमीची आहे, या ध्यानात ठेवायला हवे.

No comments:

Post a Comment