Thursday, August 2, 2018

मेरा मन क्युं तुम्हें चाहे...


     माणसाचं मन मोठं विचित्र आहे. त्याच्याकडं निसर्गानं अनेक कला दिल्या आहेत.पण तो शेवटी आपली तुलना प्राणी आणि पक्षांशीच करताना दिसतो.जर तो शक्तीशाली असेल तर त्याची तुलना घोड्याच्या ताकदीशी करतो. तो म्हणतो, पहा त्याच्यात घोड्याचं बळ आहे. त्याने हवेत उडण्याचे यंत्र बनवले. विमानं,रॉकेट, हेलिकॉप्टर अशी ताकदवान यंत्रं त्याने बनवली.पण आजदेखील तो आकाशात भरारी मारणार्या पक्ष्यांशीच तुलना करतो. आपल्या शरीराच्या जाडीची तुलना तो हत्तीशी करताना दिसतो. कमी बुद्धीच्या माणसाची तुलना गाढवाशी करतो. प्रामाणिकपणासाठी कुत्र्याशिवाय दुसरा कुठला प्राणी त्याच्या मनात नाही. स्वार्थच्या तराजूमध्ये तो कोल्ह्याला टाकतो. राजाची तुलना जंगलचा राजा म्हटल्या जाणार्या सिंहाशीच करतो. सिंह हाच माणसाच्या समाजाचा खरा आदर्श आहे.

     माणूस सगळी कामं करू शकतो, त्याच्या डिक्शनरीत नाही हा शब्दच नाही. पण तरीही तो प्राणी-पक्षांमध्येच आपलं जग पाहात असतो. मग मला कधी कधी असा प्रश्न पडतो की, माणूस जसा प्राणी-पक्षी यांच्याशी आपली तुलना करतो, तसे हे प्राणी-पक्षी आपली तुलना माणसाशी करत असतील का?  पण असा निष्कर्ष काढणं वेडेपणाचाच भाग म्हणावा लागेल. कारण माणसानंच माणसाशिवाय अन्य कोणता प्राणी विचार करू शकत नाही,याचा शोध लावला आहे. ते लोक आपल्याला जसं ठेवलं आहे, त्यात प्रचंड सुखी असतील. परंतु, माणूसच असा एकमेव प्राणी आहे, जो त्याच्या स्वत:च्या आनंदाच्या आणि सुखाच्या क्षणीदेखील आनंदोत्सव साजरा करत नाही. पाण्याचे चार थेंब पडले तरी राना-वनातला मोर थुईथुई नाचायला लागतो. पण माणूस पावसाच्या दिवसांतही थंडी लागेल का म्हणून विचार करत रजई लपेटून बसलेला असतो. निसर्गाच्या फवार्याखाली आनंदाचा आस्वाद घेणं, स्वर्गीय आनंदापेक्षा वेगळा आनंद नाही. म्हणूनच माणसाचं मन विचित्र आहे, असं म्हटलं आहे.
     माणसाला जे मिळालं आहे,त्यात त्याला समाधान नाही, आनंद नाही. जे मिळालेलं नाही, ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो. या विचित्र किंवा वेड्या मनाची एक कमजोरीसुद्धा आहे, ती म्हणजे त्याला वाटत असतं की, त्याला सोडून सर्वजण आनंदात आहेत, खुशालीत आहेत. आणि याच आनंदाच्या शोधात तो भटकत असतो. भौतिक सुविधा त्याच्या पायाशी लोळण घेत असतानाही तो सुखी नाहीए. त्याला आणखी याहीपेक्षा अधिक मिळायला हवं, असं वाटत असतं. जीवनाचं सत्य मात्र वेगळंच आहे. माणसाचं वेड मन पहिल्यांदा भौतिक सुविधा मिळवायला धडपडतं,पण सगळ्या सुविधा मिळाल्यावर मात्र त्याचं मन वैरागी बनून जातं. तरीही कित्येकदा वैराग्याचा मार्ग पत्करला असतानाही बावरं मन जे मिळालं नाही, ते मिळवायची इच्छा बाळगून असतं.  
     माणसाच्या मनाचे हे बावरेपण दु:खाचे कारण असले तरीही त्याच्या यशालाही कारणीभूत तेच असतं. एक उद्योगी मुंगीकडून तो जीवन कसं जगायचं हे शिकून घेतो.  आयुष्याच्या या धावपळीने वैतागून गेलेल्या माणसाला अहोरात्र काबाडकष्ट करणारी मुंगी त्याला प्रेरणा देत राहते. त्याच्यात हिंमत निर्माण करते. तो अगदी बारकाईने पाहत असतो की, कसं वारंवार अपयशी होऊनही कोळीण जाळं विणण्यात यशस्वी होते. तिच्याकडून माणसाचं मन यशस्वी कसं व्हायचं, हेच शिकतं.  मन गायला उठतं तेव्हा कोकिळेचा मधुर स्वर त्याला साथ द्यायला येतं, शिवाय रागाला आल्यावर कावळ्यासारखं काव-काव करायचं विसरत नाही. त्याच्या जीवनातल्या यश आणि अपयशाचा मानक नेहमी ससा आणि कासवच राहिला आहे. तो सशासारखं झटपट सर्व काही मिळावं, अशी आशा बाळगून असतो. पण एक लय धरून मार्गक्रमण करतानादेखील प्रचंद यश मिळतं, हेही तो प्राण्यांकडूनच शिकतो.
     जे आहे त्याहीपेक्षा अधिक मिळायला हवं, या इच्छेमुळं तो स्वतंत्र प्राणी-पक्षांसारखं बनतो. पण सर्व काही शक्य नसतं. तेव्हा हे वेड मन त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतं. पंचतंत्रातल्या गोष्टी त्याला मार्गदर्शन करत राहतात. जंगलात प्राणी-पक्षी यांच्यात वाढलेल्या मोगलीला पाहून मनाला सुखद अनुभव मिळतो. माणसाच्या मुलाचे प्राणी-पक्षांच्या मुलांसारखे लाड करावेत, ही त्याच्यासाठी शिकवण असते. त्यामुळेच तो घरातदेखील सर्व सुविधा असतानाही प्राणी-पक्षी पाळत असतो.
     माणसाचं मन इतकंही काही वेड नसतं की, माणसानं आपल्या फायद्या-तोट्याचं गणित विसरून जावावं. तो कुत्र्याला यासाठी पाळतो की, त्याने त्याचे रक्षण करावं. त्याच्या स्वत:च्या मनोरंजनासाठी तो पोपट पाळतो. हा स्वार्थच त्याला प्राणी-पक्षांपासून वेगळा करतो. प्राणी-पक्षीसुद्धा स्वार्थी असू शकतील,पण माणसाच्या वेड्या मनासारखं ते दुतोंडी नसतं. स्वत:चा जीव संकटात असेल तर तो प्राण्याला-पक्षाला मारायलाही कमी करत नाही. पण हेच प्राणी माणसाने जीव घेण्याअगोदरच तेथून पळ काढतात. त्यांना ठाऊक असतं, शिकारी येईल, जाळं टाकेल. दाणे टाकेल. आणि त्याला बंदिवान बनवेल. माणसानं कितीही उंच भरारी घेतली, प्राणी-पक्षासांरखे कितीही बनण्याचा प्रयत्न केला तरी तो तसा बनू शकत नाही. कारण माणसाचा एक अर्थ त्याच्या लोभी असण्यात आहे. यालाच आपण वेड मन म्हणतो.

No comments:

Post a Comment