Monday, July 30, 2018

सुविचार संग्रह (भाग 3)


1)   यशापयशाने जी निष्ठा कमी-जास्त होते, ती खरी निष्ठाच नाही.-गोंदवलेकर महाराज
2)   भय आणि हव्यास यामुळे बुद्धीचा गैरवापर होतो.-निसर्गदत्त महाराज
3)   केवळ राख फुंकून अग्नी पेटत नाही,त्याप्रमाणे निव्वळ शब्दज्ञानाने खरे ज्ञान प्राप्त होत नाही.-संत ज्ञानेश्वर
4)   आपण आपल्या कर्तृत्वावर जोर देत गेलो तर आपले हक्क आणि अधिकार आपोआपच चालत येतात.- स्वामी रामतीर्थ
5)   शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान असते.-गोंदवलेकर महाराज
6)   शिखरापर्यंत पोहचण्यासाठी पायापासून सुरुवात करा.-महावीर स्वामी
7)   आपले जीवन कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाइतके अस्थिर आहे.-आद्य शंकराचार्य
8)   चुकार लोकांची गणती करताना माणूस स्वत:ला मोजायला नेमका विसरतो.-योगी अरविंद
9)   कर्तव्याचे विस्मरण होऊ नये याचीच केवळ काळजी असावी.-भाऊसाहेब महाराज (उमदीकर)
10) वेदांची अक्षरे पोथीत सापडतात तर वेदांचा अर्थ जीवनात शोधायचा असतो.- विनोबा भावे
11) आयुष्य आनंदाने जगण्यासाठी त्याबाबतची आसक्ती सोडून द्यावी.-महात्मा गांधी
12) वेळ- संधी येईल म्हणून वाट पाहात बसू नका ती आपल्या कर्तबगारीने आणा.-लोकमान्य टिळक
13) देशाभिमानाचा अतिरेक हा देशभक्तीच्या अभावाइतकाच दूषणास्पद आहे.- स्वातंत्र्यवीर सावरकर
14) वाईट माणसावर उपकार करणे हे चांगल्या माणसावर पकार करण्याइतकेच वाईट आहे.-व्यास
15) जे भूतकाळ वापरतात त्यांना लोकप्रियता मिळते तर जे भूतकाळ गाडतात त्यांच्या मनाला शांती मिळते.-न्या. महादेव गोव्ंद रानडे
16) खोटे बोलणार्यास शिक्षा हीच की तो खरे बोलला तरी लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.- भगवान बुद्ध
17) असत्य ही जिभेची मलिनता होय.-गुरुनानकजी
18) गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करेल.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
19) मी स्वत:लाच जेव्हा हसू शकतो, तेव्हा माझ्यावरील मी पणाचे ओझे कमी होते.-रवींद्रनाथ ठाकूर
20) चमत्कारांना शरण गेलेले मन संघर्षासाठी उठू शकत नाही.-डॉ. नरेंद्र दाभोळकर
21) कसे बोलावे हे ज्याला कळते तो वक्ता,पण काय बोलावे हे ज्याला कळते तो विचारवंत.- गो.के.मनोळीकर
22) मनाचे तळमळे। चंदनेही अंग पोळे॥-संत तुकाराम
23) पाकळ्या तोडून फुलांचे सौंदर्य काही कुणाच्या पदरात पडत नाही.- गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर
24) सज्जनांनी समर्थ बनल्याशिवाय रामराज्य अवतरणार नाही.-डॉ. मुकुंदराव दातार
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)

पाण्याबरोबर समृद्धी येईल


     इथली माती कसदार आहे, माणसं कष्टाळू आहेत. वागायला-बोलायला मधासारखी गोड आहेत. महत्त्वाचं म्हणजे कमालीची सहनशील आहेत. म्हणूनच तर गेल्या पन्नास वर्षात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण्यांच्या आश्वासनाला थकून जाऊनही फारशी कुरकुर केली नाही. पण तेवढ्यावर थांबलेही नाहीत. आपला मार्ग त्यांनी धरला आहे. पाणी येवो अथवा न योवो, शेती तर जम्म के करायचीच, असं इथल्या लोकांनी कधीचं ठरवून टाकलं आहे. त्यामुळे कमी पाण्यावर, ठिबक,तुषार या सिंचन प्रकारचा वापर करत इथला शेतकरी डाळिंब, द्राक्षे, पेरू,चिकू आणि आंब्याच्या बागा करत आहे. आता जत पश्चिम भागातल्या एका कोपर्यातून कृष्णेचं पाणी वाहत वाहत सांगोल्याला पोहचलं आहे. आता तीच दहा-बारा गावं हिरवाळली आहेत. त्यांना पाण्याचं मोल कळलं आहे. कृष्णा अशीच संपूर्ण तालुक्यातून खळाळत गेली तर तालुक्याचा शेतीच्याबाबतीत कोणी हात धरणार नाहीत आणि इथे औद्योगिक एरिया वाढल्याशिवायही राहणार नाही. शेतीत समृद्धी आली तर आपोआप सगळी सुबत्ता येईल. फक्त पाण्याची आस इथल्या लोकांना आहे.

     जत तालुका दुष्काळी म्हणून हिणवला जात आला आहे. पश्चिम भागातील, नदीच्या काठावरच्या मुली या भागात देण्याचं कुणीही अजून  धाडस करत नाही. याला पाणी हे एकच कारण आहे. या भागात इंडस्टीयल एरिया वाढला नाही,याला पाणी हे एकच कारण आहे. दूध-दुभत्याची जनावरे आहेत,पण दूध संस्था नाहीत. इथल्या बोकडाचे मटण एक नंबर! या भागात यावरचा प्रक्रिया उद्योग सहज भरभराटीला येऊ शकतो.पण पाणी नाही! काय म्हणून या ओसाड माळरानात जायचं, हा प्रत्येक उद्योजकाचा सवाल! कुसळं पिकणार्या जत तालुक्यात राजकारण्यांच्या कुरघोड्यांमुळं सहकारी संस्था चालू शकत नाहीत. या भागात कापूस फार मोठा पिकायचा.पण शासनाने या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही. त्यांना कधी प्रोत्साहन दिलं नाही. बहुतांश कापूस हा कर्नाटकात जायचा. पण आता कापूस पिकवण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर लगेचच काही वर्षात तालुक्यातील विधानसभा सदस्याची जागा आरक्षित पडली. पश्चिम भागातल्या राजकारण्यांनी या भागात राजकीय नेतृत्व उभं करू दिलं नाही. त्यामुळे दुष्काळानं मारलं आणि राजानं झोडलं,तर मग दाद कुणाकडे मागायची? अशी विवंचना या भागातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांची झाली. काही तरी करू म्हणणार्या लोकांना ऊस तोडणीचा मुकादम करून टाकला.
     आपले साखर कारखाने चालण्यासाठी माणसं नकोत का? मग जतला पाणी दिल्यावर ती आपल्या कारखान्यात कामाला कशाला येतील, असं कुणी तरी पश्चिम भागातल्या नेत्याने म्हटल्याचे तोंडातोंडी वायरल झालेले मेसेज इथे भरपूर आहेत. आताची एकूण परिस्थिती पाहता खरेच यात तथ्य होतं, असं म्हणायला जागा आहे. तालुक्याच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या झाल्या नाहीत. विकास निधी जादा येईल आणि विकास साधला जाईल, म्हणून तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा पुढे आला,पण त्याला तसाच गुंडाळून ठेवण्यात आला. फारच कुरकुर चालवली आहे,म्हणून तहसीलचे अप्पर कार्यालय सुरू करण्याचा फंडा राजकारण्यांनी शोधून काढला. त्यातही संखला कार्यालय झाले म्हणून उमदीवाले भलतेच खवळले. त्यांनाही शांत करण्याची कला सत्ताधारी मंडळींना चांगली  साधली, अप्पर तहसीलदाराने तीन दिवस संख आणि तीन दिवस उमदी, अशी अफलातून आयडिया काढून सगळ्यांची तोंडे बंद करून टाकण्यात आली. पण याचा नेमका काय फायदा तालुक्याला झाला. चार-दोन दाखले काय, शाळेतल्या पोरांना जिथल्या तिथे मिळू लागली. पण पुढे काय? काहीच नाही. शुद्ध फसवणूक!
     या अगोदर जतच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करू, असे काही नेत्यांनी,मंत्र्यांनी सांगितले. डी पल्स झोनमध्ये जतचा समावेश झाल्याचे काही नेतेमंडळींनी सांगितले,पण ते कधीच सत्यात आले नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आपल्या जतला कर्नाटकातून पाणी आणण्याची भाषा झाली,पण अजूनही यावर कर्नाटकच्या मंत्र्यांशी चर्चाच होते आहे आणि पाणीही येतच आहे. याच्याने खराच विकास साधला जाणार आहे का? तिकिट मिळवून विजय होण्यापुरतेच येथील पुढारी विकासाच्या गप्पा मरतात आणि इतर वेळेला सुईने टाके घातल्यासारखे यांची तोंडे बंद असतात. इथल्या लोकांना जतचा विकास हा फक्त जाहीर सभांमध्ये दिसला आहे. बाकी त्याच्या नावाने ठणाणाच आहे. खरे तर या सगळ्यांचे मागणे पाणी आहे,यामुळेच लोकदेखील हाक दिल्यावर फारसा प्रतिसाद देत नाहीत. पाणी,वीज, रस्ते या महत्त्वाच्या आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून किती तरी वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.हा लढा तसे तर चालूच आहे. नाही तर कपातल्या थंड चहासारखी त्याची अवस्था झाली आहे. कोणीही येतो आणि आश्वासनाची पुडी सोडून जातो. ही पुडी चगळतच आला दिवस ढकलण्याचा क्रम सुरू आहे.
     इथला सुशिक्षित हाताला काम नाही,म्हणून शहराकडे गेला. ऊसतोड मजूर आणि वीट भट्टीवर राबणारे हात दरवर्षी स्थलांतर करीत असतात. आता अलिकडच्या काही वर्षात कोकण भागात लोक जांभा दगड फोडायला जाऊ लागला आहे. बाकीच्या राहिलेल्या लोकांना राजकारण्यांचं काही समजत नाही. बघा, कसे वेड्यात काढलो,म्हणून ही मंडळी आनंदानं राहत आहेत. आता काही इथले लोक शिकत आहेत. शेतीत काही तरी करण्याची धडपड त्यांची सुरू झाली आहे. पण त्यांना खर्या अर्थानं यश मिळणार आहे ते बाहेरून पाणी आल्यावरच! दर दोन-चार वर्षांनी सुका दुष्काळ ठरलेलाच आहे. त्यामुळे पाण्याच्या कालव्याबरोबरच पाणीदेखील आले पाहिजे.
तालुक्यात डाळिंब, द्राक्षे यांचे क्षेत्र वाढत असले तरी त्याची व्यापारपेठ जवळ होण्यासाठी मिरज-जत-विजापूर रेल्वेसाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत. यामुळे औद्योगिकीकरणालादेखील चालना मिळू शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्याचे विभाजन! विभाजन झाल्याशिवाय विस्तार क्षेत्राने मोठ्या असलेल्या तालुक्याला निधी वाढीचा बोनस मिळून मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. रस्ते,वीज यांचा बॅकलॉग अजूनही मोठा आहे. तालुक्यातून हाय वे मार्ग जात असले तरी तालुकांतर्गत रस्ते अजूनही स्वातंत्र्यापूर्वीचे आहेत. काही गावांना अजूनही पक्के रस्ते नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अजून पूर्णपणे मिटलेला नाही. गेल्या कित्येक वर्षात जतला यंदा प्रथमच पाण्यासाठी टँकर लावावे लागले नाहीत. अर्थात याला गेल्यावर्षी चांगले झालेले पाऊसमान आणि जलशिवार योजना त्याचबरोबर पाणी व नाम फौंडेशनकडून झालेली जलसंधारणची कामे कारणीभूत आहेत. पण पूर्णपणे जलशिवार किंवा पाणी-नाम फौंडेशनला श्रेय देणे योग्य होणार नाही. यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
     दुधाचा आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय या भागात चांगला तग धरून आहे. पाणी आल्यावर यात आणखी वाढ होईल आणि शेतकर्यांच्या घरात सुबत्ता येण्यास मदत होणार आहे. आज दुष्काळ असूनही तालुक्याचे अर्थकारण अजूनही शेतीभोवतीच आहे. जर पाणी आले तर नक्कीच शेती उत्पादनात मोठी वाढ शक्य आहे. राजकारण्यांनी याबाबतीत फक्त राजकारण न करता पाण्यासाठी एकमेकांना पाठिंबा द्यायला हवा. त्याशिवाय तालुक्यात कृष्णेचे पाणी खळाळणार नाही. आर्थिक समृद्धीकडे जाणारी वाट ही पाण्याने भरलेल्या कालव्यांवरूनच जाणार आहे.  

Sunday, July 29, 2018

रीयल हिरो:सोनम वांगचूक


      आपल्या देशात क्रिकेटर आणि बॉलीवूडचे नायक हेच खरे हिरो आहेत. त्यांचेच अनुकरण सध्या आपली आजची पिढी करत आहे.पण खरे हिरो तर आपल्या आजूबाजूला असतात. पण आपलं त्याकडे लक्ष जात नसतं. मात्र याच हिरोंची स्टोरी एकादा बॉलीवूड नायक पडद्यावर साकारतो, तेव्हा खर्या अर्थानं आपलं लक्ष त्या रीयल हिरोकडं जातं. असाच एक हिरो आपल्या देशातल्या  श्रीनगर राज्यात असलेल्या बर्फाच्छित लडाखमध्ये शिक्षण म्हणजे डिग्री नव्हे तर ज्ञान  समजून खर्या अर्थानं शिक्षण देण्याचं कार्य करीत आहे. निसर्गातूनच प्रेरणा घेऊन त्याचा उपयोग करून पाणीटंचाई असलेल्या लडाखमध्ये पाण्याचा स्त्रोत निर्माण करणार्या अशा सोनम वांगचूक या रीयल हिरोला नुकताच प्रतिष्ठेचा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा एक त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरवच म्हणावा लागेल. शिक्षण हे पुस्तकात किंवा चार भिंतीत नाही तर खुल्या नैसर्गिक वातावरणात आहे,याचा वस्तुपाठ देणार्या सोनम वांगचूक यांच्या आयुष्यावर बेतलेला अमिरखानचा थ्री एडियट या चित्रपटातील फुनसूक वांगडूपेक्षा किती तरी पटीने अधिक सोनम यांचे कार्य आहे. स्वत: सोनमसुद्धा म्हणतात की, एकाद्या चित्रपटामुळे खरी माणसे ओळखली जातात, असे व्हायला नको आहे. पण आपल्या देशात परिस्थिती वेगळीच आहे. इथे नकलाकाराचा सन्मान केला जातो आणि जे खरे खणखणीत नाणे असते,ते मात्र दुर्लक्षित राहते.

     सोनम वांगचूक यांनी शिक्षणाची दिशा बदलली. पाठांतर, पुस्तक वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिणे या कागदी शिक्षणाला छेद देण्याचा प्रयत्न केला. मुलं जे शिकतात, ते त्यांना प्रत्यक्षात करता आले पाहिजे, व्यवहारात त्याचा उपयोग झाला  पाहिजे. तरच ती गोष्ट त्याला समजली असे होईल. असे शिक्षण सोनम वांगचूक यांच्या शाळांमध्ये दिले जाते. जी मुलं नापास होतात,त्यांच्यासाठी वेगळे वर्ग सुरू केले जातात. मुलं अभ्यासात कमी पडली असे नव्हे तर आपण त्यांना शिक्षण द्यायला कमी पडलो, असा त्याचा अर्थ सोनम लावतात. आज या शिक्षण संस्थांमधील मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत. काहींनी आपला स्वत:चा बिझनेस सुरू केला आहे. म्हणजे मुलांना समजेल, अशा प्रकारचे शिक्षण दिले तर मुलं ते लवकर ग्रहण करतात. त्यामुळे आपल्याकडची शिक्षणाची पद्धती बदलण्याची गरज अधोरेखित होते.
     शिक्षणाचा उद्देश फक्त डिग्री मिळवावी, असा असू नये, असे सोनम यांना वाटते. अशा या खर्या हिरोचे बालपण आणि शिक्षण काहीसे कष्टपद आहे. त्यांचे बालपण जम्मू-काश्मिरच्या लेह जिल्ह्यातल्या नयनरम्य परिसरात गेले. लडाखपासून काहीशा दूर असलेल्या अल्ची गावात त्यांचा जन्म झाला. या गावात एकही शाळा नव्हती. त्यामुळे त्यांना नवव्या वर्षांपर्यंत शाळेत जाता आले नाही. मात्र शिकलेल्या त्यांच्या आईने त्यांना घरीच शिकवले. वडील राजकारणी होते. नऊ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबासह ते श्रीनगरला आले. आईला मुलाच्या शिक्षणाची फार काळजी होती. त्यामुळे श्रीनगरमध्ये दाखल झाल्या झाल्या सोनमचे शाळेत अॅडमिशन केले.
     वांगचूक यांचे शाळेतले दिवस वाईटच होते. शाळेतील मुलांचा त्यांच्याशी असलेला व्यवहार हा फारसा चांगला नव्हता. त्यांचा तोंडावळाही वेगळा होता,त्यामुळे तिथल्या सहकार्यांची हा आपल्यातला नाही, अशीच भावना होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषेची अडचण. आई त्यांना लेहची स्थानिक भाषा शिकवायची,पण श्रीनगरला इंग्रजी किंवा उर्दू भाषेत शिकवले जायचे. त्यांना पुस्तकातले शब्द अजिबात समजायचे नाहीत. बोलतानाही मोठी अडचण यायची. ज्या ज्या वेळेला वर्गात सोनम यांना प्रश्न विचारले जायचे, त्या त्या वेळेला ते फक्त उठून गप्पगार उभे राहायचे. त्यांना हेच समजत नव्हते की, त्यांना काय विचारले जात आहे. त्यामुळे वर्गातली मुलं सोनमची खिल्ली उडवायचे. सगळेच म्हणायचे,हा मूर्ख आहे. कुणास ठाऊक कुठून आलाय हा मुलगा? सोनम शाळेतले ते दिवस आठवल्यावर आजही भावूक होतात.
     मात्र नंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली. भाषेची अडचणदेखील दूर होऊ लागली. वर्गातले काहीजण त्यांचे खास दोस्त बनले. अभ्यासाच्याबाबतीत त्यांचा दृष्टीकोन वेगळाच होता.  ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा होती. डिग्रीसाठी नाही. बारावीनंतर त्यांना मॅकेनिकल इंजिनिअरिंग व्हायचे होते. यावरून त्यांच्यात आणि वडिलांमध्ये वाद झाले. त्यांच्या वडिलांना आपला मुलगा सिव्हिल इंजिनिअर व्हावा, असे वाटत होते. वडिलांमध्ये सोनम आपल्या विरोधात जात असल्याची भावना निर्माण झाली.पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते.
     1987 मध्ये सोनम यांनी एनआयटी (श्रीनगर)मधून बीटेक पदवी मिळवली. इथेही घरच्यांना आपला मुलगा नोकरी करावा, असे वाटत होते. पण त्यांच्या मनात वेगळेच काही खदखदत होते. त्यांना त्यांच्या गावातले जुने दिवस आठवू लागले. ते लेहच्या बर्फाळ वाळवंटात राहणार्या मुलांना शिकवायचे होते. अशी मुलं, जी सुविधा नसल्याने शिक्षणापासून वंचित होती. डिग्री मिळवल्यानंतर ते आपल्या गावी लेहला परतले. इथे त्यांनी 1988 मध्ये स्टुडेंट्स एज्युकेशन अॅन्ड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाखची स्थापना केली. त्यांनी अशा मुलांना शिकवायला सुरुवात केली, जी शिक्षणात मागे आहेत. किंवा वारंवार एकाच वर्गात नापास होतात.
     त्यांचे हे अभियान यशस्वी झाले. त्यांच्या संस्थेतील शिकलेले विद्यार्थी पुढे इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ बनले. काही विद्यार्थ्यांनी आपला स्वत:चा बिझनेस चालू केला. आज ते मोठी प्रगती करत आहेत. सोनम वांगचूक सांगतात की, मला इंजिनिअरिंगमध्ये आवड होती. त्यामुळे मी बीटेक केले. आता मी या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करू इच्छितो. मला एक असे विद्यापीठ स्थापन करायचे आहे, जिथे मुलांनी ज्ञान मिळवायला हवे.
     सोनम यांनी 1994 मध्ये ऑपरेशन न्यू होप अभियान सुरू केले. याचे ध्येय होते, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. या दरम्यान सुमारे सातशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. याचे परिणाम चांगले समोर आले. लडाखमध्ये  दहावीत पास होणार्यांची टक्केवारी वाढली. यादरम्यान त्यांची अभिनेता अमिर खान यांच्याशी भेट झाली. त्यांच्या कार्यावर ते फार प्रभावित झाले आणि थ्री इडियट चित्रपटात अमिर खान यांनी जी फुनसुक वांगडू ही भूमिका साकारली, ती सोनम यांच्या जीवनावर आधारित होती.
     आणखी एक मोठं काम सोनम यांनी लडाख परिसरात केलं आहे. बर्फाच्छादित असलेल्या या प्रदेशात उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या मोठी होती. त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत मिळून विज्ञानावर आधारित हिमस्तूप बनवले. या नव्या अविष्कारामुळे जून-जुलै महिन्यातदेखील तिथल्या लोकांना पाणी मिळू लागले. त्यामुळे शेती करता येऊ लागली. कडाक्याच्या थंडीत बर्फाचे स्तुप बनवले जात आणि उन्हाळ्यात तेच स्तुप वितळून पाणी होई आणि त्याचा उपयोग लोकांना दैनंदिन वापरात होऊ लागला. वांगचूक सांगतात की, स्तूप बनवण्याची प्रेरणा मला चवांगच्या एका ग्रामीण नॉर्फेलपासून मिळाली. त्यांनी कृत्रीम ग्लेशियर्स बनवले होते. जवळ्पास 40 मीटर उंच स्तूपपासून 10 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणता येते. याशिवाय त्यांनी लेहमधला परिसर  सोलर ऊर्जेपासून उजाळून टाकला आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. 2008 मध्ये त्यांना रीयल हिरो आणि 2017 मध्ये ग्लोबल अवार्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चरने गौरवण्यात आले आहे. परवाच त्यांना प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

Saturday, July 28, 2018

आयुष्याच्या उतरंडीला नवा जोडीदार


     अलिकडे परदेशात वयोवृद्ध लोकांची करमणूक करायला, त्यांना आनंद द्यायला तरुण मुलं-मुली भाड्यानं मिळत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. ही तरुण मुलं त्यांची सेवा करतात, त्यांना हवं नको ते बघतात. दिवसभरातले चार-पाच तास ते या वयस्कर लोकांबरोबर घालवतात. यासाठी ते मोबदला घेतात.पण आयुष्याच्या शेवटाला एकाकी जीवन जगणार्या लोकांच्या जीवनात नवा उमंग, उत्साह ते आणत असतात. वृद्धांच्या चेहर्यावरचे हास्य आणि आनंद त्यांना पैशांपेक्षाही बरेच काही देऊन जातो. मात्र आता याचबरोबर आणखी एक ट्रेंड पश्चिमी देशात रुळतो आहे, तो म्हणजे साठीनंतर नव्यानं आयुष्य जगण्याचा,लग्न करण्याचा ट्रेंड! आयुष्याच्या शेवटच्या काळात एकटेपणा खायला उठतो,ही गोष्ट खरी आहे. परंतु, याला पाश्चात्य लोकांनी असा उपाय शोधून काढला आहे. अरे हो,पण हा प्रकार फक्त परदेशातच नाही तर आपल्या भारतातदेखील हळूहळू रुजत आहे.त्याची सुरुवात बर्यापैकी सुरू झाली आहे.

     परदेशातल्या लाइफस्टाइल मासिकांमध्ये,नियतकालिकांमध्ये अशा लग्नांची चर्चा जोरात आहे. एवढेच नव्हे तर अशा लग्नांना प्रोत्साहन देणार्या संस्थांच्या जाहिरातीही झळकत आहेत. या ट्रेंडनुसार अगदी ब्रिटेनपासून अमेरिकेपर्यंत साठ वर्षांपुढील लोक आपला नवा जोडीदार निवडून नवं आयुष्य जगताना दिसत आहेत. याला पुष्ठी देणारी ब्रिटेनची सरकारी आकडेवारी पुरेशी आहे. साठीनंतर लग्न करणार्या तरुणांच्या टक्केवारीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात महिलाही काही मागे नाहीत. 21 टक्क्यांसह महिलादेखील या ट्रेंडच्या हिस्सेदारी बनल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
     या नव्या चलनामध्ये फक्त पश्चिमी देशांची एकधिकारशाही नाही बरं का! भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात या प्रकारात आपली ओळख बनवू पाहात आहेत. कोलकात्यातल्या माजी विंग कमांडरचीच कथा घ्या. सपन असे काही तरी त्यांचे नाव आहे. 40 वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांच्या पत्नीला ते गमावून बसले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एका जोडीदाराची गरज भासू लागली. त्यावेळेला  त्यांचे वय 64 होते. त्यांच्यासोबत  त्यांची वयोवृद्ध आई होती. मुलं लग्नं करून अमेरिकेत सेटल झाली होती. सपन यांची इच्छा होती की, त्यांच्या दुसर्या लग्नाला त्यांच्या घरच्या सगळ्यांची सहमती असावी. मुले, त्यांचे इन लॉज, त्यांची आई आणि दिवंगत पत्नीचे भाऊ-बहीण असे सगळे. अर्थात त्यांना विरोध कुणीच केला नाही,पण सुरुवातीला मुलं अवघडल्यासारखं वागत होती, हे त्यांना जाणवलं. एका विवाह पोर्टलद्वारा त्यांनी देशातल्या विविध भागातल्या काही महिलांची मुलाखत घेतली होती. बर्याच ठिकाणांहून त्यांना नकार आला. मग एके दिवशी त्यांना सुजाता भेटली. त्यावेळेला त्यांचं वय होतं 62. त्या एका शाळेतून निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी सपन यांची प्रोफाइल पाहिली आणि त्यांच्याशी संपर्क केला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या नवर्याचे निधन झाले होते.
     त्यांना सपन यांना कॉल करायला बरेच दिवस लागले म्हणे! शेवटी त्यांनी हे धाडसी पाऊल उचललेच. अर्थात त्यावेळेला म्हणजे सुरुवातीला त्यांना फक्त आपल्याशी कुणी तरी बोलावं, असं वाटत होतं. मग सपन भेटले आणि त्यांचे लग्न करायचे पक्के झाले. सुजाता यांनीही पहिल्यांदा ठरवले होते की, संसार करण्याचा कसोशीने प्रयत्न करू, जर जमले नाही तर माघारी येऊ. पण आता त्यांच्या लग्नाला सात वर्षांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत.
     माझे एक स्टाफमेंबर होते. ते दोघेही शिक्षक. त्यांच्या पत्नी रिटायर्ड झाल्यावर एक-दोन वर्षातच वारल्या. तेही रिटायर्ड होते. मुलगा नव्हता,पण एक नातू होता. मुलगी नवर्याकडे होती. त्यामुळे त्यांच्या जेवणा-खाण्याचा प्रश्न होता. त्यांच्या जेवण-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी एका महिलेची व्यवस्था करण्यात आली. नंतर ते तिच्यासोबतच राहू लागले. कुणी काही म्हणायचा प्रश्न नव्हता,पण या नात्याला दुसरेच नाव दिले गेले. सर्वांच्या संमतीने दुसरी इनिंग खेळता येते आणि तसा प्रयत्न आपल्या देशातही सुरू आहे. एका मुलीने आपल्या आईचेच लग्न लावून दिल्याचे वाचण्यात आले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत. मुलामुलींच्या आणि नातेवाईकांच्या संमतीने आता अशी लग्ने होताना दिसत आहेत.
     गेल्या दोन-तीन दशकांपूर्वी तरी वयस्करांच्या लग्नाची गोष्ट कठीण होती. पण अलिकडच्या काही वर्षात हा ट्रेंड वाढला आहे. आज मेट्रोमोनियल पोर्टलवर आता आपल्याला सीनियर सिटीजन्सच्या अनेक प्रोफाइल्स पाहायला मिळत आहेत. काही सेवा तर अशा आहेत की, त्या फक्त दुसर्या लग्नासंबंधीच काम पाहतात. यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकडून नोंदणी करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. कंपेनियनशिप याचे मुख्य कारण आहे. ज्यावेळेला कामातून रिटायर्डमेंट घेतल्यावर, मुले आपापल्या कामात,कुटुंबात बिझी असल्यावर आणि जोडीदाराचे निधन झाले असेल तर ... मग एकाकीपण खायला उठते. कुणी तरी बोलायला, वेळ घालवायला हवं असतं. अलिकडे वयोमर्यादा वाढली आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सरासरी आयुष्य 32 वर्षे होतं, आता हेच वय सरासरी 67 इतके झाले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 10.38 कोटी लोक 60 वर्षांच्या वरचे आहेत. यातील बहुतांश सिंगल,घटस्फोटीत किंवा आपला जोडीदार गमावलेले आहेत. आणि ही मंडळी आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायला आसुसलेले आहेत.
     मुंबईमध्ये 15 वर्षांपूर्वी री-मॅरिजची एक साइट सुरू करण्यात आली होती. त्याच्या संचालकाचे म्हणणे असे होते की, सिनिरर्सच्या रजिस्ट्रेशनची संख्या सातत्याने वाढत होती. ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली होती, त्यावेळेला जवळपास 20 टक्के प्रोफाइल्स सिनियर्सची होती. असे सिनिअर सिटीजन्स केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातील अनिवासी भारतीयदेखील रजिस्ट्रेशन करत आहेत. तरीही वयस्करांचे लग्न लावणे तसे सोपे काम नाही. यात जोडीदार निवडताना जे मुद्दे येतात किंवा ज्या समस्या येतात, त्या युवा वर्गांपेक्षा फारच भिन्न आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलं,शेजारी-पाजारी, कुटुंब, नातेवाईक आणि समाजाकडून होणार्या विरोधाला अगोदर तोंड द्यावे लागते. प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला असतो की, या वयात लग्नाची काय आवश्यकता आहे. त्यांना का लग्न करायचे आहे? नंतर आरोग्य ही एक मोठी गंभीर समस्या असते.  क्रोनिक आणि अन्य आजार हा एक चिंतेचा विषय बनतो. आर्थिक स्थिरता ही आणखी एक समस्या आहे.
     संपत्ती ही विवादाचे मुख्य कारण असते. त्यामुळे याबाबतीत फारच जागरूक आणि व्यावहारिक राहावे लागते. मुले, नातेवाईक यांचे समाधान होणे महत्त्वाचे असते. संपत्तीची वाटणी व्यवस्थित व्हायला हवी. अनेक वृद्ध मुले,कुटुंब यांच्यामुळे पुनर्विवाह करत नाहीत. जर मुलांनी दुसर्या लग्नाला साथ दिली नाही तर त्यांना निर्णय घ्यायला आणि पुढे पाऊल टाकायला अवघड जाते. प्रत्येकाला एकच काळजी असते,लोक काय म्हणतील? वयस्क मुलांचे इन-लॉज काय म्हणतील? मुलांना आणखी एक नेहमी भिती वाटत असते, ती म्हणजे पैसे किंवा एसेट्समधील त्यांचा हिस्सा कमी होईल.
     यातून काही फायदेही आहेत. सिनिरर्सच्या विवाहामुळे काही चिंता आणि भेदभाव यांना पूर्णविराम मिळतो. उदाहरणच द्यायचे म्हटले तर सिनिरर्स जातीधर्माला आनंदाने निरोप देतात. जन्मपत्रिकेचा इथे संबंध येत नाही. विवाह समारंभदेखील साधेपणाने आणि कमी खर्चात होतात. अलिकडील काही लग्नाची उदाहरणे पाहिली तर आजची पिढी अशा लग्नाला स्वीकारताना दिसत आहे. काही मुलं आपल्या पालकांसाठी जोडीदार निवडण्यामागेही आपली महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतात. मुलं फुल टाइम कामात असतात किंवा दुसर्या शहरांमध्ये राहत असतात.त्यामुळे ही मंडळी आपल्या पालकांची सेवा करण्यास असमर्थ असतात. अर्थात हेही निश्चित की, दुसरे लग्न करताना निर्णय घेणं कठीण जातं. घटस्फोटीत प्रकरण असेल तर त्यामागची भूमिका जाणून घ्यायला वेळ लागतो. काही अशा लग्नांचा अंतदेखील ब्रेकअपमध्ये होतो. सामाजिक जीवनात काहीच निश्चित नाही. पण जर दोन लोकांमध्ये लग्नामुळे कंपेनियनशिप. आनंद आणि समाधान आयुष्याच्या उतरंडीच्या काळात  मिळत असेल तर मग त्यांनी लग्न का करू नये?

(बालकथा) वरदान


     बिहार राज्याच्या प्रेतशिला प्रदेशात गयासुर नावाचा एक दैत्य राहात होता. गयासुर अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस होता. तो ज्याला कुणाला पकडायचा,त्याला मारून टाकायचा. हजारो लोकांना त्याने आपल्या क्रुरतेचा बळी बनविला होता.
एके रात्री त्याने एक स्वप्न पाहिले. कोणी तरी त्याला सांगत होतं की, अशा प्रकारे कोणाची हत्या करणं पाप आहे. याचे फळ तुला भोगावेच लागणार.

     त्याचा परिणाम राक्षसावर झाला. तो पाप या शब्दालाच फार घाबरून गेला. मग काय! त्या दिवसापासूनच त्याचे जीवन पार बदलून गेले. त्याने वाईट कामांना तिलांजली दिली. जंगलात जाऊन तो भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन होऊन गेला. मोठी कठोर तपस्या करू लागला.
तहान-भूक विसरून गयासुरने शेकडो वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्याच्या या तपाने देव-देवतांचे सिंहासन डळमळीत झाले. त्यांनी त्याची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला,पण त्यात त्यांना यश आले नाही. आता त्यांना मोठी चिंता सतावू लागली. जर भगवान विष्णूने गयासुरला वरदान दिले तर, त्याला मारणे कठीण जाईल.हा आपल्याला सुखाने जगू देणार नाही. इंद्राला त्यांनी गयासुराचा तप भंग करण्याची विनंती केली. इंद्राने आपल्या दरबारातल्या सुंदर सुंदर अप्सरा गयासुराजवळ पाठवल्या. पण अप्सरादेखील त्याची तपश्चर्या भंग करू शकल्या नाहीत. यामुळे देवलोक तोंडावर आपटले. यामुळे ते आणखीच बिथरले.
     शेवटी सर्व देवतांनी हार पत्करली आणि ते ब्रम्हदेवाकडे गेले. म्हणाले, “महाराज, आता तुम्हीच आमचे रक्षण करू शकता. तुम्हीच गयासुरकडे जा. त्याची तपश्चर्या खंडित करा.”
     देवतांची चिंता पाहून नाइलाजास्तव ब्रम्हदेवांना त्याच्याकडे जावे लागले. परंतु, गयासुर तपस्येत इतका गढून गेला होता की,ब्रम्हदेव त्याच्याकडे जाऊन त्याचा तप भंग पावला नाही.ब्रम्हदेव गयासुरला म्हणाले,“ भक्ता, खूप झाले. तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. तुला कोणता वर मागायचा आहे तो माग.”
मला वर-बीर काही नको. तुम्ही मला भगवान विष्णूचे ध्यान करायला द्या, एवढेच.” गयासुर म्हणाला.
     ब्रम्हदेवदेखील रिकाम्या हाताने परतले. मग सर्व देवतांनी आपसात चर्चा केली. ते शेवटी भगवान शंकराला घेऊन गयासुराकडे गेले. ते म्हणाले,“ भगवान विष्णूच्या उपासनेसाठी आम्हाला एक यज्ञ करावयाचा आहे. यज्ञासाठी कुठेच योग्य असे स्थान मिळत नाही. यासाठी तुझे विशाल शरीरच योग्य आहे. तू संमती दिलीस तर आम्ही तुझ्या शरीरावर यज्ञकुंड बनवून यज्ञ करू.”
हे ऐकून गयासुर हसला. म्हणाला, “मी माझे शरीर भगवान विष्णूला अर्पण केले आहे. त्यांचा यज्ञ जर माझ्या शरीरावर होणार असेल तर यापेक्षा आणखी कोणते असे मोठे भाग्य माझ्यासाठी असणार आहे.”
     देवतांना आनंद झाला. त्यांनी गयासुराच्या पाठीवर यज्ञकुंड मांडले आणि यज्ञ करविला. यज्ञाच्या आगीतून भगवान विष्णू प्रकट झाले.  ते गयासुरला म्हणाले,“ भक्तराजा, तू दैत्यरुपात जे म्हणून काही पाप केले आहेस, त्याचे प्रायश्चित पूर्ण झाले आहे. आता तू पुण्याचा अधिकारी बनला आहेस. मी तुझ्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न आहे. माग, तुला कोणता वर मागायचा आहे,तो वर माग.”
प्रभू,मी तुमचा भक्त आहे. तुमच्या दर्शनाशिवाय मला आणखी काय हवं? मला मोक्ष नको आहे, कारण मी माझ्या आयुष्यात खूप लोकांचे प्राण घेतले आहेत. हजारो आत्म्यांना कष्ट दिले आहेत. माझी इच्छा आहे की, आता या अतृप्त आत्म्यांना शांतता प्रदान करावी.”
     विष्णू भगवान म्हणाले,“गयासुर, मी तुला असा वर देतो की, तुझ्या या क्षेत्रात कोणीही मृत्यू पावल्यास किंवा कोणा मरणार्याचे पिंडदान झाल्यास, त्याला लागलीच मुक्ती मिळेल. हे क्षेत्र गयाया तुझ्या नावाने ओळखले जाईल. सर्व धार्मिक लोकांना याचा परिचय होईल.”
गयासुराच्या शरीरावर भगवान विष्णूच्या चरणाचे ठसे उमटले. फल्गू नदीच्या पावन काठावर विष्णूपादनावाचे मंदिर उभारले गेले. गयासुराला भगवान विष्णूचे दर्शन मिळाले होते. त्याने आपले शरीर सोडले. तो भगवान रुपात सामावला गेला.
     ‘विष्णूपादमंदिराचे महत्त्व संपूर्ण जगात आहे. भारताशिवाय मॉरिशस, सुरिनाम,केनया,मलेशिया,इंडोनेशिया, नेपाळ आदी देशांमध्येदेखील विष्णूपादमंदिरे आहेत. पण गयाचे एक आपले महत्त्व आहे. हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी जातात. तिथे आपल्या पितृलोकांच्या नावावर पिंडदान, श्राद्ध करून त्यांना मुक्ती देतात.

Friday, July 27, 2018

(बालकथा) मांजराचे खाद्य


एकदा दक्षिण भारतात उंदरांनी मोठा उच्छाद मांडला होता. धान्याची कोठारेच्या कोठारे त्यांनी फस्त केली होती. शेवटी राजा कृष्णदेव राय यांनी इराण देशातून शेकडो मांजरांची आयात केली. प्रत्येक कुटुंबाला एक गाय आणि एक मांजर देण्यात आले. आणि त्यांना सांगण्यात आले की,गायीचे दूध मांजराला पाजायचे.त्याचा सांभाळ करायचा. तेनालीरामलादेखील एक गाय आणि एक मांजर मिळाले.
तेनालीरामने गाय आणि मांजर घरी आणले आणि राजाचा आदेश सांगितला. यावर तेनालीरामची पत्नी भडकली. म्हणाली,“ इथे माणसांच्या लेकरांना दूध मिळत नाही, तिथे गायीच्या दुधावर मांजर पोसायचे?”

तेनालीराम हसून म्हणाला,“ तू काही काळजी करू नकोस. तू फक्त पहात राहा.”
तेनालीरामने गायीचे दूध काढले. ते चांगले गरम केले आणि एका भांड्यात मांजराला प्यायला दिले. मांजराने त्यात तोंड घातले आणि त्याचे तोंड पोळून निघाले. पुन्हा म्हणून कधी त्याने दुधाच्या भांड्याला तोंड लावले नाही.
काही दिवसांनी राजाने सर्व लोकांना दरबारात आपल्या मांजरांना घेऊन यायला सांगितले. सर्वांची मांजरं टुणटुणीत,गुटगुटीत होती. फक्त तेनालीरामचे मांजर कृश, अगदी हडाचा सापळा होते. राजाने रागाने तेनालीरामकडे कटाक्ष टाकला.
तेनालीराम म्हणाला, “महाराज, काही लोकांच्या नशीबात सर्व काही असूनही काही नसल्यासारखे असते. हे मांजरदेखील असेच नशीबवान आहे. दूध मुबलक असूनही पित नाही.”
राजा कृष्णदेव रायचा तेनालीरामच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याने तात्काळ दुधाने भरलेले भांडे मागवले. पण मांजर दूध पाहून लांब जाऊन बसले. तेनालीरामने उपाय सांगितला. “महाराज, याला गायीच्या स्तनाला लावून पाजायला सांगा.”  राजाने गाय मागवली. मांजराचे दात गायीच्या स्तनात रुतले. गायीने मांजराला जोराची लाथ मारली. मांजर विव्हळत कुठल्या तरी कोपर्यात जाऊन बसले.
तेनालीराम हात जोडून म्हणाला,“महाराज, मांजरांचं खाद्य उंदीर आहे. गायीचे दूध तर अमृतासमान असते. आपल्या प्रजेला हे अमृत पिऊ दे. लहान लहान लेकरांना अमृत प्यायला मिळू दे. मग मुलंही धष्टपुष्ट होतील. देशाचं रक्षण करतील.” राजा हसला आणि त्याने तेनालीरामच्या विनंतीला संमती दिली.

(बालकथा) स्वप्नांचा चक्काचूर झाला,पण...


  आज शनिवार असल्याने संजू सकाळी सकाळी पायीच शाळेला निघाला होता. वाटेत त्याला एक सोन्याची चैन सापडली. त्याने इकडे-तिकडे पाहिले,पण आजूबाजूला कोणीच नव्हते. त्याने ती उचलून पँटीच्या खिशात टाकली आणि शाळेच्या दिशेने चालू लागला. थोड्या वेळाने मागून त्याचा वर्गमित्र आकाश सायकलवरून आला. संजूने त्याला थांबवले आणि चैन दाखवली. “ अरे,मला ही आत्ताच सापडली. कुणाची आहे काय माहित? आपण त्या चहाच्या टपरीवर बसलेल्या लोकांना विचारूया का?”
आकाश तसा व्यवहारात चतुर होता. तो संजूला म्हणाला, “तू गप्प रहा. मी विचारतो,काय विचारायचं आणि कसं विचारायचं ते. आता ही चैन गपचिप खिशात ठेव.”

आकाशने चहाच्या टपरीवर उभा राहिलेल्या आणि बाकड्यावर बसलेल्या लोकांना विचारले,“काका, जरा इकडे लक्ष द्या. मला एक वस्तू सापडली आहे. कृपया,तुमची एकादी वस्तू गेली असेल तर तपासून पाहा आणि मला सांगा.”
सगळ्यांनीच आपापले खिसे तपासले.कुणाच्याजवळ पिशव्या होत्या. त्याही चाचपून पाहिल्या.पण कुणाची काहीच वस्तू गेलेली नव्हती.त्यामुळे त्या सगळ्यांनी नकारार्थी माना हलवल्या. तिथून ते दोघेही पुढे निघाले. संजू आकाशला म्हणाला, “आता रे! याचं काय करायचं?”
आकाश म्हणाला,“ आता काय! ही चैन आता तुझीच झाली.”
अरे, पण ही खूप महाग असेल ना?” संजू
यावर आकाशने चैन हातात घेतली आणि तोलून बघितली. म्हणाला,“असेल पन्नास हजारांची!”
आकाशच्या बोलण्यावर हसत संजू म्हणाला, “तुला बरं रे माहित.ही पन्नास हजारांची आहे.”
आकाश म्हणाला,“गेल्याच आठवड्यात आईने एवढ्याच वजनाची एक चैन खरेदी केली होती. ती पन्नास हजाराची होती. ती मी तोलून पाहिली होती. म्हणून तुला सांगतोय.”
बोलत बोलत ते शाळेत पोहचले. बोलण्याच्या नादात त्यांना शाळा आलेलीही कळले नाही.
आकाशचे बोलणे ऐकल्यापासून संजू मनातल्या मनात खूश झाला होता. या चैनचा मालक आता मीच आहे, असे तो खात्री करून घेत होता. शाळा सुटल्यावर घरी परततानाही त्याच्या डोक्यात तोच विचार.  बाबांना किती दिवसांपासून सांगतोय, सायकल घ्यायला.पण घेतच नाहीत. आता मीच घेईन,ही चैन विकून. छानपैकी मला हवी तशी सायकल घेईन. सायकल घेऊन राहिलेल्या पैशांतून रमालासुद्धा काही तरी घेईन. रमाला व्हिडिओ गेम घ्यायचा आहे. तो घेतला तर तिला फार आनंद होईल. तरीही पैसे उरतील. हां मग आईलाही एक साडी घेऊ. टीव्हीत होम मिनिस्टरचे बांदेकरकाका देतात ती पैठणी साडी घेऊ. आई म्हणत असते, ही साडी तिला खूप आवडते. आई जाम खूश होईल.
यानंतर तो पैशांचा हिशोब लावू लागला. तरीही पैसे शिल्लक राहतात. मग बाबांनाही काही तरी घेऊ. बाबांचे मनगटी घड्याळ खराब झाले आहे. टाइम व्यवस्थित दाखवत नाही. त्यांना पैसे नसल्यानं कित्येक दिवसांपासून घड्याळ घेता आलेलं नाही.त्यांच्यासाठीही एक सुंदर घड्याळ घेऊ.
स्वप्नं पाहात पाहात संजू घरी आला. त्याला घरात काका दिसले. ते आजच गावाकडून आले होते. त्याला समजलं होतं की, काका खूप दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचे एक मोठे ऑपरेशन होणार होते. यासाठी त्यांना एक लाख रुपयांची निकड होती. त्यांच्याजवळ फक्त चाळीस हजार होते. आणखी साठ लाख रुपयांचा बंदोबस्त करावा लागणार होता.यासाठीच ते गावाकडून इथे आले होते.
त्याने पाहिले,बाबा काकांविषयी मोठ्या काळजीत होते. त्याचे बाबा काकांना म्हणाले,“माझ्या बँक खात्यावर तीस हजार रुपये आहेत. बाकीच्या पैशांची व्यवस्था कशी आणि कोठून करू?” दोघेही गप्प होते. कुणाला काहीच उमजत नवहते.  विचार करतच संजूचे बाबा बाहेर आले. मागे मागे संजू आला. तो बाबांसमोर उभा राहिला आणि त्याच्या उजव्या हातातल्या मुठीतली चैन खोलून दाखवली.
बाबांना सोन्याची चैन पाहून धक्काच बसला. यावर संजू म्हणाला, “बाबा, ही काय मी चोरून आणली नाही. वाटेत सापडली. सकाळी शाळेला जाताना. तिथल्या लोकांना विचारले,पण कुणीच आपली असल्याचे सांगितले नाही. तेव्हा आकाश म्हणाला, आता ही चैन तुझी झाली. म्हणून मी घरी घेऊन आलो. आता ती विकून तुम्ही काकांच्या ऑपरेशनसाठी पैसे उभे करा.”
बाबा गंभीर झाले. संजू तसा लहानच. भाबड्या मनाचा.त्याला काय चांगलं, काय वाईट कसं कळणार?  त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले,“बाळा,ही कुणा दुसर्याची अमानत आहे. आपल्याला लगेच पोलिसांना कळवायला हवं. पोलिस त्याच्या मालकाला शोधून काढतील आणि त्याची अमानत त्याला सोपवतील.”
बाबांच्या बोलण्यामुळे त्याच्या सायकल आणि अन्य वस्तू घेण्याच्या स्वप्नाचा चक्काकूर झाला. पण त्याला आनंद याचा झाला की, बाबांनी त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. एवढ्यात आईदेखील तिथे आली. तिने त्यांचे बोलणे ऐकले होते. तिने संजूला जवळ घेतले आणि म्हणाली,“ परक्यांच्या वस्तूला आपले म्हणायचे नसते.”  संजू विश्वासपूर्वक म्हणाला, “ बाबा चला, पोलिस ठाण्यात जाऊ.” 

(बालकथा) मंगू बेडूक


     गावापासून काही अंतरावर एक विहीर होती. या विहिरीत मंगू बेडूक त्याच्या आई-बाबांसोबत राहात होता. मंगूचे मित्र विहिरीबाहेर पडून काही वेळ फिरून यायचे. फिरून आल्यावर ते मंगूला  बाहेरच्या गमती-जमती सांगायचे. त्यामुळे मंगूलाही कधी एकदा बाहेर जाऊ आणि ती न्यारी दुनिया पाहू असे झाले होते.पण आई-बाबा त्याला विहिरी बाहेर जायला परवानगी देत नव्हते. 
     एके दिवशी भल्या पहाटे विहिरीच्या काठावर कसली तरी हालचाल झाली. मंगूला जाग आली होती. तेवढ्यात त्याला विहिरीत काही सरपटत येत आहे, असे वाटले.खाली आल्यावर त्याला एक बादली दिसली. ती एका दोरीने बांधलेली होती. त्याच्या लक्षात आले.कुणी तरी महिला पाणी भरायला आली आहे. मंगूने घागरीत पाणी भरले जात असल्याचा आवाज ऐकला.त्याचवेळा त्याच्या डोक्यात एक आयडिया चमकून गेली. विहिरीतून बाहेर पडायला  ही एक नामी संधी आहे. आई-बाबा अजून झोपेत होते. जशी बादली विहिरीत पाणी भरायला आली,तशी त्याने टुणकण बादलीत उडी घेतली. 

     महिलेने बादलीतले पाणी घागरीत ओतले,तसे मंगू घागरीत जाऊन बसला. घागर डोक्यावर घेऊन आणि बादलीत हातात घेऊन महिला निघाली. मडक्याच्या पाण्यात बसलेल्या मंगूला फार आनंद झाला. शेवटी एकदाचा तो विहिरीच्या बाहेर आला होता.
घरी आल्यावर महिलेने घागरीवर झाकण ठेवले. मग जेवण करून आपल्या कामाला निघून गेली. आता आपण पुरते अडकलो,असे मंगूला वाटले. मडक्याच्या घागरीतून बाहेर कसे जायचे?तेवढ्यात त्याच घरात राहत असलेली म्हातारी मडक्यातील पाणी प्याली. पण ती त्यावर झाकण ठेवायला विसरली. संधी साधून त्याने वेळ न दवडता घागरीतून उडी घेतली. 
     म्हातारी बाहेर गेली होती. तेवढ्यात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. घराच्या एका कोपऱ्यात लहान मुलाला झोपवण्यात आले होते. तो झोपेतून उठला होता. मंगू विचार करू लागला, या मुलाला गप्प कसे करायचे?तो मुलाच्या समोर गेला आणि जोरजोराने उड्या मारू लागला. ते पाहून मूल  रडायचा थांबला. पण पुन्हा थोड्या वेळाने तो रडायला लागला. आता मंगू आपले पोट मोठमोठ्याने फुगवू लागला आणि 'डरांव डरांव' असा आवाज काढू लागला. ते पाहून मूल भलतेच खूश झाले. त्याला पाहून हात-पाय हलवत हसू लागले. हे सगळे करता करता किती वेळ गेला  मंगूला समजलेच नाही.
     आता मंगूला त्याच्या आई-बाबांची आठवण येऊ लागली. त्याला त्याची वाटदेखील माहीत नव्हती. पण मंगू हिंमत हरला नाही. त्याला ठाऊक होतं की, आपल्याला  रात्रभर याच घरात थांबावं लागणार आहे. तो रात्री बादलीत जाऊन लपून बसला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे महिलेने कालच्यासारखी बादली नी घागर घेऊन विहिरीच्या दिशेनं निघाली. विहिरीत बादली सोडताच त्याने विहिरीत उडी घेतली. तिथे तर एकच कल्ला चालू होता. मंगूच्या आईची रडून रडून पार विचित्र  अवस्था  झाली होती. आपला मुलगा परत येईल की,नाही याची खात्री बाबांना नव्हती. बाकीचे मात्र मंगू परत येईल,तो खूप हुशार आहे, असे समजावत होते. मंगू आल्यावर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. त्याने विहिरीबाहेरच्या गमती सांगून वातावरणातला तणाव कमी केला. सगळ्यांनी मंगूच्या हिंमतीला दाद दिली. आईनं आपल्या हुशार पोराला उराशी धरलं.

Wednesday, July 25, 2018

(बालकथा) ढगाशी दोस्ती


     अमरबनातल्या एका वडाच्या झाडावर गौरी चिमणी तिच्या आई-बाबांसोबत राहत होती. गौरी फारच चंचल होती. दिवसभर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दंगा-मस्ती करायची. खेळायची-बागडायची. अभ्यासातही जाम हुशार होती. शिवाय  बनात कुठलीही स्पर्धा असो,तिला कुठलं ना कुठलं बक्षीस ठरलेलं असे. उंच उडण्याचा स्पर्धेत तर तिचा कुणीच हात धरू शकत नसे.
     गौरीला ढगांचा भारी नाद. त्यांच्याशी खेळायला आणि गप्पा मारायला तिला फार आवडे. एके दिवशी तिला अशीच लहर आली, चला , आज ढगांची सहल करू. मग काय, आले गौरीच्या मना,तिथे कुणाचे चालेना. मैत्रिणींना तर उंच उडण्याची भिती. त्यांनी स्पष्ट नकार दिला. निघाली गौरी एकटीच. भूरभूर नावाचा ढग तिला वरती येताना पाहात होता. ती जवळ आल्यावर त्याने तिचे जोरदार स्वागत केले. “ काय कमालीच उडतेस. आमच्या राज्यात ना आजपर्यंत एकही चिमणी आलेली नाही.तू पहिलीच आहेस.”  ती तिच्या या कामगिरीवर जाम खूश होती.

     दोघांची गट्टी जमायला वेळ लागला नाही. दोघांनी पकडा-पकडीचा खेळ सुरू केला. ढगाला तिच्यासोबत खेळायला खूप मजा येत होती. तो तिला खांद्यावर बसवून खूप उंच घेऊन जायचा,पुन्हा खाली आणायचा. ते दोघे खेळण्यात इतके दंग झाले होते की, गौरीला वेळेचे भानच राहिले नाही. अंधार दाटून येऊ लागला, तशी ती भानावर आली. घरची आठवण सतावू लागली. घरचे तिचे सगळेजण वाट पाहात असतील, याची जाणीव झाल्यावर ती बिथरली. भूरभूरचा निरोप घेऊन जाऊ लागली. पण काय? तिला उडताच येईना. भूरभूरसोबत खेळताना तिचे पंख भिजले होते. पंख जड झाले होते. गौरीला काळजी वाटू लागली. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.
     भूरभूरला तिच्या डोळ्यांत पाणी पाहावलं नाही. म्हणाला, “ काळजी करू नकोस,गौरी! उद्या तुझे पंख सुकतील तेव्हा जा. आज आमच्याकडेच राहा. माझ्या आईला तुला पाहून फार आनंद होईल.”  गौरी उदासपणे म्हणाली,“ मी घरी गेले नाही तर सगळे माझी काळजी करतील. मला सगळीकडे शोधतील. बिचारे! रात्रभर झोपणारसुद्धा नाहीत.मला कसल्याही परिस्थिती घरी जावं लागेल.”
     भूरभूरला गौरीची अडचण लक्षात आली. म्हणाला,“ थांब! मी आईला सांगून येतो आणि तुला सोडायला येतो.” भूरभूरला सांगून यायला वेळ लागला नाही. मग गौरी भूरभूरच्या पाठीवर बसून म्हणाली, “ हं चल, लवकर.पुन्हा तुला माघारी यावं लागणार आहे.”
भूरभूर उडाला. “ आता तू तुझ्या घराचा रस्ता दाखवत राहा. मी कधी इतका खाली आलेलो नाही.”  गडद अंधार पसरल्याने गौरीलाही काहीच दिसेना. तीही येडबडली. यापूर्वी कधी ती इतक्या रात्री घरट्यातून बाहेर आलेली नव्हती.
     “गौरी...गौरी...”  इतक्यात कुणाचा तरी गोड आवाज कानांवर पडला. तेवढ्यात तिला तिच्या झाडाजवळ राहणारा चमचम काजवा दृष्टीस पडला. त्याला पाहिल्यावर गौरीचा जीव भांड्यात पडला. ती चमचमला म्हणाली, “ जरा पुढे हो आणि भूरभूरला आपल्या घराचा रस्ता दाखव.”
     चमचम म्हणाला,“ अगं, मी तुलाच शोधायला निघालो होतो. तू परत न आल्याने तुझ्या घरातले सगळे काळजीत आहेत.” थोड्याच वेळात गौरी घरी पोहचली. तिला पाहिल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला.
     गौरीने भूरभूरची ओळख करून दिली आणि सगळे सांगितले. सगळ्यांनी भूरभूरला मनापासून धन्यवाद दिले. भूरभूर म्हणाला,“ यात कसले धन्यवाद? मला माझे मैत्रीचे कर्तव्य पार पाडावेच लागणार होते.”
      गौरी म्हणाली, “ आता पुढच्या वेळेला ना, माझ्या मैत्रिणींनाही तुझ्याकडे घेऊन येईन. त्यांना उंच भरारी कशी घ्यायची,याचे धडे देईन. आपण सर्वजण खूप खेळू, खूप मजा करू. आणि महत्त्वाचे म्हणजे सूर्यदादाच्या किरणांनी आमचे पंख सुकवून लवकर माघारी येऊ.”
बाबांनी गौरीला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले,“आमची गौरी, फार धाडसी आणि समजूतदार आहे. आपल्या चुकांतून शिकते पण कशाला भित नाही.” मग सर्वांनी भूरभूरला निरोप दिला आणि पुन्हा भेटण्याचे वचन दिले.