Saturday, July 7, 2012

स्त्री भ्रूणहत्या: समस्या आणि उपाय

     ध्या महाराष्ट्रात बीड, कोल्हापूर आणि सांगली  जिल्हय़ातील स्त्री भ्रूणहत्येची प्रकरणे राज्यभर गाजत आहेत. स्त्री भ्रूणहत्याप्रकरणी यापूर्वीच राज्य व केंद्र सरकारांनी कायदे केले आहेत. मात्र आता त्याची तीव्रता पाहता सरकारची आरोग्य व पोलिस खातीही खडबडून जागी झाली आहेत, त्यांनी आपली कारवाईची मोहिम आणखी तीव्र केली आहे. त्यामुळेच आणखी काही प्रकरणे उजेडात येत आहेत. हा डॉक्टर आणि लोकांचा निगरगठ्ठपणाच म्हणावा लागेल. स्त्री भ्रूण हत्येचा विषय चांगला गाजत असताना पैशाला चटावलेले डॉक्टर आपले कोणी वाकडे करत नाही, अशा आविर्भावात स्त्री भ्रूण हत्या करण्याचे पाप करत आहे. खरे तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कायद्यातही सुधारणा करून कठोर कायद्याची तरतूद  करण्याची गरज आहे.

     मागच्या  दशकामध्ये सुमारे १२ लाख स्त्री-भ्रूण हत्येची प्रकरणं घडली आहेत. देशातील लिंग-गुणोत्तर प्रमाण कमालीचे घटत चालले आहे.  दशकभरापूर्वी, १००० मुलांमागे ९२७ मुली असे लिंग-गुणोत्तर होते, ज्यात घसरण होऊन १००० मुलांमागे ९१४ मुली अशा धोकादायक आकड्यावर येऊन हे लिंग-गुणोत्तर स्थिरावले आहे. यापूर्वी आश्चर्यकारकरित्या १००० मुलांमागे ९४५ मुली असे लिंग गुणोत्तर होते. सध्या असलेले स्त्री-पुरुष विषमता प्रमाण अनेक सामाजिक समस्यांना जन्माला घालणार आहे. त्याची सुरुवातही कधीची झाली आहे.  याने अराजकाताच माजणार आहे.
स्त्री भ्रूणहत्येमागील कारणे
मुली म्हणजे डोक्याला ताप ही मानसिकता अद्याप संपलेली नाही. हुंड्यासाठी होणारा छळ, ठराविक काळात मुलीची घ्यावी लागणारी काळजी या आगामी काळात होणार्‍या त्रासाला घाबरण्याबरोबरच आणखी कारणांमुळे  लोक मुलीला जन्माला घालण्याचे टाळत आहेत. मुलगी हे परक्याचे धन आहे. तिच्या वाढवण्यावर, शिक्षणावर होणारा खर्च वायफट जाणार आहे. ही एक मानसिकता तयार झाली आहे. हुंडय़ामुळे किंवा आणखी काही वेगळ्या कारणांमुळे समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोट, मानसिक, शारीरिक त्रास या वैतागाला कंटाळून स्त्रिया आत्महत्येला कवटाळत आहेत. त्यामुळे आणखी बर्‍याच समस्या निर्माण होतात. या समस्यांना सामोरे जाण्याची भीती माणूस बाळगत आहे. उलट मुलगा म्हणजे  आयुर्विम्यासारखा वाटत असतो. तो मोठा झाल्यावर सोबत राहून आधार देतो. मरणानंतर मोक्ष देतो आणि आपला वंश पुढे चालवत राहतो, असे लोकांना वाटत असते. वास्तविक, वंशाचा दिवा पाहिजे म्हणणार्‍याला आपल्या पणजोबाच्या अगोदरच्या कुणाचेच नाव सांगता येत नाही, तरीही वंशाच्या दिव्यासाठी हट्टाहास केला जातो.
सोनोग्राफी वरदान पण...
सोनोग्राफी यंत्राद्वारे बाळाची गर्भात कशी वाढ होत आहे? गर्भातील मूल गंभीर आजाराने ग्रस्त आहे का?, त्याच्यात काही जन्मजात व्यंग आहे काआदी गोष्टी कळतात. त्यामुळेच  काही चाचण्या अस्तित्वात आल्या- अल्ट्रासोनोग्राफी , अम्निओसेन्टेसीस, कोरिओनिक विल्लस बयोप्सी इ. आणि हानिकारकरित्या केल्या जाणाऱ्या गर्भापातामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भपाताचा कायदा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी एक्ट १९७१ पासून भारतात लागू झाला. पण.. या गोष्टींचा गैरफायदा घेऊन काही वैद्यकीय क्ष्रेत्रातल्या मंडळींच्या मदतीने लोक स्त्रीभ्रूण हत्या विनासायास करून घेतात. या सोयी प्रारंभ करण्यामागचा मूळ उद्देश कुठल्याकुठे हरवला आहे. गर्भात असणारे  मूल मुलगी आहे कळल्यावर कायद्याने संमत एखादे कारण निवडून गर्भपात केला जातो. डॉक्टर्सपण यात सामील असल्याने अपराध सिद्ध करणे अशक्य असते. या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्त्रियांनाही मुलगाच हवा असतो. कारण त्यांना सासरच्या मंडळींची भीती असते. त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून मान मिळवून घेण्याबरोबरच अशा एक ना दोन अनेक कारणांमुळे काही स्त्रिया मनाविरुद्ध का होईना पण गर्भपाताला तयार होतात. 

स्त्री भ्रूणहत्येचे परिणाम

स्त्री भ्रूण हत्या करण्याचे प्रमाण पुढे असेच सुरू राहिले तर अनेक कठोर समस्यांना,अराजकतेला  तोंड द्यावे लागणार आहे. एक वेळ अशी येईल स्त्रियांची द्रौपदीसारखी स्वयंवरे भरवावी लागतील. आणि  वर  वीरदक्षणा जाऊन वधूदक्षिणा पद्धत सुरू होईल. स्त्री भ्रूण हत्येमुळे  समाजात अविवाहित तरुणांची संख्या वाढते आहे तसेच लैंगिक अपराधांची संख्याही   वाढते आहे.  00 सालापर्यंत चीनमध्ये ३५ दशलक्ष अधिक पुरु ष असतील तर भारतात २५ दशलक्ष, असा सर्वे सांगतो. विवाहयोग्य मुलींची संख्या कमी असल्याने वयस्कर पुरुष तरुण मुलींशी विवाह करतात. याचा परिणाम - अधिक जनन क्षमता आणि  लोकसंख्याही वाढण्यात होत आहे.   
 स्त्री भ्रूणहत्येवर उपाय
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचे कर्तृत्व मोठे असल्याचे दिसत आहे. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही, ज्याचे स्त्रियांनी नेतृत्व स्वीकारलेले नाही. अगदी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्येही मुलीच आघाडीवर आहेत. असे असताना मुली नको म्हणणारे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत, याची जाणीव त्यांना आलेलीच नाही.  समाज रुढीला चिकटून, समाजाला घाबरून मुलाच्या प्रतीक्षेत स्त्री भ्रूण हत्या करणार्‍या पालकांना सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी बळ देण्याची आवश्यकता आहे. गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अशा संस्थांनी घेतल्यास या प्रकाराला बर्‍याच प्रमाणात आळा बसेल.  परवा गुरु पौर्णिमेच्या निमिताने शिर्डी देवस्थानला तब्बल चार कोटी पेक्षा अधिक संपत्ती लोकांनी अर्पण केली. अशीच मोठी संपती देशभरातल्या देवस्थानांकडे आहे. ही संपत्ती देशाची आर्थिक दैना संपवून टाकू शकते.  ही संपत्ती फारशी वापरात येत नाही. त्याचा काही संस्था वगळता सामाजिक कार्यासाठी विनियोग करत नाही. या पैशातून बर्‍याच गोष्टी हो ऊ शकतात. परंतु यात म्हणावी अशी प्रगती दिसून येत नाही. अशा संस्थांनीही मुलींच्या समप्रमाणासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शिवाय जी मंडळी मोठमोठ्या प्रमाणात देवस्थांना देणगी देतात. याच पैशातून अनेक गरीब मुलींचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाच्या सोयी होऊ शकतात. ही जबाबदारी त्यांनी घेतली तर बरेच साध्य होणार आहे. आगामी काळातील मोठ्या अराजकतेपासून देशाची सुटका होणार आहे. माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. देशसेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी वाक्ये केवळ पुस्तकातच राहिली आहेत. ती उपयोजनेत यायला हवीत.                                      

No comments:

Post a Comment